वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. २०-२३
  • मोठ्या बाबेलवरील उघड दोषारोप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठ्या बाबेलवरील उघड दोषारोप
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सध्याची बाबेल ईश्‍वरी नामाचा तिरस्कार करते
  • आम्हास बाबेलच्या शिकवणूकींचा तिरस्कार का वाटतो
  • आम्ही देवाविरुद्धच्या तत्वज्ञानास का धिक्कारतो?
  • मोठ्या बाबेलच्या फलप्राप्तीचा आम्हास तिटकारा का आहे
  • आम्ही बाबेलच्या अनीतीस का धिक्कारतो
  • आम्हास बाबेलच्या आध्यात्मिक वेश्‍याव्यवसायाचा का तिटकारा आहे
  • बाबेलच्या रक्‍तदोषाचा आम्ही का तिरस्कार करतो
  • मोठी बाबेल पडली, तिचा न्याय करण्यात आला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • कुप्रसिद्ध “वेश्‍या” तिचे पतन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मोठी नगरी उजाड झाली
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. २०-२३

मोठ्या बाबेलवरील उघड दोषारोप

१९८८-८९ मधील साखळी अधिवेशनात सबंध जगातील यहोवाच्या साक्षीदारांनी एक ठराव संमत करुन खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य मोठी बाबेल व तिचा प्रमुख प्रतिनिधी ख्रिस्ती धर्मराज्ये यांनी जी कुटील वागणूक सादर केली, तिचा तिटकारा व्यक्‍त केला. कोणी प्रांजळ व्यक्‍ती हेच विचारीलः ही अति कणखर भूमिका नव्हे का? नाही, कधीच नाही! कारण प्राचीन काळात इस्राएलातील संदेष्ट्यांनी त्यांच्या दिवसातील मूर्तिपूजेचा धीटपणे धिक्कार केला होता आणि येशूने देखील बलवान सुरात त्याच्या काळातील दांभिक धर्मसंस्कृतींना उघड केले होते. यास्तव आम्ही यहोवाचे साक्षीदार हा विश्‍वास बाळगतो की, आमची भूमिका न्याय्य आहे, इतकेच नव्हे तर ती देवाने दिलेली आज्ञा आहे.—यशया २४:१-६; यिर्मया ७:१६-२०; मत्तय २३:९-१३, २७, २८, ३७-३९.

तर मग, आम्ही कोणत्या मुळाधारावर मोठ्या बाबेलच्या वागणूकीचा तिटकारा व्यक्‍त करतो? विश्‍वाचा खरा सार्वभौम प्रभु यहोवा याचा आदर करण्यात धर्म मागे पडले आहेत याचा कोणता ऐतिहासिक पुरावा आम्हापाशी आहे?

सध्याची बाबेल ईश्‍वरी नामाचा तिरस्कार करते

विश्‍वाचा सार्वभौम प्रभु निनावी नाही. त्याने आपली ओळख पवित्र शास्त्रात यहोवा या नामाने ७,००० वेळा दिली आहे. आपल्या नावाला त्याने अद्वितीय महत्व जोडले आहे. दहा आज्ञांतील तिसरी आज्ञा म्हणतेः “तुझा देव यहोवा याचे नाम व्यर्थ घेऊ नको. कारण जो यहोवाचे नाम व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.” येशूने देखील प्रभूच्या प्रार्थनेत आपल्या पित्याच्या नावाला गौरवून असे म्हटलेः “तुझे नाम पवित्र मानिले जावो.”—निर्गम २०:७; मत्तय ६:९.

देवाचे नाम गौरविण्याच्या बाबतीत ख्रिस्ती धर्मराज्यांचा अहवाल अत्यंत निराशाजनक आहे. १६११ च्या किंग जेम्स पवित्र शास्त्र आवृत्तीतही यहोवा हे नाम वेगळे व संयुक्‍तपणे केवळ सात वेळा उल्लेखण्यात आले आहे.a इतर भाषांतरांनी तर ते नाम सर्वस्वी गाळलेले आहे. त्याच्या नावाचा सन्मान करण्यात बहुतेक धर्म मागे पडले आहेत. त्याऐवजी, त्यांनी “पवित्र” त्रैक्यत्व, व काही ठिकाणी तर मरीया हिला देवाची माता मानून पवित्र शास्त्राच्या देवापेक्षाहि अधिक मान दिला. त्यांनी यहोवाचे बहुमोल नाम अगदी निरुपयोगी अवस्थेत जाऊ दिले.b

हे स्तुत्य आहे की इस्लाम धर्म, त्यांचे पवित्र पुस्तक कुराण याला अनुसरुन एका देवास ओळखतात व त्याला ते अल्लाह अशी हाक मारतात. तरी ते त्याचे यहोवा हे नाम उपयोगात आणीत नाही; जे पवित्र शास्त्र किंवा बायबलमध्ये कुराण अस्तित्वात येण्याच्या दोन हजार वर्षे आधी उल्लेखित आहे. हिंदू धर्मीय लाखो देव व देवतांची भक्‍ती करतात, पण यात यहोवाला समाविष्ठ केलेले नाही.

या कारणास्तव, सार्वभौम प्रभु यहोवा याचे साक्षीदार असल्यामुळे, मोठ्या बाबेलकरवी देवाच्या पवित्र नामाची जी उपेक्षा होत आहे तिजबद्दल आपला तिटकारा व्यक्‍त केलाच पाहिजे.

आम्हास बाबेलच्या शिकवणूकींचा तिरस्कार का वाटतो

मानवी जीव अमर आहे या बाबेलच्या शिकवणूकीच्या आधाराने लाखो लोकांना सतत भयात ठेवण्यात आले आहे व याकरवी त्यांची पिळवणूक होत आहे. प्राचीन काळापासून खोट्या धर्माने मरणानंतर जिवांना अग्नीनरकात कायमच्या पीडा भोगाव्या लागतात या भयाने ग्रासिलेले आहे. या शिकवणूकीची अधिक फसवी पण मनास धीर देणारी कल्पना म्हणजे परगेटरीतील अग्नीची तात्पुरती पीडा. प्रांजळ जन आपल्या मृतांच्या सन्मानार्थ प्रार्थनापूर्वकचा विधी करण्यासाठी पैसे भरतात पण हे देय केव्हा देण्याचे थांबवावे याला सीमाच नाही! या निंदक धर्मतत्वाला पवित्र शास्त्रात कोणताच मुळाधार नाही.—पडताळा यिर्मया ७:३१.

खरे पहाता, मानव हा स्वतःच जिवंत असा मर्त्य जीव आहे असे पवित्र शास्त्र शिकविते. आदामाने आज्ञाभंग केला म्हणून त्याला अग्नीनरकात किंवा परगेटरीत जाण्याचा नव्हे तर मरण दंड देण्यात आला. अगदी साधेपणात म्हणायचे तर, “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३; उत्पत्ती २:७, १७; ३:१९) मृतांसाठी असणारी शास्त्रवचनीय आशा अमर जिवाच्या शिकवणूकीवर आधारीत नसून, अशांना नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर पूर्णत्वातील जीवनाकरता पुनरुत्थान प्राप्त होईल या देवाच्या अभिवचनावर आधारीत आहे.—योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:१-४.

दुसरी बाबेलची शिकवण आहे ती, “पवित्र” त्रैक्यत्व! तीन व्यक्‍ती पण एक देव ही शिकवण प्राचीन इब्री लोकांठायीच्या विश्‍वासाचा भाग नव्हती. (अनुवाद ५:६, ७; ६:४) स्वतः यहुदी असताना येशूने, आपण सर्वसमर्थ देव आहोत असा विश्‍वास बाळगला नाही व तशी शिकवणहि दिली नाही. बाबेलच्या धार्मिक शिकवणीत किंवा मतप्रणालीत शिकविले जाते तसा त्रैक्यत्वातील एक भाग असल्याचा त्याने कधीच दावा केला नाही.—मार्क १२:२९; १३:३२; योहान ५:१९, ३०; १४:२८; २०:१७.

यास्तव आम्ही जगभरातील खोट्या धर्माकरवी ही जी बाबेलची देवनिंदात्मक खोटी शिकवण दिली जाते तिचा धिक्कार करतो. आम्ही, यहोवा या एकच खऱ्‍या देवाची त्याच्या पुत्राकरवी भक्‍ती करतो. देवाच्या पुत्राने केवळ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्यासाठीच नव्हे तर सबंध मानवी जगाच्या पापास्तव “प्रायश्‍चिताचे अर्पण” दिले असे आम्ही मानतो.—१ योहान २:२.

आम्ही देवाविरुद्धच्या तत्वज्ञानास का धिक्कारतो?

ख्रिस्ती धर्मजगताचे पोप व पाद्रीगट नास्तिकवाद उचल खात असल्याचा शोक करीत आहेत आणि पुष्कळजण याचा उपयोग राजकारणातील उजव्या गटाला आपला पाठिंबा का आहे याच्या समर्थनार्थ करतात. तरीपण हा प्रश्‍न विचारावयाचा आहे कीः हा नास्तिकवाद उंचावण्यात अन्याय व उच्चनीच भेदभावाला खतपाणी घालून त्याला चिथावणी कोणी दिली आणि तीही खासकरुन गत शतकात? हे सर्व ख्रिस्ती धर्मराज्यांच्या प्रजाक्षेत्रात उल्लेखनीयरित्या घडले. उदाहरणार्थ, रशियातील कर्मठ चर्चवाल्यांनी, ज्यांनी आपल्या राजवटीत गरीबांना निष्ठुरपणे छळले होते त्या झार घराण्याशी मैत्री जोडली. देवाचे प्रतिनिधी आहोत असे आपणास सादर करणाऱ्‍यांनीच खऱ्‍या ख्रिस्ती मूल्यांची आपणामध्ये असणारी उणीव दाखवली तिनेच नास्तिकवादाचे वातावरण निर्माण करण्यास हातभार लाविला.

ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मांनी सृष्टीकर्त्याचा अपमान करणाऱ्‍या उत्क्रांतीच्या शिकवणूकीस देखील कवटाळले. ते लाखो जिवांच्या बनावटीतील गुंतागुंती आणि स्थित्यंतराचे श्रेय अंध शक्‍तींना देतात. एकंदरीत त्यांचे म्हणणे आहे की, ही स्थित्यंतरे अनेक उपयुक्‍त दैवयोग आहेत. हे तत्वज्ञान देवास अनावश्‍यक ठरविते आणि मनुष्य कोणालाहि जबाबदार नाही हे सुचविते. नीतीशास्त्र वैयक्‍तीक निवडीचा प्रकार ठरला. (स्तोत्रसंहिता १४:१) याचा एक परिणाम हा दिसतो आहे की, धार्मिक म्हणविणाऱ्‍या देशातच गर्भपातांची संख्या आज लाखांनी आपली मजल गाठते आहे!

आम्ही अशी देवनिंदात्मक तत्वज्ञाने व संस्कृतींचा धिक्कार करतो. आम्ही, “युगानुयुग जिवंत असणाऱ्‍या आणि ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिजवर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते उत्पन्‍न केले” त्याचीच भक्‍ती करतो.—प्रकटीकरण १०:६; १९:६.

मोठ्या बाबेलच्या फलप्राप्तीचा आम्हास तिटकारा का आहे

ख्रिस्ती धर्मराज्याने प्रकटीकरण २ व ३ अध्यायात सात मंडळ्यांना उद्देशून जो इशारेवजा संदेश दिला आहे तो पाळून चालण्यात अपयश दाखविले आहे. पंथप्रथा, मूर्तिपूजा, जारकर्म तसेच कोमटपणा आणि बेपर्वाई याजविरुद्ध तेथे सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणाही भक्‍तीस्थानास भेट द्या, तेथे हेच आढळेल की अनेक धार्मिकांनी सृष्टीकर्त्याऐवजी त्याच्या सृष्टीतील प्राणिमात्रांना अधिक उंचावले आहे. ते कसे? मूर्ति, प्रतिमा यांच्यासारखे प्रकार स्थानापन्‍न करुन तसेच महात्मे, मेडोना आणि क्रुसांची भक्‍ती करुन.—स्तोत्रसंहिता ११५:२-८; १ करिंथकर ५:७; १ योहान ५:२१.

यांच्याबाबतीत पौलाचे शब्द तंतोतंत पुरे होतातः “कारण, देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानिले नाहीत. . . . ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले . . . आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकारांच्या मूर्तींशी मोबदला केला.”—रोमकर १:२१-२३.

आम्ही बाबेलच्या अनीतीस का धिक्कारतो

गेल्या २० वर्षांत समलिंग संबंधास वैकल्पिक जीवन शैली म्हणून पसंती किंवा सूट दिली गेली असल्याचे आपण पाहतो. लाखो समलिंग पुरस्कर्ते “आपल्या अज्ञातवासातून” बाहेर रस्त्यावर आता दिमाखाने वावरत आहेत व आपल्या “मौजी अभिमानास” उंचावीत आहेत. देव त्यांच्या या समलिंग संबंधाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो?

पवित्र शास्त्राने सुमारे ३,५०० वर्षांपूर्वीच अगदी स्पष्ट शब्दात म्हटले होतेः “स्त्रीगमनाच्या रीतीप्रमाणे पुरुषगमन करु नको. हे अमंगळ कृत्य होय.” (लेवीय १८:२२) शिवाय, साधारण २,००० वर्षांआधी पौलाने आपल्या लिखाणात हे स्पष्ट केले की, देवाने घालून दिलेल्या आदर्शात बदल झालेला नाही. “यामुळे, देवाने त्यांस निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातील स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरला. तसेच पुरुषांनीही स्त्रियांबरोबरचा स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले, आणि त्यांच्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ त्यांनी आपल्या ठायी उपभोगिले.”—रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ६:९, १०; १ तीमथ्य १:१०.

तरीही, ख्रिस्ती धर्मराज्यातील कितीतरी पाद्रीजन समलिंग गमन अनुसरीत आहेत व जे एवढे बोकाळलेले आहे की, ते अनेक प्रमुख धर्म समाजात त्यांचा एक वेगळाच कक्ष स्थापित करु शकले. त्यांना या जीवन शैलीस मान्यता द्यावी व त्यांनाही पाद्री बनण्याची संधी दिली जावी अशी त्यांची मागणी आहे. यापैकीचे लक्षात राहण्याजोगे प्रकरण कॅनडातील आहे जेथे युनायटेड चर्च ऑफ कॅनडा, जे प्रॉटेस्टंट पंथीयांचे प्रमुख चर्च आहे, त्यांच्या पुढाऱ्‍यांनी, ऑगस्ट २४, १९८८ रोजी जी सभा झाली तिजमध्ये समलिंग पुरस्कर्त्यांनाही पुरोहितांचा दर्जा देण्याची अनुकुलता प्रदर्शित करण्यात २०५ विरुद्ध १६० मतदान दिले.

आम्हास बाबेलच्या आध्यात्मिक वेश्‍याव्यवसायाचा का तिटकारा आहे

बाबेलने “पृथ्वीवरील राजे” म्हणजे राजकीय सत्ताधिष्ठांसोबत जे जारकर्म आचरले आहे त्याविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक तिचा धिक्कार करते. ही वेश्‍या “बहुत जलांवर” म्हणजेच, “लोक, जनसमूह, राष्ट्रे, भाषा” यांचेवर जणू स्वार असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. (प्रकटीकरण १७:१, २, १५) राजकीय अधिपतींशी उबदार मित्रत्व राखून खोटा धर्म आज अनेक शतके उघडपणे वा अर्धवट झाकलेल्या अवस्थेत आपल्या प्रभावी बळाचा सर्वसाधारण लोकांना दडपून टाकण्यास किंवा स्वार्थ साधण्यास उपयोग करीत आहे.

या वर्चस्वाची काही उदाहरणे व्हॅटिकनने नाझी व फॅसिस्ट हुकुमशहांसोबत या २० व्या शतकात जे करार किंवा समझोते केले त्यात दिसतात. याच्या परिणामात, चर्चने त्यांच्या कळपांना सर्वस्वी क्रुर अधिपतींच्या हवाली केले. १९२९ मध्ये व्हॅटिकनने फॅसिस्ट हुकुमशहा बेनीटो मुसलोनी याचेशी करार केला. यानंतर, जर्मनीत काय घडले? जर्मनीचे कार्डिनल फॉलहेबर यांनी पोप पायस ११ वे यांच्याविषयी काढलेल्या पुढील प्रशंसनीय उद्‌गारात पोपच्या मनात हिटलरविषयी काय होते त्याची अंतर्दृष्टी दिलीः “मला आनंद वाटतो की ही अशी पहिली व्यक्‍ती आहे जिने बॉलशिविझम विरुद्ध स्वर उंचावला आहे.” फॉलहेबर नंतर म्हणतातः “माझी रोमची फेरी बऱ्‍याच काळापासून हाच संशय बाळगून होती. रोममध्ये ही विचारप्रणाली आहे की कम्युनिझम आणि बॉलशिविझम याचे विरोधात नॅशनल सोशलिझम आणि फॅसीझम हे दोनच पर्याय आहेत.”

जर्मनीतील कॅथोलिक बिशप १९३३ पूर्वी नाझी तत्वज्ञानास विरोध करीत होते. पण जर्मन लेखक क्लॉज श्रोडर यांनी द चर्चेस ॲण्ड थर्ड रिच या आपल्या पुस्तकात म्हटले त्यानुसार व्हॅटिकनने राजदूत म्हणून जर्मनीला पाठविलेल्या कार्डिनल पेसेलीनींनी असा हुकुम काढला की नॅशनल सोशालिझम बद्दलच्या आपल्या वृत्तीत बदल करावा. पण हा बदल का? कारण तिसरे साम्राज्य आणि व्हॅटिकन यांच्यामध्ये करार घडून येणार होता. हा करार जुलै २०, १९३३ रोजी झाला.

क्लॉज श्रोडर म्हणतातः “१२ नोव्हेंबर [१९३३] रोजी जी निवडणूक आणि सार्वत्रिक मतदान झाले त्यात हिटलरने सर्वात अधिक “होय” मते कॅथोलिकाकरवी मिळवून रिच सोबतच्या कराराची फळे मोठ्या प्रमाणात लुटली.”

जरी अल्पसंख्याक प्रॉटेस्टंट नेत्यांनी नाझी नेतृत्वास १९३३ मध्ये अधिकारपदी येण्यास विरोध केला तरी त्यांचा आवाज राष्ट्रीयत्वाच्या जयघोषात लुप्त झाला. श्रोडर पुढे म्हणतातः “प्रॉटेस्टंट चर्चमध्ये पूर्वी जी सावधगिरी बाळगली जात होती ती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती हे सुव्यक्‍त होते व आता राष्ट्रीय उत्साहाचे उधान आले होते. . . . चर्चच्या अधिकृत निवेदनात, प्रथमच, नवीन रिचला काही बंधने न पाळता पाठिंबा जाहीर करण्यात आला.” प्रत्यक्षात प्रॉटेस्टंट पंथीयांनी स्वतःला, कॅथोलिकांनी केले तसेच नाझींच्या राष्ट्रीयत्वास विकले व ते त्यांचे बगलबच्चे बनले.

आज अनेक शतके, ऐतिहासिक अहवाल हे स्पष्ट करतो की, खोट्या धर्माने अधिकारपदी असलेल्या शक्‍तीशाली श्रेष्ठींची दाट मैत्री राखून त्यांच्या प्रतिष्ठेस सर्वसाधारण लोकांची हानी करण्यात उपयोगात आणले. सत्ता, धन आणि जहागिरी मिळविण्याच्या मागे अधाशीपणाने धावलेल्या जगभरातील धर्माधिकाऱ्‍याकरवी ‘ख्रिस्ताप्रमाणेची चित्तवृती’ प्रदर्शित झाली नाही. आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे अशा या आध्यात्मिक वेश्‍याव्यवसायाचा तिटकारा करतो.—योहान १७:१६; रोमकर १५:५; प्रकटीकरण १८:३.

बाबेलच्या रक्‍तदोषाचा आम्ही का तिरस्कार करतो

प्रकटीकरण पुस्तकात मोठ्या बाबेलवर प्रचंड रक्‍तपाताचा दोष आहेः “ती स्त्री पवित्र जनांच्या रक्‍ताने व येशूच्या साक्षांच्या रक्‍ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली . . . तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.”—प्रकटीकरण १७:६; १८:२४.

खोट्या धर्माचा इतिहास द्वेष व रक्‍तपात यांनी खच्चून भरलेला आहे व त्याचा प्रमुख भाग ख्रिस्ती धर्मराज्ये तर रक्‍तलांछित आहेत. दोन्ही जागतिक महायुद्धे स्वतःला ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍या ख्रिस्ती राज्यात सुरु झाली. “ख्रिस्ती” राजकीय नेत्यांनी १९१४ व १९३९ मध्ये शस्त्रास्त्रांचा आधार घेतला व या स्पर्धक राष्ट्रांना त्यांच्या पाद्रींनी आशीर्वाद देखील दिले. द कोलंबिया हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड पहिल्या जागतिक महायुद्धाबद्दल म्हणतेः “जीवनात सत्याचे मोल राहिले नाही, व विरोधात तर आवाजच उठले नाही. देवाच्या वचनाचे रक्षक युद्धाच्या ध्रुपदास उंचावत होते. कट्टर द्वेष हाच सार्वत्रिक युद्धाचे बळ ठरला.” (तिरप्या वळणाच्या अक्षरांचा प्रकार आमचा.) लष्करी पाद्रींनी त्यांच्या सैनिकांना अधिक कळकळीचे देशभक्‍त बनण्याचा उपदेश केला कारण दोन्हीकडील युवक तोफात गोळे भरण्याच्या कामाला जुंपले होते. तेच इतिहासाचे पुस्तक पुढे म्हणतेः “पुरुषांच्या विचारात अगदी पद्धतशीरपणे राष्ट्रीयत्वाच्या रोगाचे विष भरवून . . . शांतीप्राप्त्यर्थ प्रयत्नांना अनेक अडथळे निर्माण केले गेले.”

खोट्या धर्माने सबंध जगभरात, यहुदी आणि मुस्लीम, हिंदू व शीख तसेच कॅथोलिक व प्रॉटेस्टंट, मुस्लीम व हिंदू, बुद्ध व हिंदू यात जे झगडे चालू होते त्यात अधिक त्वेषाची व द्वेषाची मुळे रुजविली. होय, खोटा धर्म सतत त्याचा रक्‍तपात पुढे चालवून होता व त्यानेः “पृथ्वीवर वधिलेल्या सर्वांचे रक्‍त सांडले.”—प्रकटीकरण १८:२४.

वर उल्लेखिलेल्या सर्व पुराव्यांचा विचार करता यहोवाच्या साक्षीदारांना वाटते की, त्यांनी १९८८ मध्ये जो अधिवेशनीय ठराव संमत केला तो अगदी योग्य व समयोचित होता. आम्ही खोट्या धर्माचा रक्‍तपाती वेश्‍या, मोठी बाबेल म्हणून अगदी योग्यपणे धिक्कार करतो. शांती व खरी भक्‍ती यांच्याकडे नेणाऱ्‍या मार्गाची आम्ही जगास घोषणा करीत आहोत व तो आहेः विश्‍वाचा सार्वभौम प्रभु यहोवा याजपाशी त्याने पृथ्वीवर पाठविलेला त्याचा मशीहा वा ख्रिस्त येशू याच्याद्वारे येणे. याचाच अर्थ, मानवजातीच्या सर्व गरजा पूर्ण करु शकणारे नीतीमान व सार्वकालिक सरकारचा, देवाच्या राज्याचा स्विकार करणे. याचा असाही अर्थ होतो की, आम्ही पुढील आज्ञेचे पालन करण्याची हीच निकडीची वेळ आहे की, “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या [मोठ्या बाबेलच्या] पापाचे वाटेकरी होऊ नये व तिच्या पीडातील कोणतीहि पीडा तुम्हाला होऊ नये म्हणून तिच्यातून निघा.”—प्रकटीकरण १८:४; दानीएल २:४४; योहान १७:३.

[तळटीपा]

a  उत्पत्ती २२:१४; निर्गम ६:३; १७:१५; शास्ते ६:२४; स्तोत्रसंहिता ८३:१८; यशया १२:२; २६:४.

b  देवाच्या नावाचे महत्व व त्यामागील अर्थसूचकता याविषयीच्या सविस्तर विचारविनिमयासाठी द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्युअर फॉरएव्हर हे ३२ पृष्ठांचे, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क करवी प्रकाशित झालेले माहितीपत्रक पहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा