आशा निराशेला घालवून देते!
वेस्टर्स नाइन्थ न्यू कॉलेजिएट डिक्शनरी यामध्ये निराशेची व्याख्या “आशेची जबर उणीव,” अशी देण्यात आलेली आहे. यास्तव, आपल्याला निराशेवर मात करण्यासाठी आशा हवी आहे!
रस्त्यावरील जीवनमान अनुभवण्यास भाग पडलेल्या माणसाला एखादी आशा आहे तर तो निराश असू शकणार नाही. नैराश्येचा आजार सहन करणाऱ्या लोकांना आशा ही धैर्य आणि सहनशक्तीचे बळ देऊ शकते. पण ही आशा भरवशाची असली पाहिजे. याचा काय अर्थ होतो?
आशेचा आधार
कुलपिता अब्राहाम याची बायको सारा हिच्या बाबतीत काय घडले ते विचारात घ्या. ती ९० वर्षांची झाली तरी अद्याप वांझ होती आणि आता मूल प्रसवू शकणार नाही अशी निराशा तिला लाभली होती. तरीही, तिचा पती ९९ वर्षांचा असता यहोवाने जे अभिवचन काही वर्षांआधी केले होते त्याची पुनरावृत्ती अब्राहामासोबत केली. त्याला “संतान” किंवा वारस लाभेल हे ते अभिवचन होते. हे खात्रीलायक अभिवचन होते ते अब्राहामाला ठाऊक होते. यास्तव, जेव्हा ती आनंदी घटना खरीच अद्भूतपणे घडली, आणि साराने इसहाकाला जन्म दिला तेव्हा ती केवढी आनंदी झाली असावी याचा विचार करा. (उत्पत्ती १२:२, ३; १७:१-४, १९; २१:२) अब्राहामाने देवावर ठेवलेला भरवसा चुकीचा ठरला नाही. प्रेषित पौलाने हेच स्पष्टीकरण दिलेः “त्याने [अब्राहाम] देववचनाकडे पाहून अविश्वासमुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले.”—रोमकर ४:२०.
पौलाच्या काळी ख्रिस्ती बनलेल्या यहूद्यांना लिहिताना त्याने याची चर्चा केली की दोन सबळ कारणांमुळे ते ख्रिस्ताद्वारे देवाच्या तारणाच्या अभिवचनावर अवलंबून राहू शकतात. देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व त्याने सोबत जोडलेली ईश्वरी शपथ याचा उल्लेख करून प्रेषितान आर्जविलेः “मनुष्ये आपणापेक्षा मोठ्यांची शपथ वाहतात; आणि आपले स्थापित करण्यासाठी शपथ ही त्यांच्यामध्य सर्व वादांचा शेवट आहे. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारांस विशेष दाखवावी या इच्छेने देव शपथेच्या मध्ये आला, यासाठी की ज्यांविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गाष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे; ते आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरिता आश्रयास धावलो.” (इब्रीयांस ६:१६-१८) होय, देवाची अभिवचने खरी व विश्वासपात्र आहेत. यहोवा सर्वसमर्थ देव असून तो आपले वचन पूर्ण होण्याची खात्री निश्चितपणे देऊ शकतो.
आशा—“अचल व बळकट”
अशाप्रकारे, पौलाने लिहिले की, ख्रिस्ती आशा ही “अचल व बळकट” आहे. (इब्रीयांस ६:१९) आपली आशा कोठे मुळावलेली आहे हे पौलाला ठाऊ होते. तो स्पष्टीकरण देतोः ‘ती [आशा] पडद्याच्या आतल्या स्थळी पोहंचणारी’ आहे. याचा काय अर्थ आहे? येथे पौल यरुशलेमातील प्राचीन मंदिराचा उल्लेख करीत होता हे उघड आहे. यामध्ये परमपवित्र स्थान होते, जे मंदिराच्या इतर विभागांपासून एका पडद्याद्वारे वेगळे करण्यात आले होते. (निर्गम २६:३१, ३३; मत्तय २७:५१) अर्थात, यरुशलेमातील खरे मंदिर हे नष्ट होऊन आता बराच काळ झाला आहे. तर मग, आज परमपवित्र स्थान कशाला अनुलक्षून आहे?
जेथे देव सिंहासनाधिष्ठ आहे त्या स्वर्गाला! हे पौलानेच स्पष्ट केले व म्हणूनच तो म्हणतो की, येशूचे स्वर्गारोहण झाल्यावर तो “खऱ्या गोष्टींच्या नमुन्यासारखे [यरुशलेम मंदिरात] हातांनी केलेले पवित्र स्थान यात . . . गेला नाही, तर आपल्यासाठी देवासन्मुख उभा राहण्यास स्वर्गात गेला.” (इब्रीयांस ९:२४) अशाप्रकारे, निराशेला सामना देण्यात आम्हाला मदत करणारी ख्रिस्ती आशा ही कोणा मानवी राजनीती तज्ञांवर नव्हे तर स्वर्गीय व्यवस्थेवर अवलंबून आहे. ती, देवाने नियुक्त केलेल्या व ज्याने आपल्या पापांसाठी स्वतःचे जीवन खंडणी म्हणून दिले व जो आता आमच्या वतीने देवासन्मुख उभा आहे त्या येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे. (१ योहान २:१, २) याखेरीज, जसे या मासिकात आधीपासून दाखविण्यात आले तसे, या येशूला देवाचा स्वर्गीया राज्याचा राजा म्हणून नियुक्ती मिळाली आहे व तो १९१४पासून हा राज्याधिकार करीत आहे. हे स्वर्गीय राज्य निराशा निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा लवकरच समूळ नाश करील.
आशा—“जिवाचा नांगर”
येशूद्वारे तारणप्राप्तीची आशा ही सबळ पायावर आधारलेली आहे याची आपल्या वाचकांना खात्री पटविण्यासाठी पौलाने एका साम्यतेचा वापर केला. “ती आशा,” तो म्हणतो, “आपल्याला जिवाचा नांगर आहे.”—इब्रीयांस ६:१९.
पौलासारख्या प्रवाशांना नांगर काय असतो ते चांगले माहीत होते. प्राचीन काळातील नांगर आधुनिक काळातील नांगराच्या समान होते; ते लोखंडाचे होते व याला पुढे दोन दात होते जे समुद्राच्या भूपृष्ठाला पकडून धरत. इ. स. ५८ च्या सुमाराला पौल रोमचा प्रवास करीत असता त्याचे तारु बुडण्याची भीती निर्माण झाली. हे तारु सपाटीच्या दिशेकडे जाऊ लागले तेव्हा खलाशांनी “वरामावरुन चार नांगर” सोडले. या नांगरामुळेच ते तारु वादळापासून वाचले.—प्रे. कृत्ये २७:२९, ३९, ४०, ४४.
तर मग, तुमची आशा बळकट नांगराप्रमाणे होऊन ती आर्थिक तणाव, शारीरिक किंवा मानसिक आजार, किंवा इतर जे “वादळ” उठेल यामध्ये कशी पुढे जाऊ शकेल? प्रथम, पवित्र शास्त्रातील अभिवचन खात्रीदायक आहे याचा आत्मविश्वास बाळगा. “सर्व गोष्टींची पारख करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) उदाहरणार्थ, पुढील वेळेला यहोवाचे साक्षीदार तुम्हाशी बोलतील तेव्हा कृपया ते लक्षपूर्वक ऐका. तुमच्या विभागात ते तुरळक येत असतील तर कृपया त्यांना जवळच्या राज्य सभागृही शोधून काढा. तुम्हाला त्यांच्या संस्थेत येण्याची सक्ति करण्यात येणार नाही, पण एक विनामूल्य असा पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याचे निमंत्रण तुम्हाला देण्यात येईल. हा अभ्यास तुमच्या सोयीनुरुप वाटणाऱ्या जागी व वेळी चालविला जाऊ शकतो.
अशा प्रकारच्या अभ्यासामुळे तुमची खात्री होईल की, देवाकडे “धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो.” (इब्रीयांस ११:६) तुम्हाला शिकायला मिळेल की, देवाचे त्याचा राजा ख्रिस्त याजमार्फतचे राज्य लवकरच, आज पुष्कळांना ज्यामुळे निराशा प्राप्त झालेली आहे ती भ्रष्टता तसेच असमानता काढून टाकील. त्या राज्यामध्ये ही पृथ्वी नंदनवनात रुपांतरीत होईल, आणि देव, आपणावर प्रीती करणाऱ्या सर्वांना चिरकालिक जीवन देईल. (स्तोत्रसंहिता ३७:२९; प्रकटीकरण २१:४) केवढी ही वैभवी आशा!
ही आशा खरीच खात्रीलायक आहे हे पाहण्यासाठी पवित्र शास्त्राचे काळजीपूर्वक वाचन करा. यानंतर, देवासोबत जवळचे व्यक्तिगत नाते उभारण्यासाठी काम करा आणि अब्राहाम होता तसे देवाचे मिळ बनण्याचा प्रयत्न करा. (याकोब २:२३) यहोवा हा “प्रार्थना ऐकणारा देव” असल्यामुळे तुम्ही त्याला आपल्या सर्व चिंता कळवा. तुमचा पवित्र सरळ असला तर तुमच्या प्रार्थनेमुळे तुम्हावरील भार कमी होईल आणि मग निराशेवर मात करता येईल. देवाचा आत्मा, तुम्हाला त्रास देणारी परिस्थिती बदलण्यासाठी देखील परिस्थितीत बदल घडवून आणू शकेल.—स्तोत्रसंहिता ५५:२२; ६५:२; १ योहान ५:१४, १५.
“बळकट धरा”
“सर्व गोष्टींची पारख करा,” ही शिफारस आपल्या सोबतच्या शिष्यांना केल्यावर पौल पुढे म्हणालाः “चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) याचा एक मार्ग म्हणजे जे अशा ख्रिस्ती आशेला बळकट धरुन आहेत अशांच्या बरोबर स्वतःचा सहवास ठेवणे. शलमोन राजाने याचा इशारा दिलाः “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रें १३:२०) अहंभाव किंवा विचित्रतेची भावना यामुळे तुम्ही स्वतःला अशा चांगल्या सहवासापासून वंचित ठेवू नका. यहोवाच्या साक्षीदारात देखील असे लोक आहेत, जे पूर्वी आशाहीन असे होते. पण त्यांनी पवित्र शास्त्राचा केलेला अभ्यास व त्यांच्या समविश्वासूंबरोबर असलेला आनंदी सहवास यामुळे त्यांचे यहोवासोबतचे नाते दृढ झाले आहे व हे त्यांना भरवशाची व नांगरासारखी बळकट आशा देते. यामुळे निराशा नाहीशी होते का? होय, निश्चितपणे!
ॲनमरेचे प्रकरण लक्षात घ्या. आपल्या पतीद्वारे मिळालेल्या अत्यंत कठोर वागणूकीमुळे ती खूपच निराश झाली होती. “मी माझे जीवन संपवण्याचा निश्चय केला,” असे ती सांगते, “पण आधी, काही कारणामुळे देवास प्रार्थना करावी असा विचार केला. मला ते शब्द आठवतात. मी म्हणाले, ‘तू मला का मदत करीत नाहीस? इतका काळ मी तुजवर भाव ठेवून होते, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही.’ मी माझी प्रार्थना थांबविली, हे जाणून की आता माझ्या जीवनात कसलाही उद्देश नाही. यामुळे मरणे हेच मला बरे आहे. याचवेळी माझ्या घराचे दार ठोठावल्याचा आवाज झाला. मी त्याकडे दुर्लक्ष केले, मला वाटले की, ज्याने ते ठोठावले तो निघून जाईल.
“पण ते ठोठावणे पुन्हा घडले आणि मला थोडीशी चीड आली. मी डोळे पुसत दरवाज्यावर कोण आले आहे ते बघण्यासाठी उठले. त्याला लवकरच घालवून देऊन मी केलेला निश्चय पूर्ण करण्याचा बेत ठरविला. पण,” ॲनमरे म्हणते, “मी यहोवाचे उपकार मानते की, मी जे करण्याचे ठरविले ते पूर्ण होऊ शकले नाही. मी दार उघडले तेव्हा दोन स्त्रिया उभ्या असलेल्या दिसल्या. मी खूपच गोंधळलेली होते व त्या काय म्हणतात ते त्यावेळी मला समजले नाही. पण त्यांनी मला असे पुस्तक दिले ज्यात जीवनाला एक उद्देश आहे याचे स्पष्टीकरण होते. माझ्या जीवनात आस्था निर्माण करण्यासाठी ते पुस्तक हेच पुरेसे होते.” तिला भेट देणाऱ्या स्त्रियांनी तिच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला. ॲनमरेने देवाचे मित्र कसे व्हावे ते शिकून घेतले. यामुळे तिला जीवनात एक उद्देश आढळला. आता ती इतरांचा देवावरील विश्वास वाढविण्यात मदत देत आहे.
तुम्ही देखील कदाचित आपल्याला निराशेपासून सुटका मिळावी अशी आशा धरली असेल; पण यात काय काय समाविष्ट असते ते तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही कदाचित ही प्रार्थना देखील म्हटली असेल की, “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” ही देवाचे येशू ख्रिस्तामार्फत चालविल्या जाणाऱ्या राज्यासाठी प्रार्थना आहे व हे राज्य प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना निराश करणाऱ्या सर्व गोष्टींचे समूळ उच्चाटन करणार आहे. (मत्तय ६:१०) पवित्र शास्त्राचा व्यक्तिगत अभ्यास आणि असाच आत्मविश्वास असणाऱ्या इतरांसोबतचा सहवास यहोवाचे राज्य येण्याबद्दल तसेच पृथ्वीर नंदनवन पुनर्स्थापित होण्याबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या आशेची पकड अधिक दृढ करील. (१ तीमथ्य ६:१२, १९) हीच ती वैभवी आशा आहे ज्याच्याबद्दल या मासिकाच्या प्रत्येक अंकात लिखाण असते. निराशेचा सामना करण्यासाठी या आशेला अंतःकरणात घट्ट बिलगून ठेवा. खरेच, “आशा मनोभंग करीत नाही.”—रोमकर ५:५.
[७ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यामुळे आपल्याला अशी आशा मिळते जी “आपल्याला जिवाचा नांगर आहे”