ईश्वरी भक्तीविषयी येशूचे उदाहरण अनुसरा
“ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज निर्विवाद मोठे आहेः ‘तो [येशू] देहाने प्रगट झाला.’”—१ तीमथ्य ३:१६.
१. (अ) सुमारे ४,००० वर्षे कोणता प्रश्न उत्तर न मिळता तसाच राहिला? (ब) त्या प्रश्नाला केव्हा व कसे उत्तर मिळाले?
असा एक प्रश्न होता जो सुमारे ४,००० वर्षापर्यंत काही उत्तर न मिळता तसाच राहिला होता. पहिला मानव आदाम याने आपली सचोटी राखण्यात अपयश दाखविल्यापासून हा प्रश्न उद्भवला होता की, मानवजातीत ईश्वरी भक्ती कशी दिसून येईल? सरतेशेवटी इ.स.च्या पहिल्या शतकात देवाचा पुत्र या पृथ्वीवर आला तेव्हा या प्रश्नाला उत्तर मिळाले. येशू ख्रिस्ताने आपले विचार, बोलणे आणि कृती याद्वारे यहोवाशी असणारे व्यक्तीगत जिव्हाळ्याचे नाते प्रदर्शित केले. अशाप्रकारे त्याने “ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज” यावरील पडदा दूर सारला. व त्याद्वारे ही भक्ती समर्पित लोकांना कशी जोपासता येईल हे दाखवून दिले.—१ तीमथ्य ३:१६.
२. ईश्वरी भक्तीचे आचरण करताना आम्ही येशूच्या उदाहरणाचा अगदी जवळून विचार का करायला हवा?
२ समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्वरी भक्ती आचरीत असताना आम्ही येशूचे उदाहरण “जवळून” अनुसरलेले बरे. (इब्रीयांस १२:३) ते का बरे? विशेषतः दोन कारणास्तव. पहिले, येशूच्या उदाहरणामुळे आम्हाला ईश्वरी भक्तीची जोपासना करण्याची मदत मिळते. येशूला इतरांपेक्षा आपल्या पित्याची अधिक चांगली ओळख होती. (योहान १:१८) तसेच येशूने आपला पिता यहोवा याच्या मार्गाचे व गुणांचे इतक्या जवळून अनुकरण करून दाखविले की तो हे म्हणू शकलाः “ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) या कारणास्तव, येशूचे जीवन व उपाध्यपण यांजमुळे आम्हाला यहोवाच्या कनवाळू गुणांविषयी अधिक खोल रसिकता निर्माण होऊन आमच्या प्रेमळ निर्माणकर्त्याविषयी आमचे व्यक्तीगत नाते अधिक बळकट झाल्याचे वाटू लागते. दुसरे कारण म्हणजे, येशूचे उदाहरण आम्हाला ईश्वरी भक्ती प्रदर्शित करण्यात साहाय्यक ठरते. यामुळेच आपल्याला कशाप्रकारे ‘ख्रिस्ताला परिधान करता येईल’ किंवा त्याचा नमुना कसा उचलून घेतला येईल, त्याचे उदाहरण कसे अनुसरता येईल ते समजू शकते.—रोमकर १३:१४.
३. आमच्या व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यासाच्या कार्यक्रमात कशाचा समावेश होण्यास हवा व का?
३ येशूने जे म्हटले व जे केले त्या सर्व गोष्टी लिखित करण्यात आल्या नाहीत. (योहान २१:२५) या कारणास्तव, ज्या गोष्टी ईश्वरी प्रेरणेने लिखित झाल्या त्या आम्हासाठी खास आस्थेच्या वाटल्या पाहिजेत. आमच्या व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यासाच्या कार्यक्रमात यासाठी येशूच्या जीवनावरील शुभवर्तमानांच्या अहवालाचे वाचन नियमित रुपात असावयास हवे. तथापि, या वाचनामुळे आमच्या ईश्वरी भक्तीच्या आचरणाला साहाय्य लाभायचे आहे तर मग, जे वाचतो त्यावर रसिकपूर्ण अर्थाने मनन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जे दिसते त्यापलिकडेही पाहण्याची शोधक वृत्ती आपल्याठायी असावयास हवी.
पिता तसा पुत्र
४. (अ) येशू हा उबदारपणा व गाढ आस्था राखणारा होता हे कशावरुन दिसून येते? (ब) दुसऱ्यांसोबत व्यवहार करताना येशूने कोणता पुढाकार घेतला?
४ याचे एक उदाहरण पहा. येशूला उबदारपणा व गाढ आस्था होती. मार्क १०:१, १०, १३, १७ तसेच ३५ वचनांपासून हे लक्षात घ्या की सर्व वयाचे व पार्श्वभूमीचे लोक येशूकडे येत. येशूने कितीतरी वेळा लहान मुलांना आपल्याजवळ घेतले. (मार्क ९:३६; १०:१६) मग, लोक इतकेच काय पण मुलांना देखील येशूकडे येण्यास निःसंकोचपणा का वाटे? कारण त्याने त्यांच्याविषयी प्रामाणिक व खरी आस्था व्यक्त केली. (मार्क १:४०, ४१) जे गरजवंत होते त्यांना त्याने पुढे होऊन मदत दिली यावरुन ते स्पष्ट होते. याचे उदाहरण पाहिल्यास, त्याने नाईन गावच्या एका विधवेला ‘पाहिले,’ जिच्या मृत मुलास बाहेर नेत होते. त्याने “जवळ जाऊन” त्या मुलाचे पुनरुत्थान केले. असे काही करावे अशी कोणी त्याला विचारणा केली होती असा काही उल्लेख नाही. (लूक ७:१३-१५) याचप्रमाणे कोणीही विचारणा केली नसताना त्याने स्वतःच पुढे होऊन एका कुबड्या स्त्रीला व जलोदर लागलेल्या एका मनुष्याला बरे केले.—लूक १३:११-१३; १४:१-४.
५. येशूच्या उपाध्यपणाविषयीचे अहवाल यहोवाचे गुण व मार्ग यांजविषयी आपल्याला काय शिकवितात?
५ अशा प्रसंगाचे वाचन केल्यावर थोडेसे थांबून स्वतःला विचाराः ‘येशूने आपल्या पित्याचे पूर्णपणे अनुकरण केले आहे तर मग हे अहवाल मला यहोवाचे गुण व त्याचे मार्ग याविषयी काय सांगतात?’ त्यामुळे हेच दिसून आले पाहिजे की, यहोवा हा देखील उबदारपणा व गाढ आस्था राखणारा देव आहे. मानवी कुटुंबाविषयी त्याला वाटणाऱ्या प्रखर आस्थेमुळे त्याने त्यांच्याशी दळणवळण ठेवण्यात पुढाकार घेतला. आपल्या पुत्राची “बहुतांकरिता खंडणी” द्यावी यासाठी त्याला गळ घालावी लागली नाही. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) जे प्रेमामुळे त्याची सेवा करण्याचा मनोदय राखतात अशांच्या ‘जवळ जाण्याच्या’ संधि तो शोधतो. (अनुवाद १०:१५) पवित्र शास्त्र म्हणतेः “यहोवाचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरिक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.”—२ इतिहास १६:९.
६. येशूच्या उदाहरणाकरवी प्रवर्तित होणारा यहोवाचा उबदारपणा व गाढ आस्था याविषयी मनन केल्यामुळे कोणता परिणाम संभवतो?
६ येशूच्या उदाहरणाकरवी प्रवर्तित होणारा यहोवा देवाचा उबदारपणा व गाढ आस्था याविषयी या पद्धतीने मनन केल्यामुळे तुमचे अंतःकरण भारावून जाईल व त्यामध्ये त्याच्या कोमल व अपीलदायक गुणांविषयी अधिक आस्था निर्माण होऊ शकेल. हे तुम्हाला त्याजकडे येण्यास आकर्षित करील. तुम्हाला त्याच्याकडे सर्वदा व कोणत्याही परिस्थितीत प्रार्थनेच्या माध्यमाने जवळ जाण्यास मोकळेपणा वाटेल. (स्तोत्रसंहिता ६५:२) तुम्हाला त्याच्याविषयी वाटणारा जिव्हाळा अधिक वाढेल.
७. यहोवाठायी असणारा उबदारपणा व गाढ आस्था याविषयीचे मनन केल्यावर तुम्ही स्वतःला काय विचारण्यास हवे व का?
७ हे लक्षात घ्या की, ईश्वरी भक्तीमध्ये नुसत्या उपासनायुक्त भावनांपेक्षा अधिक समाविष्ट आहे. एक पवित्र शास्त्र प्रामाण्य आर. लेन्स्की यांनी म्हटले की, त्यात “आमचा एकंदर भक्तीमानपणा, उपासनिक प्रवृत्ती आणि याकरवी उद्भवणारी सर्व कृती यांचा समावेश होतो.’ (तिरप्या अक्षरवळणाचा प्रकार आमचा.) अशाप्रकारे येशूच्या नमुन्यात दिसून येणारा यहोवाचा उबदारपणा व गाढ आस्था याविषयीचे मनन केल्यावर स्वतःला विचारा: ‘मला यामध्ये यहोवाच्या अधिक सदृश्य कसे होता येईल? मी संकुचित दृष्टीकोन राखणारा नाही हे लोकांना दिसून येते का?’ तुम्ही पालक आहात तर मुले तुम्हाजवळ मोकळेपणाने आली पाहिजे. तसेच तुम्ही मंडळीत वडील आहात तर लोकांना तुम्हाकडे येण्यास संकोच वाटता कामा नये. पण हे कशामुळे अधिक घडून येऊ शकेल? उबदारपणा व गाढ आस्था या गुणांमुळे. तुम्ही इतरांविषयी प्रामाणिक व अस्सल आस्था जोपासली पाहिजे. तुम्ही इतरांची खरीच काळजी करता व त्यांच्याखातर स्वतःला देऊ करता तेव्हा हे लोक जाणतील व ते तुम्हाकडे आकर्षले जातील.
८. (अ) येशूविषयी पवित्र शास्त्रात वाचन करतेवेळी तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे? (ब) तळटीपेत जे अहवाल उद्धृत करण्यात आले आहेत त्याद्वारे आपल्याला यहोवाविषयी काय शिकायला मिळते?
८ यास्तव, तुम्ही येशूविषयीचा पवित्र शास्त्र अहवाल वाचता तेव्हा त्याने जे केले व म्हटले त्याद्वारे यहोवाच्या व्यक्तीमत्वाविषयी तुम्हाला अधिक शिकायला मिळेल हे लक्षात ठेवा.a येशूकरवी प्रदर्शित झालेल्या ईश्वरी गुणांसंबंधाची रसिकता तुम्हाठायी अधिक वाढू लागेल तेव्हा तुम्हाला अधिक देवासारखे होण्याची चालना मिळेल. जेव्हा हे घडते तेव्हा ईश्वरी भक्तीचा पुरावा असतो.
कौटुंबिक सदस्यांच्या बाबतीत ईश्वरी भक्ती आचरणे
९, १०. (अ) मरण्याच्या आधीच येशूला आपली आई मरीया हिच्याविषयी वाटणारी प्रीती व काळजी कशी व्यक्त झाली? (ब) आपल्या आईची काळजी घेण्याचे येशूने स्वतःच्या सख्या भावांवर न सोपविता प्रेषित योहानावर सोपविण्याचे काय कारण असावे?
९ येशू ख्रिस्ताचे जीवन व उपाध्यपण हे ईश्वरी भक्ती कशी प्रदर्शित व्हावी याचे प्रकटन पुरविते. याविषयीचे हृदयाला हलविणारे उदाहरण योहान १९:२५-२७ मध्ये लिखित आहे, जेथे आम्ही वाचतोः “येशूच्या वधस्तंभी त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला [योहान] जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटलेः ‘बाई, पाहा, हा तुझा मुलगा!’ मग त्याने त्या शिष्याला म्हटलेः ‘पाहा, ही तुझी आई!’ आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.”
१० जरा विचार करा! आपले पृथ्वीवरील जीवन अर्पण करण्याआधी येशूने आपली आई मरीया (जी बहुधा या वेळेपर्यंत विधवा झाली होती) हिच्याविषयी वाटणारी प्रीती व कळकळ यामुळे प्रिय प्रेषित योहानाला तिची काळजी घेण्याची जबाबदारी सुपुर्द केली. पण प्रश्न हा येतो की, येशूने आपल्या सख्या भावांऐवजी योहानाला ती जबाबदारी का दिली? कारण येशूला मरीयेच्या केवळ भौतिक गोष्टींची नव्हे तर त्यापेक्षा तिच्या आध्यात्मिक कल्याणाविषयी अधिक काळजी वाटत होती. प्रेषित योहान (जो की येशूचा चुलत भाऊ असावा) याने आपला विश्वास सिद्ध करून दाखवला होता, पण येशूचे सखे भाऊ त्यावेळेपावेतो विश्वासधारी बनले होते असा संकेत मिळत नाही.—मत्तय १२:४६-५०; योहान ७:५.
११. (अ) प्रेषित पौलाच्या मते कोणा ख्रिश्चनाला स्वतःच्या घरातच ईश्वरी भक्तीचे आचरण कसे दाखवता येईल? (ब) खरा ख्रिस्ती वडीलधाऱ्यांसाठी का तरतूद करतो?
११ आता ही गोष्ट ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन कशी होती? प्रेषित पौल याविषयीचे विवेचन देतोः “ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. कोणा विधवेला मुले वा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर ईश्वरी भक्तीने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” (१ तीमथ्य ५:३, ४) गरज आहे तेव्हा आपल्या पालकांना भौतिक गोष्टींचे साहाय्य देणे हे पौल म्हणतो की, ईश्वरी भक्ती दाखविण्यासारखे आहे. ते कसे काय? कारण कुटुंब व्यवस्थेचा संस्थापक यहोवा देव अशी आज्ञा देतो की, मुलांनी आपल्या आईबापाचा सन्मान करावा. (इफिसकर ३:१४, १५; ६:१-३) अशाप्रकारे खरा ख्रिस्ती हे ओळखेल की, ही कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करणे हे केवळ पालकांविषयी प्रीती दाखवत नसून देवाचा सन्मान व त्याच्या आज्ञांचे पालन दाखवीत असते.—पडताळा कलस्सैकर ३:२०.
१२. वडीलधाऱ्यांसंबंधाने तुम्हाला ईश्वरी भक्ती कशी आचरता येईल व यामागील हेतू कोणता असावा?
१२ तर मग, कौटुंबिक सदस्यांच्या अनुषंगाने तुम्हाला ईश्वरी भक्ती कशी आचरता येईल? जसे येशूने केले त्याप्रमाणे वडीलधाऱ्यांच्या आध्यात्मिक व शारीरिक गरजांची काळजी घेण्याची व्यवस्था करणे हे यात समाविष्ट असेल. हे न केल्यास ते ईश्वरी भक्तीच्या अभावाचे प्रदर्शन करेल. (पडताळा २ तीमथ्य ३:२, ३, ५.) समर्पित ख्रिस्ती गरजवंत पालकांना जी तरतूद करतो ती केवळ दयाळूपणा वा कर्तव्य म्हणून नव्हे तर त्याचे आपल्या कुटुंबावर प्रेम आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करण्याविषयी यहोवा जी उच्च भावना बाळगून आहे त्याच्या अनुषंगाने असते. त्यामुळेच, आपल्या पालकांची काळजी करणे हे ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन आहे.b
१३. ख्रिस्ती पित्याला आपल्या कुटुंबाच्या अनुषंगाने ईश्वरी भक्ती कशी आचरता येईल?
१३ घरात ईश्वरी भक्ती आणखी काही मार्गांनी आचरता येईल. उदाहरणार्थ, ख्रिस्ती पित्याला आपल्या कुटुंबाची भौतिक, भावनिक व आध्यात्मिक तरतूद करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळेच भौतिक गोष्टींची आयोजना करण्यासोबत तो नियमित रुपाच्या पवित्र शास्त्र अभ्यासाचीही व्यवस्था करील. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर नियमित रुपाने क्षेत्र कार्यात सहभागी व्हावे यासाठी तो वेळेची योजना करील. तो समतोल राखतो, कारण कुटुंबाला आराम व मनोरंजनाचीही गरज आहे हे तो जाणतो. तसेच तो अधिक महत्वाच्या गोष्टींना सूज्ञपणे अग्रक्रम देतो आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्यासाठी तो मंडळीतील कामकाजाला वाव देणार नाही. (१ तीमथ्य ३:५, १२) हे सर्व त्याने कशासाठी केले पाहिजे? कर्तव्याखातर नव्हे तर आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे. कुटुंबाची काळजी करण्याच्या गोष्टीला यहोवा केवढे महत्त्व देतो हे तो जाणून असतो. अशाप्रकारे पती व पिता या अर्थाने आपली जबाबदारी पूर्ण करून तो ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन करतो.
१४. ख्रिस्ती पत्नीला आपल्या घरी ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन कसे करता येईल?
१४ घरामध्ये ईश्वरी भक्ती आचरण्याची जबाबदारी ख्रिस्ती स्त्रियांवरही आहे. ती कशी? पवित्र शास्त्र म्हणते की, स्त्रियांनी आपल्या पतीच्या “अधीन असावे” व त्यांनी त्याची “भीड राखावी.” (इफिसकर ५:२२, ३३) तिचा पती जरी विश्वासात नसला तरीही तिने त्याच्या ‘अधीन राहिले पाहिजे.’ (१ पेत्र ३:१) पत्नीची ही अधीनता ख्रिस्ती स्त्रिया आपल्या पतीने घेतलेल्या निर्णयांना मान्यता दाखवून प्रदर्शित करतात. अर्थात, ते निर्णय देवाच्या नियमांविरुद्ध असू नयेत. (प्रे. कृत्ये ५:२९) ती अशी भूमिका का स्वीकारते? तिचे आपल्या पतीवर प्रेम आहे म्हणून केवळ नव्हे तर हे “प्रभूमध्ये उचित” आहे, म्हणजेच ती कुटुंबासंबंधाने देवाने लावून दिलेली व्यवस्था आहे हे ओळखल्यामुळे ती, ती भूमिका स्वीकारते. (कलस्सैकर ३:१८) तिने आपल्या पतीच्या अधीन स्वेच्छेने राहिल्यामुळे ते ईश्वरी भक्तीचे प्रमाण ठरते.
“ह्याच उद्देशाने मी निघालो आहे”
१५. कोणत्या उल्लेखनीय मार्गाने येशूने ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन केले?
१५ येशूने ‘देवाच्या राज्याची घोषणा’ करून एका उल्लेखनीय मार्गाने ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन केले. (लूक ४:४३) इ.स. २९ मध्ये यार्देनमध्ये बाप्तिस्मा घेतल्यावर येशूने साडेतीन वर्षे या महत्त्वपूर्ण कार्यात अगदी तन्मयतेने भाग घेतला. “ह्याच उद्देशाने मी आलो आहे,” असे त्याने स्पष्टीकरण दिले. (मार्क १:३८; योहान १८:३७) पण हे ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन कसे होऊ शकते?
१६, १७. (अ) प्रचार व शिक्षण देण्याच्या कामात गढून जाण्यात येशूला कशामुळे चालना लाभली? (ब) येशूच्या प्रचाराचे व शिक्षणक्रमाचे उपाध्यपण ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन करणारे का होते?
१६ ईश्वरी भक्तीमध्ये तुम्ही देवावर प्रेम करता व त्याजठायीच्या गुणांची तुम्हाला रसिकता वाटते म्हणून त्याला संतुष्ट करणाऱ्या पद्धतीने जीवनाक्रमण आचरण्याचे समाविष्ट असते. पण कशामुळे येशूला पृथ्वीवरील आपली शेवटली वर्षे प्रचार करण्यात व शिक्षण देण्यात एवढ्या उत्कटपणे घालविण्याची चालना मिळाली बरे? कर्तव्य किंवा बंधन असल्यामुळे का? त्याला लोकांविषयीची काळजी होती यात कसलाही संशय नाही. (मत्तय ९:३५, ३६) शिवाय त्याचा पवित्र आत्म्याने झालेला अभिषेक त्याच्या उपाध्यपणाच्या नेमणूकीसाठी तसेच ती पूर्ण करण्यासाठी होता याची त्याला चांगली जाणीव होती. (लूक ४:१६-२१) तरीपण त्याचा हेतू आणखी गाढ स्वरुपाचा होता.
१७ पृथ्वीवरील आपल्या जीवनाक्रमणाच्या शेवटल्या रात्री येशू आपल्या शिष्यांना अगदी साधेपणात म्हणालाः “मी पित्यावर प्रीती करतो.” (योहान १४:३१) असे हे प्रेम अगदी गाढ, यहोवाच्या गुणांविषयीची अगदी जवळून परिचित होण्यावर आधारलेले आहे. (लूक १०:२२) आपल्या अंतःकरणात गाढ रसिकता राखल्यामुळे येशूला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद वाटला. (स्तोत्रसंहिता ४०:८) ते जीवनासाठी आवश्यक असणारे रुचिकर “अन्न” होते. (योहान ४:३४) स्वतःला पुढे ठेवण्यापेक्षा “प्रथम . . . राज्य मिळविण्याच्या मागे लाग”ण्याचे परिपूर्ण उदाहरण त्याने घालून दिले. (मत्तय ६:३३) या कारणास्तव, त्याने जे केले वा जितके केले ते नव्हे तर का केले यामुळे त्याच्या प्रचार व शिकविण्याच्या कामात ईश्वरी भक्ती होती हे दिसले.
१८ उपाध्यपणात थोडाफार सहभाग घेतला तर तो ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन का ठरू शकत नाही?
१८ तर मग, आम्हाला या बाबतीत येशूचा “कित्ता” कसा अनुसरता येईल? (१ पेत्र २:२१) “माझ्या मागे या” हे येशूचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या सर्वांना देवाच्या राज्याचा सुवार्तेचा प्रचार करण्याची तसेच शिष्य बनविण्याची ईश्वरी नियुक्ती मिळते. (लूक १८:२२; मत्तय २४:१४; २८:१९, २०) मग, आम्ही सुवार्ता घोषित करण्यात सहभाग घेतला तर ते ईश्वरी भक्तीचे प्रदर्शन होते असे आहे का? कदाचित नाही. कारण जर आपण आपले उपाध्यपण चालढकलीने किंवा नाममात्र रितीने करतो, तसेच कौटुंबिक सदस्य व इतरांनी आम्हाला चांगले म्हणून खुश व्हावे म्हणून करत असलो तर अशा कामाला “ईश्वरी भक्तीची कृत्ये” असे क्वचितच म्हणता येईल.—२ पेत्र ३:११.
१९. (अ) आम्ही उपाध्यपणात जे काही करतो त्यामागील मूळ कारण कोणते असले पाहिजे? (ब) देवाविषयी खोल मुळावलेले प्रेम आम्हाठायी आहे तर कोणता परिणाम दिसून येतो?
१९ येशूप्रमाणेच आमचाही हेतू गाढ असला पाहिजे. येशूने म्हटलेः “तू आपला देव यहोवा याजवर संपूर्ण अंतःकरणाने [अंतस्थ ठिकाणी वास करीत असलेल्या भावना, इच्छा आणि हेतू], संपूर्ण जिवाने [तुमचे जीवन व एकंदर जीवनाक्रमण], संपूर्ण बुद्धीने [तुमची एकंदरीत विचार करण्याची क्षमता] व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.” या गोष्टीला एका शास्त्र्याने ही पुष्टी दिली की, “हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे.” (मार्क १२:३०, ३३, ३४) यास्तव आम्ही जे करतो त्यापेक्षा ते का करतो हे अधिक जमेस धरले जाते. आम्ही उपाध्यपणात करीत असलेल्या कार्याच्या मागे देवाविषयी आम्हास वाटणारी व खोलवर मुळावलेली प्रीती, ज्यात आमचा प्रत्येक तंतू समाविष्ट आहे हे प्रधान कारण असले पाहिजे. असे घडते तेव्हा आम्ही नाममात्र सेवेत तृप्त राहणार नाही तर होता होईल तितके करून ईश्वरी भक्तीची खोली प्रदर्शित करू. (२ तीमथ्यी २:१५) याचवेळी, देवावरील प्रेम हा आमचा हेतू असताना आम्ही इतरांच्या उपाध्यपणाविषयी टीका करणारे, आमच्या उपाध्यपणाशी त्यांच्या कार्यास पडताळून पाहण्याचा दृष्टीकोन धरणार नाही.—गलतीकर ६:४.
२०. ईश्वरी भक्तीचे आचरण करण्यामध्ये आपल्याला येशूच्या उदाहरणापासून पूर्ण तऱ्हेने कसा लाभ मिळवता येईल?
२० ईश्वरी भक्तीचे पवित्र गूज यहोवाने आम्हास प्रकटविले आहे याविषयी आम्हाला किती धन्यता वाटली पाहिजे! येशूने जे म्हटले व केले त्याचे काळजीपूर्वक मनन करून तसेच त्याचे अनुकरण करीत राहून आम्हाला ईश्वरी भक्तीचे पूर्ण प्रमाणात आचरण ठेवता येईल व ती प्रदर्शित करता येईल. समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्वरी भक्ती आचरण्यात येशूचे उदाहरण अनुसरु तेव्हा यहोवाचा समृद्ध आशीर्वाद आम्हावर राहील.—१ तीमथ्य ४:७, ८.
[तळटीपा]
a आणखी काही उदाहरणांसाठी, पुढील अहवालांपासून आपण यहोवाविषयी काय शिकू शकतो ते विचारात घ्याः मत्तय ८:२, ३; मार्क १४:३-९; लूक २१:१-४, व योहान ११:३३-३६.
b वडीलधाऱ्यांच्या बाबतीत ईश्वरी भक्ती कशी आचरता येते त्याच्या पूर्ण माहितीसाठी टेहळणी बुरुज डिसेंबर १९८७ चा अंक, पृष्ठे १६-२१ पहा.
तुम्हाला आठवते का—
◻ ईश्वरी भक्ती आचरीत असताना आम्ही येशूच्या उदाहरणाचा का विचार करावा?
◻ येशूने दाखविलेला उबदार व खोल जिव्हाळा याजकडून आम्ही यहोवाविषयी काय शिकतो?
◻ आम्हाला आमच्या कौटुंबिक सदस्यांच्या बाबतीत ईश्वरी भक्ती कशी आचरता येईल?
◻ आमचे उपाध्यपण हे ईश्वरी भक्ती आहे असे दिसावे यासाठी आमचा हेतू कसा असला पाहिजे?
[२१ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती पित्यावर आपल्या कुटुंबासाठी भौतिक, भावनिक व आध्यात्मिक गोष्टींची तरतूद करण्याची जबाबदारी आहे
[२३ पानांवरील चित्रं]
“कोणा विधवेला मुले वा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे.”