विश्वासात सुदृढ राहा!
तीतास पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये
भूमध्ये समुद्रावरील क्रेत या बेटाकडे आध्यात्मिक बाबतीत लक्ष देण्याची जरूरी होती. त्यांना कोण मदत देणार? प्रेषित पौलाचा सहकारी तीत! हा तीत धैर्यवान, शिकविण्यामध्ये निपुण, चांगल्या कामासाठी आवेशी आणि विश्वासात सुदृढ होता.
पौलाचा रोममध्ये पहिल्यांदा तसेच दुसऱ्यांदा तुरुंगवास घडतेवेळी त्याने क्रेतला भेट दिली होती. त्याने तीताला येथे काही गोष्टी ठीक करण्यासाठी आणि मंडळीत वडीलांची नेमणूक करण्यासाठी मागे सोडले होते. तीतने खोट्या शिक्षकांची कानउघाडणी करायची होती व आपले चांगले उदाहरण मांडायचे होते. हे सर्व पौलाने तीतला लिहिलेल्या पत्रावरून दिसून येते. हे पत्र बहुधा मासेदोनिया येथून इ. स. ६१ ते ६४ च्या दरम्यान पाठविले असावे. या पत्रातील सूचनांचा अवलंब केल्यास सध्याच्या देखरेख्यांना आणि समविश्वासू बांधवांना धैर्यवान, आवेशी आणि आध्यात्मिक रित्या सुदृढ होता येईल.
देखरेख्यांविषयी काय अपेक्षा असतात?
देखरेख्यांची नियुक्ती करण्याची गरज होती तसेच काही गंभीर प्रकरणांची हाताळणी करायची होती. (१:१-१६) देखरेख्याच्या नियुक्तीसाठी दोषापासून मुक्त, व्यक्तीशः तसेच कौटुंबिक जीवनात उदाहरणशील, पाहुणचारी, समतोल आणि संयमी असण्याची गरज होती. त्या माणसाने जे सत्य आहे तेच शिकवावयाचे होते आणि जे विरोधी मते मांडत होते अशा सर्वांचे खंडण करून बोध करावयाचा होता. मंडळीतील स्वैराचारी माणसांना शांत करण्यासाठी धैर्य आवश्यक होते. हे सुंतेची प्रणाली मानणाऱ्यांबद्दल अधिक खरे होते, कारण यांनी सर्व घराण्याचा नाश चालविला होता. मंडळीने आध्यात्मिक रितीने सुदृढ रहावयाचे आहे तर कडकपणे दोष पदरी घालायचा होता. आज, मंडळीची उभारणी होण्याकरता जरूर भासेल तेथे वाग्दंड देण्यासाठी व कानउघाडणी करण्यासाठी ख्रिस्ती देखरेख्यांठायी धैर्य जरूरीचे आहे.
हितकारक शिक्षणाचा अवलंब करा
तीतने आध्यात्मिक दृष्ट्या शोभणाऱ्या गोष्टींचे शिक्षण द्यावयाचे होते. (२:१-१५) वृद्ध पुरुषांनी संयम, गंभीर, मर्यादशीलपणा, विश्वास, प्रीती, आणि सहनशीलता याबाबतीत उदाहरण असणे जरूरीचे होते. वृद्ध स्त्रियांनी “चालचलणूकीत आदरणीय” असणे होते. “चांगल्या गोष्टी शिकविणारे” या नात्याने त्यांनी तरुण स्त्रियांना, बायका व माता या नात्याच्या त्यांच्या कर्तव्यांविषयी योग्य दृष्टीकोणाची मदत दिली पाहिजे. तरूण पुरुषांनी मर्यादशील, तसेच दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहून देवाच्या शिक्षणाला शोभा आणावयाची होती. सर्व ख्रिश्चनांनी अभक्तीची वृत्ती त्यागून या व्यवस्थीकरणात, देव व येशू ख्रिस्ताच्या भव्य प्रकटीकरणाची वाट पाहात जगत असता मर्यादशीलतेने जीवन व्यतित करायचे होते. येशू ख्रिस्ताने “स्वतःला आपल्याकरिता दिले [होते], ह्यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.”
पौलाने दिलेली समारोपाची सूचना आध्यात्मिक आरोग्य वाढीस लावते. (३:१-१५) अधिकाऱ्यांना योग्य अधीनता दाखविणे आणि व्यवहार्यपणे वागणे जरूरीचे आहे. ख्रिस्तीजनांना सार्वकालिक जीवनाची आशा होती, त्यामुळे चांगल्या कामासाठी तत्पर राहण्यात उत्तेजन मिळत राहावे म्हणून पौलाचे शब्द खातरीने समजून घ्यावयाचे होते. नियमशास्त्राविषयी मूर्ख वाद तसेच कलह टाळायचे होते; आणि जो तट पाडणारा आहे अशाला दोनदा समज दिल्यावर त्याला नाकारायचे होते. या सूचनेचा अवलंब केल्यामुळे वडीलांना तसेच त्यांच्या समविश्वासू बांधवांना विश्वासात सुदृढ राहता येईल.
[१० पानावरील चौकट/चित्रं]
मद्यपानासक्त नसणेः स्त्रियांना मंडळीत पुरुषांना शिकवण्याची मुभा नव्हती, तरी वृद्ध स्त्रियांना तरुण स्त्रियांना खाजगीपणे सूचना देता येत होत्या. पण हे प्रभावकारीपणे होण्यासाठी त्यांनी पौलाचे हे शब्द ऐकले पाहिजेतः “वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या; सुशिक्षण देणाऱ्या असाव्या.” (तीत २:१-५; १ तीमथ्य २:११-१४) मद्यप्राशनाचे परिणाम लक्षात घेऊनच देखरेखे, उपाध्य सेवक आणि वृद्ध स्त्रिया यांनी मर्यादशील असले पाहिजे व मद्यपानासक्त नसावे. (१ तीमथ्य ३:२, ३, ८, ११) सर्व ख्रिश्चनांनी मद्यपानासक्त बनण्याचे टाळावे आणि सुवार्तेच्या प्रचाराचे “पवित्र काम” करीत असताना मद्यपान करू नये.—रोमकर १५:१६; नीतीसूत्रे २३:२०, २१.