वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १/१ पृ. १०-१५
  • यहोवासाठी साक्ष देत राहा आणि माघार घेऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासाठी साक्ष देत राहा आणि माघार घेऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आव्हान स्वीकारणे
  • राज्याचा विस्तार व छळ
  • पौलाने इब्रीयांस लिहिलले पत्र
  • विश्‍वासू उदाहरणांपासून फायदा उचलणे
  • थकून जाऊ नये
  • यहोवा का शिस्त लावतो
  • “न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खात्री”
  • जीवनाच्या धावेवर हार मानू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवास संतुष्ट करणारी अर्पणे सादर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • अविश्‍वासापासून जपा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा मला साहाय्य करणारा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १/१ पृ. १०-१५

यहोवासाठी साक्ष देत राहा आणि माघार घेऊ नका

तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.”—इब्रीयांस १२:३.

१, २. आपले पुनरुत्थान झालेले आहे याविषयी येशूने आपल्या शिष्यांना कोणते खात्रीशीर प्रमाण दिले?

“मी प्रभूला पाहिले आहे!” या आश्‍चर्यकारक उद्‌गारांनी मरीया मग्दालिया हिने येशूच्या पुनरुत्थानाची बातमी जाहीर केली. (योहान २०:१८) याद्वारे, पूर्वी येशूच्या मृत्युमुळे दुःखी झालेल्या त्याच्या शिष्यांना ४० दिवस पहावयास मिळणाऱ्‍या आश्‍चर्यकारक घटनांची सुरवात झाली.

२ आपण खरोखरी जिवंत आहोत अशी आपल्या शिष्यांच्या मनात कसलीही शंका न रहावी अशी येशूची इच्छा होती. या कारणास्तव लूक लिहितोः “मरण सोसल्यानंतरही [येशूने] त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे.” (प्रे. कृत्ये १:३) खरे म्हणजे, एके प्रसंगी तो “एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला.” (१ करिंथकर १५:६) आता संशयाला कोठेच जागा नव्हती. येशू जिवंत होता!

३. राज्याविषयीचा कोणता प्रश्‍न येशूच्या शिष्यांनी त्याला विचारला, आणि त्याच्या उत्तराने ते आश्‍चर्यचकित का झाले?

३ त्यावेळी येशूच्या शिष्यांच्या मनात, एकेकाळी इस्राएलात होते त्या पृथ्वीवरील “देवाच्या राज्या”चा विचार होता. (लूक १९:११; २४:२१) यामुळेच त्यांनी येशूला विचारलेः “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापीत करणार काय?” तेव्हा येशूने त्यांना जे उत्तर दिले त्यामुळे त्यांना मोठे आश्‍चर्य वाटले असावे, कारण तो म्हणालाः “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमात, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:६-८) आता शिष्यांपुढे केवढे आव्हान प्रस्तुत झाले होते! शिवाय केवढी गहन जबाबदारी उभी होती! हे काम त्यांना कसे जमणार होते? याचे उत्तर आश्‍चर्यकारक रितीने मिळाले.

आव्हान स्वीकारणे

४. पेंटेकॉस्टच्या दिवशी काय घडले त्याचे वर्णन करा.

४ लूक विदीत करतोः “नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे पन्‍नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले; आणि वेगवेगळ्या झालेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” तो नाद इतका मोठा होता की, सणासाठी यरुशलेमात आलेल्या बहुतेक यहुद्यांचे लक्ष तेथे आकर्षले गेले. या लोकांना ‘आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये’ ऐकून मोठे आश्‍चर्य वाटले.—प्रे. कृत्ये २:१-११.

५. प्रे. कृत्ये १:८ मध्ये येशूने केलेले भाकित केवढ्या प्रमाणात पूर्ण झाले?

५ पेत्राने वेळ न दवडता मोठे प्रभावकारी भाषण दिले व त्यामध्ये, ज्याला त्या यहुद्यांनी वधस्तंभावर मारले होते तो “नासोरी येशू” दावीदाने प्रेरणेने सांगितलेला “प्रभू” होता हे निःसंशयाने पटवून सांगितले. दावीदाने त्या प्रभुविषयी असे म्हटले होते की, “यहोवाने माझ्या प्रभूला सांगितले की, ‘मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” पेत्राचे भाषण ऐकून त्याच्या श्रोत्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली व त्यांनी विचारलेः “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्राने आपल्या उत्तरात आर्जविलेः “पश्‍चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या.” याचा परिणाम काय दिसला? हजारोंचा तेथे बाप्तिस्मा झाला! (प्रे. कृत्ये २:१४-४१) अशाप्रकारे, यरुशलेमात आधीच साक्ष मिळाली. नंतर ती सर्व यहुदीयात, मग शोमरोनात व शेवटी “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पसरली गेली. इ. स. ६० च्या सुमारापर्यंत राज्य प्रचाराच्या कार्याचा विस्तार इतक्या जलद गतीने झाला की, सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत . . . घोषणा झाली” असे प्रेषित पौल म्हणू शकला.—कलस्सैकर १:२३.

राज्याचा विस्तार व छळ

६, ७. (अ) पहिल्या शतकात राज्याची वाढ तसेच ख्रिश्‍चनांचा छळ हा एकत्र कसा झाला? (ब) यरुशलेमातील ख्रिश्‍चनांच्या बाबतीत कोणती तातडीची गरज उद्‌भवली, व ही गरज कशी पूर्ण झाली?

६ इ. स. ३३ चा पेंटेकॉस्ट होऊन बराच काळ लोटला नाही तोच येशूच्या शिष्यांना त्याचे उद्‌गार आठवण्याचे कारण आले. तो म्हणाला होताः “दास धन्यापेक्षा मोठा नाही. . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमात शिष्यांची सख्या फार वाढत गेली” हे बघून यहुदी धर्मपुढाऱ्‍यांना मोठा द्वेष चढला. स्तेफन या शिष्याला खोटा आरोप घालून धोंडमार करण्यात आला. हा, कित्येक दिवस वाट पाहून असलेल्या गोष्टीचा संकेत ठरला, कारण “त्याच दिवशी यरुशलेमातील मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदीया व शोमरोन ह्‍या प्रदेशात पांगापांग झाली.”—प्रे. कृत्ये ६:७; ७:५८-६०; ८:१.

७ हा छळ तात्पुरता थांबला. पण काही काळातच हेरोद अग्रिप्पा १ याने प्रेषित याकोबाला जिवे मारले. पेत्राला कैदेत टाकण्यात आले पण त्याची एका दिव्यदूताने सुटका केली. नंतर यरुशलेमातील बांधव आर्थिकदृष्ट्या निर्बळ झाले आणि यांना दुसरीकडील समविश्‍वासू बांधवांकडून मदत पाठवावी लागली. (प्रे. कृत्ये ९:३१; १२:१-११; १ करिंथकर १६:१-३) प्रेषित पौलाने यरुशलेमास भेट दिली तेव्हा धर्मवेड्यांचा गोंधळ सुरु झाला; कित्येक ओरडलेः “जगातून ह्‍याला नाहीसे करा; ह्‍याची जगण्याची लायकी नाही.” (प्रे. कृत्ये २२:२२) खरेच, यरुशलेम व यहूदीया येथील ख्रिश्‍चनांनी राज्याची विश्‍वासूपणे साक्ष देत राहण्याकरता त्यांना प्रोत्साहन मिळण्याची खूप गरज होती. येशूने आपल्या शिष्यांना हे अभिवचन दिले होते की, “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो . . . पवित्र आत्मा” “कैवारी” किंवा मदतनीस म्हणून कार्य करील. (योहान १४:२६) पण आता पिता ही जरुर असणारी मदत वा सांत्वन कसे देणार होता? याचे उत्तर होते, काही अंशी प्रेषित पौलाद्वारे.

पौलाने इब्रीयांस लिहिलले पत्र

८. (अ) पौलाने इब्रीयांस पत्र कशामुळे लिहिले? (ब) या पत्राच्या कोणत्या भागावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत व का?

८ इ. स. ६१ च्या सुमारास पौल रोममध्ये कैदी झाला पण यरुशलेमात आपल्या बांधवांच्या बाबतीत काय होत आहे याची त्याला जाणीव होती. यासाठी यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने इब्रीयांस समयोचित पत्र पाठवले. ते इब्री बंधूभगिनींविषयीच्या प्रेमळ काळजीने भरलेले आहे. यहोवा हा साहाय्यकर्ता आहे असा विश्‍वास व भरवसा असण्यासाठी या बांधवांनी काय करणे जरूरीचे आहे हे त्याला ठाऊक होते. तेव्हाच यांना ‘नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने धावता येऊ’ शकत होते; आणि मग ते आत्मविश्‍वासाने म्हणू शकत होतेः “यहोवा मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (इब्रीयांस १२:१; १३:६) पौलाने इब्रीयांस लिहिलेल्या पत्राच्या याच भागासंबंधाने (अध्याय ११-१३) आम्ही आता आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. पण का? कारण त्या आरंभीच्या ख्रिस्तीजनांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले तीच आज यहोवाच्या साक्षीदारांना सामोरी उभी आहे.

९. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांपुढे उभा राहिलेला कोणता वादग्रस्त विषय आज ख्रिश्‍चनांपुढे आहे, आणि याचा सामना कसा करता येईल?

९ आमच्या याच पिढीत पुष्कळांनी राज्य संदेशाला सरळ मनोवृत्तीने प्रतिसाद दाखविला, आपल्या जीवनाचे यहोवाला समर्पण केले आणि त्याचे साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला. तथापि, खऱ्‍या उपासनेच्या या वाढीसोबतच हिंसाचारी छळाची लाटही उसळली आहे व यामध्ये स्तेफन, याकोब व पहिल्या शतकातील विश्‍वासू साक्षीदारांप्रमाणेच कित्येक ख्रिश्‍चनांना आपले जीवनही गमवावे लागले आहे. यास्तव त्या काळी जो वादग्रस्त विषय होता तोच आजही आहेः राज्याच्या संदेशाला होणाऱ्‍या वाढत्या विरोधात सचोटीची जी परिक्षा होते त्यामध्ये कोण टिकून राहू शकतो? तसेच, या सध्याच्या पिढीवर जेव्हा लवकरच “मोठे संकट” कोसळेल तेव्हा ज्या विलक्षण घटना घडतील त्यावेळी कोणास तोंड देता येणे शक्य होईल? (मत्तय २४:२१) याचे उत्तर हे आहे की, जे “विश्‍वासाचे सुयुद्ध करतात,” जे “विश्‍वासात दृढ आहेत” ते. हेच लोक शेवटी असे म्हणू शकतीलः “ज्याने जगावर विजय मिळविला तो म्हणजे आपला विश्‍वास.”—१ तीमथ्य ६:१२; १ पेत्र ५:९; १ योहान ५:४.

विश्‍वासू उदाहरणांपासून फायदा उचलणे

१०. (अ) विश्‍वास काय आहे? (ब) प्राचीन काळच्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांविषयी देवाला कसे वाटले?

१० विश्‍वास हा काय आहे? पौल याचे उत्तर देतो. तो म्हणतोः “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्‍वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.” (इब्रीयांस ११:१, २) पौलाने विश्‍वासाविषयी दिलेल्या या व्याख्येच्या समर्थनात विश्‍वास कसा कार्य करतो ते सांगतो. “पूर्वज” तसेच सारा व रिबका या स्त्रियांच्या जीवनातील काही ठळक घटनांकडे तो आपले लक्ष नेतो. अशा लोकांचा “देव म्हणवून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही” हे किती प्रोत्साहनदायक वाटते बरे! (इब्रीयांस ११:१६) आमच्याठायी जो विश्‍वास आहे तो बघून देवही आपल्याविषयी असेच म्हणू शकेल का? प्रत्येक दिवस मावळतो तसे त्याने आम्हाविषयी काही लज्जा धरावी असे कोणतेही कारण आपण त्याला देऊ नये.

११. आम्हासमोर वेढलेल्या “साक्षीरुपी मेघा”चा आज आपल्याला कसा लाभ मिळविता येईल?

११ या विश्‍वासू स्त्री-पुरुषांविषयीचा अहवाल सांगितल्यावर पौल म्हणतोः “तर मग, आपण एवढ्या साक्षीरुपी मेघाने वेढलेलो आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने धावावे.” (इब्रीयांस १२:१) हे विश्‍वासूजन आज कबरेत निद्रेत असले तरी ते आमच्या मनात जिवंत आहेत का? तुम्ही त्यांना व त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल चांगले जाणता का की ज्याकरवी तुम्हाला होय, असे उत्तर देता येईल? नियमित रुपाच्या पवित्र शास्त्र अध्ययनापासून जे प्रतिफळ लाभतात त्यांच्यापैकी हे एक आहे. या “साक्षीदारांच्या मेघा”च्या थरारक अनुभवास पवित्र शास्त्र अध्ययनाद्वारे आपणासमोर जिवंतपणा निर्माण करता येतो. या लोकांच्या विश्‍वासू उदाहरणांना आपण आपल्या अंतःकरणी लावले तर विश्‍वासाविषयी कसलीही उणीव आम्हाला सहजपणे काढून टाकता येईल. उलट, सर्व प्रसंगी आम्ही सत्याविषयी निर्भिड व धैर्यवान साक्ष देत राहू.—रोमकरांस १५:४.

थकून जाऊ नये

१२. (अ) येशूचे उदाहरण ‘आमची मने खचून आम्ही थकून जाऊ नये’ म्हणून कसे सहाय्यक ठरते? (ब) आज थकून न जाण्याविषयीची कोणती आधुनिक उदाहरणे आहेत?

१२ आम्हासमोर विश्‍वासाविषयीचे थोर उदाहरण येशू ख्रिस्ताचे आहे. पौल आर्जवितोः “आपण आपल्या विश्‍वासाचा प्रमुख कर्ता व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहात असावे; (आणि आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने धावावे.) . . . तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी सखोल विचार करा.” (इब्रीयांस १२:१-३) तुम्ही येशूच्या उदाहरणाचा किती “सखोल” विचार केला आहे? तुम्ही त्याच्याकडे किती निरखून पाहत आहात? (१ पेत्र २:२१) ‘आमची मने खचून आम्ही थकून जावे’ अशी सैतानाची इच्छा आहे. आम्ही साक्षीकार्य बंद ठेवावे असे त्याला वाटते. हे तो कसे करतो? पहिल्या शतकात केले त्याप्रमाणे आजही तो धार्मिक आणि जगातील अधिकाऱ्‍यांच्या द्वारे सरळ विरोध उभा करुन हे करतो. गेल्या वर्षी राज्य-प्रचाराचे हे कार्य ४० देशात निर्बंधित होते. पण यामुळे आमचे बांधव खचले का? नाही! त्यांच्या विश्‍वासू कामामुळे त्या देशांमध्ये १९८८ वर्षात १७,००० पेक्षा अधिक लोकांचा बाप्तिस्मा होऊ शकला. जे बांधव हे कार्य मुक्‍तपणे करु शकतात अशा देशात वसाहतीस आहेत त्यांना यामुळे केवढी उत्स्फुर्तता मिळाली पाहिजे! राज्याची ही सुवार्ता प्रसारीत करण्यात आपल्याला केव्हाही कंटाळा वाटू नये!

१३. (अ) आमच्या प्रचारकार्यात आम्हाला थकविणारे बनवणाऱ्‍या काही युक्‍तीबाज गोष्टी कोणत्या आहेत? (ब) कोणता ‘आनंद येशूपुढे होता,’ आणि हीच आनंदी मनोवृत्ती आपल्याला कशी मिळवता येईल?

१३ तथापि आणखी काही युक्‍तीबाज गोष्टी आहेत ज्या आपल्याला खचवू शकतात. यामध्ये विभाजित घरातील विरोध, मानसिक ताण, आजारपण, सहसोबत्यांकडून दबाव, आमच्या प्रचारकार्यात अपेक्षिण्यात आलेले परिणाम न मिळाल्यामुळे येणारे नैराश्‍य किंवा व्यवस्थीकरणाचा नाश लवकर येत नाही हे बघून वाटणारी उद्विग्नता यांचा समावेश होतो. तर आता प्रश्‍न हा येतो की येशूलाही जेव्हा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला तेव्हा ते त्याने कशामुळे सोसले? “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यामुळे त्याला ते सहन करता आले. (इब्रीयांस १२:२) आपल्या पित्याचे नाम गौरवल्यामुळे पित्याच्या अंतःकरणाला वाटणारी संतुष्टता तसेच मशीही राज्याचे अप्रतिम आशीर्वाद मानवजातीवर आणण्यात जो आनंद मिळणार आहे त्याचा विचार यामुळे येशूचे पोषण झाले. (स्तोत्रसंहिता २:६-८; ४०:९, १०; नीतीसूत्रे २७:११) येशूची ही आनंदी प्रवृत्ती आम्हाला अधिक जवळून आचरता येईल का? शिवाय पेत्राने १ ले पेत्र ५:९ मध्ये जी हमी दिली आहे तीही लक्षात आणा. तो म्हणतोः “जगातील तुमच्या बंधूवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” यहोवाला आपली काळजी आहे, आमच्या जगव्याप्त बंधुजनांचा उबदारपणा तसेच देवाच्या राज्यामध्ये मिळणाऱ्‍या आनंदाकडे आपले डोळे लावणे—या सर्व गोष्टी आम्हाला यहोवाची सेवा विश्‍वासाने करीत राहण्यात तसेच शेवट इतका जवळ आलेला आहे तर आपले प्रचारकार्य मंदावू न देण्यात आम्हाला मदत देतील.

यहोवा का शिस्त लावतो

१४. आम्हाला सोसाव्या लागणाऱ्‍या परिक्षा आणि त्रास यामधून कसला लाभ मिळू शकेल?

१४ आम्हाला परिक्षा व त्रास का सोसावा लागेल त्याच्या कारणावर पौल प्रकाश टाकतो. अशांसंबंधाने आपण शिस्तीचा प्रकार असा विचार बाळगावा असे पौल सुचवितो. तो म्हणतोः “माझ्या मुला, यहोवाच्या शिस्तीचा अनादर करु नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको.” (इब्रींयांस १२:५, ६) येशूला सुद्धा ‘दुःख सोसल्यामुळे आज्ञाधारकपणा शिकायला मिळाला.’ (इब्रीयांस ५:८) आम्हीही आज्ञाधारकपणा शिकून घेतला पाहिजे. शिस्तीने वळण लावण्याचा कोणता लाभदायक परिणाम आम्हाला मिळतो ते लक्षात आणा. पौल म्हणालाः “ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतीमत्त्व हे शांतीदायक फळ देते.” किती हे प्रोत्साहनदायक आहे बरे!—इब्रीयांस १२:११.

१५. “आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा” या पौलाच्या सूचनोचा अवलंब आपल्याला कसा करता येईल?

१५ या अनुषंगाने आपण ‘यहोवाकडील शिस्तीचा स्वीकार केला’ तर मग पौलाची ही सरळ सूचना आपल्या अंतःकरणी आपण लावू की, “लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा; आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा.” (इब्रीयांस १२:१२, १३) काही वेळा ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद मार्गा’वरुन आपले पाय सहजगत्या दुसरीकडे भटकतात. (मत्तय ७:१४) या बाबतीत प्रेषित पेत्र आणि अंत्युखियातील इतर जण दोषी ठरले होते. ते का? कारण ‘सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालले नाहीत.’ (गलतीकर २:१४) आज आपण आमचा सर्वोच्च शिक्षक, यहोवा देव याचे ऐकत राहिले पाहिजे. तसेच, “विश्‍वासू व बुद्धीमान दास”वर्ग याजकरवी पुरविण्यात आलेल्या सर्व मदतींचा आम्ही पुरेपूर उपयोग केला पाहिजे. यामुळे आमच्या पायांना “सरळ वाटा” मिळतील.—मत्तय २४:४५-४७; यशया ३०:२०, २१.

१६. (अ) मंडळीत “कडूपणाचे मूळ” कसे अंकुरित होऊ शकते? (ब) पौल अनैतिकतेचा पवित्र गोष्टींची तमा न बाळगणे यासोबत का संबंध जोडतो, आणि अशा धोक्यांपासून आपल्याला कसे सुरक्षित राहता येईल?

१६ पौल पुढे इशारा देताना म्हणतो की, “देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये.” (इब्रीयांस १२:१५) मंडळीत ज्या पद्धतीने कामे केली जातात त्याविषयी असंतुष्ट होणे, असमाधानी बनणे, सदा कुरकुरत राहाणे हे त्या ‘कडू मूळ’सारखे आहे जे लवकरच सर्वत्र पसरते आणि मंडळीतील इतर लोकांच्या चांगल्या विचारात विष कालवते. आम्ही, सत्याने आमच्या जीवनात जे अगणित आशीर्वाद आणले ते विचारात घेऊन या नकारात्मक विचारांचा सामना करु शकतो. (स्तोत्रसंहिता ४०:५) दुसरा आणखी एक धोका म्हणजे अनैतिक भावना बाळगणे किंवा ‘एसावासारखी पवित्र गोष्टींची तमा न बाळगणे’ हा आहे. (इब्रीयांस १२:१६) पौल या दोन्ही धोक्यांना एकत्र जोडतो कारण एकामुळे दुसरा धोका सहजपणे संभवतो. अशा या स्वार्थी इच्छा आकांक्षाना, जर पेत्राच्या, “[सैताना]विरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा” ह्‍या शब्दांचा अवलंब केला तर बळी पडणार नाही.—१ पेत्र ५:९.

“न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खात्री”

१७. सियोन डोंगरापाशी घडलेल्या अद्‌भूत घटना व आज ख्रिश्‍चनांना सामोऱ्‍या असणाऱ्‍या घटनांची तुलना करा.

१७ आमचा विश्‍वास हा “न दिसणाऱ्‍या गोष्टींविषयीच्या खात्री”वर आधारलेला आहे. (इब्रीयांस ११:१) दिसत नसलेल्या पण खात्रीशीर अशा काही गोष्टींचा पौल इब्रीयांस १२:१८-२७ मध्ये उल्लेख करतो. देव इस्राएलांसोबत सिनाय डोंगरापाशी थेट बोलला तेव्हा ज्या भयावह घटना घडल्या तसेच मोशेने जे म्हटले की, “मी अति भयभीत व कंपित झालो” त्याविषयीचे वर्णन त्याने दिले. प्रेषित पुढे म्हणतोः “पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज . . . ह्‍यांच्याजवळ आला आहा.” प्राचीन इस्राएली लोक सिनाय डोंगराजवळ असताना देवाच्या वाणीने पृथ्वी कंपायमान झाली असे पौलाने म्हटले पण आता देव असे म्हणतोः “आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे, तर आकाशही कांपवीन.” हे शब्द प्रामुख्यत्वे अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना लागू असले तरीही मेंढरासमान असणारा “मोठा लोकसमुदाय” सुद्धा हे शब्द आपल्या अंतःकरणी घेऊ शकतो. (प्रकटीकरण ७:९) पौल जे म्हणत होता त्याविषयीची पूर्ण रसिकता तुम्हाठायी आहे का? आम्ही लाखो दिव्यदूतांच्या समूहासमोर उभे आहोत. अर्थातच, यहोवापुढेही आम्ही आहोत. त्याच्या उजव्या बाजूस येशू ख्रिस्त आहे. होय, पूर्वी सिनाय डोंगरापाशी उभे राहिलेल्या प्राचीन इब्री लोकांपेक्षा आज आपण अत्यंत भयावह जबाबदारीत आहोत! हे लक्षात घ्या की, येणाऱ्‍या हर्मगिद्दोनच्या लढाईत जे हादरणे होणार त्यामध्ये सध्याचे दुष्ट आकाश व पृथ्वी नाहीशी होईल. यास्तव आजचा काळ हा देवाचे वचन ऐकणे व त्याचे पालन करणे यापासून ‘मागे वळण्याचा’ नाही!

१८. आम्हाला केवळ कशामुळे यहोवासाठी साक्ष देत राहता येईल आणि थकता येणार नाही?

१८ अशाप्रकारे आपण मानवी इतिहासाच्या अत्यंत भयचकित समयात राहात आहोत. आम्हाला यहोवाचे साक्षीदार या नात्याने पृथ्वीच्या शेवटापर्यंत देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी पाठविले आहे. यासाठी आम्हाला न डळमळणारा अटळ विश्‍वास हवा आहे, असा विश्‍वास जो खचणार नाही तर यहोवाकडील शिस्तीचा आम्हाला स्विकार करावयाला लावील. आम्हाठायी असा विश्‍वास असला तर आम्ही “विपुल दया मिळणाऱ्‍या आणि देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भयाने करणाऱ्‍या” लोकांमध्ये राहू. (इब्रीयांस १२:२८) होय, आम्ही यहोवासाठी साक्ष देत राहू व कधी थकणार नाही.

तुमचा कोणता प्रतिसाद असेल?

◻ पौलाने इब्रीकरांना लिहिलेले पत्र आम्हास का लाभदायक आहे?

◻ ख्रिश्‍चनांना आज कोणत्या वादविषयाला तोंड द्यावयाचे आहे?

◻ प्राचीन काळच्या विश्‍वासू साक्षींकरवी आपल्याला कसा फायदा करुन घेता येईल?

◻ यहोवा ज्यांच्यावर प्रीती करतो अशांना तो का शिस्त लावतो?

◻ न थकता साक्ष देत राहण्याची गुरुकिल्ली कोणती आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा