शांती ती निःशस्त्रीकरणामुळे येईल का?
“निःशस्त्रीकरणाची शांतीबरोबर सांगड घालणे ही एक घोडचूक आहे,” असे उद्गार, राष्ट्रांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात उडी घेण्याच्या ५ वर्षांअगोदर विन्स्टन चर्चिल यांनी काढले होते. ते पुढे म्हणालेः “जेव्हा शांती असते तेव्हा निःशस्त्रीकरणही असते.”
काय हा विरोधाभास! जोपर्यंत शांतीबद्दल निश्चित खात्री मिळत नाही तोपर्यंत निःशस्त्रीकरण करण्याचा धोका कोण पत्करेल? परंतु, युद्धासाठी शस्त्रांचा साठा केला जात आहे तर तेथे खरी शांती कशी असू शकेल? ही अशी परिस्थिती आहे जिच्यातून राजकीय नेत्यांना बाहेर पडण्याचा मार्ग अजूनही सापडलेला नाही.
विन्स्टन चर्चिल यांनी आपले विधान १९३४ मध्ये मांडले होते व याच्या दोन वर्षे आधी लिग ऑफ नेशन्सने संघटित केलेल्या निःशस्त्रीकरण परिषदेचा समारोपही झाला. जिच्या तयारीसाठी १२ वर्षे लागली होती त्या ह्या परिषदेचा उद्देश युरोपने परत शस्त्र उचलण्याचे टाळावे हा होता. पहिल्या महायुद्धाच्या वेळी झालेली नव्वद लक्ष सैन्याची कत्तल आणि कितीतरी लक्ष जखमी लोक व असंख्य नागरिकांचा झालेला मृत्यु याची दहशतवजा आठवण आजही जगभरातील लोकांना आहे. आणि तरीही निःशस्त्रीकरणाची योजना सिद्धीस गेलेली नाही. ते का?
निःशस्त्रीकरणाचे प्रयत्न
निःशस्त्रीकरणाचा करार अंमलात आणला जाऊ शकेल, परंतु परिणामांची शक्यता कमीच असते. उदाहरणार्थ, व्हर्साइल्स्च्या १९१९ मधील तहानुसार जर्मनीमध्ये निःशस्त्रीकरण केले गेले व त्याप्रमाणे “योग्य खात्री करून घेऊन व देऊन हे ठरविण्यात आले की, राष्ट्रीय युद्धसाहित्य देशांतर्गत सुरक्षितता राखू शकेल इतक्या पातळीपर्यंत कमी करण्यात येईल.” हे, अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन यांच्या सूचनेशी संबंधित होते, जे नंतर लिग ऑफ नेशन्सच्या कराराच्या आठव्या कलमात सामील करण्यात आले. पण हिटलर सत्तेवर आला तेव्हा या कराराचा अवमान केला गेला.
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर निःशस्त्रीकरणाचा मजबूत पाया स्थापन करण्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला अधिक यश मिळाले का? नाही. योग्य व निश्चित प्रयत्नांच्या अभावामुळे यश मिळू शकले नाही. व्यापक संहार करणारी अण्वस्त्रे उपलब्ध असल्यामुळे निःशस्त्रीकरण हा एक तातडीचा विषय बनला. द न्यू एनसायक्लोपिडिआ ब्रिटेनिका म्हणतेः “शस्त्रीकरणातील शर्यत ही आर्थिकदृष्ट्या अनुचित असून अपरिहार्यपणे युद्धाकडे नेणारी आहे हा पहिला चर्चेचा विषय नंतर भविष्यातील अण्वस्त्रांचा वापर हा मानवी संस्कृतीला हादरविणारा असेल या वादात रूपांतरीत झाला.”
पौर्वात्य व पाश्चिमात्य शस्त्रस्पर्धा प्रगतीपथावर असताना ती निष्फळ करण्यासाठी १२ राष्ट्रांचे एक निःशस्त्रीकरण मंडळ नेमले गेले. परंतु त्याला यश मिळाले नाही व त्याचा परिणाम म्हणजे दोन प्रबळ सत्ता एकमेकांविरुद्ध दंड ठोकून उभ्या राहिल्या. त्यानंतर आजच्या या क्षणापर्यंत पुष्कळ करार व तहनामे तयार झाले. परंतु एकमेकांवरील अविश्वास युद्धाच्या सर्व शस्त्रास्त्रांची विल्हेवाट लावण्यास परवानगी देईना. द न्यू एनसायक्लोपिडिआ ब्रिटेनिका म्हणतेः “सुखवस्तु विद्वानांनी केलेली ती वकिली आहे.”
किंमत मोजणे
निःशस्त्रीकरण करणे किंवा ते न करणे—यात कोणती किंमत गोवलेली आहे? ही किंमत पैशातच होते असे नाही. शस्त्रास्त्रांशी संबंधीत असलेला व्यवसायही प्रथम विचारात घेतला पाहिजे. पुष्कळ राष्ट्रांमध्ये करआकारणीचा पैसा शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरला जातो व त्यातून मिळणारा पैसा या व्यवसायाला उत्तेजन देतो. यास्तव निःशस्त्रीकरण झालेच तर त्याचा परिणाम म्हणजे बेकारी ही येऊ शकते. या कारणामुळेच, संरक्षणाचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात अंगावर घेतलेल्या राष्ट्रांना निःशस्त्रीकरणाच्या नुसत्या कल्पनेनेही थरकाप सुटतो. हा विचार त्यांना सुखासिन स्वप्न न वाटता एक भयानक स्वप्न वाटते.
तरीही, शस्त्रांच्या यंत्रसामग्रीसाठी गुंतवल्या गेलेल्या प्रचंड रकमेकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. संपूर्ण जगातील उत्पादनाचा १० टक्के भाग हा शस्त्रांवर खर्च करण्यात येत आहे असा अंदाज आहे. हे प्रमाण किती असेल? चलनातील वाढीनुसार तंतोतंत आकडेवारी बदलते, परंतु हे लक्षात घ्या की, अशारितीने दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला दहा लाख डॉलर्स (१.५४ लाख अमेरिकन डॉलर्स) खर्च केले जातात! एवढ्या रकमेचा विनिमय तुम्हाला करायला सांगितल्यास तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याल? दुष्काळ-निवारण? आरोग्य-निधी? बालकल्याण? पर्यावरणाची पुनर्स्थापना? अशाप्रकारच्या पुष्कळ गोष्टी केल्या जाऊ शकतील!
उदाहरणार्थ, रशियामध्ये अलिकडेच उद्घोषित केलेली “रणगाड्यांचे हलयंत्र” ही योजना विचारात घ्या, ज्यामध्ये काही शस्त्रे बनविणाऱ्या कारखान्यांचे रुपांतर “आधुनिक शेतीची [२०० प्रकारची] अवजारे बनविणाऱ्या” कारखान्यात केले गेले. पण, शेतकीच्या या अवजारांची इतक्या तीव्रतेने का गरज भासली? ब्रिटनच्या फार्मिंग न्यूजनुसार “शेतावर पिकलेल्या फळ व भाज्यांचा केवळ एक तृतीयांशच ग्राहकांपर्यंत पोहंचू शकतो व बाकीचा हिस्सा शेतातच कुजून जातो; किंवा ने-आण करण्यात किंवा साठवणीच्या कोठीत नाश पावतो.”
रणगाड्यांऐवजी हलयंत्रे बनविणे हे प्रशंसनीय आहे व ही एक असामान्य बाब असल्यामुळे वर्तमानपत्रात ती ठळक मथळा ग्रहण करू शकते. तरीपण, शस्त्रास्त्रांच्या एकूण उत्पादनावर याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. येशूने भविष्यवादित केल्यानुसार “भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख” होत असलेल्या या जगात शस्त्रास्त्रांच्या उत्पादनावर शेकडो दशलक्ष पौंडस्, रूबल्स्, व डॉलर्स खर्च केले जात आहेत. मग, हे भय कसे नष्ट होणार? संपूर्ण निःशस्त्रीकरण हे निव्वळ स्वप्नच राहणार का? जर नाही, तर त्याच्या पूर्ततेसाठी कशाची गरज आहे?—लूक २१:२६.