तुमची देवाकडून ऐकण्याची तयारी आहे का?
आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा आम्हास चटकन् समजते की, पहिल्या शतकातील लोकांची स्थिती, आज बहुतांशी आपल्याच परिस्थितीप्रमाणे होती. इस्राएलच्या विलासी शेजाऱ्यांमध्ये अनैतिकता व अप्रामाणिक आचार यांना अगदी ऊत आला होता; अनैतिकपणा हा त्यांचा धर्माचा एक भागच बनला होता. गरीब लोकांचे जीवन खूपच कष्टमय होते व शिवाय राजकीय समस्याही होत्या. इ.स. ६६ पर्यंत इस्राएल व रोम पूर्ण रुपात युद्धात गुंतले होते. त्या काळातील लोकांना आजच्या प्रमाणेच मदतीची गरज होती.
धर्माबाबत पाहू जाता, आज व त्याकाळात बरेच साम्य आहे. यहुदी धार्मिक पुढारी ढोंगी होते. (मत्तय २३:१५; लूक २०:४६, ४७) यहुद्देत्तर जगात धार्मिक मनोवृत्ती अंधश्रद्धा तसेच दिखाऊ धर्मपद्धतीकडे वळली होती. (पडताळा प्रे. कृत्ये १४:८-१३; १९:२७, २८.) तसेच नव्यानेच प्रस्थापित झालेल्या ख्रिस्ती मंडळीत देखील सर्वकाही सुव्यवस्थित नव्हते. त्या शतकाच्या समाप्तीला प्रेषित योहानाने हा इशारा दिला होता: “फसविणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत.” (२ योहान ७) होय, त्या काळीही धर्माच्या विषयासंबंधी बरीच बनावट मसलत दिली जात होती. तरीही विश्वसनीय मदत उपलब्ध होती.
तुम्ही येशूचे ऐकले असते का?
येशूने त्या काळी वाजवी सूचना दिल्या. त्या एवढ्या प्रभावशाली होत्या की त्याच्या परिणामाविषयी आम्हाला असे वाचावयाला मिळते: “त्याच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीमुळे लोकांनी आश्चर्य केले.” (मत्तय ७:२८) पण त्या लोकसमुदायातील थोडक्यांनी त्याचे म्हणणे खरोखरी ऐकले. येशूने अद्भुत चमत्कार केले व ईश्वरी जीविताचे व वर्तणूकीचे चांगले उदाहरण मांडले. तथापि, सुशिक्षित समजणाऱ्या धर्मनेत्यांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींचे मोल जाणण्याचे नाकारले. ते का?
त्यात अधिकांशी अहंकार गोवला होता. येशू हा नासरेथमधील आहे म्हणून त्याला तुच्छ लेखिले. त्याचे मोठमोठ्या वेदांत शाळेत शिक्षण झाले नाही तसेच त्याचा अधिपत्य गाजविणाऱ्या लोकांशी कसलाही संबंध नव्हता म्हणून इतरांनी त्याला धिक्कारले. (योहान १:४६; ७:१२, १५, ४७, ४८) याखेरीज, लोकांच्या कानांना गोड वाटणाऱ्या गोष्टी येशूने विदीत केल्या नाहीत. त्याने केवळ सत्याविषयी बोलणी केली आणि त्याच्या बोलण्यामुळे परुशी बहुधा अडखळले. (मत्तय १५:१२-१४) खरे पाहता, साडे तीन वर्षांच्या प्रचार कार्यानंतर यहुदी धर्मनेत्यांनी त्याला ठार केले. (लूक २३:२०-३५) येशूजवळ “सार्वकालिक जीवनाची वचने” होती, पण त्याला ठार करून त्या यहुदी धर्मनेत्यांनी केवढी चांगली संधि गमावली!—योहान ६:६८.
तुम्ही त्या काळी यरुशलेमात हयात असता तर त्या काळचे धर्मनेते व बाकीचा लोकसमुदाय यांना अनुसरले असते का? किंवा येशू जे बोलत होता ते समजावून घेण्यात आपले मन मोकळे केले असते? तसे असल्यास, तुम्ही त्या एका अप्रतिम स्त्रीप्रमाणे बनला असता जी येशूला त्याच्या प्रवासात भेटली होती.
तिने ऐकले
येशू शोमरोनातून जात असता त्या स्त्रीला भेटला. तो विसावा घ्यावा यासाठी एका विहीरीपाशी बसला. तेव्हा तेथे ही स्त्री पाणी भरण्यासाठी आली. तिचे नाव आम्हाला ठाऊक नाही, परंतु पवित्र शास्त्र अहवाल आम्हास सांगतो की, येशू थकलेला होता तरी त्याने तिजसोबत धर्माविषयी बोलण्याची संधि साधली.—योहान ४:५-१५.
अशी बरीच कारणे होती की ज्यामुळे या स्त्रीला येशूच्या या पवित्र्यास दाद न देण्याची संधि होती. एकतर ती वेगळ्याच धर्माची होती; शोमरोनी लोकांची भक्तीपद्धत यहुद्यांपेक्षा भिन्न होती. तसेच यहुदी शोमरोन्यांना तुच्छ मानीत व त्यांच्याशी व्यवहार ठेवत नसत. याप्रमाणे, यहुदी पुरूष कोणा अपरिचित शोमरोनी स्त्रीबरोबर बोलत नव्हते. (योहान ४:९, २७) आणखी एक गोष्ट ही की, ती शोमरोनी स्त्री अनैतिक जीवन जगत होती, आणि आपले पाप उघडकीस येऊन त्यावर टिका केली जाईल ही भीतीही तिला वाटली असावी.—योहान ४:१८.
तथापि, तिने अशी प्रतिक्रिया दाखविली नाही. उलट येशूच्या चतुर अशा आस्था उभारणाऱ्या पवित्र्याविषयी तिने व्यवहार्य प्रश्न विचारले. संभाषण पुढे गेल्यावर ती, यहुदी व शोमरोनी यांजमध्ये असणाऱ्या धार्मिक विभाजनापर्यंत आली. तेव्हा या विषयावर येशूने दयाळूपणे पण स्पष्टपणाने म्हटले: “तुम्हाला ठाऊक नाही त्याची तुम्ही उपासना करता; आम्ही आम्हाला ठाऊक आहे त्याची उपासना करतो.” (योहान ४:१९-२२) तिने स्वतःला अडखळवू दिले नाही. तिने आपले मन अधिक गोष्टींचे श्रवण करण्यासाठी खुले केले.
या कारणास्तव, येशूने महत्त्वपूर्ण घोषणा केली: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; एवढेच नव्हे तर आली आहे, कारण असे उपासक असावेत अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे व त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२३, २४) नंतर या खुल्या मनाच्या स्त्रीने स्वतः ऐकलेल्या गोष्टींविषयीची रसिकता, इतरांना कळवून व्यक्त केली. याचा परिणाम हा झाला की, तेही येशूकडे आले व त्यांनी त्याच्याकडून अधिक माहिती ग्रहण केली.—योहान ४:३९-४२.
आम्ही यापासून काय शिकतो? आम्ही वंशीय, राष्ट्रीय, धार्मिक अभिमान बाळगणाऱ्या वसाहतीतत राहात आहोत आणि कोणी वेगळ्याच वंशाचा, राष्ट्राचा किंवा धर्माचा आम्हाकडे बोलण्यास आला तेव्हा आमची प्रतिक्रिया कशी असते? विषयाच्या चर्चेत असे दिसून आले की आमची बाजू चुकीची आहे तर आम्ही ते पकडीत धरल्यासारखे गप्प बसतो का? किंवा आम्ही त्या शोमरोनी स्त्रीप्रमाणे बोलण्याची निदान इच्छा धरतो?
तुम्ही पौलाचे ऐकले असते का?
पहिल्या शतकात ज्याने उत्तम मसलती दिल्या त्यापैकी प्रेषित पौल हा एक होता. एकेकाळी तो स्वतः संकुचित मनाचा होता. तो कबुली देतो. “मी . . . पूर्वी निंदक, छळ करणारा व उपद्रव देणारा होतो . . . मला त्याने विश्वासू मानून, मी असा होतो तरी अविश्वासामुळे न समजून ते केले, म्हणून मजवर दया झाली.” (१ तीमथ्य १:१३) तथापि, त्याने येशू ख्रिस्ताबद्दलचे सत्य स्वीकारले व आपला अहंभाव काढून टाकला. पौलाचे उदाहरण स्पष्ट करते की, एखाद्याच्या अंतःकरणातील ‘तर्कवितर्क’ जीवनास घातक असतील तर पवित्र शास्त्र ते काढून टाकण्यास मदत देते.—२ करिंथकर १०:४.
ख्रिस्ती झाल्यावर पौलाने तात्काळ शिकलेल्या सुवार्तेविषयी निर्भिडपणे बोलण्यास आरंभ केला. त्याला सुद्धा, अपेक्षेप्रमाणे, तो पूर्वी होता तसे संकोचित मनाचे लोक मिळाले. पण ते प्रत्येक प्रकरणात नव्हते. उत्तर ग्रीसमधील बिरुया येथे त्याला काही नम्र लोक आढळले, जे समलत कशी ऐकून घ्यावी याविषयीचे उत्तम उदाहरण होते. या लोकांनी पौलाच्या शब्दातील सत्य ओळखले. त्यामुळे त्यांनी “वचनाचा स्वीकार मोठ्या उत्सुकतेने केला.” ते खुल्या मनाचे होते; फसणारे नव्हते. त्यांनी ‘या गोष्टी अशाच आहेत का याविषयी प्रतिदिवशी शोध केला.’ (प्रे. कृत्ये १७:११) त्यांना ऐकलेल्या गोष्टी आवडल्या. त्यांचा पूर्ण स्वीकार करण्याआधी त्यांनी पवित्र शास्त्रात त्यांचा खरेपणा पडताळून पाहिला.
“सर्व गोष्टींचा पारख करा”
आमच्या दिवसात, यहोवाचे साक्षीदार आपल्या इतर धर्मीय शेजांऱ्याकडे जाऊन त्यांना राज्याची सुवार्ता सांगण्यामध्ये पुष्कळ वेळ खर्च करतात. साक्षीदारांना कोणता प्रतिसाद मिळतो? पुष्कळ मित्रत्व प्रदर्शित करणारे लोक त्यांचा स्वाकार आनंदाने करतात. पण बरेच जण त्यांचे ऐकण्याचे नाकारतात; काही तर, साक्षीदार भेट घेतात म्हणून रागावतात.
हे दुःखाचे आहे. कारण यहोवाचे साक्षीदार ज्याविषयी बोलू इच्छितात ती पवित्र शास्त्रात संबोधिल्याप्रमाणे “सुवार्ता” आहे. (मत्तय २४:१४) याखेरीज, ते प्रेषित पौलाने राखलेली मनोवृत्ती राखण्याचे सर्वांना उत्तेजन देतात की, “सर्व गोष्टींची पारख करा व चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनीकाकर ५:२१) कोणापाशी जरी आक्षेप घेण्याजोगे काही असले तरीही त्यांनी बिरुयातील लोक तसेच शोमरोनी स्त्रीप्रमाणे देवाविषयी इतरांपाशी बोलणी करण्यामध्ये खुले मन ठेवले पाहिजे.
खुल्या मनाचे का असावे?
दर वर्षी हजारो लोक अशीच मनोवृत्ती दाखवीत आहेत हे आनंदाचे आहे. पुष्कळांना पवित्र शास्त्रात सामावून असलेले सूज्ञान उमगले व त्याचा परिणाम त्याच्या जीवनात खरा व चिरकालिक बदल घडविण्यात झाला. काही जण त्या जेनेट या युवतीप्रमाणे होते, जिला मादक द्रव्ये व मद्यप्राशनाची इतकी सवय जडली होती की, तिने सरतेशेवटी आत्महत्या करण्यापर्यंत आपली मजल नेली. पण आता, जेनेट एक आनंदी ख्रिस्ती व्यक्ती आहे. तिच्या पवित्र शास्त्र अभ्यासाने तिला पौलाची ही सूचना अनुसरण्यास बळ दिले: “शरीर व आत्मा यांना अशुद्ध करणाऱ्या सर्व गोष्टींपासून स्वतःला शुद्ध” करा.—२ करिंथकर ७:१.
वेर्नोन हा आणखी एक दारुबाज होता व त्याचा विवाह आता मोडण्याच्या लागास आला होता. पण पवित्र शास्त्रातील सूचनेचा अवलंब केल्यामुळे त्याने या सवयीवर मात केली व आपल्या पत्नीशी समेट करणे शक्य झाले. (१ करिंथकर ६:११) डेब्राला तर खूपच वंशिक अभिमान होता. पण पवित्र शास्त्र अभ्यास व ख्रिस्ती जनांच्या सहवासाने तिला आपल्या विचारात सुधारणा करता आली. (प्रे, कृत्ये १०:३४, ३५) याशिवाय, नेदरलँडमधील एका वेश्येच्याही जीवनात बदल होऊ शकेल असे कोणाला वाटले असते? पण जेव्हा तिने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तेव्हा तिजमध्ये बदल घडून आला. तिने लवकरच बाप्तिस्मा घेतला. शुद्ध असे ख्रिस्ती जीवन सुरु केले आणि आपल्या लेकरांचे संगोपन करण्याची जबाबदारी पूर्ण करू लागली.
लोक पवित्र शास्त्र जे शिकवते त्याकडे लक्ष देऊ लागतात तेव्हा अशा प्रकारातील अनुभव वारंवार घडतात. यापैकीच्या काहींना वाटले नव्हते इतक्या प्रमाणात त्यांचे जीवन बदलले गेले. अधिक महत्त्वाचे ते हे की, यांनी देवासोबतचे आपले नाते जुळवून घेतले व आता ते त्याला पूर्ण काकळूतीने “हे आमच्या स्वर्गातील पित्या,” ही प्रार्थना म्हणू शकतात. (मत्तय ६:९) याशिवाय, त्यांना खात्रीलायक व अतूट अशा भवितव्याची संधी सामोरी आहे. त्यांना लवकरच येशूने विदीत केलेल्या सत्याचा अनुभव येईल: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, त्याने जो तू एकच सत्य देव त्या तुझे, व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान संपादावे.”—योहान १७:३.
हीच माहिती, यहोवाचे साक्षीदार आपल्या जाहीर उपाध्यपणात तसेच आपल्या शेजाऱ्यांना भेटी देत असताना कळवू इच्छितात. लवकरच ते तुमची भेट घेतील. तर मग, त्यांचे ऐकून घेण्यासाठी तुम्ही आपल्या मनाचा मोकळेपणा प्रदर्शित करणार का?
[६ पानावरील चौकट]
शोमरोनी स्त्रीने येशूचे ऐकत असताना आपल्या अहंकाराला आड येऊ दिले नाही. तुम्ही याचप्रमाणे मोकळ्या मनाचे आहात का?