तीत—“तुमच्याकरिता सहकारी”
पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये काहीवेळा समस्या निर्माण व्हायच्या. त्या सोडवणे गरजेचे होते पण त्याकरता धाडसाची आणि आज्ञापालनाची आवश्यकता होती. तीताने या आणि यांसारख्या अनेक आव्हानांना सर केले. प्रेषित पौलासोबत काम करत असताना लोकांनी यहोवाच्या नीतिनियमाने चालावे म्हणून त्याने त्यांची प्रांजळपणे मदत केली. म्हणूनच पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना तीताविषयी असे म्हटले, की तो ‘त्यांच्याकरता सहकारी आहे.’—२ करिंथकर ८:२३.
तीत कोण होता? समस्या सोडवण्यात त्याने कोणती भूमिका पार पाडली? त्याचे आचरण विचारात घेतल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे लाभ मिळू शकतो?
सुंतेचा वादविषयी
तीत सुंता न झालेला ग्रीक होता. (गलतीकर २:३)a “विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू” असे पौलाने तीताविषयी म्हटले; त्यावरून असे दिसून येते, की तीत कदाचित प्रेषित पौलाच्या आध्यात्मिक मुलांपैकी एक असावा. (तीत १:४; पडताळा १ तीमथ्य १:२.) सुंतेमुळे निर्माण झालेला वाद मिटवण्याकरता सा.यु. ४९ मध्ये जेरुसलमेत गेलेल्या पौल, बर्णबा तसेच अंत्युखिया आणि सूरियाच्या इतर लोकांसोबत तीत सुद्धा होता.—प्रेषितांची कृत्ये १५:१, २; गलतीकर २:१.
असे म्हटले जाते, की जेरुसलेममध्ये सुंता न झालेल्या विदेशी लोकांच्या धर्मांतरावर वादंग उठले होते त्यामुळे हे दाखवण्यासाठी तीताला सोबत घेण्यात आले होते, की देवाची कृपापसंती यहुदी आणि यहुदी नसलेल्या दोन्ही प्रकारच्या लोकांवर आहे मग त्यांची सुंता झालेली असो अगर नसो. ख्रिस्ती विश्वासात येण्यापूर्वी परुशी असलेल्या जेरुसलेममधील मंडळीतील काही सदस्यांनी असा वाद घातला, की धर्मपरिवर्तन करण्याकरता विदेशी लोकांना नियमशास्त्र पाळणे आणि सुंता करणे गरजेचे आहे, पण त्यांचे म्हणणे खोडून काढण्यात आले. तीत आणि दुसऱ्या विदेशी लोकांना सुंता करायला भाग पाडण्याचा हाच अर्थ झाला असता, की तारण यहोवाच्या अपात्र कृपेवर आणि येशू ख्रिस्ताच्या विश्वासावर नव्हे, तर नियमशास्त्राच्या कामांवर अवलंबून आहे. तसेच विदेशी लोकांना किंवा राष्ट्रांच्या लोकांना पवित्र आत्मा मिळाल्याचा पुरावा खोटा ठरवणे असाही त्याचा अर्थ झाला असता.—प्रेषितांची कृत्ये १५:५-१२.
करिंथला रवाना येते
सुंतेचा वादविषयी मिटवल्यानंतर राष्ट्रांना सुवार्तेचा प्रचार करण्याचा पौलाला आणि बर्णबाला पूर्ण अधिकार देण्यात आला. त्याचवेळी त्यांनी गरीब लोकांची काळजी घेण्याचाही प्रयत्न केला. (गलतीकर २:९, १०) सुमारे सहा वर्षांनंतर तीताचा उल्लेख पुन्हा एकदा प्रेरित शास्त्रवचनांमध्ये येतो, त्यावेळी तो पौलाचा दूत म्हणून पवित्र लोकांकरता वर्गणी जमा करण्यासाठी करिंथमध्ये गेला होता. तीत या कामात होता खरा, पण त्याला त्यावेळी एका दुसऱ्याच समस्येने त्रस्त करून सोडले होते.
पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात त्यांना सांगितले, की त्यांनी “जारकर्म्यांची संगत धरू नये.” त्याला त्यांना असेही सांगावे लागले, की त्यांनी त्यांच्यातील अपश्चात्तापी जारकर्म्याला काढून टाकावे. पौलाने त्यांना अगदी कडक शब्दांत आणि अक्षरशः “अश्रु गाळीत” लिहिले होते. (१ करिंथकर ५:९-१३; २ करिंथकर २:४) या काळादरम्यान, गरजू यहुदी ख्रिश्चनांकरता वर्गणी गोळा करण्यासाठी तीताला करिंथमध्ये पाठवण्यात आले होते. पौलाच्या पत्राचा करिंथकरावर कसा परिणाम झाला, हे पाहण्यासाठीही त्याला कदाचित तेथे पाठवण्यात आले असावे.—२ करिंथकर ८:१-६.
पौलाच्या सल्ल्याला करिंथकरांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास अधीर झालेल्या पौलाने कदाचित याच कारणास्तव तीताला इफिसपासून अजियन समुद्र पार करून करिंथला धाडले असावे; तेथे पोहंचताच लवकरात लवकर परतावे, असेही पौलाने त्याला सांगितले. त्याचे हे काम समुद्री दळणवळण थंडीमुळे बंद होण्यापूर्वी (सुमारे नोव्हेंबरच्या मध्यात) पूर्ण झाले असते तर तीत जहाजाने त्रोवसला पोहंचला असता किंवा हलसापॉन्तच्या लांबच्या मार्गाने त्रोअसला आला असता. पौल कदाचित त्रोवसला ठरवलेल्या वेळेच्या आधी पोहंचला असावा कारण इफिसमधल्या सोनारांनी केलेल्या दंग्यामुळे त्याला आधीच इफिसमधून काढता पाय घ्यावा लागला. त्रोवसमध्ये मोठ्या आस्थेने तीताची वाट पाहिल्यानंतर पौलाला वाटले, की तीत आता काही समुद्री मार्गाने येत नाही. यामुळे अगदी उतावीळ होऊन पौल तीताला भेटण्यासाठी जमिनीमार्गाने निघाला. युरोपला पोहंचल्यानंतर पौल एग्नातीआवरून तीताला अखेरीस मासेदोनियामध्ये भेटला. तेथे करिंथकरांच्या चांगल्या प्रतिसादाची बातमी ऐकून त्याला फार बरे वाटले आणि आनंदही झाला. प्रेषिताच्या सल्ल्याप्रती करिंथच्या मंडळीने खरोखरच चांगली प्रतिक्रिया दाखवली होती.—२ करिंथकर २:१२, १३; ७:५-७.
आपल्या दूतासोबत कशाप्रकारचा व्यवहार करण्यात येईल, अशी खरे तर पौलाला काळजी वाटत होती, पण तीताला त्याचे काम पूर्ण करण्याकरता देवाने मदत केली. सर्व लोकांनी तीताचा “भीत भीत व कापत कापत” स्वीकार केला. (२ करिंथकर ७:८-१५) टीकाकार डब्लू. डी. थॉमस यांनी म्हटले: “आपण याची कल्पना करून शकतो, की पौलाने दिलेल्या कडक सल्ल्याचा कोणत्याही प्रकारे प्रभाव कमी न करता [तीताने] मोठ्या कौशल्याने आणि हतोटीने करिंथकरांना विनंती केली असावी; त्याने त्यांना असे आश्वासन दिले असावे, की पौल त्यांच्या आध्यात्मिक भल्याकरता असे बोलला आहे.” आपले काम पूर्ण करत असताना करिंथमधील ख्रिश्चनांचा आज्ञाधारकपणा आणि त्यांच्यातील चांगले बदल पाहून तीताला करिंथकर आवडू लागले. त्यांची ही चांगली मनोवृत्ती पाहून तीताला आणखी उत्तेजन मिळाले.
करिंथमध्ये, तीतावर यहुदातील लोकांच्या मदतीकरता वर्गणी गोळा करण्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती त्याबद्दल काय? २ करिंथकरमध्ये असलेल्या माहितीवरून असे अनुमान काढले जाऊ शकते, की तीत त्यावेळी हे काम देखील करत होता. तीत आणि पौलाची भेट झाल्यानंतर लगेचच अर्थात सा.यु. ५५ च्या अखेरीस मासेदोनियात हे पत्र लिहिण्यात आले असावे. तीताने वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू केले होते तेव्हा पौलाने त्याला लिहिले, की तो तीताला या कामात मदत करण्याकरता आणखी दोन निनावी लोकांना त्याच्याकडे पाठवत आहे. तीताला करिंथमध्ये विशेष आस्था होती त्यामुळे तोच तेथे जाण्यास एका पायावर तयार झाला. त्यामुळे पुन्हा एकदा करिंथला जाताना पौलाने करिंथकरांना लिहिलेले दुसरे प्रेरित पत्र त्याने कदाचित आपल्यासोबत नेले असावे.—२ करिंथकर ८:६, १७, १८, २२.
तीत केवळ एक चांगला संघटकच नव्हता, तर तो अशाप्रकारचा मनुष्य होता ज्याच्यावर कठीण परिस्थितींमध्ये नाजूक काम सोपवले जाऊ शकत होते. तो धैर्यशील, पक्व आणि दृढ होता. म्हणूनच करिंथमध्ये ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांसंबंधित’ निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी पौलाने तीताला लायक समजले. (२ करिंथकर ११:५) तीत असा होता याची आपल्याला खात्री मिळते कारण पुढे शास्त्रवचनांमध्ये त्याचा उल्लेख येतो तेव्हा त्याच्यावर एका आव्हानात्मक कामगिरी सोपवण्यात आली होती.
क्रेत बेटावर
पौलाने तीताला कदाचित सा.यु. ६१ ते ६४ च्या दरम्यान पत्र लिहिले असावे; त्यावेळी तीत क्रेताच्या भूमध्य बेटावर सेवा करत होता. पौलाने त्याला तेथे “अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था” करण्याचे आणि “प्रत्येक नगरात वडील” नेमण्याचे काम सोपवले होते. तेथील बहुतेक लोकांची “लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड” अशी ख्याती होती. त्यामुळे तीताला क्रेतामध्ये पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे धैर्य आणि दृढता दाखवावी लागली. (तीत १:५, १०-१२) हे फार जबाबदारीचे काम होते आणि त्याच्या या कामावरच या बेटावरील ख्रिस्ती विश्वासाचे भवितव्य आधारलेले होते. संभवनीय पर्यवेक्षकामध्ये काय पाहावे, याबाबतीत ईश्वरी मार्गदर्शनानुसार पौलाने तीताची मदत केली. आजही ख्रिस्ती वडिलांच्या नियुक्तीच्यावेळी याच योग्यतांना पाहिले जाते.
क्रेतातून तीत केव्हा गेला हे शास्त्रवचनांमध्ये सांगण्यात आलेले नाही. तो तेथे काही काळ राहिला असावा कारण पौलाने त्याला जेना आणि अपुल्लो यांच्या गरजा पुरवण्याकरता सांगितले होते, हे दोघे त्यांच्या प्रवासाच्यावेळी अधूनमधून तेथे थांबत असत. पण तीत या बेटावर फार काळ राहणार नव्हता. कारण अर्तमाला किंवा तुखिकाला तेथे पाठवण्याचा विचार पौल करत होता; तीत निकपलिसास येथे पौलाला येऊन भेटणार होता; ग्रीकच्या वायव्येला वसलेले हे एक प्रमुख शहर होते.—तीत ३:१२, १३.
बायबल थोडक्यात आपल्याला तीताविषयी जे सांगते त्यातून हे कळते, की सुमारे सा.यु. ६५ मध्ये पौलाने त्याला आणखी एका कामावर पाठवले असावे. त्यावेळी तीत दालमतियाला गेला, एड्रियाटिक समुद्राच्या पूर्वेला असलेले क्रोआशिया हेच आहे. (२ तीमथ्य ४:१०) तीताला तेथे काय करायचे होते, हे आपल्याला सांगण्यात आलेले नाही, पण असे दिसून येते की त्याला मंडळीच्या कारभारासाठी आणि मिशनरी कामासाठी पाठवण्यात आले असावे. क्रेतमध्ये जसे जबाबदारीचे काम पार पाडले त्याचप्रकारचे काम या वेळेसही तीताला करायचे होते.
तीतासारख्या परिपक्व ख्रिस्ती पर्यवेक्षकांसाठी आपण किती आभारी आहोत! शास्त्रवचनीय तत्त्वांविषयी त्यांची स्पष्ट समज आणि ती तत्त्वे लागू करण्यातील त्यांचे धैर्य यांमुळे मंडळीची आध्यात्मिकता सुरक्षित राहते. आपण त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करावे आणि आपल्या सहविश्वासूंची आध्यात्मिकता वाढवण्याकरता तीतासारखे बनावे.—इब्री लोकांस १३:७.
[तळटीपा]
a गलतीकर २:३ येथे तीताला ग्रीक (हेल्लेणी) संबोधण्यात आले आहे. त्याचे वाडवडिल ग्रीक असावेत, असा त्याचा अर्थ होतो. पण असा दावा करण्यात येतो, की काही ग्रीक लेखकांनी ग्रीक नसलेल्या अशा लोकांचा उल्लेख करण्याकरता अनेकवचनाचा (हेल्लेणीस) उपयोग केला ज्यांनी ग्रीक भाषा आणि संस्कृती आत्मसात केली होती. तीत कदाचित अशाप्रकारच्या ग्रीक लोकांमधील असावा.
[३१ पानांवरील चित्र]
करिंथमधील आणि इतर ठिकाणच्या ख्रिश्चनांकरिता तीत एक धैर्यशील सहकारी होता