देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ति करणे
“देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ति करावी.”—२ करिंथकर ७:१.
१. उच्च पदावर असणारे दिव्यदूत यहोवाच्या पावित्र्याला ओळखून आहेत हे आम्ही कसे जाणतो?
यहोवा हा पवित्र देव आहे. स्वर्गात उच्चपदावर असणारे दिव्यदूत त्याच्या पावित्र्याविषयी अनिश्चितपणा घोषित करीत नाहीत. “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश यहोवा. अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय.” या शब्दांनी सराफांनी देवाची स्तुति गायिली. हा दृष्टांत यशया संदेष्ट्याला इ.स.पू. च्या आठव्या शतकात घडला होता. तसेच इ. स. च्या पहिल्या शतकाच्या शेवटाला प्रेषित योहानालाही, जे “प्रभूच्या दिवसात” घडणार होते व ज्यामध्ये आज आपण स्वतः आहोत त्याचा दृष्टांत दाखवला गेला. त्याने यहोवाच्या राजासनाभोवती चार प्राणी पाहिले व ते सतत याप्रकारे म्हणत असल्याचे त्याने ऐकलेः “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश यहोवा, जो होता, आहे व येतो.” यहोवाच्या स्वर्गीय आत्मिक प्राण्यांनी ही जी त्रिवार घोषणा वदविली, ती यहोवाच्या सर्वोच्च पावित्र्याविषयी साक्ष देणारी आहे.—यशया ६:२, ३; प्रकटीकरण १:१०; ४:६-८.
पावित्र्य व वेगळेपण
२. (अ) पावित्र्यात कोणते दोन पैलू आहेत, आणि या दोन्ही पैलूंच्या बाबतीत यहोवा कसा पवित्र आहे? (ब) मोशाने यहोवाच्या पावित्र्यावर कसा भर दिला?
२ पावित्र्याचा अर्थ केवळ धार्मिक स्वच्छता व शुद्धता इतकाच नसून त्यामध्ये वेगळेपण, किंवा गौरव देखील आहे. यहोवा हा सर्वार्थाने स्वच्छ किंवा शुद्ध आहे; तो राष्ट्रांच्या इतर सर्व घाणेरड्या दैवतांपासून वेगळाच आहे. पावित्र्याचा त्याचा हा पैलू किंवा गौरव, मोशेने गायिलेल्या गीतामध्ये याप्रकारे जोर देऊन सांगण्यात आलेः “हे यहोवा, देवांमध्ये तुजसारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी . . . असा . . . तुजसारखा कोण आहे?”—निर्गम १५:११.
३. इस्राएलांनी कोणत्या बाबतीत शुद्ध राहण्याची गरज होती, आणि यहोवाने यासाठी त्यांना काय दिले होते?
३ या पवित्र देव, यहोवाने हे अपेक्षिले की, पृथ्वीवरील त्याचे लोक, प्राचीन इस्राएल यांनीही पवित्र असावे. हे केवळ याजक व लेव्यांच्या बाबतीत नव्हे तर साऱ्या राष्ट्राविषयीही सांगण्यात आले होते. यहोवाने मोशाला म्हटलेः “इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांगः ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे.” (लेवीय १९:२) याकरिता, यहोवाने त्यांना आध्यात्मिक, नैतिक, मानसिक, शारीरिक आणि विधिपूर्वक स्वच्छ राहण्यासाठी नियम दिले. यातील शेवटली म्हणजे विधिपूर्वक स्वच्छता ही त्यांची निवासमंडपात केली जाणारी भक्ती व नंतर मंदिरातील भक्ती यांच्या अनुषंगाने होती.
वेगळे करण्यात आलेले लोक
४, ५. (अ) दैहिक इस्राएल एक पवित्र केलेले राष्ट्र कसे होते? (ब) आध्यात्मिक इस्राएलांच्या संबंधाने काय अपेक्षा आहे, आणि प्रेषित पेत्र याची कशी पुष्टी देतो?
४ इस्राएलांनी जितक्या प्रमाणात देवाने दिलेले नियम आचरले, तितक्या प्रमाणात ते त्यांच्या सभोवार असलेल्या पण वंचित झालेल्या राष्ट्रांपासून वेगळे असल्याचे दिसून आले. पवित्र देवाच्या सेवेसाठी वेगळे करण्यात आलेले किंवा पवित्र झालेले लोक असे ते उठून दिसत होते. मोशाने त्यांना सांगितलेः “तू आपला देव यहोवा याची पवित्र प्रजा आहेस. या अखिल पृथ्वीवरील देशातील लोकातून तुझा देव यहोवा याने तुला निवडून घेतले आहे ते यासाठी की, तू त्याची खास प्रजा व्हावे.”—अनुवाद ७:६.
५ ही शुद्धता व वेगळेपणा आध्यात्मिक इस्राएलांच्या बाबतीत देखील अपेक्षित आहे. ज्यांची आध्यात्मिक इस्राएल म्हणून निवड झाली होती अशांना प्रेषित पेत्राने लिहिलेः “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांप्रमाणे वागूवर्तू नका. तर ज्याने तुम्हास पाचारण केले आहे तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण, ‘मी पवित्र आहे, यास्तव तुम्ही पवित्र व्हा,’ असा शास्त्रलेख आहे.”—१ पेत्र १:१, १४-१६.
६, ७. (अ) प्रकटीकरणाच्या ७व्या अध्यायात “मोठा लोकसमुदाय” वर्गाच्या सदस्यांचे कसे वर्णन दिले आहे, तेव्हा त्यांच्याकडून देखील व्यवहार्यपणे कशाची अपेक्षा आहे? (ब) यानंतरच्या परिच्छेदांत कशाची चर्चा होणार आहे?
६ प्रकटीकरणाच्या ७व्या अध्यायात “मोठा लोकसमुदाय” वर्गाचे वर्णन “शुभ्र झगे परिधान केलेला . . . [यहोवाच्या] राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला” असे केले आहे. यांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:९, १४) त्यांचे शुभ्र झगे यहोवासमोर असणारे त्यांचे स्वच्छ व नीतीमान स्थान सुचवितात. हे स्थान यहोवा त्यांना ख्रिस्ताच्या मुक्तीदायक रक्तावर विश्वास ठेवण्यामुळे देतो. यास्तव, हे स्पष्ट आहे की, केवळ अभिषिक्त ख्रिश्चनांनीच नव्हे तर, “दुसरी मेंढरे” यांनीही यहोवाची सेवा त्याला पसंत पडेल अशा पद्धतीने करण्यासाठी आध्यात्मिक रितीने व नैतिकदृष्ट्या शुद्ध असले पाहिजे.—योहान १०:१६.
७ आता आपण हे पाहू या की, गतकाळातील यहोवाच्या लोकांना स्वच्छ व पवित्र असल्याचे का शाबीत करायचे होते व तीच तत्त्वे आज देवाच्या लोकांना का लागू होणारी आहेत.
आध्यात्मिक शुद्धता
८. इस्राएलांना कनानातील धर्मांपासून स्वतःला कोणकोणत्या कारणांमुळे वेगळे ठेवायचे होते?
८ दैहिक इस्राएलांना सभोवार असलेल्या राष्ट्रांच्या घाणेरड्या धार्मिक प्रथांपासून कटाक्षाने वेगळे ठेवायचे होते. यहोवाने मोशेद्वारे इस्राएलांना म्हटलेः “तू सावध ऐस. ज्या देशी तू जात आहेस तेथल्या रहिवाश्यांशी काही करारमदार करू नको, केलास तर तो तुला पाश होईल. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ [ओंगळ अशा लैंगिक आराधनेसाठी वापरण्यात येणारे] फोडून टाका. त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा; कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाची भक्ती करावयाची नाही. का की, ज्याचे नाम ईर्ष्यावान असे आहे तो यहोवा ईर्ष्यावान देव [किंवा, “सर्वस्वाची भक्ती अपेक्षिणारा देव,” न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप] होय. संभाळ, देशातील रहिवाश्यांशी तुला करारमदार करता कामा नये. नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांस बलिदान करतील.”—निर्गम ३४:१२-१५.
९. इ. स. पूर्व ५३७ मध्ये बाबेलातून निघालेल्या विश्वासू शेषांना कोणत्या विशिष्ट सूचना देण्यात आल्या?
९ काही शतकानंतर बाबेलातून यहुदाकडे परतणाऱ्या विश्वासू शेषांकरता यहोवाने यशयाला प्रेरणेने आधीच हे शब्द बोलायला सांगितलेः “निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; त्यांच्यामधून निघून जा. यहोवाची पात्रे वाहणाऱ्यांनो, [ती पात्रे यरुशलेमातील यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी वापरावी म्हणून] तुम्ही आपणास शुद्ध करा.”—यशया ५२:११.
१०, ११. (अ) पहिल्या शतकातील अभिषिक्त ख्रिस्ती जनांना अशाच स्वरुपाच्या कोणत्या सूचना देण्यात आल्या? (ब) या सूचना १९१९ आणि १९३५ पासून कशा पद्धतीने अनुसरल्या गेल्या, शिवाय आणखी कोणत्या बाबतीत अभिषिक्त व त्यांचे सहकारी आध्यात्मिक रितीने शुद्ध राखीत आहेत?
१० याचप्रमाणे, आध्यात्मिक इस्राएल व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील स्वतःला या जगाच्या मूर्तिपूजक धर्मांनी कलंकित होऊ देता कामा नये. करिंथ मंडळीतील अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिताना प्रेषित पौलाने म्हटलेः “देवाच्या मंदिराचा मूतींबरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहो; देवाने असे म्हटले आहे कीः ‘मी त्यात वास करीन व चालेन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.’ ‘“यास्तव, त्यातून निघा व वेगळे व्हा,” असे यहोवा म्हणतो, “आणि अशुद्ध वस्तुला शिवू नका’”; ‘“मी तुम्हाला स्वीकारीन.”’”—२ करिंथकर ६:१६, १७.
११ १९१९ पासून पुढे अभिषिक्त शेषांचे मोठ्या बाबेलच्या अशुद्ध, मूर्तिपूजक धर्मांपासून शुद्धीकरण करून स्वच्छता करण्यात आली. (मलाखी ३:१-३) त्यांनी ही स्वर्गातील वाणी ऐकलीः “मोझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा.” (प्रकटीकरण १८:४) या वाणीला १९३५ पासून वाढत्या समूहाच्या “दुसरी मेंढरे” याच्या लोकसमुदायाने ऐकले व अशुद्ध बाबेलोनी धर्माकडे आपली पाठ दाखवली. याचप्रमाणे अभिषिक्त जन व त्यांचे सहकारी यांनी धर्मत्याग्यांच्या अपायकारक कल्पनांशी कोणताही संपर्क येऊ देण्याचे टाळले.—योहान १०:१६; २ योहान ९-११.
नैतिक शुद्धता
१२. (अ) यहोवाने कोणत्या नियमांच्या माध्यमाने इस्राएलांचा नैतिक दर्जा सभोवार पसरलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक उंचावला? (ब) याजकांसाठी खासपणे कोणते नियम कडक होते?
१२ यहोवाने इस्राएलांना नियमशास्त्र लावून दिल्यामुळे त्यांचा नैतिक दर्जा, हिणकस परिस्थितीने जर्जर झालेल्या आजूबाजूच्या राष्ट्रांपेक्षा खूपच वरच्या दर्जाचा ठरला. इस्राएलाच्या संघटनेद्वारे विवाह व कौटुंबिक जीवन सुरक्षित झाले. दहा आज्ञांमधील सातव्या आज्ञेने व्यभिचारास पायबंद घातला. व्यभिचार व जारकर्म आचरणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळे. (अनुवाद २२:२२-२४) नियमशास्त्राकरवी कुमारींचे संरक्षण करण्यात आले. (अनुवाद २२:२८, २९) विवाहाचे नियम खासपणे याजकवर्गासाठी कडक होते. प्रमुख याजकाच्या बाबतीत अशी अपेक्षा होती की, त्याने बायको करण्यासाठी शुद्ध कुमारीची निवड करावी.—लेवीय २१:६, ७, १०, १३.
१३. ख्रिस्ताच्या “वधू”च्या सदस्यांना कशाप्रमाणे लेखण्यात आले, व का?
१३ याचप्रमाणे थोर महायाजक, येशू ख्रिस्त, यालाही एक “वधू” आहे जी, १,४४,००० सदस्यांची मिळून बनलेली आहे व यांना “कुमारी”ची उपमा देण्यात आली आहे. (प्रकटीकरण १४:१-५; २१:९) ते स्वतःला सैतानी जगापासून निष्कलंक ठेवतात आणि तत्त्वे व नैतिकता यांच्याबाबतीत शुद्ध ठेवतात. प्रेषित पौलाने करिंथ येथील अभिषिक्त ख्रिश्चनांना हे लिहिलेः “मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते; कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे.” (२ करिंथकर ११:२) पौलाने आणखी लिहिलेः “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे, आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.”—इफिसकर ५:२५-२७.
१४, १५. (अ) वधू वर्गाच्या आध्यात्मिक शुद्धतेला आणखी कशाची जोड हवी, आणि कोणते शास्त्रवचन ते सुचविते? (ब) नैतिक शुद्धतेविषयीच्या त्याच गरजा दुसरी मेंढरे यांनाही लागू होतात हे कसे स्पष्ट होते?
१४ ख्रिस्ताच्या वधूच्या आध्यात्मिक शुद्धतेसोबत तिच्या सदस्यांची नैतिक शुद्धता देखील असावयास हवी. प्रेषित पौलाने म्हटलेः “फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, . . . यांस देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही . . . धुतलेले, पवित्र केलेले, व नीतीमान ठरविलेले असे झाला आहे.”—१ करिंथकर ६:९-११.
१५ नैतिक शुद्धतेच्या या गरजा दुसरी मेंढरे वर्गाच्या सदस्यांनाही लागू आहेत हे, यहोवा, त्याने अभिवचन दिलेले नवे आकाश व नवी पृथ्वी यामध्ये ज्यांना प्रवेश देणार नाही त्यांना लक्षात आणले तर स्पष्ट होते. आम्ही वाचतोः “परंतु . . . अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, . . . यांस अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण आहे.”—प्रकटीकरण २१:१, ८.
आदरणीय विवाह
१६, १७. (अ) नैतिक शुद्धतेसाठी सडेपणा राखण्याची गरज नाही हे कोणती शास्त्रवचने दाखवतात? (ब) विवाहसोबती निवडण्यासंबंधाने एखाद्या ख्रिश्चनाला देवाचे योग्य भय आहे हे कसे दाखवता येईल, आणि ही प्रेषितीय सूचना अमान्य करणे हे सूज्ञतेचे का ठरणार नाही?
१६ वधू वर्गाच्या अभिषिक्त सदस्यांनी तसेच दुसरी मेंढरे यांनी नैतिकदृष्ट्या स्वच्छ राहायचे आहे तर त्यांनी सडे असण्याची जरुरी नाही. सक्तीची अविवाहितावस्था लादणे हे अशास्त्रीय आहे. (१ तीमथ्य ४:१-३) वैवाहिक बंधनातील लैंगिक समागम अशुद्ध नाही. देवाचे वचन म्हणतेः “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे; व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांस देव दंड करील.”—इब्रीयांस १३:४.
१७ तथापि, ज्या ख्रिश्चनाची ‘देवाचे भय मानून पावित्र्याची परिपूर्ति कर’ण्याची इच्छा आहे त्याला किंवा तिला, इच्छा आहे त्या कोणाबरोबरही विवाह करण्यास आपण मोकळे आहोत असे वाटू देऊ नये. प्रेषित पौलाने आपल्या सहख्रिश्चनांना, ‘देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करून देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ति करावी’ ही सूचना देण्याआधी असे लिहिलेः “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका; कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? . . . विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार?” (२ करिंथकर ६:१४, १५; ७:१) यहोवाच्या वेगळ्या तसेच शुद्ध लोकांचा सदस्य या नात्याने, विवाहबद्ध होण्याची कोणा ख्रिस्ती पुरुषाची वा स्त्रीची इच्छा आहे तर तो किंवा ती हा विवाह “केवळ प्रभुमध्ये” करावा ही प्रेषितीय सूचना मान्य करील. याचा अर्थ हा की, हा विवाहसोबती, तो किंवा ती यहोवाच्या समर्पित, बाप्तिस्मा घेतलेल्या व विश्वासू सेवकांमधून निवडून घेईल. (१ करिंथकर ७:३९) देवाच्या लोकातील समर्पित जनांनी ही शास्त्रवचनीय सूचना अमान्य करणे हे जसे पूर्वी होते तसे आजही मूर्खपणाचे असेल. (पडताळा अनुवाद ७:३, ४; नेहम्या १३:२३-२७.) ते आमचा थोर धनी यहोवा याला हितकारक स्वरुपाचे दाखविलेले भय नसणार.—मलाखी १:६.
१८. ख्रिस्ती लोकांना आणखी कोणत्या मार्गाने आपला विवाह आदरणीय ठेवता येईल?
१८ आणखी एक गोष्ट म्हणजे, इस्राएलामध्ये वैवाहिक बंधनात देखील नियमशास्त्राने लैंगिक हालचालींना मर्यादा घालून दिली होती. बायको ऋतुमती झाली असता तिच्या पतीने तिजसोबत समागम करायचा नव्हता. (लेवीय १५:२४; १८:१९; २०:१८) यामुळे इस्राएली पुरुषवर्गाला प्रेमळ विचार व संयम राखण्याचे शिकावे लागले. मग, ख्रिस्तीजनांनी आपल्या बायकांच्या बाबतीत कमी विचारशील असावे का? प्रेषित पेत्र म्हणतो की, खिस्ती पतींनी आपल्या बायकांसोबत “सूज्ञतेने” म्हणजे, बायको ही “अधिक नाजूक पात्र” आहे ही तिची घडण लक्षात आणून तसा व्यवहार ठेवणे जरुरीचे आहे.—१ पेत्र ३:७.
“पवित्र मार्गा”ने चालणे
१९, २०. (अ) मानवजातीतील बहुतेक लोक ज्या रुंद मार्गाने जात आहेत त्याचे वर्णन करा. (ब) यहोवाच्या लोकांनी सैतानी जगापेक्षा कसे वेगळे दिसले पाहिजे? (क) कोणता राजमार्ग देवाचे लोक अनुसरीत आहेत, तो केव्हा उघडा करण्यात आला, आणि त्यामध्ये केवळ कोण जाऊ शकतात?
१९ आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती हे दाखविते की, सैतानी जग आणि यहोवाचे लोक यामध्ये एक मोठा दरा विभाजन करून आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थीकरणामध्ये स्वैराचार व आत्मसंतुष्टता वाढतच आहे. येशूने म्हटलेः “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत.” (मत्तय ७:१३) तो रुंद मार्ग आज मानवजातीतील बहुतेक जण अनुसरीत आहेत. पेत्राच्या म्हणण्यानुसार तो “कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तिपूजा” यांचा मार्ग आहे, जो “दंगलाच्या भरात” अधोगतीकडे नेतो. (१ पेत्र ४:३, ४) नाश हा त्याचा शेवट आहे.
२० पण तेच, देवाचे लोक हे वेगळ्या मार्गाने, शुद्ध मार्गाने जात आहे, जो केवळ शुद्ध लोकच अनुसरीत आहेत. हा मार्ग शेवटल्या काळी खुला असेल हे यशया संदेष्ट्याने भाकित केले होते. त्याने लिहिलेः “तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाहीत.” (यशया ३५:८) या भविष्यवादावर भाष्य करताना वर्ल्डवाईड सेक्युरिटी अंडर द “प्रिन्स ऑफ पीस” हे पुस्तक म्हणतेः “देवाच्या आनंदी सेवकांसाठी १९१९ मध्ये एक लाक्षणिक मार्ग उघडा झाला. ज्यांना यहोवाच्या दृष्टीने पवित्र होण्याची इच्छा होती तेच या ‘राजमार्गा’ने ‘पवित्र मार्गा’ने चालले. . . . आज ‘व्यवस्थीकरणाच्या समाप्ती’चा अगदी शेवट आला असताना देखील तो ‘राजमार्ग’ उघडा आहे. या ‘पवित्र मार्गा’वरील आध्यात्मिक नंदनवनाकडे . . . आज रसिकता राखणारे लोक येत आहेत.”a
२१. यहोवाच्या सेवकांनी दियाबलाच्या समूहापासून स्वतःला वेगळे असल्याचे का दाखवण्यास हवे, आणि नंतरच्या लेखात कशाविषयीची चर्चा करण्यात येईल?
२१ होय, आध्यात्मिक इस्राएलाचे अभिषिक्त शेष आणि त्यांचे साथीदार, दुसरी मेंढरे हे स्वतःला सैतानी जगापासून वेगळे करण्यात आलेले लोक या अर्थी दाखवीत आहेत. सैतानी जगासाठी पवित्रतेचा आता काहीच अर्थ राहिलेला नाही. ‘नाशाकडे रुंद व पसरट मार्गा’ने, जाणाऱ्या दियाबलाच्या लोकांना काहीच पवित्र वाटत नाही. ते आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या अशुद्ध तर आहेच पण सोबत शारीरिकरित्या देखील अशुद्ध राहतात व त्यांचे स्वरुप गबाळेपणाचे भासते. पण प्रेषित पौल म्हणालाः “देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ति करावी.” (२ करिंथकर ७:१) मग, देवाच्या लोकांना मन व शरीर यासंबंधाने शुद्ध राहण्याची कशी काळजी घेता येईल हे आपण पुढील महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या लेखात पाहू.
[तळटीपा]
a अध्याय १६, पृष्ठे १३४-५.
उजळणीसाठी मुद्दे
◻ पावित्र्याचे कोणते दोन पैलू आहेत व यहोवा अत्यंत पवित्र आहे असे का म्हणता येते?
◻ इस्राएलांनी आपले पवित्र राष्ट्र आहे हे कोणत्या दोन मार्गांनी सिद्ध करून दाखवावयाचे होते?
◻ आध्यात्मिक इस्राएल व त्यांचे साथीदार यांच्या बाबतीत कसली अपेक्षा आहे?
◻ आम्हाठायी असणाऱ्या देवाच्या भयाने आम्ही विवाहसोबत्याची निवड करताना कसा परिणाम करण्यास हवा?
◻ आज कोणत्या दोन मार्गांनी मार्गाक्रमण करता येते, पण यात स्पष्ट निवड का केली पाहिजे?
[२४ पानांवरील चित्रं]
देवाचे वचन म्हणतेः “विवाह आदरणीय असावा.”