वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. २०-२३
  • बर्णबा—‘सांत्वनाचा पुत्र’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बर्णबा—‘सांत्वनाचा पुत्र’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सढळ हाताने साहाय्य करणारा
  • अंतुखियात
  • खास मिशनरी नेमणूक
  • सुंतेचा वादविषय
  • “तीव्र मतभेद”
  • “सांत्वनाचा मुलगा”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • “यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • यहोवाच्या लोकांना विश्‍वासात दृढ करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. २०-२३

बर्णबा—‘सांत्वनाचा पुत्र’

अलीकडेच तुमच्या मित्राने तुमचे सांत्वन केल्याचे तुम्हाला आठवते का? किंवा तुम्ही कोणाचे सांत्वन अलीकडेच केलेले तुम्हाला आठवते का? वेळोवेळी आपल्या सर्वांना प्रोत्साहनाची आवश्‍यकता आहे आणि जे आपल्याला प्रेमळपणे प्रोत्साहन देतात त्यांचे आपण किती आभार मानतो! सांत्वन देणे म्हणजे, ऐकून घेणे, समजून घेण्यासाठी व साहाय्य करण्यासाठी वेळ काढणे. तुम्ही असे करण्यासाठी तयार आहात का?

‘चांगला व पवित्र आत्म्याने व विश्‍वासाने पूर्ण’ असलेला बर्णबा नावाचा एक मनुष्य, एका अनुकरणीय पद्धतीत असे करण्यासाठी इच्छुक होता. (प्रेषितांची कृत्ये ११:२४) बर्णबाविषयी असे का म्हणता येऊ शकत होते बरे? त्याने असे काय केले हेते, की ज्यामुळे त्याला हे नाव मिळाले?

सढळ हाताने साहाय्य करणारा

त्याचे खरे नाव योसेफ होते, पण प्रेषितांनी त्याला एक वर्णनात्मक नाव दिले जे त्याच्या गुणांचे उचित वर्णन करणारे होते—बर्णबा, म्हणजे, ‘[बोधपुत्र] सांत्वनाचा पुत्र.’a (प्रेषितांची कृत्ये ४:३६) ख्रिस्ती मंडळीची अलीकडेच स्थापना झाली होती. काहींचा असा अंदाज होता, की बर्णबा पूर्वी येशूचा एक शिष्य होता. (लूक १०:१, २) हे खरे असो किंवा नसो, या मनुष्याचे आचरण मात्र अतिशय उत्तम होते.

सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या काही काळानंतर, कुप्र [सायप्रस] येथील लेवी असलेल्या बर्णबाने स्वेच्छेने काही जमीन विकली आणि मिळालेले पैसे प्रेषितांना आणून दिले. त्याने असे का केले? जेरुसलेममधील त्या काळच्या ख्रिस्ती जनांमध्ये, “ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून” देण्याची रीत होती, असे प्रेषितांच्या कृत्यांतील अहवाल आपल्याला सांगतो. स्पष्टच आहे, की बर्णबाने गरज ओळखून एक प्रेमळ कार्य केले. (प्रेषितांची कृत्ये ४:३४-३७) तो कदाचित एक धनी मनुष्य असावा, परंतु राज्य आस्थांच्या वाढीसाठी आपली भौतिक मालमत्ता आणि स्वतःलाही वाहून देण्याकरता त्याने मागेपुढे पाहिले नाही.b “लोकांना प्रोत्साहनाची आवश्‍यकता आहे हे बर्णबाला दिसून आल्याबरोबर तो त्यांना त्याला होईल तसे उत्तेजन देत असे,” असे एफ. एफ. ब्रूस हे विद्वान म्हणतात. दुसऱ्‍या एका घटनेत जे झाले त्यावरून हे स्पष्ट दिसते.

सा.यु. ३६ च्या सुमारास, तार्सकर शौल (जो नंतर प्रेषित पौल बनला) जो आतापर्यंत एक ख्रिस्ती बनला होता व जेरुसलेममधील मंडळीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता, “परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्‍वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते.” आपण खरोखरीच परिवर्तन केले आहे व पुढे मंडळी उद्ध्‌वस्त करण्याकरता हा एक डाव नाही याची तो मंडळीला कशी काय खात्री देऊ शकत होता बरे? “बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला.”—प्रेषितांची कृत्ये ९:२६, २७; गलतीकर १:१३, १८, १९.

बर्णबाचा शौलावर इतका विश्‍वास का होता हे सांगितलेले नाही. असो, शौलाचे बोलणे ऐकून घेण्याद्वारे व निराशाजनक भासणाऱ्‍या दशेतून त्याला बाहेर येण्यास साहाय्य करण्याद्वारे हा ‘सांत्वनाचा पुत्र’ आपल्या नावाला जागला. शौल पुन्हा आपल्या मायदेशी तार्सला परतला असला तरी, त्यांच्यामध्ये मैत्री प्रस्थापित झाली होती. यामुळे भवितव्यात महत्त्वपूर्ण परिणाम घडणार होते.—प्रेषितांची कृत्ये ९:३०.

अंतुखियात

सा.यु. ४५ च्या सुमारास, सिरियाच्या अंतुखियातील असामान्य वाढीची—त्या शहरातील अनेक ग्रीक भाषिक रहिवासी ख्रिस्ती विश्‍वासू होत असल्याची बातमी जेरुसलेमपर्यंत पोहंचली. तेथील कामाची छानणी व व्यवस्था करण्यासाठी मंडळीने बर्णबाला तिकडे पाठवले. ही त्यांच्यावतीने खरोखरीच सुज्ञता होती. लूक म्हणतो: “तो तेथे पोहोंचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा. तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्‍वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.”—प्रेषितांची कृत्ये ११:२२-२४.

तो एवढ्यावरच थांबला नाही. झुझेप्पे रिकॉटी नामक विद्वानाच्या मते, “बर्णबा एक व्यवहारी मनुष्य होता, ह्‍या आशादायक भरभराटानंतर चांगले पीक येईल याची खात्री करण्यासाठी आपल्याला कामाला लागले पाहिजे हे त्याने लागलीच समजून घेतले. म्हणजे, कापणीकरिता कामगारांची प्रमुख आवश्‍यकता होती.” सायप्रसचा असल्यामुळे विदेशी लोकांशी कसा व्यवहार करायचा हे बर्णबाला कदाचित चांगल्याप्रकारे माहीत असावे. आपण मूर्तिपूजकांना प्रचार करण्यात तरबेज आहोत असे कदाचित त्याला वाटले असावे. परंतु या आनंदी व प्रोत्साहनदायक कार्यात इतरांनाही सामील करण्याची त्याची तयारी होती.

बर्णबाच्या मनात शौल होता. एका गोष्टीची दाट शक्यता असावी, व ती म्हणजे, शौलाच्या परिवर्तनाच्या वेळी हनन्याला झालेले भविष्यसूचक प्रकटीकरण बर्णबाला ठाऊक असावे, की आधी छळ करणारा, राष्ट्रांसमोर ‘येशूचे नाव घेऊन जाण्याकरता निवडलेला पात्र’ होता. (प्रेषितांची कृत्ये ९:१५) म्हणून, शौलाला भेटण्याकरता बर्णबा सुमारे २०० किलोमीटरच्या एक-मार्गी प्रवासाला तार्ससला निघाला. हे दोघे एक संपूर्ण वर्षभर एकमेकांबरोबर काम करीत होते आणि याकाळातच “शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.”—प्रेषितांची कृत्ये ११:२५, २६.

क्लॉडियसच्या कारकीर्दीदरम्यान रोमी साम्राज्याच्या विविध भागांत कडक दुष्काळ पडला. यहुदी इतिहासकार जोसीफसनुसार, जेरुसलेममध्ये “अन्‍न मिळवण्याकरता ज्याची आवश्‍यकता होती तेच न मिळाल्यामुळे पुष्कळ लोक मृत्यूमुखी पडले.” म्हणूनच, अंतुखियातील शिष्यांनी “निश्‍चय केला की, यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरिता यथाशक्‍ति काही पाठवावे; त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्‍यांच्या हाती वडीलवर्गाकडे पाठवून दिले.” ही कामगिरी पूर्णपणे पार पाडल्यावर हे दोघे योहान मार्क बरोबर अंतुखियास परतले; येथे यांना संदेष्टे आणि मंडळीचे शिक्षक म्हणून गणण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये ११:२९, ३०; १२:२५; १३:१.

खास मिशनरी नेमणूक

आता एक असामान्य घटना घडली. “ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्णबा व शौल ह्‍यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा.” विचार करा! या दोघांना एक खास नेमणूक देण्यात यावी अशी यहोवाचा आत्मा आज्ञा करतो. “ह्‍याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.” आता बर्णबालासुद्धा एक प्रेषित, किंवा पाठवलेला असे म्हणायला काही हरकत नव्हती.—प्रेषितांची कृत्ये १३:२, ४; १४:१४.

सायप्रसहून प्रवास करून व त्या द्वीपाचा रोमी प्रांताचा सुभेदार सिर्ग्य पौलाचे परिवर्तन केल्यावर ते आशिया मायनरच्या दक्षिणेकडील किनाऱ्‍यावरील पिर्ग्याला गेले; तेथून योहान मार्क त्यांना सोडून जेरुसलेमेस परतला. (प्रेषितांची कृत्ये १३:१३) असे दिसते, की अनुभवी सोबती म्हणून तोपर्यंत बर्णबा पुढाकार घेत होता. तेथूनपुढे शौल (ज्याला आता पौल संबोधले जाते) पुढाकार घेतो. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १३:७, १३, १६; १५:२.) या बदलामुळे बर्णबाला वाईट वाटले का? नाही, तो एक प्रौढ ख्रिस्ती होता; यहोवा त्याच्या सोबत्याचाही एका प्रभावशाली मार्गाने उपयोग करून घेत आहे हे त्याने नम्रपणे जाणले होते. त्यांच्याद्वारे इतर क्षेत्रांतील लोकांनीही सुवार्ता ऐकावी अशी यहोवाची इच्छा होती.

खरे तर, पिसिदियांतील अंतुखियातून या दोघांची हकालपट्टी होण्याआधी, त्या क्षेत्रांतील सर्व लोकांनी पौल आणि बर्णबा यांच्याकडून देवाचे वचन ऐकले होते व अनेकांनी त्यांचा संदेश स्वीकारला देखील होता. (प्रेषितांची कृत्ये १३:४३, ४८-५२) इकुन्यात, “यहूदी व हेल्लेणी ह्‍यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्‍वास ठेवला.” यामुळे पौल आणि बर्णबा, ‘त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्‌भुत कृत्ये होऊ देणाऱ्‍या यहोवाविषयी निर्भीडपणे’ बोलण्यात पुरेसा वेळ खर्च करण्यास प्रवृत्त झाले. त्यांना दगडमार करण्यासाठी एक कट रचण्यात आला आहे, हे ऐकल्यावर ते दोघेही तेथून अगदी सुज्ञपणे निसटले व लुकवनिया, लुस्त्र व दर्बे येथे त्यांचे कार्य चालू ठेवले. लुस्त्र येथे जीवघेणे अनुभव आले असतानाही, बर्णबा आणि पौल ह्‍यांनी, “शिष्यांची मने स्थिरावून . . . त्यांना असा बोध केला की, विश्‍वासात टिकून राहा; कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.”—प्रेषितांची कृत्ये १४:१-७, १९-२२.

हे दोन प्रभावशाली प्रचारक आपली हिंमत खचू देणार नव्हते. उलट, ज्या ठिकाणी त्यांनी कट्टर विरोधाचा सामना केला होता तेथील नव्या ख्रिश्‍चनांची उभारणी करण्यासाठी ते पुन्हा तेथे गेले; कदाचित योग्यता प्राप्त पुरुषांना नव्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेण्यास त्यांनी साहाय्य केले असावे.

सुंतेचा वादविषय

सा.यु. च्या पेन्टेकॉस्ट ३३ नंतर १६ वर्षांनी, बर्णबा सुंतेविषयीच्या एका ऐतिहासिक घटनेत गोवला गेला. “काही जणांनी यहूदीयाहून [सुरियाच्या अंतुखियात] उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.” बर्णबा आणि पौल यांना अनुभवावरून माहीत होते की हे बरोबर नाही, म्हणून त्यांनी या मुद्द्‌यावर चर्चा केली. आपलेच घोडे पुढे ढकलण्याऐवजी, बंधूसमाजाच्या भल्यासाठी या प्रश्‍नाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे त्यांनी ओळखले. यास्तव, त्यांनी निर्णयाकरता जेरुसलेममधील नियमन मंडळापुढे हा प्रश्‍न मांडला आणि त्यांनी दिलेल्या बातम्यांच्या साहाय्याने हा वादविषय सोडवण्यात आला. त्यानंतर, “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधु” असे संबोधण्यात आलेले पौल आणि बर्णबा, घेतलेल्या निर्णयाची खबर अंतुखियातील बांधवांना देण्याकरता नियुक्‍त केलेल्यांपैकी होते. नियमन मंडळाकडून आलेले पत्र वाचून दाखवल्यानंतर व भाषणे दिल्यानंतर मंडळीला, त्यातला “बोध वाचून आनंद झाला,” व ती ‘मजबूत’ झाली. (तिरपे वळण आमचे.) —प्रेषितांची कृत्ये १५:१, २, ४, २५-३२.

“तीव्र मतभेद”

बर्णबाविषयी इतक्या सकारात्मक गोष्टी ऐकल्यावर, आपण तर त्याच्यासारखे कधीच जगू शकणार नाही असे आपल्याला वाटू शकेल. पण, हा ‘सांत्वनाचा पुत्र’ आपल्या सर्वांप्रमाणेच अपरिपूर्ण होता. तो आणि पौल मंडळ्यांना भेटी देण्याकरता दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याची योजना करीत असताना त्यांच्यात मतभेद निर्माण झाला. बर्णबा आपला भाऊ योहान मार्कला सोबत नेण्याचा हट्ट करीत होता; पण पौलाला हे उचित वाटत नव्हते कारण योहान मार्क त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी त्यांना अर्ध्यातूनच सोडून गेला होता. “ह्‍यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्कला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला” आणि “पौलाने सीलाला निवडून घेतले” व ते दोघे वेगवेगळ्या दिशेने गेले.—प्रेषितांची कृत्ये १५:३६-४०.

किती दुःखाची गोष्ट! तरीपण, यावरून आपल्याला बर्णबाच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आणखी काहीतरी शिकायला मिळते. “बर्णबाने मार्कवर भरवसा ठेवून दुसऱ्‍यांदा त्याला आपल्याबरोबर घेऊन धोका पत्करला असल्यामुळे त्याला खरेच मानलं पाहिजे,” असे एक विद्वान म्हणतात. ते पुढे म्हणाले त्याप्रमाणे कदाचित, “बर्णबाने त्याच्यावर ठेवलेल्या भरवशामुळे मार्कला स्वतःचा आत्मविश्‍वास पुन्हा प्राप्त करता आला असावा, ज्यामुळे पुढील जबाबदाऱ्‍या मोठ्या आवेशाने पार पाडण्यासाठी त्याला उत्तेजित केले असावे.” आणि पुढे असेच झाले, बर्णबाने मार्कवर ठेवलेला भरवसा शाबीत झाला; कारण एक असा दिवस आला जेव्हा स्वतः पौलाने, ख्रिस्ती सेवेत मार्क किती उपयोगी होता हे कबूल केले.—२ तीमथ्य ४:११; पडताळा कलस्सैकर ४:१०.

बर्णबाचे उदाहरण आपल्याला, उद्विग्न लोकांचे ऐकून घेण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जेव्हा जेव्हा आवश्‍यकता असल्याचे दिसते, तेव्हा तेव्हा व्यावहारिक मदत देण्यासाठी वेळ काढण्यास प्रवृत्त करू शकते. सौम्यतेने व धैर्याने आपल्या बांधवांची सेवा करण्याच्या त्याच्या स्वेच्छेचा अहवाल तसेच यांतून उत्पन्‍न झालेले उत्तम परिणाम खरेच किती उत्तेजनकारक आहेत. आपल्या मंडळ्यांमध्ये बर्णबासारखे लोक असणे किती आशीर्वादाचे आहे!

[तळटीपा]

a एखाद्याला विशिष्ट गुणाचा ‘पुत्र’ असे संबोधणे म्हणजे त्याच्यातील उल्लेखनीय गुणलक्षणे दाखवणे होय. (अनुवाद ३:१८, NW तळटीप पाहा.) पहिल्या शतकात, एखाद्याच्या गुणांकडे लक्ष वेधण्याकरता अशी नावे देणे सर्वसामान्य होते. (पडताळा मार्क ३:१७.) जणू काय लोकांना हे मान्य होते.

b मोशेच्या नियमशास्त्राने जे ठरवले होते त्याचा आपण विचार केल्यास, बर्णबा एक लेवी होता तर त्याच्या नावावर जमीन कशी काय होती. (गणना १८:२०) परंतु ती जमीन पॅलेस्टाईनमध्ये होती की सायप्रसमध्ये हे अजूनही स्पष्ट नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढे, कदाचित बर्णबाने जेरुसलेममध्ये प्राप्त केलेली ही जमीन एक कबरस्थानाची जमीन असू शकते. असो, बर्णबाने इतरांना मदत करण्याकरता ती विकून टाकली.

[२३ पानांवरील चित्र]

बर्णबा “चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्‍वासाने पूर्ण होता”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा