पवित्र गूज उलगडते
“या ईश्वरी भक्तीचे रहस्य मोठे निर्विवाद आहे.”—१ तीमथ्य ३:१६.
१. पहिले तीमथ्य ३:१६ मध्ये वर्णिण्यात आलेले गूज कोणते आहे?
कोडी तुमचे औत्सुक्य वाढवितात का? रहस्य सोडविण्यास तुम्हाला आनंद वाटतो का? आम्हापैकी बहुतेकांना तो वाटतो. तर मग, आम्हासोबत मिळून सर्वात मोठे असणारे गूज सोडवा. हे असे गूज आहे जे देवाच्या वचनात हजारो वर्षांसाठी दडलेले राहिले होते. हे पवित्र गूज आमच्या सध्याच्या व भावी जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम घडवीत आहे व घडवणार आहे. या पवित्र गूजाचे वर्णन १ तीमथ्य ३:१६ मध्ये ‘ईश्वरी भक्तीचे पवित्र रहस्य’ याप्रकारे करण्यात आले आहे. हे अत्युच्च गूज आम्हाला मोठ्या उदारपणे सांगून त्याचा अर्थही विशद केल्यामुळे आम्ही ‘रहस्ये प्रकटविणाऱ्या’ यहोवा देवाचे केवढे आभार मानावयास हवेत!—दानीएल २:२८, २९.
२. (अ) यहोवा पहिल्यांदाच पवित्र गूजाविषयी केव्हा बोलला, व मग त्याने कशाचे अभिवचन दिले? (ब) कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची गरज आहे?
२ एदेनात सर्पाने हव्वेस फसविले आणि आदामाने बंड करण्यात आपल्या पत्नीचा मागोवा घेतल्यानंतर यहोवा देवाने प्रथमतःच त्या पवित्र गूजाचे वक्तव्य केले. तेथे देवाने याचे अभिवचन दिले की, “संतति,” किंवा संतान त्या सर्पाचे डोके फोडणार. (उत्पत्ती ३:१५) तर मग, हे संतान कोण होते? तो सर्पावर कसा विजय मिळवणार होता? तो देवाच्या सत्यतेला तसेच त्याने या पृथ्वीविषयी राखलेल्या उद्देशाला पावित्र्यता मिळवून देणार होता का?
३. ईश्वरी भविष्यवादांनी संतानाची ओळख व त्याची कार्ये याविषयी कोणते प्रकटन पुरविले?
३ काही काळातच ईश्वरी भविष्यवादांनी या संतानाची ओळख व त्याची भावी कार्ये याविषयीचे प्रकटन पुरविले. तो अब्राहामाचा वंशज होणार होता, त्याला दाविदाचे राज्य मिळणार होते व त्याला शांतीचा राजपुत्र असे संबोधिण्यात येणार होते. ‘त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत होणार नव्हता.’ (यशया ९:६, ७; उत्पत्ती २२:१५-१८; स्तोत्रसंहिता ८९:३५-३७) पण रोमकरांस पत्र १६:२५ म्हणते त्याप्रमाणे हे पवित्र गूज “गतयुगात गुप्त ठेवले होते.”
रहस्य सोडविणे
४. इ.स. २९ मध्ये पवित्र गूज उलगडण्यास कशी सुरवात झाली?
४ सरतेशवेटी चार हजार वर्षांनी पडदा दूर झाला! तो कशाप्रकारे? इ.स. २९ मध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने नासोरी येशूचा यार्देन नदीच्या पाण्यात बाप्तिस्मा केला आणि स्वर्गातून अशी देवाची वाणी ऐकावयास मिळालीः “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) अहा, येथे वचनयुक्त संतान सरतेशवेटी दिसले! आता पवित्र गूज आपल्या सर्व वैभवी पैलूमधून तसेच ईश्वरी भक्तीच्या विषयातूनही उलगडू लागले होते.
५. “ईश्वरी भक्ती” म्हणजे काय, व जे ती आचरतात त्यांच्यावर ती कसा परिणाम करते?
५ आता, “ईश्वरी भक्ती” या संज्ञेमुळे आपल्याला कोणता अर्थबोध होतो? ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ही संज्ञा केवळ २० वेळा आढळते व यापैकीच्या अर्ध्या तर पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दोन पत्रात आढळतात. “ईश्वरी भक्ती” याची व्याख्या देताना इनसाईट ऑन द स्क्रिपचर्स हे प्रकाशन म्हणतेः “देवास दाखविलेला पूज्यभाव, उपासना व सेवा आणि त्याच्या विश्वव्याप्त सार्वभौमत्वास निष्ठावंतपणा.” जे अंतःकरण देवाच्या जवळ आलेले असते त्यामधून त्याजविषयी पूज्यभाव येतो, त्याची श्रेष्ठता, त्याचे सनातनपण व त्याच्या भव्य निर्मितीचा बहुतपणा याविषयी भीतीयुक्त आदर तसेच, रसिक मानवासाठी तो आध्यात्मिक व भौतिकरित्या देत असलेल्या देणग्या याविषयी कृतज्ञता वाटत असते. होय, आम्हापैकी ईश्वरी भक्ती जोपासणाऱ्या प्रत्येकास स्तोत्रकर्त्याप्रमाणेच वाटले पाहिजे, जे त्याने स्तोत्रसंहिता १०४:१ मध्ये म्हटले आहेः “हे माझ्या जिवा, यहोवाचा धन्यवाद कर. हे यहोवा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. तू मान व महिमा यांनी मंडित आहेस.”
६. (अ) यहोवाचे उपासक चर्चला जाणाऱ्या सभासदांपेक्षा कसे भिन्न आहेत? (ब) रोमकर ११:३३, ३४ मध्ये पौल काय म्हणतो व कोणते प्रश्न सामोरे येतात?
६ आम्ही देवास दाखवीत असलेल्या निष्ठेला आमच्या कृतीकरवी वक्तव्य मिळण्यास हवे. या बाबतीत खरा देव यहोवा याचे उपासक ख्रिस्ती धर्मजगताच्या कोमेजत जात असलेल्या चर्चमधील सभासदांपेक्षा खूपच वेगळे आहेत. आज पृथ्वीवरील पुष्कळ लोकांना धर्म—एखादा कोणता तरी असला तरी तो—नुसता औपचारिक वाटतो; अशा अंगरख्यासारखा की जो घातला म्हणजे पवित्र दिसतो, पण वस्तुतः त्यांचे जीवन सभोवतालच्या भ्रष्ट जगाच्या चालीरितीनुसार असते. देव कोण आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसते. अशा व्यक्तींनी पौलाच्या प्रे. कृत्ये १७:२३ मधील वचनांकडे जरुर लक्ष द्यावे, जेथे तो “अज्ञात देवा”ची भक्ती करणाऱ्या अथैनेकरांना असे म्हणाला होताः “ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो.” त्या वैभवी देवाविषयी पौल रोमकर ११:३३, ३४ मध्ये हे उद्गार काढतोः “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! कारण ‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे आणि त्याचा कोण मंत्री होता?’” तर मग देवाच्या मार्गाची आम्हाला कशी ओळख घडणार? ‘ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज शिकून.’ पण हे कसे करणे जमेल?
७. “ईश्वरी भक्तीचे हे गूज निर्विवाद मोठे आहे,” असे का म्हटले जाऊ शकते?
७ तीमथ्याला लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या ३ऱ्या अध्यायात सुरवातीला प्रेषित पौल देवाच्या जबाबदार सेवकांनी देवाच्या घरात म्हणजे ज्याचा उल्लेख १५ व्या वचनात “सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी” असा करण्यात आला आहे तेथे कसे वागावे याविषयीच्या गरजा प्रस्तुत करतो. मग, पुढे १६ व्या वचनात पौल म्हणतोः “ईश्वरी भक्तीचे हे गूज निर्विवाद मोठे आहे.” (न्यू.व.) मोठे असे खरेच म्हणता येईल कारण यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या पृथ्वीवर हे गूज उघडण्यास, ईश्वरी भक्ती काय असते ते दाखविण्यास व ती खऱ्या उपासनेच्या अनुषंगाने कशी महत्त्वपूर्ण, प्रमुख अंग आहे ते प्रदर्शित करण्यास पाठविले. ईश्वरी भक्तीचे हे पवित्र गूज येशूच्या पृथ्वीवरील जीवनक्रमणात दिसले. यास्तव यहोवावर प्रीती करणाऱ्या सर्वांनी आपला विश्वास व आपले जीवन ख्रिस्तावर उभारले पाहिजे, कारण त्यानेच प्रत्यक्षात ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन केले. पण येशूने हे ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज कसे स्पष्ट केले?
सहा पैलू
८. (अ) पौलाने १ तीमथ्य ३:१६ मध्ये वर्णिलेल्या पवित्र गूजाचे सहा पैलू कोणते आहेत? (ब) जो प्रकट झालो तो “तो” कोण आहे?
८ पौल या प्रश्नाचे उत्तर ईश्वरी प्रेरणेने देतो. १ तीमथ्य ३:१६ मध्ये तो या पवित्र गूजाच्या सहा पैलूंचे वर्णन देतो व म्हणतोः “तो [१] देहाने प्रकट झाला, [२] आत्म्याने नीतीमान असा घोषित करण्यात आला, [३] देवदूतांच्या दृष्टीस पडला, [४] त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, [५] जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, आणि [६] तो गौरवात वर घेतला गेला.” हा “तो” कोण आहे जो प्रकट झाला? “तो” म्हणजे येशू, वचनयुक्त संतान, जो देवाच्या इच्छेनुसार करण्यासाठी येथे आला. तो या पवित्र गूजाचा केंद्रभाग आहे व त्यामुळेच ते निर्विवाद मोठे ठरते.
९. “देव देहाने प्रगट झाला,” असे १ तीमथ्य ३:१६ वाचू नये याला कोणता पुरावा आहे?
९ पहिले तीमथ्य ३:१६ मध्ये असणारा “तो” हा स्वतःच देव आहे असे म्हणून त्रैक्यवादी पवित्र गूजाच्या समजणूकीला पार विस्कळीत करतात. ते हे प्रतिपादन किंग जेम्स आवृत्तीच्या पवित्र शास्त्राधाराने करतात, जेथे असे वाचण्यात येतेः “देव देहाने प्रगट झाला.” पण अत्यंत विश्वासार्ह असे ग्रीक हस्तलिखित काय म्हणते? त्यात “देव” याऐवजी “तो” हे सर्वनाम वापरण्यात आले आहे. आता शास्त्रवचनांवर टीका मांडणारे या गोष्टीशी सहमत झाले आहेत की, या वचनात घालण्यात आलेला “देव” हा शब्द ही शास्त्र्यांनी केलेली चूक होती. अशाप्रकारे, अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन, द न्यू इंग्लिश बायबल व न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन या अलिकडच्याच भाषांतरात हे वचन योग्यपणे असे वाचण्यात येतेः ‘तो देहाने प्रकट झाला.’ हा ‘देहाने प्रकट झालेला’ देव निश्चितच नव्हता. तर तो त्याचा प्रिय पुत्र व पहिली निर्मिती होता, ज्याविषयी प्रेषित योहानाने लिहिलेः “शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली; आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.”—योहान १:१४.
“देहाने प्रकट झाला”
१०. (अ) येशूच्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगी पवित्र गूजाचा पहिला पैलू कसा स्पष्ट झाला? (ब) येशू “शेवटला आदाम” का झाला?
१० येशूच्या बाप्तिस्म्याच्या प्रसंगी पवित्र गूजातील पहिला पैलू दृष्टीपथात आलाः येशू देवाचा अभिषिक्त पुत्रा असा “देहाने प्रकट झाला.” यहोवा देवाने स्वर्गातून आपल्या पुत्राचे जीवन मरीयेच्या उदरात स्थलांतरित केले की ज्यामुळे येशूचा परिपूर्ण मानव या नात्याने देहात जन्म घडला. अशाप्रकारे १ करिंथकर १५:४५-४७ दाखविते त्यानुसार येशू हा पहिला आदाम होता अगदी त्याच्याशी सदृश्य असणारा दुसरा किंवा “शेवटला” आदाम झाला. पण कोणत्या कारणास्तव? पहिले तीमथ्य २:५, ६ या ‘शेवटल्या आदामा’स “येशू ख्रिस्त, हा एकच मनुष्य . . . त्याने सर्वांसाठी अनुरुप असे मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले,” या अर्थाने संबोधिते. या परिपूर्ण मानवी यज्ञार्पणाच्या कायदेशीर आधारावर येशू १,४४,००० मानवासोबत केल्या जाणाऱ्या नव्या कराराची मध्यस्ती करतो. ते त्याच्या राज्यामध्ये त्याच्याबरोबर सहवारीस बनतात.—प्रकटीकरण १४:१-३.
११. येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचे लाभ कोणास मिळतात?
११ येशूच्या यज्ञार्पित मरणामुळे इतरांनाही लाभ घडू शकेल का? होय, निश्चितपणे! पहिले योहान २:२ म्हणते की, येशू ख्रिस्त हा आपल्या पापांबद्दल [म्हणजे, योहानासारख्या असणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या पापांसाठी] प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.” अशाप्रकारे येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचे लाभ १,४४,००० अभिषिक्त ख्रिस्ती जनांच्या पुढे जाऊन मानवजातीच्या सबंध जगापर्यंत पोहोचतात. येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवल्यामुळे सध्या जिवंत असलेला “मोठा लोकसमुदाय” व नंदनवनमय पृथ्वीवर पुनरुत्थित होणाऱ्या लाखो लोकांना सार्वकालिक जीवन मिळेल. प्रकटीकरण ७:९, १० मध्ये दर्शविल्याप्रमाणे मोठ्या लोकसमुदायाने आत्ताच आपले झगे येशू ख्रिस्त या कोकऱ्याने ओतिलेल्या रक्तावर आपला विश्वास ठेवून शुद्ध केले आहेत. त्यांना देवाबरोबर मित्रत्व साधण्यासाठी नीतीमान असे धरण्यात येत आहे. ते आनंदाने या पवित्र गूजाच्या विविध पैलूचे शिक्षण घेत असून येशूच्या उदाहरणास अनुलक्षून ईश्वरी भक्ती प्रदर्शित करीत आहेत!
इतर पैलू
१२. येशू कसा “आत्म्याने नीतीमान ठरला”?
१२ आता १ तीमथ्य ३:१६ च्या दुसऱ्या पैलूविषयी काय? येशू “आत्म्याने नीतीमान ठरला.” पण कसा? यहोवाने आपला या सचोटी-रक्षक पुत्रास मृतातून आत्मिक जीवनात उठविले. यामुळे देवाने जे घोषित केले की येशू हा सर्वतोपरि नीतीमान आहे व आता त्याला आणखी उच्च नेमणूका मिळण्याच्या पात्रतेचा आहे त्याला पुष्टी मिळाली. रोमकर १:४ म्हणते की, “पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने [येशू] मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला.” याला दुजोरा देऊन पेत्र आपल्या पहिल्या पत्राच्या ३ऱ्या अध्यायाच्या १८ व्या वचनात म्हणतोः “आपल्याला देवाजळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतीमान पुरुषाने अनीतीमान लोकांकरिता एकदा मरण सोसले; तो देहरूपात जिवे मारिला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” तर येशूचे हे ईश्वरी भक्तीचे उदाहरण तुम्हाला देवाकडे निरवते का?
१३. पुनरूत्थित येशू कोणत्या देवदूतांना दिसला, आणि त्याने त्यांना कोणत्या प्रकारातील संदेशाचा प्रचार केला?
१३ पहिले तीमथ्य ३:१६ मध्ये पुढे पौल पवित्र गूजाच्या तिसऱ्या पैलूची माहिती देताना असे म्हणतो की येशू “देवदूतांच्या दृष्टीस पडला.” हे देवदूत कोण असावेत? जो “आत्म्यात जिवंत केला गेला” त्या येशूविषयी आणखी सांगताना पेत्र १ पेत्र ३:१९, २० मध्ये असे लिहितोः “त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानिली तेच ते होत.” यहुदाचे पत्र ६ व्या वचनाच्या मते हे आत्मे म्हणजे “ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता [स्वर्गातील] आपले वसतीस्थान सोडले” ते होत. या देवदूतांनी स्त्रियांसोबत निषिद्ध लैंगिक समागमाचा आनंद लुटावा यासाठी रुपांतरीत शरीरे धारण केली. जलप्रलय आला व या दूतांना आत्मिक क्षेत्राकडे धाव घ्यावी लागली तेव्हा यांना तार्तारस म्हणजे अत्यंत हिणकस परिस्थितीत डांबण्यात आले. (२ पेत्र २:४) पुनरूत्थित येशूने यांना प्रचार केला. हा प्रचार तारणाविषयीचा होता का? निश्चितच नाही! उलटपक्षी, येशूने त्यांच्या दुष्टाईचा, ईश्वरी भक्तीच्या अगदी विरुद्ध स्वरुपाची हालचाल या नात्याने कडक निषेध केला. यास्तव, जे देवाचे लोक आज लैंगिक अनैतिकतेची खेळी करीत असतील अशांनी त्या दूतांना जो न्यायदंड घोषित करण्यात आला त्यापासून धडा शिकण्यास हवा!
१४. येशूविषयी कशाप्रकारे “राष्ट्रांत घोषणा” होण्यास सुरवात झाली?
१४ पहिले तीमथ्य ३:१६ चा चवथा पैलू हा की, येशूची “राष्ट्रात घोषणा झाली.” याची पूर्णता कशी झाली? येशूला धरण्याआधी त्याने आपल्या प्रेषितांना म्हटले होतेः “मी तुम्हाला खचित खचित सांगतो की, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील; कारण मी पित्याकडे जातो.” (योहान १४:१२) यानंतर लवकरच, म्हणजे इ.स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी येशूने आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला व मग, “त्या येशूला देवाने उठविले” ह्या आश्चर्यकारक वार्तेचा यहुद्यांमध्ये प्रचार होऊ लागला. नंतर शोमरोन्यांनीही देवाचे वचन स्वीकारले व त्यांना पवित्र आत्मा मिळाला. (प्रे. कृत्ये २:३२; ८:१४-१७) यानंतर इ.स. ३६ मध्ये पेत्राने कर्नेल्य व त्याच्या घरात जमलेल्या इतर विदेश्यांना प्रचार केला. अशाप्रकारे येशूविषयीच्या सुवार्तेची “राष्ट्रांत घोषणा” होण्यास आरंभ झाला. “राष्ट्रांत” याचा अर्थ यहुद्देत्तर किंवा विदेशी लोकात याचा प्रचार सुरु झाला व यांचाही पवित्र आत्म्याने अभिषेक झाला.
१५. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी ईश्वरी भक्तीविषयीचे पवित्र गूज चांगल्याप्रकारे शिकून घेतले होते हे कशावरून सिद्ध होते?
१५ प्रे. कृत्ये १२:२४ मध्ये कळविल्यानुसार “देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.” प्रे. कृत्ये १७:६ कळविते की, आज जसे घडते त्याचप्रमाणे विरोधकांनी तेव्हाही ओरड केली कीः “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत.” ३० वर्षांच्या आतच पौल रोममधून हे लिहू शकला की, सुवार्तेची “आकाशाखालील सर्व सृष्टीत घोषणा झाली.” (कलस्सैकर १:२३) त्या काळातील ख्रिस्ती लोकांनी ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज चांगल्या प्रकारे शिकून घेतले होते. ते त्याचा केवढ्या उत्साहाने अवलंब करीत होते! यास्तव, आज राज्य प्रचाराच्या कळसास येऊन पोहोचलो असता आपणही, ते शिकून घेऊन त्याचा अवलंब करू या.
१६. पवित्र गूजाचा पाचवा पैलू कोणता होता आणि कोणत्या कार्यामुळे तो उघड झाला?
१६ पहिल्या शतकातील त्या प्रचाराच्या अनुषंगाने १ तीमथ्य ३:१६ च्या पवित्र गूजातील पाचव्या पैलूचे दर्शन घडले. आता येशूवर “जगात विश्वास ठेवण्यात आला.” हे पौल व तीमथ्य यांजसारख्या इतर आवेशी सुवार्तिकांनी ख्रिस्तासारख्या दाखविलेल्या ईश्वरी भक्तीच्या प्रदर्शनामुळे घडून आले. यांनी आशिया मायनर, युरोप व स्पेनपर्यंत लांब ही सुवार्ता नेली. तर पूर्व आफ्रिकेपर्यंत बाप्तिस्मा झालेल्या कुशी षंढाच्या मुखाने ती गेली आणि पेत्राने बाबेलमध्ये आपले कार्य केले.
१७. येशूवर सध्या जगतात सर्वत्र का विश्वास ठेवला जात आहे?
१७ आता आमच्या काळाविषयी काय? १९१९ पासून अभिषिक्त शेष हे ईश्वरी भक्तीचे उदाहरण प्रदर्शित करीत आहेत. या अभिषिक्त जणांनी येशूने घातलेल्या विश्वासाच्या पायावर आपली बांधणी मजबूत केली आहे. खासपणे १९३५ पासून त्यांनी एका मोठ्या लोकसमुदायाला गोळा केले आहे जो “मोठे संकट” यामधून पार होण्याची व नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनप्राप्तीची आशा राखून आनंदीत होत आहे. (प्रकटीकरण ७:९, १४) अशाप्रकारे येशूवर केंद्रित असणाऱ्या सुवार्तेवर आता जगभरात विश्वास ठेवण्यात येत आहे. जगभरात ३७,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार ईश्वरी भक्तीने प्रचाराचे काम करीत आहेत व सर्वत्र वाढत आहेत!
१८. येशू कसा “गौरवात वर घेतला गेला”?
१८ आता पवित्र गूजाचा आणखी एक पैलू आहे, सहावाः येशू “गौरवात वर घेतला गेला.” आत्म्याने पुनरूत्थित झाल्यावर येशूने ४० दिवस विविध रुपांतरित शरीरे धारण करून आपल्या शिष्यांना दर्शन दिले व त्यांना “देवाच्या राज्याच्या गोष्टी” सांगितल्या. यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. (प्रे. कृत्ये १:३, ६-९) अशा पद्धतीने, येशूने पित्याला केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळाले. ही प्रार्थना योहान १७:१-५ मध्ये अशी लिखित आहेः “बापा, . . . पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. . . . जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.”
१९. येशू स्वर्गात परतल्यावर त्याचे कसे स्वागत झाले असावे?
१९ येशू स्वर्गात परतला तेव्हा तेथे केवढा आनंद झाला असावा! बऱ्याच पूर्वी जेव्हा यहोवाने पृथ्वीची स्थापना केली तेव्हा “सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:७) तर आता जेव्हा यहोवाच्या सार्वभौमत्वाचा निष्ठावंत पुरस्कर्ता त्यांच्यामध्ये परतला तेव्हा त्या देवकुमारांना केवढा आनंद वाटला असेल बरे!
२०. येशू एवढे अत्युत्तम नाव का मिळवू शकला, आणि पृथ्वीवर असताना त्याने काय केले?
२० पौल विजयशाली ख्रिस्ताविषयी इब्रीयांस १:३, ४ मध्ये असे म्हणतोः “पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.” ख्रिस्ताने अधर्मावर विजय मिळवल्यामुळे त्याला हे नाव मिळाले. देवाच्या या पुत्राने येथे या पृथ्वीवर ईश्वरी भक्तीला खऱ्या अर्थी पूर्णपणे उजळविले. यासोबत त्याने सार्वकालिक जीवनाची प्राप्ती मिळविणाऱ्या सर्वांसाठी एक नमुना प्रस्तुत केला. येशू आता स्वर्गात देवाच्या उजव्या हाती उंचावला असल्यामुळे ईश्वरी भक्तीचे हे पवित्र गूज त्याच्या पूर्ण पैलूनिशी प्रकट झाले आहे.
तुमचा काय प्रतिसाद असेल?
◻ “ईश्वरी भक्ती” म्हणजे काय?
◻ येशू कशाप्रकारे “देहाने प्रकट झाला” व त्यानंतर तो कसा “आत्म्याने नीतीमान ठरला”?
◻ येशू कोणत्या देवदूतांना दिसला व कोणत्या संदेशासह?
◻ ख्रिस्ताची कशी “राष्ट्रांत घोषणा झाली” व कशाप्रकारे “जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला”?
◻ येशू केव्हा “गौरवात वर घेतला गेला,” आणि ईश्वरी भक्तीविषयी काय केल्यानंतर तो वर गेला?