“ऐकणाराही म्हणोः ‘ये!’”
या सबंध वर्षभरात यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा अधिक देशात त्यांच्या १९९१ च्या वार्षिक वचनानुरुप जागतिकपणे स्वतःला कामी लावतील कीः “ऐकणाराही म्हणो, ‘ये!’”
“आत्मा व वधू ही म्हणत राहतातः ‘ये!’ ऐकणाराही म्हणोः ‘ये!’ तान्हेला येवो; आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.”—प्रकटीकरण २२:१७.
१. कोणत्या ‘पाण्या’कडे ‘ये’ण्याचे आपल्याला निमंत्रण आहे?
“या!” हे निमंत्रण आपल्याला दिले जात आहे. पण कशाला? पाण्याने आपली तहान भागविण्यासाठी. हे काही नेहमीचे पाणी नाही, तर ते असे पाणी आहे ज्याविषयी येशू ख्रिस्त त्याच्या काळी विहीरीपाशी एका शोमरोनी स्त्रीला बोलला होता. तो म्हणालाः “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याजमध्ये उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहान ४:१४) हे “पाणी” येशूला कोठून मिळाले?
२. या ‘पाण्याचा’ उगम कोठे दिसतो, व हे पाणी कोणत्या घटनेनंतर वाहण्याचे सुरु होणार?
२ या ‘पाण्या’चा उगम कोठून आहे ते दृष्टांतात पाहण्याचा प्रेषित योहानाला हक्क मिळाला. ते त्याने प्रकटीकरण २२:१ मध्ये नोंदून ठेवले आहेः “त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली . . . जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी दाखवली.” होय, या स्फटिकासारख्या नितळ तसेच जीवनप्रदायक पाण्याचा उगम हा जीवनदाता यहोवा देवाशिवाय इतर कोणीही नाही व हे पाणी तो कोकरा, येशू ख्रिस्त याजमार्फत उपलब्ध करून देतो. (पडताळा प्रकटीकरण २१:६.) त्या वचनात “देवाच्या व कोकऱ्याच्या राजासना”चा उल्लेख असल्यामुळे या जीवनदायी पाण्याचा प्रवाह वाहण्याची सुरवात १९१४ मध्ये मशीही राज्याची प्रस्थापना झाल्यावर, म्हणजेच प्रभूच्या दिवसाची सुरवात झाल्यावर होणार होती हे स्पष्ट आहे.—प्रकटीकरण १:१०.
३, ४. ते “पाणी” कशाचे प्रतिनिधित्व करते, व ते कोणासाठी उपलब्ध होत आहे?
३ हे जीवनाचे पाणी कशाविषयीचे सूचक आहे? ते परिपूर्ण मानवी जीवनाची, पूर्णत्वातील सार्वकालिक जीवनाची पुनर्स्थापना नंदनवनात बदलविण्यात आलेल्या पृथ्वीवर करण्यासाठी देवाकडील तरतुदीला चित्रित करते. हे जीवनाचे पाणी, जीवनाकरता येशू ख्रिस्ताद्वारे करण्यात आलेल्या सर्व तरतुदींचे प्रतिनिधित्व करते. हे पाणी आता सर्वतोपरि उपलब्ध आहे का? नाही, सर्वतोपरि नाही; कारण प्रथम, देवाने, सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण व त्याचा अदृश्य शासक दियाबल सैतान यांचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे. पण सध्याला, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचे श्रवण करून, तिचे पालन करून व आपले जीवन या सुवार्तेच्या अनुषंगाने रूपांतरित करून या ‘पाण्या’चा थोडा भाग आपल्याला मिळवता येऊ शकेल.—योहान ३:१६; रोमकर १२:२.
४ अशाप्रकारे ही ‘जीवनाची नदी’ योहानाला दाखविल्यानंतर, हा दृष्टांत आपल्या देवदूताकरवी त्याच्याकडे पाठविण्याचा उद्देश कोणता होता हे येशूने त्याला बोलून दाखविले. योहानाला अशी घोषणा ऐकायला मिळालीः “आत्मा व वधू ही म्हणत राहतातः ‘ये!’ ऐकणाराही म्हणोः ‘ये!’ तान्हेला येवो; आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) यास्तव, पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीस्तव देवाने कोकऱ्याद्वारे ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या घेण्यासाठी तहानलेल्या सर्वांना देवाचे सेवक निमंत्रण देत आहेत.—योहान १:२९.
जीवनाच्या पाण्याची गरज उद्भवते
५. या ईश्वरी तरतुदीची गरज मानवजातीस कशी भासली?
५ हे खरोखरीच खेदाचे आहे की, मानवी कुटुंबाच्या पहिल्या पालकांनी जीवनाचे मार्गाक्रमण धरले नाही, जे त्यांच्या संततीसाठी नंदनवन गृहात परिपूर्ण मानवी जीवनाचा सदासर्वदा उपभोग घेण्यासाठी संधी देऊ शकले असते. आदामाने आपल्या निर्मात्याची आज्ञाधारकपणे सेवा करण्याची बुद्धीपूर्वक निवड करण्यावर मानवजातीचे सार्वकालिक जीवन विसंबून होते. तथापि, एका बंडखोर आत्मिक प्राण्याच्या प्रभावाखाली येऊन हव्वेने अशी हालचाल आरंभिली ज्याचा परिणाम मानवजातीवर मरण ओढावण्यात झाला. तिचा परिपूर्ण पती आदाम यानेही तिचीच कास धरली व मरणाकडे निरवणारे मार्गाक्रमण पत्करले. यास्तव, नंतरच्या पिढ्यांना स्वाभाविक जीवन देणारा जनक या नात्याने आदामाने सबंध मानवी कुटुंबासाठी मरणाची कार्यपद्धत लावून दिली. या कारणामुळे पवित्र शास्त्र म्हणतेः “एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात मरण पसरले.” (रोमकर ५:१२) आदाम व हव्वा हे पापात पडल्यानंतर त्यांनी मानवी कुटुंबाचा वंशविस्तार केला.—स्तोत्रसंहिता ५१:५.
६. हे “पाणी” उपलब्ध होण्याची यहोवाने का व्यवस्था केली?
६ मग, ही पृथ्वी नंदनवन होऊन तिजमध्ये परिपूर्ण मानवांची वसाहत असावी हा उद्देश पुरा करण्यात देवाला कायमचा अडथळा झाला का? पवित्र शास्त्र अगदी उचितपणे म्हणते, नाही! तरीपण, आपल्या या उद्देशाच्या पूर्णतेमध्ये यहोवाने अशी प्रेमळ योजना योजिली जी, आदामाच्या घातक अपयशयाचे उच्चाटन करू शकेल व हे त्याच्या न्याय व नीतीमत्तेस अनुसरून असेल. वस्तुतः तो स्वतःच न्याय व नीतीमत्ता यांजमध्ये सर्वांगपूर्ण आहे. ही योजना तो “जीवनाच्या पाण्याची नदी” हिजद्वारे पुरवितो. या योजनेमुळे, आधी ज्यांचा जीवनाच्या उगमाकडे येण्याच्या हक्क हिरावून घेण्यात आला होता त्या आज्ञाधारक मानवजातीला तो परत परिपूर्ण असे मानवी जीवन बहाल करील. ही नदी, येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय कारकिर्दीत पूर्ण अर्थाने वाहत राहील. ख्रिस्ताच्या या हजार वर्षांच्या राजवटीत मानवांना तसेच त्यांच्यामध्ये मृतातून पुनरुत्थान होऊन परतलेल्या लोकांनाही “जीवनाच्या पाण्याची नदी” यातून पाणी प्यावे लागेल.—पडताळा यहेज्केल ४७:१-१०; प्रे. कृत्ये २४:१५.
७. “पाणी” मिळण्याची व्यवस्था कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे?
७ यहोवा स्वतःच्या जीवनाचा मनमुराद आनंद घेत आहे व शिवाय आपल्या निर्मितीतील काहींना बुद्धीजीवी जीवनाचा हक्क देण्यात त्याला आनंद वाटतो. येशूचे खंडणी यज्ञार्पण हे यहोवा पुरवीत असलेल्या जीवन-प्रदायक योजनेचा आधार आहे. (मार्क १०:४५; १ योहान ४:९, १०) तसेच यात देवाचे वचन, पवित्र शास्त्र हेही समाविष्ट आहे व त्याला कधी कधी “जल” असेही संबोधिण्यात आले आहे. (इफिसकर ५:२६) देवाने आदाम व हव्वा या परिपूर्ण मानवी जोडप्याला जी मूळ व्यवस्था पुरविली होती ती ज्यांना मिळू शकली नाही अशा मानवी संततीला “या!” असे निमंत्रण देण्यात यहोवा देव मोकळा आहे.
वधुवर्ग “ये!” हे निमंत्रण देतो
८. हे “पाणी” प्रथम कोणाला व केव्हा देण्यात येते?
८ “ये!” असे आमंत्रण देण्यात कोकरा, म्हणजे यहोवा देवाचा आत्म्याने जन्मलेला प्रथमपुत्र याची वधू ही पहिली आहे. ही वधू अनेक सदस्यांची मिळून तयार होते. (प्रकटीकरण १४:१, ३, ४; २१:९) पण ख्रिस्ताची ही आध्यात्मिक वधू “ये!” असे स्वतःला, म्हणजे तिच्या १,४४,००० सदस्यांची संख्या पूर्ण करण्यासाठी यहोवा देव ज्यांना गोळा करणार आहे त्यासाठी म्हणत नाही. तर हे आमंत्रण, आर्मगिदोनानंतर या पृथ्वीवर परिपूर्ण जीवनाची प्राप्ती मिळविणाऱ्या मानवांना देण्यात येत आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) १९१४ पासून या सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्ती काळात “वधू” हे निमंत्रण देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहकार्याने देत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे.
९. हे निमंत्रण केवळ लहानशा गटासाठी नाही हे आपल्याला कसे कळते?
९ पवित्र शास्त्रातील शेवटले पुस्तक, देवराज्याच्या सुवार्तेच्या घोषणेला “कोणाच्याने मोजवला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” प्रतिसाद देईल व तो त्या बादशाही सरकारच्या बाजूला स्वतःला ठेवील असे सांगते हे मोठे शहारे आणणारे आहे. (प्रकटीकरण ७:९, १०, १६, १७) या मोठ्या लोकसमुदायामध्ये तुम्ही आहात का? मग, “ऐकणाराही म्हणोः ‘ये!’”
आत्मा व वधू म्हणतात, “ये!”
१०. त्या लाक्षणिक पाण्याचा उगम कोठून असावयास हवा व का?
१० पण प्रकटीकरण २२:१७ मध्ये देव तसेच लाक्षणिक वर यांचा का उल्लेख दिसत नाही? ते वचन वाचल्यावर याकडे लक्ष द्या की, आत्मा हा कोणाच्या मार्गदर्शनाखाली हालचाल करतो ते त्यात सांगण्यात आले नाही. तथापि, आत्म्याच्या अनुषंगाने असलेला संदर्भ आपले लक्ष स्वतः यहोवा देवाकडेच निरवितो. पित्याला या दृश्यातून काढून टाकण्यात आले नाही; कारण तोच स्वतः पवित्र आत्म्याचा उगम आहे. दुसरी गोष्ट ही की, पुत्र आपल्या पित्याला पूर्ण रुपाचे सहकार्य देतो, कारण त्याने म्हटलेच आहेः “पुत्र जे काही पित्याला करताना पाहतो, त्यावाचून त्याला स्वतः होऊन काही करता येत नाही.” (योहान ५:१९) याशिवाय हे प्रेरित बोल मूळतः यहोवा देवापासून आलेले आहेत, तरी मानवाला ईश्वरी मार्गदर्शन किंवा “प्रेरित वचने,” येशू ख्रिस्त, जो “शब्द” त्याच्याद्वारे मिळू शकतात. (प्रकटीकरण २२:६; तसेच २२:१७, रेफरन्स बायबल, तळटीप; योहान १:१) यामुळे या निमंत्रणात वर, ख्रिस्त याल समाविष्ट करता येऊ शकते. होय, “वधू” ही पवित्र आत्म्याच्या द्वारे “ये!” असे निमंत्रण देते तेव्हा त्यामागे वराचा पिता यहोवा देव आणि येशू ख्रिस्त हा वर हे देखील आहेत हे खात्रीने सांगता येईल.
११, १२. (अ) प्राशन करण्यास येण्याच्या निमंत्रणाचा विस्तार होणार होता हे आधी कशाप्रकारे सूचित झाले? (ब) वर्षामागून वर्षानंतर ही गोष्ट कशी अधिक स्पष्ट होत गेली?
११ ‘जीवनाच्या पाण्या’ची तहान असणाऱ्यांसाठी ‘ये’ण्याचे हे आमंत्रण आज कित्येक दशके दिले जात आहे. मागे १९१८ मध्ये सुद्धा वधूवर्गाच्या सदस्यांनी अशा संदेशाचा प्रचार केला जो खासपणे पृथ्वीवर जीवन व्यतित करण्याची आशा राखणाऱ्यांसाठी होता. ते हे जाहीर भाषण होते, ज्याचे शिर्षक होतेः “आज जिवंत असणारे लाखो लोक कधीच मरणार नाहीत.” यामुळे ही आशा लोकांना मिळाली की, हर्मगिद्दोनातून पुष्कळजण वाचतील व त्यानंतर देवाच्या मशीही राज्यात नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर त्यांना चिरकालिक जीवन मिळेल. पण बचावून जाण्यासाठी त्या संदेशामध्ये सर्वसाधारणपणे नीतीमत्तेशिवाय इतर विशिष्ट मार्गाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.
१२ “ये!” असे निमंत्रण अधिक लोकांना देण्यासाठी १९२२ मध्ये देवाची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना हा संदेश देण्यात आलाः “राजा व त्याचे राज्य याविषयीची जाहीरातबाजी करा.” १९२३ मध्ये वधूवर्गाला कळले की, मत्तय २५:३१-४६ मध्ये येशूने दिलेल्या दाखल्यातील “मेंढरे” व “शेरडे” ही हर्मगिदोनाआधी सामोरी येणार. मग, १९२९ मध्ये द वॉच टावर मासिकाने मार्च १५ च्या अंकात “भव्य निमंत्रण” हा लेख दिला. त्याचे शिर्षक वचन प्रकटीकरण २२:१७ हे होते व त्यामध्ये वधूवर्गाच्या “ये!” असे निमंत्रण देण्याच्या जबाबदारीवर अधिक भर देण्यात आला.—पृष्ठे ८७-९.a
“ये!” असे म्हणण्यासाठी दुसरी मेंढरे येऊन मिळतात
१३, १४. इतरही लाक्षणिक पाणी पितील याविषयी १९३०शी मध्ये कोणत्या स्वरुपाचे स्पष्टीकरण देण्यात आले?
१३ याखेरीज, सुरवातीला म्हणजे १९३२ मध्ये द वॉचटावरने “ये!” हे निमंत्रण देण्यात दुसरी मेंढरे यांची पाळी कशी येते व त्यांची जबाबदारी काय याविषयी दर्शविले. (योहान १०:१६) त्याच्या ऑगस्ट १ च्या अंकात, पृष्ठ २३२ व परिच्छेद २९ वर म्हणण्यात आलेः “यहोवाच्या साक्षीदारांना येहूसारखा आवेश आहे व त्यांनी योनादाब वर्ग [दुसरी मेंढरे] याला आपणासोबत येऊन देवाचे राज्य जवळ आले आहे या घोषणेत थोडा सहभाग घ्यावा याविषयीचे उत्तेजन द्यावे.” मग, प्रकटीकरण २२:१७ चे अवतरण घेतल्यावर परिच्छेद पुढे म्हणतोः “राज्याची सुवार्ता सांगण्यात ज्यांना भाग घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना अभिषिक्तांनी उत्तेजन द्यावे. प्रभुचा संदेश घोषित करण्यासाठी त्यांनी अभिषिक्त असण्याची गरज नाही. यहोवाच्या साक्षीदारांना आता हे जाणून घेण्यात मोठे समाधान वाटते की, त्यांना आता जीवनाचे पाणी अशा लोकांकडे घेऊन जाण्याची परवनगी आहे, जे हर्मगिदोनमधून बचावतील व यांना यहोवाच्या विपुल चांगुलपणामुळे पृथ्वीवर सार्वकालिक जीवन दिले जाईल.”b
१४ अभिषिक्त शेषांनी १९३४ पासून पुढे हे दर्शविले की, या दुसऱ्या मेंढरांनी देखील देवाला आपले समर्पण केले पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे व वधुवर्गासोबत मिळून आणखी इतर तान्हेल्या लोकांना “ये!” हे आमंत्रण दिले पाहिजे. अशाप्रकारे, आता वधुवर्गामार्फत या तान्हेल्या दुसऱ्या मेंढरांना एकत्र येण्याची व “एक मेंढपाळ” येशू ख्रिस्ताच्या “एक कळप” यामध्ये गोळा होण्याचे निश्चित रुपाचे आमंत्रण दिले जात होते. (योहान १०:१६) १९३५ मध्ये अभिषिक्त शेषांना त्या वर्षाच्या सर्वसाधारण अधिवेशनात हे समजून इतके आंनदविल्यासारखे झाले की, ज्यांना ते “ये!” असे आमंत्रण देत होते तो मेंढरासमान असणाऱ्या लोकांचा वर्ग खरे पाहता प्रकटीकरण ७:९-१७ मधील “मोठा लोकसमुदाय” होता. यामुळे त्या निमंत्रणाच्या कामाला अधिक जोर मिळाला.
१५. “ये!” असे निमंत्रण देण्यामध्ये “आत्मा” हा कसा समाविष्ट आहे?
१५ “ये!” असे म्हणण्यात वधुवर्गाचे देवाच्या आत्म्याशी संगनमत होते. देवाने आपल्या आत्म्याद्वारे त्याच्या लिखित वचनातील भविष्यवादांचा अर्थ त्यांना उलगडा करून या वधुवर्गाच्या शेषांना ते निमंत्रण दुसऱ्यांना देण्यास सांगितले. ज्यावर यांचे निमंत्रण आधारलेले आहेत ते भविष्यवाद देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनेच लिहिण्यात आले आहेत. यामुळेच असे म्हणता येईल की, देवाचा आत्मा हा ख्रिस्त व त्याची वधू यांच्याद्वारे जणू सामोरा जाऊन मेंढरासमान लोकांच्या मोठ्या लोकसमुदायाला म्हणत होता की, “ये!”—प्रकटीकरण १९:१०.
१६. निमंत्रणासोबत आत्मा व वधू ही कशी जडली गेली आहेत?
१६ आजपर्यंत आत्मा व शेषांकरवी प्रतिनिधित्व करणारी वधू हे “म्हणत आहेत की, ‘ये!’” सध्या उपलब्ध असणारे “जीवनाचे पाणी” त्यांनी स्वतःकडे ठेवायचे नाही. त्यांनी “आत्मा व वधू” यांच्याकडील ती आज्ञा ऐकलीच पाहिजे की, “ऐकणाराही म्हणो, ‘ये!’” जे आपली तहान भागवितात त्या सर्वांनी हे निमंत्रण चोहोकडे दिले पाहिजे. वंश, राष्ट्रीयत्व, भाषा किंवा सध्याचा धर्म याविषयी कोठलाही भेदभाव न करता त्यांनी सर्वांना व सर्वत्र हे निमंत्रण दिले पाहिजे! सध्याच्या काळात जे “जीवनाचे पाणी” उपलब्ध आहे त्याविषयी यहोवाचे साक्षीदार सर्व लोकांना निमंत्रण देत आहेत व त्यात सहभागी होण्यात मदत करीत आहेत.
१७. कोणत्या प्रकारचे “पाणी” आज उपलब्ध आहे?
१७ सबंध पृथ्वीभर कोकरा येशू ख्रिस्त, मोठ्या लोकसमुदायाला खरेपणाने “जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ” नेत आहे. (प्रकटीकरण ७:१७) हे काही प्रदुषित पाणी नव्हे, तर ते त्याच्या उगमापासूनच येणारे स्वच्छ व थंड पाणी आहे. हे लाक्षणिक पाणी पवित्र शास्त्रीय सत्याची समजणूक होण्याच्यापेक्षा अधिक अर्थ राखून आहे. त्याचा अर्थ, देवाने येशू ख्रिस्तामार्फत केलेल्या सर्व योजना होत; ज्यामुळे आताही मोठ्या लोकसमुदायाला सौख्यानंदातील पूर्ण असे सार्वकालिक जीवन मिळविण्याच्या मार्गाला लावले जात आहे.
घोषणेत सहभागी व्हा
१८. हे निमंत्रण आमच्या काळात केवढ्या व्याप्त रुपाचे बनले आहे?
१८ या मोठ्या लोकसमुदायाची संख्या आत्ताच काही लाखांच्या घरात गेली आहे. ते आवेशाने देवाच्या राज्याचे शुभवर्तमान सबंध जगभर करीत आहेत. या कार्याच्या अनुषंगाने ते क्षेत्रात जो वेळ खर्च करीत आहेत त्याचा ते नियमित रुपात अहवाल देत आहेत; तो २१२ देशातून येत आहे. जोपर्यंत या व्यवस्थीकरणाची समाप्ती वेळ देत राहील तोपर्यंत हे निमंत्रण थोर वेळ नियोजक यहोवा देव याची सहनशीलता व धीर यानुरुप दिले जाईल. ती वेळ कधी संपते तसेच त्याला आपले यहोवा हे नाव करण्याची घटका केव्हा आली आहे हे त्याला माहीत आहे. त्याने पवित्र शास्त्र भविष्यवादांमध्ये आपले नाव महान करण्याविषयी वेळोवेळी सांगितले आहे.—यहेज्केल ३६:२३; ३८:२१-२३; ३९:७.
१९. हे “पाणी” मोफत आहे असे आम्ही का म्हणू शकतो?
१९ या कारणास्तव वेळ आहे तोपर्यंत मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य वधुवर्गातील शेषांसोबत मिळून हे निमंत्रण आनंदाने देत आहेत की, “या व हे जीवनी पाणी फुकट घ्या!’ सार्वकालिक सुवार्तेचे हे घोषक ही घोषणा मोफतपणे करीत आहेत. जगभर राज्याचा संदेश प्रसारीत करीत असता ते आपल्या सेवेबद्दल मोबदला घेत नाहीत.
२०. हे “पाणी” उपलब्ध आहे म्हणून कोणता परिणाम घडून येऊ शकतो?
२० जीवनाचे पाणी आता सर्व गोलार्धावर मिळत आहे, त्यामुळे ज्याला ते घेण्याची इच्छा आहे ते तो घेऊन पूर्ण समाधान मिळवू शकतो व जीवनदायी परिणाम देखील प्राप्त करू शकतो. मुक्त करण्यात येणारी मानवजात याच पृथ्वीवर अनंत जीवनाचा अनुभव घेत राहील. ही पृथ्वी नंदनवनात रुपांतरित करण्यात येईल व त्यामुळे यहोवा देवाचा तिजविषयीचा मोलवान उद्देश पूर्ण होईल. आमच्या निर्मात्याने या पृथ्वीला निष्फळ म्हणून निर्माण केली नाही, पण तिजवर गालार्धव्याप्त रुपात एदेन बाग, किंवा सुखलोक पसरवला जावा आणि देवाची प्रतिमा व प्रतिरुपाप्रमाणे परिपूर्ण मानवाची वसाहत राहावी हा त्याचा उद्देश होता.
२१. देवाने पृथ्वीविषयी राखलेला उद्देश कसा पूर्ण करण्यात येईल?
२१ अशा या नव्या जगात राहण्याचा आनंद व थोर हक्क केवढा वेगळा असणार! तेव्हा देवाने पहिल्या मानवी जोडप्याला दिलेली व उत्पत्ती १:२७, २८ मध्ये लिखित असणारी आज्ञा भव्य रुपात पूर्ण केली जाईल. मानवजातीवर आरंभाला ओढवलेल्या विपत्तीची हाताळणी यहोवाने ज्या कुशलतेने केली त्याविषयी आम्ही त्याचे आभारी आहोत. ही सबंध पृथ्वी मशागत होऊन नंदनवन बनेल व ती परिपूर्ण मानवी वंशाने बहरून जाईल. होय, देव त्याच्या कृतीचे परिक्षण करील आणि पाहील तो काय, ते सर्व चांगले दिसेल. तुम्ही तेथे असाल का? जर होय, तर मग, आत्ताच तुम्ही जीवनाचे पाणी मोफतपणे अगदी रसिकतापूर्वकतेने प्राशन केले पाहिजे. आता वाहू लागलेल्या व जे येणाऱ्या हजार वर्षाच्या काळात पूर्ण रुपाने वाहू लागेल त्या जीवनाच्या पाण्याच्या जलाने आपली तहान भागविण्यासाठी “या!” तसेच जे हे प्रेमळ निमंत्रण ऐकत आहेत त्यांनीही म्हणावे की, “या!”
[तळटीपा]
a इतर गोष्टींसमवेत त्या लेखाने असेही म्हटलेः “पूर्वी कधी नव्हती इतक्या विस्तारीतपणे सत्याविषयीची साक्ष गेल्या काही वर्षांत दिली गेल्याचे दिसले. . . . शेष आनंदी वार्ता कळवतात व त्यांना म्हणतातः ‘ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.’ त्यांनी प्रभूच्या बाजूने पण दियाबलाच्या विरूद्ध उभे राहावे आणि आशीर्वाद मिळवून घ्यावे असे सांगितले जात आहे. होय तो, लीनतेने व धार्मिकतेने चालणारा, तसेच क्रोधाच्या दिवशी वाचणारा व आर्मगिदोनाच्या लढाईतून पार जाऊन नंतर सदासर्वकाळ जिवंत राहणारा व कधीही न मरणारा लोकांचा गट नव्हे का? (सफन्या २:३) . . . विश्वासू शेष वर्ग मोठ्या निमंत्रणात सहभागी होतो व म्हणतो की, ‘या.’ हा संदेश नीतीमत्व तसेच सत्याची आवड असणाऱ्या लोकांना घोषित करण्यास हवा. ते आत्ताच केले जाण्यास हवे.”
b दुसरी मेंढरे यांच्या जबाबदारीविषयी द वॉचटावर मासिकाच्या ऑगस्ट १५, १९३४ च्या अंकाने कळवले व पृष्ठ २४९ वरील परिच्छेद ३१ मध्ये म्हटलेः “सत्याच्या संदेश ऐकणाऱ्या तसेच त्यांचे ऐकणाऱ्यांना ‘ये,’ म्हणणाऱ्यांचा मिळून योनादाब वर्ग तयार होतो. याचप्रमाणे ‘ऐकणाराही म्हणोः ये, तान्हेला येवो व ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.’ (प्रकटी. २२:१७) योनादाब वर्गाने प्रतिनमुनेदार येहू, म्हणजे अभिषिक्तांबरोबर आपला सहवास ठेवावा आणि ते [योनादाब वर्ग] जरी यहोवाचे अभिषिक्त साक्षीदार नसले तरीही राज्याचा संदेश घोषित करावा.”
तुमचे उत्तर काय आहे?
◻ प्रकटीकरण २२:१७ मध्ये कोणत्या ‘पाण्या’चा उल्लेख आहे?
◻ या ‘पाण्या’चा उगम कोठून आहे?
◻ हे “पाणी” का जरुरीचे आहे व ते केवळ केव्हापासून वाहू लागते?
◻ आमच्या शीर्षकवचनात ‘आत्म्या’विषयीचा जो संदर्भ आहे तो काय सूचित करतो व येथे “वधू” कशी समाविष्ट आहे?
◻ हे “पाणी” कोण पिऊ शकतो व याचा कोणता परिणाम होणार?