येशूचे जीवन व उपाध्यपण
दुरात्मा लागलेला मुलगा बरा होतो
हर्मोन डोंगरावर येशू, पेत्र, याकोब व योहान असता खाली इतर शिष्यांपुढे एक समस्या आली आहे असे दिसते. परतत असताना येशू ते पाहतो व काही तरी बिनसले आहे हे त्याच्या लक्षात येते. त्याच्या शिष्यांसभोवती लोकांचा समुदाय गोळा झालेला आहे व शास्त्री त्यांच्याबरोबर वाद घालीत आहेत. येशूला पाहून लोकांना आश्चर्य वाटते व ते त्याला भेटण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतात. तो विचारतोः “ह्यांच्याबरोबर तुमचा कसला वाद चालला आहे?”
जमावातून एक माणूस पुढे येतो व येशूपुढे तो गुडघे टेकून त्याला स्पष्टीकरण देतोः “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आलो, ह्याला मुका आत्मा लागला आहे. ह्याच्या तोंडाला फेस येऊन तो निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु तो त्यांना काढता येईना.”
यास्तव, ते शास्त्री लोक त्या मुलाला बरे करण्यात शिष्यांना आलेल्या अपयशाची चेष्टा करीत आहेत व त्यांच्या प्रयत्नांचा उपहास करीत आहेत हे स्पष्ट आहे. आणि या आणीबाणीच्या क्षणीच येशूचे आगमन होते. तो म्हणतोः “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हाला वागवून घेणार?”
येशूने हे बोलणे सर्वांना उद्देशून केले असावे, पण ते खासपणे शास्त्र्यांना अनुलक्षून आहेत, कारण ते त्याच्या शिष्यांना त्रास देत होते. पुढे येशू त्या मुलाबद्दल म्हणतोः “त्याला माझ्याकडे आणा.” पण तो येशूकडे येत असता, त्याला लागलेला दुरात्मा त्याला जमिनीवर आपटतो व त्याला फेंफरे येतात. तो जमिनीवर लोळू लागतो व त्याच्या तोंडाला फेस येतो.
“ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” येशू विचारतो.
“बाळपणापासून.” त्याचा बाप म्हणतो. “ह्याचा नाश करावा म्हणून त्याने [दुरात्म्याने] ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले.” आता बाप विनंती करून म्हणतोः “आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला साहाय्य करा.”
कदाचित पुष्कळ वर्षापासून हा बाप मदतीसाठी शोध घेत असल्याचे दिसते. आणि आता शिष्यांना आलेल्या अपयशामुळे तर त्याची अधिक निराशा झालेली आहे. त्या माणसाची ती निराशा बघून येशू त्याला प्रोत्साहनदायकपणे बोलतोः “‘शक्य असेल तर,’ असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्यास सर्व काही शक्य आहे.”
“माझा विश्वास आहे,” बाप लगेच मोठ्याने ओरडून सांगतो. तो पुढे विनंती करतोः “माझ्या विश्वासाची उणीव घालवून टाका.”
लोकसमुदाय आपणाकडे धाव घेऊन येत आहे हे बघून येशू त्या दुरात्म्याला दटावतोः “अरे मुक्या, बहिऱ्या दुरात्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातुन नीघ व पुन्हा याच्यात शिरू नकोस.” तो दुरात्मा निघत असता तो मुलाला परत ओरडायला लावतो, व त्याला पिळवटून टाकतो. मुलगा जमिनीवर निपचित पडून राहतो. लोक म्हणतातः “मुलगा मेला.” पण येशू त्याला हात धरून उठवतो व तो उभा राहतो.
पूर्वी शिष्यांना सुवार्ता प्रचारासाठी पाठवले होते तेव्हा त्यांनी भूते काढली होती. त्यामुळे घरात गेल्यावर शिष्य त्याला एकांती विचारतातः “आम्हाला ते का काढता आले नाही?”
त्यांच्याजवळील विश्वासाच्या अभावाचा उल्लेख करून येशू म्हणतोः “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही.” या संदर्भातील या विशेष प्रबळ दुरात्म्याला घालविण्यासाठी तयारीची जरुरी आहे हे दिसून येते. येथे, देवाला त्याच्या सामर्थ्यासाठी विनंतीपूर्वक केलेल्या प्रार्थनेसह बळकट विश्वासाची गरज होती.
मग, येशू म्हणतोः “मी तुम्हास खचित सांगतो की, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.”
विश्वास हा किती सामर्थ्यशाली असू शकतो! यहोवाच्या सेवेत आमची प्रगति, शब्दशः अचल पर्वताप्रमाणे पार करण्यास कठीण वाटणाऱ्या अडथळ्यांनी व समस्यांनी थांबू शकेल. पण येशू म्हणतो की, आपण आपल्या अंतःकरणात विश्वासाचे बीजारोपण केले, त्याला पाणी घातले व त्याची वाढ केली तर परिपक्वतेचा विस्तार होऊन पर्वतप्राय अडथळ्यांवर व समस्यांवर आपण विजय मिळवू शकू.” मार्क ९:१४–२९; मत्तय १७:१९, २०; लूक ९:३७-४३.
◆ हर्मोन डोंगरावरुन परतल्यावर येशूला कोणती परिस्थिती आढळून येते?
◆ दुरात्मा लागलेल्या मुलाच्या बापाला येशू कोणते उत्तेजन देतो?
◆ दुरात्म्याला घालवून देणे शिष्यांना का जमले नाही?
◆ विश्वास किती सामर्थ्यवान होऊ शकतो असे येशू दाखवतो?