वडीलांनो आपला विश्वस्तपणा सांभाळून ठेवा
“तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास देखरेखे करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या. यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या स्वपुत्राच्या रक्ताने मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.”—प्रे. कृत्ये २०:२८.
१. ख्रिस्ती जबाबदारीत कशाचा समावेश होतो?
यहोवा देवाने आपल्या पृथ्वीवरील संघटनेत एक अद्भूत जबाबदारी सोपविली आहे. कोणती जबाबदारी? ती कोणाकडे तरी सोपविण्यात आलेली मूल्यवान गोष्ट असते जिच्याविषयी त्याला हिशोब द्यावयाचा असतो. या ख्रिस्ती जबाबदारीत “सुवचनांचा नमुना” म्हणजे शास्त्रवचनांद्वारे दिले जाणारे सत्य तसेच “विश्वासू व बुद्धिमान दास” याद्वारे पुरविले जाणारे “यथाकाळचे अन्न” याचा समावेश आहे. (२ तीमथ्य १:१३, १४; मत्तय २४:४५-४७) या जबाबदारीत सत्याच्या अनुषंगाने असणारे सेवकपणही समाविष्ट आहे. हे मंडळीच्या आत व बाहेर पार पाडले जाते. (२ तीमथ्य ४:१-५) आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या वडीलांसह सर्व राज्य घोषकांनी या सर्वात महत्त्वपूर्ण अशा जबाबदारीचा सांभाळ केला पाहिजे.
२. वडीलांवर कोणती अधिक जबाबदारी आहे, आणि पेत्राने याविषयी काय म्हटले?
२ ख्रिस्ती वडीलांना या जबाबदारीत आणखी एक जबाबदारी समाविष्ट आहे, ती आहे, देवाच्या कळपाची राखण करण्याची जबाबदारी. याविषयी प्रेषित पेत्राने लिहिलेः “तुम्हातील वडील मंडळीला, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होणाऱ्या गौरवाचा विभागी, तो मी बोध करतोः तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभानेही नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिम्मतीच्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हाल असे करा. मग मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.”—१ पेत्र ५:१-४.
३. ख्रिस्ती वडीलांनी कशाचा उगम असले पाहिजे?
३ ख्रिस्ती वडीलांनी “वाऱ्यापासून आसरा, वादळापासून निवारा, रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया” असल्याचे दिसून आले पाहिजे. (यशया ३२:१, २) याचा अर्थ हा की, वडीलांनी सुरक्षितता, शांती तसेच देवाच्या मेंढरासमान सेवकांच्या कळपाचे स्थैर्य टिकवणारे उगम असल्याचे दिसले पाहिजे. कळपाच्या वडीलांपासून किंवा सहमेंढपाळापासून “फार मागण्यात येईल,” कारण त्यांच्याजवळ “फार ठेवले आहे.” (लूक १२:४८) यामुळे त्यांच्यापाशी बहुमोल असा विश्वस्तपणा आहे जो त्यांनी सांभाळण्यास हवा.
तुम्हाला का सोपविण्यात आला?
४. इतक्या वडीलांची का गरज आहे?
४ आज जगभर यहोवाच्या साक्षीदारांच्या ६३,००० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत. यामुळे देवाच्या कळपाची काळजी करण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या लायक असणाऱ्या हजारो लोकांची गरज आहे. प्रत्येक देशात वडीलांचा वर्ग आहे हे एक आनंदाचे कारण आहे. जगभर सरासरी ६० प्रचारकांची एक मंडळी आहे. यामुळे वडीलांना खूप काम करायचे आहे.—१ करिंथकर १५:५८.
५. कोणा पुरुषाला वडील या नात्याने सेवा करण्याचा हक्क कोणकोणत्या आधारामुळे दिला जातो?
५ तुम्ही वडील आहात, तर हा आशीर्वादित हक्क तुम्हाला का मिळू शकला याचा तुम्ही विचार केला आहे का? कारण तुम्ही काही गोष्टींची पूर्ति केली आहे. उदाहरणार्थ, देवाच्या वचनाचा तुम्ही परिश्रमी अभ्यास केला आहे. (यहोशवा १:७, ८) तसेच तुम्ही प्रचारकार्यात आवेशाने भाग घेतलेला आहे आणि इतरांनाही राज्याचे घोषक बनण्याची मदत दिली आहे. पात्रतेविषयी तुमची ‘पूर्वीच परिक्षा झाली’ असल्यामुळे तुम्ही उपाध्य सेवक या नात्याने विश्वासूपणे काम केले. मग, तुम्ही, देखरेख्याचे काम करणे म्हणजे ‘चांगल्या कामाची इच्छा धरणे’ हे जाणून वडील बनण्याच्या पात्रतेचे होण्यासाठी प्रयत्न केला, किंवा ‘पोहंचण्याचा प्रयत्न’ केला. (१ तीमथ्य ३:१, १०) तीमथ्याप्रमाणे, तुम्हीही ‘बंधुवर्गाकडून नावाजलेले’ झाला होता. (प्रे. कृत्ये १६:२) तुमची वडील म्हणून शिफारस करण्यात आली तेव्हा तुम्ही कदाचित विशीच्या उत्तरार्धातील किंवा त्यापेक्षाही अधिक वयाचे व जीवनाचा अनुभव संपादलेले होता. मंडळी तुम्हाविषयी आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ असणारा माणूस, संपर्क साधता येणारा, परामर्श देणारा तसेच प्रभावी शास्त्रवचनीय सूचना प्रदान करणारा आणि गोपनीय गोष्टींची गुप्तता राखणारा या अर्थी तुमचा आदर करू लागली असावी.—नीतीसूत्रे २५:९, १०.
आपला विश्वस्तपणा कसा संभाळावा?
६, ७. वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा सांभाळून ठेवण्यासाठी १ तीमथ्य ४:१३-१५ कोणती सूचना देते?
६ होय, तुम्ही आता वडील आहात तर निश्चितच सबळ कारणांसाठीच ख्रिस्ती देखरेखीची जबाबदारी तुम्हाला देण्यात आली. तेव्हा तुम्हाला केवढे भारावल्यासारखे वाटले असेल! पण हा विश्वस्तपणा तुम्हाला कसा सांभाळता येईल?
७ आपल्या कर्तव्यांविषयी सरळ दृष्टीकोण राखून ते परिश्रमाने पार पाडणे हा वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा सांभाळण्याचा एक मार्ग आहे. यहोवाच्या संस्थेमध्ये आम्हाला विविध रुपाच्या नेमणूका आहेत. यास्तव आपले स्थान सांभाळा आणि स्वतःला ‘कनिष्ठ असे समजून’ वागवण्यात समाधानी राहा. (लूक ९:४६-४८; पडताळा शास्ते ७:२१.) आपल्या हक्काची जोपासना करीत राहा, तसेच ‘आपला हात राखून काम करू नका.’ (नीतसूत्रे १०:४) एकाच जागी स्तब्ध राहू नका, पण यहोवाच्या मदतीने सेवकपणाच्या सर्व प्रकारांमध्ये आपली प्रगती करीत राहा. खरे म्हणजे, पौलाने तीमथ्याला दिलेली ही सूचना अनुसराः “वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुजवर वडीलवर्ग हात ठेवत असताना संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नको. तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. यात गढून जा.”—१ तीमथ्य ४:१३-१५.
८. सबळ सूचना प्रदान करण्यासाठी तसेच सभांमध्ये आध्यात्मिक दृष्टीने समृद्ध गोष्टी देण्यासाठी काय वडीलांना मदत देऊ शकेल?
८ आपल्या व्यक्तीगत अभ्यासाचा चांगला व प्रतिफळदायक आराखडा राखण्याची खात्री ठेवा. वडील या नात्याने तुम्ही सबळ शास्त्रवचनीय सल्ला द्यावा ही तुम्हाबाबतीत अपेक्षा असते. ही जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही सबंध पवित्र शास्त्राचे अधिक वेळा मननपूर्वक वाचन केले आहे का? (नीतीसूत्रे १५:२८) तसेच तुमच्या व्यासपिठावरील नेमणूकांविषयी काय? त्यांची चांगली तयारी करा, यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा म्हणजे आमच्या सभांना उपस्थित असणाऱ्या बांधवांना तुम्हाला काहीतरी देता येईल. खासपणे वडीलांनी ‘उन्नतीकरता जे काही उपयुक्त तेच मात्र बोलावे, त्याद्वारे ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त होईल.’—इफिसकर ४:२९; रोमकर १:११.
९. दुसरे तीमथ्य ४:२ नुसार वडीलाने काय करण्यास हवे?
९ वडील असल्यामुळे पौलाची ही सूचना कृपया ग्रहण कराः “वचनाची घोषणा कर. सुवेळी, अवेळी तयार राहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव. वाग्दंड कर व बोध कर.” (२ तीमथ्य ४:२) पौलाला धर्मत्यागाविषयी चिंता लागून होती, कारण मंडळीतील काही लोक “शब्दयुद्ध” करीत होते व ते “रिकाम्या वटवटी”त गुंतले होते आणि ‘सत्याविषयी चुकले’ होते. (२ तीमथ्य २:१४-१८, २३-२५; ३:८-१३; ४:३, ४) मंडळीकरता सुवेळ असला किंवा अवेळ असला तरीही तीमथ्याने ‘वचनाची घोषणा करा’यची होती. यामुळे सहविश्वासू जनांना धर्मत्यागाचा प्रतिकार करण्याची बळकटी मिळणार होती. याचप्रमाणे, वडीलांनीही अंतर्यामी शिरणारे देवाचे वचन किंवा त्याच्या संदेशाचा प्रचार केला पाहिजे, तो अंतःकरणात शिरुन यहोवाच्या दर्जांना चिकटून राहण्याचे प्रोत्साहन देतो.—इब्रीयांस ४:१२.
१०. कुटुंबातील सदस्य तसेच इतरांसोबत वडीलाने नियमित कार्य का केले पाहिजे?
१० वडीलाने अधिकाराने बोलावयाचे आहे तर मग त्याने देवाच्या वचनाच्या सहमतात आपले जीवन व्यतित केले पाहिजे. त्याने नुसतेच मंडळीत व्यासपीठावरुन ‘वचनाची घोषणा’ केली तर तो आपला विश्वस्तपणा सांभाळीत नसल्याचे दिसून येईल. याच संदर्भात पौलाने तीमथ्याला हे आर्जविले होतेः “सुवार्तिकाचे काम कर.” वडीलाने ‘सोपविलेली सेवा पूर्ण कर’ण्यासाठी त्याने देवाच्या वचनाचा “चार लोकात व घरोघरी” प्रचार केला पाहिजे. (२ तीमथ्य ४:५; प्रे. कृत्ये २०:२०, २१) यासाठीच, आपल्या कौटुंबिक सदस्यांबरोबर मिळून क्षेत्रकार्य करा. यामुळे तुमचे व तुमच्या पत्नीचे आध्यात्मिक बंधन अधिक दृढ होऊन तुमच्या मुलांना मोठा लाभ मिळू शकेल. तसेच मंडळीतील इतर सदस्यांसोबत कार्य करण्यासाठी काही वेळ द्या. यामुळे आध्यात्मिक बंध बळकट होऊन बंधुप्रेम वाढीस लागते. (योहान १३:३४, ३५) अर्थात, आपल्या अमूल्य वेळेचे नियोजन कुटुंब तसेच मंडळीमध्ये करण्यासाठी वडीलाने समतोल राखला पाहिजे. समंजसपणा त्यांना या कामात मदत देईल. यामुळे एका गोष्टीला अधिक वेळ तर दुसऱ्याकडे दुर्लक्ष व अनिष्ट परिणाम हे टाळता येईल.
११. शिक्षक या अर्थी आपली क्षमता अधिक वाढविण्यासाठी वडीलाने का परिश्रम घेतले पाहिजे?
११ वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा सांभाळायचा असल्यास शिक्षक या अर्थी आपली क्षमता अधिक वाढविण्यासाठी परिश्रम घ्या. “शिक्षक आहे त्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे,” असे पौल म्हणाला. (रोमकर १२:७, ८) एखादा शिक्षक बोध करण्यास उभा असल्यामुळे इतरांना त्याच्याकडून बऱ्याच गोष्टींची अपेक्षा धरता येईल. कोणा वडीलाने शिक्षण देण्यात गंभीर चूक केली व यामुळे कोणी बांधव समस्येत गुरफटला तर यामुळे वडील देवाकडील न्यायास पात्र ठरेल. होय, शिक्षकांना “अधिक दंड” मिळेल. (याकोब ३:१, २; मत्तय १२:३६, ३७) यास्तव, वडीलाने देवाच्या वचनाचा गंभीर अभ्यास करून त्याचा आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे. यामुळे त्यांचे शास्त्रवचनीय शिक्षण व सोबत असलेला व्यक्तीगत अनुभव याचा इतर समविश्वासू बांधवांना लाभ मिळू शकेल. मंडळीचे अहितकारी प्रभाव व धर्मत्याग यापासून रक्षण केले जाईल.
खाचखळगे टाळणे
१२. वॉचटावर मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेली कोणती सूचना वडीलांना जिभेचा अयोग्य वापर करण्याचे टाळण्यामध्ये मदत देईल?
१२ याचप्रमाणे विविध खाचखळगी टाळून वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा सांभाळा. यापैकी एक गोष्ट, शिक्षक म्हणून जिभेचा गैरवापर टाळणे. याविषयी किती दक्षता बाळगण्याची गरज आहे हे यहोवाच्या संस्थेने बऱ्याच काळाआधी दाखविले आहे. उदाहरणार्थ, वॉचटावर मासिकाने आपल्या मे १५, १८९७ च्या अंकात याकोब ३:१-१३ ची चर्चा केली व खासपणे वडीलांविषयी असे म्हटलेः “त्यांनी वक्तृत्वपूर्ण जिव्हा राखल्यास ते आशीर्वादांचे माध्यम ठरेल व यामुळे अधिक लोकांना प्रभुकडे, सत्याकडे व धार्मिकतेच्या मार्गाकडे निरवण्यात येईल. पण उलटपक्षी, ही जिव्हा चुकांनी दूषित झाल्यास तिजमुळे बऱ्याच अकथित इजा निर्माण होतील—विश्वास, नैतिकता व सत्कार्ये यांना इजा. ज्यांच्यापाशी शिक्षण देण्याची देणगी आहे त्यांच्यावर देव व मानव यांच्यासमोर वाढती जबाबदारी आहे हे खरे आहे. . . . यास्तव ज्या मुखातून ईश्वरी वचनाच्या जलाचा स्रोत वाहतो व त्यामुळे आशीर्वाद, तजेला व बळकटी प्रदान होते, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, कडू पाणी, खोटी तत्त्वे ही शाप व इजा आणतात; ती देवाची निंदा व त्याच्या वचनांचा विपर्यास करतात. त्यामुळे अशा गोष्टी संभाषणाच्या माध्यमात येता कामा नये. मंडळीमध्ये सभांसाठी जे पुढारी नेमले जातात त्यांच्याविषयी येथे देण्यात आलेली ‘जिव्हे’विषयीची गुणवत्ता दुर्लक्षिली जाऊ नये. कोपिष्ठ जिव्हा निवडू नये; सौम्य, सभ्य, जिभेला ‘ताब्यात ठेवणारे’ आणि ‘देवाची महत्कृत्ये सांगणारे’ यांचीच जिव्हा निवडण्यात यावी.” तर मग, वडीलाने आपल्या जिभेचा वापर योग्यपणे करावा हे किती योग्य आहे!
१३. वडीलांनी मनोरंजनाविषयी कोणती दक्षता घ्यावी?
१३ मनोरंजनाचा अतिरेक हा खाचखळगा देखील टाळला पाहिजे. मनोरंजनाने तजेला आणला पाहिजे व उभारणी केली पाहिजे, थकवा निर्माण करून ख्रिश्चनाला विचलीत बनवता कामा नये. याचप्रमाणे देखरेख्याने “सवयीत नेमस्त” असावयास हवे. (१ तीमथ्य ३:२) मनोरंजनात नेमस्तपणा असल्यास ते तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करील आणि तुमचे मंडळीला चांगले उदाहरण राहू शकेल. असे दिसले की तुमचे समविश्वासू बांधव आठवड्याच्या शेवटी क्षेत्रकार्यात मोठ्या परिश्रमाने सहभाग घेत आहेत व तुम्ही मात्र दर खेपेला मनोरंजनाकडे धावत आहात तर हे चांगले उदाहरण ठरणार नाही. सुवार्तेचा प्रचार झालाच पाहिजे व वडीलांनी या कामात आवेशी राज्य घोषक या अर्थाने नेतृत्व करण्यास हवे.—मार्क १३:१०; तीत २:१४.
१४. (अ) लैंगिक अनैतिकतेविरुद्ध वडीलांनी दक्ष राहिले पाहिजे याचे विदारण कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे करतात? (ब) कोणा आध्यात्मिक भगिनीस मदत देण्याविषयी वडीलाने वारंवार देण्यात आलेल्या कोणत्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये?
१४ लैंगिक अनैतिकता हा आणखी एक खाचखळगा टाळण्यास हवा. आज सैतान देवाच्या लोकांची सचोटी भंगविण्याचा खूप प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोहपाशांविषयी वडीलांनी प्रतिकार दर्शविला नाही तर या जगाच्या नैतिक अधोगतीची कीड त्यांनाही लागेल. (पडताळा मत्तय ४:१-११; ६:९, १३.) संदेष्टा बलाम याने इस्राएलांविरुद्ध शाप उच्चारण्याचा खूप प्रयत्न केला पण यात तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याने ही युक्ती सुचविली की, इस्राएलांना लैंगिक भक्ती करण्यासाठी उद्युक्त केल्यास यहोवाच त्यांना शाप देईल. यामुळे बलामने मवाबी राजा बालाक याला ‘इस्राएलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करणे हे अडखळण ठेवण्यास शिकवले.’ इस्राएलांना हा पाश टाळता आला का? नाही. कारण त्यांनी मवाबी स्त्रियांसोबत अनैतिक संबंध केले व त्यांच्या देवांपुढे दंडवत घातल्यामुळे यहोवाचा कोप होऊन २४,००० इस्राएलांचा संहार झाला. (प्रकटीकरण २:१४; गणना २५:१-९) याचप्रमाणे, ‘देवाच्या मर्जीस उतरलेला’ दावीद देखील लैंगिक अनैतिकतेच्या आहारी गेला हे लक्षात आणा. (१ शमुवेल १३:१४; २ शमुवेल ११:२-४) तेव्हा, “विश्वासू कारभारी” याने वेळोवेळी जो सल्ला दिला आहे तो वडील या नात्याने ग्रहण करा की, कोणाही आध्यात्मिक बहिणीस एकाकी असताना सल्ला वा मदत देऊ नये, तर आपली जबाबदारी पूर्ण करतेवेळी सोबत आणखी एक वडील तेथे उपस्थित असू द्यावा.—लूक १२:४२.
१५. जडवादाच्या खळग्यात पडण्यापासून वडीलांचे कुटुंब त्यांना कशी मदत करू शकेल?
१५ जडवाद हा आणखी एक खाचखळगा आहे जो वडीलाने टाळावा. यहोवा पुरेशी तरतुद करू शकतो हे जाणून आवश्यक गोष्टीतच तृप्त राहावे. (मत्तय ६:२५-३३; इब्रीयांस १३:५) आपल्या कुटुंबाला काटकसरी असण्याची तालीम द्या; कारण उधळपट्टी ही वेळेची तसेच मिळकतीची चोरी करते; वस्तुतः या दोन्ही गोष्टी कुटुंबाच्या मदतीसाठी, क्षेत्रकार्यात सहभागी होण्यासाठी, मंडळीची बळकटी करण्यासाठी आणि राज्य आस्था वाढीस लावण्यासाठी वापरता येऊ शकतात. कुटुंबाने या बाबतीत सहकार्य दिल्यास आणि खरीच गरज नाही अशा वस्तुंची त्यांनी मागणी करण्याचा दबाव टाळला तर ते वडीलांना खरेच लाभदायक होईल. खरे पाहता, “बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून यहोवाचे भय बाळगणे हे बरे.”—नीतीसूत्रे १५:१६.
‘स्वतःकडे लक्ष द्या’
१६. पौलाने इफिसच्या देखरेख्यांना कोणता सल्ला दिला होता?
१६ वडीलांना आपला विश्वस्तपणा सांभाळायचा आहे तर मग, त्यांनी पौलाने इफिसच्या वडीलांना दिलेला सल्ला अनुसरण्यास हवा. त्याने त्यांस सांगितलेः “तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास देखरेखे करून ठेविले त्या सर्वांकडे लक्ष द्या. यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या स्वपुत्राच्या रक्ताने मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांस आपल्यामागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. यास्तव सावध असा, आणि मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रु गाळीत प्रत्येकास बोध करणे थांबविले नाही याची आठवण करा.”—प्रे. कृत्ये २०:२८-३१.
१७, १८. वॉचटावर मासिकात सुमारे ८२ वर्षांआधी दिलेली कोणती सूचना आजही ख्रिस्ती वडीलांना लागू होणारी आहे?
१७ साधारण ८२ वर्षांआधी द वॉचटावर मासिकाने (मार्च १, १९०९) पौलाने सह वडीलांना वर देण्यात आलेल्या सूचनेचे अवतरण घेतले व पुढे म्हटलेः “वडीलांनी सर्वत्र खास दक्षता घेण्यास हवी; कारण प्रत्येक परिक्षेत अधिक कृपा पावलेले व प्रमुख यांना सर्व बाजूंनी घेरले जाणार व दंडही मिळू शकतो. या कारणामुळे [याकोब] हे आर्जवितो, ‘माझ्या बंधूनो, तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका, कारण तुम्हास माहीत आहे की, आपणास अधिक दंड होईल.’ या कारणामुळे आम्ही अंतःकरणाच्या शुद्ध व निस्वार्थ वडीलांना हा बोध देतो की, मानवजातीविषयीचे प्रेम व सदिच्छा याशिवाय इतर काही गोष्टी धरू नका. तसेच त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याची फळे व कृपा यांनी भरुन जावे. कळपाकडे लक्ष द्यावे. कळप हा प्रभूच्या मालकीचा आहे हे ध्यानात ठेवा. तुम्हाला प्रभुविषयी तसेच कळपातील सदस्यांविषयीची जबाबदारी आहे. तुम्हाला त्यांच्या जिवांची (आस्थांची) काळजी घ्यायची आहे आणि मोठ्या व प्रमुख मेंढपाळाला हिशेब द्यायचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. सर्व गोष्टींमध्ये प्रेम हेच महत्त्वपूर्ण आहे आणि तत्त्वांकडे दुर्लक्ष न करता प्रभुच्या आत्म्याची वाढ त्याच्या शरीराच्या विविध सदस्यांमध्ये कशी करता येईल याकडे खास लक्ष द्या. यासाठी की, त्यांना ‘प्रकाशाच्या पुत्रांच्या वतनाची प्राप्ती घडावी.’ या दुष्ट काळी अडखळू नका तर ईश्वरी इच्छेनुरुप सर्व काही करून ख्रिस्तामध्ये, त्याचे शरीर, त्याचे सभासद, त्याचे सह-यज्ञार्पित लोक, त्याचे सहवारीस असे पूर्णपणे दृढ उभे राहा.”
१८ त्या आरंभाच्या काळी यहोवाची संस्था हिची परिस्थिती व समज याच्या अनुषंगाने ते शब्द आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या वडीलांना व समविश्वासू बांधवांना उद्देशून लिहिण्यात आले होते. पण तीच सूचना केवढ्या सार्थपणे आज लागू होते! वतनदारीची आशा स्वर्गीय किंवा पार्थिव असली तरी ख्रिस्ती वडीलांनी आपणा स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे, विश्वस्तपणा सांभाळला पाहिजे, आणि देवाच्या कळपाच्या आस्थांची प्रेमळपणे काळजी घेतली पाहिजे.
विश्वस्तपणा सांभाळल्यामुळे आनंद परिणामित होतो
१९, २०. वडीलांनी आपला विश्वस्तपणा सांभाळला तर आनंद परिणामित होतो असे का म्हणता येते?
१९ ख्रिस्ती वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा सांभाळल्यामुळे आनंद—अंतःकरणपूर्वक समाधान—मिळत राहाते. गंभीर जबाबदाऱ्या चांगलेपणाने पूर्ण केल्यामुळे समाधान लाभते. यास्तव दक्ष, प्रार्थनाशील व परिश्रमी राहा. वडील या नात्याने आपला विश्वस्तपणा संभाळा आणि अशा काळाकडे बघत राहा जेव्हा तुम्हाला सचिवाची दऊत असणाऱ्या माणसाप्रमाणेच हे कळवता येईलः “तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे.”—यहेज्केल ९:३, ४, ११.
२० होय, वडील असे निष्ठावंत राहा, म्हणजे नोहाविषयी सांगण्यात आले होते तेच तुम्हाबाबतीत देखील म्हणता येईल की, ‘तुम्हीही त्याचप्रमाणे केले.’ (उत्पत्ती ६:२२) अशा परिश्रमी सेवेमुळे मंडळीचा पुष्कळ मार्गांनी फायदा होतो. याखेरीज, बळकट व क्रियाशील मंडळ्यांकरवी, त्यामधील विश्वस्तपणा राखणाऱ्या विश्वासू वडीलांच्या सेवेद्वारे यहोवाचे गौरव होते. तथापि, तुम्हाला “शाब्बास, भल्या विश्वासू दासा!” असा शेरा मिळवून घ्यायचा आहे तर आणखी एका गोष्टीची गरज आहे. (लूक १९:१७) वडील या नात्याने तुम्ही देवाच्या कळपास ममतेने वागविले पाहिजे.
तुम्ही काय म्हणाल?
◻ ख्रिस्ती वडीलांना कोणती अधिक जबाबदारी आहे?
◻ आपली विश्वस्तता सांभाळण्यासाठी वडीलांना कोणती सरळ पावले घेता येतील?
◻ आपल्या विश्वस्ततेचे रक्षण करण्यासाठी वडीलांनी कोणती खाचखळगी टाळावीत?
◻ वडीलांनी आपला विश्वस्तपणा सांभाळल्यास आनंद का परिणामित होतो?
[१२ पानांवरील चित्रं]
ख्रिस्ती वडीलांनी “वादळापासून निवारा” यासारखे होण्यास हवे
[१४ पानांवरील चित्रं]
वडील या नात्याने आपल्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत तसेच इतरांसोबत नियमितपणे क्षेत्रकार्यात सहभाग घ्या
[१५ पानांवरील चित्रं]
तुम्ही वडील या नात्याने आपली विश्वस्तता सांभाळल्यास मंडळीला त्याचा अनेक मार्गांनी लाभ मिळतो