मवाबी शिला नष्ट झालेली, पण न हरवलेली
मवाबी किंवा मेशा शिलेचा शोध १८६८ मध्ये लागला त्याच वर्षभरात ती हेतुपुरस्सर तोडण्यात आली. ती जवळजवळ ३,००० वर्षांची जुनी होती. ही काळ्या लाव्ह्याची गोलाकृती शिला चार फूट उंच, दोनपेक्षा अधिक फूट रुंद व दोन फूट जाडीची होती. काही काळानंतर ती फोडण्यात आली. तिचे दोन मोठे व अठरा लहान तुकडे मिळाले, पण या शिलेचा एक तृतीयांश भाग पुन्हा कधीही मिळू शकणार नाही असा हरवला गेला.
अशी ही अभूतपूर्व कलात्मकता कशी नष्ट झाली? ती पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी केवढी महत्त्वपूर्ण आहे?
गुप्त कारस्थान व बेईमानपणा
एफ. ए. क्लेन हे ते पहिले व शेवटले युरोपियन गृहस्थ होते, ज्यांनी या शिलेला अभंग स्थितीत बघितले. ती मृत समुद्राच्या ईशान्येकडे दिबोनच्या भग्न अवशेषात पडली होती. या शिलेच्या उंचवट्यावरील ३५ ओळींची नक्कल त्यांनी करून घेतली, आणि यरुशलेमात परतल्यावर त्यांनी तो शोध प्रुसियन वरिष्ठांना कळवला. ते लिखाण फोएनशियाचे असल्याचे ओळखले गेले आणि ते महत्त्वपूर्ण असल्याचे समजले गेले. ही शिला विकत घेण्यासाठी बर्लिनच्या रॉयल संग्राहालयाने किंमत देऊ केली, पण आणखी काही लोक यात रस घेऊ लागले होते; ते देऊ करीत असलेली किंमत जाणून स्थानिक शेखांनी ती शिला लपवली आणि तिची किंमत भरमसाट वाढवली.
एका फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञाने त्या लिखाणावर कागदाचा दाब देऊन त्याच्या छटा मिळविण्याचा प्रयत्न केला, पण तो कागद ओला होण्याआधी काढावा लागल्यामुळे त्यावरील लिखाण स्पष्ट दिसू शकले नाही. मध्यंतरात, ज्यांच्यापाशी ही शिला होती त्या बेडौन जमातीने ती सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुपुर्द करावी असे आदेश दमास्कस येथून पाठवले गेले. त्या जमातीने ते करण्याऐवजी या शिलेला नष्ट करण्याचे ठरविले. यामुळे त्यांनी त्या मोलवान शिलेसभोवती आग पेटवली, व त्यावर सतत पाण्याचा मारा केला. ही शिला जेव्हा भंगली तेव्हा त्यांनी त्याचे तुकडे स्थानिक कुटुंबाला आपापल्या धान्याच्या कोठारात दडवून ठेवण्यासाठी दिले; यात हेतू हा होता की, त्यांच्या पिकांवर आशीर्वाद यावा. या तुकड्यांमुळे त्या विशिष्ठ व्यक्तींना व्यक्तीगतपणे त्यांची विक्री करण्याचा उत्तम मार्ग मिळाला.
पवित्र शास्त्र इतिहास जिवंत होतो
जे तुकडे विकत घेण्यात आले त्यांची गिलावा व कागदावरील छटा यांच्या माध्यमाने केलेल्या जुळणीमुळे शेवटी शिलेवरील लिखाण मिळवता आले. सबंध लिखाण मिळवले गेले तेव्हा प्रामाण्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यावेळी त्या प्राचीन चिऱ्याचे वर्णन “अद्यापपर्यंत शोधण्यात आलेले अप्रतिम स्मारक” असे करण्यात आले.
मवाबाचा राजा मेशा याने मवाबी शिला आपला देव कमोश याच्याप्रीत्यर्थ, मेशाने इस्राएलाचे त्याजवरील ४० वर्षांचे आधिपत्य झुगारून दिल्याच्या स्मरणार्थ बसवली होती. कमोशचा “त्याच्या देशावर कोप झाला होता” त्यामुळे मेशा इस्राएलाच्या अंकित झाला असे समजले जात होते. मवाबाने हे जे बंड केले ते पवित्र शास्त्रातील २ रे राजे याच्या तिसऱ्या अध्यायातील माहितीशी संबंधित असल्याचे समजले जाते. त्या शिलालेखावर मेशाने आपण खूप धार्मिक, शहरे व हमरस्ते बांधणारा, आणि इस्राएलावर विजय संपादित करणारा असल्याचे मोठ्या दिमाखाने कोरले आहे. या सर्वांचे श्रेय तो त्याचा देव कमोश याला देतो. तद्वत, पवित्र शास्त्रात लिखित असणारा मेशाचा पराजय तसेच त्याने आपल्या पुत्राचा केलेला बळी या सर्व गोष्टी अर्थातच या स्वगौरवाच्या लिखाणात गाळल्या जाणार हे अपेक्षिता येते.
मेशाने जिंकल्याचा दावा केलेली कित्येक ठिकाणे पवित्र शास्त्रात उल्लेखिण्यात आली आहेत व त्यापैकीची काही मेदबा, अतारोथ, नबो व यहाज ही होत. अशाप्रकारे ती मवाबी शिला पवित्र शास्त्र इतिहासाची अचूकता दाखवते. तथापि, यामध्ये अत्यंत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने त्या लिखाणाच्या १८ व्या ओळीत इस्राएलाच्या देवाचे नाव मूळ आद्याक्षरात YHWH लिहिल्याचे आढळून येते. तेथे मेशा ही घमेंड करतो की, “मी तेथून [नबो] याव्हेची पात्रे आणली; त्यांना कमोशपुढे ओढत आणले.” ईश्वरी नामाचा पवित्र शास्त्राबाहेर केला गेलेल्या वापरात हा बहुधा अगदी सुरवातीचा अहवाल असावा.
१८७३ मध्ये या मवाबी शिलेवर गिलाव्याने राहिलेली वचने कोरून पूर्ण शिला तयार केली गेली व तिला पॅरिस येथील लौवूर संग्राहालयात ठेवण्यात आले. ती आता तेथेच आहे. लंडनमधील ब्रिटीश संग्राहालयात याची नक्कल ठेवण्यात आली आहे.
[२७ पानांवरील चित्रं]
(वर) मवाबाचा प्रदेश
(डावीकडे) पुनर्रचना केलेली मवाबी शिला
(उजवीकडे) तयार केलेल्या नकलेतील ईश्वरी नामाची मूळाक्षरे