कुप्रसिद्ध “वेश्या” तिचे पतन
“[ती] पडली, मोठी बाबेल पडली; जिने आपल्या जारकर्माचा क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजिला.”—प्रकटीकरण १४:८.
हा व यानंतरचा लेख, “नेमलेला समय जवळ आला आहे” या परिसंवादातील समारोपाचे भाषण या अर्थी होता. हा परिसंवाद १९८८ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी न्याय” या प्रांतिय अधिवेशनात सादर केला गेला
१. कुप्रसिद्ध वेश्या कोण आहे, व आम्हाला तिजबद्दलची माहिती का असावी?
हीकुप्रसिद्ध “वेश्या” कोण आहे? आम्ही तिजबाबत चर्चा करण्याची गरज का आहे? आजच्या थरारक कादंबऱ्या, चित्रपट, दूरदर्शन आणि व्हिडिओ कार्यक्रम अनैतिकतेच्या विषारी घोटांना घशात उतरविण्यास पुरेसे आहेत. ते खरे! पण ही कोणी साधारण संध्यादेवी नाही. तर प्रत्यक्षात, ती अत्यंत प्रभावी तसेच अत्यंत कुविख्यात आणि सबंध मानवी इतिहासात एवढी खुनशी वेश्या झाली नसेल, अशी आहे. आज ४,००० पेक्षा अधिक वर्षे ती स्वतःच्या विक्रीचा धंदा करीत असल्यामुळे आमच्या सुरक्षिततेसाठी तिची ओळख जाणून घेण्याची गरज आहे. प्रकटीकरण १४:८ मध्ये एक स्वर्गीय देवदूत या कुप्रसिद्ध स्त्रीला “मोठी बाबेल” असे संबोधून तिचे वर्णन, ती राष्ट्रांना कुकर्माकरिता प्रवृत्त करणारी आहे असे करतो. ती जर एवढी अपायकारक आहे तर, तिजवर दंड बजाविण्याचा यहोवाकडील नेमलेला “समय जवळ आला आहे” हे जाणणे आमच्यासाठी केवढ्या आनंदाचे आहे!—प्रकटीकरण १:३.
२. या वेश्येला तिचे नाव कोठून प्राप्त झाले आणि एका खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याची सुरवात कशी झाली?
२ या वेश्येने आपले नाव प्राचीन काळातील बाबेलकडून उचलले आहे, जे शहर मेसोपोटेमियात ४,००० पेक्षा अधिक वर्षांआधी निम्रोदने वसविले होते. निम्रोद हा स्वतः “यहोवाच्या विरुद्धतेतील पारधी” होता. जेव्हा बाबेलच्या लोकांनी एक गगनचुंबी धार्मिक बुरुज उभारण्यास सुरवात केली त्यावेळी यहोवाने त्यांच्या भाषेत घोटाळा निर्माण केला व त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. त्यांनी त्यांचे धर्म सोबत नेले व यामार्गी बाबेल पंथीय धर्मांच्या जगव्याप्त साम्राज्याची सुरवात झाली. ते खरेच मोठे बाबेल आहे. (उत्पत्ती १०:८-१०; ११:१-९) आमच्या काळातही प्राचीन बाबेलची गुढार्थक गूजे सर्व जगातील विश्वासात आणि रीतीरिवाजात आढळून येतात. (प्रकटीकरण १७:७) बाबेल या शहराच्या इब्री नावाचा अर्थ “घोटाळा” असा होतो, जे आजच्या काळातील खोट्या धर्मांतील गोंधळांना अगदी यथायोग्य खुणचिठ्ठी आहे.
३. (अ) केवढा काळ बाबेलने देवाच्या लोकांना गुलामगिरीत ठेवले होते, त्यांना कशाचे सान्निध्यात आणिले होते? (ब) बाबेलने कधी नाशकारक पतन अनुभविले, आणि तिचा अंत त्याचवेळी का झाला नाही?
३ प्राचीन बाबेल त्या प्राथमिक आघातापासून आता सावरली आणि इ. स. पूर्वी ६३२ मध्ये अश्शूरचा पाडाव करुन पवित्र शास्त्र इतिहासातील तिसरी जागतिक सत्ता बनली. तिचे गौरव अल्पकाळ टिकले—शंभरपेक्षाही कमी वर्षे टिकले—तरी त्यातील ७० वर्षे तिने देवाच्या इस्राएल लोकांना गुलामगिरीत जखडले होते. यामुळे ते, बाबेलमधील हजारो मंदिरांच्या, त्यांच्या त्रैक्य दैवतांच्या व त्रैक्यत्वातील दुरात्म्यांच्या तसेच माता-पुत्राच्या भक्तीच्या व तथाकथित अमर असणाऱ्या दैवतांच्या भक्तीकडे नेणारे ज्योतिषशास्त्र यांच्या सान्निध्यात आले. तद्वत, इ. स. पूर्वी ५३९ मध्ये बाबेलास जो नाशकारक अधःपात सोसावा लागला त्यावेळी गुलामगिरीतील इस्राएल, खोट्या धर्माच्या जागतिक मुख्य केंद्रात उपस्थित होते. पण तिचा अंत अद्याप होणे नव्हते. तिजवर विजय मिळविणारे पुढे सतत तिचा एक प्रतिष्ठित धार्मिक केंद्र म्हणून दिमाखाने उपयोग करु लागले.
गोलार्धव्याप्त धार्मिक साम्राज्य
४. (अ) यहोवाच्या संदेष्ट्यांनी बाबेलबद्दल काय घोषित केले होते आणि बाबेलचे काय झाले? (ब) पृथ्वीवरील लोकांच्या हानीकरता दुसरे कोणते बाबेल जिवंत राहिले?
४ यहोवाच्या संदेष्ट्यांनी त्याच्याकडील न्यायदंडाची घोषणा केली की, देवाने “सदोम व गमोरा यांचा जसा सर्वनाश केला”, तसेच तो बाबेलास “नाशरुपे झाडूने” झाडून टाकील. या भविष्यवादाची पूर्णता त्यानंतर झाली का? होय, अगदी शब्दशः झाली. नेमलेल्या वेळी, प्राचीन बाबेल नासाडीचा ढिगार बनले, आणि जसे पूर्वभाकित करण्यात आले त्याप्रमाणे तेथे केवळ वनचर आणि हिंस्रपशूंच्या वस्तीशिवाय निर्जनता आली! (यशया १३:९, १९-२२; १४:२३; यिर्मया ५०:३५, ३८-४०) तथापि, दुसरी बाबेल, आधुनिक मोठी बाबेल अजूनही जिवंत आहे. खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य या रुपाने ती मूळ बाबेलच्या शिकवणी व गर्विष्ठ आत्म्याला जागृत ठेवण्याचे काम करत आहे. यहोवाकडील राज्याच्या उद्देशाबाबत लोकांची मने अंधळी करण्याचे, ती, सैतानाचे प्रमुख उपकरण आहे.—२ करिंथकर ४:३, ४.
५. (अ) बाबेल तिच्या गौरवाच्या कळसास पोहोचली असता कोणकोणते धर्म उदयास आले, पण सबंध जगास खोट्या धर्माकरवी नाशास लोटण्यात सैतानाला यश का आले नाही? (ब) ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर सैतानाने खोट्या धर्माचा कसा उपयोग करुन घेतला?
५ ख्रिस्तपूर्व सहा शतकांच्या आधी, बाबेलची जागतिक सत्ता आपल्या गौरवाच्या कळसास पोहंचली होती त्यावेळी हिंदू, बुद्ध, कन्फ्युशियनिझम् व शिंतोईझम् हे धर्म उदयास आले होते. पण सर्व जगास खोट्या धर्माकरवी वेढण्यात सैतानाला यश प्राप्त झाले का? नाही. कारण यहोवाच्या प्राचीन साक्षीदारांतील शेषवर्ग बाबेलमधून यरुशलेमास यहोवाची भक्ती तेथे परत पुनर्स्थापित करण्यास परतला. अशाप्रकारे, सहा शतकानंतर मशीहाचे स्वागत करण्यास व ख्रिस्ती मंडळीचे प्राथमिक सदस्य बनण्यास विश्वासू यहुदी अस्तित्वात होते. येशू आणि त्याच्या प्रेषितांनी आधीच भाकित केल्यानुसार खोट्या धर्माने देवाच्या स्वपुत्राचे हुतात्मिक मरण आणि खऱ्या ख्रिस्ती धर्माचा विरोध करण्यातील सैतानाचे प्रमुख उपकरण म्हणून भूमिका पार पाडली.—मत्तय ७:१५; प्रे. कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१.
६. (अ) ख्रिस्ती शिकवणूकींना सैतानाने कसे भ्रष्टविले, आणि देवास अपमानकारक अशा कोणत्या शिकवणूकी प्रचारात आणिल्या? (ब) त्या हजारोंबद्दल काय जे बाबेलच्या मतप्रणालीऐवजी पवित्र शास्त्र सत्य स्विकारतात?
६ खासकरुन, इ. स. ७० मध्ये यरुशलेमाचा दुसऱ्यांदा नाश घडवून आणल्यावर, सैतानाने खोट्या प्रेषितांचा वापर करुन ख्रिस्ती शिकवणूकीत भ्रष्टता आणून त्यांच्यामध्ये बाबेली गूढवाद आणि जगीक विचारांचे ग्रीक तत्ववादांचे मिश्रण करुन गोंधळ उत्पन्न केला. याप्रकारे, पवित्र शास्त्रामधील “अनन्य यहोवा” ऐवजी ‘ईश्वरी त्रैक्य’ किंवा त्रैक्यत्वाच्या शिकवणीस पसरविले. (अनुवाद ६:४; मार्क १२:२९; १ करिंथकर ८:५, ६) तसेच मूर्तिपूजक तत्ववेत्ता प्लॅटो याने प्रचलित केलेल्या अमर जिवाच्या शिकवणूकीस, पवित्र शास्त्रातील ख्रिस्ताची खंडणी आणि पुनरुत्थान या मोलवान शिकवणींना नगण्य ठरविण्यास आग्रहाने मांडले. याकरवी, अग्नीमय नरक आणि कमी तप्त परगेटरीच्या विश्वासांना मार्ग मोकळा झाला. (स्तोत्रसंहिता ८९:४८; यहेज्केल १८:४, २०) याप्रकारच्या ईश्वरनिंदक शिकवणी, ज्या लोकांना सर्व प्रकारच्या भयात लपेटून ठेवतात, त्या चर्चचे खजिने भरण्यास हातभार लावतात. एवढेच नव्हे तर, चौकशी आणि पुनर्रचना यांच्या नावाखाली थैमान माजविलेल्या दिवसात धर्मपुढाऱ्यांनी नरकाग्नीतील ज्वालेवर यातना देण्याचे काम टाकले नाही. तर ज्यांनी बाबेली शिकवणींऐवजी पवित्र शास्त्रीय सत्यांना कवटाळले होते अशा हजारोंना कॅथोलिक व प्रॉटेस्टंट धर्मपुढाऱ्यांनी खांबावर जिवंत जाळले. इतकेच नाही, तर जसे आपण पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणे मोठ्या बाबेलची शिंदळकी ही खोटेपणा वाढविण्याच्याही पलीकडे गेली आहे.
यहोवाच्या न्यायाचा दिवस
७. (अ) केव्हापासून आणि कशाप्रकारे यहोवाने मूळ पवित्र शास्त्र सत्यांना परत रोविण्यास आणि बाबेलच्या खोट्या शिकवणूकींना उघड करण्यास सुरवात केली? (ब) कोणत्या मूळ सत्यांना पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी परत स्थापित केले?
७ या वेश्येचा न्याय करण्याचा यहोवाचा दिवस आलाच पाहिजे! (इब्रीयांस १०:३०) १८७० च्या काळापासून सुरु झालेल्या प्रास्ताविक तयारीच्या काळात यहोवाने आपल्या ‘निरोप्या’ला—एका प्रांजळ शास्त्र विद्यार्थ्यांच्या गटाला—खोट्या बाबेली शिकवणींना उघड करुन पवित्र शास्त्रीय सत्यांची पुनर्स्थापना करावयास सामोरे आणले. (मलाखी ३:१अ) या “निरोप्या” गटाने प्रकटीकरण ४:११ मधील भविष्यवादित शब्दांकडे लक्ष आकर्षित केले कीः “हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत, असे म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस; कारण तूच सर्वकाही उत्पन्न केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” हा “निरोप्या”, येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाचेही समर्थन करणारा बनला, जी देवाने मानवजातीच्या मुक्ततेकरिता पुरविली. मुक्तताप्राप्त मानवजातीत प्रथम, जे येशूसोबत स्वर्गीय राज्यात राज्य करतील त्यांचा समावेश आहे, व नंतर त्या लाखो लोकांचा आहे जे पृथ्वीवरील नंदनवनाचे सार्वकालिक जीवन अनुभवतील, आणि यांच्यामध्येच मृतातून पुनरुत्थान मिळविणारेही समाविष्ट असतील. (लूक १२:३२; १ योहान २:२; प्रे. कृत्ये २४:१५) होय, त्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी या मूल सत्यतत्वांचा पाया परत रोविला, आणि लाक्षणिकपणे म्हणावयाचे म्हणजे, त्यांनी बाबेलच्या सार्वकालिक यातनांच्या ‘नरकावर पाण्याचा जोरदार मारा करुन तेथील अग्नी शमविला.’a
८. (अ) कशाप्रकारे ख्रिस्ती धर्मराज्याच्या पाद्रीगटाने, पहिल्या जागतिक महायुद्धाचा पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या नाशाकरता उपयोग केला? (ब) ज्याने वॉचटावर सोसायटीच्या आठ अधिकाऱ्यांना जामीन नाकारुन तुरुंगात टाकिले त्या न्यायधिशांचे काय झाले?
८ सुमारे ४० वर्षे हे पवित्र शास्त्र विद्यार्थी हे निर्भिडपणे घोषित करीत होते की, १९१४ हे वर्ष विदेश्यांच्या काळाच्या समाप्तीचे वर्ष ठरणार. अपेक्षेप्रमाणे त्या वर्षी, जगास हादरविणाऱ्या अशा घटना घडल्या ज्यात पहिल्या जागतिक महायुद्धाचा समावेश होता. होय, या जागतिक संकटाचा मोठ्या बाबेलचा सर्वात मुख्य भाग असणाऱ्या ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगटाने, स्पष्टवक्त्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचा नाश घडून यावा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला. शेवटी १९१८ मध्ये त्यांच्यावर राजद्रोहीपणाचा ठपका येऊन वॉचटावर सोसायटीच्या आठ अधिकाऱ्यांना कैदखान्यास रवाना केले. पण या अधिकाऱ्यांना नऊ महिन्यांनंतर सोडून दिले व नंतर सर्व आरोपातून मुक्त केले गेले. अमेरिकेचे फेडरल न्यायाधीश मार्टीन टी. मेन्टन यांनी जामीन नाकारुन या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना तरुंगात ठेवले होते त्यांना नंतर पोप पायस अकरावे यांनी, “नाईट ऑफ द ऑडर ऑफ सेंट ग्रेगरी द ग्रेट” हा किताब देऊन भूषविले. तथापि, हा दिमाख फार काळ टिकला नाही. कारण १९३९ मध्ये त्यांना दोन वर्षांची सक्त मजुरी व भारी दंडाची शिक्षा देण्यात आली. ती का? कारण त्यांच्यावर सहा कोर्टांचे निकाल २७,९०,००० रुपयांची लाच घेऊन विकल्याचा आरोप सिद्ध झाला.
९. यहोवाच्या लोकांचे काय होत आहे हे मलाखीच्या भविष्यवादाने कसे स्पष्ट केले, तर न्याय कोणापासून सुरु झाला?
९ आपण नुकतेच पाहिले आहे की यहोवाच्या साक्षीदारांनी १९१८ मध्ये एका कठीण परिक्षा काळात प्रवेश केला. जे काही घडले ते संदेष्ट्याच्या मलाखी ३:१-३ मधील पुढील शब्दात स्पष्ट होतेः “ज्या प्रभूला [यहोवाला] तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, [अब्राहामाचा] करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची” येशूची संगत असेल. होय, यहोवा आपल्या ख्रिस्तासह न्यायनिवाडा करावयास आला. यहोवा यानंतर विचारतोः “त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातु गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे.” १ पेत्र ४:१७ मध्ये म्हटल्यानुसार न्यायाची अंमलबजावणी जे ‘देवाच्या घरचे’ असल्याचे म्हणवितात, त्यांच्यापासून होणार. अशाप्रकारे, खऱ्या ख्रिश्चनांना यहोवाच्या सेवेकरिता शुद्ध व पवित्र करण्यात आले.
“माझ्या लोकांनो, . . . तिच्यातून निघा”!
१०. कोणता ईश्वरी न्याय १९१९ च्या सुमारास ख्रिस्ती धर्मराज्यावर आणि खोट्या धर्मावर गुदरला, व मोठ्या बाबेलवर त्याचा काय परिणाम झाला?
१० मोठ्या बाबेलचा पश्चातापहीन अविभाज्य भाग म्हणून ख्रिस्ती धर्मराज्याचा पाद्रीवर्ग यहोवाकडील न्यायदंड चुकवू शकणार नाहीत. जागतिक महायुद्धांच्या भयानक रक्तपातास आणि खऱ्या ख्रिश्चनांच्या अमानुष छळात सहभागी होऊन त्यांनी आपली वस्त्रे कलंकित केली आहेत. (यिर्मया २:३४) ख्रिस्तामार्फतच्या स्वर्गीय राज्याच्या आगमनाचे स्वागत करण्याऐवजी, त्यांनी जिचे वर्णन, “पृथ्वीवर देवराज्याचे राजनैतिक प्रतिनिधीत्व करणारी” असे केले, त्या मनुष्यनिर्मित लिग ऑफ नेशन्सचे महत्व वाढविले. १९१९ पर्यंत हे स्पष्ट झाले की, यहोवाने ख्रिस्ती धर्मराज्यावर आणि सोबतच्या खोट्या धर्मांवर आपला न्यायदंड बजावला आहे. मोठी बाबेल पडली व तिला मृत्युदंड झाला. याचकरता, जे सर्व सत्यावर आणि नीतीमत्वतेवर प्रेम करतात त्या सर्वांनी यिर्मया ५१:४५ मधील भविष्यवादानुसार हालचाल करण्याची वेळ आली होती की, “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्यातून निघून जा! यहोवाच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.”
११, १२. (अ) मोठ्या बाबेलवरील न्यायदंडाबद्दल एका देवदूताने प्रकटीकरण १७:१, २ मध्ये काय म्हटले? (ब) मोठी कळवंतीण बसलेली आहे ती “बहुत जले” काय आहेत, आणि तिने पृथ्वीच्या रहिवाश्यांना “तिच्या जारकर्मरुपी द्राक्षारसाने” कसे मस्त केले आहे?
११ मोठी बाबेल पडली! पण तिचा अद्याप नाश झालेला नाही. खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य म्हणून, सैतानाचे ठकविण्याचे उत्कृष्ट उपकरण यानाते, ती थोडा वेळ अधिक राहील. तिजवरील देवाकडील अंतिम न्यायदंड काय असेल? त्याबद्दल आम्हास कोणा साशंकतेत सोडलेले नाही. आपण आपापल्या पवित्र शास्त्रात प्रकटीकरण १७:१, २ काढू. येथे दिव्यदूत प्रेषित योहानास व त्याच्या द्वारे, आजचे त्या भविष्यवादाचे विद्यार्थी यांना उद्देशून म्हणतोः “इकडे ये, म्हणजे बहुत जलांवर बसलेली मोठी कळवंतीण हिचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो; तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरुपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे जन मस्त झाले.” यातील “बहुत जले” ही संज्ञा पृथ्वीवरील अनावर लोकसमुदायाला उद्देशून आहे, ज्यांची इतका काळ या मोठ्या बाबेलने पिळवणूक केली आहे. शिवाय भविष्यवाद म्हणतोः “पृथ्वीवर राहणारे जन” तिच्या द्राक्षारसाने मस्त झाले आहेत. त्यांना मोठ्या बाबेलच्या खोट्या शिकवणींनी आणि जगीक अनैतिकतेच्या मार्गांनी स्वस्त व बेकायदेशीर दारुच्या व्यसनाप्रमाणे मस्त केले आहे.
१२ याकोब ४:४ मध्ये आम्ही वाचतोः “अहो, व्यभिचारणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही का?” विसाव्या शतकातील धर्म या जगाबरोबर खुशामत करुन मर्जी संपादण्यास अगदी हातघाईत असतात व यात ख्रिस्ती धर्मराज्ये आघाडीवर आहेत. यहोवाकडून येणाऱ्या राज्याची सुवार्ता घोषित करण्यात त्यांचे पाद्रीवर्ग मागे पडले आहेत इतकेच नसून त्यांच्या चर्च सदस्यांना नैतिकतेचे शिक्षण पवित्र शास्त्रातून देण्यावर त्यांनी चक्क पाणी सोडून दिले आणि जगीक विचाराच्या स्वैराचरणास परवानगी दिली. याशिवाय, ज्याचा प्रेषित पौलाने एवढ्या स्पष्ट शब्दात धिक्कार केला आणि म्हटलेः “फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी . . . यांस देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी . . . धुतलेले . . . असे झाला आहा.” तरी त्यांचेतील पाद्रीगट सर्व प्रकारच्या शारीरिक जारकर्मात निरपराधी नाहीत.—१ करिंथकर ६:९-११.
“गाळात लोळणे”
१३, १४. (अ) कोणती उदाहरणे हे स्पष्ट करतात की, आधुनिक काळातील पाद्रीगटास “धुवून स्वच्छ” केलेले नाही? (ब) चर्च ऑफ इंग्लंडच्या धर्मसभेने समलिंगी नैतिक संबंधातील लोकांच्या गुह्यांग कृतीबद्दल कसली चित्तवृती धारण केली व एका स्तंभलेखकाने चर्चला कोणते नाव द्यावे म्हणून सुचविले? (क) हे स्वधर्मत्यागी पाद्री प्रेषित पेत्राच्या कोणत्या शब्दांच्या वर्णनात बसतात?
१३ आजच्या काळातील पाद्रीवर्गाचे “अंग धुणे” उरकलेले आहे का? उदाहरण म्हणून पाहता, जे एकेकाळी प्रॉटेस्टंट पंथाचा बालेकिल्ला होते, त्या ब्रिटनमधील परिस्थितीकडे लक्ष द्या. नोव्हेंबर १९८७ ची गोष्ट, जेव्हा की, ब्रिटनच्या प्रधान मंत्री, तेथील पाद्रीगटास नैतिक आचारात पुढाकार घेण्याची हाक देत होत्या, त्याचवेळी अँग्लीकन चर्चचे रेक्टर म्हणत होतेः “लैंगिक विचार व्यक्त करण्याची जशी इतरांना मोकळीक आहे तेवढीच समलिंगी पुरस्कर्त्यांनाही असावी. आम्ही त्यातील चांगले ते धुंडाळावे आणि त्यांच्यातील [समलिंगी पुरस्कर्त्यांतील] इमानास उत्तेजन द्यावे.” लंडनच्या एका वर्तमानपत्राने म्हटलेः “समलिंगी समागम पुरस्कर्त्यांची संख्या एवढी वाढली की एका अँग्लीकन पाद्रींच्या शिक्षण महाविद्यालयात दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटीस येण्यास तेथील अधिकाऱ्यांना मनाई करावी लागली.” एका जनमत आकडेवारीतः “लंडनमधील एका प्रांतात, पाद्रीगटाच्या संख्येपैकी निम्म्याहून अधिकांचा कल समलिंगी पुरस्काराप्रत झुकलेला आहे.” तसेच, चर्च धर्मधिकाऱ्यांच्या उच्च सभेत, चर्च ऑफ इंग्लंडच्या पाद्रीगटांपैकी, ९५ टक्क्यांनी ह्या प्रस्तावास आपला पाठिंबा दिला, ज्यात परशय्यागमन आणि व्यभिचार यांना जरी पाप मानले तरी समलिंगी लैंगिक जननेंद्रियांच्या कृत्यांना नव्हे; अशी ही समलिंगी लैंगिक कृत्ये आदर्शांना थोडीफार कमी पडतात, एवढेच! यावर आपले मत मांडण्यात एक वार्ताहर सुचवितात की, “चर्च ऑफ इंग्लंड हे नाम बदलून त्याला सदोम आणि गमोरा हे नाव ठेवावे.” लंडनच्या दुसऱ्या एका वर्तमानपत्राने जाहीर केलेः “ब्रिटीश लोक, या सर्व गोष्टींना मोकळीक असणाऱ्या पिढीच्या कृत्यांना न्याहाळून गांगरले आहेत.”
१४ या सर्व वर्षांत धर्मभ्रष्ट पाद्रीवर्गाने स्वतःस केवढे हुबेहुब प्रेषित पेत्राच्या शब्दरचनेत बसविले आहेः “आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व गाळात लोळण्यास अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरीण अशी जी खरी म्हण आहे तिच्याप्रमाणे त्यांची गोष्ट आहे.”—२ पेत्र २:२२.
१५. (अ) सबंध ख्रिस्ती धर्मराज्यात नैतिक मूल्ये कशी ढासळलेली आहेत? (ब) या दयनीय हंगामाबद्दल कोण जबाबदार आहे?
१५ सबंध ख्रिस्ती धर्म जगतात तसेच सर्व जगात नैतिक मूल्ये सतत ढासळत आहेत. काही समाजात विवाहास अनावश्यक मानले जाते आणि ज्यांचा विवाह झाला आहे ते विवाहातील विश्वासूपणास कामचलाऊ समजतात. फार थोडके आज त्यांच्या जुटीला कायदेशीर बनवितात व जे तसे बनवितात अशांचे मध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २५ वर्षांत अमेरिकेत घटस्फोटाचे प्रमाण तिपटीने वाढून दरवर्षास दशलक्षापर्यंत पोहोचले आहे. १९६५ पासून पुढील २० वर्षांत ब्रिटनमध्ये चौपट, ४१ हजारापासून ते १,७५,००० पर्यंत पोहोचले आहे. जे सडे आहेत त्यांना जे त्यांच्यासारखेच सडे आहेत अशांसोबत समागम करावासा वाटतो व आपले सोबती बदलत राहावे असे वाटत असते. त्यांच्या अनैतिक जीवनी आचरणात शेवटी पेशींच्या वाढीमुळे जे लैंगिक संबंधातून एडस् सारखे भयानक रोग जडतात त्यावर विलाप करीत अधोगतीस जावे लागते. चुका करणाऱ्या आपल्या चर्च सदस्यांना ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीवर्गाने शासन केलेले नाही. ज्या मर्यादेपर्यंत त्यांनी अनैतिकतेकडे कानाडोळा केला आहे तर मग या दुःखद कापणीची जबाबदारी त्यांनी सहभागीपणात स्विकारली पाहिजे.—यिर्मया ५:२९-३१.
१६. (अ) असे कोणते जोर देऊन सांगण्यासारखे कारण आहे की ज्यामुळे मोठ्या बाबेलचे पतन झाले आणि प्रकटीकरण १८:२ मधील देवदूताची कोणती हाक उचित आहे? (ब) जे सर्व जगाच्या अंतातून बचावू इच्छितात त्यांनी काय करण्यास हवे?
१६ जगव्याप्त खोट्या धर्माच्या साम्राज्यातील दयनीय नैतिक अधोगती, मोठी बाबेल पडली या सत्याखाली अधोरेखा मारते. देवाने तिचा न्याय केला आहे व तिजवर नाशदंडाची खूण केलेली आहे. मग, एका देवदूताने जे काही मोठ्या आवाजात म्हटले ते प्रकटीरकण १८:२ मधील शब्द केवढे सार्थ आहेतः “पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची व सर्व प्रकारचा अशुद्ध आत्म्यांचा आश्रय सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.” मग, जे सर्व या जगाच्या अंतातून बचावून राहू इच्छितात त्यांच्याकरिता हे केवढ्या महत्वाचे आहे की त्यांनी ४थ्या वचनात उल्लेख आहे तशी कृती तत्काळ अनुसरावीः “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पिडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा!” खोट्या धर्मातून बाहेर पडणे हेच अगदी नजीक आलेल्या “मोठ्या संकटा”तून बचावून राहण्याकरिता उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरेल. (प्रकटीकरण ७:१४) याशिवाय अधिक काही करण्याची गरज आहे, ते काय ते पाहू.
[तळटीपा]
a नोव्हेंबर १, १९०३ रोजी, अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया संस्थानचे पिटस्बर्ग शहरातील कार्नगी हॉलमध्ये चार्ल्स टी. रसेल आणि डॉ. इ. एल. इटन यांचेतील चर्चेचे शेवटले सत्र संपल्यावर तेथे उपस्थित असलेल्या एका पाद्रीने बंधु रसेल यांच्या विजयाची कबुली दिली की, “मला आनंद वाटला तो याचा की, आपण नरकावरही सतत पाण्याचा जोरदार मारा करून तेथील अग्नीच शमविला.”
[८ पानावरील चौकट]
पाद्रींची नैतिक आचारसंहिता
“गेल्या पाच वर्षांत अमेरिकेतील कॅथोलिक पाद्रीगटाकरवी शेकडो लेकरांना जे जबरदस्तीने छळण्यात आले त्यामुळे मनावर प्रचंड आघात झालेला आहे असे पालक, मानसशास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी आणि या प्रकरणांचा छडा लावण्यात गुंतलेला वकीलवर्ग म्हणतो.”—अक्रॉन बेकन जर्नल, जानेवारी ३, १९८८.
“अमेरिकेतील रोमन कॅथोलिक चर्चच्या पाद्रीगटास लाखो डॉलर्सची नुकसान भरपाई त्या कुटुंबांना देण्याची सक्ती करण्यात आली ज्यांच्या लेकरांवर पाद्रींनी नैतिक अत्याचार केले. याचे व्यतिरिक्त हे प्रकरण एवढे गंभीर झाले की, अनेक कायदेतज्ञांनी व दुर्दैवींनी हेच उद्गार काढले की, चर्च अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करते, त्यांच्यावर पांघरुण घालते.”—द मियामी हेरल्ड, जानेवारी ३, १९८८.
[६ पानांवरील चित्रं]
त्रैक्य देवांच्या प्रतिमा—प्राचीन मिसर व ख्रिस्तीधर्मराज्य
[चित्राचे श्रेय]
Saint-Remi Museum collection, Reims, photo by J. Terrisse
Louvre Museum, Paris
[९ पानांवरील चित्रं]
पवित्र शास्त्र, अनैतिक धर्मनेत्यांची बरोबरी अंग धुतलेल्या डुकरीणीसोबत करते, जी गाळात लोळण्यास परतत असते