वाचकांचे प्रश्न
देवदूत आत्मिक आहेत, त्यांना भौतिक शरीरे नाहीत; मग, तुम्ही तुमच्या चित्रांमध्ये त्यांना पंख असलेले का दाखवता? ही केवळ एक धार्मिक रूढी आहे म्हणून का?
आम्ही देवदूतांना पंखांसहित दाखवतो याचे कारण त्यांचे तसे लाक्षणिक वर्णन पवित्र शास्त्रात आढळते.
तुम्ही जे म्हणता की, आत्मिक प्राण्यांना पंखासहित चेहरे, हात, पाय किंवा शरीराचे इतर भाग असणारी भौतिक शरीरे नाहीत ते बरोबर आहे. तरीही प्रसंगी जेव्हा देवाच्या सेवकांसमोर देवदूत प्रकट झाले तेव्हा ते सर्वसामान्य माणसांप्रमाणेच दिसत असतील, कारण ते तसेच वाटले होते.—उत्पत्ती १८:२, २२; १९:१; शास्ते ६:११-२२.
कधी कधी मानवांना देवदूतांचे दृष्टांत झाले व त्यांनी त्यांचे वर्णन केले. यहेज्केल संदेष्ट्याने चार जिवंत प्राणी पाहिले व नंतरच्या दृश्यात त्याने त्यांना करुबाच्या योग्यतेचे ते देवदूत असल्याचे ओळखले. (यहेज्केल १:५; ९:३; १०:३) या प्रत्येक देवदूताला चार पंख होते व त्यावरुन देवाच्या आज्ञेप्रमाणे कोणत्याही दिशेला तत्परतेने जाण्याची त्यांची पात्रता दिसून येते. “ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. आत्मा नेई तिकडे जात; चालताना वळत नसत.”—यहेज्केल १:६, ९, १२.
परंतु दृष्टांतात पाहिलेले देवदूत नेहमीच तसे दिसत असे नाही. आत्मिक प्राणी सराफीम जे यशयाने पाहिले होते त्यांना सहा पंख होते. यहेज्केलाच्या दृष्टांतातही फरक होता. पहिल्यांमध्ये देवदूतांना पाय होते, चार पंखांखाली हात होते व चार चेहरे (जसे की, मनुष्याचा, सिंहाचा, बैलाचा व गरुडाचा चेहरा) होते. नंतरच्या दृष्टांतात बैलाऐवजी करुबाचा चेहरा होता, कदाचित करुबाचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी ते असावे. नंतरच्या लाक्षणिक मंदिराच्या सजावटीच्या दृश्यात यहेज्केलला माणसाचा व सिंहाचा असे दोन चेहरे असलेले करुब दिसले. (यहेज्केल १:५-११; १०:७-१७; ४१:१८, १९) गाभाऱ्यातील परमपवित्र स्थानात व शलमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात दोन पंख असलेले करुब होते. कराराचा कोश म्हटलेल्या सोन्याच्या मोठ्या पेटीच्या झाकणावर ते होते. दोन्ही करुबांची तोंडे एकमेकांसमोर होती; त्यांना दोन पंख असून त्या पंखांनी दयासनाला झाकले होते. (निर्गम २५:१०-२२; ३७:६-९) शलमोनाच्या मंदिरातील कोशावर (व त्याच्या झाकणावर) सोन्याने मढवलेले दोन करुब होते, त्यांनी आपले पंख पसरवले होते.—१ राजे ८:६-८; १ इतिहास २८:१८; २ इतिहास ५:७, ८.
जोसेफसने लिहिले: “करुबाविषयी म्हणाल तर कोणी सांगू शकत नाही किंवा कल्पनाही करु शकत नाहीत, ते कसे होते.” अशा रितीने काही विद्वान व चित्रकार देवदूतांचे (व खासपणे करुबांचे) वर्णन प्राचीन पौर्वात्य नमुन्यांवरुन करतात, जेथे देवता पंख असलेल्या प्राण्यांच्या स्वरुपात दाखवले जातात. परंतु अधिक विश्वासार्ह वर्णन यहेज्केलच्या विवेचनात सापडते, जेथे तो पाहतो की, त्यांची “पृथ्वीवरील मनुष्याशी सदृश्यता होती.” (यहेज्केल १:५) यास्तव, जेव्हा आमच्या प्रकाशनात देवदूत दाखवले जातात तेव्हा आम्ही सर्वसाधारणपणे मानवी रुप धारण केलेले असे दाखवतो. आम्ही त्यांना पंखासहित दाखवतो कारण पवित्र शास्त्रात पुष्कळ ठिकाणी देवदूतांचे वर्णन पंख असलेले असे आहे व त्यांच्यावर भाष्य करताना देवदूत “उडत असलेले” असे आहे.—प्रकटीकरण १४:६; स्तोत्रसंहिता १८:१०.
शेवटी, रेवलेशन—इटस् ग्रँड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड! या प्रकाशनात पृष्ठ २८८ वर पंख असलेला स्वर्गीय प्राणी चित्रित केलेला आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे व त्याच्या हातात किल्ली आहे. हे प्रकटीकरण २०:१ चे हुबेहुब वर्णन आहे: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले; त्याच्याजवळ अथांगडोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता.” आमच्या लक्षात येते की हा किल्ली घेतलेला देवदूत गौरविलेला येशू ख्रिस्त आहे. त्याला पंख आहेत हे चित्र ह्या वास्तवतेशी मिळतेजुळते आहे की, दृष्टांतात दिसलेल्या देवदूतांना पंख होते.