सुखावह नंदनवनामध्ये भव्य मानवी संभाव्यता
“देवाने त्यांस आशीर्वाद दिला; देव त्यांस म्हणालाः ‘फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.’”—उत्पत्ती १:२८.
१, २. मानवास काय मिळावे म्हणून देव प्रेमळपणे काम करीत आहे, आणि त्याने आदामाला कोणते काम सोपून दिले?
“देव प्रीती आहे.” असे आपणाला पवित्र शास्त्रात सांगण्यात आले आहे. तो मानवजातीविषयी प्रेमळ व निस्वार्थ स्वरुपाची आस्था बाळगून आहे आणि तिने सुखावह नंदनवनामध्ये आरोग्यदायी व शांतीपूर्ण जीवनाचा सातत्याने अनुभव घेत राहावा यासाठी तो सतत कार्यरत आहे. (१ योहान ४:१६; पडताळा स्तोत्रसंहिता १६:११.) पहिला मानव, परिपूर्ण आदामाचे जीवन शांतीमय होते व त्याला मनोरंजक तसेच आनंद देणारे काम होते. मानवाच्या निर्मात्याने त्याला सुंदर एदेन बागेची मशागत करण्याचे काम नेमून दिले होते. परंतु आता, त्या निर्मात्याने मानवाला आणखी एक, खासप्रतीचे काम दिले. ते आव्हानदायक काम होते. हे आपल्याला, जे घडल्याचे अहवालात नमूद आहे त्यावरून कळते. तो वृत्तांत असाः
२ “यहोवा देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडिल्यावर आदाम त्यांस कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याजकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांस नावे दिली.”—उत्पत्ती २:१९, २०.
३. आदाम तसेच प्राणीवर्ग यांना आपसात एकमेकांची भीती का नव्हती?
३ मानवाने घोड्याला सुस, बैलाला शोहर्, मेंढराला सेह, शेरडास ʽएझ, पक्ष्याला ʽओहफ, कबुतराला योह․नाहʹ, मोरास तुक्कीʹ, सिंहाला ʼआर․येह किंवा ʼआरीʹ, अस्वलास डोव, माकडास कोहफ, कुत्र्याला केʹलेव, सर्पाला ना․चाशʹ, इ. नावे दिली.a तो एदेनातून वाहणाऱ्या नदीकडे गेला तेव्हा त्याला त्यामध्ये मासे दिसले. त्याने माशांना दा․गाहʹ असे नाव दिले. स्वतःपाशी संरक्षणाची शस्त्रे नसलेल्या या मानवाला पाळीव किंवा वन्य प्राण्यांची, किंवा पक्ष्यांची भीती वाटली नाही; तसेच यांनाही मानवाची भीती वाटली नाही. आपणापेक्षा मानव हा श्रेष्ठ, उच्च प्रतीचे जीवन जगणारा आहे असे प्राण्यांनी उपजतपणे ओळखले होते. हे देवाने निर्माण केलेले प्राणी होते व यांनाही देवानेच जीवन दिले होते; तेव्हा यांना इजा करावी किंवा त्यांचे जीवन हिरावून घ्यावे अशी इच्छा मानवाला नव्हती.
४. आदामाने सर्व प्राणी व पक्षी यांना जी नावे दिली त्याविषयी आपल्याला कोणते अनुमान काढता येईल, आणि त्याला यात कशाप्रकारचा अनुभव आला असावा?
४ अशाप्रकारे, मानवाला हे सर्व प्राणी म्हणजे पाळीव, वन्य प्राणी तसेच आकाशतील पाखरे यांना दाखविण्याचा कार्यक्रम किती काळ चालला ते अहवाल आपल्याला सांगत नाही. ते सर्व ईश्वरी मार्गदर्शन व व्यवस्थेनुरुप पार पडले. बहुधा आदामाने प्रत्येक वेगवेगळ्या प्राण्याचा अभ्यास केला असावा, त्या प्राण्याची उपजतबुद्धी कशी आहे तसेच त्याची घडण कशी आहे याचे त्याने निरिक्षण केले असावे व मग त्याला सुयोग्य दिसणारे नाव त्याने त्याला दिले. याचा अर्थ यासाठी बराच काळ गेला असावा. तद्वत, तो आदामासाठी मोठा थरारक अनुभव होता यात शंका नाही, कारण पृथ्वीवरील विविध जातीच्या प्राणीवर्गाची ओळख त्याला करून घ्यावी लागली, या जातीतील फरक ओळखण्यासाठी आपले बुद्धीचातुर्य तसेच नामांकन करण्यासाठी योग्य ती शब्दावली निवडावी लागली.
५-७. (अ) आता कोणते प्रश्न बहुधा उद्भवण्याची शक्यता आहे? (ब) याविषयी उत्पत्ती १:१-२५ मधील निर्मितीच्या अहवालात कोणत्या प्रकारची उत्तरे देण्यात आली आहेत?
५ तथापि, या सर्व प्राण्यांच्या निर्मितीचा क्रम कसा होता? पक्ष्यांच्या निर्मितीआधी जमिनीवरील प्राणी निर्मिले गेले वा नाही, आणि या सर्व कनिष्ठ प्राण्यांच्या अनुषंगाने वेळेच्या व क्रमाच्या बाबतीत मानव कोठे बसतो? अशा या विविध प्राणी-जीवनासाठी देवाने पृथ्वीचा पृष्ठभाग कसा घडवला, तसेच हवामान कसे योग्य राखले की ज्यामुळे पक्षी आकाशात उंचावर भ्रमण करू शकले; याशिवाय त्याने पिण्यासाठी पाणी, अन्नासाठी भाजीपाला कसा निर्माण केला? तसेच दिवसास उजळावे यासाठी मोठी ज्योत आणि रात्र सुंदर करण्यासाठी लहान ज्योत त्याने कशी बनविली? वातावरण इतके सौम्य व उबदार कसे राहू शकले की, ज्यामुळे मानवाला काम करणे, विश्रांती घेणे हे तो विवस्त्र असतानाही जमू शकले?
६ या सर्व प्रश्नांची काय उत्तरे असावीत याविषयीचे निदान करण्याचे मानवावर सोडून देण्यात आले नाही. त्याच्या चौकस मनाला याविषयी अचूक व खऱ्या उगमाकडून उत्तरे मिळणार होती. देवाचा उपेक्षित पुत्र म्हणून त्याला सोडून देण्यात आले नव्हते, तर त्याला निर्मितीविषयीचा जो अद्भूत इतिहास कळविण्यात आला त्यामुळे त्याच्या बुद्धीमत्तेची तल्लखता अधिकच वाढली असावी. हा अहवाल आपल्याला उत्पत्ती १:१-२५ मध्ये सापडतो.
७ निर्मितीच्या या थरारक अहवालामुळे आदामाला खरेच भारावल्यासारखे वाटले असावे. त्यात पुष्कळ गोष्टींचे स्पष्टीकरण होते. त्याचे शब्दांकन ज्या पद्धतीने करण्यात आले त्यावरून आदामाला हे कळाले की, देवाने आपल्या परिभाषेनुसार ज्याला दिवस असे संबोधिले तो पहिल्या तीन दिवसांचा काळ मोठा होता. चवथ्या निर्मितीच्या काळात देवाने दोन मोठ्या ज्योति आकाशात दिसतील अशा केल्या की, ज्यामुळे माणसाचा छोटा २४ तासांच्या अवधीचा दिवस आरंभ झाला. हा जो छोटा दिवस होता तो मोठी ज्योत अस्ताला जाण्यापासून ती परत अस्ताला जाण्यापर्यंत एवढा होता. आदामाला हेही कळाले की, त्याच्या काळाची वर्षे होणार व यामुळेच त्याने आपले आयुष्य मोजायला सुरु केले. हे त्याला अंतराळातील मोठ्या ज्योतिमुळे साध्य होणार होते. परंतु निर्मितीविषयीच्या देवाच्या लांब मुदतीच्या दिवसाविषयी पहिल्या मानवाला कळून आले की तो तेव्हा देवाच्या पृथ्वीवरील निर्मितीकामाच्या सहाव्या दिवसात जगत होता. जमिनीवरील सर्व पशुंची निर्मिती तसेच मानवाच्या स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या निर्मितीच्या सहाव्या दिवसाचा कालावधी संपला असे त्याला अद्याप सांगण्यात आले नव्हते. येथपर्यंत त्याला वनस्पति, सागरी जलचर, पक्षी, आणि जमिनीवरील प्राणी यांच्या निर्मितीचा क्रम समजला होता. पण या एदेनात आदाम हा, देवाने पृथ्वीवरील नंदनवनात मानवासाठी जो प्रेमळ उद्देश राखला होता त्याच्या अनुषंगाने अजूनही उणाच राहिला होता.
पहिल्या स्त्रीची निर्मिती करणे
८, ९. (अ) प्राण्यांच्या निर्मितीसंबंधाने परिपूर्ण मानवाने काय निरिक्षण केले, पण त्याने स्वतःविषयी काय निष्कर्ष काढला? (ब) परिपूर्ण मानवाने सोबत्याविषयीची विचारणा देवाला केली नाही हे का योग्यच होते? (क) पहिल्या मानवी स्त्रीच्या निर्मितीचे वर्णन पवित्र शास्त्र अहवाल कसे करतो?
८ पहिल्या मानवाने आपल्या परिपूर्ण बुद्धी तसेच निरिक्षण याकरवी हे पाहिले की, पक्षी तसेच पशु जगतामध्ये नर व माद्या आहेत आणि ते आपल्या जातीनुसार आपली वंशनिर्मिती करीत आहेत. पण आपल्या बाबतीत असे काहीच नाही असे तेव्हा माणसाला आढळले. अशा निरिक्षणामुळे, आपल्याला सुद्धा कोणाची तरी सोबत असावी असा विचार त्याला आला असावा, पण प्राणी जगतात तसा अनुरुप सोबती कोणीच नव्हता, वानरांमध्येही तो दिसून आला नाही. तेव्हा आदामाने हा निष्कर्ष काढला असावा की, त्याला कोणी सोबती नसावा, कारण जर कोणी असताच तर देवाने तो आतापर्यंत सामोरा आणला नसता का? मानवाची निर्मिती सर्व जातीच्या पशुंपेक्षा भिन्न तऱ्हेने करण्यात आली होती व तो वेगळाच असावा असा यामध्ये उद्देश होता! यामुळे हे प्रकरण स्वतःच निकालात काढावे आणि उद्धटपणे देवाला एका सोबत्याची विचारणा करावी असा त्याने कल धरला नाही. सर्व गोष्टींची हाताळणी देवाने करावी असा परिपूर्ण माणसाने विचार राखणे उचितच होते; आणि देवानेही या परिस्थितीविषयी आपला निर्वाळा लवकरच प्रकट केला हे त्याला दिसून आले. याविषयी आणि जे काही घडून आले त्याबद्दल अहवाल आम्हाला कळवितोः
९ “आदामाला कोणी अनुरुप सहाय्यक मिळेना. मग, यहोवा देवाने आदामाला गाढ निद्रा आणिली; आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली; यहोवा देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणालाः ‘आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.’ यास्तव, पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यांस संकोच वाटत नसे.”—उत्पत्ती २:२०-२५.
१०. परिपूर्ण मानवाला परिपूर्ण स्त्री सादर करण्यात आली तेव्हा त्याची कोणती प्रतिक्रिया होती, आणि त्याच्या शब्दांकरवी काय सूचित होऊ शकते?
१० परिपूर्ण स्त्रीला त्याच्यापाशी आणून तिला अनुरुप सहकारी असे सादर करण्यात आले तेव्हा आदामाने आपल्या शब्दांकरवी पूर्ण समाधान व्यक्त केले. तो म्हणालाः “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे.” नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या बायकोला पाहिल्यावर हे जे शब्द त्याने उच्चारले त्यावरुन त्याला या सुंदर सहचरीसाठी थोडा वेळ थांबून रहावे लागले असा अर्थ ध्वनित होतो. आपले विचार व्यक्त करताना आदामाने आपल्या बायकोला “नारी” (ʼईश․शाहʹ किंवा शब्दशः “नराची स्त्री”) असे संबोधिले, कारण तो म्हणालाः “ही नरापासून बनविली आहे.” (उत्पत्ती २:२३, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप) देवाने आदामाला नावे देण्यासाठी जे उडणारे पक्षी तसेच जनावरे यांना त्याच्याकडे आणले होते त्याविषयीची शारीरिक ओढ आदामाला वाटली नाही. त्याचे शरीर त्यांच्यापेक्षा वेगळे होते. पण आता त्याच्यासमोर आलेली स्त्री ही मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या शरीरासारखीच होती. त्याच्या कुशीतून जी फासळी काढण्यात आली तिच्यापासून त्याच्या शरीरात असणाऱ्या रक्तासारखीच रक्ताची निर्मिती झाली. (मत्तय १९:४-६ पहा.) आता त्याच्यासोबत असे कोणीतरी होते ज्याच्याशी तो निर्मितीकार्याच्या अद्भूत अहवालाची सहभागिता करू शकत होता व तो स्वतः त्या साथीदाराकरता देवाचा संदेष्टा किंवा प्रवक्ता अशी हालचाल करू शकत होता.
११-१३. (अ) आदामाला बायको मिळाली या गोष्टीमुळे कोणते प्रश्न उद्भवतात? (ब) पहिल्या मानवी जोडप्याविषयी देवाने कोणता हेतू राखला होता? (क) परिपूर्ण मानवी कुटुंबासाठी कोणते खाद्य असणार होते?
११ परंतु, मानवाला स्त्री बहाल करण्यामध्ये मानवाच्या निर्मात्याचा कोणता हेतू होता? एक मदतनीस व सहकारी व्हावे आणि त्याला कंटाळा वाटू नये म्हणून त्याच्याच जातीचा एक सोबती असावा हा तो हेतू होता का? देवाने जेव्हा या दोघांच्या विवाहावर आपला आशीर्वाद देताना जे उद्गार काढले त्याकरवी देवाच्या हेतूची स्पष्टता आपल्याला कळून येते. अहवाल आपल्याला सांगतोः
१२ “मग देव बोललाः ‘आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवितील.’ देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांस आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणालाः ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.’
१३ “देव म्हणालाः ‘पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पति व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो; ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचारे करणारे सर्व जीवधारी प्राणी यांस अवघी हिरवळ खावयासाठी देतो. आणि तसे झाले.’”—उत्पत्ती १:२६-३०.
पहिल्या मानवी जोडप्यापुढील संभाव्यता
१४. देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण पुरुष व स्त्रीपुढे कोणते भवितव्य उभे होते, व त्यांच्या डोळ्यांपुढे कोणते चित्र तरळणे साहजिक होते?
१४ पहिला परिपूर्ण मानव व त्याची परिपूर्ण स्त्री यांनी देवाची वाणी ऐकणे, काय करावे हे त्याच्याकडून समजून घेणे तसेच त्याचा आशीर्वाद मिळवणे हे किती अद्भूत होते बरे! देवाचा आशीर्वाद असताना त्यांचे जीवन निरर्थक होणार नव्हते तर जे काही करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते ते त्यांना पूर्ण करता येणार होते. होय, त्यांच्यापुढे किती चांगले भविष्य उभे होते! त्या आनंदी विवाहीत जोडप्याने तेथे, एदेन बागेतील आपल्या घरात एकत्रपणे ह्या विषयाचे चिंतन केले असावे की, देवाची इच्छा पूर्ण करण्यामुळे काय काय घडणार. त्यांनी आपल्या मनःचक्षूने भावी काळात लांबवर दृष्टी टाकून हे पाहिले असेल की, “पूर्वेस [असणारी] एदेन बाग”च नाही, तर ही सबंध पृथ्वी हसमुख व उजळलेल्या चेहऱ्याच्या पुरुष व स्त्रियांनी बहरून गेली आहे. (उत्पत्ती २:८) एवढे सगळे लोक, आपली मुले, आपले वंशज असणार या विचाराने आदाम-हव्वेचे अंतःकरण केवढे उचंबळून आले असेल! शारीरिकदृष्ट्या व घडणीच्या बाबतीत सर्व परिपूर्ण व निर्दोष आहेत, सर्वांठायी चिरतारुण्य खेळते आहे, सर्वजण आरोग्याने रसरसले आहेत, जगण्याचा सर्वांनाच आनंद वाटतो आहे, ते एकमेकांसोबत परिपूर्ण प्रेम दाखवीत आहे, सर्वजण आपला स्वर्गीय पिता व थोर निर्माणकर्ता याच्या भक्तीमध्ये आपले पहिले माता व पिता यांच्यासमवेत एकवटलेले आहेत हा विचारच केवढा मनोरम होता! एवढे भव्य कुटुंब आपल्याला असेल या विचाराने त्या पहिल्या पुरुषाचे व स्त्री अंतःकरण किती धडधडले असेल!
१५, १६. (अ) मानवी कुटुंबासाठी भरपूर अन्न का असणार होते? (ब) आनंदी कुटुंबाची वाढ होईल तेव्हा यांच्यासाठी एदेन बागेबाहेर कोणते काम असणार होते?
१५ संपूर्ण पृथ्वी ज्या मानवी कुटुंबांनी भरुन जणार होती त्यातील प्रत्येक सदस्याकरता भरपूर अन्न असणार होते. येथेच एदेन बागेत आरंभाला भरपूर अन्न तयार होते. देवाने आधीच त्यांना ते तयार करुन दिले होते व आता सोबत बीज देणारी वनस्पतिही आरोग्यदायी, जीवनदायी आहारासाठी तसेच फळझाडेही दिली होती.—पडताळा स्तोत्रसंहिता १०४:२४.
१६ हे आनंदी कुटुंब संख्येने वाढेल तसतसे ते बागेचा विस्तार एदेनच्या परिसराबाहेर देखील नेणार होते, कारण देवाच्या शब्दांवरुन असे सूचित होते की, एदेनाबाहेरील भूमि तयार झाली नव्हती. ती, मशागत केलेली आणि एदेन बागेसारखी उच्चतम पातळीवर आणली गेली नव्हती. याच कारणास्तव निर्माणकर्त्याने त्यांना म्हटले की, फलद्रुप होत असता, पृथ्वी “व्यापून” टाका.—उत्पत्ती १:२८.
१७. वाढत्या लोकसंख्येसाठी भरपूर अन्न का राहणार होते, आणि बागेचा विस्तार वाढल्यावर कशी स्थिती येणार होती?
१७ बागेचा व्याप पूर्णपणे मशागत करणाऱ्यांनी आणि राखण करणाऱ्यांकरवी वाढत असता व्यापलेली भूमि वाढत्या लोकसंख्येसाठी भरपूर उपज देणार होती. सरतेशेवटी या बागेचा विस्तार पृथ्वीच्या चारही सीमांना जाऊन भिडणार होता आणि पृथ्वीव्याप्त नंदनवन बहरणार होते व ते मानवाचे चिरंतन घर यानात्याने राहणार होते. स्वर्गातून तिच्याकडे अवलोकन केल्यावर ती जणू सुंदर दिसणाऱ्या तिळाप्रमाणे वाटणार होती व मग तिच्या बाबतीत, ती सर्वांगपूर्ण आहे असे स्वर्गीय निर्माणकर्त्याला घोषित करता येणार होते.—पडताळाला ईयोब ३८:७.
१८. गोलार्धव्याप्त पसरलेली एदेन बाग कसल्याही त्रासापासून का मुक्त असणार होती, आणि कोणती शांतीमय स्थिती तेथे वास करणार होती?
१८ हे सर्व, पहिल्या नवविवाहित मानवी जोडप्याला एदेन बागेत असताना जसे शांत व कसलाही त्रास नाही असे वाटत होते तशा स्थितीत असणार होते. आदाम या पहिल्या मानवाने ज्यांचे निरिक्षण करून त्यांना नावे दिली त्या पशुंपासून किंवा पक्ष्यांपासून कसलेही भय किंवा त्रास ओढवण्याची आशंका राहणार नव्हती. पृथ्वीभर पसरलेल्या नंदनवनातील परिपूर्ण रहिवाशी आपल्या पहिल्या माता-पित्याप्रमाणेच समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, जमिनीवर असणारे प्राणी इतकेच काय पण अरण्यातील वन्य श्वापदे यांजवर सत्ता करणार होते. ‘देवाच्या प्रतिरुपानुरुप’ निर्माण करण्यात आलेल्या मानवास आपल्या उपजत बुद्धीकरवी अधीन राहून हे कनिष्ठ प्राणी त्याच्याशी शांतीसंबंधात असणार होते. या प्राण्यांना आपल्या अधीन ठेऊन त्यांचे हे कनवाळू परिपूर्ण मालक प्राणी जगतात शांती टिकविणार होते. या देवसदृश्य मानवी मालकांनी जोपासलेले शांतीमय वर्चस्व प्राणीवर्गात संरक्षणाची भावना सर्वत्र पसरविणार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परिपूर्ण मानवजात ही देवासोबत शांतीसख्यात राहणार होती व यामुळे देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरुन कधीही ढळणार नव्हता.—पडताळाल यशया ११:९.
देव आपल्या निर्मिती कार्यापासून विसावा घेतो
१९. (अ) देवाच्या उद्देशाच्या विषयासंबंधाने पहिला पुरुष व स्त्री यांना काय कळले असावे? (ब) वेळेच्या बाबतीत देवाने काय सूचित केले?
१९ देवाच्या हेतुनुरुप पृथ्वीचे दृश्य साकार करीत असण्याचे चित्र रंगवीत असता त्या पहिल्या परिपूर्ण मानवी जोडप्याला एका गोष्टीची जाणीव घडली असावी. देवाकडील हे अद्भूत कार्य पूर्ण करायला वेळेची गरज आहे. किती काळाची? त्यांचा निर्माता व स्वर्गीय पिता याला ते माहीत होते. त्याने त्यांना सूचित केले की, निर्मिती कार्याच्या दिवसांची मोठी मालिका आता संपण्याच्या बेतात होती आणि ते आता ‘संध्याकाळी,’ म्हणजे देवाने निर्मिती कार्याच्या दिवसांची गणना ज्या पद्धतीने अनुसरली, त्याच्या अनुषंगाने एका नव्या दिवसाच्या आरंभाला सामोरे आले होते. हा आशीर्वादीत दिवस असून तो देवाच्या शुद्ध व नीतीमान हेतूंना समर्पित होता. या विषयीची दखल, देवाचा संदेष्टा वा प्रवक्ता असणाऱ्या पहिल्या माणसाने घेतली. प्रेरित वृत्तांत आम्हास असे सांगतोः
२०. ‘सातव्या दिवसा’विषयी पवित्र शास्त्र अहवाल काय सांगतो?
२० “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा सहावा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपविले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्तीक्रम हा होय.”—उत्पत्ती १:३१–२:४.
२१. (अ) आपला विसाव्याचा दिवस देवाने संपवला आणि तो फारच चांगला होता असे पवित्र शास्त्र सांगते का? विवेचीत करा. (ब) कोणते प्रश्न येतात?
२१ देवाने हा विसाव्याचा सातवा दिवस संपवला व त्याने पाहिले की सर्व काही चांगले आहे आणि संध्याकाळी आली व सकाळ आली हा तो सातवा दिवस, असे अहवाल आपल्याला सांगत नाही. सातव्या दिवसाची मागील सहा निर्मितीच्या दिवसांसोबत समांतरता होण्यासाठी सातवा दिवस चांगला आहे हे म्हणण्याचे अद्याप बाकी राहिले आहे, कारण तो अजून संपला नाही. तर मग, निदान आतापर्यंत या दिवसाचा हा जो काळ गेला त्याविषयी यहोवा देव चांगले म्हणू शकतो का? नंदनवनात आपल्या लग्नाच्या दिवशी पहिला पुरुष व स्त्रीने एकत्र बसून आपल्या डोळ्यांपुढे अंतःकरणास उबविणारे जे चित्र चितारले होते त्याबद्दल काय? पुढील लेखात कोणते नवे दृश्य आपल्याला पहायला मिळते ते बघू या.
[तळटीपा]
a इब्री शास्त्रवचनातील उत्पत्तीच्या इब्री लिखाणात तसेच इतर प्रेरित पुस्तकात ही नावे आढळतात.
तुमचा प्रतिसाद काय असेल?
◻ बागेची मशागत करण्यासोबतच देवाने आदामाला आणखी कोणते काम दिले व यामध्ये काय समाविष्ट होते?
◻ उत्पत्ती १:१-२५ मधील निर्मितीचा अहवाल काय प्रकट करतो?
◻ पहिल्या मानवी स्त्रीची निर्मिती कशी झाली, आणि आदामाने आपल्या लग्नाच्या दिवशी कोणता प्रतिसाद व्यक्त केला?
◻ पहिल्या मानवी जोडप्यासमोर कोणती संभाव्यता उभी होती?
◻ निर्मितीच्या दिवसांच्या थोर मालिकेने आणखी एक शेवट गाठला होता हे देवाने कसे सूचित केले?