यहोवाचा प्रमुख प्रतिनिधि, त्याचा पुत्र याचा सन्मान करा
“जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो . . . पित्याचा सन्मान करीत नाही.”—योहान ५:२३.
१. ख्रिस्ती धर्मजगतात बाळगण्यात येणारा त्रैक्याबद्दलचा विश्वास येशूचा कसा अपमान करतो?
आपण येशू ख्रिस्ताचा सन्मान करीत आहोत असे आज ख्रिस्ती धर्मजगतातील लोक मोठ्या दाव्याने सांगतात, पण खरे म्हणजे ते याच्या अगदी उलट करीत आहेत. ते कसे? कारण येशू हा सर्वसमर्थ देव आहे आणि हा देव, सर्व गोष्टींचा निर्माता या पृथ्वीवर आला, मानव या नात्याने जगला व मेला असे त्यांचे म्हणणे आहे. हाच विचार त्रैक्याच्या तत्त्वात सामावलेला आहे; हे तत्त्व ख्रिस्ती धर्मजगाची मूलभूत शिकवण आहे. पण त्रैक्य जर खोटे आहे, म्हणजे येशू हा देवापेक्षा कनिष्ठ व दुय्यम दर्जावर आहे तर मग, त्याचे देवाबरोबर असलेल्या नातेसंबंधाच्या दृष्टीने असे चुकीचे केलेले वर्णन येशूला दुःखी करणार नाही का? खरे म्हणजे हे त्याचे चुकीचे प्रतिनिधित्व, त्याचा व त्याने शिकवलेल्या गोष्टींचा अपमान करणारे ठरेल.
२. येशू देवापेक्षा कनिष्ठ आहे व तो दुय्यम दर्जावर आहे हे शास्त्रवचने कसे स्पष्ट दाखवतात?
२ वास्तविक सत्य हे आहे की, येशूने स्वतः देव असल्याचा कधीच दावा केला नाही; उलटपक्षी त्याने वेळोवेळी स्वतःला “देवाचा पुत्र” असल्याचे संबोधिले. याची कबूली तर त्याच्या शत्रूंनीही दिली. (योहान १०:३६; १९:७) पित्यापेक्षा स्वतःला वर उंचावण्याचा विचार येशूने कधीच राखला नाही, तर स्वतःला नेहमी कनिष्ठ दर्जावर राखले, हे त्याने स्वतःच कबूल केले आहे. तो म्हणालाः “पुत्र जे काही करताना पित्याला पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काही करिता येत नाही. कारण जे काही तो करितो, ते पुत्रही तसेच करितो. माझ्याने स्वतः होऊन काही करवत नाही . . . कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” पुन्हा त्याने असे म्हटलेः “ज्याने मला पाठविले त्याचा मी प्रतिनिधि आहे.” (न्यू.व.) शिवाय तो म्हणालाः “मी देवापासून निघालो व आलो आहे.” (योहान ५:१९, ३०; ७:२८, २९; ८:४२) येशूने देव असल्याचे किंवा त्याच्या बरोबरीचा असल्याचे कधीच सुचविले नाही. त्यामुळे अशी शिकवण देणे हे येशूचा अपमान करणारे आहे.
काहीजण येशूचा अपमान आणखी कोणत्या रितीने करतात
३. (अ) येशूबद्दल कोणत्या गोष्टीचा नकार दर्शवून ख्रिस्ती धर्मजगतातील काही जण त्याचा अपमान करतात? (ब) येशूने मानवीप्रकृतीपूर्वीच्या आपल्या अस्तित्त्वाबद्दल कोणती साक्ष दिली?
३ आणखी एक आश्चर्याची गोष्टी अशी की, ख्रिस्ती धर्मजगतातील काहीजण येशूला मानवी प्रकृतीपूर्वीचे अस्तित्वच नव्हते असे म्हणून त्याचा अपमान करीत आहेत. पण आम्ही, येशू स्वर्गातून खराच पृथ्वीवर आला होता असे मानल्यामुळे त्याचा सन्मान करतो. स्वतःला मनुष्यप्रकृतीपूर्वीचे अस्तित्व होते असे येशूने वेळोवेळी स्वतःच म्हटले होते. तो म्हणालाः “स्वर्गाहून उतरलेला मनुष्याचा पुत्र याजवाचून कोणी [मनुष्य] स्वर्गी चढून गेला नाही.” नंतर तो म्हणालाः “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे . . . मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर?” तसेच तो आणखी असे म्हणालाः “तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे . . . मी तुम्हास खचित खचित सांगतो, अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आहे.” (योहान ३:१३; ६:५१, ५२; ८:२३, ५८) येशूने त्याचा विश्वासघात होण्याच्या रात्री त्याच्या स्वर्गातील पित्याला केलेल्या प्रार्थनेत स्वतःच्या मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्त्वाबद्दल उल्लेख केला.—योहान १७:५.
४. (अ) काहीजण आणखी कोणत्या प्रकारे येशूचा अपमान करतात? (ब) येशू खराच जिवंत होता हे सिद्ध करण्यास कोणता पुरावा पुरेसा आहे व का?
४ ख्रिस्ती धर्मजगतातील काही जण आणखी पराकोटीला जाऊन असेही म्हणतात की, येशू हा ऐतिहासिक व्यक्ति नव्हताच; त्याने मानव म्हणून जीवन व्यतित केले हे ते नाकारतात. तो जर अस्तित्वातच नव्हता तर मग, आम्ही त्याचा सन्मान का व कसा करावा याची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. तथापि, शास्त्रवचनात राखून ठेवण्यात आलेल्या, डोळ्यांनी बघणाऱ्या साक्षीदारांचा इतका मुबलक पुरावा उपलब्ध आहे की, येशू खराच या पृथ्वीवर हयात होता हे निसंशये सिद्ध करता येते. (योहान २१:२५) ते खरेच आहे कारण आरंभीच्या ख्रिश्चनांनी आपले जीवन व स्वातंत्र्य धोक्यात घालून येशूबद्दलची शिकवण इतरांना दिली होती. (प्रे. कृत्ये १२:१-४; प्रकटीकरण १:९) तथापि, त्याच्या अनुयायांनी त्याच्याबद्दल जे लिहिले त्याशिवाय दुसऱ्या कोणा मार्गाने येशूचे अस्तित्व सिद्ध करता येईल का?
५, ६. शास्त्रवचनांशिवाय इतर ऐतिहासिक पुरावा येशूच्या खऱ्या अस्तित्वाबद्दल काय दाखवितो?
५ द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटेनिका (१९८७) म्हणतेः “ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनीही येशूच्या ऐतिहासिकपणाबद्दल कधी संशय व्यक्त केला नाही हे स्वतंत्र अहवालाद्वारे सिद्ध होते.” हे स्वतंत्र अहवाल कोणते आहेत? जोसेफ क्लॉसनर या यहूदी प्रामाण्यांच्या मते आरंभीच्या तालमूदी लिखाणांची साक्ष आहे. (जिझस ऑफ नासरेथ, पृ. २०) याचप्रमाणे पहिल्या शतकातील यहूदी इतिहासकार जोसेफस याचीही साक्ष आहे. उदाहरणार्थ, त्याने याकोबास झालेल्या दगडमाराचे वर्णन देताना याची ओळख, “ज्याला ख्रिस्त असे म्हटले जात होते त्या येशूचा भाऊ” अशी दिली आहे.—ज्युईश अँटीक्विटीस्, २०.
६ त्याचप्रमाणे आरंभीच्या इतिहासकारांची साक्षही उपलब्ध आहे. यामध्ये टॅसिटस् हा अधिक मान्यवर होता. त्याने दुसऱ्या शतकाच्या आरंभाला लिहिले की, “एक असा वर्ग होता ज्याच्याबद्दल घृणा किंवा तिटकारा व्यक्त होत होता. यांना ख्रिस्ती म्हणत. हे नाव ख्रिस्तस् [ख्रिस्त] यावरुन पडले; याला तिबिर्य याच्या कारकिर्दीतील आमच्या एका अधिकाऱ्याकडून भयंकर शिक्षा झाली.” (द ॲनल्स, १५, ४४) येशू या ऐतिहासिक व्यक्तीचा इतका भरपूर पुरावा पाहून जीन-जॅक्वस रोसेओ या १८व्या शतकातील फ्रेंच नीतीवादी तत्त्ववेत्यांनी ही साक्ष दिलीः “कोणाला शंका वाटत नाही त्या सॉक्रेटीसचा इतिहास, येशू ख्रिस्ताबद्दल सापडणाऱ्या भरपूर साक्षीच्या मानाने कमी साक्षीचा आहे.”
पुत्राचा सन्मान करण्याची कारणे
७. (अ) कोणत्या शास्त्रवचनीय साक्षीमुळे आम्हावर येशू ख्रिस्ताचा सन्मान करण्याचे बंधन आहे? (ब) यहोवाने आपल्या पुत्राला आणखी कसे सन्मानित केले आहे?
७ आता आपण येशू ख्रिस्ताला सन्मान देण्याच्या विषयाकडे वळू या. त्याच्या अनुयायांनी त्याचा सन्मान केला पाहिजे हे आपल्याला त्याच्या योहान ५:२२, २३ शब्दांवरुन कळतेः “पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे. यासाठी की जसा पित्याचा सन्मान करितात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करीत नाही.” ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून यहोवाने त्याच्या पुत्राला आणखी उच्च प्रकारची सन्मानित जागा दिली आहे, त्याला ‘मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित” केले आहे. (इब्री २:९; १ पेत्र ३:२२) येशूला सन्मान देण्याची कारणे, तो कोण आहे व त्याने काय केले या मूलभूत गोष्टींवर आधारीत आहेत.
८. येशू ख्रिस्ताबद्दलच्या कोणत्या अप्रतिम गोष्टीमुळे तो सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा आहे?
८ येशू ख्रिस्त सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा आहे याचे कारण की तो लोगस किंवा देवाचा शब्द या नात्याने यहोवाचा उत्कृष्ठ प्रवक्ता आहे. शास्त्रवचनांवरुन हे स्पष्ट दिसते की, येशूला “देवाचा शब्द” ही संज्ञा पृथ्वीवर येण्याआधी तसेच त्याचे स्वर्गारोहण झाल्यावर लागू करण्यात आली आहे. (योहान १:१; प्रकटीकरण १९:१३) प्रकटीकरण ३:१४ मध्ये तो स्वतःबद्दल “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” असल्याचे बोलतो. तो केवळ “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” आहे इतकेच नाही तर “एकुलता एक पुत्र” देखील आहे ते या अर्थी की, केवळ त्याचीच यहोवा देवाकरवी थेटपणे निर्मिती झाली आहे. (कलस्सैकर १:१५; योहान ३:१६) त्यानंतर, “सर्व त्याच्या द्वारे झाले; आणि झाले असे काहीच त्यांजवाचून झाले नाही.” (योहान १:३) या कारणास्तव आपण उत्पत्ती १:२६ मध्ये देवाने “आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू” असे म्हटल्याचे वाचतो तेव्हा त्या “आपण” मध्ये लोगस किंवा शब्द याचाही समावेश होता. अशाप्रकारे येशूला आपल्या मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात यहोवा देवासोबत निर्मिती कार्यामध्ये सहभागी होण्याचा अद्भूत हक्क लाभल्यामुळे तो मोठ्या सन्मानास खराच पात्र आहे.
९. येशू हाच आद्य देवदूत मीखाएल आहे हा निर्णय आम्ही का घेऊ शकतो आणि मीखाएलने मोशाच्या शरीरासंबंधाने यहोवाचा कसा सन्मान केला?
९ येशू ख्रिस्त यहोवाचा प्रमुख दूत किंवा आद्य देवदूत असल्यामुळे सन्मानास पात्र आहे. हा निर्वाळा आपण कोणत्या आधारावर घेऊ शकतो? “आद्य” या शब्दाचा अर्थ “मुख्य” किंवा “प्रधान” असा होत असल्यामुळे देवाचा केवळ एकच आद्य देवदूत असला पाहिजे. देवाचे वचन त्याचा संदर्भ केवळ पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या अनुषंगाने उपयोगात आणते. ते म्हणतेः “प्रभु स्वतः आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनि होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.” (१ थेस्सलीनकाकर ४:१६) या आद्य देवदूताला एक नाव आहे व ते आपल्याला यहूदाचे पत्र ९व्या वचनात सापडतेः “आद्य देवदूत मीखाएल हा जेव्हा मोशाच्या शरीरासंबंधाने सैतानाशी वाद घालिताना भांडला तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास त्याचा हिय्या झाला नाही. तर ‘प्रभु [यहोवा, न्यू.व.] तुला धमकावो,’ एवढे तो म्हणाला.” दियाबलाविरुद्ध दंडाज्ञा बजाविण्यात येशूने यहोवापुढे आपली मजल मारली नसल्यामुळे त्याने आपल्या स्वर्गीय पित्याचा याप्रकारे मान राखला.
१०. (अ) मीखाएल देवाच्या राज्याच्या वतीने लढण्यामध्ये कसा पुढाकार घेतो? (ब) इस्राएल राष्ट्राच्या बाबतीत मीखाएलने कोणती भूमिका पार पाडली?
१० आद्य देवदूत मीखाएल देवाच्या राज्याच्या वतीने लढतो आणि सैतान व त्याचे दुरात्मे यांना स्वर्गातून काढून टाकून स्वर्ग स्वच्छ करण्यात पुढाकार घेतो. (प्रकटीकरण १२:७-१०) दानीएल संदेष्टा म्हणतो की, तो ‘देवाच्या लोकांचा कैवार घेणारा,’ अधिपति आहे. (दानीएल १२:१) या कारणास्तव, असे दिसते की, मीखाएल हा “[खऱ्या] देवाचा दूत इस्राएली सैनेच्या पुढे चालत असे,” म्हणजे याचाच देवाने आपल्या लोकांना वचनयुक्त देशात आणण्यामध्ये उपयोग केला होता. “त्याच्यासमोर तुम्ही सावधगिरीने राहून त्याचे सांगणे माना,” असे देवाने आज्ञापिले. “त्याची अवज्ञा करू नका, कारण . . . त्याच्याठायी माझे नाम आहे.” (निर्गम १४:१९; २३:२०, २१) यहोवाच्या या आद्य देवदूताने देवाच्या नामाच्या नमुनेदार लोकांच्या बाबतीत मोठी आस्था राखली होती यात काही संशय नाही. दानीएल संदेष्ट्याचे सांत्वन करण्यासाठी जो एक दुसरा दूत पाठविण्यात आला होता व ज्याला प्रबळ दुरात्म्याने अडवले होते त्याच्या साहाय्यार्थ हा उचितपणे धावून आला. (दानीएल १०:१३) या कारणामुळे असेही म्हणता येते की, ज्या देवदूताने सन्हेरीबच्या १,८५,००० सैन्याचा संहार केला तो या मीखाएल आद्य देवदूताशिवाय दुसरा कोणीही नसला पाहिजे.—यशया ३७:३६.
११. पृथ्वीवर असताना कोणते जीवनाक्रमण व्यतित केल्यामुळे येशू आमच्या सन्मानास पात्र ठरतो?
११ येशू ख्रिस्त हा कोण आहे त्यामुळेच केवळ नव्हे तर त्याने काय केले यामुळे देखील तो आमच्या सन्मानास पात्र आहे. उदाहरणार्थ, ज्याने परिपूर्ण जीवन व्यतित केले असा केवळ तोच आहे. आदाम व हव्वा यांची परिपूर्ण स्वरुपात निर्मिती करण्यात आली होती, पण ती फारच थोडा काळ टिकली. पण येशू ख्रिस्त तर दियाबलाने त्याच्यावर मोहपाश व छळ या रुपात जे जे आणले त्या सर्वांमध्ये ‘सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा’ राहिला. त्या सर्व छळात “त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.” या कारणामुळे तो आपल्या धार्मिक विरोधकांना आव्हानाने हे म्हणू शकलाः “तुम्हातील कोण मजवर पाप लागू करील?” त्यापैकीच्या एकालाही ते करता येत नव्हते! (इब्रीयांस ७:२६; १ पेत्र २:२२; योहान ८:४६) येशूने आपली निष्पाप सचोटी राखल्यामुळे आपला स्वर्गीय पिता हा सेनाधीश प्रभु आहे आणि दियाबल हा मोठा घातकी लबाडखोर आहे हे त्याने सिद्ध केले.—नीतीसूत्रे २७:११.
१२. (अ) येशू कोणत्या प्रकारातील माणूस होता, आणि त्याने इतरांबद्दल काय केले व कोणता त्रास काढला? (ब) येशूने जे केले व त्याने जो त्रास सहन केला त्यामुळे तो आमच्या सन्मानास पात्र आहे असे तुम्ही का म्हणाल?
१२ येशू ख्रिस्ताने आपले परिपूर्ण व निष्पाप जीवन व्यतित केले पण सोबत तो चांगला, निस्वार्थ व स्वार्थत्यागी माणूस होता या कारणामुळे सुद्धा तो सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा आहे. (पडताळा रोमकर ५:७.) त्याने लोकांच्या आध्यात्मिक तसेच भौतिक गरजा पूर्ण करण्यामध्ये अविश्रांत काम केले. त्याने आपल्या पित्याच्या घरासाठी केवढा आवेश दाखवला, तसेच आपल्या शिष्यांच्या बाबतीत केवढी सहनशीलता प्रदर्शित केली! पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्याने केवढा त्रास सहन केला! गेथशेमाने बागेतील त्याजवरील कसोटीसंबंधाने पवित्र शास्त्र म्हणतेः “मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा त्याचा घाम रक्ताचे मोठे थेंब भूमीवर पडावे असा पडत होता.” होय, त्याने “मोठ्या आक्रोशाने व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली.” (लूक २२:४४; इब्रीयांस ५:७) त्याच्या कसोटीबद्दल यशया संदेष्ट्याने यशया ५३:३-७ मध्ये किती अचूकपणे भाकित केले होते!
१३. आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करण्यामध्ये येशूने आम्हासाठी कोणते उत्तम उदाहरण मांडले?
१३ आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करण्यामध्ये येशूने स्वतःचे जे उत्तम उदाहरण आमच्यासाठी मांडले त्यामुळे तो आमच्या सन्मानास पात्र आहे. “मी आपल्या पित्याचा सन्मान करितो,” असे तो योग्यपणे म्हणू शकला. (योहान ८:४९) आपले बोल व कृत्ये याद्वारे त्याने सर्वदा यहोवास सन्मान मिळवून दिला. एकदा एका माणसाला येशूने बरे केले तेव्हा पवित्र शास्त्र अहवाल म्हणतो की लोकांनी येशूचे गौरव केले नाही, तर “देवाचे गौरव” केले. (मार्क २:१२) या कारणास्तव, पृथ्वीवरील आपल्या सेवकपणाच्या शेवटाला येशू त्याच्या स्वर्गीय पित्यास हे अगदी उचितपणे म्हणू शकलाः “जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.”—योहान १७:४.
त्याने आम्हासाठी काय केले
१४. येशूच्या मृत्युने आम्हासाठी असे काय केले की ज्यामुळे तो आमच्या सन्मानास पात्र ठरतो?
१४ तसेच येशूने आम्हासाठी जे सर्व केले त्याकरता तो आमच्या सन्मानास केवढा पात्र ठरतो बरे! आमचा यहोवा देवाशी समेट घडावा यासाठी त्याने आमच्या पापास्तव मरण सहन केले. याबद्दल येशू स्वतः म्हणालाः “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला.” (मत्तय २०:२८) अशाप्रकारे त्याच्या मृत्युमुळे देवाचे राज्य आम्हा मानवासाठी शक्य ते सर्व साध्य करु शकतेः त्याची वधू असणाऱ्या १,४४,००० सदस्यांसाठी स्वर्गातील अमर जीवन आणि परिक्षाप्रसंगी आपला विश्वास व आज्ञाधारकता सिद्ध करणाऱ्या इतर लाखो लोकांसाठी नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन.—स्तोत्रसंहिता ३७:२९; प्रकटीकरण १४:१-३; २१:३, ४.
१५. येशूने आपल्या पित्याचे व्यक्तिमत्व आपल्याला प्रकट केल्याचे कोणते एक उदाहरण देता येईल?
१५ येशू ख्रिस्त आमच्या सन्मानास पात्र असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, थोर शिक्षक या नात्याने त्याने आम्हाला त्याच्या पित्याची इच्छा व व्यक्तिमत्व पूर्ण रुपाने प्रकट केले. उदाहरणार्थ, डोंगरावरील प्रवचनात त्याने आपला पिता चांगल्या व वाईट या दोघांनाही सूर्यप्रकाश व पाऊस देतो हे सांगून पित्याचा उदारशीलपणा प्रकट केला व म्हटलेः “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.”—मत्तय ५:४४-४८.
१६. येशू सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा आहे हे पौलाने सारांशरित्या कसे सांगितले?
१६ येशू सन्मान मिळण्याच्या केवढ्या पात्रतेचा आहे याचा सारांश प्रेषित पौलाने योग्य रितीने केला. त्याने लिहिलेः “तो देवाच्या स्वरुपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले; आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. एथपर्यंत आज्ञापालन करुन त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:५-८.
आम्ही पुत्राचा सन्मान कसा करु शकतो
१७, १८. आम्ही कोणकोणत्या विविध मार्गाने येशू ख्रिस्ताचा सन्मान करू शकतो?
१७ येशू ख्रिस्त सन्मानास पात्र असल्याचे निःसंशये खरे असल्यामुळे आता प्रश्न हा आहे की, आम्ही या पुत्राचा कसा सन्मान करु शकतो? हे, त्याच्या खंडणी यज्ञार्पणावर आपला विश्वास प्रदर्शित करून आणि पश्चात्ताप, परिवर्तन, समर्पण व बाप्तिस्मा ही पावले उचलून हा विश्वास सिद्ध करुन करु शकतो. यहोवाला येशूच्या नामाने प्रार्थना करण्याद्वारे आपण येशूचा सन्मान करतो. तसेच त्याच्या या शब्दांकडे लक्ष देण्याद्वारे आम्ही त्याचा आणखी सन्मान करतो. तो म्हणालाः “माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा, व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) याचप्रमाणे देवाच्या राज्याचा व त्याच्या नीतीमत्तेचा आपण प्रथम शोध घ्यावा या त्याच्या सूचनेकडे आपण लक्ष देतो व शिष्य बनविण्याच्या कार्यात सहभागी होण्याची त्याची आज्ञा पाळतो तेव्हा आम्ही त्याचा सन्मान करतो. आणखी, जेव्हा त्याने म्हटले की, खरे बंधुप्रेम हे त्याच्या अनुयायांचे ओळखचिन्ह आहे ते आपण प्रदर्शित करतो तेव्हा आपण येशूचा सन्मान करीत असतो.—मत्तय ६:३३; २८:१९, २०; योहान १३:३४, ३५.
१८ आणखी जेव्हा आपण पुत्राचे नाव स्वतःवर लावून स्वतःला ख्रिस्ती म्हणवितो आणि या नावानुरुप आपले चांगले आचरण ठेवीत असतो तेव्हाही या पुत्राचा सन्मान करीत असतो. (प्रे. कृत्ये ११:२६; १ पेत्र २:११, १२) प्रेषित पेत्राने म्हटले की, आपण येशूच्या पावलांस जवळून अनुसरले पाहिजे. (१ पेत्र २:२२ न्यू.व.) आमच्या सर्व वागणूकीत त्याचे अनुकरण करण्याद्वारे देखील आपण त्याचा सन्मान करतो. याचप्रमाणे जेव्हा आपण वार्षिकरित्या ख्रिस्ताच्या मृत्युचा स्मारकविधी आचरतो तेव्हा आम्ही त्याचा खास सन्मान करतो.—१ करिंथकर ११:२३-२६.
१९, २०. (अ) आपला सन्मान करण्यामुळे येशू त्याच्या अनुयायांसाठी सध्या व भविष्यासाठी कोणते बक्षीस राखून आहे? (ब) पुत्रासंबंधाने आपल्याला कोणता आत्मविश्वास राखता येईल?
१९ आपल्या शिष्यांनी सन्मान देणारा मार्ग आचरल्यामुळे येशू त्यांच्यासाठी कोणते बक्षीस राखून आहे? त्याने म्हटलेः “मी तुम्हास खचित सांगतो, ज्याने मजकरिता व सुवार्तेकरिता घर, भाऊ, बहिणी, आई, बाप, मुले किंवा शेते सोडली आहेत अशा कोणाही इसमाला या सांप्रतकाळी शंभरपट घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले व शेते ह्याबरोबर पाठलाग आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्यावाचून राहणार नाही.”—मार्क १०:२९, ३०.
२० जर आपण येशूसाठी त्याग पत्करला तर आम्हाला त्याचे प्रतिफळ मिळत आहे याकडे त्याचे लक्ष असेल. येशू ही खात्री आम्हास देतोः “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील, त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.” (मत्तय १०:३२) जसे स्वर्गीय पिता आपला सन्मान करणाऱ्यांना बहुमानित करतो तसेच यहोवाचा एकुलता एक पुत्र त्याच्या पित्याचे जसे इतर प्रकारात अनुकरण करीत आला आहे तसेच याबाबतीत देखील अनुकरण करील असा आत्मविश्वास आपल्याला राखता येईल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ ख्रिस्ती धर्मजगतातील पुष्कळ जण पुत्राचा कसा अपमान करतात?
▫ मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल येशूने कोणती साक्ष दिली?
▫ आम्ही येशूचा सन्मान करावा अशी कोणती कारणे आपल्यापाशी आहेत?
▫ आम्ही येशूचा सन्मान कोणकोणत्या मार्गाने करू शकतो?
▫ येशू ख्रिस्ताचा सन्मान करण्यामुळे कोणते लाभ मिळतात?