यहोवाच्या दिवसासाठी तयार राहा!
थेस्सलनीकाकरांच्या पहिल्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये
यहोवाचा दिवस! थेस्सलनीकातील ख्रिश्चनांना वाटले की तो जवळ येऊन ठेपला आहे. ते बरोबर होते का? तो केव्हा येणार होता? पौलाने थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये हा एक महत्त्वाचा विषय होता. हे पत्र करिंथमधून आमच्या समान शकाच्या ५० व्या वर्षी लिहिण्यात आले.
पौल व सीला यांनी थेस्सलनीका येथील मंडळीची प्रस्थापना केली होती. थेस्सलनीका हे मासेदोनिया या रोमी प्रांताच्या शासकीय कारभाराचे शहर होते. (प्रे. कृत्ये १७:१-४) नंतर, पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात त्याने प्रथम प्रशंसा केली, बोध दिला व यहोवाच्या दिवसासंबंधाने चर्चा केली. आता यहोवाचा दिवस इतक्या जवळ येऊन ठेपला असल्यामुळे आम्हालाही या पत्रातून लाभ मिळवता येईल.
प्रशंसा व उत्तेजन
पौलाने पहिल्यांदा थेस्सलनीकाकरांची प्रशंसा केली. (१:१-१०) त्यांच्या विश्वासू कामासंबंधाने व धीराविषयी ते प्रशंसापात्र होते. त्यांनी “फार सकंटात असताना पवित्र आत्म्याच्या योगे आनंदाने वचन” स्वीकारले होते हे स्तुतीपात्र होते. पौलाने जशी प्रशंसा केली तशी तुम्ही इतरांची करता का?
प्रेषिताने आपले सुंदर उदाहरण त्यांच्यापुढे ठेवले होते. (२:१-१२) फिलिप्पै येथे त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली तरी थेस्सलनीकाकरांना ‘सुवार्ता सांगण्याचे धैर्य त्याने देवाकडून मिळविले होते.’ त्याने खुशामत, धूर्तपणा तसेच गौरव मिळविणे या गोष्टी टाळल्या. पौल त्यांना भार झाला नाही, तर आई आपल्या बालकाचे ज्या पद्धतीने संगोपन करते तसेच तो त्यांच्याशी सौम्यपणे वागला. हे आज वडीलांसाठी केवढे चांगले उदाहरण आहे!
यानंतर पौलाच्या पुढील शब्दांनी थेस्सलनीकाकरांना छळामध्ये दृढ राहण्याचे उत्तेजन दिले. (२:१३–३:१३) त्यांनी आपल्या शहरवासियांकडून मिळालेला छळ सहन केला होता आणि तीमथ्याने पौलाला त्यांच्या आध्यात्मिक स्थितीविषयी उत्तम वार्ता कळविली होती. प्रेषिताने हे प्रार्थिले की, त्यांचे प्रेम उत्तरोतर वाढावे व त्यांची अंतःकरणे दृढ व्हावी. आज, याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार आपल्या समविश्वासूंसाठी प्रार्थना करतात, शक्य आहे तर त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या विश्वासूपणाविषयीचा अहवाल ऐकून आनंदी होतात.
आध्यात्मिक रितीने जागृत असा!
यानंतर थेस्सलनीकाकरांना सल्ला मिळतो. (४:१-१८) त्यांनी देवास संतुष्ट करणाऱ्या मार्गाने अधिक पूर्णतेने मार्गाक्रमण करायचे होते, अधिक बंधुप्रीती व्यक्त करायची होती आणि आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्या हातांनी काम करीत राहायचे होते. याखेरीज, त्यांनी एकमेकांना या आशेने सांत्वन द्यावयाचे होते की, येशूच्या आगमनसमयी आत्म्याने अभिषिक्त असणारे जे आधी वारले होते ते पहिले उठविले जाणार व त्याला जाऊन मिळणार. मग, मागे उरलेले अभिषिक्त जन आपले मरण व पुनरुत्थान झाल्यावर ख्रिस्ताला तसेच ज्यांचे आधीच पुनरुत्थान घडले त्यांना जाऊन मिळणार होते.
यानंतर पौलाने यहोवाच्या दिवसाची चर्चा केली आणि आणखी सूचना दिल्या. (५:१-२८) यहोवाचा दिवस चोरासारखा येणार होता, तो “शांती आहे, निर्भय आहे” अशी ओरड झाल्यावर येऊन त्वरेने नाश आणणार होता. यासाठीच थेस्सलनीकाकरांनी आध्यात्मिक रितीने जागे राहून स्वतःला विश्वासाची ढाल व प्रेम यांनी सज्ज करून तसेच तारणाचे शिरस्त्राण घालून सिद्ध ठेवायचे होते. मंडळीत जे नेतृत्व करतात अशांसाठी त्यांनी खोल आदर दाखवावयाचा होता व दुष्टतेपासून दूर राहायचे होते. हेच आपण केले पाहिजे.
पौलाने थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्राने आम्हाला, आमच्या समविश्वासू बांधवांना प्रशंसा व प्रोत्साहन देण्याची चालना दिली पाहिजे. तसेच आम्ही आमची वागणूक व प्रवृत्ती यामध्ये उदाहरणशील असण्यास त्याने प्रवृत्त केले पाहिजे. शिवाय त्यातील सूचनांनी आम्हाला यहोवाच्या दिवसाच्या तयारीसाठी सिद्ध केले पाहिजे.
[३१ पानावरील चौकट/चित्र]
उरस्त्राण व शिरस्त्राणः आध्यात्मिक जागृततेविषयी आर्जविताना पौलाने म्हटलेः “आपण सावध असावे व विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.” (१ थेस्सलनीकाकरांस ५:८) उरस्त्राण हे योद्ध्याच्या उराचे संरक्षण करणारे साधन होते; त्याला चिलखत, साखळ्या, किंवा जाड धातू असे. याचप्रमाणे विश्वासाचे उरस्त्राण आम्हाला आध्यात्मिकरित्या संरक्षण देते. पण प्राचीन काळच्या शिरस्त्राणाविषयी काय? ते धातूचे बनविलेले असे व लष्करी टोपासारखे असे व ते युद्धात डोक्याला संरक्षण देण्यासाठी वापरीत असत. जसे शिरस्त्राण डोक्याचे संरक्षण करी तसेच तारणाची आशा विचारशक्तीचे संरक्षण करते व ती ख्रिश्चनाला सचोटी राखण्यात मदत देते. अशी ही आध्यात्मिक शस्त्रसामग्री यहोवाच्या लोकांनी धारण करावी हे किती अगत्याचे आहे!—इफिसकर ६:११-१७.