वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १/१ पृ. १५-२०
  • यहोवा मला साहाय्य करणारा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा मला साहाय्य करणारा आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या मदतीची गरज
  • कृतीत असणारे बंधुप्रेम
  • पाहुणचार करा
  • छळग्रस्तांचे स्मरण ठेवा
  • विवाह सन्माननीय असला पाहिजे
  • जवळ आहे तेवढ्यावर तृप्त असणे
  • यहोवावर भाव ठेवा
  • यहोवास संतुष्ट करणारी अर्पणे सादर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवासाठी साक्ष देत राहा आणि माघार घेऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • अविश्‍वासापासून जपा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १/१ पृ. १५-२०

यहोवा मला साहाय्य करणारा आहे

“धैर्य धरा आणि म्हणाः ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?’”—इब्रीयांस १३:६.

१, २. (अ) स्तोत्रकर्ता तसेच प्रेषित पौलाने यहोवाविषयीचा कोणता आत्मविश्‍वास प्रकट केला? (ब) आता कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

यहोवा देव मदतीसाठी नित्य तयार असतो; त्यात तो कधीही अपयशी होत नाही. स्तोत्रकर्त्याला हे अनुभवावरुन समजले होते आणि यासाठीच तो म्हणू शकलाः “यहोवा माझ्या पक्षाचा आहे. मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (स्तोत्रसंहिता ११८:६) प्रेषित पौलाने जेव्हा इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिले त्यावेळीही त्याने अशाच भावना व्यक्‍त केल्या.

२ पौल स्तोत्रकर्त्याचे शब्द ग्रीक सेप्ट्युजंट मधून अवतरीत करीत असता आपल्या इब्री सहउपासकांना म्हणालाः “आपण धैर्य धरावे आणि म्हणावेः ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?’” (इब्रीयांस १३:६) प्रेषित पौलाने त्यांना असे का लिहिले? या संदर्भाद्वारे आपण काय शिकू शकतो?

यहोवाच्या मदतीची गरज

३. (अ) कोणकोणत्या परिस्थितीत यहोवा पौलाचा साहाय्यकर्ता होता हे सिद्ध झाले? (ब) इब्री ख्रिश्‍चनांना यहोवा हा त्यांच्या साहाय्यकर्ता असावा ही खास गरज का होती?

३ पौल हा स्वार्थत्यागी साक्षीदार होता व त्याने यहोवा त्याला साहाय्य करणारा आहे हे अनुभवले होते. देवाने या प्रेषिताला कित्येक त्रासात साहाय्य दिले होते. पौलाला तुरुंगात टाकण्यात आले, त्याला मारले गेले व दगडमारही झाला. ख्रिस्ती उपाध्याय म्हणून तो प्रवासात असता त्याचे जहाज फुटले, तसेच पुष्कळ धोके त्याच्यासमोर आले. परिश्रम, जागरणे, भूक, तहान व शिवाय उघडेवाघडेपणा याच्याशी तो परिचित बनला होता. “शिवाय ह्‍या व अशा इतर गोष्टींखेरीज,” तो म्हणतो, “माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता, ही आहे.” (२ करिंथकर ११:२४-२९) त्याला इब्री ख्रिश्‍चनांविषयीही अशाच स्वरुपाची काळजी होती. यरुशलेमाचा काळ भरला होता आणि आता प्रेषिताच्या यहुदीयात असणाऱ्‍या यहुदी बंधूभगिनींना विश्‍वासाच्या मोठ्या परिक्षेला समोर जायचे होते. (दानीएल ९:२४-२७; लूक २१:५-२४) या कारणास्तव त्यांना यहोवाच्या साहाय्याची गरज होती.

४. इब्रीयांस लिहिण्यात आलेल्या पत्रात कोणता मूलभूत बोध सादर करण्यात आला आहे?

४ इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्राच्या आरंभालाच पौलाने हे स्पष्ट केले की, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचे ऐकले तरच ईश्‍वरी मदतीचा अनुभव मिळू शकेल. (इब्रीयांस १:१, २) या मुद्याचेच समर्थन सबंध पत्रात करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, आपल्या सूचनेला पुष्टी द्यावी यासाठी प्रेषिताने आपल्या वाचकांना याविषयीचे स्मरण दिले की, इस्राएलांना अवज्ञेमुळे अरण्यवासामध्ये शिक्षा मिळाली. तेव्हा देवाने येशूच्या द्वारे जे काही म्हटले त्याचा इब्री ख्रिश्‍चनांनी त्याग केला आणि धर्मत्यागी बनून ते ख्रिस्ताच्या यज्ञार्पणाद्वारे जे रद्द करण्यात आले त्या मोशेच्या नियमशास्त्रास बिलगून राहिले तर शिक्षा कशी चुकवू शकणार होते बरे!—इब्रीयांस १२:२४-२७.

कृतीत असणारे बंधुप्रेम

५. (अ) इब्रीयांस लिहिण्यात आलेले पत्र आणखी कोणत्या सूचना पुरविते? (ब) पौलाने प्रेमाविषयी काय म्हटले?

५ इब्रीयांस लिहिलेल्या पत्राने स्वर्गीय राज्याचा वारसा असणाऱ्‍या भावी वारसदारांना आपला कित्ता, येशू ख्रिस्ताचे कसे अनुकरण करावे आणि “[पवित्र] सेवा आदर व ईश्‍वरी भय धरून [कशी] सादर” करावी तसेच यहोवाला आपला साहाय्यकर्ता कसे बनवावे याविषयीच्या सूचना दिल्या. (इब्रीयांस १२:१-४, २८, २९) पौलाने समविश्‍वासूंना नियमितपणे एकत्र मिळावे आणि “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” द्यावे हा बोध केला. (इब्रीयांस १०:२४, २५) आता तो म्हणतोः “तुमचे बंधुप्रेम टिकून राहो.”—इब्रीयांस १३:१.

६. येशूने कोणत्या अर्थाने आपल्या अनुयायांना प्रेमाविषयी “नवी आज्ञा” दिली होती?

६ येशूनेही आपल्या अनुयायांच्या बाबतीत अशाच प्रेमाची अपेक्षा धरली होती. त्याने म्हटलेः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) ही “नवी आज्ञा” होती, याचे कारण हे की, मोशेच्या नियमशास्त्रात “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर,” अशी जी आज्ञा देण्यात आली होती त्यापेक्षाही या आज्ञेत अधिक अपेक्षिलेले होते. (लेवीय १९:१८) ही “नवी आज्ञा” हिने, कोणा माणसाने आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम करणे यापेक्षा अधिक साध्य केले. तिने अशा स्वार्थत्यागी प्रेमाची अपेक्षा धरली ज्यामध्ये एखाद्यासाठी आपला जीवही देण्याचे समाविष्ठ होते. येशूचे जीवन व त्याचे मरण यांनी त्या प्रेमाविषयीचे सुंदर उदाहरण दिले. टर्टुलिनने देखील, जगातील लोक ख्रिश्‍चनांविषयी जे म्हणतात त्याचे अवतरण घेताना याच प्रेमाचा आवर्जून उल्लेख केला. त्याने म्हटलेः “‘पहा,’ ते म्हणतात, ‘ते कशी एकमेकांवर आपली प्रीती दाखवितात . . . शिवाय ते एकमेकांसाठी जीवही देण्यास केवढे तयार आहेत.’”—ॲपॉलॉजी, अध्याय ३९, ७.

७. इ.स. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर बंधुप्रेम कसे दिसले?

७ हे बंधुप्रेम येशूच्या शिष्यांमध्ये इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टनंतरही दिसले. यरुशलेमातील सण साजरा झाल्यावर नवीन परिवर्तितांना व बाप्तिस्मा घेतलेल्या विश्‍वासूजनांना तेथे राहून देवाने ख्रिस्ताद्वारे तारणाच्या केलेल्या योजनेविषयी अधिक शिकण्यासाठी आपला मुक्काम वाढवता यावा म्हणून ‘विश्‍वास ठेवणारे सर्व एक झाले. त्यांनी आपले सर्वकाही समाईक केले. ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देऊ लागले.’—प्रे. कृत्ये २:४३-४७; ४:३२-३७.

८. आज यहोवाच्या साक्षीदारात बंधुप्रेम आहे याचा कोणता पुरावा आहे?

८ अशाप्रकारचे हे बंधुप्रेम, आज आमच्या काळी, यहोवाच्या साक्षीदारात दिसून येते. उदाहरणार्थ, दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर अशा प्रेमामुळेच देवाच्या लोकांनी अडीच वर्षे संकटग्रस्तांसाठीची मदतीची कामे केली. ऑस्ट्रीया, बेल्जियम, बल्गेरिया, चीन, झेकोस्लोवाकिया, डेन्मार्क, इंग्लंड, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, नेदरलँडस्‌, नॉर्वे, फिलिपाईन्स, पोलंड व रोमानिया या युद्धाने छिन्‍नविच्छिन्‍न झालेल्या देशातील समविश्‍वासू बांधवांसाठी कॅनडा, स्वीडन, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि इतर देशातील साक्षीदारांनी वस्त्रे आणि अन्‍न विकत घेण्यासाठी पैशांची सढळ हस्ते मदत दिली. हे केवळ एक उदाहरण झाले, कारण अलिकडेच पेरु व मेक्सिको येथील भूकंपात, जमेकातील वादळात आणि इतरत्र अशाच संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांसाठी देवाच्या लोकांनी मदतीचा हात दिला आहे. या व इतर मार्गाने यहोवाचे लोक ‘आपले बंधुप्रेम टिकवीत आहेत.’

पाहुणचार करा

९. (अ) इब्रीयांस पत्र १३:२ मध्ये कोणता ईश्‍वरी गुण उल्लेखिलेला आहे? (ब) काहीजणांनी ‘देवदूतांचे आतिथ्य [कसे] नकळत केले’?

९ ख्रिस्तास अनुसरणारे, ‘[पवित्र] सेवा आदर व ईश्‍वरी भयाने’ करणारे आणि यहोवाला आपला साहाय्यकर्ता मानणारे आणखी ज्या गुणाचे प्रदर्शन करतात त्याविषयीचे भाष्य पौलाने पुढे केले. त्याने आर्जविलेः “अतिथीप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.” (इब्रीयांस १३:२) कोणी “देवदूतांचे आतिथ्य नकळत केले”? प्रथम, कुलपिता अब्राहाम याने तीन देवदूतांचा पाहुणचार केला. (उत्पत्ती १८:१-२२) यानंतर यातील दोन देवदूत सदोमात आले तेव्हा अब्राहामाचा पुतण्या लोट याने या अनोळखी लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांचा पाहुणचार केला. तरीपण, हे पाहुणे विश्रांतीस जाण्याआधीच शहराच्या अधम माणसांनी लोटाच्या घराला वेढा दिला. तो ‘तरुण व म्हाताऱ्‍यांचा’ जमाव होता. लोटाने त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांना त्यांच्याकडे वाईट कामासाठी सोपून द्यावे अशी मागणी जमावाने लोटाला केली. पण लोटाने ते नाकारले. आपण कोणाचा पाहुणचार करीत आहोत हे लोटाला समजले नाही तरीही यामुळेच या दूतांनी लोट व त्याच्या मुलींना ‘यहोवाने सदोम व गमोरा यांवर गंधक व अग्नि यांचा वर्षाव आकाशातून केला’ तेव्हा बचावण्यात मदत दिली.—उत्पत्ती १९:१-२६.

१०. पाहुणचारी ख्रिश्‍चनांना कोणते आशीर्वाद मिळतात?

१० पाहुणचारी ख्रिश्‍चनांना कित्येक आशीर्वाद मिळतात. पाहुण्यांमार्फत विदित झालेले समृद्ध अनुभव त्यांना कळतात आणि त्यांच्या आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिफळदायी असणाऱ्‍या सहवासाचा त्यांना लाभ मिळतो. समविश्‍वासू बांधवांचे आदरातिथ्य, ते “अनोळखी” होते तरी केल्यामुळे गायसची प्रशंसा करण्यात आली. याचप्रमाणे आजही यहोवाच्या लोकात फिरत्या देखरेख्यांचा पाहुणचार होत आहे. (३ योहान १, ५-८) पाहुणचारी असणे हे वडीलांच्या नियुक्‍ततेतील एक गुणवत्ता आहे. (१ तीमथ्य ३:२; तीतास १:७, ८) शिवाय हेही लक्षात घेण्याजोगे आहे की, ज्या मेंढरासमान लोकांनी येशूच्या अभिषिक्‍त “बंधूं”ना चांगले करून आदरातिथ्य व्यक्‍त केले त्यांना राज्याचे आशीर्वाद मिळणार असे येशूचे अभिवचन आहे.—मत्तय २५:३४-४०.

छळग्रस्तांचे स्मरण ठेवा

११. इब्रीयांस १३:३ मधील सूचना का योग्य होती?

११ यहोवाच्या साहाय्याची तसेच ‘त्याची पवित्र सेवा आदराने व ईश्‍वरी भयाने’ करण्याची इच्छा धरणाऱ्‍यांनी त्रासात असणाऱ्‍या आमच्या समविश्‍वासूंना विसरता कामा नये. ख्रिश्‍चनांना वाईट वागणूक केवढ्या त्रासाने सहन करावी लागते ते पौलाला ठाऊक होते. काही काळाआधी छळामुळे शिष्य सर्वत्र पांगले होते आणि पौलाचा सहकारी तीमथ्य याची नुकतीच कैदेतून सुटका झाली होती. (इब्रीयांस १३:२३; प्रे. कृत्ये ११:१९-२१) ख्रिस्ती सुवार्तिक नव्या मंडळ्यांची स्थापना करण्याच्या कामी लागले होते वा ते आधीच प्रस्थापित असणाऱ्‍या मंडळ्यांना आध्यात्मिकरित्या सुदृढ करण्याच्या कामात गुंतले होते. जे दुसरीकडे स्थलांतरित होत होते ते बहुतेक बांधव विदेशी होते त्यामुळे काही इब्री ख्रिश्‍चनांनी यांच्यापाशी द्यावे तितके लक्ष दिले नाही असे दिसते. या कारणास्तव पौलाने ही सूचना केलीः “बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहा असे समजून त्यांची आठवण करा. आपणही देहात आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा.”—इब्रीयांस १३:३.

१२. दुःख भोगणाऱ्‍या आमच्या समविश्‍वासूंची आपण आठवण ठेवावी ही सूचना आपल्याला कशी पाळता येईल?

१२ इब्रीकर “बंदिवानांबरोबर समदुःखी” झाले होते पण यांना अशा विश्‍वासू सह-उपासकांना, मग ते यहुदी असो वा विदेशी, विसरायचे नव्हते. (इब्रीयांस १०:३४) पण आम्हाबाबत काय? दुःख सोसत असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना आम्ही ध्यानात राखून आहोत हे आपल्याला कसे दाखवता येईल? जेथे राज्य-प्रचाराच्या कामाला बंदी आहे अशा देशात विश्‍वासखातर कैदेत पडलेल्या आमच्या बांधवांचे साहाय्य करता यावे म्हणून काही प्रकरणात कदाचित तेथील सरकारी अधिकाऱ्‍यांना पत्राद्वारे विनवणी करता येईल. आम्ही आमच्या प्रार्थनेत त्यांची जरुर आठवण ठेवावी व शक्य आहे तर त्या प्रार्थनेत त्यांचा नावानेही उल्लेख करावा. त्यांच्यावर ओढवलेला छळ आम्हावर देखील मोठा परिणाम करतो यामुळे आम्ही त्यांच्यासाठी यहोवाकडे केलेल्या कळकळींच्या प्रार्थनांना तो नक्कीच ऐकतो. (स्तोत्रसंहिता ६५:२; इफिसकर ६:१७-२०) आम्ही जरी एकाच तुरुंगात नसलो तरीही ते जणू आम्ही एकाच जागी असून त्यांना मदत व उत्तेजन देण्यासाठी आहो असे असते. आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना दुःख भोगणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांबद्दल साहजिक दुःख वाटते. (पडताळा १ करिंथकर १२:१९-२६.) त्यांना पृथ्वीची आशा असणाऱ्‍या आपल्या छळग्रस्त साथीदारांविषयी, ते छळकर्त्यांद्वारे विविध संकटे सहन करीत आहेत म्हणून सहानुभूति वाटते. अशाप्रकारची ही समभावना योग्य आहे, कारण आपण सर्व अद्याप मानवी शरीरात आहोत आणि यहोवाचे उपासक या अर्थी आपल्यावर त्रास व छळ हा ओढवणार आहे.—१ पेत्र ५:६-११.

विवाह सन्माननीय असला पाहिजे

१३. पौल इब्रीयांस १३:४ मध्ये सारांशदृष्ट्या काय सांगत होता?

१३ ख्रिस्ताचे उदाहरण अनुकरण करताना आणि ‘यहोवाची पवित्र सेवा आदराने व ईश्‍वरी भयाने करीत असता’ आम्हाला इतर मार्गाने देखील इतरांची काळजी करता आली पाहिजे. “आपणही देहात आहो” असे सूचित करण्याद्वारे पौलाने हे दर्शविले की, आमचे शारीरिक वा दैहिक नाते याने आम्हाला दुसऱ्‍यांविषयी योग्य आदर प्रदर्शित करण्यासाठी सुसंधी दिली पाहिजे. (इब्रीयांस १३:३) त्याने इब्री ख्रिश्‍चनांना हा बोध केलाः “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्रीयांस १३:४) ही सूचना केवढी योग्य होती कारण रोमी साम्राज्यात सर्वत्र लैंगिक अनैतिकता बोकाळलेली होती! आज जगाचे नैतिक दर्जे खालावलेले असल्यामुळे आणि लैंगिक अनैतिकतेच्या कारणामुळेच दरवर्षी हजारोंना मंडळीतून बहिष्कृत केले जाते आहे ही वस्तुस्थिती असल्यामुळे आजच्या ख्रिश्‍चनांनी या उपदेशाकडे कान दिला पाहिजे.

१४. विवाह हा आदरनीय आहे असे तुम्ही का म्हणाल?

१४ पौलाच्या काळी एसेनस हा अशाप्रकारचा वर्ग होता ज्याने विवाहाला उच्च दर्जाचे मानले नव्हते. ते आजच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांप्रमाणे अविवाहितावस्था आचरीत होते. विवाहापेक्षा अविवाहितावस्था अधिक पवित्र आहे असा त्यांनी चुकीने समज करून घेतला होता. तथापि, पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना जे सांगितले त्याद्वारे विवाह हा आदरनीय आहे हे तो स्पष्टरित्या सांगत होता. नामीने आपल्या दोन विधवा सुना, रूथ व अर्पा यांना ती इच्छा व्यक्‍त केली तेव्हा तेथे विवाहाविषयीचा उच्च श्रद्धा दिसल्या. ती म्हणालीः “यहोवा करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” (रूथ १:९) याखेरीज दुसऱ्‍या ठिकाणी पौलाने स्वतः हे दर्शविले की, “पुढील काळी विश्‍वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; . . . लग्न करावयाची ते मनाई करतील.”—१ तीमथ्य ४:१-५.

१५. इब्रीयांस १३:४ मध्ये सांगण्यात आलेले जारकर्मी व व्यभिचारी कोण आहेत व अशांचा देव कसा न्याय करील?

१५ इब्री एकेकाळी नियमशास्त्राधीन होते, व आता त्यांना नवीन करारात घेण्यात आले होते. त्यांना ही आज्ञा ठाऊक होतीः “व्यभिचार करू नको.” (निर्गम २०:१४) पण ते तेव्हा अनैतिक जगात वास्तव्यास होते यासाठीच त्यांना हा सल्ला जरुरीचा होता की, “अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” जारकर्मी हे ते असतात जे अविवाहित असतात पण जे लैंगिक समागम करतात. पण व्यभिचारी हे खासपणे ते असतात जे विवाहित असून आपल्या वैवाहिक सोबत्याशी नव्हे तर इतरांसोबत लैंगिक समागम करतात व याकरवी ते आपल्याच विवाह अंथरुणास भ्रष्ट करतात. अशा या निर्लज्ज जारकर्मी व व्यभिचाऱ्‍यांना देवाकडील प्रतिकूल दंड मिळत असल्यामुळे त्यांना स्वर्गीय नवीन यरुशलेमात प्रवेश मिळणार नाही किंवा देवाच्या राज्याच्या अधिपत्याखाली पृथ्वीवर चिरकालिक जीवनाचा आनंद मिळू शकणार नाही. (प्रकटीकरण २१:१, २, ८; १ करिंथकर ६:९, १०) विवाह अंथरूण भ्रष्ट न करण्याविषयीच्या या सूचनेस लक्षात घेता विवाहीत ख्रिश्‍चनांनी आपल्या वैवाहिक सोबत्याशी नीच लैंगिक आचार टाळावा. वस्तुतः विवाहात योग्य अशी शारीरिक जवळीक अशुद्ध नाही.—पहा द वॉचटावर, मार्च १५, १९८३, पृष्ठे २७-३१.

जवळ आहे तेवढ्यावर तृप्त असणे

१६, १७. इब्रीयांस १३:५ मध्ये काय सांगण्यात आले, आणि इब्री लोकांना ही सूचना का जरुरीची होती?

१६ आम्ही आमच्या कित्त्याचे अनुकरण केले आणि यहोवा आमचा साहाय्य करणारा आहे हा आत्मविश्‍वास राखून त्याची ‘पवित्र सेवा ईश्‍वरी भयाने व आदराने केली’ तर आम्हास समाधान मिळू शकेल. तथापि, भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याचा मोह सतत होत असतो, पण ख्रिश्‍चनांनी त्यास बळी पडता कामा नये. यासाठी इब्रीकरांना सांगण्यात आलेः “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. कारण त्याने स्वतः म्हटले आहेः ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” (इब्रीयांस १३:५) इब्रीकरांना ही सूचना का आवश्‍यक होती?

१७ क्लौद्य या कैसराच्या कारकिर्दीत (इ.स. ४१-५४) “मोठा दुष्काळ” पडला होता त्यामुळे इब्रीकरांना पैशाविषयी कदाचित अवास्तव काळजी वाटत असावी. हा दुष्काळ इतका भयानक होता की इतरत्र पसरलेल्या ख्रिश्‍चनांनी यहुदीयातील आपल्या बांधवांना संकटकाळाची मदत दिली होती. (प्रे. कृत्ये ११:२८, २९) यहुदी इतिहासकार जोसेफसच्या मते हा दुष्काळ तीन वर्षे वा अधिक होता व त्यामुळे यहुदीया व यरुशलेमात भयंकर दारिद्र्‌य ओढवले.—अँटीक्विटीज्‌ ऑफ द ज्यूस्‌, २०, २, ५; ५, २.

१८. इब्रीयांस १३:५ मध्ये देण्यात आलेल्या सूचनेत आम्हाला कोणता धडा आहे?

१८ येथे आम्हाला काही धडा मिळतो का? होय, कारण आपण जरी गरीब असलो तरी आपणाला पैशाविषयी प्रेम नको किंवा त्याची अवास्तव काळजी करू नये. सांपत्तिक सुरक्षेविषयी अवास्तव चिंताग्रस्त होण्याऐवजी किंवा लोभी बनण्यापेक्षा आपण “जवळ आहे तेवढ्यात तृप्त असावे.” येशूने म्हटलेः “तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व [देवाची] धार्मिकता मिळवावयाचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हास मिळतील.” (मत्तय ६:२५-३४) त्याने हेही दाखवले की, ‘आमच्यापाशी संपत्ती आहे तर त्यामुळे आमचे जीवन होते असे नाही,’ या कारणास्तव आम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” झाले पाहिजे. (लूक १२:१३-२१) संपत्तीवरील प्रेमामुळे आमची आध्यात्मिकता धोक्यात येत आहे तर पौलाने इब्रीकरांना दिलेली सूचना आपण ऐकू आणि हेही लक्षात ठेवू की, “पुरेश्‍या गोष्टी जवळ असून त्यासोबत असणारी ईश्‍वरी भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे.”—१ तीमथ्य ६:६-८.

यहोवावर भाव ठेवा

१९. देवाने यहोशवाला कोणते आश्‍वासन दिले, आणि याचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?

१९ ‘आदर व ईश्‍वरी भयाने पवित्र सेवा’ करणारे येशूचे शिष्य या नात्याने आम्ही आमचा भाव संपत्तीवर नव्हे तर आमच्या स्वर्गीय पित्यावर ठेवला पाहिजे, कारण त्यापासून मिळणारी मदत महत्त्वाची आहे. आमच्यापुढे कोणतीही समस्या उभी राहिली तरी त्याच्या या आश्‍वासनाची आपण आठवण ठेवावीः “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्रीयांस १३:५) येथे पौल, देवाने यहोशवाला जे म्हटले होते ते अवतरीत करीत होता. देव म्हणालाः “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (यहोशवा १:५; पडताळा अनुवाद ३१:६, ८.) यहोवाने यहोशवाला कधीच त्यागले नाही त्याचप्रमाणे आम्ही त्याच्यावर आपला भाव ठेवला तर तोही आम्हाला त्यागणार नाही.

२०. (अ) १९९० या वर्षाचे वचन काय आहे? (ब) मग कसलेही भय न धरता आम्ही काय करीत राहिले पाहिजे?

२० देवाकडून मिळणारी नितांत मदत याविषयी या वर्षाला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अधिक भर दिला जाईल; कारण १९९० चे वार्षिक वचनही तेच आहेः “धैर्य धरा आणि म्हणाः ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे.” हे शब्द इब्रीयांस १३:६ मध्ये सापडतात. येथे पौलाने स्तोत्रकर्त्याचे शब्द अवतरीत केले व तो इब्रीयांना म्हणालाः “म्हणून आपण धैर्याने म्हणतोः ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?’” (स्तोत्रसंहिता ११८:६) आमचा छळ झाला तरी आम्ही भयग्रस्त होणार नाही कारण देव जेवढी अनुज्ञा देतो त्यापेक्षा अधिक माणसाला काही करता येत नाही. (स्तोत्रसंहिता २७:१) सचोटी रक्षक या अर्थी जरी आम्हाला मरावे लागले तरी आम्हापाशी पुनरुत्थानाची आशा आहे. (प्रे. कृत्ये २४:१५) यासाठीच, ‘आदराने व ईश्‍वरी भयाने पवित्र सेवा सादर’ करण्यात आपण आपल्यासाठी कित्ता ठरलेल्या येशूचे अनुकरण करु आणि हा आत्मविश्‍वास बाळगू की, यहोवा आम्हाला साहाय्य करणारा आहे.

तुमचा प्रतिसाद कोणता असेल?

◻ इब्री ख्रिश्‍चनांना यहोवाच्या मदतीची खासपणे का गरज होती?

◻ यहोवाच्या लोकांनी ‘आपले बंधुप्रेम कसे टिकविले’?

◻ पाहुणचारी का असावे?

◻ दुःख सहन करणाऱ्‍या आमच्या समविश्‍वासूंबद्दल आपल्याला आठवण आहे हे कसे दाखवता येईल?

◻ विवाह आदरनीय का ठेवला पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा