जगीक मनोकल्पना सोडून द्या, राज्याच्या वास्तवतेचा शोध घ्या
“तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीही सर्व तुम्हांस मिळतील.”—मत्तय ६:३३.
१. देवाचे वचन लाक्षणिक अंतःकरणाबद्दल कोणता इशारा देते, आणि ते कोणत्या मार्गाने आपल्याला फसवते?
“सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रें ४:२३) हा इशारा शलमोन राजाला देणे इतके जरुरीचे का वाटले बरे? कारण “हृदय सर्वांत कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) आमचे लाक्षणिक अंतःकरण आम्हाला फसवू शकेल तो एक मार्ग आहे, जगीक मनोकल्पनांमध्ये स्वतःला गुंतविणे. पण या मनोकल्पना काय आहेत? त्या वास्तवता नसणाऱ्या कल्पना, दिवास्वप्न, आणि रिकामटेकड्या मनाचे भटकणे आहे. जेव्हा ही दिवास्वप्ने जगीक मनोकल्पना बनतात, तेव्हा नुसता वेळेचा अपव्यव होतो इतकेच नव्हे तर, त्या अत्यंत घातक देखील ठरतात. या कारणामुळे आपण त्यांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. खरे म्हणजे आपण येशूने अधर्माचा वीट मानला तसे केले तर आपल्या अंतःकरणाचे जगीक मनोकल्पनांमध्ये गुरफटण्यापासून रक्षण करू शकू.—इब्रीयांस १:८, ९.
२. जगीक मनोकल्पना काय आहेत, आणि आम्ही त्यांचा का त्याग करावा?
२ पण या जगीक मनोकल्पना काय आहेत? त्या सैतानाच्या ताब्यात असणाऱ्या या जगाचे गुणलक्षणदर्शक आहेत. याबद्दल प्रेषित योहानाने असे लिहिलेः “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत; तर जगापासून आहेत.” (१ योहान २:१६; ५:१९) ख्रिश्चनांनी या जगीक मनोकल्पनांचा का त्याग करावा? कारण या मनोकल्पना मन व अंतःकरण यामध्ये स्वार्थी भावना उचंबळवितात. दिवास्वप्नात ज्या गोष्टी करण्याचे चूक असते ते पाहणे म्हणजे ते तो माणूस खरोखरी करू शकतो याची जणू मनामध्ये केली जाणारी एक तालीमच आहे. यासाठीच शिष्य याकोब आपल्याला ही ताकीद देतोः “प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलविलेला असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.”—याकोब १:१४, १५.
इशारेवजा उदाहरणे
३. स्वार्थी मनोकल्पनांमुळे होणाऱ्या इजांबाबत कोणाचे प्रकरण आपल्याला सर्वात पहिला इशारा देते?
३ आपण जगीक मनोकल्पनांचा का त्याग केला पाहिजे याबद्दलची काही उदाहरणे विचारात घेऊ या. दियाबल सैतानाचे उदाहरण हे स्वार्थी मनोकल्पनांमध्ये गुरफटण्यामुळे काय होऊ शकते ते दाखविण्यात प्रमुख असे होऊ शकते. त्याने स्वतःच्या प्रतिष्ठेची भावना आपल्या अंतःकरणात इतक्या प्रमाणात वाढवू दिली की त्याला यहोवा विश्वव्याप्त सार्वभौम असल्याचा हेवा वाटू लागला व त्याचीही, आपली उपासना केली जावी अशी गाढ इच्छा बनली. (लूक ४:५-८) ही अवास्तव मनोकल्पना होती का? निश्चितपणे! कारण, सैतानाला जेव्हा हजार वर्षे बांधलेले राहण्यासाठी अगाधकूपात टाकले जाईल व मग त्याला “अग्नीचे सरोवर” यात दुसऱ्या मरणासाठी टाकण्यात येईल तेव्हा ते निसंशये सिद्ध होईल.—प्रकटीकरण २०:१-३, १०.
४. सैतानाने हव्वेला कसे फसवले?
४ पहिली स्त्री हव्वा हिच्यामध्ये आपल्याला इशारेवजा उदाहरण मिळते. सैतानाने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने झपाटून हव्वेला भुरळ घातील. त्याने तिला म्हटले की, तिने मना केलेले फळ खाल्ले तर मरणार तर नाहीच, पण देवासारखे बरे किंवा वाईट कळू लागेल. असे म्हणून त्याने तिच्या मनात मनोकल्पना घातली. तर ती मनोकल्पना अवास्तव, स्वार्थ होती का? होय, ती होती. हे, यहोवाने नित्याच्या संभाषणात हव्वा व तिचा पती आदाम यांना प्रश्न केला व नंतर त्यांचा धिक्कार करून शिक्षा केली त्यावरुन दिसू शकते. याचा परिणाम, त्यांना स्वतःला व त्यांच्या सर्व अपूर्ण संततीसाठी नंदनवनात जीवन जगण्याचा हक्क गमवावा लागला.—उत्पत्ती ३:१-१९; रोमकर ५:१२.
५. देवाच्या काही दूतपुत्रांचे पतन कशामुळे घडले, आणि याचा त्यांना काय परिणाम मिळाला?
५ देवाच्या काही दिव्यदूत पुत्रांमध्येही आपल्याला इशारा देणारे उदाहरण मिळते. (उत्पत्ती ६:१-४) यहोवाच्या स्वर्गीय सान्निध्यात जो आशीर्वाद मिळत होता त्यामध्ये तृप्त न राहता त्यांनी स्वतःमध्ये पृथ्वीवरील स्त्रियांच्या बाबतीत मनोकल्पना जडविल्या, आणि त्यांच्यासोबत शारीरिक समागम करण्यात केवढे सुख मिळू शकेल याच्या विचारतरंगात ते डुबून गेले. आपल्या या मनोकल्पनांनुरुप हालचाल केल्यामुळे त्या अवज्ञाकारी देवदूतांना तार्तरस या आध्यात्मिक काळोखात बंदिस्त ठेवण्यात आले असून येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या राजवटीच्या शेवटाला त्यांचा नाश होण्याची वेळ वाट पाहत आहे.—२ पेत्र २:४; यहूदा ६; प्रकटीकरण २०:१०.
जगीक मनोकल्पनांचा त्याग करा
६, ७. भौतिक धनाबद्दलची जगीक मनोकल्पना का धोक्याची व फसवी आहे?
६ आता आपण सैतानाने प्रसारीत केलेल्या अत्यंत सर्वसाधारण, पण खूपच घातकी अशा मनोकल्पनांपैकी एकीचा विचार करू या. प्रत्येक प्रकारच्या माध्यमाद्वारे आपल्याला या जगीक मनोकल्पनांमध्ये पडण्याचे मोहीत केले जात आहे. हे सर्वसाधारणपणे धनवान बनण्याची लालसा जागृत करून केले जाते. मालमत्ता असण्यामध्ये तितके काही चूक नाही. ईश्वरभक्तीचा अब्राहाम, ईयोब आणि दावीद राजा हे सर्व खूपच श्रीमंत होते, पण त्यांनी भौतिक गोष्टींची लालसा बाळगली नाही. भौतिक मनोकल्पना लोकांना संपत्ती साठविण्यासाठी वर्षानुवर्षे अविरतपणे काम करायला लावतात. अशा मनोकल्पना यांना सर्व प्रकारच्या जुगारात सामील होण्यास जसे की, घोड्यांवर आपले पैसे लावणे किंवा लॉटरी तिकिटे घेणे या गोष्टी करायला लावतात. आपण संपत्तीबद्दल कसलीही भ्रामक कल्पना आपल्या मनात उभारु नये. भौतिक धनसंपदा आपल्याला सुरक्षितता देऊ शकते असे आपल्याला वाटत असल्यास या खऱ्या नीतीसूत्राचा विचार कराः “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही; पण धार्मिकता मृत्युपासून सोडविते.” (नीतिसूत्रें ११:४) खरोखर, भौतिक धन “मोठ्या संकटातून” वाचवण्यासाठी उपयोगी पडणार नाही.—मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:९, १४.
७ भौतिक धन आपल्याला सहज फसवू शकते. या कारणास्तव आपल्याला सांगण्यात आले आहेः “धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.” (नीतिसूत्रें १८:११) होय, ते केवळ “त्याच्या मते” आहे, कारण नियंत्रणाबाहेर गेलेली महागाई, आर्थिक अधःपतन, राजकीय उलाढाली, किंवा प्रदीर्घ आजार या गोष्टीत ते भौतिक धन नाममात्र संरक्षक ठरते. येशू ख्रिस्ताने देखील भौतिक धनावर आपली भिस्त ठेवण्याच्या मूर्खतेसंबंधाने ताकीद दिली. (लूक १२:१३-२१) याखेरीज, प्रेषित पौलाचे हे इशारेवजा शब्दही आम्हापाशी आहेतः “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतले आहे.—१ तीमथ्य ६:१०.
८. लैंगिक स्वभावाच्या जगीक मनोकल्पना किती प्रचलित आहेत, आणि या कोणता धोका आणतात?
८ इतर मनोकल्पना बेकायदेशीर लिंगाचाराशी संबंधित आहेत. पापीष्ठ मानवी स्वभावाला लैंगिक मनोकल्पनांच्या तरंगात किती डुबून राहण्याची इच्छा आहे हे विशिष्ट दूरध्वनी फिरवल्यामुळे ऐकावयास मिळणारी घाणेरडी शाब्दिक भाषा व बीभत्स संदेश याची वाढती लोकप्रियता यावरुन दिसून येऊ शकते. अमेरिकेत तर दूरध्वनीद्वारे उपलब्ध असणारी बीभत्स सेवा ही करोडो डॉलर्सचा उद्योग होऊन बसली आहे. आपण आपली मने अशा बेकायदेशीर लैंगिक आचारावर लावली तर आपण ढोंगी असल्याचे दिसत नाही का, कारण एकतर्फे तर आपण शुद्ध ख्रिस्ती नुसते भासवत असतो? मग, या मनोकल्पना पुढे अनैतिक संबंधांकडे निरवू शकण्याचा धोका नाही का? हे घडले आहे व यामुळे ख्रिस्ती मंडळीतून व्यभिचार किंवा जारकर्म आचरल्याच्या कारणामुळे काहींना बहिष्कृत करण्याचा परिणाम घडला. येशूचे मत्तय ५:२७, २८ मधील शब्द लक्षात घेतल्यास अशा मनोकल्पनांमध्ये दंग असणारे सर्व आपल्या अंतःकरणात व्यभिचार करण्याचे दोषी आहेत हे दिसत नाही का?
९. जगीक मनोकल्पनांविरुद्ध इशारा देण्यात शास्त्रवचने कोणता सुंदर सल्ला देतात?
९ आमच्या पापीष्ठ अंतःकरणाला अशा मनोकल्पनांमध्ये दंग राहण्याची जी लालसा वाटत असते तिजविरुद्ध कार्य करण्यासाठी पौलाची ही ताकीद आपण लक्षात ठेवली पाहिजेः “[देवाच्या] दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तु नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडेवाघडे आहे.” (इब्रीयांस ४:१३) आपण सर्वदा मोशेसारखे असले पाहिजे, जो “अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा” होता. (इब्रीयांस ११:२७) होय, आपण स्वतःला सांगत राहिले पाहिजे की, यहोवाला या जगीक मनोकल्पना आवडत नाहीत, आणि त्या आम्हावर केवळ घातक परिणाम करू शकतात. आपण देवाच्या आत्म्याच्या सर्व फळांची व विशेषेरित्या आत्म-संयम या फळाची जोपासना केली पाहिजे, कारण आपण देहाला अनुसरुन पेरणी केल्यास त्याकडून आपल्याला नाशाचे पीक मिळेल ही वस्तुस्थिती मुळीच टाळता येणार नाही.—गलतीकर ५:२२, २३; ६:७, ८.
राज्याच्या वास्तवता
१०, ११. (अ) निर्माणकर्त्याच्या वास्तवतेबद्दल कोणत्या वस्तुस्थिती आहेत? (ब) पवित्र शास्त्र हे खरेच देवाचे वचन आहे याला कोणता पुरावा आहे? (क) देवाच्या राज्याच्या राजा वास्तविक आहे याला काय पुरावा आहे?
१० जगीक मनोकल्पनांचा त्याग करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राज्याच्या वास्तवतेचा पाठपुरावा करणे. देवाकरवी निर्मित असणाऱ्या राज्याच्या वास्तवता या जगीक मनोकल्पनांच्या अगदी विरुद्ध आहेत. देव स्वतः वास्तविक आहे का? तो अस्तित्वात आहे याबद्दल काही प्रश्नच नाही. दृश्य निर्मिती ही या गोष्टीची साक्ष देते. (रोमकर १:२०) साधारण शंभर वर्षांआधी वॉचटावर संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या द डिव्हाईन प्लॅन ऑफ द एजेस् या पुस्तकात काय म्हटले आहे त्याचे स्मरण दिले जात आहे. ते म्हणतेः “जो दुर्बिणीद्वारे किंवा आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आकाशाकडे बघतो आणि त्याला निर्मितीचा अफाटपणा, त्याची प्रमाणबद्धता, सुंदरता, व्यवस्था, सुसंगतता आणि विविधता दिसते; आणि तरी देखील यांचा निर्माता हा ज्ञान व सामर्थ्य यांच्या बाबतीत अत्यंत श्रेष्ठ आहे याबद्दल तो शंका घेतो आणि म्हणतो की, ही व्यवस्था केवळ आकस्मिकपणे, निर्माणकर्त्याविना उद्भवली, अशा व्यक्तीने कारणमीमांसा गमावली असून त्याला पवित्र शास्त्र जी मूर्ख (कारणाकडे दुर्लक्ष करणारा किंवा त्याची उणीव असलेला) अशी संज्ञा देते तीच योग्य आहे.—स्तोत्रसंहिता १४:१.
११ राज्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला पवित्र शास्त्रात मिळते. पवित्र शास्त्र हे खरेपणाने देवाचा लिखित शब्द आहे का? ते निश्चितपणे तसे आहे व याची प्रचिति त्याची सुसंगतता, त्याची वैज्ञानिक अचूकता, आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची त्याच्यामध्ये असलेली क्षमता, व खासपणे त्यातील भविष्यवादांची होत असलेली पूर्णता, यामुळे मिळते.a देवाच्या राज्याच्या राजा, येशू ख्रिस्त याबद्दल काय? तो खरेच अस्तित्वात होता का? शुभवर्तमान लिखाण आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील ईश्वरी प्रेरणेने लिहिण्यात आलेली पत्रे अगदी स्पष्टरित्या व बोलकेपणाने येशू ख्रिस्ताच्या ऐतिहासिकतेबद्दल साक्ष देतात. येशूच्या इतिहासाच्या बाबतीत यहूदी तालमूदमध्ये ही साक्ष मिळते, जेथे त्याला एक व्यक्ती या नात्याने उल्लेखिण्यात आले आहे. याचप्रकारे, पहिल्या शतकातील यहूदी व रोमी इतिहासकार देखील तीच साक्ष देतात.
१२, १३. देवाच्या राज्याच्या वास्तवतेबद्दल कोणती विधाने साक्ष देतात?
१२ आता राज्याच्या वास्तवतेबद्दल काय? त्याच्याकडे ख्रिस्ती धर्मजगताचे बहुतांशी दुर्लक्ष होत आहे. हे एका मशहूर प्रेसबिटेरियन गृहस्थाने जी तक्रार केली तिजमध्ये दिसून येतेः “पाळक आपल्या लोकांना राज्याच्या वास्तवतेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न गेल्या तीस वर्षांपासून करीत असल्याचे मी ऐकत आहे.” तरीही, राज्याद्वारेच यहोवाच्या नामास पवित्रीकरण लाभणार हा त्याच्या वचनाचा विषय आहे. देवाने स्वतःच राज्याचे प्रथम अभिवचन दिले. त्याने म्हटलेः “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टांच फोडिशील.” (उत्पत्ती ३:१५) या राज्याची पडछाया इस्राएल राष्ट्रात दिसली व खासपणे ती शलमोनाच्या कारकिर्दीत दिसली. (स्तोत्रसंहिता ७२) याशिवाय, देवाचे राज्य हा येशूच्या प्रचाराचा विषय होता. (मत्तय ४:१७) त्याने त्याचा उल्लेख त्याच्या पुष्कळ दाखल्यात, उदाहरणार्थ, मत्तयाच्या १३ व्या अध्यायात सापडणारे दाखले यात केला. येशूने आम्हाला त्या राज्याबद्दल प्रार्थना करण्यास व त्याचा प्रथम शोध घेण्यास सांगितले. (मत्तय ६:९, १०, ३३) खरे म्हणजे, देवाच्या राज्याचा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात १५०च्या जवळपास उल्लेख आला आहे.
१३ हे राज्य खरे सरकार असून त्याच्याठायी सामर्थ्य व अधिकार आहेत आणि ते सर्व योग्य अपेक्षांची परिपूर्ति करील. त्याचे कायदेकानून आहेत, जे पवित्र शास्त्रात आढळतात. या राज्याने खरे पाहता पुष्कळ गोष्टी खऱ्या करून दाखवल्या आहेत. त्याचे निष्ठावंत प्रजाजन—४०,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार—आहेत. ते मत्तय २४:१४च्या पूर्णतेला अनुलक्षून २११ देशात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करीत आहेत. १९९१ या कार्यवर्षात त्यांनी राज्याचा संदेश प्रचार करण्यामध्ये ९५,१८,७०,०२१ तास खर्च केले. हे कार्य, जनसमुदाय मोठ्या संख्येने पवित्र शास्त्राच्या “शुद्ध वाणी”चे शिक्षण घेत असता, प्रत्यक्ष व दीर्घकालीन परिणाम घडवून आणत आहे.—सफन्या ३:९.
राज्याच्या वास्तवतेचा पाठपुरावा करा
१४. राज्याच्या वास्तवतेबद्दलची कदर आपण कशी अधिक दृढ करू शकतो?
१४ मग, आता, आम्हाला देवाच्या राज्याच्या वास्तवतेचा कसा पाठपुरावा करता येईल? आमची आशा ही दृढ खात्रीवर आधारलेली असली पाहिजे. देवाने अभिवचन दिलेले नवे जग आम्हास खरे वाटले पाहिजे. (२ पेत्र ३:१३) याशिवाय, देव आमच्या “डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरणे हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत” या त्याच्या अभिवचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. (प्रकटीकरण २१:४) ही कोणतीही मनोकल्पना नाही याबद्दल आपली कशी खात्री होऊ शकेल? हे सर्व काही देवाच्या नियुक्त वेळी पूर्ण होणार, कारण त्याला खोटे बोलणे अशक्य आहे. (तीतास १:१, २; इब्रीयांस ६:१८) या अभिवचनांवर आपण मनन केले पाहिजे. देवाच्या नव्या जगात स्वतःला बघणे व त्याचे आशीर्वाद अनुभवीत आहोत असे वाटू देणे ही काही अवास्तव मनोकल्पना नसून आमचा तो विश्वास आहे असा पुरावा देते. पौलाने विवेचीत केले त्यानुसार, “विश्वास हा अपेक्षित गोष्टींविषयींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री असा आहे.” (इब्रीयांस ११:१) देवाच्या वचन आणि त्याची समज पुरवून ते कसे लागू करावी याची स्पष्टता देणाऱ्या ख्रिस्ती प्रकाशनांचे नियमितपणे वाचन करून आपण स्वतःला भरवीत राहून आमचा विश्वास दृढ करू या. आपण जितक्या अधिकपणे या राज्याबद्दल इतरांना औपचारिकपणे व अनौपचारिकपणे सांगत राहू तितक्या अधिकपणे आम्हाला आमचा विश्वास बळकट झाल्याचे व आमची आशा अधिक प्रज्वलित झाल्याचे आढळून येईल.
१५. ख्रिस्ती सेवकपणाबद्दल आमच्यावर कोणते बंधन आहे?
१५ आमच्या सेवकपणाचा दर्जा सुधारत राहून आपल्याला राज्याच्या वास्तवतेच्या सहमतात काम करीत राहिले पाहिजे. अद्याप पुष्कळसे करायचे असल्यामुळे ते आम्हाला कसे करता येईल? (मत्तय ९:३७, ३८) शिकून घेण्याच्या बाबतीत वेळ सरलेली नसते ही म्हण खरी आहे. आपण साक्षीच्या कार्यात सहभागी होऊन कितीही वर्षे का झाली असेना, आपल्याला सुधारणा करता येईल. देवाच्या वचनाची हाताळणी अधिक परिणामकारकपणे करण्याद्वारे आपल्याला येशू ख्रिस्त या राजाची वाणी इतरांना ऐकविण्यात मोठी मदत मिळू शकेल. (पडताळा योहान १०:१६.) लोकांचे सार्वकालिक भवितव्य यात गोवलेले आहे याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आम्ही आमच्या क्षेत्राचा उरक पराकाष्ठेने करून लोकांना, ते, “मेंढरे” आहेत की, “शेरडे” यामध्ये कोठे उभे आहेत हे प्रदर्शित करण्याची सारखी संधी देत राहू या. (मत्तय २५:३१-४६) याचा अर्थ हा की, जेथे आम्हाला लोक घरी भेटत नाहीत अशांची व जे खासपणे राज्य संदेशाबद्दल आस्था दाखवतात अशांची काळजीपूर्वक नोंद करून ठेवणे.
राज्याचा पाठपुरावा करीत राहा
१६. राज्याच्या वास्तवतेची जोपासना करण्याबद्दलचे सुंदर उदाहरण कोणी जोपासले, व ते राज्याला कसे ‘पराकाष्ठेने घेत’ आहेत?
१६ राज्याच्या वास्तवतेचा पाठपुरावा करण्यामध्ये पराकाष्ठेच्या परिश्रमाची गरज आहे. शेष उरलेल्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या आवेशी उदाहरणामुळे आपल्याला उत्तेजन मिळत नाही का? ते तर या राज्याच्या वास्तवतेचा पाठपुरावा कितीतरी दशकांपासून करीत आहेत. हा पाठपुरावा येशूने या शब्दात वर्णिलाः “बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर हल्ला [“पाठपुरावा,” न्यू.व.] चालला आहे आणि जबरदस्त लोक [“लोक पराकाष्ठेने,” न्यू.व.] ते नेटाने घेतात.” (मत्तय ११:१२) येथे कोणी शत्रू राज्य बळकावून घेत आहे असा विचार नाही. उलट, जे या राज्याच्या वतनदारीत आहेत त्यांच्या कामाला उद्देशून ते म्हटले आहे. एका पवित्र शास्त्र प्रामाण्यांनी म्हटलेः “अशा प्रकाराने जवळ येत असलेल्या मशीही राज्याबद्दल लोक दाखवीत असलेला उत्साह, प्रयत्नांची पराकाष्ठा व नेट याचे वर्णन दिले आहे.” या राज्याला आपलेसे करण्यात अभिषिक्त जनांनी कोणताही प्रयत्न मागे ठेवला नाही. याचप्रमाणे, ज्यांना देवाच्या स्वर्गीय राज्याची पृथ्वीवरील प्रजा या नात्याने वतन मिळायचे आहे अशा “दुसरी मेंढरे” यांनीही असाच जोराचा प्रयत्न दाखवण्याची अपेक्षा केली जाते.—योहान १०:१६.
१७. जगीक मनोकल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्यांना काय मिळणार?
१७ खरेच, आज आम्ही एका खास सुसंधीच्या काळात राहात आहोत. जे जगीक मनोकल्पनांचा मागोवा घेत आहेत अशांना मिळणाऱ्या कटु परिणामांमुळे त्यांचे डोळे खाडकन् उघडतील. त्यांना मिळणारी दशा या शब्दात सांगितली आहेः “कोणी क्षुधित स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच. कोणी तृषित स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो व्याकुळ व तृषाक्रांत.” (यशया २९:८) या जगाच्या मनोकल्पना निश्चये कोणाची तृप्ती करू शकणार नाहीत व त्याला सुखी करू शकणार नाहीत.
१८. राज्याच्या वास्तवतेच्या दृष्टिकोणातून आपण कोणता मार्ग धरावा, आणि कोणते भवितव्य दृष्टीपथात असू द्यावे?
१८ यहोवाचे राज्य ही खरी वास्तवता आहे. ते क्रियाशीलपणे राज्य करीत आहे; पण या दुष्ट व्यवस्थीकरणापुढे त्वरेचा व कायमचा नाश उभा आहे. यास्तव, पौलाची सूचना आपल्या अंतःकरणी लावाः “आपण इतरांसारिखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:६) आपण आपली मने व अंतःकरणे राज्याच्या वास्तवतेवर केंद्रित करून ठेवू या आणि त्याजकडील चिरकालिक आशीर्वाद अनुभवू या. आणि या राज्याच्या राजाने आम्हाबाबतीत हे म्हटल्याचे आम्हाला ऐकायला मिळोः “अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले ते वतन करून घ्या.”—मत्तय २५:३४.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? हे पुस्तक बघा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ जगीक मनोकल्पना काय आहेत, आणि आम्ही त्यांचा का त्याग करावा?
▫ जगीक मनोकल्पनांमध्ये गुरफटून जाणे केवढे मूर्खतेचे आहे हे कोणती उदाहरणे दाखवतात?
▫ निर्माणकर्ता, त्याचे वचन, येशू ख्रिस्त आणि राज्य यांच्या खरेपणाबद्दल कोणत्या वस्तुस्थिती साक्ष देतात?
▫ राज्याच्या वास्तवतेबद्दलचा आमचा विश्वास कसा अधिक दृढ करता येईल?
[२७ पानांवरील चित्रं]
भौतिक धनसंपदेची लालसा धरल्यामुळे जगीक मनोकल्पना संचारु लागतात
[२८ पानांवरील चित्रं]
राज्याच्या वास्तवतेचा मागोवा घेण्याचा एक मार्ग सुवार्तेचा प्रचार करणे हा होय
[२९ पानांवरील चित्रं]
देवाच्या वचनाचा परिश्रमाने अभ्यास करण्याद्वारे तुम्ही राज्याची वास्तवता जोपासत आहात का?