जागतिक शांती तिचा खरा अर्थ कोणता?
देवाच्या विचारात असणाऱ्या जागतिक शांतीमध्ये विश्वयुद्धविराम, किंवा अणुशक्तीस गोठविणे यापेक्षा पुष्कळ अधिक गोवलेले आहे. हे, पवित्र शास्त्र, “शांती” या शब्दाचा ज्या पद्धतीने उपयोग करते त्यावरुन सुव्यक्त आहे.
उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचनात (“जुना करार”) शांतीसाठी शालोम हा शब्द आहे. या शब्दाच्या एका रुपाचा उत्पत्ती ३७:१४ मध्ये उपयोग केलेला आहे, जेथे कुलपिता याकोब त्याचा पुत्र योसेफ याला सांगतोः “जा, तुझे भाऊ व कळप कसे काय [सुखरुप व सुरक्षित] आहेत (का) याचा समाचार घेऊन मला बातमी आण.”a उत्पत्ती ४१:१६ मध्ये शालोम या शब्दाचा परत एकदा “मंगलदायक” किंवा शुभचिंतक या अर्थी उपयोग केलेला आहे.
अशाप्रकारे, पवित्र शास्त्राच्या मते खरी शांती, केवळ युद्धविरामातच नव्हे, तर आरोग्य, सुरक्षितता आणि शुभचिंतन यातही संबंधित आहे. आमच्या ऑगस्ट १, १९९१ च्या अंकातील लेखात हे स्पष्ट केले आहे की शांती प्रस्थापित करण्याचे हे कोडे सोडविण्यात मनुष्य कसा हतबल ठरला आहे. केवळ येशू ख्रिस्त, जो “शांतीचा अधिपती” आहे तोच हे तुकडे जुळवणूक करून पृथ्वीवर खऱ्या शांतीची स्थापना करील. (यशया ९:६, ७) उदाहरणार्थ, स्तोत्रसंहिता ७२:७, ८ त्याच्या कारकिर्दीबद्दल काय म्हणते ते लक्षात घ्या: “त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल.” कल्पना करा, आरोग्य, सुरक्षितता आणि शुभचिंतन हे सबंध जगव्याप्त असेल! कोणताही राजकीय तह हे कधीच सिद्ध करू शकणार नाही. केवळ देवाचे राज्य ते करील व ते यापेक्षाही अधिक साध्य करील. या भावी जागतिक शांती काळाची पवित्र शास्त्र आम्हास आश्चर्यचकित करणारे अनेक भविष्यवादित दृश्ये पुरविते. यांच्यापैकी काहींचा आपण विचार करु.
विश्वशस्त्रसंधी—देवाच्या मार्गी!
स्तोत्रसंहिता ४६:८, ९ म्हणतेः “या, यहोवाची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीवर कशा अचंबा वाटू देणाऱ्या घटना घडविल्या आहेत. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो. रथ अग्नीत जाळून टाकतो.” “धनुष्य,” “भाला,” व “रथ” हे शब्द कोणाही प्रकारातील युद्ध साहित्यांचे किंवा युद्ध तंत्रांचे प्रतिनिधित्व करतात. अशाप्रकारे यहोवा शस्त्रसंधी किंवा शस्त्रांचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्याही कितीतरी पुढे जातो. तो अणुशस्त्रे, तोफखाने, टँकदळ, अग्नीबाणमारक यंत्रे, बॉम्ब, प्लास्टिक बॉम्ब, बंदुका, हस्तबंदुका, शिवाय ते सर्व जे विश्वशांतीस धोका निर्माण करु शकते, ते सारे काही मुळासकट नाश करील!
तथापि, केवळ शस्त्रामुळेच युद्धे उद्भवतात असे नाही. सामान्यतः युद्धांचे खरे मूळ अपूर्ण मानवातील द्वेष, हाव व हिंसक वृत्ती यात असल्याचे दिसते. (याकोब ४:१, ३ पडताळा.) ह्याच कारणास्तव, देवाचे राज्य लोकांतील या अति अधम व्यक्तीमत्वाच्या गुणांना काढून टाकून युद्धाच्या या मुळावरच हल्ला चढविते. तो कसा बरे? सबंध जगभर शैक्षणिक कार्यक्रम राबवून. “सागर जसा जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.
अशाप्रकारे, “यहोवाने शिकविलेले,” असे जे मानव त्यांच्यामध्ये ते वंशभेद राहणार नाहीत, ज्यामुळे झगडे, शत्रुत्व आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणे ही मुळे उद्भवत असतात. (योहान ६:४५) “देव पक्षपाती नाही,” म्हणून पृथ्वीवरील रहिवाशी त्याच्या निःपक्षपातीपणास प्रतिक्षेपित करतील. (प्रे. कृत्ये १०:३४) देवाचे राज्य सर्व राष्ट्रीय सरहद्दींचे निर्मूलन करून राष्ट्रीय तणावांची व युद्धांची संभावनाच समूळ नष्ट करील. ‘समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंत’ सर्वजण ख्रिस्ताच्या सत्तेस त्यांचे सर्वस्व आणि कृतज्ञतापूर्वक निष्ठा शपथपूर्वक वाहून असतील.—स्तोत्रसंहिता ७२:८.
ही शांतता अखंडपणे टिकून राहावी म्हणून हे राज्य, मानवी इतिहासातील त्या अत्यंत विभाजक शक्तीला, खोट्या धर्मालाही समूळ नष्ट करील. (सफन्या २:११) मानवजात ही त्यांच्या एकमेव खरा देव, याच्या भक्तीत एकत्रित केली जाईल. (यशया २:२, ३) चोहोकडे विश्वबंधुत्व नांदेल!
कौटुंबिक आघाडीवरील शांती
तथापि, खाजगी कौटुंबिक क्षेत्रावर अपमान, अपशब्द, धमकी देणे व भांडणे यांची चिखलफेक वेळोवेळी चालत राहून ते जर युद्धक्षेत्र बनत असेल तर जागतिक शांती काय मोलाची? आज हेच अनेक कुटुंबाबाबत खरे आहे. इतर कुटुंबे, खोलवर रुजलेल्या वैरभावावरचे मौनावर भावशून्यतेचे पांघरुण ओढून घेतात.
यासाठी शांतीमध्ये कौटुंबिक आघाडीवरील शांतपणाही समाविष्ट असला पाहिजे. राज्याच्या शिक्षण कार्यक्रमात पती, पत्नी या दोघांनाही एकमेकांसोबतचे सर्व व्यवहार प्रेम आणि आदराने करण्याचे शिकवले जाईल. (कलस्सैकर ३:१८, १९) मुलांना शिकवले जाते की, “तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापाची आज्ञा माना.” (कलस्सैकर ३:२०) पालकांना निराश करणारी व काळजीत पाडणारी बंडखोर मुले तेथे नसणार. आज्ञाधारकपणा हा सर्वसाधारण, तर सहकार्य हा नियम असेल. या कारणामुळे मुले आनंद देणारी व सभोवताली वावरणारी असावी असे हवेहवेसे वाटेल.
आज, आर्थिक समस्यांचा दबाव कौटुंबिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढवीत आहे; ज्यामुळे बहुतेक दोन्ही पालकांना मोठ्या कष्टाच्या नोकऱ्या कराव्या लागतात. पण ख्रिस्ताच्या कारकिर्दीत कुटुंबांना भारी आर्थिक बोजाखालून जसे की, महागडे घरभाडे, व्याजभरणा, कर, बेकारी, यासारख्या गोष्टीपासून सोडविले जाईल. आव्हानदायी कामे पूर्ण करण्यास भरपूर असतील. कोणीही घराविना नसेल. यशया ६५:२१-२३ मधील भविष्यवाद या गोष्टींची कशी चर्चा करतो ते लक्षात घ्याः “ते घरे बांधून त्यात राहतील, . . . ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही. . . . माझे निवडलेले आपल्या हातांच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत; कारण यहोवाने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे, व त्यांची मुले त्यांजजवळ राहतील.”
कल्पना करा, अशा या वातावरणात वास्तव्यास आहात, जेथे नागरी उकिरड्यांची घाण पाहण्यास, वासास आढळत नाही. सबंध हिरवळीचा प्रदेश—तुमच्या स्वतःची जमीन—व्यवस्थितपणे मशागत केलेली, कापलेली अशी, रमणीय भूप्रदेशावर राहण्यास आहात. हवामान, शुद्ध आणि निर्भेळ हवेचा श्वासोच्व्छास करीत आहात; कानावर जे आवाज येत आहेत ते आधुनिक युगाच्या कर्णकटू संगीताचे नाहीत तर कानास सुखावणाऱ्या नैसर्गिक आवाजांचे असतील. हे खरे की, काहींना आधीच या गोष्टीचा आनंद मिळत आहे. पण देवाच्या राज्य वर्चस्वाखाली शांतीमध्ये जीवनाचे वातावरण सर्वजण अनुभवतील. कोणी गरीब, भूकेला, दरिद्री राहणार नाही.—स्तोत्रसंहिता ७२:१३, १४, १६.
पवित्र शास्त्र आणखी अभिवचन देतेः “अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.” (नीतीसूत्रे २:२२) याचाच अर्थ गुन्हेगारीचा समूळ नायनाट केला जाईल. आपले छोटे बाळही जर बाहेर खेळावयास गेले तरी तेथे कोणी मुलांचा छळ करणारा किंवा अपहरण करणारा लपून बसलेला नसेल; कोणी दारुड्या मोटारचालक भरवेगात जात नसेल; किंवा मादक औषधे घेणाऱ्या तरुणांचे एखादे टोळके हिंडत नसेल. अशी काही भीती राहणार नाही. तुमची मुले संपूर्ण सुरक्षिततेत आणि निर्भयतेत खेळू शकतील.
शांती व तुमचे व्यक्तीगत कल्याण
शेवटी, वैयक्तीक स्वास्थ्याच्या विचाराचीही बाजू असतेच. उद्यानगृहाची परिस्थिती कर्करोग किंवा सांधेदुखीच्या यातना मंद करु शकणार नाही. या कारणास्तव, खरी शांती प्रस्थापित होण्याकरता रोग, आजार व मरण यांचे समूळ निर्मूलन झाले पाहिजे. हे शक्य आहे का? पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने आपणाठायी असलेल्या मानवी उपचार शक्तीचे वेळोवेळी प्रदर्शन केले. (मत्तय ८:१४-१७) त्यामुळे तो आपल्या स्वर्गीय सर्वोच्च स्थानातून असेच चमत्कार सबंध पृथ्वीवर घडवू शकेल. “तेव्हा,” पवित्र शास्त्र अभिवचन देते, “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३३:२४; ३५:५, ६.
ख्रिस्ताची मानवी कष्टावस्थेविरुद्ध असणारी मोहीम येथवरच संपणार नाही. तर प्रेषित पौलाने ख्रिस्ताच्या राज्यपदाबद्दलचे विवेचन देताना असे म्हटलेः “त्याच्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रू जो मृत्यु तो नाहीसा केला जाईल.” (१ करिंथकर १५:२५, २६) याचाच अर्थ, मृत्युने अगदी सुरवातीपासून जे सर्व प्रचंड अनर्थ लादले ते सर्व पूर्वस्थितीवर आणले जातील. स्वतः येशू याचे विवेचन देताना म्हणतोः “असा समय येत आहे की, त्यात कबरेतील सर्व मनुष्ये त्याची [ख्रिस्ताची] वाणी ऐकतील . . . आणि . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) असंख्य लोक, जे एकेकाळी जिवंत होते, पण अत्यंत कष्टावस्थेत मेले अशांना याप्रकारे येणाऱ्या जागतिक शांतीच्या काळाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
आपण त्यात सहभागी होऊ इच्छिता का? यहोवाचे साक्षीदार आपणास ही विनंती करतात की, याबद्दल पवित्र शास्त्र अधिक काय म्हणते ते शिका.b जागतिक शांतीचे भवितव्य एवढे शिरशिरी भरविणारे व खरे आहे की, त्याकडे कानाडोळा करणे शक्य नाही. आण जर देवाचे वचन शिकून ते आचरणात आणण्याचा यत्न केला तर, “शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील.”—फिलिप्पैकर ४:९.
[तळटीपा]
a शब्दशः “तुझ्या भावांची शांती आणि कळपाची शांती याकडे लक्ष दे.”
b या मासिकाच्या प्रकाशकांना लिहिल्यास मोफत पवित्र शास्त्राभ्यासाची सोय होऊ शकेल.
[५ पानांवरील चित्रं]
यहोवा पृथ्वीच्या “दिगंतापर्यंत लढाया बंद” करील
[६ पानांवरील चित्रं]
पती व पत्नी या दोघांनाही एकमेकांसोबतचे सर्व व्यवहार शांतीने करण्याचे शिकवले जाईल