तो दिवस जवळ येत असता एकमेकांना उत्तेजन देत राहा
“एकमेकांस उत्तेजन द्या; आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता, म्हणून विशेषेकरुन करा.”—इब्रीयांस १०:२५.
१, २. कोणता दिवस जवळ येत आहे, आणि यहोवाच्या लोकांची प्रवृत्ती कशी असावी?
‘या आणि जीवनाचे पाणी घ्या,’ हे निमंत्रण देण्यात सहभागी होणारे आपणाला एकाकी ठेवीत नाहीत. यहोवाच्या विजयाचा तो मोठा दिवस जवळ येत असता ते या पवित्र शास्त्रीय सूचनेचा अवलंब करतातः “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकांस उत्तेजन द्या; आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता, म्हणून विशेषेकरुन करा.”—इब्रीयांस १०:२४, २५.
२ त्या ‘दिवसा’विषयी शास्त्रवचने असे भाकित करतात की तो “यहोवाचा दिवस” आहे. (२ पेत्र ३:१०) यहोवा हा सर्वसमर्थ व सर्वशक्तीमान देव असल्यामुळे त्याच्या दिवसापुढे इतर कोणताही दिवस फिका पडणार. (प्रे. कृत्ये २:२०) त्या दिवसाचा अर्थ, सबंध विश्वात देव या नात्याने त्याचेच सार्वभौमत्व आहे हे समर्थन सर्वत्र होईल. हा अतुलनीय व महत्त्वपूर्ण दिवस आता जवळ येत आहे.
३. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांसाठी यहोवाचा दिवस कोणत्या अर्थाने जवळ येत होता, पण आज आम्हाबाबतीत काय?
३ प्रेषित पौलाने आमच्या समान शकातील पहिल्या शतकाच्या ख्रिस्ती लोकांना यहोवाचा दिवस जवळ येत असल्याचे म्हटले होते. त्या दिवसाच्या येण्याकडे ते डोळे लावून होते, पण त्यावेळी तो १,९०० वर्षे लांब होता. (२ थेस्सलनीकाककर २:१-३) तरीपण, तो दिवस निश्चित येणार होता म्हणून त्यांना उत्तेजन देण्याची जरुरी होती; आणि ख्रिश्चनांनी आपला विश्वास राखला तर ते त्या आशीर्वादित दिवसात प्रवेश मिळवणार होते. (२ तीमथ्य ४:८) मागे त्या काळी तो दिवस जवळ येत असल्याचे दिसत होते. आज आमच्या बाबतीत बघता, यहोवाचा दिवस निश्चितपणे जवळ येत आहे. पवित्र शास्त्रातील भविष्यवादांची होणारी अद्भुत पूर्णता आनंदास प्रेरित करणाऱ्या या विधानाच्या सत्यतेला पुष्टी देते. लवकरच आमचा देव यहोवा याचे नाम सदासर्वकाळासाठी पवित्र होणार.—लूक ११:२.
ईश्वरी नामाकरवी उत्तेजीत
४. प्रकटीकरण १९:६ च्या मते कोण राजा होणार होता, व त्याचे नाम कसे लपविले गेले?
४ ईश्वरी नाम हे सबंध मानवी कुटुंबाला आस्थेचे वाटावयास हवे. टुडेज् इंग्लिश व्हर्शन असे म्हणतेः “देवाची स्तुती करा! कारण प्रभु, आमचा सर्वसमर्थ देव राजा झाला आहे!” (प्रकटीकरण १९:६) व्टेंटियथ् सेंचुरी बायबल भाषांतराच्या मते तो प्रभु, सर्वसत्ताधारी देव आहे. हे भाषांतर तसेच इतर अनेक भाषांतरे, ज्याने राज्य करण्यास आरंभ केला आहे त्या ईश्वरी नामाचा उल्लेख देत नाहीत. तथापि, ते ईश्वरी नाम “हालेलूया!” (“याहची स्तुती असो” किंवा “यहोवाची स्तुती गा”) या घोषणेत अंतर्गत आहे व ते रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हर्शन, न्यू इंटरनॅशनल व्हर्शन, आणि मोफॅट यांचे भाषांतर यामध्ये प्रकटीकरण १९:६ मध्ये दिसते. आमच्या समान शकामध्ये हे ईश्वरी नाम बहुधा पवित्र शास्त्र भाषांतरामध्ये लपविले गेले आहे. तथापि, आपण पाहणारच आहोत त्याप्रमाणे ते ईश्वरी नाम देवाच्या प्राचीन व आजच्या लोकांसाठी खास प्रेरणादायक ठरले व ठरत आहे.
५, ६. (अ) ज्याचे प्रतिनिधित्व करीत आहोत त्या देवाचे नाव मोशाने जाणून घेण्याची का गरज होती? (ब) मोशेने या ईश्वरी नामाचा इस्राएलांपुढे भर दिला तेव्हा काय परिणाम झाला असावा?
५ आम्हाला आठवत असेल की, सर्वसमर्थ देवाने मोशाला मिसरमध्ये गुलाम असणाऱ्या इस्राएल लोकांकडे पाठविले. तेव्हा मोशे ज्यांच्याकडे गेला त्या लोकांच्या मनात, याला कोणी आपल्याकडे पाठविले हा प्रश्न उभा राहिला होता. त्रास सहन करणाऱ्या यहुद्यांनी देखील, आपण ज्याचे प्रतिनिधी आहोत त्या देवाचे नाव जाणावे अशी मोशाने अपेक्षा धरली होती. याविषयी आम्ही निर्गम ३:१५ मध्ये असे वाचतोः “आणखी देवाने मोशाला सांगितले की, ‘तू इस्राएल लोकांना सांगः “तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव यहोवा याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.”’ हेच माझे सनातन नाम आहे व याच नामाने पिढ्यान्पिढ्या माझे स्मरण होईल.”
६ ही माहिती इस्राएलांना जोर देऊन सांगण्यात आली तेव्हा त्यांना बरेच उत्तेजन आल्यासारखे वाटले असेल. त्यांची मुक्तता होणार होती व याची ग्वाही एकच खरा देव, यहोवा याने दिली होती. तसेच या देवाशी परिचित होण्याची संभाव्यता देखील किती उत्तेजनकारक होती, जो उद्दामपणे स्वतःला एकाकी न ठेवता आपल्या व्यक्तीगत नावाचा अर्थ प्रदर्शित करून दाखवणार होता!—निर्गम ३:१३; ४:२९-३१.
७. (अ) येशूचे शिष्य ईश्वरी नामाशी परिचित होते हे आपल्याला कसे समजते? (ब) देवाचे नाम कसे मागे लोटण्यात आले?
७ प्रभु येशू ख्रिस्ताचे शिष्य देखील हे ईश्वरी नाम यहोवा व ते ज्यासंबंधाने आहे त्याविषयी जाणून घेऊन उत्तेजीत झाले. (योहान १७:६, २६) येशूने आपल्या उपाध्यपणात ते ईश्वरी नाम निश्चितच मागे लोटून दिले नसावे; शिवाय आपले येशू हे नाव सामोरे आणावे असाही त्याचा उद्देश नव्हता. पण जेव्हा भाकित केलेला धर्मत्याग सामोरा आला तेव्हा मात्र ते ईश्वरी नाम मागे लोटले गेले व ते एकंदरीत ख्रिस्ती संभाषणातून नाहीसेच झाले. (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) उलटपक्षी, देवाच्या पुत्राला नामाला अधिक महत्त्व देण्यात येऊ लागले व पित्याच्या नामावर पडछाया आणली गेली तेव्हापासून तथाकथित ख्रिश्चनांना पित्याची भक्ती अधिकाधिक व्यक्तीरहित, कौटुंबिक जवळीकीची न वाटणारी बनली व त्यामुळे उत्साह लोपला.
८. यहोवाचे साक्षीदार हे नाव लावून घेतल्यामुळे देवाच्या लोकांवर कोणता नित्याचा प्रभाव होत राहिला?
८ या कारणामुळेच, वॉचटावर संस्थेशी संलग्न असणाऱ्या आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी १९३१ मध्ये जेव्हा स्वतःला यहोवाचे साक्षीदार हे नाव लावून घेतले तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय होता. त्यात केवळ आनंदच नव्हता तर उत्तेजन देखील होते. या कारणामुळे, नवे नाव धारण केलेले पवित्र शास्त्र विद्यार्थी एकमेकांना उत्तेजन देऊन बोध करू शकत होते.—पडताळा यशया ४३:१२.
९. ज्याचे आपण साक्षीदार आहोत त्या देवाविषयी खऱ्या ख्रिश्चनांना कसे वाटते?
९ या कारणास्तव, आज खऱ्या ख्रिश्चनांना, आपण ज्याचे साक्षीदार आहोत असे पूर्वी कळवण्यात आले होते त्या देवाची ओळख बाळगणे योग्य वाटते. हेच त्यांचा गुरु येशू ख्रिस्त याने पृथ्वीवर असताना केले होते. (प्रकटीकरण १:१, २) होय, तो यहोवा आहे अशी ते त्याच्याविषयीची ओळख देतात.—स्तोत्रसंहिता ८३:१८.
आनंद व पवित्र आत्म्याने भरलेले
१०-१२. (अ) क्रियाशील शक्तीचा येशूच्या अनुयायांवर कसा परिणाम होणार होता? (ब) आनंदाने प्रेरित झालेल्या साक्षीदारांनी एकमेकांना कसे वागविण्याची इच्छा धरावी?
१० येशू ख्रिस्ताने निरोप घेण्याआधी आपल्या प्रेषितांना हे म्हटलेः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदीत तुम्हाबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.
११ हे लक्षात घ्या की, नव्यानेच शिकविण्यात आलेल्या ख्रिश्चनांचा पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा करायचा होता. हा पवित्र आत्मा कोणी व्यक्ती नाही तर ती यहोवा देवाची क्रियाशील शक्ती आहे. तिचा तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे वापर करतो. पेंटेकॉस्टच्या वेळी यहोवा देवाने येशूच्या द्वारे ही क्रियाशील शक्ती येशू ख्रिस्ताच्या समर्पित अनुयायांवर ओतली. (प्रे. कृत्ये २:३३) ते या पवित्र आत्म्याने भरले गेले आणि पवित्र आत्म्याचे एक फळ, आनंद हा गुण आहे. (गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ५:१८-२०) आनंद उत्तेजकजा देतो. शिष्य पवित्र आत्म्याच्या आनंदाने भारावून जाणार होते. प्रेषित पौलाने प्रार्थनेचे केलेले हे शब्दांकन अगदी उचित आहेः “आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशाकरिता की, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.”—रोमकर १५:१३.
१२ आनंदाची प्रेरणा देणाऱ्या या आत्म्याने भारावून आज “मोठा लोकसमुदाया” समवेत सर्व यहोवाचे साक्षीदार सध्याच्या कठोर व्यवस्थीकरणात वास्तव्यास असता एकमेकांना बोध करण्यास पुढे येतील. याच कारणामुळे, प्रेषित पौलाने ‘उभयतांविषयीच्या उत्तेजना’बद्दल लिहिले.—प्रकटीकरण ७:९, १०; रोमकर १:१२; १४:१७.
उत्तेजीत होण्याचे प्रत्येक कारण
१३. आम्हाला उत्तेजीत असण्याचे तसेच इतरांना उत्तेजन देण्याची कोणती कारणे आहेत?
१३ ज्या व्यवस्थीकरणात नीतीमान गोष्टीचा विरोध करणारा विरोधक स्वतःच अधिपती व शिवाय देव आहे त्यामध्ये राहात असताना ख्रिस्तीजनांनी एकमेकांना जगभरातील ख्रिस्ती मंडळ्यातून उत्तेजन दिले पाहिजे; या मंडळ्यात यहोवा देवाचा पवित्र आत्मा वास्तव्य करतो. (इब्रीयांस १०:२४, २५; प्रे. कृत्ये २०:२८) आम्हाला उत्तेजीत राहण्याचे प्रत्येक कारण आहे. होय, आम्हाला यहोवा देव, त्याचा पुत्र तसेच ते वापरीत असलेली क्रियाशील शक्ती म्हणजेच पवित्र आत्मा याविषयी अचूक ज्ञान असल्यामुळे आम्ही केवढे कृतज्ञ आहोत! ते आम्हास जी आशा देतात त्याविषयीही आम्हाला केवढे कृतज्ञ वाटते! या कारणास्तव आमची भक्ती ही आनंदाने भरलेली आहे. प्रेषित पौलाने ज्यांना पत्र लिहिले त्यांना त्याने म्हटले की, त्यांनी एकमेकांस उत्तेजन द्यावे आणि एकमेकांची पवित्र विश्वासात उभारणी करावी. हे त्यांनी ‘तो लाक्षणिक दिवस जवळ येत आहे हे पाहून अधिकपणे करायचे’ होते. जेव्हा या पृथ्वीतील राजकारणी सत्ता नामधारी ख्रिस्ती राज्यास तसेच इतर सर्व खोट्या धर्मास काढून टाकतील तेव्हा आम्ही एकमेकांना आणखी जादा उत्तेजन देत राहावे ही त्या वेळेची गरज असणार.
१४. कोणी एकमेकांना उत्तेजन द्यावे, व कसे?
१४ वडीलजन आपापल्या मंडळ्यातील कळपाला उत्तेजन देण्यात पुढाकार घेत असले तरी इब्रीयांस पत्र १०:२५ मध्ये दाखविल्यानुसार सर्व खिश्चनांनी एकमेकांना उत्तेजन दिले पाहिजे. तुम्ही मंडळीचे सदस्य आहात तर तुम्ही उत्तेजन देता का? तुम्हाला वाटेल, ‘मी कसे काय देणार? मी काय करू शकतो?’ पहिली गोष्ट ही की, तुम्ही सभांना हजर राहता व ख्रिस्ती व्यवस्थेला पाठबळ देता तेव्हा इतर सर्व बंधू-भगिनींना उत्तेजन मिळत नाही का, तसेच इतर जेव्हा विश्वासूपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहात असल्याचे तुम्हाला दिसते तेव्हा तुम्हाला देखील ते उत्तेजन मिळत नाही का? याशिवाय, तुमच्या विश्वासू सहनशीलतेच्या उदाहरणामुळे देखील त्यांना उत्तेजन मिळते. जीवनाच्या समस्या, अडचणी असताही हार न खाता तुम्ही ख्रिस्ती मार्गाक्रमणात टिकून राहिल्यामुळे तुम्हाला इतरांपुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवता येईल.
दियाबलाकडून येणाऱ्या नैराश्याचा सामना करा
१५. दियाबल का “अतिशय संतप्त” आहे, व कोणाविरुद्ध?
१५ यहोवाचा दिवस समीप आहे हे केवळ आपल्यालाच ठाऊक नाही. दियाबल सैतानाला देखील ते माहीत आहे. प्रकटीकरण १२:१२ आम्हास सांगते की, पृथ्वीवर आता अनर्थ आहे, “कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” तसेच प्रकटीकरण १२:१७ असे सूचित करते की, त्याचा हा अतिशय संताप तो “देवाची आज्ञा पाळणारे व येशूविषयीची साक्ष देणारे” याजवर ओतीत आहे. यात प्रश्नच नाही की, आम्हास निराशीत करावे हीच दियाबलाची इच्छा आहे. शिवाय ते कसे घडवून आणावे याची त्याला माहिती आहे. तो आमचा अशक्तपणा, आमच्या समस्या जाणतो व त्यानुसार खेळी करतो.
१६. सैतान नैराश्याचा एक अस्त्र म्हणून का वापर करतो?
१६ हा सैतान नैराश्याचा एक अस्त्राप्रमाणे का वापर करतो? कारण त्यामुळे कार्यसिद्धी घडते. कोणा माणसाने उघड विरोध वा छळ सहन केला असेल पण तो नैराश्याला बळी पडू शकतो. यहोवा देवास टोमणे देत राहावे, आणि आपल्याला लोकांना देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करता येते हे दाखवून देण्याची सैतानाची इच्छा आहे. (नीतीसूत्रे २७:११; पडताळा ईयोब २:४, ५; प्रकटीकरण १२:१०.) तुम्हाला नैराश्य आणण्यात जर तो यशस्वी झाला तर त्याद्वारे तो तुम्हाला देवाच्या सेवेत मंद बनवू शकेल आणि ते कार्यही बंद पाडेल व मग तुम्ही राज्याची सुवार्ता प्रचार करण्याच्या बाबतीत अक्रियाक आहात असे दिसेल.—२ करिंथकर २:१०, ११; इफिसकर ६:११; १ पेत्र ५:८.
१७. नैराश्याचे नकारार्थी परिणाम मोशेच्या काळी कसे दिसले?
१७ नैराश्याद्वारे जे घातक परिणाम होत असतात ते आपल्याला प्राचीन मिसरातील इस्राएल लोकांमध्ये दिसू शकतील. मोशाने फारोसोबत बोलणी केल्यावर त्या जुलमी राजाने इस्राएल लोकांवरील आपला भार व जाच अधिकच वाढविला. देवाने मोशाला सांगितले की, त्याने इस्राएलांकडे जाऊन, तो त्यांची खरीच मुक्तता करणार, त्यांना स्वतःचे लोक बनविणार, बचावाचा मार्ग पुरविणार आणि त्यांना वचनयुक्त देश देणार याची खात्री त्यांना द्यावी. मोशाने जाऊन हे इस्राएल लोकांना सांगितले. पण निर्गम ६:९ कळविते की, “ते आपल्या मनाच्या संतापामुळे [नैराश्यामुळे] आणि बिकट दास्यामुळे मोशाचे ऐकेनात.” यामुळे मोशेसुद्धा निराश झाला व त्याला फारोकडे परत जावेसे वाटले नाही. पण यहोवाने मोशाची खात्री पटविली व त्याला उत्तेजन दिले.—निर्गम ६:१०-१३.
१८. दियाबलाने आणलेल्या नैराश्यासंबंधाने देवाच्या लोकांनी प्रतिकार करण्याची इतकी गरज का आहे?
१८ देवाच्या सेवकांवर नैराश्य ओढवून आणल्यास त्याचे कसे नकारार्थी परिणाम घडतात ते दियाबल सैतानाला चांगले ठाऊक आहे. नीतीसूत्रे २४:१० म्हणतेः “संकटकाळी तुझे धैर्य खचले, तर तुझी शक्ती अल्प होईल.” आम्ही अंतसमयाच्या अगदी शेवटाला जगत असल्यामुळे आध्यात्मिकरित्या सबळ व बळकट राहिले पाहिजे. आम्हाला आमची अपूर्णता, अशक्तपणा आणि चुका यांचा सतत सामना द्यावा लागला आहे हे दुःखाचे आहे; पण आता सैतान या उणीवांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करीत असल्यामुळे आम्हाला मदतीची गरज आहे.
ख्रिस्ताच्या यज्ञार्पणावर पूर्णपणे विसंबून राहा
१९. कशामुळे आपल्याला नैराश्याचा सामना करता येईल व का?
१९ यासाठी जी मदत आम्हाला उपलब्ध आहे ती आहे, यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे शक्य केलेली खंडणीची तरतुद. या खंडणीवर पूर्ण विसंबून राहून आपल्याला जय मिळवता येऊ शकतो. या तरतुदीचे मोल कमी लेखण्यात धोका आहे. आम्ही अपूर्ण आहोत तोपर्यंत आम्हाकडून चुका, पापे घडणार. पण यामुळे निराश होऊन, आता काही उपयोग नाही असे समजून मागे पडण्याची जरुरी नाही. कारण अशामुळे आपण सैतानाच्या हाती सहजपणे पडतो. आपल्या पापाविषयी पूर्णपणे यज्ञार्पण देण्यात आले आहे हे आपल्याला माहीत आहे. ही खंडणी आमची पापे नाहीशी करू शकते. आम्ही “मोठा लोकसमुदाय” वर्गाचे सदस्य आहोत तर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे व आपली वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र होतात हे मानले पाहिजे.—प्रकटीकरण ७:९, १४.
२०. नैराश्य आणविणाऱ्या सैतानावर कसा विजय मिळवता येऊ शकतो हे प्रकटीकरण १२:११ कसे सूचित करते?
२० प्रकटीकरण १२:१० मध्ये सैतानाविषयी म्हटले आहे की, तो “आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा” असा आहे. आपल्याला या नैराश्य आणणाऱ्या दुष्टावर व प्रचंड राक्षसावर कसा विजय मिळवता येईल बरे? त्या अध्यायातील ११ वे वचन याचे उत्तर देतेः “त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकिले, आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली होती तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.” अशाप्रकारे, यहोवाच्या लोकांनी खंडणी यज्ञार्पण, कोकऱ्याचे रक्त यावर आपला पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. साक्षीकार्यामुळे, देवाच्या राज्याची सुवार्ता तुम्हाला होता होईल तितक्या लोकांना सांगत राहून व त्यात नियमितपणे सहभागी होऊन मिळणारे उत्तेजन दृढ ठेवा.
२१. बांधवांना नैराश्य देण्याच्या दियाबलाच्या कामात आपण कसे नकळतपणे सहभागी होऊ शकतो?
२१ दियाबलाकरवी बंधूंना नैराश्य आणण्याच्या कामी कधी कधी आपण नकळतपणे साहाय्य देण्याची शक्यता आहे. ती कशी? स्वतः फारच टीकात्मक होऊन, खूप गोष्टीची मागणी करून किंवा फाजील धार्मिक होऊन. (उपदेशक ७:१६) आम्हा सर्वांपाशी उणेपणा व अशक्तपणा आहे. तेव्हा याविषयी आपण दियाबलासारखी खेळी करू नये. याउलट, आमचे बांधव तसेच एक संघटित गट या नात्याने आम्ही यहोवाच्या लोकांबद्दल नेहमी उत्तेजनपर बोलावे. आम्ही एकमेकांना अंतःकरणाला स्फूर्ति द्यावी व यासाठी एकमेकांना अंतःकरणी दुःखी बनवू नये.
दिवस जवळ येत असता अधिक उत्तेजन देणे
२२, २३. (अ) उत्तेजनाचा स्रोत बनण्याचे आम्ही केवळ वडीलांवर का सोडू नये? (ब) ख्रिस्ती मंडळीतील देखरेख्यांना कसे उत्तेजन मिळू शकेल?
२२ तो दिवस जवळ येत असता आपण एकमेकांना उत्तेजन देत राहण्याचा ठाम निर्धार करावा. आपले विश्वसनीय उदाहरण तसेच सांत्वनपर बोल याकरवी इतरांना उत्तेजन पुरवा. याबाबतीत यहोवा देव व प्रभु येशू ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरा. उत्तेजनाचा स्रोत बनण्याचे केवळ मंडळीच्या वडीलांवर टाकू नका. खरे म्हणजे, वडीलांनाही उत्तेजनाची गरज असते. त्यांनाही कळपातील इतरांप्रमाणेच अशक्तपणा व दुर्बळता आहेत. तसेच त्यांनाही आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, या ऱ्हास होत चाललेल्या जगात पूर्ण करीत असता त्याच समस्यांचा सामना करावा लागतो. यासोबत आणखी हे की, पौलाने वर्णिल्यानुसार त्यांना मंडळ्यांची चिंता वाटत असते. (२ करिंथकर ११:२८, २९) त्यांचे काम कठीण स्वरुपाचे आहे त्यामुळे त्यांना उत्तेजनाची गरज भासते.
२३ ख्रिस्ती मंडळीत जे देखरेखीच्या जबाबदार पदी आहेत अशांना सहकार्य देऊन तुम्ही त्यांना मोठे उत्तेजन देऊ शकता. तेव्हा तुम्ही इब्रीयांस पत्र १३:१७ मध्ये दिलेल्या सूचनेचा करणारे असालः “तुम्हामध्ये जे नेतृत्व करतात त्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”
२४. या नैराश्याच्या काळी आम्ही काय करण्यास हवे व का?
२४ आम्ही नैराश्याच्या काळात जगत आहोत. येशूने म्हटले त्याप्रमाणे, जगाची अवस्था पाहून लोकांची अंतःकरणे भारावली व भीतीने ग्रस्त झाली आहेत. (लूक २१:२५, २६) निराश व दुःखी करणाऱ्या समस्या वाढत असता “एकमेकांस उत्तेजन द्या व तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता तेव्हा विशेषेकरून करा.” प्रेषित पौलाने १ थेस्सलनीकाकर ५:११ मध्ये जी उत्तम सूचना दिलेली आहे ती अनुसराः “तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करीतच आहा.”
तुम्ही कसे उत्तर देणार?
◻ ख्रिस्तीजनांनी एकमेकांना का उत्तेजन द्यावे व पूर्वीपेक्षा अधिक का द्यावे?
◻ ईश्वरी नामाविषयीच्या ज्ञानामुळे यहोवाच्या लोकांना कसे उत्तेजन मिळाले?
◻ आम्हाला एकमेकांना व्यक्तीगतपणे कसे उत्तेजन पुरवता येईल?
◻ आमच्या बांधवांना निराश करण्यामध्ये दियाबलाच्या कामात आम्ही का हातभार लावू नये?
[१७ पानांवरील चित्रं]
मंडळीतील आपल्या कळपाला उत्तेजन देण्यासाठी वडील पुढाकार घेत असतात