तुमच्या जीवनावर नशिबाची सत्ता असावी का?
वरील चौकोनात आपल्याला दिसेल की, दैवावर विश्वास न ठेवणारा एकमेव माणूस येशू ख्रिस्त होता. त्याचा दृष्टीकोण काय होता?
पहिल्या शतकातील येशूबद्दलची चरित्रविषयक वर्णने (पवित्र शास्त्रातील मत्तय, मार्क, लूक व योहान यांची पुस्तके) दाखवितात की, माणसांना त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीवर प्रभाव राखता येऊ शकतो असा येशूचा विश्वास होता.
उदाहरणार्थ, येशू म्हणाला की, देवाजवळ “जे मागतात, त्यांना तो चांगल्या देणग्या देईल.” आणि जो माणूस “शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” तसेच, यरुशलेमच्या रहिवाशांनी, त्यांचे जीव वाचू शकणाऱ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्यांचे हे वागणे येशूने नशीबावर टाकले नाही. तर उलट तो म्हणालाः “तुमची इच्छा नव्हती.”—मत्तय ७:७-११; २३:३७, ३८; २४:१३.
यरुशलेमामध्ये झालेल्या एका प्राणघातक अपघाताबद्दल येशूने केलेल्या टिपणावरुन आपल्याला त्याची विचारधारा कळते. तो म्हणालाः “ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो की, नव्हते.” (लूक १३:४, ५) यशूने त्या अठरा जणांच्या मृत्युसाठी नशीबाला जबाबदार ठरवले नाही की, इतरांपेक्षा ते अधिक दुष्ट होते, असेही तो म्हणाला नाही हे लक्षात घ्या. माणसांच्या स्वतंत्र इच्छेच्या श्रद्धेशी दैवाचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या, त्याच्या काळच्या परुशांपेक्षा वेगळे येशूने शिकवले की, माणूस त्याचे व्यक्तीगत भविष्य प्रभावीत करू शकतो.
यासारखेच, येशूच्या प्रेषितांनीही शिकवले की, तारण ही निवड असून सर्वांना साध्य आहे. प्रेषित पौलाने लिहिलेः “तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे . . . ते . . . तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.” तसेच प्रेषित पेत्राने म्हटलेः “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (२ तीमथ्य ३:१५; १ पेत्र २:२; तसेच प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १७:२६, २७ पहा.) जस्टीन, ओरिजेन व आयरीनियस यासारख्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील लेखकांना ‘बिनशर्त नियतीबद्दल काहीच माहीत नव्हते; त्यांनी स्वतंत्र इच्छेबद्दल शिकवले,’ याकडे हेस्टिंग्ज् यांचा एनसाक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स् हा ग्रंथ लक्ष वेधवतो.
पण जेव्हा की, सभोवतालच्या बहुतेक यहुद्यांचा दृष्टीकोण नशीबाच्या प्रकारावर होता तर येशू व सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांचा, माणसाचे नशीब ठरलेले असते असा का विश्वास नव्हता? याचे एक कारण असे की, या कल्पनेत अनेक समस्या आहेत. त्यातील दोन सांगायच्या तरः नशीबवादी दृष्टीकोण यहोवा देवाच्या गुणांविरुद्ध जातो; प्रस्थापित वस्तुस्थिती त्याला खोडून टाकते. शिवाय त्याने तुमचे सध्याचे व भावी जीवन धोक्यात येते. अधिक बारकाईने पाहिल्यास हे कसे होते ते तुम्हाला दिसून येईल.
नशीबाचा सूचित होणारा अर्थ व देवाचे गुण
इ. स. पू. च्या तिसऱ्या शतकात अथेन्समध्ये सिटियमच्या झेनो या तत्ववेत्त्याने आपल्या विद्यार्थ्यांना असे शिकवले की, “तो कोणा अज्ञात रितीने फायद्याचा असावा म्हणून त्यांनी नशीबाच्या हुकुमाचा स्वीकार करावा.” पण जेव्हा, एके दिवशी झेनोला कळले की, त्याच्या गुलामाने चोरी केली आहे तेव्हा झेनोला स्वतःच्याच तत्वज्ञानाला तोंड द्यावे लागले. ते कसे? त्याने चोराला मार दिला तेव्हा त्या गुलामाने ठणकावून उत्तर दिलेः “पण मी चोरी करावी हे माझ्या नशीबातच होते.”
झेनोच्या गुलामाने चांगला मुद्दा मांडला होता. प्रत्येक माणसाचे जीवन आधीच ठरवलेले असते असा तुमचा विश्वास असला तर चोर झाल्याबद्दल माणसाला दोष देणे म्हणजे संत्र्याच्या बीला संत्र्याचे झाड झाल्याबद्दल दोष देण्यासारखे आहे. कारण काही झाले तरी, माणूस व बी दोन्हीही योजनेनुसारच वाढतात. पण अशा युक्तीवादाचा अखेर ध्वनित होणारा अर्थ तो काय?
गुन्हेगार फक्त आपल्या नशीबाप्रमाणे वागले तर त्यांच्या कृत्यांसाठी, त्यांचे नशीब ठरवणारा जबाबदार आहे. तो कोण असू शकेल? नशीबवाद्यांच्या मते, तो स्वतः देव आहे. हा युक्तीवाद बराच पुढे नेल्यास असे दिसते की, माणसाने आजपर्यंत केलेल्या सर्व दुष्टता, हिंसा व जुलमाचे सर्वप्रथम कारण देवच असला पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का?
नेदरलँडमधील एका वेदांतीय नियतकालिकातील लेख नमूद करतो की, अशा नशीबवादी दृष्टीकोणाने “गृहित धरलेली देवाची कल्पना निदान ख्रिश्चनांच्या मते असमर्थनीय आहे.” ते का बरे? कारण ती प्रेरित शास्त्र लेखकांनी सांगितलेल्या देवाच्या कल्पनेच्या विरुद्ध आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहिता या प्रेरित पुस्तकातील ही अवतरणे लक्षात घ्याः “तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस.” “त्याला दुर्जनांचा व आततायी माणसाचा वीट येतो.” “जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो [देवाने नियुक्त केलेला मशीही राजा] मुक्त करील.” (स्तोत्रसंहिता ५:४; ११:५; ७२:१४) तद्वत, हे स्पष्टच दिसते की, नशीबाचा सूचित होणारा अर्थ तसेच देवाचे गुण यांचे आपसात वाकडे आहे.
नशीब व वस्तुस्थिती
परंतु नैसर्गिक आपत्तींचे काय? त्यांचे घडणे दैवानेच किंवा नशीबाने ठरलेले असून टाळता येणे अशक्य नाही का?
वस्तुस्थिती काय सिद्ध करते? एन.आर.सी हँडल्स्ब्लॅड या वृत्तपत्रात नैसर्गिक आपत्तींच्या कारणाबद्दल दिलेल्या एका पाहणीचे अनुमान बघाः “आत्तापर्यंत नेहमी, धरणीकंप, पूर, कडे कोसळणे व वादळ यांना निसर्गाची लहर असे मानले जात असे. परंतु बारकाईने पाहिल्यास, निसर्गामध्ये मानवाने केलेल्या अतिशय हस्तक्षेपामुळे, आपत्तींपासून स्वतःचा बचाव करण्याच्या पर्यावरणाच्या कुवतीवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. परिणामी नैसर्गिक आपत्ती आधीपेक्षा कितीतरी अधिक जिवांचा बळी घेतात.”—तिरप्या अक्षरवळणाचा प्रकार आमचा.
आधीच्या लेखात उल्लेखलेला बांगला देशातील पूर या मुद्याला धरून आहे. शास्त्रज्ञ आता म्हणतात की, “नेपाळ, उत्तर भारत व बांगला देश यामधील जंगलातील विस्तीर्ण प्रदेशाचा नाश हे, गेल्या काही वर्षात बांगला देशात पुरांनी आणलेल्या पीडेचे मोठे कारण आहे.” (व्हॉईस नियतकालिक) जंगलतोडीमुळे बांगला देशात होणाऱ्या पुराचे प्रमाण, ५० वर्षात एक पूर येथपासून ते ४ वर्षात एक पूर, इतके वाढले आहे, अशी दुसरी एक बातमी म्हणते. जगाच्या इतर भागात, मानवी हस्तक्षेपाच्या असल्या कृत्यांमुळे तितकेच अनर्थकारी परिणाम—दुष्काळ, जंगलातील आगी, कडे कोसळणे—झाले आहेत. होय, नैसर्गिक अनर्थाला अनेकदा गूढ नशीब नव्हे तर, मानवी कृत्ये कारणीभूत असतात वा विकोपाला नेतात.
असे असल्याने, मानवी कृत्यांनी उलटे परिणामही झाले पाहिजेत, म्हणजे आपत्ती कमी केल्या पाहिजेत. पण तसे दिसते का? युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड) कळवते की, अनेक वर्षे बांगला देशात खेडोपाडी शेकडो मुले अंधळी झाली. अटळ नशीबामुळे हे झाले का? मुळीच नाही. कुटुंबांना केवळ भातच नव्हे तर फळे व भाज्याही खाऊ घालाव्या याची खात्री युनिसेफच्या कार्यकर्त्यांनी तेथील मातांना पटवल्यानंतर डोळ्याच्या या रोगाची पकड सुटू लागली. आतापर्यत, आहारातील या बदलामुळे बांगला देशातील शेकडो मुले अशा अंधळेपणापासून वाचली आहेत.
तसेच धुम्रपान न करणारे लोक, धुम्रपान करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी तीन ते चार वर्षे अधिक जगतात. मोटारीत प्रवास करणाऱ्यांपैकी खुर्चीचा पट्टा बांधणाऱ्यांना न बांधणाऱ्यांपेक्षा कमी घातक अपघात होतात. नशीब नव्हे तर तुमची स्वतःची कृत्ये तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात हे आता उघड आहे.
नशीबवादी दृष्टीकोणाचे घातक परिणाम
वर म्हटल्याप्रमाणे नशीबवादाने किंवा दैववादाने तुमचे जीवन संपू शकते. ते कसे? नशीबाच्या अधिक भयानक प्रकारच्या उदाहरणांची चर्चा करताना द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन म्हणतोः “वैयक्तीक मानवी जिवांपेक्षा अधिक महत्त्वाच्या मानलेल्या भाग्याच्या (शिक्साल) कल्पनेला प्रतिसाद म्हणून, दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या कारकिर्दीमध्ये एस.एस. (शुट्झ्स्टाफे) बराकीतील आत्महत्त्या व आत्महत्त्येचे जपानी टॉरपेडो हल्ले, आपल्याला माहीत आहेत.” तेच पुस्तक नमूद करते की, अगदी अलिकडेच “मुस्लीम धर्माला ज्यापासून धोका असण्याची कल्पना आहे अशा लक्षांवर धार्मिक भावनेने प्रेरित आत्मघातकी हल्ल्यांच्या बातम्या, नजिकच्या पूर्वेकडील देशातील वृत्तपत्राच्या बातम्यांचे जवळपास नियमित वैशिष्ट्य झाले होते.” अशा बातम्या सांगतात की, “एखादा मरणार नाही असे लिहिले असेल तर त्याला काही इजा होणार नाही” अशी खात्री असल्याने हजारो जवान सैनिक युद्धावर गेले.
परंतु अनेक मान्यवर मुस्लीम शिक्षक अशा अविवेकी वर्तनाला आक्षेप घेतात. उदाहरणार्थ, एक खलीफा म्हणालाः “जो आगीत आहे त्याने स्वतःला देवाच्या मर्जीवर सोपवावे; पण जो अजून आगीत नाही त्याने स्वतःला त्यात झोकून देण्याची गरज नाही.” दुःखाची गोष्ट अशी की, बहुसंख्य सैनिक त्या खलीफाच्या सल्ल्यानुसार वागले नाहीत. जवळजवळ आठ वर्षांच्या लढाईत इराणला ४,००,००० लोक गमवावे लागले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे जितके लोक लढाईत मारले गेले त्याहूनही हे अधिक आहेत! दैववाद तुमचे आयुष्य घटवू शकतो हे उघड आहे. पण त्यामुळे तुमचे जीवनही धोक्यात येऊ शकते. ते कसे?
भविष्य हे भूतकाळाइतकेच अटळ व निश्चित आहे असा विश्वास असल्यामुळे नशिबवादी माणूस सहजगत्या स्वतःमध्ये धोकादायक स्वभाव जडविण्याची शक्यता आहे. कोणता स्वभाव? द एन्सायक्लोपिडिआ ऑफ थिऑलॉजी उत्तर देतोः “अटळ सामाजिक घडामोडींमध्ये आपण एक असहाय्य, क्षूद्र व महत्त्वशून्य चीज आहोत असे . . . त्या व्यक्तीला वाटते. त्यामुळे एका गूढ व सार्वभौम नशीबावर सर्व अवलंबून असते या अंधश्रद्धेला कृतज्ञपणे चिकटून राहणारी निष्क्रियता उत्पन्न होते.”
निष्क्रियता इतकी धोकादायक कशाने होते? अनेकदा त्यामुळे बिघडवणारी अपयशयाची प्रवृत्ती बनते. त्याने, कोठल्याही बाबतीत पुढाकार घेण्यात वा, “अहो, तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. . . . कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीवन वाचेल,” या देवाच्या अद्भूत आमंत्रणाला प्रतिसाद देण्यातही अडथळा येतो. (यशया ५५:१-३) पुढे “येण्यात” व “ऐकण्यात” नशीबावरील श्रद्धेमुळे कसूर झाल्यास, जगभर पुनर्स्थापन होणाऱ्या सुखलोकात अनंत काळ “जीव वाचण्याची” संधि हुकण्यात, त्याची परिणती होईल. केवढी ही मोठी किंमत द्यावी लागणार!
तर मग, तुमची परिस्थिती कशी आहे? तुम्ही वाढलात त्या समाजात लोकांचे विचार नशीबवादी कल्पनांवर आधारलेले असतील तर तुम्हीही तो विश्वास निःशंकपणे स्वीकारला असेल. परंतु तुमचे वर्तमान व भावी जीवन बहुअंशी तुमच्या स्वतःच्या कृत्यांनी घडते हे जाणण्यास, या लेखात चर्चिलेल्या आक्षेपांनी तुम्हाला मदत केली असेल. तुम्ही पाहिल्याप्रमाणे, तर्कबुद्धी, वस्तुस्थिती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र शास्त्र दाखवते त्याप्रमाणे तुम्ही घातक अपयशी प्रवृत्तीच्या आहारी जाऊ नये. या उलट, येशूने आग्रह केलाः “अरुंद दरवाज्याने आत शिरण्याचा निकराचा प्रयत्न करा.” (लूक १३:२४, द एम्फॅटिक डायग्लॉट) पवित्र शास्त्रावरील एक विवेचनकार सांगतातः “तो शब्द [झटून] ग्रीक खेळांपासून घेतलेला आहे. खेळाडू आपल्या शर्यतींमध्ये . . . विजय मिळवण्यासाठी झटत किंवा कळकळीचा प्रयत्न करीत किंवा आपले सर्व बळ एकवटत असत.” जीवनामध्ये अपयशापुढे लोटांगण घालण्यापेक्षा संपूर्ण विजयासाठी तुम्ही झटावे असा आग्रह येशू करीत होता!
या कारणासाठी नशीबवादी किंवा दैववादी निष्क्रियता झटकून टाका. देवाच्या वचनाने प्रोत्साहन दिल्याप्रमाणे जीवनाच्या शर्यतीत भाग घ्या आणि दैववादाला तुमची गती कमी करू देऊ नका. (पहा १ करिंथकर ९:२४-२७.) या प्रेरित आमंत्रणाला विनाविलंब प्रतिसाद देऊन आपली गती वाढवाः “तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील.” तुम्हाला ती निवड कशी करता येईल? “आपला देव यहोवा ह्याच्यावर प्रीती करून, त्याची वाणी ऐकून व त्याला धरुन राहून.” असे केल्यामुळे विजय प्राप्त होईल कारण यहोवा देव “तुमचे जीवन होईल व त्यामुळेच तुम्ही दीर्घायु व्हाल.”—अनुवाद ३०:१९, २०.
[७ पानांवरील चित्रं]
मोशाने नशीबाबद्दल शिकवण दिली नाही. तर त्याने आर्जविलेः “तू जीवन निवडून घे, म्हणजे तू जिवंत राहशील.”