“मशीहा आम्हांस सापडला आहे”!
“[आंद्रियाला] त्याचा स्वतःचा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणालाः ‘मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांस सापडला आहे.’”—योहान १:४१.
१. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने नासरेथकर येशूबद्दल कोणती साक्ष दिली, आणि आंद्रियाने त्याच्याबद्दल कोणता निष्कर्ष काढला?
नासरेथकर येशूला आंद्रियाने निरखून पाहिले. तो काही एखादा राजा, कोणी सुज्ञ माणूस किंवा एखादा रब्बी असाही दिसत नव्हता. त्याचा पोशाख बादशाही नव्हता, त्याचे केसदेखील सोनेरी नव्हते; तसेच हात मऊ आणि काया उजळ नव्हती. येशू सुमारे तीस वर्षांचा होता. हातांनी जड काम केल्यामुळे ते घट्टा पडलेले झाले होते व कातडी तांबूस तपकिरी रंगाची होती. या कारणामुळे त्याला सुतार असे न्याहाळण्यात आंद्रियाला कोणतेही आश्चर्य वाटले नसावे. तरीपण, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने या माणसाबद्दल म्हटले होतेः “हा पाहा, देवाचा कोकरा!” याच्या एक दिवस आधी योहानाने आणखी काही आश्चर्याचे म्हटले होते. तो म्हणालाः “हा देवाचा पुत्र आहे.” हे खरे असू शकेल काय? या कारणामुळे आंद्रियाने येशूचे बोलणे ऐकण्यात तो दिवस घालवला. येशूने काय माहिती सांगितली ती आम्हाला ज्ञात नाही; तरीपण त्याच्या शब्दांनी आंद्रियाचे जीवनच पार बदलले गेले हे मात्र आम्ही सांगू शकतो. या कारणामुळेच तो घाईघाईने पळत शिमोन या त्याच्या भावाकडे येऊन म्हणालाः “मशीहा आम्हास सापडला आहे”!—योहान १:३४-४१.
२. येशू हा खराच वचनदत्त मशीहा होता याबद्दल पुराव्याचा विचार करणे का महत्त्वाचे आहे?
२ आंद्रिया व शिमोन (येशूने याचे नाव नंतर पेत्र असे ठेवले) हे येशूचे प्रेषित बनले. शिष्य होऊन दोनपेक्षा अधिक वर्षे झाल्यावर, पेत्राने येशूबद्दल म्हटलेः “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” (मत्तय १६:१६) या विश्वासासाठी विश्वासू प्रेषित व शिष्य मरण्यासाठीही तयार होते. आजही, लाखो प्रामाणिक लोक असेच निष्ठावंत आहेत. पण कोणत्या पुराव्याच्या आधारावर? कारण पुरावा हा विश्वास व भोळेपणा यात फरक करतो. (पहा इब्रीयांस ११:१.) यास्तव, येशू हा खराच मशीहा होता याबद्दल तीन प्रकारातील सर्वसाधारण पुरावा आपण विचारात घेऊ या.
येशूची वंशावळ
३. येशूच्या वंशावळीबद्दल मत्तय व लूकची शुभवर्तमाने कोणती माहिती देतात?
३ येशूच्या मशीहापदाबद्दल आधार देण्यात ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने येशूच्या वंशावळीचा पुरावा पहिल्याने सादर करतात. मशीहा दावीद राजाच्या घराण्यातून येणार याबद्दल पवित्र शास्त्राने आधीच भाकित केले होते. (स्तोत्रसंहिता १३२:११, १२; यशया ११:१, १०) मत्तयाच्या शुभवर्तमानाची सुरवात अशी आहेः “येशू ख्रिस्त, जो दावीदाचा पुत्र, जो अब्राहामाचा पुत्र, त्याची वंशावळ.” मत्तय, येशूचा दत्तक पिता योसेफ याची वंशावळ देऊन या गोष्टीची पुष्टी देतो. (मत्तय १:१-१६) लूकचे शुभवर्तमान येशूची वंशावळ त्याची पार्थिव आई मरीया हिजपासून मागे दावीद, अब्राहाम व आदाम येथपर्यंत सादर करते. (लूक ३:२३-३८)a अशाप्रकारे आपल्या लिखाणाद्वारे शुभवर्तमानाचे लेखक, येशू हा दावीदाचा कायदेशीर तसेच स्वाभाविक वारस होता या दाव्याला पुष्टी देतात.
४, ५. (अ) येशूच्या काळातील लोकांनी तो दावीदाच्या वंशातून आला आहे याबद्दल कधी आव्हान केले का, आणि हे अर्थपूर्ण का आहे? (ब) पवित्र शास्त्र विरहीत असणारे संदर्भ येशूच्या वंशावळीला कसा दुजोरा देतात?
४ येशू हा दावीदाचा पुत्र आहे हे येशूच्या मशीहापदाबद्दल टिका करणारे नाकारु शकत नाही. ते का? याची दोन कारणे आहेत. यरुशलेम शहराचा इ. स. ७० मध्ये नाश होण्याआधीच्या दशकात तो दावा वारंवार सांगण्यात येत होता. (पडताळा मत्तय २१:९; प्रे. कृत्ये ४:२७; ५:२७, २८.) हा दावा खोटा असता तर येशूचे कोणतेही विरोधक—तसे पाहता ते पुष्कळ होते—जाहीर दफ्तरखान्यातून त्याची वंशावळ शोधून येशू हा लबाड असल्याचे सहज सिद्ध करू शकत होते.b तरीपण येशू हा दावीद राजाचा वारस आहे याबद्दल आव्हान करणारा कसलाही दावा इतिहासात मिळत नाही. त्या दाव्यावर तुटून पडता येत नाही हे उघड आहे. मत्तय तसेच लूक यांनी निश्चये जाहीर दफ्तरखान्यामधूनच वंशावळीतील नावे घेऊन आपल्या लिखाणातील माहिती लिहिली असावी.
५ दुसरे, पवित्र शास्त्राबाहेर असणारे पुरावे येशूच्या वंशावळीचा स्वीकार करण्याला सर्वसाधारण पुष्टी देतात. उदाहरणार्थ, तालमूद अहवालात चवथ्या शतकातील रब्बी, येशूची आई मरीया हिच्याबद्दल ‘सुतारांसोबत वेश्यागिरी करणारी’ असा अभद्र उल्लेख करतात, पण त्याच परिच्छेदात “ती राजपुत्र व अधिपती यांच्या घराण्यातील होती” असाही नामनिर्देश करतात. आणखी एक आधीचे उदाहरण दुसऱ्या शतकातील हेजेसिपस् या इतिहासकाराचे आहे. त्याने कळवले की, जेव्हा रोमी कैसर डॉमितियन याने दावीदाच्या वंशातील सर्वांचा उच्छेद करण्याचे ठरवले तेव्हा, आरंभीच्या ख्रिश्चनांच्या काही शत्रूंनी येशूचा सावत्र भाऊ यहूदाचा नातू “दावीदाच्या घराण्यातील” असल्याबद्दल दोष दिला. यहूदा जर दावीदाचा वंशज होता तर मग, येशू नव्हता का? निश्चितपणे!—गलतीकर १:१९; यहूदा १:१.
मशीही भविष्यवाद
६. इब्री शास्त्रवचनात मशीहाबद्दल किती भविष्यवाद आहेत?
६ येशू हा मशीहा होता याचा आणखी एक पुरावा म्हणजे पूर्ण झालेले भविष्यवाद. मशीहाच्या अनुषंगाने इब्री शास्त्रवचनात मुबलक भविष्यवाद सापडतात. द लाईफ ॲण्ड टाइम्स ऑफ जिझस द मसाया, या पुस्तकात आल्फ्रेड एडरशिम या लेखकाने रब्बी लोकांना मशीहाविषयक वाटणारे इब्री शास्त्रवचनातील ४५६ उतारे उद्धृत केले. तथापि, रब्बींनी मशीहाबद्दल अनेक चुकीचे ग्रह धरले होते; त्यांनी दर्शवलेले अनेक उतारे मशीहाबद्दल मुळीच नाहीत. तरीपण असे डझनावारी भविष्यवाद आहेत, जे येशूची मशीहा अशी ओळख देतात.—पडताळा प्रकटीकरण १९:१०.
७. येशू पृथ्वीवर असताना कोणकोणते भविष्यवाद पूर्ण झाले?
७ यापैकीचे काही असे आहेतः त्याच्या जन्माचे गाव (मीखा ५:२; लूक २:४-११); त्याच्या जन्मानंतर बालकांची करण्यात आलेली प्रचंड हत्या (यिर्मया ३१:१५; मत्तय २:१६-१८); त्याला मिसरातून बोलावले गेले (होशेय ११:१; मत्तय २:१५); राष्ट्रांचे अधिकारी त्याचा नाश करण्यात एकोपा करतील (स्तोत्रसंहिता २:१, २; प्रे. कृत्ये ४:२५-२८); त्याचा चांदीच्या ३० तुकड्यांसाठी झालेला विश्वासघात (जखऱ्या ११:१२; मत्तय २६:१५); त्याच्या मरणाची पद्धत.—स्तोत्रसंहिता २२:१६; न्यू.व. तळटीप; योहान १९:१८, २३; २०:२५, २७.c
त्याचे येणे भाकित करण्यात आले
८. (अ) मशीहा केव्हा येणार त्याबद्दल कोणता भविष्यवाद सूक्ष्मपणे दर्शवतो? (ब) या भविष्यवादाचे आकलन होण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी प्रथम शोधून काढल्या पाहिजेत?
८ आपण एकाच भविष्यवादावर आपले लक्ष केंद्रित करू या. मशीहा केव्हा येणार त्याबद्दल यहूद्यांना दानीएल ९:२५ मध्ये माहिती कळवण्यात आली होती. तेथे म्हटले आहेः “हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त, अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके.” पहिल्या दृष्टिक्षेपात हा भविष्यवाद गूढ असल्याचा वाटेल. पण विस्तारीत रूपाने तो केवळ आपल्याला दोन प्रकारची माहिती: एक म्हणजे त्याचा आरंभ व कालमर्यादा शोधून पाहण्याची विचारणा करीत आहे. उदाहरणार्थ, तुमच्यापाशी एक नकाशा आहे, ज्यात “गावातील उद्यानात असलेल्या विहीरीपासून पूर्वेकडे ५० गज लांब ठिकाणी” एक खजिना दडलेला आहे असे म्हटले आहे. तुम्हाला ही विहीर कोठे आहे आणि ‘गज’ याचे प्रमाण काय आहे हे माहीत नसल्यामुळे तुम्ही प्रथमतः गोंधळून जाल. तेव्हा, खजिना मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम त्या दोन गोष्टींचा शोध घेणार नाही का? दानीएलाचा भविष्यवाद देखील बहुतेक असाच आहे, यात सुरवात होण्याचा काळ ओळखणे आणि कालावधी मोजणे या गोष्टींचा पर्याय एवढाच फरक आहे.
९, १०. (अ) एकोणसत्तर आठवड्यांची मोजणी जेथून सुरवात होते तो उगम कोणता आहे? (ब) हे ६९ आठवडे किती लांब कालमर्यादेचे आहेत, आणि हे आपल्याला कसे कळते?
९ पहिल्यांदा आपल्याला भविष्यवादाची सुरवात होण्याचा काळ, “यरुशलेमाची जीर्णोद्धार करण्याची आज्ञा” केव्हा झाली ते हवे आहे. तेथून पुढे ६९ (७ अधिक ६२) सप्तके कशी भरतात ते पहायचे आहे. यापैकीची कोणतीही गोष्ट कठीण नाही. यरुशलेमाचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा केव्हा झाली ते नहेम्या आम्हाला स्पष्टरित्या सांगतो. ते “अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी” घडले असे तो म्हणतो. या आज्ञेमुळेच शेवटी यरुशलेम एक पुनर्स्थापित शहर बनले. (नहेम्या २:१, ५, ७, ८) अशाप्रकारे कालमोजणी करण्याची सुरवात आम्हाला इ. स. पूर्वीचे ४५५वे वर्षे देते.d
१० आता ६९ सप्तकांबद्दल पाहू जाता, ते सात दिवसांच्या आठवड्यासारखे खरोखरीचे आठवडे आहेत का? नाही, कारण मशीहा इ. स. पू. ४५५ नंतर एका वर्षात प्रकट झाला नाही. अशाप्रकारे बहुतेक पवित्र शास्त्र प्रामाण्य आणि विविध भाषांतरे (यहूदी तानख देखील) या वचनाबद्दल म्हणजे दानीएल ९:२५ बद्दल (आपल्या तळटीपेत) ही सप्तके “वर्षांची” आहेत याबद्दल कबुली देतात. हे ‘वर्षांचे सप्तक,’ किंवा सात वर्षीय चक्र प्राचीन यहूद्यांच्या परिचयाचे होते. ते जसा दर सातव्या दिवशी शब्बाथ पाळीत, तसे दर सातव्या वर्षी शब्बाथ वर्ष पाळीत असत. (निर्गम २०:८-११; २३:१०, ११) यास्तव ६९ आठवड्यांची वर्षे ही ६९ गुणिले ७ म्हणजे ४८३ वर्षे होतील. आता केवळ मोजणी राहिली आहे. ही ४८३ वर्षे इ. स. पूर्व ४५५ पासून मोजल्यास, आम्ही इ. स. २९ मध्ये येतो. हे तेच वर्ष आहे जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला व तो म․शीʹआख, किंवा मशीहा बनला!—पहा “सत्तर सप्तके,” इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स्, खंड २, पृ. ८९९.
११. दानीएलाच्या भविष्यवादाचा हा आधुनिक पद्धतीने केलेला उलगडा असे ज्यांचे मतप्रतिपादन आहे अशांना आम्ही कसे उत्तर देऊ शकू?
११ काही म्हणतील की, भविष्यवाद इतिहासात कसा तरी जमवावा या हेतूने दाखवलेली ही उलगड्याची आधुनिक पद्धत आहे. तसे आहे तर मग, येशूच्या काळी मशीहाचे आगमन होईल अशी अपेक्षा लोकांनी का धरली होती बरे? ख्रिस्ती इतिहासकार लूक, रोमी इतिहासकार टॅसिटस् व स्युटोनियस, यहूदी इतिहासकार जोसेफस् आणि यहूदी तत्त्ववेत्ता फिलो हे याच कालावधीच्या जवळपास होते व यांनीही या अपेक्षेबद्दलची साक्ष लिहिली आहे. (लूक ३:१५) काही प्रामाण्यांचे म्हणणे आहे की, रोमी जाचामुळे यहुद्यांनी मशीहा यावा अशी त्या काळी अपेक्षा धरली असावी. ते जर खरे आहे तर मग, यहुद्यांनी शतकांआधी त्यांची ग्रीक लोकांकडून जी अमानुष छळणूक झाली तेव्हा मशीहाची अपेक्षा न करता याच वेळी का केली बरे? टॅसिटस असे का म्हणतो की, “गूढ भविष्यवादा”मुळे यहूद्यांनी यहुदीयातून एक प्रबळ शास्ता उद्भवणार व तो “सार्वत्रिक साम्राज्य मिळवणार” अशी अपेक्षा धरली होती? ए हिस्ट्री ऑफ मेसियानिक स्पेक्युलेशन इन इज्रेएल, या पुस्तकाचे लेखक ॲबे हिलेल सिल्वर कळवतात की, “पहिल्या शतकाच्या दुसऱ्या पाव हिश्श्यात मशीहा येण्याची अपेक्षा केली जात होती,” ती रोमी छळामुळे नव्हे तर, “त्या काळच्या प्रसिद्ध कालगणने”मुळे; जी दानीएलाच्या पुस्तकातून काही अंशी घेण्यात आली होती.
वरुन देण्यात आलेली ओळख
१२. येशू मशीहा झाला आहे याबद्दलची ओळख स्वतः यहोवाने कशी दिली?
१२ येशूच्या मशीहापदाचा तिसरा पुरावा म्हणजे स्वतः देवाने दिलेली साक्ष होय. लूक ३:२१, २२ नुसार येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर त्याचा, विश्वातील अत्यंत पवित्र व सामर्थ्ययुक्त शक्ती, यहोवा देवाचा स्वतःचा पवित्र आत्मा याद्वारे अभिषेक करण्यात आला. यहोवाने आपल्या स्वतःच्या वाणीने याची कबुली दिली की, त्याची त्याचा पुत्र येशू याच्यावर मर्जी आहे. आणखी दोन वेगळ्या प्रसंगी यहोवाने येशूसोबत स्वर्गातून थेटपणे भाषण केले व याद्वारे आपली पसंती जाहीर केलीः एकदा येशूच्या तीन प्रेषितांसमोर, तर दुसऱ्या वेळी बघत असलेल्या जमावापुढे. (मत्तय १७:१-५; योहान १२:२८, २९) याखेरीज, येशूला ख्रिस्त, किंवा मशीहा हा दर्जा मिळाला आहे याची पुष्टी देण्यासाठी वरून स्वर्गदूतांना पाठविण्यात आले.—लूक २:१०, ११.
१३, १४. येशू हा मशीहा असल्याबद्दलची संमती यहोवा देवाने कशी प्रदर्शित केली?
१३ यहोवाने आपल्या अभिषिक्ताबद्दलची पसंती, त्याला मोठी कामे करण्याची शक्ती बहाल करून दाखवली. उदाहरणार्थ, येशूने अशी काही भाकिते अगाऊपणे केली जी इतिहासात व आमच्या दिवसापर्यंत देखील पूर्ण होत आलेली आहेत.e त्याने भूकेलेल्या जमावास भरविण्याचे व आजाऱ्यांना बरे करण्याचे अद्भुत चमत्कार केले. त्याने मृतांना देखील परत जिवंत केले. तेव्हा त्याच्या अनुयायांनी त्याच्या या आश्चर्यकर्माबद्दलच्या बातम्या शोधून काढल्या होत्या का? येशूने तर आपली कार्ये हजारो लोकांपुढे, त्यांच्या डोळ्यादेखत केली होती. त्याने ही अद्भुत कृत्ये केल्याचा नकार त्याच्या शूत्रंनाही करता आला नाही. (मार्क ६:२; योहान ११:४७) येशूच्या अनुयायांनी अशा प्रकारचे अहवाल आपल्या मनाप्रमाणे लिहिले आहेत असे जर काहींचे म्हणणे आहे तर मग, जेव्हा त्यांनी स्वतः चुका केल्या तेव्हा त्यांनी ते प्रामाणिकपणे दाखवण्याची काय गरज होती? त्यांनी आपल्या मनाप्रमाणे या गोष्टी लिहिल्या आहेत हे जर खरे आहे तर मग, अशा या दंतकथांसाठी त्यांनी आपला प्राण पणाला लावायची इतकी स्वेच्छा का दर्शवली बरे? नाही. येशूने केलेले चमत्कार ही इतिहासातील सत्य वस्तुस्थिती आहे.
१४ येशू हा मशीहा आहे याबद्दल देवाने दिलेली साक्ष यापुढे जाते. आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्याने येशूच्या मशीहापदाबद्दलचा पुरावा लिहिला जात आहे व त्याचे या सबंध इतिहासात अधिक भाषेत अनुवादित व पुस्तकांच्या रुपाने वितरीत होत आहे याकडे लक्ष दिले.
यहूद्यांनी येशूचा का स्वीकार केला नाही?
१५. (अ) येशूला मशीहा या नात्याने ओळख दाखवणारी चिन्हे किती मुबलक आहेत? (ब) यहूद्यांनी बाळगलेल्या कोणत्या अपेक्षेमुळे त्यापैकीच्या बहुतेकांनी येशूचा मशीहा म्हणून स्वीकार केला नाही?
१५ अशाप्रकारे या तीन विभागात खरे पाहता, येशू मशीहा असल्याची ओळख दाखवणारा पुरावा शेकडोंनी उपलब्ध आहे. एवढा पुरावा पुरेसा नाही का? समजा की, तुम्ही वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज दिला आहे किंवा क्रेडिट कार्ड मागत आहा. तुम्हाला सांगण्यात आले की, ओळख दाखविणारे पुरावे पुरेसे नाहीत; तुम्ही शेकडो आणले पाहिजे. तुम्हाला हा वेडेपणा वाटणार नाही का? या कारणामुळेच येशूबद्दल पवित्र शास्त्रात भरपूर ओळख दाखवण्यात आली आहे. तरीपण, येशू मशीहा असल्याबद्दलचा सर्व पुरावा त्याच्या बहुतेक लोकांनी का नाकारला? कारण खऱ्या विश्वासाला अत्त्यावश्यक असणारा पुरावा विश्वासाची हमी देऊ शकत नाही. खरे म्हणजे लोकांना ज्यावर विश्वास ठेवावासा वाटतो त्याचाच ते, विशिष्ठ पुरावा जरी मुबलक असला तरी विश्वास धरतात व हे दुःखाचे आहे. मशीहाबद्दल बघता, बहुतेक यहूद्यांच्या मनात पूर्वग्रह आधीच घर करून होता. त्यांना राजकीय मशीहा हवा होता, जो त्यांना रोमी जाचापासून मुक्त करून इस्राएलाला शलमोनाच्या दिवसातील वैभवाप्रमाणे दिमाख बहाल करू शकणार होता. तेव्हा, या गरीब सुताराच्या मुलाला, ज्याने कधीही राजकारण किंवा धन याबद्दल काहीच आस्था दाखवली नव्हती अशा नासरेथकराला ते मशीहा म्हणून कशी संमती देणार? त्याने वधस्तंभावरील लज्जास्पद मरण सहन केले तो मशीहा कसा असू शकेल?
१६. येशूच्या अनुयायांना मशीहाबद्दल त्यांना वाटणाऱ्या अपेक्षांमध्ये का सुधारणा करावी लागली?
१६ खरे म्हणजे, येशूच्या मरणामुळे त्याचे स्वतःचे शिष्य देखील हादरले. पण त्याचे वैभवी रितीने पुनरूत्थान झाल्यावर त्यांना उघडपणे असे वाटले की, तो तेव्हाच ‘इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापीत करणार.’ (प्रे. कृत्ये १:६) पण त्यांची ही व्यक्तिगत अपेक्षा साकार झाली नाही म्हणून त्यांनी येशूचा मशीहा म्हणून धिक्कार केला नाही. त्यांनी उपलब्ध असणाऱ्या सर्व पुराव्यास अनुलक्षून त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्यांची समज हळूवारपणे वाढू लागली; गूढ गोष्टी उकलल्या गेल्या. त्यांना दिसून आले की, मशीहाला, त्याच्या पृथ्वीवरील मानव या नात्याच्या अल्पावधीत त्याच्याबद्दल असणाऱ्या सर्व भविष्यवादांची पूर्णता करता येणे शक्य नव्हते. कारण, एक भविष्यवाद त्याला गाढवीच्या शिंगरावर बसून नम्रपणे येण्याबद्दलचे भाकित करतो तर, दुसरा तो मेघारूढ होऊन वैभवाने येत असल्याबद्दलची माहिती देतो! हे दोन्हीही एकाच वेळी कसे खरे होऊ शकतात? याचाच अर्थ, त्याने याच्या पूर्णतेसाठी दुसऱ्यांदा येण्याची गरज होती.—दानीएल ७:१३; जखऱ्या ९:९.
मशीहाला का मरावे लागले
१७. मशीहाला मरावे लागणार आहे हे दानीएलच्या भविष्यवादाने कसे स्पष्ट केले, आणि त्याला कशासाठी मरावे लागणार होते?
१७ याखेरीज, मशीहाच्या भविष्यवादांनी त्याला मरावे लागणार असे स्पष्ट सांगितले होते. उदाहरणार्थ, मशीहाच्या येण्याबद्दलची माहिती ज्या भविष्यवादात सांगितली आहे, त्याच्याच पुढल्या वचनात असे म्हटले आहेः “बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल.” (दानीएल ९:२६) येथे “वध” या शब्दाबद्दल वापरण्यात आलेला इब्री शब्द क․रेथʹ मोशेच्या नियमशास्त्रात मृत्यु दंडाच्या शिक्षेबद्दल जो शब्द आला आहे तोच आहे. या कारणास्तव, मशीहाला मरावे लागणार होते यात काही संशय नव्हता. ते का बरे? २४वे वचन याचे उत्तर देऊन म्हणतेः “पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी.” अपराधांबद्दल प्रायश्चित्त केवळ यज्ञाने, किंवा मृत्युने होते हे यहूद्यांना चांगले माहीत होते.—लेवीय १७:११; पडताळा इब्रीयांस ९:२२.
१८. (अ) मशीहाने त्रास सहन करून मेलेच पाहिजे हे यशयाचा ५३ वा अध्याय कसे दाखवतो? (ब) हा भविष्यवाद कोणत्या संभाव्य विरोधाभासात्मक गोष्टींना पुढे आणतो?
१८ ज्याला त्रास सहन करून इतरांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून मरावे लागणार होते त्या मशीहाला यशयाचा ५३वा अध्याय यहोवाचा खास सेवक असे संबोधतो. त्याचे ५ वे वचन सांगतेः “तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला.” मशीहाने “दोषार्पण” या अर्थाने मृत्यु सहन करायचा आहे हे सांगितल्यावर हाच भविष्यवाद पुढे प्रकट करतो की, “तो दीर्घायु होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] मनोरथ पूर्ण होईल.” (१० वे वचन) हे विरोधाभासात्मक वाटत नाही का? मशीहा कसा मरू शकतो व तो “दीर्घायु” कसा होणार होता? एक यज्ञार्पण वाहिल्यावर तो “यहोवाचा मनोरथ [कसा] पूर्ण” करणार होता? खरे म्हणजे तो मेल्यावर, त्याबद्दलच्या सर्वात महत्त्वपूर्ण भविष्यवादाची, म्हणजे तो राजा या नात्याने सदासर्वदा राज्य करणार आणि सबंध जगाला शांती व आनंद देणार याची पूर्णता करण्यासाठी तो तसाच मृतावस्थेत कसा राहू शकणार होता?—यशया ९:६, ७.
१९. येशूचे पुनरूत्थान मशीहाबद्दल वाटणाऱ्या प्रतिकूल भविष्यवादांशी कसे जुळणारे आहे?
१९ या सर्व विरोधाभासात्मक गोष्टी एकाच प्रेक्षणीय चमत्काराद्वारे सुटल्या. येशूचे पुनरूत्थान झाले. या वैभवी प्रत्यक्षतेचे शेकडो प्रामाणिक अंतःकरणाचे यहुदी साक्षीदार बनले. (१ करिंथकर १५:६) प्रेषित पौलाने नंतर लिहिले की येशू, “पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे; आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होत तोपर्यंत वाट पाहात आहे.” (इब्रीयांस १०:१०, १२, १३) होय, येशूचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान झाल्यावर व थोडा काळ “वाट” पाहण्यानंतर येशूला शेवटी राजा म्हणून सिंहासनाधिष्ट केले जाणार व मग तो आपला पिता यहोवा याच्या शत्रूंविरुद्ध हालचाल करणार. एक स्वर्गीय राजा या नात्याने येशू मशीहा सध्या जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनाला स्पर्श करीत आहे. ते कसे? याबद्दल आपण पुढील लेखात विचार करणार आहोत.
[तळटीपा]
a लूक ३:२३ म्हणतेः “योसेफ एलीचा पुत्र,” याचा उघड अर्थ, “जावई” या अर्थाने “पुत्र” असा होतो, कारण एली मरीयेचा बाप होता.—इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स्, खंड १, पृ. ९१३-१७.
b यहूदी इतिहासकार जोसेफस् स्वतःची वंशावळ देताना हे स्पष्ट करतो की, असा अहवाल इ. स. ७० पूर्वी उपलब्ध होता. हे सर्व अहवाल यरुशलेमाच्या नाशाबरोबरच नष्ट झाले आणि मशीहाबद्दल असणारे सर्व दावे खोडले गेले.
c पहा इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स्, खंड २, पृ. ३८७.
d अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीची सुरवात इ. स. पूर्व ४७४ मध्ये झाली याबद्दल प्राचीन ग्रीक, बाबेलोनिया व पर्शियांचा उगम खात्रीलायक पुरावा देतात. पहा इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स्, खंड २, पृ. ६१४-१६, ९००.
e यापैकीच्या एका भविष्यवादात त्याने त्याच्या काळापासून पुढे खोटे ख्रिस्त उद्भवण्याचे भाकित केले होते.—मत्तय २४:२३-२६.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ येशू हा वचनदत्त मशीहा आहे याबद्दलच्या पुराव्याचे परिक्षण का करावे?
▫ येशूची वंशावळ त्याच्या मशीहापदाबद्दल कसा आधार देते?
▫ येशू हा मशीहा होता हे सिद्ध करण्यामध्ये पवित्र शास्त्रातील भविष्यवाद कशी मदत देतात?
▫ येशूची मशीहा या नात्याच्या ओळखीची पुष्टी स्वतः यहोवाने कशी दिली?
▫ येशूचा मशीहा म्हणून पुष्कळ यहूद्यांनी का नकार केला, आणि त्यांची कारणमीमांसा का सबळ नव्हती?
[६ पानांवरील चित्रं]
येशूच्या प्रत्येक चमत्काराने त्याच्या मशीहापदाबद्दलचा पुरावा प्रस्तुत केला