“शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशन चुकवू नका
पवित्र शास्त्र शिक्षणाचे चार लाभदायक दिवस आपली वाट पाहात आहेत. गुरुवारी दुपारी १:३० वाजता सुरवात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित असा. जे विचारप्रवर्तक भाषण होईल की, “तुम्ही यहोवाच्या मित्रांचे मित्र आहात का?” तसेच “सर्व राष्ट्रांसाठी एकच शुद्ध वाणी” हे मुख्य भाषण ऐकण्याचा आनंद लुटा. त्या दुपारी शेवटल्या भाषणाचा विषय असेलः “रक्ताद्वारे तुमच्या जीवनाची भरपाई—कशी?” यात तुम्हाला, जीवनाच्या बचावासाठी रक्ताची खरीच गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाची सुरवात ९:३० वाजता होईल. तेथे हे मनाचा शोध घेणारे भाषण ऐकून त्यापासून फायदे मिळविण्यास हजर असाः “ख्रिस्ताने ‘अधर्माचा वीट मानला’—तुम्हास तो वाटतो का?” आणि यानंतरचे चालनाप्रवर्तक भाषण ऐकाः “जगाच्या विलक्षण कल्पनांना नकार द्या—राज्य सत्याच्या मागे लागा.” दुपारच्या अधिवेशन कार्यक्रमात आर्थिक ऐपत आहे तेवढ्यातच समाधानी राहण्याविषयीचे व्यावहारिक प्रस्ताव, सूचना पुरविल्या जातील. पालकांना आपणावरील जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकपणे कशा पूर्ण करता येऊ शकतील ते दाखविले जाईल व मग आधुनिक काळातील दृश्य रचनेचे एक नाटक युवकांनी, शाळेच्या क्रमिक अभ्यासाव्यतिरिक्त जे कार्यक्रम होतात त्यात सहभागी होण्याविषयी कोणते धोरण राखावे याबद्दल उत्तम मार्गदर्शन देईल.
शनिवारी सकाळच्या सभेत समर्पण व बाप्तिस्मा, तसेच वैयक्तीक पवित्र शास्त्राभ्यासासाठी कोणते संभाव्य त्याग करावे लागतील याविषयीचा विचारविनिमय प्रस्तुत करणारे भाषण असेल. दुपारच्या कार्यक्रमात, “यहोवाचा अग्नीमय रथ आगेकुच करीत आहे,” हे चेतविणारे भाषण ऐका. याशिवाय ज्यांना खोट्या धर्माने अंध बनविले आहे अशांचे साहाय्य करण्यामध्ये आम्हावरील ख्रिस्ती जबाबदाऱ्यांची कडक शब्दात आठवण करून दिली जाईल व याबरोबर ही जबाबदारी कशी पुरी करावी याची व्यावहारिक मदतही सादर करण्यात येईल.
रविवारी सकाळी तर आपणास, ख्रिस्ती धर्मराज्ये व त्याचा पाद्रीगट यांच्याविरूद्ध जोरदार शक्तीशाली संदेश ऐकण्यास हमखास उपस्थित रहावेसे वाटेल. त्यानंतर येहू व योनादाब यांच्या जीवनावर आधारीत असलेले प्राचीन पेहराव व प्रसंग यांनी युक्त असणारे नाटक सादर करण्यात येईल. मग, दुपारच्या जाहीर सभेत “शुद्ध वाणीच्या द्वारे एक व्हा” हे जाहीर भाषण ऐकण्याचे निश्चित करा.
सप्टेंबर १९९० ते जानेवारी १९९१ या कालावधीत सबंध भारतभर एकूण २६ अधिवेशने भरविण्याचे आयोजित आहे. यास्तव, तुम्ही राहता त्या ठिकाणापासून जवळच्या अंतरावर एखादे जरुर असणार. स्थानिय यहोवाचे साक्षीदारांकडे अधिवेशनाची तारीख, वेळ व स्थळाबाबत चौकशी करा, किंवा या मासिकाचे प्रकाशकांना लिहा.