वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ६/१ पृ. १०-१४
  • यहोवाचा सन्मान करा—का व कसा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा सन्मान करा—का व कसा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • सन्मान देण्याचा अर्थ काय होतो
  • यहोवा सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा का आहे?
  • यहोवाचा कसा सन्मान करावा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ६/१ पृ. १०-१४

यहोवाचा सन्मान करा—का व कसा?

“जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.”—१ शमुवेल २:३०.

१. नोबेल पारितोषिक कोणाला दिले जाते, त्यात कशाचा समावेश असतो आणि या पारितोषिकाबद्दल अनेकांचा कसा दृष्टीकोण आहे?

दर वर्षी स्कँडेनेवियाच्या चार संस्था नोबेल पारितोषिक देत असतात. ही पारितोषिके ‘ज्यांनी मागील वर्षात मानवजातीसाठी सर्वथोर लाभ मिळवून देण्याचे कार्य केले’ अशांना दिली जातात. ती सहा वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येतात. हे नोबेल पारितोषिक कोणा मानवास मिळणारा सर्वोच्च बहुमान आहे असे समजले जाते.

२. नोबेल पारितोषिक देणाऱ्‍यांचे कशाकडे सहसा दुर्लक्ष झाले आहे, पण तो खासपणे कोणत्या बहुमानास पात्र आहे?

२ लायक माणसांना सन्मानाने बहुमानित करणे यात काही चुकीचे नसले तरी बहुमान देणाऱ्‍यांनी, मानवजातीला सर्वतोपरि फायदा देणाऱ्‍याचा बहुमान करण्याचा कधी विचार केला आहे का? मानवजातीला सर्वतोपरि लाभ मिळवून देणाऱ्‍याने सुमारे ६,००० वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्या मनुष्य व स्त्रीची निर्मिती केली तेव्हापासून अगणित असे लाभ दिले आहेत. याचा सन्मान करण्यात जी सतत हेळसांड होत आलेली आहे ती आम्हाला ईयोबाचा मित्र अलिहू ज्याने हे शब्द उच्चारले होते त्याचे स्मरण करून देतात. तो म्हणालाः “तरीपण असे कोणीही म्हणत नाही की, ‘जो रात्रीची स्तोत्रे गावयाला देतो, तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे?’” (ईयोब ३५:१०) आम्हास सर्वतोपरि लाभ देणारा हा निर्माणकर्ता ‘आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु देऊन अन्‍नाने व हर्षाने मन भरुन तृप्त’ करीत आला आहे. (प्रे. कृत्ये १४:१६, १७; मत्तय ५:४५) यहोवा खरोखरी “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा दाता आहे.—याकोब १:१७.

सन्मान देण्याचा अर्थ काय होतो

३. “सन्मान” याकरता कोणते प्रमुख इब्री व ग्रीक शब्द आहेत व त्यांचा काय अर्थ होतो?

३ सन्मान यासाठी असणारा प्रमुख इब्री शब्द का․वोहधʹ याचा शब्दशः अर्थ “भारावून टाकणे” असा आहे. अशाप्रकारे, ज्याचा सन्मान करण्यात आला आहे तो कशाने तरी भारावलेला, छाप पडलेला असा समजला जातो. हाच इब्री शब्द का․वोहधʹ याचे पवित्र शास्त्रवचनात “गौरव” असे भाषांतर झालेले आहे हे लक्षवेधी आहे व यामुळे ज्याला सन्मान मिळतो तो केवढा महत्त्वपूर्ण आहे याची सूचकता मिळते. तसेच शास्त्रवचनात “सन्मान” यासाठी जो आणखी शब्द आहे तो येकारʹ “बहुमूल्य” आणि “बहुमोल गोष्टी” असा अर्थ देतो. अशाप्रकारे इब्री शास्त्रवचनात सन्मान या शब्दाचा संबंध वैभव व बहुमोलपणा याच्याशी आहे. पवित्र शास्त्रात “सन्मान” असा भाषांतरीत करण्यात आलेला ग्रीक शब्द टी․मेʹ हा देखील उच्चता, महत्त्वपूर्णता व बहुमूल्यतेचा अर्थ देतो.

४, ५. (अ) कोणाचा सन्मान करणे याचा काय अर्थ होतो? (ब) सन्मान करण्यात कशाचा समावेश असतो याचे एस्तेर ६:१-९ मध्ये कसे विदारण करण्यात आले आहे?

४ अशाप्रकारे एकजण दुसऱ्‍याचा सन्मान करुन त्याला खोल आदर व उच्चता दाखवितो. याचे उदाहरण म्हणून पवित्र शास्त्रात विश्‍वासू यहूदी मर्दखय याची परिस्थिती लक्षात घेण्याजोगी आहे. प्राचीन पारसाचा राजा अहेश्‍वेरोश याचा जीव घेण्याचा कट एके प्रसंगी मर्दखय याने राजाला कळविला होता. नंतर एके रात्री राजाची झोप उडाली असता मर्दखयचे कृत्य राजाच्या ध्यानात आणून दिले गेले. तेव्हा राजाने आपल्या सेवकांना विचारलेः “या कामगिरीबद्दल मर्दखयाचे गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” त्यांनी म्हटलेः “त्याच्या बाबतीत काहीएक करण्यात आले नाही.” केवढा हा विचित्र प्रकार! मर्दखयाने राजाचे जीवन वाचवले होते पण याबद्दलची कदर करण्यात राजा अपयशी झाला होता.—एस्तेर ६:१-३.

५ या कारणास्तव, योग्य वेळी अहेश्‍वरोश राजाने हामान या आपल्या प्रधान मंत्र्याला विचारले की, ज्यावर राजाची मर्जी बसली आहे त्याचा कसा सन्मान केला जाण्यास हवा. तेव्हा हामानाने त्वरित आपल्या हृदयात हा विचार केलाः “मजहून दुसऱ्‍या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार?” यामुळे हामानाने म्हटले की, त्या व्यक्‍तिला “महाराज धारण करतात तो पोषाख” घालावा व “ज्या घोड्यावर महाराज स्वारी करतात” त्यावर त्याला बसवावे. तो आणखी म्हणालाः “त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्या पुढे असे ललकारावे की, ‘राजेसाहेब ज्याचे गौरव करु इच्छितात त्यांची संभावना या प्रकारे होते.’” (एस्तेर ६:४-९) अशाप्रकारे ज्याचा सन्मान होतो त्याचे सर्व लोक खूप कौतुक करण्याची अपेक्षा आहे.

यहोवा सन्मान मिळण्याच्या पात्रतेचा का आहे?

६. (अ) इतर सर्वांपेक्षा कोण अधिक सन्मानास पात्र आहे? (ब) यहोवाला “महान” हा शब्द का उचितपणे लागू होऊ शकतो?

६ इतिहासभर लोकांना सन्मानाने बहुमानित करण्यात आले व सहसा गैरवाजवी पद्धतीने देखील. (प्रे. कृत्ये १२:२१-२३) पण कोण असा आहे की जो इतर सर्वांपेक्षा अधिक सन्मानास पात्र आहे? अर्थातच, यहोवा देव पात्र आहे! तो सन्मानास पात्र आहे त्याचे कारण हे की, तो अत्यंत थोर आहे. त्याला “महान” ही पदवी वारंवार लागू करण्यात आली आहे. तो राजाधिराज, महान निर्माता, घडविणारा, थोर राजा, महान शिक्षक व धनी आहे. (स्तोत्रसंहिता ४८:२; उपदेशक १२:१; यशया ३०:२०; ४२:५; ५४:५; होशेय १२:१४) जो महान असतो तो भव्य, दिमाखी, अतिउच्च, सन्माननीय, सुविख्यात, आणि भयप्रेरित असतो. यहोवा तर अतुलनीय आहे, त्याच्याशी कोणाची बरोबरी होऊ शकत नाही; तो अत्युकृष्ट आहे. त्याने स्वतःच याबद्दलची ग्वाही दिली आहे. तो म्हणतोः “माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल की, जेणेकरुन ते मजशी समान ठरतील?”—यशया ४६:५.

७. यहोवा देव हा निदान कोणत्या मार्गाने अद्वितीय आहे असे म्हणता येईल; आणि तो अधिकाराच्या बाबतीत अतुलनीय आहे असे का म्हटले जाऊ शकते?

७ यहोवा निदान सात वेगवेगळ्या मार्गी वेगळा आहे, ज्यामुळे त्याचा सन्मान होण्याची विशिष्ट कारणे प्रस्तुत होतात. प्रथमतः तो स्वतः अधिकाराच्या बाबतीत अतुलनीय असल्यामुळे सर्वात अधिक सन्मानास पात्र आहे. प्रभू यहोवा हा विश्‍वाचा सेनाधीश, सर्वोच्च आहे. तो आमचा शास्ता, नियंता व राजा आहे. त्याला स्वर्ग व पृथ्वीतील सर्वजण जबाबदार आहेत; पण तो स्वतः मात्र कोणालाच जबाबदार नाही. तो “महान, पराक्रमी व भययोग्य” आहे असे त्याचे उचितपणे वर्णन करण्यात आले आहे.—अनुवाद १०:१७; यशया ३३:२२; दानीएल ४:३५.

८. यहोवा हा (अ) त्याचा हुद्दा व (ब) त्याचे चिरकालिक अस्तित्व याबाबतीत अतुलनीय आहे हे का म्हणता येते?

८ दुसरी गोष्ट अशी की, यहोवा आपल्या हुद्याच्या अनुषंगाने अतुलनीय असल्यामुळे सर्वथोर सन्मानाच्या पात्र आहे. तो “उच्च व परमथोर,” सर्वसमर्थ आहे. तो आपल्या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्राच्या वर अजिंक्य स्थितीत आहे! (यशया ४०:१५; ५७:१५; स्तोत्रसंहिता ८३:१८) याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे यहोवा देव त्याच्या चिरकालिक अस्तित्वाच्या बाबतीत अप्रतिम असल्यामुळे त्याला इतर सर्वांपेक्षा मान देणे योग्य आहे. त्याला एकट्यालाच कधी सुरवात नव्हती; तो चिरकालापासून ते चिरकालापर्यंत अस्तित्वात आहे—स्तोत्रसंहिता ९०:२; १ तीमथ्य १:१७.

९. यहोवा (अ) त्याचे वैभव आणि (ब) त्याची मूलभूत गुणलक्षणे यांच्या बाबतीत कशाप्रकारे अतुलनीय आहे?

९ चवथी गोष्ट अशी की, यहोवा देव आपल्या व्यक्‍तिगत गौरवात अति दैदिप्यमान असल्यामुळे तो सर्वोच्च सन्मानास पात्र आहे. तो ‘प्रकाशाचा पिता’ आहे. त्याचे व्यक्‍तीमत्व इतके तेजोमय आहे की, कोणी माणूस त्याला पाहून जिवंत राहू शकणार नाही. तो खराच भयप्रेरित आहे. (याकोब १:१७; निर्गम ३३:२२; स्तोत्रसंहिता २४:१०) पाचवी गोष्ट अशी की, यहोवा देवाठायी अद्‌भूत गुणलक्षणे आहेत त्यामुळे त्याला सर्वोच्च सन्मान मिळणे योग्य आहे. तो सर्वशक्‍तिमान व सर्वसूज्ञ आहे. तो न्यायानेही परिपूर्ण आहे आणि प्रीतीची तर सर्वांगपूर्णता त्याच्याठायी आहे.—ईयोब ३७:२३; नीतीसूत्रे ३:१९; दानीएल ४:३७; १ योहान ४:८.

१०. यहोवा (अ) त्याची निर्मिती कार्ये व मालकी ठेवा तसेच (ब) त्याचे नाव व किर्ती याबाबतीत कसा अप्रतिम आहे?

१० यहोवाची अद्‌भूत निर्मिती कार्ये यांजमुळे तो आम्हाकडील सर्वोच्च सन्मानास पात्र आहे. स्वर्ग व पृथ्वी यांजमधील सर्व गोष्टींचा निर्माता या नात्याने तो सर्व वस्तुंचा मालकही आहे. आम्ही स्तोत्रसंहिता ८९:११ मध्ये असे वाचतोः “आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे.” सातवी गोष्ट अशी की, यहोवा त्याचे नाव व किर्ती यांच्याबाबतीत अप्रतिम व अतुलनीय असल्यामुळे तो इतर सर्वांपेक्षा अधिक सन्मानास पात्र आहे. त्याचे एकट्याचेच नाव यहोवा असून त्याचा अर्थ “तो घडवतो” असा आहे.—उत्पत्ती २:४, तळटीप.

यहोवाचा कसा सन्मान करावा

११. (अ) यहोवाचा सन्मान आम्ही कोणकोणत्या मार्गाने करू शकतो? (ब) आपण यहोवाचा सन्मान खरेच करीत आहोत हे त्याजवर आपला भाव प्रदर्शित करण्याद्वारे कसे दाखवू शकतो?

११ यहोवाच्या सर्व गुणलक्षणांचा विचार करता आम्ही त्याचा कसा सन्मान करु शकतो? आम्ही पाहणारच आहोत त्याप्रमाणे त्याचे भय मानून, त्याला पूज्यता दाखवून, त्याच्या आज्ञा पाळून, आणि आपल्या सर्व मार्गात त्याची दखल घेऊन आपल्याला त्याचा सन्मान करता येईल. याचप्रमाणे आम्हाला त्याला काही दाने देऊन, त्याचे अनुकरण करून तसेच त्याला विनवण्या करून देखील त्याचा सन्मान करता येईल. याचप्रमाणे त्याच्यावर आपला विश्‍वास व्यक्‍त करून आणि काहीही झाले तरी त्याच्यावर आपला भाव प्रकट करून त्याचा सन्मान करता येईल. “आपल्या अगदी मनापासून [अंतःकरणापासून, न्यू.व.] परमेश्‍वरावर [यहोवा, न्यू.व.] भाव ठेव,” असे आपल्याला आर्जविण्यात आले आहे. अशाप्रकारे, यहोवाची वचने आपण ग्राह्‍य मानण्यामुळे त्याचा सन्मान करु शकतो. उदाहरणार्थ, तो असे म्हणतोः “तू भिऊ नको. कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरु नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्‍ति देतो; मी तुझे साहाय्यही करतो.” (नीतीसूत्रे ३:५; यशया ४१:१०) त्याच्यावर पूर्ण भाव प्रदर्शित करण्यात उणे पडणे हे त्याचा अपमान करण्यासारखे आहे.

१२. यहोवाचा सन्मान करण्यामध्ये आज्ञाधारकपणा व भय कोणता कार्यभाग पूर्ण करतात?

१२ यहोवाचा सन्मान करण्याचा आणखी एक जवळचा मार्ग म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन करणे होय. आणि आज्ञापालनासाठी ईश्‍वरी भय, देवाला नाखूष न करण्याची भीती ही आवश्‍यक आहे. भय व आज्ञापालन यात जो संबंध आहे तो स्वतः यहोवा देवानेच अब्राहामाच्या प्रकरणात, जेव्हा की अब्राहामाने इसहाकाचे बलिदान देऊ केले तेव्हा स्पष्ट केला. “तू देवाला भिऊन चालणारा आहेस, हे मला दिसून आले,” असे यहोवाने म्हटले. (उत्पत्ती २२:१२) मुले पालकांना कशाच्या बाबतीत जबाबदार असतात त्याबद्दलची चर्चा करताना प्रेषित पौलाने दाखविले की, आज्ञापालन व सन्मान या गोष्टी एकत्र जातात. (इफिसकर ६:१-३) यास्तव, देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आम्ही यहोवाचा सन्मान करतो. त्याच्या आज्ञा भारी नाहीत. उलटपक्षी, आज्ञाभंग करणे हे देवाचा अपमान करण्यासारखे आहे.—१ योहान ५:३.

१३. देवाचा सन्मान करण्यामुळे आमच्या कार्यहालचाली व योजना यासंबंधी आपणामध्ये कोणती मानसिक प्रवृत्ती घडविली जाईल?

१३ तसेच, आपण नीतीसूत्रे ३:६ मधील सल्ल्याकडे लक्ष दिल्यास यहोवाला योग्य तो सन्मान दाखविता येईल. तेथे म्हटले आहेः “तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर [होय, त्याची दखल घे], म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील.” (न्यू.व.) याबद्दल शिष्य याकोब आम्हाला चांगला सल्ला देतो. आपण दर दिवशी आपल्याच आत्मविश्‍वासाने मजल मारण्याऐवजी, आणि स्वतःच्या कुवतीवर भाव ठेवण्यापेक्षा आपल्याला असे म्हटले पाहिजेः “प्रभूची [यहोवा, न्यू.व.] इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू.” (याकोब ४:१५) काही वर्षाआधी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांची बोलण्याची एक विशिष्ट शैली होती. कोणतेही विधान केल्यावर ते शेवटी डी.व्ही. किंवा देव व्होलेंट असे म्हणत, ज्याचा अर्थ “देवाची इच्छा असले तर” असा आहे.

१४. (अ) आपल्याला देवाचा सन्मान करायचा आहे तर आमच्या प्रयत्नांच्या बाबतीत आम्ही कसले धोरण राखले पाहिजे? (ब) वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनात जी माहिती प्रकाशित केली जाते तिजबद्दल कोणती प्रवृत्ती प्रदर्शित करण्यात येते?

१४ आपली वृत्ती नम्र स्वरुपाची राखून आणि आपल्याला मिळालेल्या यशप्राप्तीचे श्रेय देवास देऊन आपण यहोवा देवाचा सन्मान करतो. प्रेषित पौलाने आपल्या सेवाकार्याबद्दल हे उचित शब्द वापरलेः “मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही, आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच कायतो आहे.” (१ करिंथकर ३:६, ७) खरेच, पौल आपल्या कार्याचे श्रेय स्वतःला किंवा इतर कोणाला नव्हे तर केवळ योग्यपणे देवालाच देत होता. त्याप्रमाणेच, वॉचटावर संस्थेची आजची प्रकाशने कोणी लिहिलीत याची माहिती देत नाहीत; तसेच लेखक सुद्धा त्यांनी जो सहयोग पुरविला त्याबद्दल इतरांना कळविण्याचे टाळतात. यामार्गी लोकांचे लक्ष अशा माहितीवर केंद्रित केले जाते जी माहिती कोणा मानवाला नव्हे तर यहोवाला सन्मान देण्यासाठी लिहिण्यात आलेली आहे.

१५. यहोवाच्या साक्षीदारांची विनयशीलता समजण्यास काही लोकांना कठीण कशी वाटते हे कोणता अनुभव चित्रित करतो?

१५ अशा पद्धतीने, यहोवाकडे लक्ष केंद्रित करण्याची व त्याद्वारे त्याचा सन्मान करण्याचे जे धोरण आहे ते काहींना आश्‍चर्यचकित करते. काही वर्षांआधी न्यूयॉर्क शहराच्या मध्यवर्ती उद्यानात एका जाहीर भाषणासाठी स्पीकर लावण्याचे काम चालू असताना साक्षीदारांनी आवाजाची चाचणी घ्यावी म्हणून एक किंग्डम मेलडीज्‌ची टेप लावली. सभ्य पेहराव केलेल्या एका जोडप्याने एका साक्षीदाराला विचारले की हे कसले संगीत आहे. माहिती विचारणारे जोडपे साक्षीदारांपैकी आहेत अशी समज झाल्यामुळे या साक्षीदाराने म्हटलेः “ही किंग्डम मेलडीज्‌ नं. ४ आहे.” “होय, ते आम्हाला कळते, पण हे संगीत कोणी रचले आहे?” त्यांनी विचारले. साक्षीदार म्हणालाः “ओह, रचनाकार निनावी आहे.” ते जोडपे पुन्हा म्हणालेः “संगीताची रचना जे करतात ते कधीही आपल्याला निनावी ठेवत नाहीत.” तेव्हा साक्षीदार म्हणालाः “पण यहोवाचे साक्षीदार तसे करतात.” होय, ते स्वतःला निनावी ठेवतात, ज्यामुळे सर्व सन्मान यहोवा देवाला जातो.

१६. आम्ही आपल्या वाणीचा यहोवा देवाचा सन्मान करण्यासाठी कसा विविधपूर्ण मार्गांनी वापर करू शकतो?

१६ आमच्या ओठांद्वारे यहोवाबद्दलची साक्ष देण्यामुळे आपण त्याचा सन्मान आणखी एका मार्गाने करू शकतो. त्याच्या नावाला सन्मान मिळवून देण्याची खरीच चिंता आपल्याला आहे तर मग, राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्याची आपण सतत जाणीव राखू. हे आपल्याला घरोघरचे कार्य किंवा इतर उपलब्ध अशा कोणाही रितीने करता येईल; यात अनौपचारिक साक्षीकार्य करण्याच्या संधिकडे आपण दुर्लक्ष होऊ देणार नाही. (योहान ४:६-२६; प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) याखेरीज, मंडळीच्या सभांमध्ये आपली विवेचने सादर करून तसेच अंतःकरणपूर्वक राज्याची गाणी म्हणून आपल्याला देवाचा सन्मान करण्याची संधी आहे. (इब्रीयांस २:१२; १०:२४, २५) आपण आपल्या दररोजच्या संभाषणात सुद्धा आपल्या ओठांचा वापर यहोवाचा सन्मान करण्यासाठी करू शकतो. थोडासा प्रयत्न करून आपण आपले संभाषण उभारणीकारक अशा आध्यात्मिक मार्गी नेऊ शकतो, जे यहोवा देवाला सन्मान मिळवून देण्यात परिणामित होईल.—स्तोत्रसंहिता १४५:२.

१७. (अ) चांगल्या वागणूकीचा संबंध यहोवाचा सन्मान करण्याशी कसा आहे? (ब) वाईट वागणूकीचा कोणता परिणाम होतो?

१७ आपल्या ओठांनी यहोवा देवाचा जसा सन्मान चांगल्याप्रकारे होऊ शकतो, तसेच आपल्या वागणुकीद्वारेही त्याला सन्मान मिळाला पाहिजे. देवाची नुसती ओठांनी स्तुती करणाऱ्‍या, पण अंतःकरण मात्र त्याच्यापासून दूर नेणाऱ्‍या लोकांचा येशूने धिक्कार केला. (मार्क ७:६) वाईट वागणूक ही निश्‍चये यहोवा देवाचा अपमान करते. उदाहरणार्थ, रोमकरांस २:२३, २४ मध्ये आम्ही वाचतोः “जो तू नियमशास्त्राचा अभिमान बाळगितोस, तो तूच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करितोस काय? ‘तुम्हामुळे विदेशी लोकात देवाच्या नामाची निंदा होत आहे,’ असा शास्त्रलेख आहे.” अलिकडील वर्षांत पुष्कळ लोकांना यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यातून बहिष्कृत करण्यात आले आहे. कदाचित यापेक्षाही अधिक संख्येच्या लोकांनी वाईट वागणूक आचरली होती, पण त्यांनी खरा पश्‍चाताप दाखविल्यामुळे त्यांना बहिष्कृत करण्यात आले नाही. हे सर्व लोक ओठांनी यहोवाचा सन्मान करीत होते, पण यांनी आपल्या वागणूकीने ते करण्यामध्ये अपयश दाखवले.

१८. (अ) काही कृपापात्र सेवकांनी यहोवाचा योग्य तो सन्मान दाखविण्याची का काळजी केली पाहिजे? (ब) ही काळजी बाळगण्याची गरज आहे हे मलाखीच्या काळातील काही याजकांच्या परिस्थितीवरुन कसे दिसून येते?

१८ पूर्ण वेळच्या सेवेच्या विविध क्षेत्रात, मग ती बेथेल सेवा असो, फिरते किंवा मिशनरी कार्य असो, की पायनियरचे कार्य असो, येथेही यहोवाच्या सन्मान घडवून आणण्यात खूप संधि आहेत. यांना नेमून दिलेल्या कामात होता होईल ते सर्वांत चांगले करून दाखविण्याचे कर्तव्य आहे. “अल्प गोष्टीविषयी विश्‍वासू तो पुष्कळाविषयीही विश्‍वासू” राहू शकतो. (लूक १६:१०) काही मार्गात त्यांचे हे सन्माननीय पद जरी प्राचीन इस्राएलातील याजक व लेव्यांद्वारे चित्रित होते; तरी ते प्रतिनमुनेदार नाही. तरीपण मलाखीच्या काळात काही याजकांच्या बेपर्वा प्रवृत्तीमुळे यहोवाने त्यांना म्हटलेः “मी बाप आहे तर माझ्या सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे?” (मलाखी १:१६) ते याजक अंधळे, लंगडे व आजारी प्राणी यज्ञार्पण म्हणून अर्पण करुन देवाच्या नामाचा अपमान करीत होते. याचप्रमाणे सेवेचे खास हक्क असणाऱ्‍यांनी सर्वोत्तम असे दिले नाही तर, यहोवा देवाने त्या याजकांची जी खरडपट्टी केली तशीच खासपणे यांना मिळू शकेल. देवाचा सन्मान करण्यात ते उणे पडले आहेत असे दिसून येईल.

१९. (अ) नीतीसूत्रे ३:९ मध्ये सुचविल्याप्रमाणे यहोवाचा सन्मान करण्याचा आणखी एक मार्ग कोणता? (ब) याखेरीज, यहोवाचा सन्मान करण्याचा दुसरा एक मार्ग कोणता आहे?

१९ यहोवा देवाने जगभर जे प्रचाराचे काम करण्याचे सोपवले आहे त्याला आर्थिक अनुदानाचे सहकार्य देऊन आपल्याला त्याच्या नावाचा सन्मान करता येईल. “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्‍नाच्या प्रथम फळाने परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] सन्मान कर,” असे आपल्याला आर्जविण्यात आले आहे. (नीतीसूत्रे ३:९) अशाप्रकारे अनुदान करण्याच्या हक्काद्वारे यहोवा देवाचा सन्मान करण्याची जी संधि असते तिजकडे कोणीही दुर्लक्ष करता कामा नये. याचप्रमाणे आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये यहोवा देवाची स्तुती व उपकारस्मरण करून त्याचा सन्मान करू शकतो. (१ इतिहास २९:१०-१३) वस्तुतः आम्ही त्याच्याकडे नम्रतेने व आदरभावाने येतो हीच गोष्ट मुळात आम्ही त्याच्याकडे प्रार्थनेद्वारे येण्याद्वारे त्याला सन्मान प्रकटवीत असते.

२०. (अ) जगातील लोक सहसा कोणाचा सन्मान करीत असतात व कसा? (ब) कोणत्या आज्ञेचे पालन करुन आम्ही यहोवाचा आणखी सन्मान करू शकतो?

२० आज पुष्कळ लोक व खासपणे युवक, त्यांना ज्या लोकांबद्दलचे कौतुक वाटत असते अशा लोकांच्या बोलण्याचे व कृतीचे अनुकरण करून त्यांना सन्मान दाखवीत असतात. साधारणपणे खेळात नैपुण्य मिळवणारे आणि मनोरंजनाच्या जगातील अभिनय करणाऱ्‍यांचे अनुकरण केले जाते. तथापि, ख्रिस्ती या नात्याने आम्ही यहोवा देवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करुन त्याचा सन्मान केला पाहिजे. आम्ही हे करावे याबद्दल प्रेषित पौलाने आम्हाला आर्जविले आहे. तो म्हणालाः “तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा . . . व प्रीतीने चाला.” (इफिसकर ५:१, २) होय, यहोवा देवाचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यामुळे आम्ही त्याचा सन्मान करीत असतो.

२१. (अ) यहोवास वैभव व सन्मान देण्यासाठी काय आम्हाला सिद्ध बनवू शकेल? (ब) यहोवाचा सन्मान करतात अशांना तो कोणते प्रतिफळ देतो?

२१ होय, देवाचे गौरव करण्याचे व त्याला सन्मान देण्याचे पुष्कळ मार्ग खरेच आहेत. आपण त्याच्या वचनाची अधिक भरवणूक केली आणि त्याच्याशी जितके अधिक परिचित बनू तितक्या अधिक प्रकाराने आपण त्याचा सन्मान करु हे कधी विसरु नये. असे केल्यामुळे कोणते प्रतिफळ मिळेल? यहोवा म्हणतो की, “जे माझा आदर करितात, त्यांचा मी आदर करीन.” (१ शमुवेल २:३०) यहोवा देव आपल्या भक्‍तांना सौख्यानंदातील सार्वकालिक जीवन बहाल करून त्यांचा आदर करील. ते जीवन एकतर स्वर्गातील असेल, जेथे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर सहशासनकर्ते म्हणून राहता येईल किंवा पृथ्वीवरील नंदनवनात ते जीवन मिळेल.

तुम्हाला आठवते का?

▫ लोक सहसा कोणाचा सन्मान करतात, पण कोणाकडे त्यांचे बहुधा दुर्लक्ष होते?

▫ कोणाचा सन्मान करणे याचा अर्थ काय, आणि हे कोणकोणत्या प्रकाराने करता येते?

▫ यहोवा देव सन्मानास पात्र आहे याची मूलभूत कारणे कोणती आहेत?

▫ यहोवाचा सन्मान आम्ही कोणत्या मार्गांनी करू शकतो?

▫ जे यहोवाचा सन्मान करतात अशांना तो कोणते प्रतिफळ देतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा