येशूचे जीवन व उपाध्यपण
छळास सामना देण्याची तयारी
प्रचाराचे काम पार पाडण्याविषयीच्या पद्धतीची विविध माहिती दिल्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना छळ करणाऱ्यांबाबत इशारा देतो. तो म्हणतोः “पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो. . . . माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल.”
आपल्या अनुयायांना तीव्र छळाला सामोरे जावे लागणार होते तरीही येशू त्यांना खात्रीपूर्वक आश्वासन देतोः “जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन केले जाईल तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचविले जाईल; कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे.”
“आणखी,” येशू पुढे म्हणतो, “भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल; मुले आईबापांवर उठून त्यांना ठार करतील.” पुढे तो म्हणतोः “माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.”
प्रचार करणे हे महत्त्वाचे काम आहे, या कारणामुळे येशू चाणाक्षता राखण्याविषयी अधिक भर देतो की, ज्यामुळे प्रचार कार्य पुढे नेण्यास मोकळे राहता येईल. “जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा,” असे तो म्हणतो. “कारण मी तुम्हास खचित सांगतो की, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरुन होणार नाहीत.”
हे खरे की येशूने ह्या सूचना, इशारा व उत्तेजन आपल्या १२ शिष्यांना दिले होते. पण हे त्यांच्यासाठी देखील होते जे त्याच्या मृत्यु व पुनरुत्थानानंतर जगभरात प्रचाराच्या कामामध्ये भाग घेणार होते. ही गोष्ट, तो जे म्हणाला की, त्याच्या शिष्यांना जेथे पाठविण्यात आले होते ते केवळ इस्राएल लोकच नव्हे तर ‘सर्व लोक द्वेष करतील,’ त्याकरवी सूचित होते. याखेरीज, येशूने आपल्या प्रेषितांना प्रचाराच्या कामास पाठविले तेव्हा त्यांना स्पष्टतया देशाधिकारी व राजांपुढे उभे करण्यात आले नव्हते. याशिवाय, विश्वासधारकांचा त्यांच्या कुटुंबियांमार्फत वध घडला गेला नव्हता.
यास्तव, जेव्हा तो असे म्हणाला की, “मनुष्याचा पुत्र येईपर्यंत,” त्याच्या शिष्यांना त्यांच्या प्रचाराचे क्षेत्र फिरुन होणार नाही, तेव्हा तो आपल्याला हे भविष्यवादितपणे सांगत होता की, तो हर्मगिदोनाच्या वेळी यहोवाचा दंड देणारा अधिकारी असा वैभवाने राजा म्हणून येईपर्यंत त्याच्या शिष्यांना देवाच्या प्रस्थापित राज्याच्या सुवार्तेचे काम संपूर्ण जगभरात आटोपणार नव्हते.
प्रचार कार्याविषयीच्या आणखी सूचना देताना येशू पुढे म्हणतोः “गुरुपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही.” यामुळेच येशूच्या अनुयायांनी देखील त्याच्याप्रमाणेच देवाच्या राज्याच्या प्रचारार्थ छळ व वाईट वागणूक याची अपेक्षा धरावी हे तो सुचवीत होता. तरीही तो म्हणतोः “जे शरीराला वधितात पण जिवाला वधावयास समर्थ नाहीत त्यांस भिऊ नका; तर जीव व शरीर या दोहोंचा गेहेन्नात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.”
येशू याबाबतीत स्वतःचे उदाहरण घालून देतो. तो सर्वसमर्थ देव यहोवा याविषयीच्या आपल्या एकनिष्ठेची हातमिळवणी करण्यापेक्षा निर्भिडपणे मरण सहन करतो. होय, यहोवा देवच केवळ एखाद्याचा “जीव” (याचा येथे अर्थ आहे की, जिवंत जीव असे त्याचे भवितव्य) नष्ट करू शकतो इतकेच नाही तर तो त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवनासाठीही पुनरुत्थित करू शकतो. खरेच, यहोवा हा किती प्रेमाळू व कनवाळू असा स्वर्गीय पिता आहे!
यहोवा आपल्या शिष्यांविषयी केवढी प्रेमळ काळजी करीत आहे याचे उदाहरण येशू देतो. “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही?” असे तो विचारतो. “तथापि, तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडत नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. यास्तव भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”
जो राज्याचा संदेश घोषित करण्याची नेमणूक येशूने आपल्या शिष्यांना दिली आहे, तो घरामध्ये विभाजन पाडणार होता; कारण काही विशिष्ट सदस्य त्या संदेशाचा स्विकार करणार होते तर बाकीचे तो नाकारणार होते. “मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका,” तो स्पष्ट करतो. “मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे.” यास्तव, कुटुंबातील जे सदस्य पवित्र शास्त्रीय सत्याचा स्विकार करणार होते त्यांना धैर्याची गरज होती. “जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही,” असे येशू परिक्षितो. “आणि जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.”
आपल्या सूचनांच्या समारोपाला येशू हे स्पष्ट करतो की, जो त्याच्या शिष्यांचा स्विकार करतो तो येशूचा देखील स्विकार करतो. “ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो काणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो.” मत्तय १०:१६-४२.
◆ येशूने आपल्या शिष्यांना कोणकोणते इशारे दिले?
◆ त्याने त्यांना कोणते उत्तेजन व सांत्वन दिले?
◆ येशूच्या सूचना आधुनिक काळातील ख्रिश्चनांनाही का लागू होतात?
◆ येशूचा एखादा शिष्य आपल्या शिक्षकापेक्षा का श्रेष्ठ नाही?