बातम्यांवरील दृष्टीकोण
“अतिशय घातक पदार्थ”
रक्त संक्रमणाद्वारे अतिशय घातक आजार झालेल्या रुग्णांनी न्यायालयात खटला दाखल करून रक्तपेढ्यांना नव्यानेच अधिक चिंतेत टाकले आहे. अमेरिकेत १९८९ च्या मध्यापर्यंत जवळजवळ ३०० खटले दाखल झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकन सहकारी रक्तपेढ्यांचे कार्यकारी संचालक गिल्बर्ट क्लार्क यांनी म्हटले की, “जनतेला आता पूर्णतया सुरक्षित रक्त हवे आहे,” पण यासोबत ते हेही कबूल करतात की, याची खात्री मात्र देता येत नाही.
त्याचप्रमाणे परेड मॅगझीन कळविते की, रक्त विशेषज्ञ डॉ. चार्लस् हगिन्स हे कबूल करतात की, “रक्त हे असुरक्षित आहे हे अपरिहार्यतेने लक्षात घेतले गेले पाहिजे.” ते रक्ताचे, “औषधातील सर्वात घातक पदार्थ,” असे वर्णन करतात. १९८९ च्या सुरवातीपासून रक्तपेढ्या ज्या संसर्गजन्य रोगांची मिमांसा करीत आहेत त्यांची संख्या ५ पर्यंत वाढली आहे (HTLV-1, याचा संबंध प्रौढातील टी-पेशी ल्युकेमिया, सिफिलीस, हेपाटीटीस बी, एडस् आणि हेपाटीटीस सी). तथापि, अमेरिकन रेड क्रॉस अधिकारी एस्. गेरल्ड सँडलर यांच्या मते “रक्तसंक्रमणाने होणारा अजूनही एखादा दुर्मिळ रोग सापडू शकेल, पण कधी ते पहायचे आहे.” एवढी प्राणघातक संभाव्यता असताना सुद्धा १९९० मध्ये उत्तर अमेरिकेत राहणारे चाळीस लाख लोक संक्रमण घेतील असा अंदाज काढण्यात आला. वर्तमानपत्राचे स्तंभलेखक डब्ल्यू. गिफर्ड-जोन्स यांच्या म्हणण्यानुसार समस्या ही आहे की, “यहोवाच्या साक्षीदारांशिवाय इतर रूग्ण रक्त संक्रमणाविषयी कधीच चर्चा करीत नाही.”
प्रे. कृत्ये १५:२८, २९; २१:२५ मधील देवाच्या आज्ञेनुसार यहोवाचे साक्षीदार कित्येक दशकांपासून रक्तसेवनाच्या कसल्याही प्रकारापासून स्वतःला दूर ठेवतात. संक्रमणाद्वारे उद्भवणाऱ्या भयानक रोगांची लागण होण्यापासून त्यांना जे संरक्षण यामुळे मिळत आहे ते केवळ हेच स्पष्ट करते की, यहोवा देवाच्या कायद्यांना आज्ञाधारक राहणे हे किती बरोबर आहे.
अदृश्य, दखल न घेतलेला?
एक वादग्रस्त व्यक्तीत्व, जोआकिम कार्डीनल मेन्सर यांची फेब्रुवारी १९८९ मध्ये जर्मनीत कोलनचे आर्चबिशप म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी अलिकडेच म्हटले की, चर्च एके दिवशी “नाहीसे होईल व त्याची समाजामार्फत दखल देखील घेतली जाणार नाही,” अशी मोठी भीती त्यांना वाटते. हेईंच पोस्ट या जर्मन वर्तमानपत्रानुसार मेन्सर म्हणालेः “समाज चर्चकडे क्षुल्लक रुपाने बघत आहे हे बघून माझा जीव फारच दुःखी झाला आहे.” त्यांच्या मतानुसार यामागील कारण हे असावे की, “आम्ही जगाविषयी बरेच बोलतो, पण स्वर्गाविषयी तितके बोलत नाही, वर्तमानकाळाबद्दल अधिक, पण अनंतकाळाविषयी फारच कमी बोलतो.”
जागतिक समस्यांचे निराकरण होण्यासाठी स्वर्गीय सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी पृथ्वीवरील राजकीय व व्यापारी घटकांशी मैत्री करून ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांनी, आपण देवाच्या आस्थेची जोपासना करीत आहोत ह्या दाव्याविषयी उघडपणे लबाडी केली आहे. यामुळे गंभीर परिणाम निश्चितच घडणार. पवित्र शास्त्रानुसार सर्व खोटे धर्म नाहीसे होणार आहेत. ही अशी घटना आहे जी, “पृथ्वीवरील राजे” आणि “पृथ्वीवरील व्यापारी” यांच्याकडून दुर्लक्षिली जाणार नाही. ही घटना घडल्यामुळे ते व्यापारी शोक करतील. यास्तव, धार्मिकतेसंबंधाने प्रेम बाळगणाऱ्यांनी या शब्दांनुरुप त्वरेने हालचाल केली पाहिजेः ‘तुम्ही त्यांच्या पापांचे वाटेकरी होऊ नये व तुम्हाला त्यांच्या पिडातील कोणतीही पिडा होऊ नये म्हणून त्यांच्यामधून [खोट्या धर्मातून] निघा.”—प्रकटीकरण १८:४, ९, ११.