“स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनांना तुमचे स्वागत असो!
स्वातंत्र्य! या शब्दातून केवढ्या सुखदायक भावनेची जाणीव होते! बंधनात किंवा दास्यत्वात राहणे हे कोणालाही आनंदाचे वाटत नाही. अलिकडच्याच काळात कल्पना नसताना काहींना राजकीय स्वातंत्र्याच्या आशादायक हालचाली दिसल्या.
राजकीय स्वातंत्र्य हवेहवेसे वाटत असले तरी आणखी एक असे स्वातंत्र्य आहे जे अधिक महत्त्वाचे व इष्ट आहे. याच स्वातंत्र्याविषयी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने भाष्य केले. तो आपल्या शिष्यांना याविषयी असे म्हणालाः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” (योहान ८:३१, ३२) हे खोटे धार्मिक विश्वास, मानवाचे भय, पापीष्ठ वासनांचे दास्यत्व, आणि अधिक गोष्टींपासूनचे स्वातंत्र्य आहे.
हाच तर, जगभर होणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतिय अधिवेशनांचा विषय, “स्वातंत्र्याचे चाहते” असा आहे. ही अधिवेशने १९९१ सालाच्या उत्तरार्धात सुरु होतील. देवाच्या लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांची शासकीय बंधनातून १९१९ पासून सुटका झाल्याच्या वर्षापासून ते शुद्ध भक्तीच्या अनुषंगाने वाढते स्वातंत्र्य उपभोगीत आहेत.
गेल्या काही वर्षात ईश्वरशासित अधिवेशनांसाठी “स्वातंत्र्य” हा विषय निवडण्यात आला हे मोठे लक्षवेधी आहे. “मुक्त राष्ट्राचे ईश्वरशासित संमेलन,” आणि “‘देवाच्या पुत्रांची स्वतंत्रता’ प्रांतिय संमेलने” ही ती शीर्षके होती. याचप्रमाणे, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते आणि लाईफ एव्हरलास्टिंग—इन फ्रीडम ऑफ द सन्स ऑफ गॉड या प्रकाशनांत देखील स्वातंत्र्याविषयी विस्तारित चर्चा करण्यात आली आहे.
यहोवाच्या सेवकांना असलेले देव-प्रणीत स्वातंत्र्य हे केवळ त्यांचे कल्याण व आनंद यापुरते मर्यादित नाही. गलतीकर ५:१३ मध्ये आपल्याला वाचायला मिळतेः “बंधुजनहो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.” “स्वातंत्र्याचे चाहते” हे प्रांतिय अधिवेशन आम्हाला आमच्या स्वातंत्र्याच्या हेतूची कदर बाळगण्यात मदत देईल, ते आमचे हे मोलवान स्वातंत्र्य जतन करून ठेवण्यात आमचे साहाय्य करील व त्याचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा हे शिकवील.
हे अधिवेशन शुक्रवारी सकाळी १०:२०ला संगीतमय कार्यक्रमानिशी सुरु होईल. यामुळे आम्हाला पुढे दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक अन्नाची स्वीकृती चांगल्या मनोदयाने करण्यासाठी सज्ज केले जाईल. पहिल्या दिवसाचा विषय आहे, “आम्हास स्वतंत्र करणारे सत्य ओळखणे” व तो योहान ८:३२ वर आधारलेला असेल. सकाळच्या कार्यक्रमात अध्यक्षांचे स्वागतपर विचार “देवाकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा हेतू व उपयोग” या भाषणात असतील. हे भाषण, यहोवाचे पूर्ण स्वरुपाचे स्वातंत्र्य व आम्हास देवाकडून मिळालेले सापेक्ष स्वातंत्र्य यामधील फरक दाखवील. शिवाय ते, आम्हास असलेल्या स्वातंत्र्याचा शक्यतो चांगलाच वापर करण्याचे उत्तेजन देईल. दुपारचा कार्यक्रम आमचे स्वातंत्र्य व आमची सेवा याच्या अनुषंगाने विविध गोष्टी सादर करील आणि दिवसाचा समारोप खऱ्या भक्तीच्या वाढीसाठी स्वतंत्र झालेले या नाटकाने होईल.
दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे शिर्षक “आम्हास देवाकरवी लाभलेल्या स्वातंत्र्यामध्ये टिकून राहाणे” असे असून ते गलतीकर ५:१ वर आधारलेले असेल. सकाळच्या कार्यक्रमात एक परिसंवाद होईल व त्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या कौटुंबिक वर्तुळात देवाकरवी लाभलेले स्वातंत्र्य कसे उपभोगू शकेल याविषयीची माहिती सादर केली जाईल. ज्यांची बाप्तिस्मा घेण्याची तयारी झालेली आहे अशांना समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे कसे स्वातंत्र्य मिळवले जाते ते जाणून घेणे खासपणे आवडेल. दुपारच्या कार्यक्रमातील एका भागात, विवाह ही सौख्यानंदाची किल्ली आहे की नाही याविषयी कुतूहल निर्माण करणारी चर्चा होईल. याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या विविध पैलूविषयी एक परिसंवाद देखील होईल, आणि शेवटी, देवाचा प्रमुख प्रतिनिधी स्वातंत्र्य व सार्वकालिक जीवन देण्यामध्ये काय करतो याकडे लक्ष वेधणारे भाषण होईल.
रविवारच्या कार्यक्रमाचे शिर्षक, “आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग देवाच्या आत्म्याच्या सहमतात करणे,” हे असून ते २ करिंथकर ३:१७ वर आधारलेले असेल. कार्यक्रमात, मत्तय १३:४७-५० मधील येशूच्या दाखल्यावर एक मनोरंजक परिसंवाद सादर होईल, ज्यामध्ये यहोवाचे साक्षीदार ‘लोकांस धरणारे’ असे कोणत्या अर्थाने सेवा करतात याची माहिती प्रकटविली जाईल. दुपारी होणाऱ्या जाहीर भाषणाचा विषय, “देवाकडील स्वातंत्र्यपूर्ण नव्या जगाचा जयघोष करा” असा राहील. यानंतर या वेळेपासून प्रांतिय अधिवेशनात एक नवीन कार्यक्रम सुरु होईलः त्या आठवड्यासाठी असणाऱ्या टेहळणी बुरुज अभ्यासाचा सारांश घेतला जाईल. शेवटी, आमची वागणूक व आमचे सेवाकार्य यामध्ये देवाने आम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करीत प्रगति करावी याविषयी शास्त्रवचनीय बोध सादर केला जाईल.
सर्व स्वातंत्र्याच्या चाहत्यांना आम्ही स्तोत्रकर्त्या दावीदाच्या शब्दांत हे आमंत्रण देतोः “यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.” (स्तोत्रसंहिता ३४:८) या अधिवेशनाला येण्यास कोठलेही अडखळण राहू देऊ नका. शुक्रवारी सकाळच्या कार्यक्रमापासून ते रविवार दुपारच्या शेवटल्या भाषणापर्यंत उपस्थित राहण्याचा मनोदय राखा. तुम्ही आरोग्यदायी आध्यात्मिक आहाराच्या क्षुधेने आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव राखून याल तर तुम्ही खरेच आनंदी व्हाल. (मत्तय ५:३) तसेच, आपण हे तत्त्व विसरू नयेः “जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील.” हे तत्त्व आम्ही, अगाऊपणे किती तत्परतेने उपस्थित राहण्याची तयारी करतो, कार्यक्रम सादर होत असताना आम्ही तो केवढ्या कळकळीने ऐकतो, आणि “स्वातंत्र्याचे चाहते” या प्रांतिय अधिवेशनात आम्हाला जे स्वयंसेवकाचे काम आहे ते केवढ्या उत्साहाने हाती घेतो त्याच्या बाबतीतही लागू होणारे आहे.—२ करिंथकर ९:६.