वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ५/१ पृ. २०-२४
  • नैतिक शुद्धाचरण हेच युवकांचे रुपसौंदर्य आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नैतिक शुद्धाचरण हेच युवकांचे रुपसौंदर्य आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हापुढील आव्हान
  • आव्हानाचा सामना करण्यासाठी मदत
  • स्वतःला शुद्ध ठेवा!
  • देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • देव शुद्ध लोकांवर प्रेम करतो
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ५/१ पृ. २०-२४

नैतिक शुद्धाचरण हेच युवकांचे रुपसौंदर्य आहे

“हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. . . . तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्‍या सर्वांबद्दल खरा देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.”—उपदेशक ११:९.

१, २. (अ) यहोवाची युवकांबाबतची इच्छा काय आहे? (ब) तुमच्या अंतःकरणाला व नजरेला जे जे आवडते त्याच्या मागोवा घेत राहणे मूर्खतेचे का आहे?

“यौवन, आवेश आणि कोमलपणा हा जीवनातील बहर होय. तो अल्पावधीचा आहे . . . याविषयीची तक्रार न करता, तो लुटण्याचा आनंद घ्या.” असे १९ व्या शतकातील एका जर्मन कवीने म्हटले. तुम्हा युवकांविषयी म्हटलेले ते शब्द, हजारो वर्षांआधी पवित्र शास्त्रातील उपदेशक या पुस्तकात जे लिखाण करण्यात आले त्याचा प्रतिध्वनि उमटवितातः “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्यात तुझे हृदय तुला उल्लास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.” (उपदेशक ११:९अ) अशाप्रकारे हे स्पष्ट आहे की युवकांच्या मनाला जे अपीलकारक वाटते त्याविषयी यहोवा देव नकारात्मक दृष्टी ठेवीत नाही. तुमच्या तारुण्यातील उत्साहाचा व शक्‍तीचा तुम्ही मनमुराद आनंद घ्यावा असे तो इच्छितो.—नीतीसूत्रे २०:२९.

२ याचा हा अर्थ होतो का की तुमच्या अंतःकरणाला व नजरेला जे जे आवडते त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या मागे जात रहावे? नक्कीच नाही! (गणना १५:३९; १ योहान २:१६) वर नमूद असणारे शास्त्रवचन पुढे म्हणतेः “पण ह्‍या सर्वांबद्दल [आपली इच्छा तृप्त करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टींची निवड करता] खरा देव तुझा झाडा घेईल.” (उपदेशक ११:९ब) होय, तुमच्या कृतीचा परिणाम तुम्हाला चुकवता येणार नाही. युवक तसेच वयस्कर लोकदेखील यहोवाच्या न्यायाखाली येतात.—रोमकर १४:१२.

३, ४. (अ) नैतिक शुद्धाचरणाचा उच्च दर्जा का राखावा? (ब) देवासोबत असणारी तुमची शुद्ध भूमिका नष्ट करावी म्हणून कोणता दबाव तुम्हावर आहे, आणि कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

३ यहोवाकडील संमतीकारक न्यायदंड केवळ सार्वकालिक जीवनाकडेच नेतो असे नव्हे तर तो सध्या देवासोबत जवळचे नाते उभारीत असतो. तथापि, तुम्ही नैतिक शुद्धाचरणाविषयी उच्च दर्जा राखला पाहिजे. स्तोत्रसंहिता २४, वचने ३ ते ५ हाच मुद्दा याप्रकारे मांडतातः “यहोवाच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानावर कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ व अंतःकरण शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावीत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो. त्याला यहोवापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल.” होय, तुम्ही नैतिक शुद्धाचरण आचरता तेव्हा तुम्ही यहोवाच्या नजरेत भरत असता.

४ पण देवाबरोबर शुद्ध भूमिका सांभाळण्याच्या बाबतीत तुम्हाला भारी दबावाखाली रहावे लागते हे नक्की. हे शेवटले दिवस आता संपण्याच्या लागास आले असताना अनैतिक वागणूक व त्याचा अशुद्ध प्रभाव या गोष्टी पीडेसारख्या बनत आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) या कारणास्तव, युवकांनी नैतिक शुद्धाचरण संभाळावे हे पूर्वी नव्हते इतके आज मोठे आव्हान बनले आहे. हे आव्हान तुम्ही यशस्वीरित्या पेलत आहात का? तुम्हाला ते पुढेही जमेल का?

तुम्हापुढील आव्हान

५. देवापुढे शुद्ध भूमिका राखून ठेवण्यामध्ये कोणता अशुद्ध प्रभाव अडथळे निर्माण करीत असतो?

५ आज करमणूकीचे माध्यम असे आहे जे चांगल्या गोष्टीना बाजूस रेटून जे अनैतिक आहे त्याला उंचावते. उदाहरणार्थ, एक भयंकर भीतीदायक व हिंसाचारी चित्रपटाचा दुसरा भाग प्रकाशित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकापैकी एकाने लिहिलेः “लैंगिक गोष्टी, खून, बीभत्सपणा या गोष्टींनी आपली मजल या दुसऱ्‍या भागात मारली आहे. या चित्रपटाने आपल्या उत्पन्‍नाचा उच्चांक गाठला तर याचा अर्थ चित्रपटाच्या अभिरुचीविषयी केवढी हिनकस पातळी आली आहे हेच दिसेल.” अशा चित्रपटांसोबत गाण्यांच्या बाबतीतही असे दिसते की, त्यातील काव्य लैंगिकतेकडे वळालेले आहे आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम देखील निषिद्ध लिंगाचाराची स्तुती गातात. “बेतालपणा” चे हुबेहुब वर्णन असणाऱ्‍या अशा गोष्टीत गढून जाऊन तुम्हाला देवापुढे शुद्ध भूमिका राखता येईल का? (१ पेत्र ४:४) एक नीतीसूत्रही असेच म्हणतेः “मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय?”—नीतीसूत्रे ६:२७.

६. आपल्या सोबत्यांकडून युवकांना कोणत्या दबावांना तोंड द्यावे लागते?

६ देवाबरोबरील शुद्ध भूमिका नष्ट करण्यासाठी आणखी एक दबाव कार्य करीत आहे व तो म्हणजे तुमचे सोबती. १७ वर्षे वयाच्या एका जगीक मुलीने शोकाने असे म्हटलेः “मी पहिल्यांदाच लैंगिक संबंध केला तो अगदी चुकीच्या कारणामुळेः एकतर माझ्या मित्राने मला गळ घातली आणि मला वाटत होते की, असा संबंध तर सर्वच आचरतात.” आपल्याला हसावे अशी कोणाचीही इच्छा नसते. इतरांना आपण आवडते व्हावे ही स्वाभाविक इच्छा आहे. पण जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राच्या नैतिक आचरणासंबंधाने आपली भूमिका स्थिर राखता तेव्हा इतर युवक तुम्हाला हसतील. यावेळी, नमते घ्यावे, आपल्या सोबत्यांकडून आपणास मान्यता मिळावी या गोष्टी तुम्हाला चुकीच्या गोष्टीचे आचरण करण्याचा दबाव आणतील.—नीतीसूत्रे १३:२०.

७. अशुद्ध प्रभावांसोबत सामना देणे युवकांना इतके का जड जाते, पण यहोवाच्या संस्थेतील हजारो युवकांनी आपल्या बाबतीत काय सिद्ध करून दाखविले आहे?

७ अशा या प्रभावांचा सामना, लैंगिक इच्छापूर्ती जोर धरते त्या “तारुण्याच्या बहर”काळात मोठा खडतर वाटतो. (१ करिंथकर ७:३६) एका संशोधक संस्थेने हे जे परिक्षण केले ते काही नवलाईचे नाहीः “वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत ज्याने वा जिने विवाहाबाहेरील लैंगिक संबंध साधला नाही ती तरुण व्यक्‍ती अपवाद अशीच म्हणावी लागेल.” तथापि, यहोवाच्या संस्थेतील तुम्हासारख्या हजारो तरुण-तरुणींनी स्वतःच्या बाबतीत अपवाद असल्याचे दाखवून दिले आहे. तुम्ही त्या आव्हानास तोंड देऊन नैतिक शुद्धाचरण राखले आहे.

८. काही ख्रिस्ती युवक जगाच्या अनैतिक प्रवृत्त्यांना का वश झाले, आणि याचा काय परिणाम दिसून आला?

८ तरीही, हे दुःखाने म्हणावे लागते की, काही ख्रिस्ती युवक जगाच्या अनैतिक प्रवृत्त्यांना वश झाले. चांगले त्यावर आपली प्रीती आहे असा त्यांचा दावा असला तरी जे वाइट आहे त्याचा ते तिरस्कार करीत नाही, किंवा पुरेसा प्रतिकार करीत नाही असे दिसते. (स्तोत्रसंहिता ९७:१०) काही प्रकरणात तर त्यांना वाइटाची आवडही दिसते. स्तोत्रसंहिता ५२:३ तेच म्हणतेः “तुला बऱ्‍यापेक्षा वाईटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे.” काही, भेटीगाठी, करमणूक व नैतिक आचरण याविषयी यहोवाच्या संस्थेकडून मिळणाऱ्‍या थेट सल्ल्याचा धिक्कार करतात. याचा परिणाम, त्यांच्यावर व त्यांच्या आईवडीलांवर लज्जा ओढवण्यात दिसतो. यामुळे ते देवाच्या नजरेतून खाली पडतात.—२ पेत्र २:२१, २२.

आव्हानाचा सामना करण्यासाठी मदत

९. नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचे आव्हान पेलण्यासाठी कशाची गरज आहे?

९ नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचे आव्हान तुम्हास कसे पेलू शकेल? हाच प्रश्‍न स्तोत्रकर्त्याने विचारला होताः “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” याचे उत्तर देताना तो म्हणालाः “तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.” (स्तोत्रसंहिता ११९:९) होय, तुम्हाला देवाच्या वचनातील मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय आमच्या प्रेमळ निर्माणकर्त्याने हे मार्गदर्शन आपल्या संस्थेकरवी देण्यात येत आहे याकडे लक्ष दिले आहे. यामुळे तुम्हाला या जगातील अशुद्ध दबावाचा प्रतिकार करण्यामध्ये मदत मिळू शकेल.

१०, ११. (अ) युवकांनी लैंगिकदृष्ट्या शुद्ध राहावे यासाठी त्यांना मदत म्हणून कोणती प्रकाशने प्रसिद्ध झाली आहेत? (ब) “यंग पीपल आस्क . . . ” या लेखमालिकेचा काहींना कसा लाभ मिळाला आहे? (क) तुम्हाला स्वतःला “यंग पीपल आस्क . . . ” या लेखमालिकेमुळे कोणता लाभ घडला?

१० युवकांना ध्यानात ठेवूनच कित्येक वर्षांपासून बरीच प्रकाशने काढण्यात आली आहेत. युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट हे त्यापैकीचे एक होय. याशिवाय १९८२ पासून अवेक! मासिकात “यंग पीपल आस्क . . . ” या लेख मालिकेने अश्‍लील चित्रे, प्रणयी कादंबऱ्‍या आणि प्रणयाराधनेतील योग्य वर्तणूक याविषयी पुष्कळ साहाय्यक मार्गदर्शन दिले आहे. या माहितीने युवकांना खरीच मदत लाभली का? एका उदाहरणाचा विचार करा. लेखमालिकेतील बऱ्‍याच लेखांनी हस्तमैथुनाविषयी चर्चा केली व हे दाखविले की, या सवयीमुळे “कामवासना” प्रदीप्त होते आणि त्याकरवी एखादा सहज लैंगिक अनैतिकतेमध्ये गुरफटू शकतो.a (कलस्सैकर ३:५) या सवयीविरुद्ध कशी लढत देता येईल तसेच दुराचरणाविषयी काय करता येईल त्याबद्दल व्यावहारिक सल्ला पुरविला गेला. या लेखांनी प्रभावीत होऊन काही युवकांनी लिहिलेः “मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून मला ही समस्या होती. आता मी १८ वर्षांचा आहे व आता या सवयीतून हळूहळू मुक्‍त होत आहे. तुम्ही प्रकाशित केलेल्या लेखांबद्दल मी तुमचा आभारी आहे.” “त्या लेखात ज्या सूचना पुरविल्या आहेत त्याचा अवलंब केल्यामुळे माझी मनःस्थिती आता बरी आहे असे मी सांगू शकतो. मला पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध व स्वच्छ वाटते.”

११ या माहितीचे वाचन व अभ्यास करण्यास वेळ लागतो, पण त्यामुळे तुम्हाला नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्यात मदत मिळते. प्रकाशित झालेल्या सर्व माहितीचा तुम्ही पूर्ण फायदा घेत आहात का? “यंग पीपल आस्क . . . ” लेखमालिकेत “सेक्स बीफोर मॅरेज—व्हाय नॉट?”b या लेखास अनुसरुन एक युवती, जी तेव्हा पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत होती तिने लिहिलेः “विवाहाबाहेरील लिंगाचारात गुरफटल्यामुळे जी वाईट, दोषी, व मत्सरी भावना जाणवू लागते ती मला चांगली ठाऊक आहे व आता मला त्याचा खूप पस्तावा वाटतो. मी आता दर दिवशी यहोवाकडे, त्याने माझा स्विकार केला आणि मला क्षमा केली याविषयी त्याचे आभार मानते. तुमचा तो लेख इतरांना, मी केले तसे त्यांनी करण्याच्या आधी निश्‍चितपणे साहाय्यक ठरेल अशी मला आशा वाटते. आता मला खरोखरी कळते की, आम्ही ‘जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे’ अशी यहोवा देवाची इच्छा का आहे.” (मराठीत प्रकाशित झालेला हा लेख आपल्याला माहितीपत्रक क्रमांक ६-३ मध्ये “तरुण लोक विचारतात . . . विवाहाआधी लैंगिक समागम—का नको?” या शिर्षकाखाली वाचावयास मिळेल.)—१ थेस्सलनीकाकर ४:३.

१२. कशामुळे तुम्हाला यहोवास संतुष्ट करण्याची मनापासूनची इच्छा वाटेल?

१२ यामुळे आपण आणखी एका गोष्टीकडे येतो, जी आम्हाला ते आव्हान यशस्वीपणे पेलण्यास मदत देऊ शकते, ती गोष्ट म्हणजे, यहोवा हा विश्‍वाचा सार्वभौम आहे व त्याची आज्ञा मानलीच पाहिजे ही रसिकता तुम्ही दाखवावी. (प्रकटीकरण ४:११) पण त्याचवेळी तो आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता आहे आणि त्याच्या मनात आम्हाविषयीचे कल्याणच आहे. (नीतीसूत्रे २:२०-२२; यशया ४८:१७) त्याने नियम देण्यामागील हेतू आम्हाला कोणत्याही बंधनात टाकावे असा नसून आमचे संरक्षण व्हावे हा आहे. तेव्हा त्याचे आज्ञापालन करणे हा सूज्ञतेचा मार्ग आहे. (अनुवाद ४:५, ६) यहोवा नैतिक शुद्धाचरणावर का भर देतो ते स्पष्ट समजल्यामुळे तुम्हाला त्यातील खरे सौंदर्य दिसेल व मग देवाला संतुष्ट करण्याची तुमची मनापासून इच्छा राहील.—स्तोत्रसंहिता ११२:१.

१३. यहोवाने व्यभिचारास मनाई करणारा जो कायदा दिला आहे तो आमच्या हितासाठी आहे याचे तुम्ही कसे स्पष्टीकरण देणार?

१३ देवाने लैंगिक आचरणाची मुभा फक्‍त विवाहापुरतीच दिली आहे व तो व्यभिचारास सक्‍त मनाई करतो हे लक्षात घ्या. (इब्रीयांस १३:४) या आज्ञेचे पालन केल्यामुळे तुमचे काही नुकसान होते का? तुमचा जीवनातील आनंद हरपला जावा असा काही नियम प्रेमळ स्वर्गीय पिता करील असे तुम्हाला वाटावे का? निश्‍चितच नाही! देवाचा नैतिक दर्जा धुडकावून लावणाऱ्‍या तुमच्या सवंगड्यांचे काय झाले ते लक्षात आणा. नको असणारी गर्भधारणा घडली गेल्यामुळे त्यांना गर्भपात करण्याकडे निरविले गेले किंवा त्यांना अकाली विवाहबद्ध व्हावे लागले. अशा कित्येक प्रकरणात हे दिसेल की, मुलाचा संभाळ पतीविना करण्याची पाळी येते. तसेच जे युवक व्यभिचार आचरतात ते ‘स्वतःच्या शरीराबाबत पाप’ करीत असतात आणि स्वतःला लैंगिकदृष्ट्या जडणाऱ्‍या आजारास सामोरे नेतात. (१ करिंथकर ६:१८) याचप्रमाणे यहोवास समर्पित असलेला युवक व्यभिचार आचरतो तेव्हा उद्‌भवणाऱ्‍या भावनिक प्रतिक्रिया विनाशकारी असतात. दोषी विवेकाचा उद्रेक दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्रास व निद्रानाश जाणवतो. (स्तोत्रसंहिता ३२:३, ४; ५१:३) यास्तव, यहोवाने व्यभिचारास मनाई करणारा कायदा दिला आहे तो तुमच्या संरक्षणासाठी आहे हे स्पष्ट होत नाही का? नैतिक शुद्धाचरण राखण्यात खराच फायदा आहे!

१४. नवयौवनातील विवाह संरक्षक असू शकतो या दाव्याविषयी आम्ही पौलाच्या १ करिंथकर ७:९ व ७:३६ मधील वचनाचा कसा दृष्टीकोन घ्यावा ते स्पष्ट करा.

१४ देवाच्या कडक नैतिक कायद्यांस चिकटून राहणे तितकेसे सोपे वाटत नाही हे खरे. आणि याचाच आधार घेऊन काही युवकांनी असा निर्वाळा घेतला की, नवयौवनातच लग्न करणे फारच बरे. ते म्हणतात की, ‘“संयम करता येत नसेल तर . . . लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे,” असे १ करिंथकर ७:९ सांगत नाही का?’ तथापि, असा हा दृष्टीकोन अपुऱ्‍या दृष्टीचा आहे. कारण पौलाने ते शब्द नवयौवनांना नव्हे तर “उपवर” झालेल्यांना उद्देशून म्हटले. (१ करिंथकर ७:३६) बहुतेक प्रकरणात हे दिसते की, नवयौवनात असणाऱ्‍या मुलामुलींची विवाहाच्या अनुषंगाने येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या व दबाव यांना तोंड देण्यासाठी भावनिक व आध्यात्मिकरित्या पुरेशी वाढ झालेली नसते. जर्नल ऑफ मॅरेज ॲण्ड द फॅमिली हे प्रकाशन कळवितेः “जे लवकर लग्न करतात त्यांनी वैवाहिक भूमिका पार पाडण्यासाठी आवश्‍यक असणारी पूर्वतयारी केलेली नसल्यामुळे त्यांना वैवाहिक समाधान कमी प्रमाणात मिळते. योग्य भूमिका पार पाडली नाही तर समाधान कमी होते आणि विवाहात अस्थिरता अधिक वाढते.” यासाठीच, नवयौवनात विवाह न करणे आणि जोपर्यंत यशस्वी विवाहासाठी आवश्‍यक असणारे गुण तुम्ही जोपासत नाही तोपर्यंत शुद्ध स्वरुपाचे सडेपण राखणे हे याचे उत्तर आहे.

स्वतःला शुद्ध ठेवा!

१५. तुम्हाला नैतिकदृष्ट्या शुद्ध रहायचे आहे तर कोणते मजबूत उपाय केले पाहिजे?

१५ प्रेषित पौलाने लिहिलेः “पृथ्वीवरील तुमचे अवयव जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना . . . हे जिवे मारा.” (कलस्सैकर ३:५) होय, मजबूत उपाय केले गेले पाहिजेत; नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचा तुमचा निर्धार असला पाहिजे. “जिवे मारणे” या क्रियापदाविषयी भाष्य करताना द एक्सपोझिटर्स बायबल कॉमेंट्री म्हणतेः “वाईट कृति वा प्रवृत्ती नुसती दाबून टाकणे वा संयमित ठेवणे याचा प्रस्ताव त्यामध्ये नाही. त्यांना काढूनच टाकले पाहिजे; जुन्या जीवनक्रमणाचे संपूर्णपणे उच्चाटन करण्यास हवे. ‘जिवे मारा’ ही संज्ञा त्यामागील जोर दाखविते. . . . क्रियापदाचा अर्थ व क्रियेचा काळ या दोन्ही गोष्टी व्यक्‍तीगत निर्धाराच्या जोरदार व पराकाष्ठेच्या प्रयत्नास सूचित करतात.”—पडताळा मत्तय ५:२७-३०.

१६. नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्यासाठी तुम्ही स्वतःला मानसिक रितीने शुद्ध ठेवण्याचा जोरदार यत्न का केला पाहिजे, आणि यात तुम्हाला कसे यश मिळवता येईल?

१६ नैतिकदृष्ट्या अशुद्ध कृती व प्रवृत्त्या यांना तुम्हाला कसे ‘जिवे मारता येईल’ किंवा ‘काढून टाकता येईल’? येशूने या समस्येच्या मुळाशीच हात घातला होता जेव्हा त्याने असे म्हटले की, “आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाइट विचार निघतात; जारकर्मे . . . व्यभिचार, लोभ.” (मार्क ७:२१, २२) लाक्षणिक अंतःकरणात विचार करण्याच्या क्षमतेचा समावेश होतो व यामुळेच त्याचा संबंध “विचारसरणी” सोबत येतो. यास्तव, तुम्हाला नैतिकदृष्ट्या शुद्ध रहायचे आहे तर मग तुम्ही मानसिकदृष्ट्या देखील शुद्ध असले पाहिजे. ते कसे? वस्तुतः इंद्रियांकरवी बुद्धी भरविली जात असल्यामुळे तुम्ही आपल्या डोळ्यांनी जे बघता त्यावर दक्षता राखली पाहिजे. याचा अर्थ लैंगिक अनैतिकतेस चित्रित करणारी वा पाठबळ देणारी पुस्तके, दूरदर्शनवरील कार्यक्रम वा चित्रपट टाळणे हा आहे. याचप्रमाणे तुम्ही आपल्या कानांनी जे ऐकता त्याविषयीही दक्षता घेतली पाहिजे, म्हणजे ज्यात लैंगिक गोष्टीना अनुलक्षून असणारे काव्य आहे अशी गीते ऐकण्याचे टाळणे. अशा या भूमिकेसाठी धैर्य लागते आणि खासपणे ते तुमच्या सोबत्यामध्ये दाखविण्यासाठी अधिकच लागणार; पण हे केल्यामुळे तुम्हाला नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्यास व स्वतःची प्रतिष्ठा राखण्यात मदत मिळेल.

१७. लैंगिक अनैतिकतेचा उच्चार सुद्धा तुम्हामध्ये का होता कामा नये?

१७ प्रेषित पौलाने आणखी अशी सूचना केलीः “पवित्र जनांना शेभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” (इफिसकर ५:३; तसेच १२ वे वचन देखील पहा.) यास्तव नैतिक अशुद्धतेच्या गोष्टींचा उच्चारदेखील नको. त्याला थट्टेचा विषयही बनवू नये. ते का? विल्यम बर्कले हे पवित्र शास्त्र प्रामाण्य म्हणतातः “एखाद्या गोष्टीविषयी बोलणे, तो थट्टा म्हणून सांगणे किंवा त्याला संभाषणात वारंवार आणणे हे बुद्धीला प्रस्ताव मांडण्यासारखे आहे आणि त्या माणसाला मग, तशी कृति आचरण्यास जवळ आणले जाते.” (याकोब १:१४, १५) यामुळेच, जेव्हा इतर युवक घाणेरडी थट्टा करतात व लैंगिक कार्याचे वर्णन करण्यासाठी वेगळी भाषा वापरतात तेव्हा खासपणे आपल्या ‘तोंडाला लगाम घालून ठेवणे’ यासाठी खरा निर्धार लागतो. (स्तोत्रसंहिता ३९:१) यामध्ये सरळ व शुद्ध राहण्यामुळे तुम्हाला यहोवाचे अंतःकरण आनंदीत करता येईल.—स्तोत्रसंहिता ११:७; नीतीसूत्रे २७:११.

१८. (अ) लैंगिक अनैतिकतेविरुद्धच्या लढतीत यशस्वी होण्यासाठी अशुद्ध विचार व भाषा यांना केवळ नकार दर्शविणे का पुरेसे नाही? (ब) पौलाने फिलिप्पैकरांना दिलेल्या सूचनेपासून तुम्हाला कसा लाभ मिळवता येईल?

१८ लैंगिक अनैतिकतेच्या विरुद्ध लढणाऱ्‍या लढतीत विजयी व्हावयाचे आहे तर नुसते अशुद्ध विचार व भाषा यांना नकार दर्शविणे पुरेसे नाही. एक चिनी म्हण म्हणतेः “मोकळे मन सर्व प्रस्तावांसाठी खुले राहते.” (पडताळा मत्तय १२:४३-४५.) आपले मन हितकारक व शुद्ध विचारांनी भरलेले असण्याविषयीची गरज पौलाने ओळखली. यासाठीच त्याने फिलिप्पैकरांना हे आर्जविलेः “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति त्यांचे मनन करा [‘या गोष्टी प्रवर्तित करण्याकडे लक्ष द्या’c].”—फिलिप्पैकर ४:८.

१९. देवाच्या वचनाचा परिश्रमी अभ्यास का करण्यास हवा, आणि यामुळे तुम्हाला नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्यास कशी मदत मिळेल?

१९ याचा अर्थ देवाच्या वचनाचा परिश्रमी अभ्यास करणे आहे. (यहोशवा १:८; स्तोत्रसंहिता १:२) ते तुमचे मन व अंतःकरण दृढ करील व यहोवासोबत जवळचे व व्यक्‍तीगत नाते बळावण्यात तुमची मदत करील. असे झाल्यास नैतिकदृष्ट्या अशुद्ध वागणुकीत सहभागी होण्याचा जो मोह समोर असेल त्यास प्रतिकार करण्याच्या भूमिकेत तुम्ही रहाल. यहोवाच्या नावाचा अपमान घडेल, तुमच्या कुटुंबाचे व मंडळीचे नाव डागळेल असे काही करण्यास तुम्ही धजणारच नाही. उलटपक्षी, तुम्हामध्ये यौवनाचा असणारा आवेश व शक्‍ती ही अशा मार्गाने वापराल की ज्याचा नंतर तुम्हाला पस्तावा वाटणार नाही. होय, तुम्ही नैतिक शुद्धाचरणाचा मार्ग अवलंबाल, कारण हेच यहोवाची सेवा करणाऱ्‍या युवकांचे खरे रुपसौंदर्य आहे!—नीतीसूत्रे ३:१-४.

[तळटीपा]

a  पहा अवेक! या मासिकाचे अंकः सप्टेंबर ८, १९८७, पृष्ठे १९-२१; नोव्हेंबर ८, १९८७ पृष्ठे १८-२०; आणि मार्च ८, १९८८, पृष्ठे २०-३.

b  अवेक! डिसेंबर ८, १९८५, पृष्ठे १०-१३.

c  द एक्सपोझिटर्स ग्रीक टेस्टमेंट.

युवकांनो—तुम्ही कशी उत्तरे देणार?

◻ तुम्ही नैतिक शुद्धतेविषयीचा उच्च दर्जा का राखण्यास हवा?

◻ देवासोबत शुद्ध भूमिका राखण्यात कोणकोणते दबाव आव्हानकारक आहेत?

◻ नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचे आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी साहाय्यक ठरतील?

◻ स्वतःला शुद्ध राखायचे आहे तर कोणते दृढ उपाय पत्करण्यास हवेत?

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

नवयौवनात असणारे बहुतेक पालकत्वाच्या जबाबदाऱ्‍या संभाळण्याच्या बाबतीत खूपच तरुण असतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा