यहोवास संतुष्ट करणारी अर्पणे सादर करा
“देवाचे नाव जाहीर करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण [येशू खिस्ताच्या] द्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”—इब्रीयांस १३:१५, न्यू.व.
१. पापी इस्राएलांना काय करण्याचे यहोवाने सांगितले?
यहोवा देवास जे संतुष्टकारक यज्ञाचे अर्पण करतात अशांना तो साहाय्य करतो. या कारणास्तव त्याची कृपा एकेकाळी यज्ञपशूंचे अर्पण सादर करणाऱ्या इस्राएलांवर होती. पण जेव्हा ते सतत पाप करू लागले तेव्हा काय घडले? त्यांना होशेय संदेष्ट्याकरवी हे आर्जविण्यात आलेः “हे इस्राएला, यहोवा तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अर्धमामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दांनिशी यहोवाकडे वळा; त्याला म्हणाः ‘आमचा सर्व अर्धम दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.’”—होशेय १४:१, २.
२. “वाणीचे फळ” काय होते, आणि प्रेषित पौलाने होशेयाचे अवतरण घेऊन काय दाखविले?
२ अशाप्रकारे देवाच्या प्राचीन लोकांना यहोवा देवास आपल्या “वाणीचे फळ” अर्पण करण्यास सांगितले गेले. पण ते काय होते? प्रामाणिक स्तुतीची यज्ञार्पणे! या भविष्यवादाचे अवतरण घेऊन प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना “देवाचे नाव जाहीर करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ . . . देवाला . . . अर्पण कर”ण्याचे प्रोत्साहन दिले. (इब्रीयांस १३:१५) अशा स्वरुपाची यज्ञार्पणे देण्यात यहोवाच्या साक्षीदारांना आज काय मदत देऊ शकेल?
“त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा”
३. इब्रीयांस १३:७ मध्ये पौलाने सारांशरित्या काय म्हटले व त्यामुळे कोणता प्रश्न येतो?
३ पौलाने इब्रीकरांना दिलेल्या सूचनेचा अवलंब केल्यामुळे आपल्याला आमचा थोर साहाय्यक, यहोवा देव याला संतुष्ट वाटणारी यज्ञार्पणे देता येतील. पौलाची अशी सूचना होतीः “जे तुम्हामध्ये पुढाकार घेतात, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणूकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (इब्रीयांस १३:७) “जे तुम्हामध्ये पुढाकार घेतात,” किंवा “जे तुमचे अधिकारी आहेत” असे म्हणण्याद्वारे पौल कोणास अनुलक्षून बोलत होता?—न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.
४. (अ) ग्रीक वचनाच्या संदर्भानुसार “पुढाकार घेणारे” काय करतात? (ब) यहोवाच्या साक्षीदारात “पुढाकार घेणारे” कोण आहेत?
४ येथे पौल “पुढाकार घेणारे” किंवा अधिकार असणारे यांविषयी बोलत होता. (वचने ७, १७, २४) “अधिकार” या शब्दाची उत्पत्ती कय․बेर․नाʹओ या ग्रीक शब्दापासून आहे ज्याचा अर्थ, “जहाज हाकणे, मार्गदर्शन करणे, नियंत्रण ठेवणे” असा आहे. स्थानिक मंडळ्यात ख्रिस्ती वडील नेतृत्व व मार्गदर्शन देण्यामध्ये आपल्या “व्यवस्थापनेच्या कुवती”चा (ग्रीक, कय․बेर․नेʹसिस) वापर करुन नियंत्रण ठेवतात. (१ करिंथकर १२:२८) तरीपण यरुशलेमातील प्रेषित व इतर वडील यांनी एक वर्ग या नात्याने सर्व मंडळ्यांना मार्गदर्शन व सूचना देण्याचे काम केले. (प्रे. कृत्ये १५:१, २, २७-२९) याकारणास्तव, आज जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांसाठी वडीलवर्गाचे एक नियमन मंडळ आध्यात्मिक देखरेख पुरवीत असते.
५. आम्ही मंडळीतील वडील तसेच नियमन मंडळाचे सदस्य यांच्यासाठी का व कशी प्रार्थना करावी?
५ स्थानिक वडील तसेच नियमन मंडळाचे सदस्य आम्हामध्ये पुढाकार घेतात; यास्तव, आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे व मंडळीचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारे सूज्ञान त्यांना लाभावे यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करावी. (पडताळा इफिसकर १:१५-१७.) “ज्यांनी आम्हास देवाचे वचन सांगितले आहे” त्यांची आम्हाला केवढी आठवण आहे बरे! तीमथ्याला त्याची आई व आजी यांच्याचकडून नव्हे तर नंतर पौल व इतरांकरवीही शिक्षण मिळाले. (२ तीमथ्य १:५, ६; ३:१४) यासाठीच तीमथ्याला ज्यांनी त्याच्याबाबतीत नेतृत्व केले त्यांच्या वर्तणूकीचा परिणाम लक्षात आणता आला व त्याला त्याकरवी त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करावयाचे जमले.
६. आम्ही कोणाच्या विश्वासाचे अनुकरण करावे, पण कोणास आम्ही अनुसरावे?
६ हाबेल, नोहा, अब्राहाम, सारा, रहाब व मोशे या सर्वांनी विश्वासाचे प्रदर्शन केले. (इब्रीयांस ११:१-४०) हे देवास निष्ठावंत राहून मेले यामुळे आम्हाला त्यांच्या विश्वासाचे निःसंशये अनुकरण करता येईल. पण यासोबत, आज जे आम्हामध्ये पुढाकार घेतात अशा निष्ठावंत लोकांच्या ‘विश्वासाचे अनुकरण करता येईल.’ अर्थात आम्ही अपूर्ण मानवास अनुसरत नाही, कारण आमचे लक्ष्य ख्रिस्तावर आहे. एक पवित्र शास्त्र भाषांतरकार एजर जे. गुडस्पीड यांनी म्हटलेः “प्राचीन काळचे नामांकित लोक विश्वासधारकांसाठी नमुने नाहीत; कारण यांना ख्रिस्तामध्ये उत्तम नमुना आढळतो. . . . ख्रिस्ती धावकाने आपली नजर येशूवर खिळून ठेवली पाहिजे.” होय, ‘ख्रिस्ताने आम्हासाठी दुःख सोसले व आम्हास अनुसरण्यास कित्ता सोडला आहे.’—१ पेत्र २:२१; इब्रीयांस १२:१-३.
७. इब्रीयांस १३:८ ने आम्हाला येशू ख्रिस्तासाठी त्रास सहन करण्याच्या बाबतीत आमच्या मनोदयावर कसा परिणाम केला पाहिजे?
७ देवाच्या पुत्रावर आपले लक्ष केंद्रित करून पौल म्हणालाः “येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.” (इब्रीयांस १३:८) स्तेफन व याकोब या विश्वासू साक्षीदारांनी येशूने दाखविलेल्या निर्भिड नमुन्याप्रमाणे आपली अटळ सचोटी दाखवली. (प्रे. कृत्ये ७:१-६०; १२:१, २) ख्रिस्ताचे अनुयायी या अर्थाने ते मरण्यासही तयार होते त्यामुळे त्यांच्या विश्वासाचे आम्ही अनुकरण करणे योग्यच आहे. ईश्वरी भक्तीचे लोक येशूचे शिष्य या अर्थाने हुतात्मिक मरणापासून कधीच पळ काढत नाही, मग ते काल, आज किंवा भविष्यातही असो.
खोटे शिक्षण टाळा
८. प्रेषित पौलाच्या इब्रीयांस १३:९ च्या शब्दांचा अर्थ तुम्ही दुसऱ्या शब्दात कसा सांगाल?
८ येशूचे कधीही न बदलणारे व्यक्तीमत्व तसेच त्याचे शिक्षण यांजमुळे आम्ही तो व त्याच्या प्रेषितांनी जे शिकवले त्यास बिलगून राहिले पाहिजे. यासाठीच इब्रीकरांना म्हटले गेलेः “विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्याकडून आचरणाऱ्यांस लाभ नाही अशा खाद्याने नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.”—इब्रीयांस १३:९
९. इब्री ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात पौल कोणत्या श्रेष्ठ गोष्टींकडे निर्दश करतो?
९ यहुदी लोक सीनाय डोंगराजवळ नियमशास्त्र देत असताना ज्या अद्भूत घटना घडल्या त्याविषयी तसेच दावीदाचे चिरकालिक राज्यपद याविषयी निर्दश करतात. तरीपण पौलाने इब्री ख्रिश्चनांना हे म्हटले की, नियमशास्त्र कराराची प्रस्थापना ही अद्भूत घटना होती तरी यहोवाने जेव्हा नव्या कराराची स्थापना केली तेव्हा चिन्हे, अद्भूते, सामर्थ्यकारी कामे आणि पवित्र आत्म्याचे वाटप याकरवी अधिक प्रभावीपणे साक्ष पुरविली. (प्रे. कृत्ये २:१-४; इब्रीयांस २:२-४) दावीदाची पृथ्वीवरील राजेशाही इ.स.पू. ६०७ मध्ये जशी डळमळली तसे ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्य कधीही डळमळणार नाही. (इब्रीयांस १:८, ९; १२:२८) याशिवाय यहोवा आता, सीनाय डोंगरापाशी घडलेल्या अद्भूत प्रदर्शनापेक्षाही अधिक भयप्रेरक गोष्टीकडे आणीत आहे; ते आता स्वर्गीय सीयोन डोंगरापाशी आले आहेत.—इब्रीयांस १२:१८-२७.
१०. इब्रीयांस १३:९ नुसार कशामुळे अंतःकरण स्थिर केले जाते?
१० याकरताच, इब्रीकरांनी यहुदी पंथीयांच्या “विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ” नये म्हणून दक्षता घेण्यास हवी होती. (गलतीकर ५:१-६) अशा शिक्षणाने नव्हे तर ‘देवाकडील कृपेने’ सत्यामध्ये स्थिर, मुळावलेले राहण्यासाठी ‘अंतःकरण स्थिर होते.’ काही लोकांनी अन्न तसेच यज्ञार्पणाच्या बाबतीत विवाद केला होता असे दिसते व यामुळेच पौलाला म्हणावे लागले की, अंतःकरण हे “ज्याकडून आचरणाऱ्यांस लाभ नाही अशा खाद्याने” स्थिर होत नाही. काही विशिष्ट अन्न खावे की खाऊ नये तसेच खास दिवस पाळावे की न पाळावे याकडून आध्यात्मिक लाभ घडत नाही, तर तो, ईश्वरी भक्ती तसेच ख्रिस्ताच्या खंडणीविषयी बाळगलेली रसिकता याद्वारे होतो. (रोमकर १४:५-९) तसेच, खरे पाहता, ख्रिस्ताच्या यज्ञार्पणामुळे लेवी करीत असणारी यज्ञार्पणे निरर्थक ठरविली गेली.—इब्रीयांस ९:९-१४; १०:५-१०.
देवास संतुष्ट करणारी यज्ञार्पणे
११. (अ) पौलाने इब्रीयांस १३:१०, ११ मध्ये लिहिलेल्या शब्दांचा अर्थ दुसऱ्या शब्दात कसा सांगता येईल? (ब) ख्रिश्चनांना कोणती लाक्षणिक वेदी आहे?
११ लेवी याजक यज्ञापर्णाच्या पशूंचे मांस खात, पण पौलाने लिहिलेः “आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार [निवास] मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही. कारण ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीरे [प्रायश्चित्ताच्या दिवशी] तळाबाहेर जाळण्यात येतात.” (इब्रीयांस १३:१०, ११; लेवीय १६:२७; १ करिंथकर ९:१३) ख्रिश्चनांना लाक्षणिक वेदी आहे जी, देवाकडे येशूच्या यज्ञार्पणाआधारे येणे सूचित करते. यामुळे पापाचे क्षालन होऊन यहोवाची क्षमा आणि चिरकालिक जीवनासाठी तारण होते.
१२. इब्रीयांस १३:१२-१४ मध्ये अभिषिक्त ख्रिश्चनांना काय करण्यास आर्जविले आहे?
१२ पौल प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या समानतेवर भर देत नाही तरी तो म्हणतोः “येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून [यरुशलेमाच्या] वेशीबाहेर मरण सोसले.” येथे ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे तंतोतंत जुळती तसेच पूर्णपणे परिणामकारक ठरणारी खंडणी दिली. (इब्रीयांस १३:१२; योहान १९:१७; १ योहान २:१, २) यास्तव, प्रेषित पौलाने सह अभिषिक्त ख्रिश्चनांना असे आर्जविलेः “तर आता आपण [ख्रिस्ता]चा अपमान सोशीत तळाबाहेर त्याच्याकडे जाऊ या. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहो.” (इब्रीयांस १३:१३, १४; लेवीय १६:१०) येशूचा झाला तसा आमचाही अपमान झाला तरी आम्ही यहोवाचे साक्षीदार असे चिकाटीने राहतो. आम्ही ‘अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने वागतो,’ आणि आपले लक्ष नवीन जगाकडे लावतो. (तीतास २:११-१४; २ पेत्र ३:१३; १ योहान २:१५-१७) आम्हामध्ये अभिषिक्त जन त्या ‘शहरा’चा, स्वर्गीय राज्याचा चिकाटीने शोध घेत आहेत.—इब्रीयांस १२:२२.
१३. देवास संतुष्ट करणाऱ्या यज्ञार्पणात केवळ कशाचा समावेश नाही?
१३ यानंतर पौल, देवाला संतुष्ट करणाऱ्या यज्ञार्पणाविषयीचा उल्लेख करतो, व म्हणतोः “देवाचे नाव जाहीर करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण [येशू खिस्ताच्या] द्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्रीयांस १३:१५, १६) ख्रिश्चनांच्या यज्ञार्पणात केवळ मानवतावादी कामांचाच समावेश नाही. जगातील लोक सर्वसाधारणपणे हेच करतात. जसे की, १९८८ च्या उत्तरार्धात सोवियत अर्मेनियामध्ये जो भूकंप घडला तेव्हा कित्येक राष्ट्रातील लोकांनी सढळ मदत दिली.
१४. देवास संतुष्ट करणारी यज्ञार्पणे देणे हे कोणत्या कामावर अधिक भर देते?
१४ यहोवाला “ईश्वरी भक्ती व आदर” याने जी पवित्र सेवा आम्ही देतो ती येशूने प्रदर्शित केलेल्या निःस्वार्थ प्रेमावर आधारलेली आहे. (इब्रीयांस १२:२८; योहान १३:३४; १५:१३) ही सेवा आमच्या प्रचाराच्या कामाला अधिक भर देते कारण ख्रिस्त या प्रमुख याजकाद्वारे ‘आपण देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो. हे आमच्या ओठांचे फळ आहे जे देवाचे नाव इतरांना जाहीर करते.’ (होशेय १४:२; रोमकर १०:१०-१५; इब्रीयांस ७:२६) अर्थातच, आम्ही “विश्वासाने एका घरचे झालेल्यां” व्यतिरिक्त इतरांनाही “चांगले करण्यास व दान करण्यास” विसरत नाही. (गलतीकर ६:१०) जेव्हा आमचा ख्रिस्ती बांधव कोणा विपत्तीत अडकतो वा गरजवंत बनतो किंवा त्रासात पडतो तेव्हा आम्ही प्रेमळपणे भौतिक तशीच आध्यात्मिक मदत देतो. ते का? कारण आमची एकमेकांवर प्रीती आहे. आमचीही हीच आशा असते की त्यांनीही न डगमगता आपल्या आशेची कबूली जाहीरपणे प्रकट करावी, कारण “अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.”—इब्रीयांस १०:२३-२५; याकोब १:२७.
अधीन असा
१५. (अ) इब्रीयांस १३:१७ मध्ये देण्यात आलेल्या सूचनेचा अर्थ तुम्हाला दुसऱ्या शब्दात कसा सांगता येईल? (ब) जे नेतृत्व करीत आहे अशांचा आदर का करावा?
१५ देवाला संतुष्ट करणारी यज्ञार्पणे द्यावयाची आहेत तर आम्ही देवाच्या संघटनेसोबत पूर्णपणे सहकार्य दिले पाहिजे. अधिकाराच्या विषयासंबंधाने अधिक भर न देता पौलाने लिहिलेः “तुम्हामध्ये जे नेतृत्व करतात त्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” (इब्रीयांस १३:१७) मंडळीत नेतृत्व करणाऱ्या नियुक्त वडीलांचा आम्ही आदर केला पाहिजे म्हणजे आमच्या असहकार प्रवृत्तीकरवी त्यांना त्रास ओढवून कण्हण्याची पाळी कधी येणार नाही. आम्ही अधीनता दाखविण्यात माघार घेतली तर ते देखरेख्यांना जड जाईल आणि याचा परिणाम आम्हाला आध्यात्मिक इजा होण्यात होईल. सहकार्याच्या आत्म्यामुळे वडीलांना सहाय्य देण्यात, ऐक्यता राखण्यात तसेच राज्य-प्रचाराच्या कामात प्रगती घडवून आणण्यात सोपे जाते.—स्तोत्रसंहिता १३३:१-३.
१६. आम्हामध्ये जे नेतृत्व करतात अशांच्या अधीन राहणे का उचित आहे?
१६ जे नेतृत्व करीत आहेत अशांच्या अधीन असणे किती उचित आहे! ते आम्हाला सभांमध्ये शिकवितात व उपाध्यपणात आमची मदत करतात. मेंढपाळ या नात्याने ते आमचे कल्याण साधतात. (१ पेत्र ५:२, ३) ते आम्हाला देव व मंडळी याजसोबत चांगले नाते जोपासण्यात मदत देतात. (प्रे. कृत्ये २०:२८-३०) त्यांच्या सूज्ञ तसेच प्रेमळ देखरेखीच्या अधीन राहण्यामुळे आम्ही आमचा सर्वथोर देखरेखा यहोवा देव व त्याच्या उप-देखरेखा येशू ख्रिस्त यांना आदर प्रदर्शित करतो.—१ पेत्र २:२५; प्रकटीकरण १:१; २:१–३:२२.
प्रार्थनाशील असा
१७. पौलाने कोणती प्रार्थना करावी अशी विनंती केली, व तो त्यांना तसे हक्काने का सांगू शकत होता?
१७ पौल व त्याचे सहकारी इब्रीकरांपासून दूर होते व कदाचित ते छळांत होते; व यामुळेच पौलाने म्हटलेः “आमच्यासाठी प्रार्थना करीत राहा; सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे. आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.” (इब्रीयांस १३:१८, १९) पौल भटकलेला असता व त्याचे अंतःकरण हे कोडगे असते तर इब्रीकरांनी आपणासाठी प्रार्थना करावी हे त्याला कसे बरे हक्काने सांगता आले असते? (नीतीसूत्रे ३:३२; १ तीमथ्य ४:१, २) तो प्रामाणिक उपाध्याय होता आणि त्याने यहुदी पंथीयांसोबत चांगल्या विवेकभावाने लढत दिली. (प्रे. कृत्ये २०:१७-२७) पौलाला ही खातरी होती की, इब्रीकरांच्या प्रार्थनेमुळे त्याला त्यांना लवकर येऊन भेटता येईल.
१८. इतरांनी आम्हासाठी प्रार्थना करावी अशी आपली इच्छा आहे तर आम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारावेत?
१८ पौलाने इब्रीकरांना प्रार्थनेसाठी केलेली विनंती हे दाखविते की, ख्रिश्चनांनी एकमेकांसाठी, नावाने सुद्धा प्रार्थना करणे उचित आहे. (पडताळा इफिसकर ६:१७-२०.) इतरांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी अशी आमची इच्छा आहे तर मग, पौलाप्रमाणे आमचीही “सर्व बाबतीत चांगली वागण्याची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे” याची खातरी करणे योग्य ठरणार नाही का? तुम्ही तुमच्या सर्व व्यवहारात प्रामाणिक आहात का? तसेच पौलाला जसा प्रार्थनेविषयी मोठा आत्मविश्वास वाटत होता तसा तुम्हाला वाटतो का?—१ योहान ५:१४, १५.
समारोप व बोध
१९. (अ) पौलाने इब्रीकरांच्या बाबतीत कोणती प्रार्थनापूर्वक इच्छा व्यक्त केली? (ब) नवीन करार हा चिरकालिक स्वरुपाचा का आहे?
१९ इब्रीकरांना प्रार्थनेविषयी सांगितल्यावर पौलाने प्रार्थनापूर्वक ही इच्छा बोलून दाखवलीः “आता ज्या शांतीच्या देवाने सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभु येशू ह्याला मेलेल्यातून परत आणिले तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या देवाला युगानुयुग गौरव असो. आमेन.” (इब्रीयांस १३:२०, २१, न्यू.व.) शांतीमय पृथ्वीचा उद्देश राखून “शांतीचा देव” याने ख्रिस्ताला स्वर्गातील अमर जीवनासाठी पुनरुत्थित केले. येथे येशूने आपल्या ओतलेल्या रक्ताचे मूल्य सादर केले व त्याकरवी नव्या कराराची प्रस्थापना केली. (यशया ९:६, ७; लूक २२:२०) हा सार्वकालिक करार आहे, कारण पृथ्वीवर राहणाऱ्यांना, नव्या करारात असणारे देवाचे १,४४,००० आध्यात्मिक पुत्र येशूसोबत स्वर्गात राज्य करून कायमचे फायदे प्रदान करतील. (प्रकटीकरण १४:१-४; २०:४-६) ज्याचे आम्ही गौरव करतो तो देव ख्रिस्ताद्वारे आम्हाला ‘सर्व बाबतीत चांगले वागण्याची [आणि] आमचा विवेकभाव चांगला राखण्याची’ मदत देतो.
२०. पौलाने इब्री ख्रिश्चनांना जो समारोपाचा बोध कला तो तुम्हाला दुसऱ्या शब्दात कसा विवेचीत करता येईल?
२० आपल्या पत्राविषयी इब्रीकरांची प्रतिक्रिया काय असेल त्याची निश्चिती न राखता पौलाने म्हटलेः “बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, हे बोधवचन [देवाच्या पुत्राचे, यहुदी पंथीयांचे नव्हे] ऐकावे. कारण [पत्राचा वजनदार मसुदा लक्षात घेता] मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे. आपला बंधु तीमथ्य ह्याची [तुरुंगातून] सुटका झाली आहे हे तुम्हास कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.” हे पत्र रोममधून लिहित असल्यामुळे पौलाला तीमथ्यासोबत यरुशलेमाला भेट देऊन तेथील इब्रीकरांची भेट घेण्याची इच्छा होती. यानंतर पौलाने म्हटलेः “तुम्ही आपल्या सर्व पुढाकार घेणाऱ्या [कष्टाळू वडीलांना] व [स्वर्गीय आशा असणाऱ्या] सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटालीचे बंधु तुम्हाला सलाम सांगतात. तुम्हा सर्वांबरोबर [देवाची] कृपा असो.”—इब्रीयांस १३:२२-२५.
चिरकालिक मूल्याचे पत्र
२१. इब्रीयांस लिहिण्यात आलेले पत्र आम्हाला कोणते प्रमुख मुद्दे समजण्यात मदत देते?
२१ पवित्र शास्त्रवचनातील इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा इब्रीयांस लिहिण्यात आलेले हे पत्र आम्हाला नियमशास्त्रामध्ये जी अर्पणे वाहिली जात त्यांची अर्थसूचकता समजण्यात मदत देते असे वाटते. हे पत्र स्पष्टपणे दाखविते की, पापी मानवजातीसाठी केवळ येशू ख्रिस्ताची खंडणी जरुरीची होती. शिवाय आम्ही देवाच्या पुत्राचे ऐकले पाहिजे हा लक्षवेधी संदेश आम्हाला त्यामध्ये सापडतो.
२२. इब्रीयांस लिहिण्यात आलेल्या पत्रासंबंधाने आपण कृतज्ञ असण्याची काही कोणती कारणे आहेत?
२२ जसे आपण मागील दोन लेखात पाहिले त्यानुसार इब्रीयांस लिहिण्यात आलेल्या पत्रासंबंधाने कृतज्ञ असण्याची आणखी कारणे आपल्याला दिसतील. ते आपल्याला आमच्या उपाध्यपणात आम्ही थकून जाऊ नये असे सांगते. ते आमच्यामध्ये धैर्य उभारते. कारण यहोवा आमचा साहाय्यकर्ता आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे हे पत्र आपल्याला देवाची पवित्र सेवा अहोरात्र करण्यासाठी आपले ओठ तसेच आमची सर्व गुणवत्ता वापरण्यास तसेच आमच्या स्तुतीपात्र व प्रेमळ देवाला संतुष्ट करणारी पूर्ण अंतःकरणाची अर्पणे देण्याचे प्रोत्साहन देते.
तुमची प्रतिक्रिया काय असेल?
◻ इब्रीयांस लिहिण्यात आलेले पत्र त्यांना खोट्या शिक्षणापासून दूर राहण्यात कसे साहाय्यक ठरले?
◻ देवास संतुष्ट करणारी अर्पणे कोणत्या महत्त्वाच्या कामाकडे निर्दश करतात?
◻ “नेतृत्व करणारे” कोण आहेत व अशांना का अधीन असावे?
◻ इब्रीकरांस लिहिलेले पत्र प्रार्थनेला कसे ठळकपणे सामोरे आणते?
◻ इब्री ख्रिश्चनांना लिहिण्यात आलेले पत्र हे चिरकाल मोलाचे आहे असे आपण का म्हणू शकतो?
[२३ पानांवरील चित्रं]
देवास संतुष्ट करणाऱ्या अर्पणात जाहीर उपाध्यपणात सहभागी होणे आणि सह ख्रिश्चनांना लाभदायक सल्ला देणे समाविष्ठ आहे