विश्वासास खंबीर करणारे थरारक दृष्टांत
प्रकटीकरणातील ठळक वैशिष्ट्ये
यहोवाचा सेवक योहान आशिया मायनरच्या पश्चिम किनाऱ्यावरील छोट्याशा पात्म बेटावर आहे. तेथे हा वृद्ध प्रेषित आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी पाहतो. त्या लाक्षणिक, थरारक, आणि खऱ्याच अर्थसूचक आहेत! तो, प्रभूच्या दिवसात येतो, ज्याची सुरवात १९१४ मध्ये येशू सिंहासनाधिष्ठ झाल्यापासून आहे व हा दिवस तेव्हापासून हजार वर्षांच्या कारकिर्दीपर्यंत चालेल. मानवजातीच्या अंधःकारमय काळातील घटना योहान बघतो, तरी त्याला बघायला मिळालेला ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकिर्दीचा पूर्वदेखावा किती विलोभनीय आहे! त्या काळी आज्ञाधारक मानवजात केवढे आशीर्वाद अनुभवील बरे!
हे दृष्टांत योहानाने पवित्र शास्त्रातील प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. त्यांचे लिखाण त्याने इ. स. ९६ च्या सुमारास केले; व ते आमचा देव यहोवा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्यावरील आमच्या विश्वासास खंबीर बनवू शकते.—याविषयीची अधिक तपशीलवार माहिती, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीतर्फे प्रकाशित करण्यात आलेले रेवलेशन—इटस् ग्रँड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड या पुस्तकातून मिळू शकेल.
ख्रिस्त प्रेमळ उपदेश करतो
देवाने ख्रिस्ताद्वारे दिलेल्या प्रकटीकरणाच्या सुरवातीस, येशूच्या राज्य-सहवारीसांनी मिळून बनलेल्या सात मंडळ्यांना लिहिलेली पत्रे दिसतात. (१:१–३:२२) या पत्रांमध्ये सर्वसाधारणपणे प्रशंसा, समस्यांची ओळख, सुधारणूक आणि/किंवा उत्तेजन दिल्याचे आढळते. शिवाय विश्वासूपणे आज्ञाधारकपणा प्रदर्शित केल्यास येणाऱ्या आशीर्वादांची नोंद दिली आहे. इफिसकर जरी टिकून राहिले तरी, त्यांच्याठायी सुरवातीची प्रीती राहिलेली नव्हती. तसेच आध्यात्मिकतेत समृद्ध राहिलेल्या स्मुर्णा मंडळीस संकटात देखील विश्वासू राहण्याचे उत्तेजन दिले आहे. पर्गम मंडळीत छळ वरचढ होऊ शकला नाही, तरी तिने पंथीयांना आपणात समावून घेतले होते. थुवतीरा मंडळीतील ख्रिश्चनांच्या हालचालीत जरी प्रगती होती तरी तेथे इजबेलीचा प्रभाव अस्तित्वात होता. सार्दीस येथील मंडळीला आध्यात्मिकतेत जागृत होण्याची गरज होती. तर फिल्देलफियामधील मंडळीला जे काही तिच्यापाशी होते ते दृढ धरून राहण्यास विनवले आणि कोंबट लावदिकियास आध्यात्मिक इलाजाची गरज होती.
भावी स्वर्गीय राजांसाठी, आणि तसे पाहता सर्व ख्रिश्चनांसाठी देखील तालीम मिळावी यासाठी ही किती उत्तम वचने आहेत! उदाहरणार्थ, आम्हापैकी कोणी कोंबट बनला आहे का? मग त्याने जलद हालचाल करावी. उष्णतेच्या दिवशी जसे पेलाभर गार पाणी हुशारी आणविते तसे बनावे, सोबतच यहोवा व त्याची सेवा यांजबद्दल उबदार तजेला प्रदर्शित करावा.—पडताळा मत्तय ११:२८, २९; योहान २:१७.
कोकरा गुंडाळी उघडतो
यहोवा आपल्या वैभवी सिंहासनावर विराजमान आहे हे पुढे पहायला मिळते. (४:१–५:१४) त्याच्या सभोवताली २४ वडील व चार जिवंत प्राणी आहेत. त्याच्या हाती सात शिक्के मारलेली एक गुंडाळी आहे. ती गुंडाळी कोण उघडणार? का बरे, कोकरा, येशू ख्रिस्त ते करण्यास योग्य आहे!
कोकरा एकानंतर एक असे सहा शिक्के फोडत असता नाट्यमय घटना घडतात. (६:१–७:१७) पहिला शिक्का फोडताच ख्रिस्त, पांढऱ्या घोड्यावर बसलेला स्वार या नात्याने सामोरा आला; त्याला मुकूट (१९१४ मध्ये) देण्यात आला आणि तो विजय प्राप्त करीत पुढे जात आहे. पुढील तीन शिक्के फोडताच, इतर घोडेस्वारांनी युद्ध, दुष्काळ व मरण यांना मानवजातीत पसरविले. पांचवा शिक्का फोडताच, ख्रिस्तासाठी ज्यांना हुतात्मिक मरण सहन करावे लागले, अशा लोकांनी रक्ताचा सूड घेण्याची ओरड केली; आणि त्या प्रत्येकास “एक पांढरा झगा” देण्यात आला, जो त्यांच्या पुनरुत्थानानंतरच्या त्या नीतीमान हक्काचे द्योतक आहे व तो त्यांना राजकीय हक्क तसेच अमर आत्मिक प्राणीमात्रांचे जीवन प्रदान करतो. (पडताळा प्रकटीकरण ३:५; ४:४.) जेव्हा सहावा शिक्का फोडला, तेव्हा देवाच्या व कोकराच्या क्रोधदिनाची घोषणा एका मोठ्या भूमिकंपाद्वारे करण्यात आली. पण, न्यायदंडाचे चिन्ह असणाऱ्या “पृथ्वीवरील चार वारे” यांना, देवाच्या १,४४,००० दासांवर शिक्का मारून पूर्ण होईपर्यंत, धरून ठेवले आहेत. त्यांचा देवाच्या आत्म्याकरवी अभिषेक होतो, आणि ते त्याचे दत्तकपुत्र बनतात, तेव्हा त्यांना एक अगाऊ प्रतीक—शिक्का—एक हक्क—त्यांच्या स्वर्गीय वारशाबद्दल प्राप्त होतो. केवळ, चाचणीतून पार पडल्यावरच शिक्का कायम होतो. (रोमकर ८:१५-१७; २ करिंथकर १:२१, २२) शिवाय, योहानाला, सर्व राष्ट्रांमधून एक मोठा कळप, पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालिक जीवन मिळविण्याच्या आशेने सामोरा येत असल्याचे पाहून केवढे नवल वाटले असावे! ते “मोठ्या संकटातून,” मानवजातीच्या असामान्य संकटांना तोंड देऊन बाहेर आलेले असणार.
जेव्हा सातवा शिक्का फोडला जातो तेव्हा केवढ्या धक्कादायक घटना घडतात बरे! (८:१–११:१४) अर्धातास निवांत होते, ज्यामुळे पवित्र जनांच्या प्रार्थना ऐकण्यास अवसर दिला. त्यानंतर वेदीवरचा अग्नी पृथ्वीवर जोरात झोकून दिला. मग, ते सात देवदूत कर्णा वाजविण्यास सिद्ध झाले, ज्यांच्याद्वारे ख्रिस्ती धर्मजगतावरील देवाच्या पिडा घोषित केल्या गेल्या. हे कर्णा मोठे संकट येईपर्यंत या शेवटल्या काळाच्या सबंध अवधीत वाजत राहणार. चार कर्णे पृथ्वीवर, समुद्रावर, ताज्या पाण्याच्या झऱ्यावर तसेच सूर्य, चंद्र व तारे यांच्यावरही अनर्थ गुदरण्याची घोषणा करतात. पाचवा कर्णा वाजविण्यामुळे त्या टोळांना हाक देण्यात येते, जे अभिषिक्त ख्रिश्चनांची प्रतिमा आहेत, ज्यांनी १९१९ पासून पुढे सुयुद्ध करण्यात टोळधाडीसमान आगेकूच केले आहे. सहाव्या कर्ण्याच्या गर्जनेने, घोडेस्वारांच्या दलाचा हल्ला होतो. याच्या पूर्णतेत, अभिषिक्तास १९३५ पासून ‘मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाला, जो त्यांना मिळून, ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मनेत्यांच्या विरुद्धतेत सताविणारा न्यायदंडरुपी संदेश घोषित करीत आहेत.
नंतर योहान एका लहानशा गुंडाळीस खातो, जी अभिषिक्तांनी त्यांच्या नेमणूकीचा स्वीकार केल्याचे व ते ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध जो जो ईश्वरी न्यायदंड घोषित करतात, तो देववचनातील ज्या ज्या भागातून आहे, त्याकडून पौष्टीक आहारासमान सत्व प्राप्त करीत असल्याची खूण आहे. प्रेषिताला मंदिर वेदीचे मोजमाप घेण्याची आज्ञा दिली, ही योजना, मंदिर व्यवस्थापनाबद्दल यहोवा काही पूर्णता घडविणार तसेच तो ईश्वरी दर्जा मंदिराशी संबंधित सर्वांनी राखावा ही अपेक्षा, निदर्शित करीत होती. मग, देवाकडील अभिषिक्त “दोन साक्षीदार” तरट पांघरून संदेश देतात, व मारले जातात, पण परत उठविले जातात. हे सर्व १९१८-१९ च्या काळाकडे अंगूली दाखविते, ज्यात शत्रूंनी प्रचारकार्यास बहुतेक मृतवत् पाडले होते; पण त्यांच्या सेवकपणाप्रीत्यर्थ, यहोवाच्या सेवकांना अद्भुतरित्या पुनरुज्जीवीत करण्यात आले.
राज्य जन्मले आहे!
सातव्या कर्ण्याच्या वाजविण्यात राज्याचा जन्म झाल्याची घोषणा करण्यात आली. (११:१५–१२:१७) स्वर्गात एका लाक्षणिक स्त्रीने (यहोवा देवाच्या स्वर्गीय संस्थेने) एका पुसंतानाला (ख्रिस्त हा राजा असणाऱ्या देवाच्या राज्याला) जन्म दिला, पण त्याला खाऊन टाकण्याचे अजगराचे (सैतान) प्रयत्न निष्फळ ठरले. १९१४ मध्ये राज्याचा जन्म झाल्यानंतर लगेच स्वर्गात युद्ध झाले, आणि विजयी मिखाएलने (येशू ख्रिस्त) अजगरास आणि त्याच्या दुरात्म्यांना खाली पृथ्वीवर टाकले. तेथे अजगराने स्वर्गीय स्त्रीच्या संतानापैकीच्या शेषासोबत आपले युद्ध जारी ठेवले.
यानंतर योहान एका श्वापदास पाहतो, ज्याची एक अमंगळ मूर्ति तयार केली जाते. (१३:१-१८) हे सात डोकी व दहा शिंगे असलेले श्वापद “समुद्रातून“ म्हणजे ज्यांचेमधून मानवी सत्तांची निर्मिती होते त्या खळवळलेल्या लोकसमुदायातून, वर आले. (पडताळा दानीएल ७:२-८; ८:३-८, २०-२५.) या प्रतीकात्मक प्राण्याच्या अधिकाराचा मूळ उगम कोठून आहे? का बरे, सैतान, जो अजगर, याजशिवाय दुसऱ्या कोणाकडून नाही. आणि, कल्पना करा! या राजकीय नश्वरासमान संस्थेस दोन शिंगाचे एक श्वापद (अँग्लो-अमेरिकन जागतिक जोडसत्ता) एक “मूर्ति,” जी आज संयुक्त राष्ट्रसंघ या नावाने ओळखली जाते, तिची तयारी करीत असलेली दिसते; शिवाय तिच्या मार्गी सर्व गोष्टी करण्यास लावून व त्यांच्या जीवनावर वर्चस्व गाजविण्यात तिची “खूण” धारण करून घेण्यास भाग पाडतात. पण, यहोवाचे साक्षीदार, या श्वापदाची दुरात्मिक खूण करून घेण्याचे पूर्ण विश्वासाने नाकारतात.!
यहोवाचे सेवक हालचाल करतात
देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओतल्या जात असता देवाचे विविध सेवक आपापल्या हालचालीत लागल्याचे दिसून आले. (१४:१–१६:२१) ऐका! स्वर्गीय सियोन डोंगरावर, १,४४,००० जणू एक नवे गीत गात असल्याचे योहानास ऐकू येऊ लागले. एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडत होता, त्याच्यापाशी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. यावरुन काय दिसून आले? राज्य संदेश घोषित करण्यात यहोवाच्या साक्षीदारांना दिव्यदूतांचे साहाय्य आहे.
पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडण्यात आले आहे व सर्व राष्ट्रांना देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकून तुडविले गेले हे पाहून योहान थक्क झाला असेल. (पडताळा यशया ६३:३-६; योएल ३:१२-१४.) यहोवाने आदेश देताच सात देवदूतांनी देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओतल्या. पहिल्या सहा वाट्या ओतत असता पृथ्वी, समुद्र, ताज्या पाण्याचे उगम, तसेच सूर्य, श्वापदाच्या आसनावर, फरात महानदावर परिणाम झाले. दुरात्मिक प्रचार मानवी राजांना देवाच्या हर्मगिदोनच्या लढाईसाठी एकत्र करीत असल्याचे पाहून योहानाला केवढी शिरशिरी भरली असावी याची कल्पना करा. शेवटी सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतताच त्याचा परिणाम केवढ्या भयानक नाशात झाला.
दोन प्रतिकात्मक स्त्रिया
मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, याचा अधःपात झाल्याचे तसेच त्याच्या नाशानंतर घडणाऱ्या आनंदाच्या घटना बघून योहान केवढा हर्षभरीत झाला असेल. (१७:१–१९:१०) पवित्र जनांचे रक्त पिऊन मस्त झालेली ती स्त्री, सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर (प्रथम लिग ऑफ नेशन्स व आता तिची वारस संयुक्त राष्ट्र संघ) स्वार झालेली दिसत आहे. पण तेच, त्याची शिंगे तिजवर उलटताच कसा विध्वंस सहन करते.
मोठ्या बाबेलचा नाश केल्यामुळे, स्वर्गातून यहोवाच्या गौरवार्थ केवढ्या मोठ्या वाणी ऐकू आल्या. याशिवाय कोकऱ्याचे व त्याची नवरी, पुनरुत्थित अभिषिक्त जणांचा वर्ग, हिचे लग्न होतेवेळी केवढ्या प्रचंड गौरवी गर्जनांच्या वाणी झाल्या.
ख्रिस्त विजय मिळवतो व सत्ता चालवितो
योहान आता राजांच्या राजास स्वर्गीय सैन्याचे नेतृत्व करताना व सैतानी व्यवस्थीकरणाचा सर्वनाश करताना पाहतो. (१९:११-२१) होय, “देवाचा शब्द” येशू, राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारतो. प्रेषित पाहतो की, ते श्वापद (सैतानाची राजकीय संस्था) आणि खोटा संदेष्टा (अँग्लो-अमेरिकन जागतिक जोडसत्ता) यांना “अग्नीचे सरोवर,” संपूर्ण, कायमचा नाश सूचित करणाऱ्या जागी टाकतो.
यानंतर पुढे काय? अर्थातच, सैतानास अगाधकूपात टाकल्याचे योहान पाहतो. मग लगेच तो ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीचा पूर्वदृष्टांत पाहतो, ज्यात येशू व त्याचे सहअधिपती मानवजातीचा न्याय करतील, आज्ञाधारकांना मानवी पूर्णतेप्रत पोहंचवितील. (२०:१-१०) आता शेवटल्या परिक्षेची वेळ येते. अगाधकूपातून सुटका झाल्यावर सैतान, पूर्णत्वास पोहंचलेल्या मानवजातीस ठकविण्याच्या प्रयत्नात असता देवाविरुद्ध असणाऱ्या सर्व दुरात्म्यांचा व मानवांचा नाश केला जाईल.
काळाच्या ओघात, परत मागोवा घेत असता, हेडीज (मानवजातीची सर्वसाधारण कबर) मध्ये असलेल्या व समुद्रात मेलेल्या सर्वांना पुनरुत्थान मिळाल्याचे व भव्य पांढऱ्या सिंहासनावर विराजमान असलेल्या देवासमोर त्यांचा न्याय होत असल्याचे पाहून योहान केवढा अचंबित झाला असेल! (२०:११-१५) यानंतर, मरण व हेडीज यांनी परत आपले सावज हेरू नये यासाठी अग्नीच्या सरोवरात टाकून दिले जाईल तेव्हा नीतीमान लोकांना महान सुटकेचा आनंद होईल.
योहानाचे दृष्टांत अंतास येत असता त्याने नव्या यरुशलेमास पाहिले. (२१:१–२२:२१) ती शासकीय नगरी स्वर्गातून खाली उतरत होती, व राष्ट्रांसाठी नवा प्रकाश आणीत होती. नव्या यरुशलेममधून “जीवनी पाण्याची नदी” वाहत होती, जी शास्त्रवचनीय सत्य व येशूच्या बलिदानावर आधारीत देवाने पुरविलेल्या त्या प्रत्येक तरतुदीचे प्रतिक आहे, ज्यांच्याद्वारे मानवजातीची पाप व मरण यांच्यापासून सुटका होऊन त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. (योहान १:२९; १७:३; १ योहान २:१, २) या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर, योहानाच्या दृष्टीस अशी झाडे असल्याचे दिसली, ज्यांची पाने, आज्ञाधारक मानवांना चिरकालिक जीवन पुरविणाऱ्या यहोवाच्या संकल्पाच्या एका भागास चित्रित करतात. देव व ख्रिस्त यांच्याकडील शेवटल्या संदेशानंतर, एक आमंत्रण दिलेले आहे. हे ऐकणे केवढे विस्मयकारक आहे की, आत्मा व वधू ही सर्व तान्हेल्यांना आमंत्रण देतात की, ‘या, जीवनी पाणी फुकट घ्या!’ शेवटी, प्रकटीकरणातील शेवटले शब्द वाचीत असता आम्हीही योहानाच्या त्या कळकळीच्या उद्गारात सामील होऊ: “आमेन! ये, प्रभु येशू, ये.”
[२८ पानावरील चौकट]
जागृत राहाः देवाच्या हर्मगिदोन (आर्मगिदोन) युद्धाबद्दलच्या भविष्यवादित शब्दांच्या पंक्तीमध्येच असे म्हटले आहेः “पाहा, मी [येशू ख्रिस्त] चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य.” (प्रकटीकरण १६:१५) हा कदाचित, यरुशलेम मंदिरात पहारेकरी म्हणून जो देखरेख करीत असे त्याच्या कर्तव्याच्या जबाबदारीस अनुलक्षून समांतर असा उल्लेख असावा. पहाऱ्याच्या काळात, तो मंदिरात हे पाहत फेरी मारत असे की, त्याचे लेवी पहारेकरी त्यांच्याजागी जागे आहेत की, झोपी गेलेले आहेत. कोणी पहारेकरी झोपी गेलेला आढळून आल्यास त्याला काठीने मारीत व लज्जास्पद शिक्षा म्हणून त्याची बाह्य वस्त्रे जाळून टाकीत. आता हर्मगिदोन एवढे जवळ आलेले असता, “राजकीय याजकगण” किंवा “आध्यात्मिक मंदिरा”च्या अभिषिक्त शेषांनी आध्यात्मिकतेत जागृत राहण्याचा निश्चय केलेला आहे. तसेच ज्यांच्याठायी पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे अशा त्यांच्या साथीदारांनी, “मोठ्या लोकसमुदाया”नेही सावध राहिले पाहिजे, कारण ते देखील देवाची, त्याच्या मंदिरात पवित्र सेवा करीत आहेत. (१ पेत्र २:५, ९; प्रकटीकरण ७:९-१७) मुख्यतः ख्रिश्चन देखरेख्यांनी, मंडळीत कोणाही प्रकारचे दुषित वातावरण फैलावू नये म्हणून सतत दक्ष राहावे. कारण ते जागृत राहिल्यास, देवाच्या आध्यात्मिक मंदिरातील सर्व विश्वासू भक्तांचे, त्यांची “वस्त्रे” राखण्यात मदत होईल. याद्वारे ते हे निदर्शित करतील की ते यहोवाचे साक्षीदार म्हणून त्यांच्या सेवेचा आदर करीत आहेत.