मानवाने नंदनवनातील जीवनाचा आस्वाद घ्यावा असा देवाचा हेतू आहे
“यहोवा देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले.”—उत्पत्ती २:१५.
१. आज्ञाधारक मानवाविषयी निर्मात्याचा मूळ हेतू कोणता होता?
आज्ञाधारक मानवाने वार्धक्यविनाचे जीवन, चिरतारुण्य, सर्व कंटाळवाण्या गोष्टींची मुक्तता अनुभवावी; त्याने आपल्या जीवनात समाधानाची योग्य ध्येये राखावी, परिपूर्ण असे प्रेमळ जीवन तसेच इतरांना खरे, निरागस, निःस्वार्थ स्वरुपाचे प्रेम दाखवावे आणि अशाच प्रेमाचा अनुभव इतरांकडून मिळवावा आणि या सर्व गोष्टींचा आस्वाद नंदनवनात घ्यावा हा निर्माणकर्त्याचा मूळ हेतू होता, आणि हा हेतू अद्याप आहे.—उत्पत्ती २:८; पडताळा लूक २३:४२, ४३.
२. (अ) प्रथम मानव सचेतन झाला तेव्हा काय घडले असावे? (ब) पहिल्या मानवाची निर्मिती केव्हा, कोठे व वर्षाच्या कोणत्या वेळी झाली?
२ हे ओळखण्यासाठी जेव्हा प्रथम आदाम घडला गेला त्या काळाचा विचार करा. आदामाला सचेतना मिळाली, त्याने आपल्या शरीराला स्पर्श करून पाहिला, सभोवार नजर टाकली, सृष्टीसौंदर्य न्याहाळले, तेव्हा त्याला कळले की आपण जिवंत आहोत! हे साधारण ६,००० वर्षांआधी, पवित्र शास्त्राच्या कालगणनेनुसार आमच्या समान शकाआधीच्या ४,०२६व्या वर्षी घडले. ते सध्या ज्याला तुर्कस्थान म्हणून ओळखले जाते त्या जागी, किंवा सध्या आशिया म्हणून समजल्या जाणाऱ्या विभागाच्या नैऋत्येकडे, इफ्रात व तैग्रीस नद्यांच्या जवळपास, म्हणजेच आमच्या पृथ्वी गोलार्धाच्या अर्ध्या उत्तर विभागात घडले. तो समय साधारण ऑक्टोबर १ च्या सुमाराचा होता, कारण मानवजातीच्या बहुतेक सर्वच प्राचीन पंचांगांनी आपल्या तारखेची गणना याच्या जवळपास तारखेकडून आरंभिली.
३. (अ) पहिला मनुष्य कोणत्या स्थितीत जिवंत झाला? (ब) पहिल्या मनुष्याला काय नाव पडले, व याची कोणती अर्थसूचकता होती?
३ पहिला मानव जिवंत झाला तेव्हा तो पूर्ण वाढलेला, सर्वांगपूर्ण, पूर्णपणे सुदृढ आणि पूर्णरुपाने नैतिक असा होता. याला पवित्र शास्त्रात ज्या नावाने संबोधण्यात आले आहे त्यावरुन त्याची घडण कशामधून झाली ते आपल्या लक्षात आणले जाते. त्याचे नाव ʼआ․दहामʹ हे होते.a जी भूमि किंवा मातीपासून त्याची निर्मिती करण्यात आली तिला ʼआ․दा․माहʹ असे म्हणण्यात येत होते. या कारणास्तव मानवाच्या नावाचा अर्थ “भूमीचा मनुष्य” असा योग्यपणे केला जाऊ शकतो. हेच पहिला माणूस आदाम याचे व्यक्तीगत नाव पडले. आदाम जेव्हा जिवंत झाला, त्याला शुद्धी आली आणि तो बुद्धीमानाप्रमाणे वावरु लागला तेव्हा त्याची संवेदना त्याला केवढ्या भव्यपणे जाणवली असावी!
४. पहिला माणूस जागा झाला तेव्हा त्याला कोणती विचित्र स्थिती दिसली नाही, तद्वत, तो कोणाचा पुत्र नव्हता?
४ पहिला मनुष्य आदाम जिवंत झाला, त्याला बौद्धिक सचेतना मिळाली आणि त्याने डोळे उघडले तेव्हा स्वतःला कोणा वानरीच्या केसाळ छातीशी, भारी हातांच्या मिठीत बिलगलेले आणि त्याची दृष्टी तिजवर खिळून तिला आई म्हणण्याची स्थिती आलेली आहे अशा दशेत त्याने स्वतःला पाहिले नाही. पहिला माणूस आदाम जिवंत झाला तेव्हा अशी विचित्र परिस्थिती त्याच्यासमोर नव्हती. कोणा वानराशी आपला नातेसंबंध आहे असे त्याला तेव्हा, तसेच नंतर प्रत्यक्षात त्याने जेव्हा पहिले माकड बघितले तेव्हाही वाटले नाही. त्याच्या निर्मितीच्या दिवशी तो, कोणा वानराचा किंवा वानराशी सदृश्य असणाऱ्या कोणा प्राण्याचा दूरचा पुत्र, वंशज आहे असे काही दिसून आले नाही. तर मग, या पहिल्या मानवाला, आपण कसे अस्तित्वात आलो याचे नेहमीच कोडे वाटत राहणार होते का? नाही.
५. आदामाला त्याच्या उद्यानसमान बागेविषयी तसेच स्वतःविषयी काय निश्चित माहीत होते?
५ तरीपण, त्याने सभोवार पाहिलेल्या सुंदर गोष्टी कशा अस्तित्वात आल्या याचे त्याला कोडे वाटले असावे हे समजण्याजोगे आहे. त्याने स्वतःला एका बागेच्या उद्यानात पाहिले; ती बाग त्याने स्वतः घडविली नव्हती. मग, हे सगळे कसे काय झाले? स्वतः बुद्धीजीवी, विचारशील असल्यामुळे त्याला हे जाणून घ्यावे असे नक्की वाटले असणार. त्याला पूर्वानुभव नव्हता. आपण आपलीच घडण केलेली नाही, किंवा स्वतःच वाढत, बदलत गेलो असे काही नाही हे तो जाणून होता. आत्ताची त्याची ही स्थिती त्याला स्वप्रयत्नामुळे मिळाली नव्हती.—पडताळा स्तोत्रसंहिता १००:३; १३९:१४.
६. परिपूर्ण अशा पृथ्वीवरील घरात जिवंत आहोत हे पाहून आदामाची कोणती प्रतिक्रिया दिसली असावी?
६ प्रथम मानव आदामाला, पृथ्वीवरील परिपूर्ण घरात जिवंतावस्थेत असल्याचा पहिला विचार चाटून जाताना, आपण येथे कसे व कशासाठी आलो आहोत त्याविषयीचा आश्चर्ययुक्त आनंद आरंभाला नक्की जाणवला असावा. आनंदाने भारावून जाऊन त्याच्या कंठातून स्वर उमटला असावा, आणि त्याला काय दिसले? आपल्याला मानवी भाषा बोलता येत आहे व जे पाहिले व ऐकले त्याविषयी बोलून दाखविता येते हे किती आश्चर्य! तर मग, नंदनवन बागेत जिवंत असणे हे केवढे चांगले होते! आता जसजसे त्याला दृष्टी, ध्वनि, वास आणि स्पर्श याकरवी अधिक माहिती ग्रहण करता येऊ लागली तेव्हा त्याच्या विचाराची गतीही सुरु झाली. आपण जर त्याच्या या स्थितीत असतो तर आपल्यालाही त्याच्यासारखे प्रत्येक गोष्टीचे कोडेच वाटले असते; असे कोडे आपल्याला स्वतःला उलगडता आले नसते.
मानवी अस्तित्वाचे कोणतेच कोडे नाही
७. आदामाला आपण जिवंत आहोत, एका नंदनवनाच्या उद्यानात आहोत हे कसे याचे कोडे फार काळ का वाटले नाही?
७ तथापि, आदामाला, ज्या स्थितीत त्याने स्वतःला जिवंत व एकटे असल्याचे बघितले, जेव्हा त्याच्यासारखा दिसणारा कोणी त्या नंदनवन बागेत नव्हता, त्याविषयी फार काळ आश्चर्यात राहावे लागले नाही. त्याने कोणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकला. त्याला ते कळले. पण तो बोलणारा कोठे होता? त्याला कोणीच दिसले नाही. तो आवाज अदृश्य, दिसू न शकणाऱ्या आसमंतातून आला व तो त्याच्याशी बोलत होता. तो आवाज मानवाला घडविणाऱ्याचा, त्याच्या निर्मात्याचा होता! शिवाय माणसालाही त्याच वाणीत प्रत्युत्तरही देता येत होते. लवकरच त्याला, आपण देवाशी, निर्माणकर्त्याशी बोलत आहोत असे दिसले. तो ईश्वरी आवाज ऐकण्यासाठी मानवाला सध्याच्या कोणाही वैज्ञानिक यंत्राची गरज भासली नाही. देवाने त्याच्याबरोबर थेटपणे त्याची निर्मिती असे भाष्य केले.
८, ९. (अ) आदाम कोणत्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकला, आणि पिता घेत असलेली कोणती काळजी व आस्था त्याला मिळाली? (ब) आदामाला त्याच्या स्वर्गीय पित्याकडून कोणते उत्तर मिळाले?
८ आता माणसाला जाणीव झाली की आपण एकटे नाही; आणि यामुळेच त्याला कितीतरी बरे वाटले असावे. परंतु त्याच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते. हे तो, जो दिसत नसता त्याच्याशी भाष्य करीत होता त्याला विचारु शकत होता. त्याला व या सुखावह बागेला कोणी बनविले? त्याला येथे का ठेवण्यात आले होते आणि त्याने आपल्या जीवनाचे काय करायचे होते? जगण्यात काही उद्देश होता का? या प्रथम मानवाला, पिता करीत असलेली काळजी व तो दाखवीत असलेली आस्था यांचा अनुभव आला; आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली व त्याचे चौकस मन समाधानी झाले. याखेरीज, मानवाच्या निर्मात्याला, जीवनदात्याला, त्याच्या स्वर्गीय पित्याला माणसाने बोलण्यास आरंभ केला, आपले पहिले शब्द उच्चारले ते ऐकून किती आनंद झाला असावा! या पुत्राने आपल्याशी भाष्य केले हे बघून स्वर्गीय पित्याला केवढा संतोष मिळाला असावा! मानवाचा पहिला व स्वाभाविक प्रश्न हाच असावाः “मी कोठून आलो?” स्वर्गीय पित्याला याचे उत्तर देण्यात आनंद वाटला आणि त्याने पहिल्या मनुष्याला, तो आपला पुत्र आहे असे म्हटले. तो “देवाचा पुत्र” होता. (लूक ३:३८) यहोवाने पहिला मानव आदाम याला आपली, त्याचा स्वर्गीय पिता अशी ओळख दिली. आदामाने त्याच्या प्रश्नाचे त्याच्याकडून जे उत्तर मिळविले व जे त्याने आपल्या संतानाला कळवले त्याचा सारांश हाः
९ “मग, यहोवा देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जिवंत जीव झाला. यहोवा देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि त्यामध्ये आपण घडलेल्या मनुष्याला ठेवले. यहोवा देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगविली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या.”—उत्पत्ती २:७-१०.b
१०, ११, (अ) कोणती माहिती आदामाला स्पष्टपणे समजू शकली, पण आता त्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवी होती? (ब) स्वर्गीय पित्याने आदामाला कोणती उत्तरे दिली?
१० ही समाधानकारक माहिती आदामाच्या ताज्या व प्रखर बुद्धीने मोठ्या उत्साहाने ग्रहण केली. आता त्याला कळले की तो, त्याचा निर्माता व घडणारा ज्या अदृश्य आसमंतातून बोलत होता तेथून आला नाही. उलटपक्षी, तो जेथे आता उभा होता त्या भूमीतून त्याची निर्मिती झालेली आहे आणि म्हणूनच तो पार्थिव होता. त्याचा जीवनदाता व पिता यहोवा देव होता. आदाम स्वतः “जिवंत जीव” होता. त्याला आपले जीवन यहोवा देवाकडून मिळाले होते म्हणून तो “देवाचा पुत्र” होता. त्याच्या सभोवार एदेन बागेत असणारी झाडे फळांनी बहरली होती; ही फळे खाण्यासाठी योग्य होती. ती खाऊन त्याला जिवंत जीव असे आपले जीवन पुढे नेता येऊ शकत होते. पण मग, जिवंत तरी का राहायचे होते? त्याला येथे पृथ्वीवर एदेन बागेत का ठेवण्यात आले होते? त्याची बौद्धिक तसेच शारीरिक घडण पूर्णपणे घडविण्यात आली होती व यामुळे हे त्याने जाणून घेणे जरुरीचे होते. ते जाणले नाही तर आपल्या जीवनाचा उद्देश त्याला कसा कळणार होता व ईश्वरी इच्छेनुरुप वागून आपल्या निर्मात्या व पित्याला कसे संतुष्ट करता येणार होते? या सर्व सुयोग्य प्रश्नांची त्याला पुढील शब्दात उत्तरे मिळालीः
११ “यहोवा देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. तेव्हा यहोवा देवाने आदामाला अशी आज्ञा केलीः ‘बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.’”—उत्पत्ती २:१५-१७.
१२. आदामाने आपल्या निर्मात्याचे कशासाठी आभार मानले असावेत, व याद्वारे मानवाला देवाचे गौरव कसे साध्य करता येणार होते?
१२ आदामाने या उत्तरांबद्दल तसेच या सुंदर एदेन बागेत त्याला जे उपयुक्त असे काम देण्यात आले त्याविषयी देवाने आभार मानले असावेत. आता त्याला आपल्या निर्मात्याची इच्छा कळाली होती आणि येथे या पृथ्वीवर राहून देवासाठी त्याला काही करून दाखविता येणे शक्य होते. त्याच्यावर आता जबाबदारी आली होती; ती ही की, एदेन बागेची मशागत करून तिची काळजी घेणे. पण हे प्रत्यक्षात सुंदर काम होते. ते केल्यामुळे त्याला एदेन बाग चांगली सुशोभित ठेवता येऊन त्याकरवी तिचा निर्माता यहोवा देव याला सन्मान व गौरव मिळवून देता येणार होते. काम केल्यामुळे आदामाला भूक लागली तर फळांचा स्वादिष्ट आहार तयारच होता; तो त्याला यथेच्छ घेता येत होता. यामुळे त्याला आपली शक्ती परत मिळवता येत होती आणि असे करून आपले जीवन सदासर्वदा—युगानुयुगे—आनंदी ठेवता येऊ शकत होते.—पडताळा उपदेशक ३:१०-१३.
सार्वकालिक जीवनाचे भवितव्य
१३. पहिल्या मानवापुढे कोणते भवितव्य होते, आणि का?
१३ युगानुयुगे? त्या परिपूर्ण माणसाला हा विचार केवढा विलोभनीय पण विश्वास बसणार नाही असा वाटला असावा! पण ही गोष्ट का घडू नये? कारण एवढ्या कुशलतेने बनविण्यात आलेल्या एदेन बागेचा नाश करण्याचा कसलाही विचार किंवा हेतू त्याच्या निर्मात्याठायी नव्हता. त्याचे काम इतके चांगले व त्याच्या कलेचा आविष्कार घडविणारे आहे तर मग ते का नष्ट करावे बरे? या कारणास्तव, ते काम नष्ट करण्याचा त्याचा हेतू नव्हता हे तर्कशुद्ध वाटते. (यशया ४५:१८) आता हे अप्रतिम उद्यान जर लागवडीखाली यायचे आहे तर मग, तेथे परिपूर्ण आदामासारख्या कोणा मशागत करणाऱ्याची व काळजी घेणाऱ्याची गरज ही राहणारच. शिवाय हा माळी जर “बऱ्या वाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ” खाणार नाही तर तो मरणारच नाही. तद्वत, या परिपूर्ण मानवाला चिरकालपणे जगण्याची संधी होती!
१४. आदामाला नंदनवनात सार्वकालिक जीवन कसे मिळणार होते?
१४ आदामापुढे एदेनच्या नंदनवन बागेतील सार्वकालिक जीवन ठेवण्यात आले! तो जर पूर्णपणे देवाच्या आज्ञेत राहिला, जे फळ खाण्याची मनाई त्याच्या निर्मात्याने केली आहे ती पाळली तर ते जीवन अबाधितपणे अनुभवता येणार होते. परिपूर्ण मानवाने आपल्या आज्ञेत राहावे व सार्वकालिकपणे जिवंत असावे हीच त्याची इच्छा होती. मनाई करण्यात आलेले “बऱ्या वाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ” मरण-प्राय नव्हते. तर ते, मानव आपल्या पित्याला पूर्णतेने आज्ञाकारी राहतो का याला अनुलक्षून होते. यामुळे मानवाला, देव व निर्माता याजविषयी वाटणारी आपली प्रीती सिद्ध करुन दाखविण्याची संधी मिळाली.
१५. आदाम, आपल्या निर्मात्याच्या हातून चांगले ते काय आहे ते संपादून तेजोमय भविष्याकडे आपली दृष्टी का लावू शकत होता?
१५ आपण आकस्मिकपणे उद्भवलो नाही, तर आपल्याला स्वर्गीय पिता आहे ही जाणीव, तसेच आपल्या जीवनात काय उद्देश आहेत त्याविषयी मनाला मिळालेली प्रज्वलित माहिती, आणि नंदनवनातील चिरकालिक जीवनाचे भवितव्य या गोष्टीमुळे परिपूर्ण मानव तेजोमय भविष्याकडे आपली दृष्टी लावू शकला. त्याने अन्नासाठी उपयोगी असणाऱ्या झाडाची फळे खाल्ली; ‘बऱ्या वाइटाचे ज्ञान करुन देणारे झाड’ टाळले. आपल्या निर्मात्याच्या हातून काय चांगले मिळते ते तो जाणून घेऊ इच्छित होता. विध्वंसकारी कृत्ये नव्हे, तर एदेन बागेची मशागत करण्याचे काम चांगले होते; आणि परिपूर्ण मानवाने ते आपल्या हाती घेतले.
माहिती विवेचीत करण्याची गरज भासली नाही
१६-१८. कोणत्या तथाकथित गूढ गोष्टींना संशोधित करण्याची जरुरी आदामाला भासली नाही?
१६ आदामाने पाहिले की, आकाशात भ्रमण करणारी ज्योति मावळत आहे आणि उजेड लुप्त होत आहे. अंधार झाला, रात्र आली आणि आकाशात चंद्र दिसला. यामुळे तो भयभीत झाला नाही. ही तर रात्रीवर प्रभुत्व करणारी लहान ज्योति होती. (उत्पत्ती १:१४-१८) लवकरच काजवे चमकू लागले आणि त्यांचा थंड प्रकाश बारीक दिव्याप्रमाणे उघडझाप करीत राहिला.
१७ रात्र झाली व त्याच्या सभोवताली काळोख पसरला आणि त्याने पाहिले की त्याच्याभोवती वावरणारे प्राणी झोपू लागले आहेत तेव्हा आपल्यालाही झोपेची गरज आहे हे त्याला जाणवले. उजाडल्यावर त्याला परत भूक लागली आणि त्याने मुभा असलेल्या झाडावरून फळे काढून सकाळची न्याहारी मनमुराद केली.
१८ रात्रीच्या विश्रांतीमुळे मिळालेला तजेला आणि आहारामुळे संपादित झालेली शक्ती यामुळे पुन्हा तो दिवसाच्या कामाला लागला. त्याने सभोवताली हिरवळ पाहिली, पण यामुळे त्याला ही हिरवळ अशी का दिसते याविषयीची माहिती संशोधित करण्याची गरज वाटली नाही. आज, हजारो वर्षांनी माणसाला प्रकाश-संश्लेशनाच्या प्रक्रियेविषयी माहिती मिळाली आहे. ही अशी प्रक्रिया आहे की जी झाडांना हिरवा रंग देते, त्यातील क्लोरोफिल सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या शक्तीचे रुपांतर मानव तसेच जनावरांसाठी अन्न निर्माण करण्याच्या कामी करते आणि याच वेळी मानव तसेच जनावरांमार्फत सोडला जाणारा कर्बद्विप्राणिल वायु ते घेते आणि त्यांच्या श्वसनासाठी प्राणवायु बाहेर सोडते. सध्याच्या माणसाला हे सारे कसे घडते त्याचे मोठे गूढ वाटत असेल, पण ते सोडविण्याची आदामाला काही गरज वाटली नाही. तो तर मानवाच्या निर्मात्याकडील एक चमत्कार होता. त्याची समज त्याला होती व त्यानेच या चमत्काराला पृथ्वीवरील त्याच्या निर्मितीच्या लाभासाठी रुजू केले होते. या कारणास्तव, पहिल्या मानवाच्या परिपूर्ण बुद्धीने देव जो निर्माणकर्ता, यानेच सर्व गोष्टींची वाढ केली; आणि आपल्याला एदेन बागेत वाढत असलेल्या हरप्रकारच्या वनस्पतींची काळजी करायची आहे हे समजून घेणे इतकेच पुरेसे होते.—पहा उत्पत्ती १:१२.
एकटा—पण आनंदात उणा नव्हे
१९. आपल्यासारखा या पृथ्वीवर कोणीही नाही, आपण एकटे आहोत हे कळले तरी आदामाने काय केले नाही?
१९ स्वर्गीय पित्याकडून मानवाला मिळणारे शिक्षण संपले नव्हते. पृथ्वीवर त्याच्यासारखा दिसणारा व मदत करण्यास येणारा कोणीही नसता त्याने एकट्यानेच एदेन बागेची काळजी घेतली. त्याच्यासारखे दिसणाऱ्याच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, मानवजातीपैकी तो एकटाच होता. आपल्याला कोणी सोबत देणारे आपल्यासारखे मिळते का हे पाहण्याचा त्याने शोध सुरु केला नाही. आपल्याला कोणी भाऊ वा बहीण द्यावी याविषयी त्याने देवाला, स्वर्गीय पित्याला विचारणा केली नाही. एकटा जरी असला तरी त्यामुळे त्याने स्वतःला वेडे होऊ दिले नाही आणि जगण्याचा व काम करण्याचा आनंद हिरावू दिला नाही. त्याला देवाची सोबत होती.—पडताळा स्तोत्रसंहिता २७:४.
२०. (अ) आदामाचा सर्वोच्च आनंद व सुख कशात होते? (ब) अशा प्रकारचे जीवनाक्रमण कसलाही त्रास किंवा कंटाळा का देणार नव्हते? (क) पुढचा लेख कशाची चर्चा करील?
२० आपण स्वतः व आपले काम यावर आपल्या स्वर्गीय पित्याचे निरिक्षण आहे हे आदामाला ठाऊक होते. याकरताच आपण आपल्या देवाला, निर्माणकर्त्याला संतुष्ट करावे यातच आपले सर्वोच्च समाधान आहे ते त्याने ओळखले; कारण देवाने आपली अद्भूतता मानवाभोवती असणाऱ्या निर्मितीच्या सर्व सुंदर कामामध्ये प्रकटविली होती. (पडताळा प्रकटीकरण १५:३.) अशाप्रकारचा जीवनाचा मार्ग चोखाळणे हे त्या परिपूर्ण व समतोल मानवाला त्रासदायक किंवा कंटाळवाणे बनविणार नव्हते; कारण तो प्रत्यक्षपणे देवाशी बोलू शकत होता. शिवाय देवाने आदामापुढे मनोरंजक, आश्चर्यावह असे काम दिले होते, जे त्याला मोठे समाधान व सुख देणार होते. या प्रेमळ निर्मात्याकडून आदामाने जे नंदनवनातील आशीर्वाद उपभोगले आणि भविष्याची अपेक्षा धरली त्याविषयी आमचा पुढील लेख अधिक माहिती देईल.
[तळटीपा]
a पवित्र शास्त्रातील निर्मितीच्या अहवालातील मूळ भाषेत हा शब्द आढळतो.—उत्पत्ती १:२६, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.
b आमच्या समान शकाच्या आधी सोळाव्या शतकात उत्पत्तीच्या अहवालाचे लिखाण करणाऱ्या संदेष्टा मोशे याने एदेनातील नद्यांविषयी, त्याच्या काळी जी माहिती ज्ञात होती ती येथे जोडलीः
“पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशास वेढिते; तेथे सोने सापडते. ह्या देशचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद ही सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशास वेढिते. तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात.”—उत्पत्ती २:११-१४.
तुमची उत्तरे काय आहेत?
◻ आदामाला आपल्या अस्तित्वाविषयीचे कोडे जादा वेळ का वाटले नाही?
◻ देवाने आदामाला कोणते काम दिले आणि त्याने त्याला कसा प्रतिसाद दिला असावा?
◻ परिपूर्ण मानवाने कोणत्या गोष्टींचा अनुभव घेतला व का?
◻ आदामाने आपल्या जीवनात विविध गूढांचे संशोधन करण्याचा उपक्रम हाती का घेतला नाही?
◻ एकटाच असला तरी यामुळे आदामाच्या जीवनातील आनंद का हिरावला गेला नाही?