मर्यादेवरील खुणेकडे धावा!
फिलिप्पैकरांस पत्र यातील ठळक मुद्दे
प्रेषित पौलाची ही इच्छा होती की, फिलिप्पैमधील ख्रिश्चनांनी सार्वकालिक जीवनासाठी मर्यादेवरील खुणेकडे धाव घेत राहावी. या कारणास्तव त्याने त्यांना इ. स. ६० किंवा ६१ च्या सुमारास रोममधील आपल्या पहिल्या बंदिवासात असताना हे पत्र पाठविले. त्याचे हे पत्र, फिलिप्पैमध्ये दहा वर्षे आधी त्याने ज्या मंडळीची स्थापना केली होती तिजकडे पाठविण्यात आले. हे शहर मासेदोनियाचा फिलिप्प (थोर सिकंदरचा बाप) याने वसविले होते. इ. स. तील पहिल्या शतकापर्यंत ते “मासेदोनियाचे त्या भागातील (प्रमुख) शहर होते,” व जे सध्याला उत्तर ग्रीस आणि दक्षिण युगोस्लाव्हियाचा एक भाग आहे.—प्रे. कृत्ये १६:११, १२.
फिलिप्पैमधील विश्वासूजन गरीब होते तरी ते उदार होते. त्यांनी पौलाच्या गरजा भागविण्यात कैक वेळा मदत पाठविली होती. (फिलिप्पैकर ४:१४-१७) पण त्याचे हे पत्र उपकार मानण्याच्या दोन शब्दापेक्षा अधिक मोलाचे होते. त्यामध्ये त्यांच्यासाठी प्रोत्साहन होते, प्रेमाचे प्रकटन तसेच उपदेश होता.
ख्रिस्ती गुणांचा प्रत्यय
पौलाने आपल्या पत्राची सुरवातच, फिलिप्पैमधील विश्वासूजनांवरील आपल्या प्रेमाचे प्रमाण देऊन केली. (१:१-३०) सुवार्ता प्रचार कार्यात वाढ व्हावी या उद्देशाने त्यांनी पाठविलेल्या दानाविषयी त्याने यहोवाचे आभार मानले; आणि त्यांच्यातील प्रीती उत्तरोत्तर वाढती राहावी यासाठी प्रार्थना केली. आपल्या बंदिवासामुळे त्यांना ‘देवाचे वचन अधिक निर्भयतेने’ घोषित करण्याची चालना मिळाली हे जाणून पौलाला आनंद वाटला. ख्रिस्तासोबत असावे असे जरी त्याला वाटत होते तरी यांची अधिक सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. तसेच त्यांनी “एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत, एकचित्ताने स्थिर राहावे,” असेही तो इच्छित होता.
यानंतर चित्तवृत्ती व वागणूक यांच्याविषयीचा उपदेश आहे. (२:१-३०) फिलिप्पैकरांनी इतरांसोबत समचित्त व्हावे व ख्रिस्तासमान नम्र चित्तवृत्ती राखावी असे त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. ते जगात “ज्योतिसारखे चकाकत असता” “जीवनाचे वचन” यावर आपली पकड घट्ट ठेवण्यास सांगितले गेले. त्यांच्याकडे तीमथ्याला पाठविण्याचा पौलाचा मानस होता व लवकरच तोही त्यांना भेट देईल असा त्याला भरवसा वाटत होता. आधी आजारी असलेला व आता बरा झालेल्या एप्रफ्रदीत या बंधुविषयी पौलाने खात्री राहावी म्हणून त्यांच्याकडे या निष्ठावंत सेवकाला तो पाठवीत होता.
मर्यादेवरील खुणेकडे नेटाने धावत राहा!
पुढे प्रेषिताने फिलिप्पैकरांना स्पष्ट केले की, ते या मर्यादेवरील खुणेकडे धावत असता, त्यांनी कोणावर भाव ठेवावा. (३:१-२१) तो भाव कोणा देहावर किंवा जसे काहीजण सुंतेवर ठेवून होते तसा त्यावर न ठेवता, येशू ख्रिस्तावर ठेवला पाहिजे. देहाबाबतच्या सर्व स्तुत्य भूषणांना पौलाने ख्रिस्ताच्या “ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे” केरकचरा लेखले होते. हा प्रेषित स्वतःच “ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे” धावत होता, आणि फिलिप्पैकरांनी देखील अशाच चित्तवृत्तीचे राहावे असे त्याने त्यांना प्रोत्साहन दिले.
पौलाने केलेला समारोपाचा सद्बोध आचरल्यास फिलिप्पैकरांना ध्येय व पण सतत नजरेसमोर ठेवण्यात साहाय्य मिळणार होते. (४:१-२३) त्यांनी आपल्या सर्व मागण्यास प्रार्थनेद्वारे देवाला कळवाव्यात व आपले मन सुविचारांनी भरलेले राखावे असे विनविले. पौल परत एकदा त्यांनी दाखविलेल्या उदारतेविषयी त्यांची प्रशंसा करतो व समाप्तीला सलाम कळवून प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा त्यांनी दाखविलेल्या आत्म्यासोबत राहो ही इच्छा व्यक्त करून पत्र संपवितो.
पौलाने फिलिप्पैकरांना लिहिलेले पत्र उदारता, प्रेम व नम्रता याविषयी चालना देते. ते ख्रिस्तावरील भरवसा व देवाकडे अंतःकरणपूर्वक प्रार्थना करण्याचे उत्तेजन देते. शिवाय, पौलाचे शब्द यहोवाच्या साक्षीदारांना सार्वकालिक जीवनाचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे नेटाने धावत राहण्यात निश्चितपणे मदत देतात.
[३१ पानावरील चौकट/चित्रं]
ध्येयाकडे वाटचालः “मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून,” पौल पुढे लिहितोः “ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो.” (फिलिप्पैकर ३:१३, १४) प्रेषित शर्यतीत धावणाऱ्याप्रमाणेच स्वतःला नेटाने पुढे नेत होता. मागे पाहात राहण्यात त्याने वेळ व परिश्रम वाया घालविले नाही, तर जसा एखादा धावपटू समाप्तीची रेषा ओलांडण्यासाठी स्वतःस ताणवीत असतो तसे तो खुणेकडे लक्ष देऊन नेटाने धावत होता. पौल तसेच इतर अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी असणारे बक्षिस हे स्वर्गीय जीवनाचे दान होते जे, देवावरील विश्वास राखून पृथ्वीवरील आपली जीवनयात्रा विश्वासाने संपवल्यावर पुनरुत्थानाद्वारे मिळणार होते. आम्हाठायी स्वर्गीय जीवनाची आशा असो की, पृथ्वीवरील जीवनाची, आपण सर्वजण यहोवास आपली सचोटी दाखवू या व त्याचे साक्षीदार या नात्याने मर्यादेवरील खुणेकडे नेटाने धावत राहू या.—२ तीमथ्य ४:७.