मशीहाची उपस्थिती व त्याचे अधिपत्य
“तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल.”—प्रे. कृत्ये १:११.
१, २. (अ) येशूचे स्वर्गारोहण झाल्यावर दोन देवदूतांनी त्याच्या प्रेषितांचे कसे सांत्वन केले? (ब) ख्रिस्ताच्या परत येण्याच्या संभाव्यतेबद्दल कोणते प्रश्न उद्भवतात?
जैतुन डोंगराच्या पूर्वेकडील उतारावर अकरा जण वर आकाशाकडे निरखून बघत होते. काही क्षणाआधी येशू ख्रिस्ताला त्यांच्यापासून वर घेण्यात आले होते, तो दिसेनासा होत गेला व मग ढगाने त्याला दृष्टिआड केले. या लोकांसोबत राहताना येशूने तो मशीहा आहे याबद्दल भरपूर पुरावा त्यांना दिला होता. ते त्याचा हृदयविदारक मृत्यु पाहण्यास व त्याचे अत्यानंददायक पुनरुत्थान बघण्यासाठी जिवंत होते. पण आता तो गेला होता.
२ आता एकाएकी दोन देवदूत दिसले आणि यांनी त्यांना समाधानकारकपणे सांगितलेः “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल.” (प्रे. कृत्ये १:११) केवढे ते सांत्वनदायक शब्द! येशूच्या स्वर्गारोहणाचा अर्थ, तो पृथ्वी व मानवजातीकडे पुढे लक्ष देणार नाही असा मुळीच नाही! उलटपक्षी, येशू परत येणार. या शब्दांमुळे प्रेषितांची अंतःकरणे आशेने भरली असावी यात काही शंका नाही. आजही, लाखो लोक ख्रिस्ताच्या परत येण्याच्या विचाराला मोठे महत्त्व देऊन आहेत. याला काहीजण त्याचे “दुसरे येणे,” किंवा “आगमन” म्हणतात. तरीपण, ख्रिस्ताच्या परतण्याचा खरा अर्थ काय याबद्दल बहुतेक गोंधळात असल्याचे दिसते. ख्रिस्त कोणत्या पद्धतीने परततो? केव्हा? आणि याचा आज आमच्या जीवनावर कसा परिणाम होतो?
ख्रिस्ताच्या परतण्याची पद्धत
३. ख्रिस्ताच्या परतण्याबद्दल पुष्कळ लोकांचा काय विश्वास आहे?
३ ॲन इव्हँजिलिकल ख्रिस्टोलॉजी या पुस्तकाच्या मते, “ख्रिस्ताचे दुसऱ्यांदा परत येणे (परोसिया) देवाच्या राज्याची शेवटी, उघडपणे व सर्वकाळासाठी प्रस्थापना करते.” ख्रिस्ताचे परत येणे सर्वांना उघड असेल, ते या ग्रहावरील सर्वांना खरेपणाने बघता येईल हा विश्वास सार्वत्रिक बनला आहे. या विचाराला पुष्टी द्यावी या उद्देशाने पुष्कळ जण प्रकटीकरण १:७ कडे निर्देश करतात. ते म्हणतेः “पाहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील.” परंतु, या वचनाचा शब्दशः अर्थ घेण्यास हवा का?
४, ५. (अ) प्रकटीकरण १:७ चा शब्दशः अर्थ होत नाही हे आपल्याला कसे कळते? (ब) या गोष्टीची समज प्रत्यक्षात येशूचे शब्द कसे देतात?
४ प्रकटीकरणाचे पुस्तक “चिन्हांद्वारे” सादर करण्यात आले आहे हे लक्षात घ्या. (प्रकटीकरण १:१) या कारणामुळे हा उतारा लाक्षणिक अर्थ देत असला पाहिजे; कारण “ज्यांनी त्याला भोसकले” ते ख्रिस्ताला परत येताना कसे पाहू शकतील? ते मरून तर आता २० शतके झाली आहेत! तसेच देवदूतांनी म्हटले की, ख्रिस्त “जसे . . . जाताना पाहिले तसाच” येईल. तो कसा गेला बरे? त्याला जाताना लाखो लोकांनी बघितले का? नाही. केवळ थोड्या विश्वासूंनीच ही घटना बघितली. शिवाय, देवदूत बोलत होते तोपर्यंत हे प्रेषित ख्रिस्ताचा स्वर्गाला जाण्याचा मार्ग निरखून पाहात होते का? नाही. एका ढगाने मध्ये येऊन येशूला त्यांच्यापासून दृष्टिआड केले. याच्या काही अवधीनंतर त्याने आत्मिक व्यक्ती असे आत्मिक स्वर्गात, मानवी नेत्रांस अदृश्य असणाऱ्या पद्धतीने प्रवेश केला असावा. (१ करिंथकर १५:५०) अशाप्रकारे प्रेषितांनी येशूच्या प्रवासाची नुसती सुरवात बघितली त्यांना या प्रवासाचा शेवट, म्हणजे त्याचे आपला पिता यहोवा याच्या स्वर्गीय उपस्थितीत जाणे बघता आले नाही. ही गोष्ट ते केवळ आपल्या मनःचक्षूंद्वारे न्याहाळू शकत होते.—योहान २०:१७.
५ येशू अगदी याच पद्धतीने परत येणार अशी पवित्र शास्त्र शिकवण देते. येशूने देखील आपल्या मृत्युच्या थोड्या आधी असे म्हटलेः “आता थोडा वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही.” (योहान १४:१९) त्याने असेही म्हटले की, “देवाचे राज्य दृश्यरुपाने येत नाही.” (लूक १७:२०) मग, कोणत्या अर्थी ‘प्रत्येक डोळा त्याला पाहतो’? याचे उत्तर मिळवण्याकरता आपल्याला येशूच्या परतीबद्दल त्याने स्वतः तसेच त्याच्या प्रेषितांनी जे शब्द लिहिले त्याविषयी स्पष्ट समज मिळवून घेतली पाहिजे.
६. (अ) प․रो․सिʹया या ग्रीक शब्दाचा “परत येणे,” “आगमन,” “येणे,” हे शब्द पुरेसा अर्थ देणारे का ठरत नाहीत? (ब) प․रो․सिʹया किंवा “उपस्थिती” ही क्षणार्धापेक्षा अधिक काळाची आहे हे कशावरून दिसते?
६ वस्तुस्थिती अशी की, ख्रिस्त हा निव्वळ ‘परतण्या’पेक्षा अधिक असे काही करतो. “येणे,” “आगमन,” यासारखे शब्द क्षणार्धाच्या साध्या कृतिला सूचित करतात. तथापि, येशू व त्याच्या अनुयायांनी ज्या ग्रीक शब्दाचा उपयोग केला तो अधिक अर्थ देतो. हा ग्रीक शब्द प․रो․सिʹया याचा शब्दशः अर्थ, “सोबत असणे,” किंवा “उपस्थिती” असा होतो. बहुतेक प्रामाण्य याबद्दल सहमत आहेत की, या शब्दात केवळ येण्याचाच नव्हे तर त्यासोबत असणाऱ्या उपस्थितीचाही अर्थ समाविष्ट आहे. हे, बादशाही घराण्यातील एखादी व्यक्ती आपली शासकीय भेट देते त्याप्रमाणे आहे. ही उपस्थिती क्षणार्धासाठी नाही; तर ती एका खास युगाची, एका खास काळाने चिन्हांकित असणारी आहे. मत्तय २४:३७-३९ मध्ये येशूने म्हटले की, “मनुष्याच्या पुत्राचे येणे [“उपस्थिती,” न्यू.व. (प․रो․सिʹया)]” “नोहाच्या दिवसातल्या”प्रमाणे असेल; नोहाचा काळ जलप्रलयात संपला. हा प्रलय येण्याआधी व ते जागतिक व्यवस्थीकरण नष्ट होण्याच्या आधी नोहा कित्येक दशके दुष्टांना इशारा देत होता व तारवाच्या उभारणीचे काम करीत होता. या कारणामुळे, ख्रिस्ती अदृश्य उपस्थिती ही मोठा विनाश घडवून येईपर्यंत कित्येक दशके टिकणारी आहे.
७. (अ) प․रो․सिʹया मानवी नेत्रांना दृश्य नाही हे कसे सिद्ध होते? (ब) ख्रिस्ताची उपस्थिती ‘प्रत्येक डोळ्याला’ दृश्यरुपाने दिसणार असल्याबद्दल शास्त्रवचनांची पूर्णता केव्हा व कशी होणार?
७ प․रो․सिʹया ही मानवी नेत्रांना खरोखरीची दिसणारी उपस्थिती नाही हे अगदी निश्चये खरे आहे. कारण ती असती तर मग, येशूने आपण पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणे आपल्या अनुयायांना त्याच्या उपस्थितीला न्याहाळण्याचे जे चिन्ह दिले ते देण्यामध्ये इतका वेळ तरी का घालवला असता बरे?a तथापि, ख्रिस्त जेव्हा सैतानी जागतिक व्यवस्थेचा नायनाट करण्यास पुढे सरसावेल त्यावेळी त्याची उपस्थिती ही सर्वांना अगदी पुरेपूर समजून येईल. तेव्हा जणू “प्रत्येक डोळा त्याला पाहील.” येशूच्या विरोधकांना सुद्धा, ख्रिस्ताची राजवट खरी असल्याचे पाहून मोठा विस्मय वाटेल.—पहा मत्तय २४:३०; २ थेस्सलनीकाकर २:८; प्रकटीकरण १:५, ६.
ती केव्हा सुरू होते?
८. ख्रिस्ताच्या उपस्थितीची सुरवात कोणत्या घटनेने होते, व ती कोठे होते?
८ मशीहाची उपस्थिती ही अशा घटनेने सुरु होते, जी मशीही भविष्यवादांचा विषय पुन्हापुन्हा दाखवते. त्याला स्वर्गात राजा म्हणून नियुक्त करण्यात येते. (२ शमुवेल ७:१२-१६; यशया ९:६, ७; यहेज्केल २१:२६, २७) येशूची उपस्थिती ही त्याच्या राजपदाशी संबंधित असेल हे येशूने स्वतः दाखवून दिले आहे. कित्येक उदाहरणात त्याने दाखवले की, तो एक धनी असून आपल्या घराण्यास सोडतो व मागे दासांना ठेवतो आणि “दूर देशी” काही काळासाठी जातो; येथे त्याला “राजसत्ता” मिळते. अशाप्रकारचा एक दाखला, त्याने त्याच्या शिष्यांनी त्याची प․रो․सिʹया केव्हा सुरु होईल याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरार्थ दिला, तर दुसरा दाखला त्याने, “देवाचे राज्य एव्हांच प्रगट होणार आहे असे त्यांस वाटत होते,” म्हणून दिला. (लूक १९:११, १२, १५; मत्तय २४:३; २५:१४, १९) यास्तव, या पृथ्वीवर मनुष्य म्हणून असताना त्याचा राज्याभिषेक होण्यास अद्याप बराच काळ होता; तो “दूर देशी” स्वर्गात होणार होता. तेव्हा काय घडणार होते?
९, १०. ख्रिस्त सध्या स्वर्गात राज्य करीत आहे याचा कोणता पुरावा आहे, आणि त्याने आपल्या राजवटीला केव्हा प्रारंभ केला?
९ येशूच्या शिष्यांनी त्याला “आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” न्यू.व.] व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” असे विचारले तेव्हा येशूने त्यांना भावी काळाचे सविस्तर वर्णन दिले. (मत्तय अध्याय २४; मार्क अध्याय १३; लूक अध्याय २१; तसेच २ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण अध्याय ६ देखील पहा.) हे चिन्ह त्रासाच्या युगाचे सविस्तर वर्णन देते. तो आंतरराष्ट्रीय युद्धे, वाढती गुन्हेगारी, कौटुंबिक जीवनाचा वाढता ऱ्हास, आजाराची पीडा, दुष्काळ व भूकंप या गोष्टींनी, स्थानिक नव्हे तर सर्व गोलार्धाला वेष्टून टाकणाऱ्या त्रासाचा काळ आहे. हे सर्व आपल्या परिचयाचे आहे का? जाणारा प्रत्येक दिवस, हे २०वे शतक येशूच्या वर्णनानुरुप पूर्णपणे बसणारे आहे याची पुष्टी देते.
१० मानवी इतिहासाला १९१४ हे वर्ष वळण देणारे होते याबद्दल इतिहासकार सहमत आहेत. ते असे महत्त्वाचे वर्ष होते, जेथून यापैकीच्या बहुत समस्या हाताबाहेर जाऊ लागल्या व त्या गोलार्धव्याप्त रुपात वाढतच राहिल्या. होय, पवित्र शास्त्र भविष्यवाद पूर्ण करणाऱ्या जागतिक दृश्य घटना १९१४ या वर्षाला, येशूने स्वर्गात राजा म्हणून राज्य करण्याची सुरवात केली म्हणून त्याकडे अंगूली दर्शवीत आहेत. याखेरीज, दानीएलाच्या ४ थ्या अध्यायातील कालगणनेचा पुरावा आम्हाला यहोवाचा नेमलेला राजा राज्य करण्यास सुरवात करील अगदी त्याच वर्षी, म्हणजे १९१४ या वर्षाकडे घेऊन येतो.b
त्रासाचा काळ का?
११, १२. (अ) ख्रिस्ताचा सध्या स्वर्गात अंमल चालू आहे असा विश्वास ठेवण्यास काहींना तितके जड का वाटते? (ब) येशूला राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ केल्यावर जे घडले त्याबद्दल कोणते उदाहरण आपल्याला देता येईल?
११ काहींना याचे नवल वाटते की, ‘मशीहा स्वर्गात राज्य करीत आहे, तर जग सध्या इतक्या त्रासाने का भरलेले आहे? त्याची राजवट कुचकामी ठरली आहे का?’ येथे एक उदाहरण आमची मदत करील. एका देशावर एका दुष्ट अध्यक्षाचे राज्य आहे. त्याने अशी भ्रष्ट व्यवस्था उभारली आहे की, तिची लक्षणे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरली आहेत. आता एक निवडणूक होते व सदाचरणी माणूस निवडून दिला जातो. तर काय? काही लोकशाही देशात घडते तसे नवीन राष्ट्राध्यक्ष रुजु होईपर्यंत बदलाचा थोडा काळ जातो. या काळात हे दोन्ही अध्यक्ष कसे वागतील? तो नवा अध्यक्ष आधीच्या अध्यक्षाने सबंध देशात जी वाईट कृत्ये घडविली तिजवर लगेच हल्ला चढवून ती नष्ट करणार का? याउलट, तो आपल्या राजधानीकडे लक्ष देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करून पूर्वीच्या अध्यक्षांच्या सर्व दुष्ट हस्तकांविरुद्ध नोटिसा बजावणार नाही का? अशाप्रकारे, पूर्ण अधिकार मिळाल्यावरच तो नव्या सिंहासनावरून प्रभावीपणे राज्य करू शकतो. आता त्या भ्रष्ट अध्यक्षांबद्दल पाहू जाता, तो जो थोडा वेळ राहिलेला आहे त्या काळात आणि आपली सत्ता जाण्याआधी सबंध देशातून आपली नीच कमाई होता होईल तितकी मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार नाही का?
१२ हेच, ख्रिस्ताच्या प․रो․सिʹयाबद्दल देखील खरे आहे. प्रकटीकरण १२:७-१२ दाखवते की, ख्रिस्ताला स्वर्गात राजा केल्यावर त्याने प्रथम सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून दिले आणि आपल्या सरकारचे स्थान शुद्ध केले. अशाप्रकारे, बऱ्याच काळापासून अपेक्षिलेला हा पराजय मिळाल्यावर सैतान, ख्रिस्ताने या पृथ्वीवर आपला पूर्ण अधिकार सुरु करण्याच्या आधी ‘त्याला मिळालेल्या थोड्या काळात’ कोणत्या प्रकारची वागणूक दाखवील? त्या भ्रष्ट अध्यक्षासारखेच हाही या जुन्या व्यवस्थीकरणातून जे काही मिळवता येते ते सर्व मिळवील. त्याचे लक्ष पैशापेक्षा मानवी जीवांकडे लागलेले आहे. होता होईल तितक्या अधिक लोकांना यहोवा व त्याचा राज्य करीत असलेला राजा यापासून दूर करण्याची त्याची इच्छा आहे.
१३. येशूच्या राज्यकिर्दीच्या आरंभाला या पृथ्वीवर त्रासाचा काळ असेल हे शास्त्रवचने कसे दाखवून देतात?
१३ यास्तव, मशीहाच्या राजवटीचा प्रारंभ म्हणजे “पृथ्वीवर अनर्थ” ओढवण्याचा काळ आहे यात काही संशय नाही. (प्रकटीकरण १२:१२) याचप्रमाणे स्तोत्रसंहिता ११०:१, २, ६ दाखवते की, येशू आपल्या “शत्रूंमध्ये” राज्य सुरु करतो. काही काळानंतर तो “राष्ट्रांना” सैतानाच्या भ्रष्ट व्यवस्थीकरणाच्या सर्व राष्ट्रांसहित विस्मृतिमध्ये लोटील.
मशीहा पृथ्वीवर जेव्हा राज्य करतो
१४. सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेचा नाश केल्यावर मशीहा काय करू शकेल?
१४ सैतानी व्यवस्था व तिच्या पाठीराख्यांचा नाश केल्यावर मशीही राजा, येशू ख्रिस्त, त्याच्या हजार वर्षांच्या राज्यकिर्दीबद्दल पवित्र शास्त्रात असलेल्या अद्भुत भविष्यवादांना पूर्ण करण्यास सुरवात करील. हा मशीहा कशाप्रकारचा राजा असेल त्याबद्दल यशया ११:१-१० मधील वर्णन आम्हाला मदत देते. २रे वचन सांगते की, त्याला “परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा . . . सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा” असेल.
१५. मशीहाच्या राजवटीत “सामर्थ्याचा आत्मा” याचा काय अर्थ होतो?
१५ येशूच्या राजवटीत ‘सामर्थ्याचा आत्मा’ असण्याचा काय अर्थ होतो, त्याचा विचार करा. पृथ्वीवर असताना त्याला काही प्रमाणात सामर्थ्य होते व यामुळेच तो चमत्कार करू शकला. लोकांना मदत करण्याची त्याची मनापासून इच्छा होती हे, “माझी इच्छा आहे,” असे बोलून प्रकटविले. (मत्तय ८:३) तथापि, त्या काळातील त्याचे चमत्कार, तो स्वर्गातून राज्य करील तेव्हा काय काय करणार याचा पूर्वदृष्टांत देणारे होते. येशू गोलार्धव्याप्तपणे चमत्कार घडवून आणणार! आजारी, अंधळे, लुळे, आणि लंगडे लोक सर्वदासाठी बरे होतील. (यशया ३५:५, ६) योग्य प्रमाणात वाटला जाणारा भरपूर अन्नसाठा उपासमार कायमची काढून टाकील. (स्तोत्रसंहिता ७२:१६) याशिवाय, देवाला स्मरण आहे अशा कबरेत असलेल्या लाखो लोकांबद्दल काय? येशूला मिळालेल्या “सामर्थ्या”त यांचे पुनरुत्थान करण्याची शक्ती असेल व या प्रत्येकाला तो नंदनवनात अनंतकाल जगू देण्याची संधी देईल! (योहान ५:२८, २९) इतके प्रचंड सामर्थ्य मिळाले असले तरी हा मशीही राजा नेहमी नम्र असेल. त्याला “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय सुगंधमय” वाटेल.—यशया ११:३.
१६. मशीही राजा कसल्या प्रकारचा न्यायाधीश असेल, आणि हे मानवी न्यायाधीशांनी स्थापिलेल्या अहवालाच्या कसे विरूद्ध असेल?
१६ हा राजा परिपूर्ण न्यायाधीश देखील असेल. तो “डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही; कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही.” अशा प्रकारचे वर्णन गतकालीन किंवा सध्याच्या कोणत्या न्यायाधीशांबद्दल देता येईल? अत्यंत बुद्धिमान न्यायाधीश देखील त्याला जे दिसते व ऐकायला मिळते, आणि त्याच्याठायी जी बुद्धिमत्ता किंवा समज आहे त्यावर न्याय करतो. अशाप्रकारे, या जुन्या जगाचे न्यायाधीश व पंच बुद्धिमानी वितंडवाद, न्यायालयीन थट्टामस्करी, किंवा प्रतिकूल पुराव्याद्वारे गोंधळून वा वाहविले जाऊ शकतात. खरे म्हणजे धनाढ्य व प्रबळ लोकांना न्याय विकत घेण्यासाठी प्रबळ समर्थन उभे करता येते. पण असे मशीही न्यायाधीशापुढे चालणार नाही! तो तर सर्वांची अंतःकरणे वाचू शकतो. त्याच्या नजरेतून काहीएक लपत नाही. प्रीती व दया यांनी सौम्य बनवलेला न्याय तेव्हा विकत दिला जाणार नाही. तो नेहमीच टिकून राहील.—यशया ११:३-५.
त्याच्या राजवटीचा तुम्हावर कसा परिणाम होतो
१७, १८. (अ) यशया ११:६-९ मध्ये मानवजातीच्या भवितव्याचे कोणते तेजस्वी चित्र रेखाटण्यात आले आहे? (ब) हा भविष्यवाद प्रामुख्यत्वे कोणाला अनुलक्षून आहे, व तसे का? (क) या भविष्यवादाची खरी पूर्णता कशी होईल?
१७ मशीहाची राजवट आपल्या प्रजाजनांवर गहन प्रभाव राखते हे समजण्याजोगे आहे. ती लोकांना बदलते. यशया ११:६-९ दाखवते की, हे बदल केवढ्या विस्तारीत रुपाचे आहेत. हा भविष्यवाद दुसऱ्या प्राण्यांवर उपजिविका करणाऱ्या क्रूर प्राण्यांचे म्हणजेच अस्वल, लांडगा, चिता, सिंह व नाग यांचे निरुपद्रवी आणि लहान मुलाच्या सहवासातील चित्र देतो. पण ती क्रूर जनावरे कसलीही इजा देत नाही! ते का बरे? कारण ९वे वचन याचे उत्तर देतेः “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशीच परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”
१८ हे खरे की, “यहोवाच्या ज्ञानाने” त्या खरोखरीच्या प्राण्यांवर कसलाच परिणाम होणार नाही; या कारणामुळे ही वचने प्रामुख्यत्वे लोकांना लागू आहेत. मशीहाची राजवट गोलार्धव्याप्त शैक्षणिक कार्यक्रम पसरविते व ती लोकांना यहोवा व त्याचे मार्ग यांचे शिक्षण देऊन आपल्या सहमानवांना प्रेम, आदर, व प्रतिष्ठेने वागवण्याचे शिक्षण देते. येणाऱ्या नंदनवनमय परिस्थितीत मशीहा मानवजातीचे शारीरिक व नैतिक पूर्णतेप्रत उत्थान करील. परिपूर्ण मानवी स्वभावाला कलंकित करणारे भक्षक, जंगलीपणाची लक्षणे निघून जातील. शिवाय खऱ्या अर्थाने देखील मानवजात जनावरांसोबत, सरतेशेवटी, शांती संबंधात राहील.—पडताळा उत्पत्ती १:२८.
१९. मशीहाची राजवट सध्याच्या काळी लोकांच्या जीवनावर कसा परिणाम करून आहे?
१९ आता हे लक्षात घ्या की, सध्या मशीहा राज्य करीत आहे. सध्याला देखील त्याच्या राज्याची प्रजा शांतीने एकत्र राहण्याचे शिकून घेत आहे व एका अर्थाने यशया ११:६-९ची पूर्णता करीत आहे. याखेरीज, आता साधारण ८० वर्षे येशू यशया ११:१०ची पूर्णता करीत आला आहेः “त्या समयी असे होईल की, राष्ट्रांकरिता ध्वजवत् उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला रा शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.” प्रत्येक राष्ट्राचे लोक मशीहाकडे वळत आहेत. का बरे? कारण त्याने राज्य करायला सुरवात केल्यापासून तो “ध्वजवत् उभा” आहे. तो आपली उपस्थिती, वर वर्णिण्यात आलेल्या प्रचंड शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे जगजाहीर करीत आहे. खरे म्हणजे, येशूने आपल्या उपस्थितीबद्दलचे उल्लेखनीय चिन्ह, या व्यवस्थीकरणाचा अंत होण्याआधी गोलार्धव्याप्त स्वरुपाचे प्रचारकार्य होईल या भाकिताद्वारे स्पष्ट केले.—मत्तय २४:१४.
२०. मशीहाच्या राजवटीची प्रजा असणारे कोणती प्रवृत्ती टाळतील, व का?
२० यास्तव, ख्रिस्ताची राज्यसत्तेतील उपस्थिती ही दूरची, तात्त्विक, वेदान्तज्ञानी लोकांमधील चर्चेच्या विषयापुरती मर्यादित नाही. त्याची राजवट यशयाने आधी भाकित केले तसे पृथ्वीवर आपला प्रभाव पाडून बदल घडवून आणीत आहे. येशूने या भ्रष्ट जागतिक व्यवस्थेमधून आपल्या राज्यासाठी प्रजाजन लाखो संख्येने गोळा केले आहेत. तुम्ही या प्रजेपैकी आहात का? तर, आमच्या अधिपतीच्या हक्काची असणारी सेवा मोठ्या आवेशाने व आनंदाने करा! हे साहजिक आहे की, कधी कधी कंटाळा वाटून या जगाच्या उपहासात्मक आरडाओरडीत समाविष्ट होऊन “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे?” हे विचारण्याचा मोह होईल. (२ पेत्र ३:४) पण येशूनेच स्वतः जे म्हटले ते लक्षात असू द्या की, “शेवटपर्यंत जो टिकेल, तोच तरेल.”—मत्तय २४:१३.
२१. आपण सर्वजन मशीही आशेबद्दल वाटणारी कदर कशी वाढवू शकतो?
२१ यहोवा आपल्या पुत्राला त्याची उपस्थिती सर्व जगाला प्रदर्शित करण्याचा तो मोठा दिवस आता प्रत्येक जाणाऱ्या दिवसागणिक जवळ येत चालला आहे. त्या दिवसाबद्दल तुम्ही बाळगून असलेली आशा कधीही मंद होऊ देऊ नका. येशूचे मशीहीपद तसेच राज्य करणारा राजा या नात्याने असलेले त्याचे गुण यावर मनन करीत राहा. याशिवाय, पवित्र शास्त्रात आखून दिलेल्या भव्य मशीही आशेचा कर्ता व कल्पक यहोवा देव याबद्दल देखील गाढ विचार करा. ते करीत राहिल्यास तुम्हाला पौलाने लिहिलेल्या या गोष्टीप्रमाणेच वाटू लागले की, “अहाहा, देवाची संपत्ती, बुद्धि व ज्ञान ही किती अगाध आहेत!”—रोमकर ११:३३.
[तळटीपा]
a मागे १८६४ मध्ये वेदांतीय आर. गोवेट यांनी असे म्हटलेः “मला तर ही गोष्ट मोठी निर्णायक स्वरुपाची वाटते. उपस्थितीचे चिन्ह दिले गेल्यामुळे ती गुप्त वाटते. आपण जे पाहात आहोत त्याच्या उपस्थितीबद्दल आपणास कोणी संकेत द्यावा याची गरज नाही.”
b याच्या सविस्तर माहितीसाठी “तुझे राज्य येवो,” या पुस्तकाची पृष्ठे १३३-९ पहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ ख्रिस्त कोणत्या पद्धतीने परत येतो?
▫ ख्रिस्ताची प․रो․सिʹया किंवा उपस्थिती ही अदृश्य असून ती लांब काळासाठी असणार हे आम्ही कसे जाणू शकतो?
▫ ख्रिस्ताची उपस्थिती केव्हा सुरु होते, आणि हे आपल्याला कसे कळते?
▫ मशीहा हा कसल्या प्रकारचा स्वर्गीय अधिपती आहे?
▫ ख्रिस्ताच्या राजवटीचा परिणाम त्याच्या प्रजाजनांच्या जीवनावर कोणकोणत्या मार्गाने होतो?
[९ पानांवरील चित्रं]
येशू परत येणार ही आशा त्याच्या विश्वासू प्रेषितांसाठी खूप अर्थ राखून होती
[११ पानांवरील चित्रं]
स्वर्गातून राज्य करीत असताना येशू गोलार्धव्याप्त रूपात चमत्कार घडवून आणील