बायबल दैवावरील विश्वासाची शिकवणूक देते का?
बदनामी! निंदा! समाजातील एखाद्या मान्यवर सदस्यास, आपले नाव व प्रतिष्ठा यावर खोट्या वृत्ताकरवी कलंक लावण्यात आला आहे असे वाटते तेव्हा तो या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहात नाही. तो बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कदाचित कायदेशीर कारवाई देखील करील.
दैववाद म्हणजे सर्वसमर्थ देवाविरुद्ध निंदाच आहे. मानवजातीला त्रस्त करणाऱ्या सर्व दुःखांसाठी व दुर्घटनांसाठी देव स्वतः जबाबदार आहे, असा या सिद्धान्ताचा दावा आहे. तुमचा दैवावर विश्वास असल्यास, सबंध विश्वाच्या सार्वभौम व्यक्तीने जणू एक कार्यसूचीच ठरवली असल्याची कदाचित तुम्ही कल्पना कराल, व ती काहीशी पुढीलप्रमाणे असेल: ‘आज, जॉन मोटार दुर्घटनेत जखमी होईल, फाट्यू हिला मलेरियाचा रोग जडेल, मामाड्यू याचे घर वादळात जमीनदोस्त होईल’! अशा देवाची सेवा करण्यास तुम्ही खरोखर प्रेरित व्हाल का?
दैवावर विश्वास ठेवणारे लोक विचारतात, ‘पण आपल्या दुर्दैवांसाठी जर देव जबाबदार नाही, तर मग कोण आहे?’ मागील लेखात उल्लेखलेला तरुण अर्थात उसमान हा देखील याच विवंचनेत होता. तथापि, सत्याचे ज्ञान होण्यासाठी अंदाज किंवा तर्क बांधण्याची त्याच्यावर वेळ आली नाही. देवाने त्याचे प्रेरित वचन अर्थात बायबल यात सापडणाऱ्या शिकवणुकींकरवी स्वतःविरुद्ध करण्यात आलेली निंदा पुसून टाकली आहे हे तो शिकला. (२ तीमथ्य ३:१६) तर मग, आपण याविषयी बायबलच्या दृष्टिकोनावर विचार करू.
जबाबदार कोण?
पूर, वादळे, भूकंप यांपैकी एखादे संकट आल्यास त्यास सहसा “ईश्वराची करणी” म्हटले जाते. तथापि, अशाप्रकारची संकटे देव घडवून आणतो असा संकेत बायबल देत नाही. मध्य पूर्वेत अनेक शतकांपूर्वी घडलेली एक दुःखद घटना अंमळ विचारात घ्या. या संकटातून बचावलेल्या एकुलत्या एका व्यक्तीने दिलेल्या वृत्ताबद्दल बायबल आपल्याला सांगते: “दैवी अग्नीचा [सहसा वीज पडणे हा अर्थबोध देणारी हिब्रू भाषेतील संज्ञा] आकाशांतून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले.”—ईयोब १:१६.
भीतीने कावराबावरा झालेल्या या माणसास देवानेच अग्नीचा वर्षाव केला असे कदाचित वाटले असावे; तरीसुद्धा, बायबल स्पष्ट करते की त्यासाठी देव जबाबदार नव्हता. ईयोब १:७-१२ स्वतः वाचून पाहा व त्यावरून तुम्हाला कळून येईल की ती वीज देवाने नव्हे तर त्याचा शत्रू अर्थात दियाबल सैतान याने पाडली होती! सर्वच दुर्घटना प्रत्यक्ष सैतानाकरवी घडवून आणल्या जातात असे नव्हे. तथापि, देवाला जबाबदार ठरविण्याचे काहीएक कारण नाही हे यावरून स्पष्ट होते.
खरे पाहता, काही अनिष्ट घडते तेव्हा त्यासाठी सहसा स्वतः लोक जबाबदार असतात. शाळेत, कार्यस्थळी किंवा मानवी नातेसंबंधांमध्ये येणारे अपयश हे कदाचित, प्रयत्न किंवा चांगल्या प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे अथवा इतरांबद्दल विचारशील भावनेचा अभाव असल्यामुळे येऊ शकते. तसेच आजारपण, दुर्घटना व मृत्यू देखील दुर्लक्ष झाल्यामुळे घडू शकतात. मोटार चालवताना केवळ सीट बेल्ट लावल्यामुळे दुर्घटनेत ठार होण्याच्या संभावना अतिशय कमी होतात. जर अपरिवर्तनीय “दैव” कार्यरत असते तर सीट बेल्ट लावल्यानेही काही फरक पडला नसता. योग्य वैद्यकीय उपचार व स्वच्छतेमुळे देखील अकाली मृत्यूंची संख्या कमालीची घटते. ज्यांना सहसा “ईश्वराची करणी” म्हणून संबोधले जाते अशा सामान्य आपत्ती देखील खरे पाहता, मानवाच्याच करणीचे अर्थात, पृथ्वीवर मानवाच्या अव्यवस्थेच्या दुःखद परंपरेचे परिणाम असतात.—पडताळा प्रकटीकरण ११:१८.
“समय व प्रसंग”
अनेक दुःखद घटना अशा असतात ज्यांची कारणे स्पष्टपणे दिसून येत नाहीत, हे खरे आहे. तथापि, उपदेशक ९:११ येथील बायबलच्या शब्दांकडे लक्ष द्या: “मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवानांस धाव व बलवानास युद्ध साधत नाही, आणि ज्ञान्यांस अन्न व बुद्धिमंतास धन आणि निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (तिरपे वळण आमचे.) (पंडिता रमाबाई भाषांतर) यामुळेच या दुर्घटनांमागे निर्माणकर्त्याचा हात आहे किंवा दुर्घटनांना बळी पडणाऱ्यांना कोणत्यातरी प्रकारे शिक्षा दिली जात आहे असे समजण्यासाठी काहीही आधार नाही.
स्वतः येशू ख्रिस्ताने देखील दैववादी तर्काविरुद्ध मत मांडले. येशूने त्याच्या श्रोत्यांना सुपरिचित असणाऱ्या एका दुःखद घटनेच्या संदर्भात विचारले: “ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते.” (लूक १३:४, ५) स्पष्टपणे, येशूने या संकटासाठी ईश्वरी हस्तक्षेपास नव्हे तर “समय व प्रसंग” यांस जबाबदार ठरवले.
अपरिपूर्णतेचे विध्वंसकारी परिणाम
तथापि, अज्ञात कारणांमुळे होणारे असंख्य मृत्यू व रोग यांबद्दल काय? बायबल मानवाच्या स्थितीचे अशाप्रकारे सडेतोडपणे वर्णन करते: “आदामामध्ये सर्व मरतात.” (१ करिंथकर १५:२२) आपला पूर्वज आदाम याने अवज्ञेचा मार्ग पत्करला तेव्हापासून मृत्यूने मानवजातीला पीडित केले आहे. देवाने ताकीद दिल्याप्रमाणे, आदाम आपल्या संततीस जणू मृत्यूचा वारसा देऊन गेला. (उत्पत्ति २:१७; रोमकर ५:१२) अशाप्रकारे, शेवटी सर्व रोगांचे मूळ कारण म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज आदाम हाच आहे. आपल्या जीवनात आपण अनुभवतो त्या सर्व निराशा व अपयशांचा देखील आपल्या जन्मजात कमतरतांशी बराचसा संबंध आहे.—स्तोत्र ५१:५.
दारिद्र्याच्या समस्येवर विचार करा. दैवावर विश्वास ठेवल्यामुळे अनेकदा, दारिद्र्याला बळी पडलेले लोक त्यांच्या कष्टमय अस्तित्वासमोर बिनतक्रारपणे मान वाकवण्यास प्रवृत्त झाले आहेत. ‘हेच आमचं नशीब,’ अशी त्यांची समजूत असते. तथापि, बायबल दाखवते, की यासाठी दैव नव्हे तर मानवी अपरिपूर्णता जबाबदार आहे. काही जण आळशीपणामुळे किंवा उपलब्ध साधनांचा अयोग्यपणे वापर केल्यामुळे ‘जे पेरतात त्याचेच त्यांना फळ मिळते,’ व ते निर्धन होतात. (गलतीकर ६:७; नीतिसूत्रे ६:१०, ११) कोट्यवधी लोक दारिद्र्यात जीवन कंठतात कारण सत्तेवर असलेली लोभी माणसे त्यांचा गैरफायदा घेतात. (पडताळा याकोब २:६.) बायबल म्हणते, “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) अस्तित्वात असलेल्या सर्व दारिद्र्याकरता ईश्वराला अथवा दैवाला जबाबदार ठरविण्यासाठी कोणताही पुरावा नाही.
दैवावरील विश्वास —त्याचे अपायकारी परिणाम
दैववादावर विश्वास ठेवणाऱ्यांवर, त्यामुळे होणारा संभाव्य परिणाम, हा दैवावरील विश्वासाविरुद्ध मन वळविणारा आणखी एक युक्तिवाद आहे. येशू ख्रिस्त म्हणाला: “प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते.” (मत्तय ७:१७) आपण दैववादाचे एक “फळ” विचारात घेऊ व ते म्हणजे लोकांच्या जबाबदारीच्या जाणीवेवर होणारा त्याचा प्रभाव.
वैयक्तिक जबाबदारीची हितकर जाणीव असणे अगत्याचे आहे. ही जाणीव, पालकांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना आपले काम इमानदारीने करण्यासाठी, उत्पादकांना दर्जेदार उत्पादन निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. दैवावरील विश्वास या जाणीवेस मंदावू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्याच्या मोटारीची स्टिअरींग यंत्रणा बिघडलेली आहे अशी क्षणभर कल्पना करा. जबाबदारीची आत्यंतिक जाणीव असल्यास, स्वतःच्या जीवनाबद्दल व मोटारीतील प्रवाशांच्या जीवनाबद्दल काळजी असल्यामुळे तो ती बिघडलेली यंत्रणा दुरुस्त करवून घेतो. दुसरीकडे पाहता, दैवावर विश्वास ठेवणारा मात्र, ‘देवाची मर्जी’ असेल तरच काही अनिष्ट घडेल असा तर्क करून कदाचित धोक्याकडे दुर्लक्ष करील!
खरोखर, दैवावरील विश्वास निष्काळजीपणा, आळशीपणा, स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्यास नकार देणे व यांसारख्या इतर अनेक अवांच्छनीय प्रवृत्तींना सहज चालना देऊ शकेल.
देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधात अडसर?
दैवावरील विश्वासाचा सर्वात अपायकारक परिणाम म्हणजे, तो एखाद्याची देवाप्रती असलेल्या कर्तव्याची अथवा जबाबदारीची जाणीव दडपून टाकू शकतो. (उपदेशक १२:१३) स्तोत्रकर्ता सर्व मानवजातीला, “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा,” असे प्रोत्साहन देतो. (स्तोत्र ३४:८) देव त्याच्या चांगुलपणाचा उपभोग घेऊ इच्छितात अशांकडून काही अपेक्षा करतो.—स्तोत्र १५:१-५.
यांपैकी एक अपेक्षा म्हणजे पश्चात्ताप. (प्रेषितांची कृत्ये ३:१९; १७:३०) यात आपल्या चुका कबूल करणे व आवश्यक फेरबदल करणे हे समाविष्ट आहे. अपरिपूर्ण मानव आहोत याअर्थी, आपल्या सर्वांच्या जीवनात असे बरेच काही आहे ज्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप करण्याची गरज आहे. तथापि, आपण दैवाच्या हातातील असहाय्य खेळणे आहोत असा एखाद्याचा विश्वास असल्यास पश्चात्ताप करण्याची गरज ओळखण्यास किंवा स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यास त्यास जड जाते.
स्तोत्रकर्त्याने देवाविषयी म्हटले: “तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे.” (स्तोत्र ६३:३) असे असूनही, दैवावरील विश्वासाने, देवच आपल्या दुःखाचा कर्ता आहे असे कोट्यवधी लोकांना पटवून दिले आहे. साहजिकच, यामुळे अनेकांचे मन देवाच्या संबंधाने कलुषित झाले आहे व याकरवी ते निर्माणकर्त्यासोबत एक खरोखर जिव्हाळ्याचा संबंध राखण्याची संधीच गमावून बसले आहेत. नाही तरी, आपल्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व समस्या व परीक्षांचे कारण असणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रीतीची भावना कशी येऊ शकेल? अशाप्रकारे, दैववाद हा देव व मनुष्य यांमध्ये एक अडसर निर्माण करतो.
दैवाच्या जुलमातून मुक्त
सुरवातीला उल्लेखलेला तरुण उसमान हा एकेकाळी दैवावरील विश्वासाचा गुलाम बनला होता. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांनी बायबलच्या मदतीने त्याच्या विचारसरणीचे मापन करण्यास उसमानला सहाय्य केले तेव्हा तो दैवावरील विश्वासाचा त्याग करण्यास प्रवृत्त झाला. परिणामस्वरूप, त्याला सुटकेची अंतःकरणपूर्वक जाणीव झाली व जीवनाबद्दल एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन लाभला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्याला “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” याअर्थी यहोवाची ओळख झाली आहे.—निर्गम ३४:६.
उसमानला हे देखील समजून आले आहे, की देव आपल्या जीवनाचे प्रत्येक बारीकसारीक तपशील आधीच ठरवत नसला तरीसुद्धा त्याचा भवितव्यासाठी एक उद्देश आहे.a २ पेत्र ३:१३ असे म्हणते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” यहोवाच्या साक्षीदारांनी लक्षावधी लोकांना, या अभिवचनातील ‘नव्या पृथ्वीच्या’ अंतर्गत सर्वकाळ जगण्याची आशा मनात बळकट करण्यास मदत केली आहे. त्यांना तुम्हालाही मदत देण्यास आवडेल.
तुम्ही बायबलच्या अचूक ज्ञानात वाढत जाता तसतसे तुम्हाला कळून येईल की तुमचे भवितव्य तुमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या पूर्वनिश्चित दैवावर विसंबून नाही. प्राचीन इस्राएलांना उद्देशून उद्गारलेले मोशेचे शब्द अगदी यथायोग्यपणे लागू होतात: “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा.” (अनुवाद ३०:१९, २०) होय, तुमच्या भवितव्यासंबंधाने निवड करणे हे तुमच्या हातात आहे; दैवाच्या हातात नव्हे.
[तळटीपा]
a देवाच्या पूर्वज्ञानाविषयी तपशीलवार चर्चेसाठी, टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) जुलै १५, १९८४ अंकातील, पृष्ठे ३-७ वर पाहा.
[७ पानांवरील चित्रं]
ही संकटे म्हणजे ‘ईश्वराची करणी’ नव्हती