येशूचे जीवन व उपाध्यपण
येशूच्या दृष्टांतापासून फायदे मिळविणे
समुद्रकाठी लोकसमुदायाला येशूने बहुत गोष्टी सांगून संपविल्यावर शिष्य जवळ येऊन त्याने दृष्टांत देऊन शिकविण्याची जी नवी पद्धत अनुसरली तिच्याबद्दल नवल व्यक्त करू लागतात. होय, त्याने याआधीही दाखले उपयोगात आणल्याचे त्यांनी ऐकले होते. पण एवढ्या वर्णनात्मकरित्या नव्हे. यास्तव त्यांना आता हे जाणून घ्यावेसे वाटते की, “आपण त्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”
यापैकीचे एक कारण हे की भविष्यवादित शब्दांची पूर्णता व्हावीः “मी आपले तोंड उघडून दृष्टांत सांगेन; प्राचीन काळच्या गूढकथांचे निवेदन करीन.” पण, त्यात याहीपेक्षा अधिक असे काही होते. त्याने जो दाखल्यांचा उपयोग केला त्यामुळे लोकांच्या हृदयाची पारख करण्याचा हेतू साध्य करण्यात मदत झाली.
प्रत्यक्षात, अनेकजण येशूकडे, तो एक प्रवीण शिक्षक—कथा निवेदक आणि चमत्कार करणारा म्हणून आकर्षित होत. ना की, प्रभू म्हणून सेवा करावी, किंवा निःस्वार्थपणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. त्यांनी बाळगलेला दृष्टीकोण आणि त्यांचा चरित्रक्रम यात ते बदल करू इच्छित नव्हते. त्याचा संदेश तेथवर डोकवावा हे ते इच्छित नव्हते. यासाठीच येशू म्हणतोः
“यास्तव मी त्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत; आणि ऐकत असता ऐकत नाहीत व समजतही नाहीत. यशयाचा संदेश त्याजविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, . . . या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे.”
तथापि, येशू पुढे म्हणतोः “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहतात; आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकतात. मी तुम्हास खचित सांगतो की, तुम्ही जे पाहता ते पाहावयास बहुत संदेष्टे व धार्मिक जन उत्कंठित झाले, तरी त्यांच्या पाहण्यात आले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित झाले तरी त्यांच्या ऐकण्यात ते आले नाही.”
होय, १२ प्रेषित व त्यांच्यासोबत असणाऱ्या श्रोत्यांठायी ग्रहणक्षम हृदय होते. ह्याकारणास्तव येशू म्हणतोः “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे. परंतु त्यांस दिलेले नाही.” आपण हे समजावून घ्यावे अशी त्यांची उत्कट इच्छा असल्यामुळे येशूने त्याच्या शिष्यांना पेरणी करणाऱ्याचा दाखला समजावून सांगितला.
“बी हे देवाचे वचन आहे,” असे येशू म्हणतो. आणि जमीन ही अंतःकरण आहे. वाटेवर पेरलेल्याबद्दलचे स्पष्टीकरणात तो सांगतोः “त्यांनी विश्वास धरून त्यांस तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.”
तसेच जे बी खडकाळ भूमीवर पेरले जाते ती म्हणजे ते अशा अंतःकरणाचे असतात जे आनंदाने ते ग्रहण करतात. तथापि, अशा प्रकारच्या अंतःकरणात बी खोलवर रूजू शकत नसल्यामुळे जेव्हा परिक्षाप्रसंग येतात किंवा छळ उद्भवतो त्यावेळी ते मागे पडतात.
जे बी काटेरी झुडपात पडते, त्याविषयी येशू पुढे सांगतो की, ते असे लोक आहेत, जे वचन ऐकतात, पण संसाराच्या चिंता, धन व विषयसुखे यात आयुष्यक्रमण करीत असता, त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत.
सरतेशेवटी, जे बी चांगल्या मातीत पडते, त्याविषयी येशू म्हणतो की, ते असे आहेत जे, वचन ऐकून निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात.
खरोखरी, हे शिष्य केवढे धन्य की ज्यांनी येशूचा पाठपुरावा करून त्याच्या शिकवणीतील मर्म समजावून घेतले. येशूची हीच इच्छा होती की, त्याचे दृष्टांत चांगले समजावेत की ज्या आधारे इतरांना सत्य चांगल्या रितीने समजावू शकू. तो विचारतोः “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवावा म्हणून आणितात काय?” नाही. “दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात.” यामुळेच येशू पुढे म्हणतोः “जे ऐकता त्याविषयी सावध राहा.” मत्तय १३:१०-२३, ३४-३६; मार्क ४:१०-२५, ३३, ३४; लूक ८:९-१८; स्तोत्रसंहिता ७८:२; यशया ६:९, १०.
◆ येशू दृष्टांतरुपे का बोलत असे?
◆ लोकसमुदायापेक्षा आपण वेगळे असल्याचे येशूचे शिष्य कसे दाखवितात?
◆ पेरणाऱ्याच्या दाखल्याचा येशू काय उलगडा देतो?