मोशे एक प्रेमळ मनुष्य
प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे इतरांबद्दल वाटणारी जिव्हाळ्याची भावना. एक प्रेमळ व्यक्ती आपल्या वागण्याबोलण्यावरून दाखवते की तिला तिच्या जवळच्या माणसांविषयी कसे वाटते; मग त्यासाठी तिला काही वैयक्तिक त्याग करावे लागले तरी.
मोशेने कशा प्रकारे प्रेम दाखवले?
मोशेचे देवावर अपार प्रेम होते हे त्याने कसे दाखवले? त्यासाठी १ योहान ५:३ मध्ये काय म्हटले आहे ते आठवा. त्यात म्हटले आहे: “देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” मोशेचे देवावर प्रेम होते आणि त्यामुळेच त्याने त्याच्या आज्ञा पाळल्या. शक्तिशाली फारोला तोंड देण्यासारख्या आव्हानात्मक गोष्टीपासून ते तांबड्या समुद्रावर काठी मारण्यासारख्या साध्याशा गोष्टीपर्यंत त्याने यहोवाचा शब्द न् शब्द पाळला. देवाने दिलेली आज्ञा पाळणे कठीण असो वा सोपे त्याने ती पाळली. बायबल म्हणते देवाने त्याला जे काही सांगितले ते “त्याने . . . केले.”—निर्गम ४०:१६.
मोशेने आपल्या इस्राएली बांधवांवरही प्रेम केले. इस्राएल लोकांना माहीत होते की त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी यहोवाने मोशेला नेमले आहे; त्यामुळे ते आपल्या व्यथा घेऊन त्याच्याकडे यायचे. त्याबद्दल बायबलमध्ये आपण असे वाचतो: “सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते.” (निर्गम १८:१३-१६) विचार करा, तास न् तास लोकांच्या व्यथा ऐकून तो किती गळून जात असेल! पण, मोशेचे लोकांवर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांना मदत करण्यास तो सदैव तयार असायचा.
लोकांच्या व्यथा ऐकण्यासोबतच त्याने आपल्या जवळच्या माणसांसाठी प्रार्थनाही केली. जे त्याच्याशी वाईट वागले अगदी त्यांच्यासाठीदेखील त्याने प्रार्थना केली! उदाहरणार्थ, मोशेची बहीण मिर्याम हिने मोशेविरुद्ध कुरकूर केली तेव्हा देवाने तिला शिक्षा दिली. तिला कोड झाले. त्या वेळी मोशेने, ‘चांगली अद्दल घडली’ असे म्हणण्याऐवजी लगेच तिच्यासाठी प्रार्थना केली: “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.” (गणना १२:१३) खरेच, प्रेमाचा झरा असलेली व्यक्तीच फक्त अशी निःस्वार्थ प्रार्थना करू शकत होती.
आपण काय शिकतो?
मोशेप्रमाणे आपणही आपल्या मनात देवाबद्दल अपार प्रेम विकसित करू शकतो. हे प्रेम आपल्याला “मनापासून” त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची प्रेरणा देईल. (रोमकर ६:१७) आपण मनापासून देवाचा हरएक शब्द पाळतो तेव्हा आपण त्याचे मन आनंदी करतो. (नीतिसूत्रे २७:११) शिवाय, आपल्यालाही त्याचा फायदा होतो. कारण, आपण जेव्हा खऱ्या प्रेमापोटी देवाची सेवा करतो तेव्हा आपण फक्त योग्य तेच करत नाही, तर ते आनंदाने करतो.—स्तोत्र १००:२.
मोशेचे अनुकरण करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांबद्दल निःस्वार्थ प्रेम विकसित करणे. आपले मित्र, आपले कौटुंबिक सदस्य त्यांच्या व्यथा घेऊन आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्यावरील प्रेम आपल्याला (१) त्यांच्या व्यथा लक्षपूर्वक ऐकण्यास; (२) त्यांना सहानुभूती दाखवण्यास; आणि (३) आपल्याला त्यांची किती काळजी वाटते हे दाखवण्यास प्रवृत्त करेल.
मोशेप्रमाणे आपणसुद्धा आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी प्रार्थना करू शकतो. काही वेळा ते आपल्याला त्यांच्या समस्या सांगतात तेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही असे आपल्याला वाटेल. आपण कदाचित असेही म्हणू, की “मी तुमच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो.” पण, हे कधीही विसरू नका की “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.” (याकोब ५:१६) आपल्या प्रार्थनांमुळे आपण कदाचित यहोवाला त्या व्यक्तीसाठी असे काही करण्यास प्रवृत्त करू जे त्याने कदाचित केले नसते. खरेच, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी प्रार्थना करणे यापेक्षा चांगले आणखी काय असू शकते!a
मोशेच्या उदाहरणावरून खूप काही शिकण्यासारखे आहे हे तुम्ही मान्य करणार नाही का? तो एक सर्वसाधारण मनुष्य होता, पण विश्वास, नम्रता आणि प्रेम हे गुण दाखवण्याच्या बाबतीत त्याने एक अनन्यसाधारण उदाहरण मांडले. आपण जितके त्याचे अनुकरण करू तितका आपल्या स्वतःला आणि इतरांनाही फायदाच होईल.—रोमकर १५:४. ▪ (w१३-E ०२/०१)
a देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात म्हणून आपण मनापासून त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. यावरील अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय १७ पाहा.