वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १/१ पृ. २०-२४
  • यहोवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्तिकांची हालचाल सुरु होते
  • छळात देखील दृढ विश्‍वास
  • एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचा निकाल लागतो
  • दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेस आरंभ होतो
  • शांतीने प्रगति
  • ख्रिस्ती सुवार्तिक कार्याचा प्रेरित नमुना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • “आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • बर्णबा—‘सांत्वनाचा पुत्र’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १/१ पृ. २०-२४

यहोवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले

“मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.”—प्रे. कृत्ये १६:५.

१. देवाने प्रेषित पौलाचा कसा वापर केला?

यहोवा देवाने तार्ससच्या शौलाला “निवडलेले पात्र” या अर्थी उपयोगात आणले. पौलास प्रेषित या नात्याने “किती तरी दुःख सोसावे लागले.” पण त्याच्या तसेच इतरांच्या कामामुळे यहोवाच्या संस्थेला ऐक्य आणि प्रचंड वाढीचा अनुभव घेता आला.—प्रे. कृत्ये ९:१५, १६.

२. प्रे. कृत्ये १३:१–१६:५ याचा विचार करणे का लाभदायक ठरेल?

२ विदेशी लोक वाढत्या संख्येने ख्रिस्ती होत होते; शिवाय नियमन मंडळाच्या एका महत्त्वपूर्ण सभेने देवाच्या लोकांमध्ये ऐक्य वाढविण्यासाठी तसेच या सर्वांना विश्‍वासात दृढ करण्यास मोठा हातभार लावला. प्रे. कृत्ये १३:१–१६:५ मधील या तसेच इतर अहवालांचा विचार करणे खरेच लाभदायक ठरू शकेल. कारण यहोवाचे साक्षीदार देखील आता अशीच वाढ व आध्यात्मिक आशीर्वादांचा अनुभव घेत आहेत.—यशया ६०:२२.

सुवार्तिकांची हालचाल सुरु होते

३. “संदेष्टे व शिक्षक” यांनी अंत्युखियात कोणते काम केले?

३ सुरियातील अंत्युखियाच्या मंडळीने माणसे पाठवून विश्‍वासधारकांचा विश्‍वास दृढ केला. (१३:१-५) अंत्युखिया येथे बर्णबा, शिमोन (निग्र), लूक्य कुरेनेकर, मनाएल व तार्ससचा शौल हे “संदेष्टे व शिक्षक” होते. संदेष्ट्यांनी देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण दिले आणि घटनांचे भाकित केले, तर शिक्षकांनी पवित्र शास्त्र वचनांतून तसेच ईश्‍वरी आचरणाविषयी सूचना दिल्या. (१ करिंथकर १३:८; १४:४) बर्णबा व शौल यांना खास नेमणूक मिळाली. ते बर्णबाचा नातलग मार्क याला सोबत घेऊन कूप्र येथे गेले. (कलस्सैकर ४:१०) त्यांनी सलमीना या पूर्वेकडील बंदरात असणाऱ्‍या सभास्थानात प्रचार केला, पण येथे यहुद्यांनी चांगला प्रतिसाद दाखविला होता असा काही अहवाल नाही. ते भौतिकदृष्ट्या संपन्‍न होते त्यामुळे मशीहाची त्यांना केवढी गरज वाटणार?

४. कुप्र येथे सुवार्तिकांनी आपला प्रचार जारी ठेवला तेव्हा काय घडले?

४ कुप्रात चाललेल्या इतर साक्षीकार्यावर देवाने आशीर्वाद पाठविला. (१३:६-१२) पफेस येथे या सुवार्तिकांना बर्येशू (अलीम) हा जादूगार व खोटा संदेष्टा भेटला. याने जेव्हा सिर्ग्य पौल या अधिकाऱ्‍याला देवाचे वचन ऐकण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शौलाने पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन म्हटलेः “अरे, सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पुत्रा, अवघ्या अधार्मिकतेच्या वैऱ्‍या, तू यहोवाचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?” तेव्हा देवाने आपल्या हाताने अलीमला काही काळ अंधळे केले; तेव्हा सिर्ग्य पौलाने “यहोवाच्या शिक्षणाचे आश्‍चर्य मानून विश्‍वास धरिला.”

५, ६. (अ) पिसिदिया येथील अंत्युखियाच्या सभास्थानात पौलाने बोलणी केली तेव्हा त्याने येशूविषयी काय म्हटले? (ब) पौलाच्या भाषणाने काय परिणाम घडला?

५ कुप्रमधून हा गट आशिया मायनर येथील पिर्गा या शहरी गेला. पौल व बर्णबा हे बहुधा उत्तरेकडील डोंगरवाटेने ‘नद्यांवरची संकटे व लुटारुंची संकटे’ सहन करीत पिसिदिया येथील अंत्युखिया येथे गेले. (२ करिंथकर ११:२५, २६) तेथे पौलाने सभास्थानात भाषण दिले. (१३:१३-४१) त्याने इस्राएलांबरोबरीच्या देवाच्या दळणवळणाची उजळणी केली आणि दाविदाचा वारस येशू तारणारा आहे अशी ओळख दिली. यहुदी धर्मनेत्यांनी येशूच्या मृत्युची मागणी केली तरी देवाने त्यांच्या पूर्वजांस दिलेल्या अभिवचनास स्मरुन त्याचे पुनरुत्थान केले. (स्तोत्रसंहिता २:७; १६:१०; यशया ५५:३) देवाने ख्रिस्तामार्फत तारणाची ही देणगी देऊ केली होती त्याविषयीची थट्टा करू नये असा पौलाने इशारा दिला.—हबक्कुक १:५, सेप्ट्युजंट.

६ आज जसे यहोवाच्या साक्षीदारांद्वारे दिल्या जाणाऱ्‍या जाहीर भाषणाकरवी लोकांत आस्था निर्माण होते त्याचप्रमाणे पौलाच्या वक्‍तव्यामुळे लोकांत आस्था जागृत झाली. (१३:४२-५२) पुढल्या शब्बाथ दिवशी तर जवळजवळ सर्वच शहर यहोवाचे वचन ऐकण्यास आले; यामुळे यहुद्यांना त्वेष चढला. खरे म्हणजे, या सुवार्तिकांनी केवळ एकाच आठवड्यात इतक्या विदेश्‍यांचे परिवर्तन केले होते की या प्रमाणात यहुद्यांचे परिवर्तन त्यांनी आपल्या सबंध आयुष्यात केले नव्हते! यहुद्यांनी पौलाची निंदा चालविली व त्याच्या म्हणण्याचा विपर्यास केला तेव्हा आता आध्यात्मिक प्रकाश दुसरीकडे पाडण्याची वेळ आहे हे त्याने लक्षात घेतले व त्यांना म्हटलेः “ज्या अर्थी तुम्ही देवाच्या वचनाचा अव्हेर करता व आपणास सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता, त्या अर्थी पाहा, आम्ही विदेशी लोकांकडे वळतो.”—यशया ४९:६.

७. पौल व बर्णबा यांनी छळाविषयी कोणती प्रतिक्रिया दाखवली?

७ आता विदेश्‍यांना आनंद होऊ लागला आणि सार्वकालिक जीवनाविषयी योग्य मनोदय राखणाऱ्‍यांचा बाप्तिस्मा झाला. जसजसे त्या देशात यहोवाचे वचन अधिकाधिक गाजविले गेले तसतसे यहुद्यांनी कुलीन स्त्रियांना (बहुधा आपले पति व इतरांना दबाव घालावा म्हणून) व मुख्य पुरुषांना चिथावले. पौल व बर्णबा यांना छळावे व त्यांच्या नगराबाहेर घालवून द्यावे यासाठी चिथावणी दिली. पण यामुळे सुवार्तिकांनी आपले काम बंद केले नाही. त्यांनी ‘आपल्या पायांची धूळ झटकली,’ व ते गलतीया या रोमी प्रांतातील प्रमुख शहर इकुन्या (आजचे कोनया) येथे गेले. (लूक ९:५; १०:११) पण मग, पिसिदिया येथील अंत्युखियामध्ये जे शिष्य मागे राहिले होते त्यांचे काय? त्यांना विश्‍वासात दृढ बनविले गेल्यामुळे ते “आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.” यामुळे आपल्याला हे दिसते की, विरोध जरी झाला तरी त्यामुळे आमची आध्यात्मिक प्रगती खुंटता कामा नये.

छळात देखील दृढ विश्‍वास

८. इकुन्यात साक्षीकार्याला यश लाभल्यामुळे काय घडले?

८ छळ सामोरा आला तेव्हा पौल व बर्णबा यांनीही आपला विश्‍वास दृढ असल्याचे दाखविले. (१४:१-७) इकुन्याच्या सभास्थानात प्रचार केल्यामुळे पुष्कळ यहुदी व ग्रीक लोकांनी विश्‍वास धरिला. जेव्हा विश्‍वासहीन यहुद्यांनी विदेश्‍यांना नव्या विश्‍वासधारकांविरुद्ध चिथाविले तेव्हा या दोन श्रमिकांनी देवाच्या अधिकाराने जोरदार भाष्य केले; शिवाय देवाने यांना अद्‌भुत चिन्हे घडवून आणण्यास आपले सामर्थ्य दिले. यामुळे जमावात दुफळी झाली; काही यहुद्यांच्या बाजूने तर बाकीचे प्रेषितांच्या (पाठवलेल्यांच्या) बाजूने झाले. प्रेषित भित्रे नव्हते तर, त्यांना दगडमार करण्याचा यहुद्यांचा बेत आहे असे कळले तेव्हा ते आशिया मायनरमधील दक्षिण गलतियाच्या लुकवनिया हा भाग सोडून गेले. आपणही चाणाक्ष राहिलो तर विरोध होतो तेव्हा आपल्याला देखील उपाध्यपणात क्रियाशील राहता येईल.—मत्तय १०:२३.

९, १०. (अ) एका पांगळ्या माणसाला बरे केल्यावर लुस्त्रच्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? (ब) पौल व बर्णबा यांनी लुस्त्रमध्ये कोणता प्रतिसाद दाखविला?

९ लुकवनियाचे पुढील शहर लुस्त्र याला आता साक्ष मिळाली. (१४:८-१८) येथे पौलाने जन्मापासून पांगळे असलेल्या एका माणसाला बरे केले. या चमत्कारास यहोवा जबाबदार होता हे न जाणून जमावाने ओरड केलीः “देव मनुष्यांच्या रुपाने आम्हाकडे उतरले आहेत!” हे लोकांनी लुकवनिया भाषेत म्हटल्यामुळे बर्णबा व पौलाला काय चालले आहे ते समजले नाही. पौलाने बोलण्यात पुढाकार घेतला होता म्हणून लोकांनी त्याला हर्मस (मर्क्युरी; देवांचा प्रभावी संदेशवाहक) व बर्णबाला झेऊस (ज्युपितर), ग्रीक देवाचा प्रमुख असे संबोधिले.

१० झेऊसच्या पुजाऱ्‍याने तर पौल व बर्णबा यांना यज्ञार्पणे वाहावी यासाठी एक बैल व माळा आणल्या. यावेळी सर्वसाधारण ग्रीक भाषेत किंवा अनुवादकाचा वापर करून या पाहुण्यांनी लगेच लोकसमुदायास सांगितले की, ते देखील त्यांच्याप्रमाणेच अपूर्ण लोक आहेत व ते सुवार्तेची घोषणा अशासाठी करीत होते की, लोकांनी “निरर्थक गोष्टी” (निर्जिव देव, किंवा मूर्त्या) सोडून देऊन जिवंत देवाकडे वळावे. (१ राजे १६:१३; स्तोत्रसंहिता ११५:३-९; १४६:६) होय, देवाने (यहुद्यांना नव्हे तर) विदेशी राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालण्याची मुभा गतकाळी दिली; पण त्याने त्यांच्याविषयी स्वतःला साक्षीविरहीत तसेच ‘पर्जन्य व फलदायक ऋतु देण्यात आणि अन्‍नाने व हर्षाने त्यांचे मन भरून तृप्त करण्यात’ आपला चांगुलपणा दाखविण्यामध्ये सोडले नव्हते. (स्तोत्रसंहिता १४७:८) इतके बोलणे केले तरी बर्णबा व पौलाला, लोकांना यज्ञ करण्यापासून मोठ्या मुष्किलीने आवरता आले. होय, त्या सुवार्तिकांनी स्वतःची देव म्हणून भक्‍ती करवून घेतली नाही; तसेच अशा अधिकाराचा वापर ख्रिस्ती धर्म त्या वसाहतीत लादण्यात केला नाही. किती हे चांगले उदाहरण! यहोवाने त्याच्या सेवेत आपल्याला जे काही उरकण्याची मुभा दिली आहे त्याविषयी आपल्याला जर श्रेष्ठ बनल्याचे वाटत असेल तर या उदाहरणास लक्षात आणावे.

११. “आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते,” या विधानाकडून आपल्याला काय शिकायला मिळते?

११ एकाएकी, छळाने आपले डोके वर काढले. (१४:१९-२८) ते कसे बरे? पिसिदियातील अंत्युखिया व इकुन्या येथील यहुद्यांनी चिथावल्यामुळे जमावाने पौलाला दगडमार केला व तो मेला आहे असे समजून त्यांनी त्याला शहराबाहेर ओढून आणले. (२ करिंथकर ११:२४, २५) पण शिष्य भोवती गोळा झाल्यावर तो उठला आणि लुस्त्रमध्ये कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने, बहुधा रात्रीच्या काळोखात, पोंचला. दुसऱ्‍या दिवशी तो व बर्णबा दर्बेला गेले; येथे बरचे शिष्य झाले. लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया येथे परत भेट देताना सुवार्तिकांनी शिष्यांना विश्‍वासात राहण्यासाठी स्थिर केले व म्हटले की, “आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते.” ख्रिस्ती आहोत म्हणून आपल्याला देखील त्रास हा होणारच; पण तो आल्यावर आम्ही आपल्या विश्‍वासाची हातमिळवणी करता कामा नये. (२ तीमथ्य ३:१२) यावेळी मंडळ्यातून वडीलांची नियुक्‍ती करण्यात आली व यांना पौलाने गलतीकरांस जे पत्र लिहिले होते ते लिहिण्यात आले.

१२. पौलाने आपली पहिली सुवार्तिक यात्रा संपविली तेव्हा दोघा सुवार्तिकांनी काय कले?

१२ पिसिदियातून जाताना पौल व बर्णबा यांनी पंफुल्यातील प्रमुख शहर पिर्गा येथे देवाचे वचन सांगितले. काही काळातच ते सुरियातील अंत्युखियास परतले. पौलाची पहिली यात्रा संपली; दोघा सुवार्तिकांनी मंडळीला “देवाने त्यांच्याकरवी काय काय घडवून आणले व त्याने विदेशी लोकांकरिता विश्‍वासाचे दार कसे उघडले हे सांगितले.” अंत्युखियातील शिष्यांसमवेत काही काळ देण्यात आला व यामुळे निःसंशये त्यांना विश्‍वासात दृढ करण्यात आले. आज विभागीय देखरेख्यांच्या भेटीमार्फत देखील असाच परिणाम घडवून आणला जातो.

एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नाचा निकाल लागतो

१३. ख्रिस्ती धर्माचे इब्री तसेच यहुद्देतरांमध्ये विभाजन न घडण्यासाठी काय करण्याची गरज होती?

१३ विश्‍वासात दृढता येण्यासाठी विचाराची ऐक्यता असावयास हवी. (१ करिंथकर १:१०) ख्रिस्ती धर्माचे विभाजन इब्री तसेच यहुद्देतर गटात व्हावयाचे नाही तर मग, देवाच्या संस्थेत घोळक्याने येणाऱ्‍या विदेश्‍यांनी मोशाच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची तसेच सुंता करून घेण्याची गरज आहे का याविषयीचा निर्णय ठरविण्याचे अगत्याचे होते. (१५:१-५) यहुदीयातील काही माणसे आधीच सुरियाच्या अंत्युखियात आली होती व त्यांनी विदेशी विश्‍वासधारकांना हे शिक्षण देणे आरंभिले होते की, त्यांची सुंता झाल्याविना त्यांना तारण मिळू शकणार नाही. (निर्गम १२:४८) यासाठीच, यरुशलेम येथे असणारा वडीलवर्ग व प्रेषित यांच्याकडे पौल, बर्णबा व इतरांची रवानगी झाली. येथेही पूर्वीचे परुशी असणारे कायदेपंडीत पण आता विश्‍वास ग्रहण केलेले लोक देखील विदेश्‍यांना सुंता करून घेण्याची व नियमशास्त्र आचरणात आणण्याची गळ घालीत होते.

१४. (अ) यरुशलेमातील परिषदेत वादविवाद झाला तरी कोणते चांगले उदाहरण मांडण्यात आले? (ब) त्या प्रसंगी पेत्राने जो विवाद मांडला त्याचा सारांश काय होता?

१४ या प्रकरणात देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक परिषद भरविण्यात आली. (१५:६-११) होय, तेथे वादविवाद झाला, पण भांडण पेटले नाही; कारण दृढ आत्मविश्‍वास राखणाऱ्‍या लोकांनी संयमाने तेथे बोलणी केली—हे आज वडीलांसाठी उत्तम उदाहरण आहे! पेत्र म्हणालाः ‘माझ्या मुखाने विदेशी लोकांनी [जसे की, कर्नेल्य] सुवार्ता ऐकून विश्‍वास धरावा म्हणून . . . देवाने निवड केली. आंतरसाक्षी देवाने आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांजविषयी साक्ष दिली; व त्याने त्यांच्या व आपल्यामध्ये काही भेद ठेविला नाही. [प्रे. कृत्ये १०:४४-४७] असे असता जे जू [नियमशास्त्र पाळण्याचे बंधन] आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? जसे त्यांचे तसे आपलेही [शरीरदृष्ट्या यहुदी असणाऱ्‍यांचे] प्रभु येशूच्या कृपेने तारण होईल, असा आपल्याला विश्‍वास आहे.’ देवाने बेसुंती लोकांचा स्वीकार केला होता ही गोष्टच दाखविते की, तारणासाठी सुंता करण्याची व नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज राहिली नाही.—गलतीकर ५:१.

१५. याकोबाने कोणते मूळ मुद्दे सांगितले, आणि विदेशी ख्रिस्तीजनांना काय लिहून कळवावे असे त्याने म्हटले?

१५ पेत्राचे भाषण संपल्यावर मंडळी स्तब्ध झाली. पण अजूनही सांगायचे बाकी होते. (१५:१२-२१) बर्णबा व पौल यांनी, ते विदेश्‍यांमध्ये कार्य करीत असता देवाने कोणकोणती चिन्हे घडवून आणली ते सांगितले. मग, येशूचा दूधभाऊ याकोब, जो परिषदेचा अध्यक्ष होता, त्याने म्हटलेः ‘विदेशी लोकातून आपल्या नामाकरिता लोक काढून घ्यावे म्हणून देवाने आपले लक्ष त्यांच्याकडे कसे वळवले हे शिमोनाने [पेत्राचे इब्री नाव] सांगितले आहे.’ याकोबाने सूचित केले की, “दाविदाचा डेरा” (दाविदाच्या मालिकेतील राज्यपदाची पुनर्स्थापना) याची भाकित करण्यात आलेली पुनः बांधणी ही यहुदी तसेच विदेशी लोकातून येशूच्या शिष्यांचे (राज्य वारीसांचे) जे एकत्रीकरण करण्यात आले आहे त्याच्या पूर्णतेनुसार आहे. (आमोस ९:११, १२, सेप्ट्युजंट; रोमकर ८:१७) देवाने हे योजिले आहे तर शिष्यांनी त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. याकोबाने सुचविले की, विदेशी ख्रिस्तीजनांना हे लिहून कळवावे की, त्यांनी (१) मूर्तीकरवी विटाळ झालेल्या गोष्टी, (२) जारकर्म, आणि (३) रक्‍त तसेच जे गुदमरुन मारले आहे त्यापासून दूर राहावे. हे मनाईहुकुम मोशेच्या लिखाणात होते व ते सभास्थानात दर शब्बाथ दिवशी वाचून दाखविण्यात येत असत.—उत्पत्ती ९:३, ४; १२:१५-१७; ३५:२, ४.

१६. पहिल्या शतकातील नियमन मंडळाने कोणत्या तीन गोष्टींविषयीचे मार्गदर्शनपर पत्र लिहिले, जे आजही उपयुक्‍त आहे?

१६ मग, नियमन मंडळाने अंत्युखिया, सुरीया व किलिकिया येथील विदेशी ख्रिस्तीजनांना पत्र पाठविले. (१५:२२-३५) पवित्र आत्मा तसेच पत्र लेखकांनी मूर्तीला अर्पिलेल्या गोष्टी; रक्‍त (जे काही लोक नियमित रुपाने घेत होते); रक्‍त वाहू न देता गुदमरून मारण्यात आलेल्या गोष्टी (पुष्कळ मूर्तिपूजकांना अशा प्रकारातील मांस मोठ्या चवीचे वाटे); आणि जारकर्म (ग्रीक, पोर्निʹआ, शास्त्रवचनीय विवाहाबाहेरील निषिद्ध लैंगिक संबंध) या गोष्टी वर्ज्य करण्यास सांगितल्या. अशाप्रकारच्या दूर राहण्यामुळे त्यांची आध्यात्मिकरित्या वृद्धी होणार होती. हेच आज, यहोवाचे साक्षीदार “अगत्याच्या गोष्टी” पाळीत असता घडून येते. “कल्याण असो!” हा शब्दप्रयोग ‘हित घडून येणे’ या गोष्टीला सूचित करणारा आहे. त्या विशिष्ट गरजा आरोग्य सुदृढ होण्याच्या दृष्टीकोणाने दिल्या गेल्या असा ग्रह करता कामा नये. ते पत्र अंत्युखियात वाचून दाखविल्यानंतर बंधूवर्गाला त्यामध्ये दिलेल्या उत्तेजनामुळे खूप आनंद झाला. त्या काळी पौल, सीला, बर्णबा व इतरांच्या उत्तेजनदायक वक्‍तव्यामार्फत अंत्युखियातील देवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले. याचप्रमाणे आपण देखील आपल्या समविश्‍वासू बांधवांना उत्तेजन देण्याचे व त्यांची उभारणी करण्याची मार्ग शोधू या.

दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेस आरंभ होतो

१७. (अ) दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेची योजना करण्यात आली तेव्हा कोणती समस्या उद्‌भवली? (ब) पौल व बर्णबा यांनी त्यांच्यामधील वाद कसा हाताळला?

१७ दुसऱ्‍या सुवार्तिक यात्रेची योजना आखण्यात आली तेव्हा समस्या उद्‌भवली. (१५:३६-४१) पौलाने सुचविले की, त्याने व बर्णबाने मिळून कूप्र व आशिया मायनर येथील मंडळ्यांना परत भेट द्यावी. बर्णबा कबूल झाला पण आपला नातलग मार्क हा सोबत असावा असे त्याला वाटत होते. पौलाने ही मान्यता दिली नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यात मध्येच सोडून गेला होता. तेव्हा दोघामध्ये “संतप्त” वादविवाद झाला. पण पौल किंवा बर्णबाने दुसऱ्‍या वडीलांना किंवा नियमन मंडळाला त्यांच्या या खाजगी गोष्टीत मध्ये आणून स्वतःचा विजय संपादीत करण्याचा प्रयत्न केला नाही. केवढे हे चांगले उदाहरण!

१८. पौल व बर्णबा यांचे विभाजन घडल्यावर काय परिणाम झाला, आणि या घटनेपासून आम्हाला कसा लाभ मिळविता येईल?

१८ तथापि, या वादविवादामुळे फाळणी झाली. बर्णबा मार्कला घेऊन कुप्रला गेला. पौलाने सोबतीला सीलाला घेतले व तो “मंडळ्यांस स्थिरावीत सूरिया व किलिकिया यामधून गेला.” बर्णबावर रक्‍ताच्या नात्याची मोठी पकड बसली असावी; पण वस्तुतः त्याने पौलाचे प्रेषितपण तसेच त्याची “निवडलेले पात्र” या अर्थी झालेली निवड लक्षात घेणे जरुरीचे होते. (प्रे. कृत्ये ९:१५) आता आम्हाविषयी काय? या घटनेने आम्ही सर्वदा ईश्‍वरशासित अधिकाराला ओळखण्याची तसेच “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याच्याशी पूर्ण सहकार्य करण्याची गरज आमच्या मनावर बिंबविली पाहिजे!—मत्तय २४:४५-४७.

शांतीने प्रगति

१९. आधुनिक काळातील ख्रिस्ती युवकांना तीमथ्यामध्ये कोणते उदाहरण आढळते?

१९ या मतभेदाला मंडळीच्या शांतीवर परिणाम करण्यास वाव दिला गेला नाही. देवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले. (१६:१-५) पौल व सीला हे दर्बे व लुस्त्र येथे गेले. येथे तीमथ्य हा युनिके या यहुदी विश्‍वासू भगिनीचा व विश्‍वासात नसणाऱ्‍या तिच्या ग्रीक पतीचा मुलगा राहात होता. तो तरुण होता, कारण याच्या १८ ते २० वर्षानंतर सुद्धा त्याला असे सांगण्यात आले की, “कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये.” (१ तीमथ्य ४:१२) तो “लुस्त्रातल्या व [तेथून १८ मैल दूरवरच्या] इकुन्यातल्या बंधुवर्गाकडून नावाजलेला होता,” याचा अर्थ तो त्याचे चांगले उपाध्यपण व ईश्‍वरी गुण याविषयी चांगला परिचित बनला होता. अशाच प्रकारची ख्याति आजच्या ख्रिस्ती युवकांनी आपणामध्ये यहोवाच्या मदतीने उभारावी. पौलाने तीमथ्याची सुंता करवून घेतली, कारण ते यहुद्यांच्या सभास्थानात तसेच त्यांच्या घरी जाणार होते; यांना तीमथ्याचा बाप विदेशी होता हे ठाऊक होते. तसेच मशीहाविषयी शिकून घेण्याची इच्छा धरणाऱ्‍या यहुदी पुरुष व स्त्रिया यांच्याप्रत जाण्याचे कसलेही अडखळण मध्ये नको होते. आज, यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्रातील कोणत्याही तत्वांचा भंग न करता, सर्व प्रकारातील लोकांना सुवार्ता स्वीकारण्याजोगी करण्यासाठी होईल तितका प्रयत्न करतात.—१ करिंथकर ९:१९-२३.

२०. पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या पत्रानुसार हालचाल ठेवल्यामुळे कोणता परिणाम घडला, व याचा आम्हावर कसा परिणाम घडून येण्यास हवा असे आपणास वाटते?

२० तीमथ्याला आपला सेवक करुन पौल व सीला यांनी शिष्यांना, नियमन मंडळाने ठरवून दिलेल्या गोष्टींचे आचरण करण्यासाठी मदत केली. याचा काय परिणाम दिसला? लूक सुरिया, किलिकिया व गलतिया यांना अनुलक्षून हे लिहितोः “मंडळ्या विश्‍वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.” होय, नियमन मंडळाच्या पत्रानुसार हालचाल ठेवल्यामुळे ऐक्य व आध्यात्मिक समृद्धी अनुभवास आली. आमच्या या कठीण काळात यहोवाच्या लोकांना विश्‍वासात ऐक्याने व दृढतेने राहण्यासाठी हे किती चांगले उदाहरण आहे!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ पौल व बर्णबा यांनी छळास कसे तोंड दिले?

◻ “आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते,” या विधानावरुन आपण काय शिकू शकतो?

◻ पहिल्या शतकातील नियमन मंडळाने पाठविलेल्या पत्रातील तीन मुद्यांमधून आपल्याला कोणती सूचना मिळते?

◻ पहिल्या शतकातील यहोवाच्या साक्षीदारांना ज्या ज्या गोष्टीमुळे विश्‍वासात दृढ करण्यात आले त्या आज आम्हास कशा लागू होतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा