तुमच्या जीवनावर नशीबावरील विश्वास नियंत्रण करतो का?
१९८८ च्या सप्टेंबरमध्ये अनर्थ कोसळला. गंगा व ब्रम्हपुत्रेच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशातील पाणी ९ मीटर चढले व त्याने बांगला देशचा पाऊण प्रदेश गिळला. हजारो लोक बुडून मेले. जवळजवळ ३,७०,००,००० लोक बेघर झाले. ६०,००० पेक्षा अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते नाहीसे झाले.
बांगला देशात असे पूर वारंवार येत असल्याने एका बातमीपत्राने त्या देशाला “नाशाचा त्रिभुज प्रदेश” असे म्हटले. ते वर्णन, अशा धक्कादायक अनर्थांचे काय कारण असावे याबद्दल, लोकांच्या दृष्टीकोणाचे प्रतिबिंब आहेः नाश अथवा नशीब, किंवा दैव.
जीवनावर नशीबाचे वर्चस्व नाही असे काही लोकांना वाटत असले तरी दैववादी दृष्टीकोण जगभर पसरलेला आहे. तर मग, अनेक लोक नशीबावर का विश्वास ठेवतात आणि नशीब किंवा दैव म्हणजे काय?
धर्माची भूमिका
नशीबासाठी असणारा इंग्रजी शब्द “फेट्” लॅटिन भाषेतील फॅटम् पासून आला आहे; त्याचा अर्थ “जे सांगण्यात आले आहे” असा आहे.a दैववाद्यांची अशी श्रद्धा आहे की, घटना पूर्वीपासूनच ठरलेल्या असतात व त्यांना बदलण्याची शक्ती माणसापाशी नाही. ही कल्पना वेगवेगळ्या धर्मांनी पसरवलेली आहे व त्याने लाखो श्रद्धाळू लोकांचा दृष्टीकोण घडला आहे. जगातील सर्वात मोठ्या तीन धर्मांकडे दृष्टीक्षेप टाकल्यास असे दिसून येते की, हिंदूंची मंदिरे, मुस्लीमांच्या मशिदी आणि ख्रिस्ती धर्मजगतातील चर्च इमारती जसे वेगवेगळे आकार धरुन आहेत तसेच नशीबाबद्दलही वेगवेगळ्या रुपाच्या कल्पना आहेत.
उदाहरणार्थ, जगातील ९० कोटी मुसलमानांची कल्पना आहे की, ईश्वरी इच्छेने नशीब (किस्मत) ठरवले जाते.b कुराण म्हणतेः “आम्ही अस्तित्वात आणण्यापूर्वी ती [वाईट घटना] एका पुस्तकात असते. . . . त्या आधी वाईट घटना पृथ्वीवर घडत नाही.” “अल्लाच्या परवानगीशिवाय जीव मरणार नाही, त्याची मुदत ठरलेली आहे.”—सुरा ५७:२२; ३:१४५.
नशीबाचे दुसरे रुप, जगाच्या जवळजवळ ७० कोटी हिंदूंच्या जीवनावर प्रभाव करून आहे. ते म्हणते की, कर्म हा कार्य-कारणाचा नियम आहे. असा समज आहे की, एखाद्या हिंदूच्या आताच्या जीवनातील घटना त्याच्या पूर्वजन्मातील कृत्यांनी ठरतात. गरुड पुराण हा एक प्राचीन हिंदू ग्रंथ म्हणतोः “या व्यक्तीच्या पूर्व अस्तित्वातील कर्मांनी पुढील जन्मातील त्याची योनी तसेच त्याला होणाऱ्या रोगांचा—शारीरिक वा मानसिक—प्रकार ठरतो. नशीबाने ठरले असेल तेच मनुष्याला त्याच्या जीवनात मिळते.”
पण, ख्रिस्ती धर्मजगतामधील १७० कोटी लोकांचे काय? हे खरे की, ख्रिस्ती धर्मजगतातील काही नशीबाऐवजी देव आणि दैववादाऐवजी नियतीला मानतात. पण, एनसाक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स कबूल करतोः “ख्रिस्ती धर्म नशीबावरील श्रद्धेपासून पूर्ण मुक्त आहे असे म्हणता येत नाही.” १६ व्या शतकातील सुधारक मार्टिन ल्युथरचे पडसाद अजूनही काही पंथात ऐकू येतात की, माणूस “एखाद्या लाकडाच्या तुकड्याइतका, खडकाइतका, मातीच्या गोळ्याइतका किंवा मिठाच्या खांबाइतका अमुक्त आहे.”
नाणे फेकणे व ग्रह पाहणे
अशा कल्पना आता ख्रिस्ती धर्मजगताच्या श्रद्धांच्या प्रमुख प्रवाहापासून बाजूला पडलेल्या असल्या तरी एक वेदांतीय गृहस्थ हे कबूल करतात की, त्याचे अनेक सभासद अजूनही या श्रद्धेचा ‘धर्मनिरपेक्ष रुपात’ स्वीकार करतात. या प्रकारात नशीबाचा मुखवटा कदाचित स्मिताची झलक दाखवील व त्याला सुदैव असे ख्रिस्ती नामकरण देईल. दैवाला किंवा नशीबाला कौल लावण्यासाठी कधीमधी नाणे फेकणारे अनेक लोक तुम्हाला बहुधा माहीत असतील. हा एक निव्वळ रिवाज आहे अशी ते बतावणी करतील, तरी ते तसे करत राहतात आणि काही वेळा त्यामुळे काम होते असे त्यांना वाटते. उदाहरणार्थ, द न्यूयॉर्क टाइम्सने नुकतीच बातमी दिली की, अमेरिकेत राहणाऱ्या एका माणसाने लॉटरीची तिकिटे विकत घेतल्यावर छाप वर असलेले एक नाणे त्याला सापडले. तो म्हणालाः “जेव्हा केव्हा छाप वर असलेले नाणे मला सापडले आहे तेव्हा दर वेळेला मला काहीतरी लाभ झाला आहे.” या वेळेला त्याने २ कोटी ५७ लाख डॉलर्स जिंकले. आता तुम्हाला काय वाटते, याचा सुदैव, किंवा नशीबावरील विश्वास कमी झाला?
नाणे फेकण्याबद्दल काही लोक गालातल्या गालात मिष्किलपणे हसतील. पण त्यांचे भविष्य ग्रहांच्या गतीमुळे पूर्वनियोजित आहे असा त्यांचा विश्वास कदाचित असेल. हा आणखी एक नशीबाचा मुखवटा. केवळ उत्तर अमेरिकेतच जवळजवळ १,२०० वर्तमानपत्रात फल-ज्योतिषांचे रकाने असतात. एका चाचणीत असे दिसून आले की, अमेरिकेतील ५५ टक्के युवकांना, फल-ज्योतिष लागू पडते असे वाटते.
होय, त्याला किस्मत, कर्म, दैव, सुदैव वा ग्रह म्हणा, नशीबावरील श्रद्धा जगभर पसरलेली आहे व ती कित्येक युगांपासून आहे. तथापि, तुम्हाला हे माहीत आहे का की, शेजारी उल्लेखिलेल्या व्यक्तींमधील केवळ एकाचाच दैवावर विश्वास नव्हता? तो कोण आहे? आणि त्याला वाटणाऱ्या दृष्टीकोणाचा तुम्ही नशीबाबद्दल बाळगलेल्या दृष्टीकोणावर कसा परिणाम होऊ शकतो?
[तळटीपा]
a द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन, खंड ५, पृष्ठ २०९ वर म्हणते: “फेट्. हा शब्द लॅटिन फॅटम् (काहीतरी सांगितलेले, एक भविष्यवादित घोषणा, दैवी उत्तर, ईश्वरी निश्चय) यापासून घेतला गेला.”
b “नशीब व किस्मत यामध्ये फरक एवढाच की, किस्मत एका सर्वसमर्थ इच्छेनुसार आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या सर्व मानवी याचिका फोल आहेत.”—हेस्टिंग्ज यांचा एनसाक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स्, खंड ५, पृ. ७७४.
[४ पानावरील चौकट]
दैवावर कोणाचा विश्वास होता?
मस्करीपुत्र गोशाल भारतीय ऋषी, इ.स.पू. ६वे/५वे शतक.
सिटियमचा झेनो ग्रीक तत्ववेत्ता, इ.स.पू. ४थे/३रे शतक.
पब्लियस व्हर्जिलियस मॅरो रोमन कवी इ.स.पू. १ले शतक.
येशू ख्रिस्त ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, १ले शतक.
सफवान पुत्र जाहं मुस्लीम शिक्षक इ.स. ८वे शतक.
जॉन कॅल्विन फ्रेंच तत्ववेत्ता व सुधारक, इ.स. १६वे शतक.