वचनयुक्त देशाचे देखावे
नासरेथ संदेष्ट्याचे घर
“लोकसमुदाय म्हणत राहिलाः ‘गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय.’” येशूच्या सेवकपण काळात त्याचा केवळ उल्लेख जरी झाला तरी त्यावेळी लगेच नासरेथाचे स्मरण होत असे, जे आज मशहूर बनले आहे. अशाप्रकारे, जे त्याला अटक करण्यास आले होते ते असे म्हणाले नाही की आम्ही येशूला शोधीत आहोत तर “नासोरी येशूचा” शोध घेण्यास आलो आहोत असे ते म्हणाले.—मत्तय २१:११; २६:७१; योहान १८:३-५; प्रे. कृत्ये २६:९.
वरील चित्र आपणास हे दाखवीत आहे की, आपण जर आज नासरेथास भेट दिली तर तेथे काय आढळेल. एका दिव्यदूताने “गालीलातील नासरेथ नामे नगरास” मरीयेस हे कळविण्यास भेट दिली होती की, तिजठायीचे मूल, देवाचा पुत्र असेल, तेव्हापेक्षा आताचे शहर खूपच मोठे आहे. (लूक १:२६-३३) त्या काळी नासरेथ, पुढील पानावर दाखविल्याप्रमाणे एक छोटेसे खेडे होते. तेथे छोटी छोटी घरे डोंगरमाथ्यावर वसली होती. योसेफ व मरिया ही बहुतेक अशाच एखाद्या घरात राहात असावेत. पण मरिया बाळंत होण्याच्या सुमारास त्यांना दक्षिणेकडे बेथलहेमास जावे लागले व तेथे येशूचा जन्म झाला. नंतर हेरोदाच्या खुनशी युक्तीपासून लेकराचा बचाव करण्यासाठी ते मिसरास पळून गेले. त्यानंतर “गालीलात आपले गाव नासरेथ येथे ती परत गेली.”—लूक २:४, ३९; मत्तय २:१३-२३.
अशाप्रकारे येशूची वाढ यरुशलेम किंवा तायबेरियासारख्या गजबजलेल्या शहरी झाली नाही, तर तो अगदी शांतस्थळी वाढला. नासरेथ हे गालीलच्या खोल भागात, डोंगरांनी वेढलेल्या तळवटीत होते; जेथे धान्य, द्राक्षे, जैतुन व अंजीर यांची झाडे बहरलेली असत. तेथे उन्हाळ्यात रम्य वातावरण असे, तरी गालील प्रांताच्या वरच्या भागाप्रमाणे हिवाळा तेवढा असह्य नसे.
योसेफाने सुतारकीचा धंदा करुन आपली बायको, मुले व मुलींचे पालन केले. पुढील पानावर आधुनिक नासरेथमधील दुकानाप्रमाणे त्याचे एखादे दुकान असावे. तो गावातील घराच्या छपरासाठी तुळ्या तसेच लाकडी दारे किंवा मेज, स्टूल यासारखे लाकडी सामान बनवीत असावा. येशूने तो करीत असलेली कामे पाहून शिकून घेतली हे आपल्याला समजू शकते व यासाठीच त्याला देखील “सुतार” असे म्हणत असत. (मार्क ६:३; मत्तय १३:५५) नासरेथ सभोवताली जी शेती होई तिजमुळे इतर कामेही निघत. कदाचित येशूने, या चित्रामध्ये जनावरांच्या मानेवर दिसणारे जू बनविण्याचेही काम केले असावे, तर योसेफ कदाचित नांगर, धान्य दळण्याची अवजारे बनवीत असावा.—२ शमुवेल २४:२२; यशया ४४:१३.
बालवयात येशूने कदाचित नासरेथात दूरवर, जसे की आठ मैलावरील उत्तरेकडील “गालीलातील काना” गावापर्यंत मौजेखातर पायरपेट केली असेल. येथेच नंतर त्याने आपला पहिला चमत्कार केला. (योहान २:१-१२) आग्नेय दिशेकडे असणारे इज्रेलचे खोरे व मोरे नामक डोंगर यांच्यापुढे सहा मैल अंतर जाऊन येशू, पुढील पानावर दिसणाऱ्या नाईन गावी पोहंचे.a(शास्ते ६:३३; ७:१) हे आठवा की, येशूला आपल्या राज्य प्रचाराच्या पहिल्याच यात्रेत नाईन गावाजवळ येताना एक प्रेतयात्रा भेटली. कळवळा येऊन त्याने त्या विधवेच्या मुलाला मृतातून उठविले.—लूक ७:११-१६.
नासरेथ हे जरी देशातील कोणाही हमरस्त्यावर वसलेले नव्हते तरी अशा कोणाही रस्त्याला तेथून सहज पोहंचता येत होते. हे आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९० च्या कॅलेंडरवरील मुखपृष्ठाच्या नकाशात सहज पाहू शकाल. यामध्येच आजच्या नासरेथाचे मोठे चित्रही पाहण्यास मिळेल. इज्रेलच्या खोऱ्यातून जाणारा पूर्व-पश्चिम मार्ग आक्रे किंवा टोलेमस हे बंदर व गालील समुद्र आणि यार्देनेची दरी यांना जोडतो. याला मध्ये तोडणारा मार्ग दक्षिणेकडील दिमिष्कपासून येतो व तो शोमरोनामधून यरुशलेमापर्यंत जातो.
नासरेथात एक सभास्थान होते आणि आपल्या उपाध्यपणाच्या आरंभालाच येशू तेथे “आपल्या परिपाठाप्रमाणे” गेला. त्याने तेथे यशया ६१:१,२ वाचून ते स्वतःला लाविले. हे ऐकून गावातील लोकांची प्रतिक्रिया कशी होती? त्यांच्यापैकी काहींनी तर त्याला त्यांच्यासमोर वाढलेला पाहिला असेल व काहींनी तर त्याला त्याने केलेल्या सुतारकामाचे पैसेही दिले असतील. ते सर्व संतापले व त्याला डोंगरकड्यावरुन लोटून देण्याच्या प्रयत्नात होते, पण तो त्यांच्यामधून निसटला. (लूक ४:१६-३०) तद्नंतर, त्याने नाईनमध्ये व इतरत्र जे काही केले त्याचा वृत्तांत नासरेथला पोहंचला असावा हे निश्चित, कारण जेव्हा तो परत आला आणि त्याने स्थानिक सभास्थानात शिक्षण दिले तेव्हा कोणीही त्याला ठार करण्याबद्दल काहीच बोलले नाही. तरी “तेथे . . . त्याने फारशी महत्कृत्ये केली नाहीत,” कारण जे त्याच्या ओळखीचे होते त्यांनी त्याजवर संदेष्टा म्हणून विश्वास ठेविला नाही.—मत्तय १३:५३-५८.
मार्कने येशूच्या प्रतिक्रियेचे टिपण केले आहे. तो म्हणतोः “संदेष्टा आपला देश, आपले नातलग व आपले घर यात मात्र सन्मान पावत नाही.” ही केवढी दुःखद गोष्ट की, हेच नासरेथमधील अनेकांच्या बाबतीत खरे ठरले. तरीही आम्ही या नगराची, आम्ही ज्याचा आदर करण्याची निवड केली आहे त्या संदेष्ट्याचे घर म्हणून नेहमी आठवण ठेवू.—मार्क ६:४.
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९० च्या कॅलेंडरमध्ये नासरेथ हे #२ वर मुखपृष्ठावरील नकाशात दिले आहे. मोरे हा डोंगर #३च्या खालच्या भागात दिसत आहे.