देवाने दिलेल्या शक्तीवर विसंबून राहा
तीमथ्याच्या दुसऱ्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये
परिक्षा व छळात टिकून राहण्यासाठी यहोवा आपल्या सेवकांना सामर्थ्य देतो. तीमथ्य तसेच इतर ख्रिस्ती जनांना ही देवाकडील शक्ती किती जरुरीची होती! रोमला इ. स. ६४ मध्ये आग लागली, आणि ती निरो सम्राटाने लावली अशी अफवा पसरली. पण आपणावर तो आळ येऊ नये यासाठी निरोने तो दोष ख्रिश्चनांवर घातला व यामुळेच सर्वत्र छळाची लाट पसरली. याच वेळेला (सुमारे इ.स. ६५) पौलाला पुन्हा रोममध्ये कैदेत टाकण्यात आले. आता मृत्यु सामोरा असताना त्याने तीमथ्याला हे दुसरे पत्र लिहिले.
पौलाच्या पत्राने तीमथ्याला धर्मत्याग्यांचा प्रतिकार करून छळामध्ये टिकून राहण्याची तयारी करून दिली. या पत्राने त्याला आध्यात्मिक प्रगती करीत राहण्याचे उत्तेजन दिले. या पत्राने त्याला पौलाच्या तुरुंगवासातील स्थिती प्रकटविली. हे पत्र वाचकांना देवाने दिलेल्या शक्तीवर विसंबून राहण्यास मदत देते.
दुःख सहन करून सौम्यपणे शिक्षण देणे
सुवार्तेचे घोषक म्हणून छळ सहन करीत राहण्यासाठी देव शक्ती प्रदान करतो. (१:१-१८) पौलाने आपल्या प्रार्थनेत तीमथ्याचा कधी विसर पडू दिला नाही. शिवाय त्याचा निष्कपट विश्वास देखील पौलाच्या चांगल्या लक्षात होता. देवाने तीमथ्याला ‘भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्य, प्रेम व संयमनाचा आत्मा दिला’ होता. यासाठी त्याने कशाचीही लाज वाटू न देता सुवार्तेविषयी साक्ष द्यावी व दुःख सहन करावे. त्याला पौलापासून ऐकून घेतलेला “सुवचनांचा नमुना” राखण्यासाठी आर्जविण्यात आले. आपणही, खऱ्या ख्रिस्ती शिक्षणापासून इतर दूर जात असले तरी त्यास बळकट धरून राहावे.
पौलाने शिकविलेल्या गोष्टी तीमथ्याने विश्वासू माणसांना सोपवून द्यावयाच्या होत्या, म्हणजे हे इतरांना त्या शिकवू शकतील. (२:१-२६) तीमथ्याला ख्रिस्ताचा चांगला शिपाई होण्याचे, दुःख सहन करीत असता विश्वास राखण्याचे सांगण्यात आले. पौलाने सुवार्तेच्या प्रचाराखातर स्वतः कैदवास सोसला होता. त्याने तीमथ्याला, देवास पटलेला कामकरी होण्यासाठी होता होईल तितके करावे याविषयीचे उत्तेजन दिले. त्याने पवित्र गोष्टी विटाळविणाऱ्या वटवटीपासून दूर राहायचे होते. तसेच प्रभुच्या दासाने इतरांना सौम्यपणाने शिक्षण द्यावे हेही त्याला सांगण्यात आले.
वचनाची घोषणा करा!
शेवटल्या काळाचा सामना करण्यासाठी तसेच शास्त्रवचनीय सत्याला दृढ धरून राहण्यासाठी देवाकडील शक्तीची गरज असणार. (३:१-१७) अभक्त लोकातून अशी माणसे पुढे येणार होती जी ‘सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी पोहंचू शकणार नव्हती.’ अशी ‘दुष्ट व भोंदू माणसे दुसऱ्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावणार होती.’ पण तीमथ्याने ‘शिकलेल्या गोष्टींना दृढ धरून ठेवायचे होते.’ आम्हीही हेच केले पाहिजे, कारण ‘सर्व शास्त्रवचने ही ईश्वरप्रेरित असून ती सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक नीतीशिक्षण ह्याकरता उपयुक्त आहेत व त्यापासून देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार होतो’ हे आपल्याला ठाऊक आहे.
तीमथ्याने धर्मत्याग्यांचा प्रतिकार करून आपले उपाध्यपण पूर्ण करायचे होते. (४:१-२२) हे तो ‘वचनाची घोषणा करून’ व त्याला दृढ धरून राहून करू शकणार होता. हे जरुरीचे होते कारण काही खोटे शिक्षण देत असल्यामुळे मंडळीसाठी ती ‘अवेळ’ होती. यहोवाचे साक्षीदार आज देवाच्या वचनास जडून आहेत, ते तातडीने त्याचा प्रचार मंडळीत व मंडळीबाहेर तसेच कृपेचा काळ नसताही करतात. पौलाचे काहींनी ऐकले नाही तरी त्याने ‘आपला विश्वास राखला’ होता. तथापि, ‘प्रभूने त्याला सामर्थ्य दिले की ज्याद्वारे त्याच्याकडून घोषणा पूर्ण होऊ शकेल.’ आपणही देवाकडील शक्तीवर विसंबून राहू या आणि सुवार्तेचा प्रचार करू या.
[२८ पानावरील चौकट/चित्रं]
चांगला शिपाईः पौलाने तीमथ्याला आर्जविलेः “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने . . . दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले आहे त्याला त्याने संतुष्ट करावे.” (२ तीमथ्य २:३, ४) पायदळी चालणारा रोमी शिपाई आपणासोबत वजनदार शस्त्रे, कुऱ्हाड, टोपली, तीन दिवसासाठी अन्नपाणी व इतर गोष्टी वागवून त्रासून जात असे. (योसेफस यांचे वॉर्स ऑफ द ज्यूस् पुस्तक ३, अध्याय ५) हा शिपाई व्यापारी गोष्टीत पडत नव्हता, कारण यामुळे त्याला आपल्या वरिष्ठांना संतुष्ट करता येत नव्हते व त्याचा खर्च भागला जाऊ शकत नव्हता. याचप्रमाणे, जो ख्रिस्ती परिक्षा सहन करतो त्याची तुलना “ख्रिस्ताचा चांगला शिपाई” याजबरोबर करण्यात आली आहे. शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्याला प्रापंचिकरित्या काम करावे लागत असले तरी त्याने भौतिक गोष्टीत अनावश्यक ती लुडबुड न करता आपले आध्यात्मिक युद्ध थांबविता कामा नये. (१ थेस्सलनीकाकर २:९) घरोघरचे साक्षीकार्य करीत असता तो “आत्म्याची तरवार, देवाचे वचन” याला वापरतो आणि लोकांची धार्मिक चुकांपासून सुटका करतो. (इफिसकर ६:११-१७; योहान ८:३१, ३२) जीवन हे पणाला लागले असल्यामुळे सर्व ख्रिस्ती शिपायांनी येशू ख्रिस्त व यहोवा देव यांना या पद्धतीने संतुष्ट करीत राहावे.