“शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करुन तिचे अवलंबन करा”
“आपल्या भक्तांच्या शांतीने आनंद पावणाऱ्या यहोवाचे गौरव असो.”—स्तोत्रसंहिता ३५:२७, न्यू.व.
१. आज आम्ही कोणत्या शांतीचा अनुभव घेत आहोत?
या विभाजित जगात शांतीत असणे हा केवढा मोठा आनंद आहे बरे! “शांतीचा देव,” यहोवा याची भक्ती करणे आणि त्याच्या “शांततेचा करार” यापासून आशीर्वाद मिळवणे हे देखील किती धन्यतेचे आहे! जीवनाच्या दबावाने गढून गेलेले असता “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे देवाची शांती” आहे हे जाणणे व देवाचे लोक, मग ते कोणाही राष्ट्राचे, भाषेचे, वंशाचे अथवा सामाजिक पार्श्वभूमीचे असोत, त्यांना “शांतीचे बंधन” ऐक्यात बांधते हा अनुभव घेणे देखील किती तजेला आणणारे आहे!—१ थेस्सलनीकाकर ५:२३; यहेज्केल ३७:२६; फिलिप्पैकर ४:७; इफिसकर ४:३.
२, ३. (अ) देवाच्या लोकांचा एकंदरीत निभाव लागणार असला तरी काही विशिष्ट ख्रिश्चनांचे काय होणार? (ब) पवित्र शास्त्र आम्हाला काय करायला आर्जविते?
२ आम्ही यहोवाचे साक्षीदार अशा शांतीची राखण करीत आहोत. तथापि, आम्हाला तिला सहजसोपी अशी समजता येणार नाही. आपण ख्रिस्ती मंडळीशी संलग्न आहोत किंवा ख्रिस्ती कुटुंबाचे सदस्य आहोत म्हणून ही शांती सहजासहजी राखली जाते असे नाही. वस्तुतः अभिषिक्त शेष व त्यांचे सोबती, “दुसरी मेंढरे” हे एक कळप या नात्याने बचावतील, तरी काही विशिष्ट आपली शांती गमावतील व ते नष्ट होतील.—योहान १०:१६; मत्तय २४:१३; रोमकर ११:२२; १ करिंथकर १०:१२.
३ प्रेषित पौलाने त्याच्या काळातील अभिषिक्तांना हा इशारा दिला होताः “बंधुजनहो, . . . जिवंत देवाला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन [अंतःकरण, न्यू.व.] तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा.” (इब्रीयांस ३:१२) हाच इशारा मोठ्या लोकसमुदायास देखील लागू होतो. या कारणास्तव पवित्र शास्त्र ख्रिश्चनांना असे आर्जवितेः “शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे, कारण यहोवाचे नेत्र धार्मिकांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची [यहोवा, न्यू.व.] नजर आहे.”—१ पेत्र ३:१०-१२; स्तोत्रसंहिता ३४:१४, १५.
“देहाचे चिंतन”
४. देवासोबत असलेली आमची शांती कशाने विचलीत होऊ शकते?
४ शांतीच्या आपल्या पाठलागास काय बाधा आणू शकते? पौलाने एका गोष्टीचा उल्लेख करून म्हटलेः “देहाचे चिंतन हे मरण, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे; कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे.” (रोमकर ८:६, ७) “देह” या शब्दाचा अर्थ, पौलाच्या मनात, पापीष्ठ प्रवृत्त्यांचा वारसा असलेले अपूर्ण मानव या नात्याची आमची पतित स्थिती असा असावा. अशा पतित शरीराच्या भावनांच्या आहारी जाण्यामुळे आमच्या शांतीचा भंग होऊ शकतो. कोणी ख्रिस्ती मुद्दाम व्यभिचार करतो, लबाडी, चोरी, मादक औषधांचे सेवन या गोष्टी करतो, किंवा इतर कोणा मार्गाने तो ईश्वरी नियम मोडतो तेव्हा, त्याने अनुभवलेल्या यहोवासोबतच्या शांतीचा तो भंग करीत असतो. (नीतीसूत्रे १५:८, २९; १ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) तसेच तो आध्यात्मिक गोष्टींपेक्षा भौतिक गोष्टींना अधिक मोलवान समजू लागतो तेव्हाही देवासोबत असणारी त्याची शांती धोक्यात येते.—मत्तय ६:२४; १ योहान २:१५-१७.
५. शांतीच्या पाठलाग करण्यात कशाचा समावेश आहे?
५ उलटपक्षी, पौलाने म्हटलेः “आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.” शांती ही आत्म्याच्या फलप्राप्तीचा एक भाग आहे. त्यामुळे आपण आमच्या अंतःकरणाला आध्यात्मिक गोष्टींची रसिकता बाळगण्याची तालीम दिली, याबद्दल देवाला त्याच्या आत्म्याद्वारे मदत करण्याची विनंती केली, तर आम्ही “देहाचे चिंतन” करण्याचे टाळू. (गलतीकर ५:२२-२४) पहिले पेत्र ३:१०-१२ मध्ये शांतीचा संबंध नीतीमत्तेसोबत दाखवण्यात आला आहे. (रोमकर ५:१) पेत्र म्हणतो की, शांतीच्या पाठलागात ‘वाईटाचा त्याग करुन बरे करण्याचे’ समाविष्ट आहे. देवाचा आत्मा आम्हाला “नीतीमत्वाच्या . . . पाठीस लाग”ण्यात मदत देऊ शकतो व त्यामुळे आमची देवासोबतची शांती टिकवता येते.—१ तीमथ्य ६:११, १२.
६. मंडळीच्या शांतीसंबंधाने वडीलांच्या जबाबदारींपैकी एक काय आहे?
६ शांतीचा पाठलाग करणे हा मंडळीतील वडीलांचा मोठ्या काळजीचा विषय आहे. उदाहरणार्थ, कोणी प्रदूषित आचार मंडळीत आणण्याचा प्रयत्न करु लागतो तेव्हा पातक्याला वाग्दंड देऊन मंडळीचे रक्षण करण्याची वडीलांची जबाबदारी आहे. त्याने वाग्दंड स्वीकारल्यास त्याची शांती त्याला पुन्हा मिळू शकेल. (इब्रीयांस १२:११) नाही तर, त्याला मंडळीतून बाहेर घालवावे लागेल की, ज्यामुळे मंडळीचे यहोवासोबत असलेले शांतीप्रिय नातेसंबंध सुरक्षित ठेवता येतील.—१ करिंथकर ५:१-५.
आमच्या बांधवांसोबत शांती
७. ‘देहाच्या चिंतना’च्या कोणत्या लक्षणाविषयी पौलाने करिंथकरांना इशारा दिला?
७ “देहाचे चिंतन” हे आमची केवळ देवासोबत असणारी शांती नव्हे तर इतर ख्रिश्चनांबरोबर असणारे आमचे चांगले नातेसंबंध देखील बिघडवू शकते. पौलाने करिंथकरांना लिहिलेः “तुम्ही अजून दैहिक आहा. तुमच्यात हेवा व कलह ही आहेत. ह्यावरुन तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही मानवी रितीने चालता की नाही?” (१ करिंथकर ३:३) हेवा व कलह या गोष्टी शांतीच्या विरुद्ध आहेत.
८. (अ) जो मंडळीत हेवा व कलह माजवितो त्याचे काय होऊ शकते? (ब) आमची देवासोबतची शांती कशावर आधारीत आहे?
८ हेवा व कलह याद्वारे मंडळीची शांती भंगविणे हे खूपच गंभीर आहे. शांतीबरोबर संबंधित असणाऱ्या एका गुणाचा देवाच्या आत्म्याचे फळ असा उल्लेख करून प्रेषित योहानाने ही ताकीद दिलीः “‘मी देवावर प्रीती करतो,’ असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो लबाड आहे; कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याजवर जो प्रीती करीत नाही, त्याच्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही.” (१ योहान ४:२०) याचप्रमाणे, जो कोणी बांधवांमध्ये हेवा किंवा कलह माजवितो तो देवासोबत शांती राखून आहे असे खरेपणाने म्हणता येईल का? खचितच नाही! यास्तव आम्हाला हे आर्जविले आहेः “तुम्ही आनंदी व्हा, जुळवून घ्या, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील.” (२ करिंथकर १३:११) होय, आम्ही एकमेकांसोबत जर शांतीने राहिलो, तरच प्रीती व शांतीचा देव आपणासोबत राहील.
९. ख्रिश्चनांमध्ये कधीकधी गैरसमज व मतभेद असतील हे आपल्याला कसे कळते?
९ याचा अर्थ ख्रिश्चनांमध्ये कधीही गैरसमज होणार नाहीत असा नाही. पेंटेकॉस्ट झाल्यानंतर काही आठवड्यातच नव्या ख्रिस्ती मंडळीत दैनंदिनीच्या आहाराचे कसे वितरण व्हावे याबद्दल मतभेद निर्माण झाले. (प्रे. कृत्ये ६:१) एके प्रसंगी पौल व बर्णबा यांजमधील मतभेद इतके विकोपाला गेले की, ते एकमेकांवर “संतप्त” झाले. (प्रे. कृत्ये १५:३९) युवदिया व सुंतुखे या दोन चांगल्या आवेशी बहिणींना पौलाने ही सूचना द्यावी लागली की, त्यांनी “प्रभुच्या ठायी एकचित्त व्हा”वे. (फिलिप्पैकर ४:२) ख्रिश्चनांमध्ये शांतीचा झालेला भंग कसा दूर करावा याविषयी येशूने जो विस्तारित सल्ला दिला, तो काही नवलाईचा नाही. त्याने म्हटले की, अशा समस्या लागलीच हाताळाव्या. (मत्तय ५:२३-२५; १८:१५-१७) त्याने आपल्या अनुयायांमध्ये अशा अडचणींची अपेक्षा धरली नसती तर असा सल्ला दिला नसता.
१०. मंडळीत कधी कधी कोणत्या परिस्थिती उद्भवू शकतील, यामुळे आम्हा सर्वांवर कोणती जबाबदारी येते?
१० यास्तव, आज, कोणी आपल्या अविचारी बोलण्यामुळे कोणाला दुखवील किंवा इतरांपेक्षा वेगळी समज करून घेईल हे साहजिक आहे. एखाद्या व्यक्तीतील गुणलक्षणे दुसऱ्याला कदाचित लगेच चीड आणतील. व्यक्तीमत्वात खटके उडतील. कोणी वडीलांच्या निर्णयावर अट्टाहासाने आक्षेप घेईल. वडीलांच्या वर्गात देखील एखादा वडील अगदीच निकराचा असेल व तो इतर वडीलांवर आपले प्रभुत्व राखण्याचा यत्न करील. अशा या गोष्टी घडतील अशी वस्तुस्थिती असली तरीही आपण शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करुन तिचे अवलंबन करू या. त्या समस्येला ख्रिस्ती मार्गाने हाताळण्याचे आम्हापुढे आव्हान असते व ते पुरे केले म्हणजे आम्हाला “शांतीचे बंधन” राखता येईल.—इफिसकर ४:३.
११. आपण एकमेकांसोबत शांतीसख्य जोपासावे यासाठी यहोवाने कोणत्या तरतूदी केल्या आहेत?
११ पवित्र शास्त्र म्हणतेः “आपल्या भक्तांच्या शांतीने आनंद पावणाऱ्या यहोवाचे गौरव होवो.” (स्तोत्रसंहिता ३५:२७, न्यू.व.) होय, आम्ही शांतीत असावे अशी यहोवाची इच्छा आहे. यासाठीच, आम्ही आपली शांती आपसात व त्याच्यासोबत टिकवून ठेवावी म्हणून दोन अप्रतिम तरतुदी करून ठेवल्या आहेत. यापैकीची एक पवित्र आत्मा आहे, ज्याचे एक फळ शांती आहे व त्याबरोबर सहनशीलता, ममता, सौम्यता व इंद्रियदमन हेही शांतीयुक्त गुण आहेत. (गलतीकर ५:२२, २३) दुसरी तरतूद ही सूज्ञान आहे, ज्याबद्दल आम्ही वाचतोः “वरुन येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण . . . असे आहे.”—याकोब ३:१७, १८.
१२. आमच्या बांधवांसोबत आमचे शांतीसंबंध तुटले असल्यास आम्ही काय करावे?
१२ या कारणास्तव, जेव्हा इतरांसोबत आमच्या शांतीचा भंग होत आहे तेव्हा आम्ही वरुन येणाऱ्या ज्ञानासाठी, आम्ही कसे वागावे हे दाखविण्यासाठी प्रार्थना करावी. तसेच आम्ही, जे योग्य ते करण्यासाठी बळकटी यावी म्हणून पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करावी. (लूक ११:१३; याकोब १:५; १ योहान ३:२२) आम्ही आमच्या प्रार्थनांच्या अनुषंगाने ईश्वरी ज्ञानाचा उगम, पवित्र शास्त्र यामध्ये मार्गदर्शनाचा शोध घेतला पाहिजे तसेच शास्त्रवचनांना कसे लागू करावे यासाठी पवित्र शास्त्रीय प्रकाशनांतून सल्ला शोधला पाहिजे. (२ तीमथ्य ३:१६) कदाचित आम्हाला मंडळीतील वडीलांकडून देखील सल्ला विचारावासा वाटेल. मग, मिळालेल्या मार्गदर्शनानुरुप हालचाल करणे हे शेवटले पाऊल असेल. यशया ५४:१३ म्हणतेः “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” याद्वारे हे सूचित होते की, यहोवापासून आपल्याला जे शिकायला मिळाले आहे ते आचारात आणण्यावर आपली शांती विसंबून आहे.
“शांती करणारे ते धन्य”
१३, १४. (अ) “शांती करणारे” या येशूच्या वक्तव्याचा काय अर्थ होतो? (ब) आम्ही शांती घडविणारे कसे बनू शकतो?
१३ येशूने आपल्या डोंगरावरील प्रवचनात म्हटलेः “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांस देवाचे पुत्र म्हणतील.” (मत्तय ५:९) “शांती करणारे” या शब्दाचा अर्थ, एखादा शांत स्वभावाचा असतो असा नाही. मूळच्या ग्रीक शब्दाचा अर्थ शांती घडवून आणणारे असा आहे. शांती घडवून आणणारा, शांतीचा भंग होतो तेव्हा तिची पुनर्स्थापना करण्यात चतुर असतो. तरीपण, अधिक महत्त्वाचे ते हे की, हा शांती घडविणारा शांतीचा भंग होऊ नये म्हणून आधीच पाऊले घेत असतो. ‘शांती त्याच्या अंतःकरणावर नियंत्रण ठेवते.’ (कलस्सैकर ३:१५, न्यू.व.) देवाच्या सेवकांनी शांती घडविणारे बनण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यातील समस्या कमीत कमी स्वरुपाच्या असतील.
१४ शांती घडविणारा असे असण्यासाठी स्वतःच्या अशक्तपणाची जाण असली पाहिजे. उदाहरणार्थ, कोणी ख्रिश्चन रागीट स्वभावाचा असेल, किंवा तो खूपच संवेदनाशील व सहजगत्या दुखविला जाणारा असा असेल. दबावाखाली असताना, त्याच्या भावनांना पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा कदाचित विसर पडेल. अपूर्ण मानवाच्या बाबतीत असे घडणे अनपेक्षित नाही. (रोमकर ७:२१-२३) तथापि, वैर, कलह आणि मत्सर या गोष्टी देहाची कर्मे आहेत. (गलतीकर ५:१९-२१) या प्रवृत्त्या आम्हाठायी असल्याचे आम्हास आढळले—किंवा त्या कोणी आमच्या लक्षात आणून दिल्या—तर आम्हामध्ये इंद्रियदमन व सौम्यता ही अधिक वाढावी म्हणून यहोवाच्या आत्म्याच्या मदतीसाठी सतत व कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. खरे म्हणजे, प्रत्येकाने हे गुण नव्या व्यक्तीमत्वाचा भाग आहेत म्हणून ते जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.—इफिसकर ४:२३, २४; कलस्सैकर ३:१०, १५.
१५. वरुन येणारे ज्ञान अव्यवहारी उद्दामपणाचा कसा विरोध करते?
१५ कधी कधी मंडळी किंवा वडीलांचा वर्ग, जेव्हा कोणी उद्दामपणा करतो व आपल्याच मार्गाने जाण्याचा हट्ट धरतो तेव्हा विचलीत होतो. हे खरे की, ईश्वरी नियमांच्या बाबतीत ख्रिश्चनाने दृढ निश्चयी व कट्टर देखील असावे. तसेच आम्हापाशी इतरांचा लाभ होऊ शकेल अशा काही कल्पना आहेत तर मग त्या आपण स्पष्टपणे, कारणांचे स्पष्टीकरण देऊन मांडण्यात काही चूक नाही. पण आपण जगातील त्या लोकांसारखे बनू नये जे ‘सहमत दाखवीत नाहीत.’ (२ तीमथ्य ३:१-४) वरुन येणारे ज्ञान हे शांतीप्रिय व समजूत होण्याजोगे आहे. ज्यांच्या हालचाली उद्दामपणाच्या दिसत आहेत अशांनी पौलाने फिलिप्पैकरांना केलेली सूचना मान्य करावी की, ‘अभिमान धरण्याचे काही नसावे.’—फिलिप्पैकर २:३.
१६. पौलाने फिलिप्पैकरांच्या पुस्तकात दिलेली सूचना अभिमानाविरुद्ध कशी कार्य करते?
१६ याच पत्रात, पौल आर्जवितो की, आम्ही, ‘लीनतेने,’ खरेच ‘एकमेकांस आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे.’ हे अभिमानाच्या अगदी उलट जाते. प्रौढ ख्रिस्ती कधीही स्वतःच्या कल्पना पुढे रेटीत नाही, तोंड लपवीत नाही आणि आपले पद व अधिकार यांचा आधार घेत नाही. हे पौलाने दिलेल्या या सूचनेच्या विरुद्ध आहे की, ‘कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे.’—फिलिप्पैकर २:४; १ पेत्र ५:२, ३, ६.
शांतीप्रिय बोल
१७. जिभेचा कोणता दुरुपयोग मंडळीची शांती बिघडवू शकतो?
१७ शांतीचे अवलंबन करणारा खासपणे आपल्या जिभेच्या वापराबद्दल दक्ष असतो. याकोबाने इशारा दिलेला आहेः “जीभ ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, किती थोडका विस्तव केवढ्या मोठ्या रानाला पेटवितो!” (याकोब ३:५) खोडकर चहाड्या, इतरांच्या मागे त्यांची निंदा करणे, कटू व कठीण शब्द, कुरकुर व तक्रार तसेच आपल्या स्वार्थासाठी तोंडपूजेपणा ही सर्व देहाची कर्मे आहेत व ती देवाच्या लोकांची शांती बिघडवतात.—१ करिंथकर १०:१०; २ करिंथकर १२:२०; १ तीमथ्य ५:१३; यहूदा १६.
१८. (अ) जिभेचा चुकीचा वापर झाल्यास आम्हापैकी प्रत्येकाने कोणता बरोबरचा मार्ग घ्यावा? (ब) रागामुळे एखादा घातक शब्द बोलतो तेव्हा प्रौढ ख्रिस्ती कशी प्रतिक्रिया दाखवितात?
१८ याकोबाने म्हटले ते खरेच आहे की, “मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही.” (याकोब ३:८) प्रौढ ख्रिश्चनांकडून देखील असे वक्तव्य होईल की, ज्याचा त्यांना नंतर प्रामाणिक पस्तावा वाटू लागेल. आम्ही जशी इतरांची क्षमा करतो तसेच तेही आमची या चुकांबद्दल क्षमा करतील अशी आम्ही आशा बाळगत असतो. (मत्तय ६:९, १०) कधीकधी संतापामुळे मनास दुखविणारे शब्द निघत असतात. तेव्हा शांती घडविणारा हे आठवील की, “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” (नीतीसूत्रे १५:१) बहुधा, त्याने एक खोल श्वास घ्यावा व वदविलेल्या रागीट शब्दांवर आपणाकडून आणखी रागीट शब्दांचा भडीमार करण्यास नकार द्यावा. नंतर डोके शांत झाल्यावर मोठ्या अंतःकरणाचा शांतीकर्ता, रागीट पारा असताना जी बोलणी झाली तिजकडे दुर्लक्ष करावे हे जाणतो. शिवाय, नम्र ख्रिस्ती आपण क्षमा मागावी, व आपणाकडून जो आघात झाला तो बरा करावा हे जाणून घेईल. “मला कृपया क्षमा कर,” असे प्रामाणिकपणे म्हणणे हे नैतिक बळाचे चिन्ह आहे.
१९. सूचना कशी द्यावी याबद्दल आम्ही पौल व येशूकडून काय शिकतो?
१९ जिभेचा वापर दुसऱ्यांना सूचना देण्यासाठीही होऊ शकतो. अंत्युखियामध्ये पेत्राने चूक केली तेव्हा पौलाने त्याला सर्वांसमक्ष दटाविले. तसेच येशूने सात मंडळ्यांना पाठविलेल्या संदेशात कडक सूचना दिल्या. (गलतीकर २:११-१४; प्रकटीकरण अध्याय २, ३) आम्ही या उदाहरणांचा अभ्यास केल्यास आपल्याला शिकायला मिळते की, सूचना ही इतकी मृदु नसावी की, ज्यामुळे तिचा उद्देश साध्य होणार नाही. तरीदेखील, येशू व पौल हे कडक किंवा क्रूर नव्हते. त्यांनी स्वतः चिडखोर बनून त्या सूचना दिल्या नाहीत. ते आपल्या बांधवांची खरेपणाने मदत करु इच्छित होते. सूचना देणाऱ्याला जेव्हा दिसते की, आपली जीभ आपल्या ताब्यात नाही, तेव्हा तो पुढे काही बोलण्याआधी अमळ थांबेल व शांत होईल. नाहीतर, त्याच्याकडून कठीण शब्दाचे उच्चारण होऊन, इतरांची समस्या हाताळण्यापेक्षा त्याचीच समस्या अधिक गंभीर बनेल.—नीतीसूत्रे १२:१८.
२०. आमच्या बंधूभगिनींना किंवा त्यांच्याबद्दल आपण जे काही बोलतो त्यावर कशाचे वर्चस्व असावयास हवे?
२० आधी उल्लेखिल्याप्रमाणे, शांती व प्रीती ही आत्म्याची फलप्राप्ती म्हणून अगदी जवळच्या संबंधात आहेत. आम्ही आमच्या बांधवांना किंवा त्यांच्यासंबंधाने इतरांना जे बोलत असतो त्यामध्ये आम्हाला त्यांच्याबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त होत आहे तर ते मंडळीच्या शांतीला मोठा हातभार लावील. (योहान १५:१२, १३) आमचे बोलणे नहेमी “कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.” (कलस्सैकर ४:६) ते गोड, जणू हृदयाला अपीलकारक असले पाहिजे. येशूने सल्ला दिलाः “तुम्ही आपणात मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”—मार्क ९:५०.
“होईल तितके प्रयत्न करा”
२१. देवाच्या लोकांबद्दल त्यांच्या साप्ताहिक सभा व संमेलने व अधिवेशने यामध्ये काय दिसत असते?
२१ स्तोत्रकर्त्याने म्हटलेः “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे!” (स्तोत्रसंहिता १३३:१) खरेच, आम्हाला आमच्या बांधवांसमवेत आमच्या साप्ताहिक सभेत, संमेलनात व मोठ्या अधिवेशनात असणे आवडते. अशा प्रसंगी आमची शांती बाहेरील लोकांस स्पष्ट दिसते.
२२. (अ) रा कोणती शांती मिळवीत आहोत असे त्यांना वाटेल, पण ती प्रत्यक्षात फसवी असेल, आणि ती त्यांना कोठे निरवील? (ब) देवाच्या शांतीचा करार कोणत्या खऱ्या शांतीकडे निरवील?
२२ लवकरच, सर्व राष्ट्रांना, आपण यहोवाच्या मदतीशिवाय शांती मिळवीत आहोत असे वाटू लागेल. पण ते, “शांती आहे, निर्भय आहे,” असे म्हणत असतानाच, त्या सर्वांवर, ते देवासोबत शांतीसंबंधात नाहीत म्हणून एकाएकी नाश येईल. (१ थेस्सलनीकाकर ५:३) यानंतर, शांतीचा राजपुत्र, मानवाने मूळतः देवासोबत शांतीसंबंध दुरावल्यामुळे जे विनाशी परिणाम आणले गेले ते मानवजातीतून दूर करून तिला बरे करण्याचे काम करील. (यशया ९:६, ७; प्रकटीकरण २२:१, २) त्यावेळी देवाच्या शांतीच्या करारामुळे सबंध जगभर शांतता नांदेल. शेतातील पशूदेखील वैरभावापासूनची मुक्तता अनुभवतील.—स्तोत्रसंहिता ३७:१०, ११; ७२:३-७; यशया ११:१-९; प्रकटीकरण २१:३, ४.
२३. आपण शांतीमय नव्या जगाची आशा बाळगून आहोत तर आत्ताच काय करण्यास हवे?
२३ तो केवढा वैभवी काळ असेल! त्याकडे तुम्ही मोठ्या उत्कंठेने पाहात आहात का? जर होय, तर “सर्वांबरोबर शांतीने राहा.” आपल्या बांधवांसोबत व खासपणे यहोवा देवासोबत आत्ता शांतीसंबंध जोपासा. होय, “ह्या गोष्टींची अपेक्षा करीत असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.”—इब्रीयांस १२:१४; २ पेत्र ३:१४.
तुम्हास आठवते का?
◻ यहोवासोबत असणारी आमची शांती कशामुळे बिघडू शकते?
◻ मंडळीत कोणत्या प्रकारातील गैरसमज दूर करण्यास हवा?
◻ आपण शांतीसाठी प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे म्हणून यहोवाने कोणती तरतूद पुरविली आहे?
◻ कोणत्या दैहिक प्रवृत्त्या मंडळीची शांती बिघडवू शकतात, आणि यांचा आम्ही कसा सामना करु शकतो?
[२५ पानांवरील चित्रं]
यहोवाकडून शिक्षण घेतलेल्यांमध्ये विपुल शांती राहते
[२७ पानांवरील चित्रं]
ऐक्याने सेवा करणाऱ्या बांधवांमधील शांती किती सुखावह आहे!