आमच्या काळासाठी दिव्यदूतीय संदेश
“देवा[ने] . . . आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून . . . चिन्हांनी ते कळविले.”—प्रकटीकरण १:१, न्यू. व.
१. अपॉक्लीप्स या नावाविषयी कोणता गैरसमज आहे, पण प्रकटीकरण भविष्याविषयी काय प्रकटविते?
अपॉक्लीप्स. हे नाव आपल्याला या २०व्या शतकात कितीदा ऐकायला मिळाले पण त्याची केवढी चुकीची समजूत बाळगली गेली! पवित्र शास्त्राच्या मते याचा अर्थ अण्वस्त्र भडक्यात सबंध मानवजातीचे उच्चाटन असा होत नाही. उलटपक्षी या ग्रीक शब्दाचा अर्थ, “पडदा दूर सारणे” असा आहे. पवित्र शास्त्रातील अपॉक्लीप्स वा प्रकटीकरण हे पुस्तक, भविष्यवादित चित्रांनी अशा घटनांचा पडदा दूर सारते ज्यांच्या कळसाला मानवजातीला चिरकालिक आनंद प्रदान करून देणाऱ्या युगाची प्रभा चकाकेल. याकरताच, येशूचा प्रेषित योहान प्रकटीकरणाचे प्रास्ताविक या शब्दांकरवी करतोः “ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.”—प्रकटीकरण १:३.
२, ३. एवढे दुःखित जग का आणि यहोवाने काय करण्याचा उद्देश केला आहे?
२ आज जग आनंदी नाही. त्याच्या दुःखाचे कारण, मोशाने सुमारे ३,४६० वर्षांआधी ज्या गीताची रचना केली होती त्यात नमूद आहेः “ते बिघडले आहेत. ते [देवाचे] पुत्र नव्हेत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.” (अनुवाद ३२:५) हे शब्द, ज्याची मूल्ये विपरीत व वाकडी झालेली आहेत त्या आजच्या पिढीला केवढे तंतोतंत लागू होतात बरे! उदाहरणार्थ, वर्ल्ड मिलिटरी ॲण्ड सोशल एक्स्पेंडिचर १९८७-८८ याचे प्रास्ताविक मोठ्या निर्भिडपणे म्हणतेः “सर्व राष्ट्रातील जीवन हे शस्त्रास्त्र स्पर्धेने वाकले आहे. अमेरिका व सोवियत युनियन हे दोघे एकत्ररित्या दरदिवशी दीड महापद्म डॉलर्स इतका खर्च लष्करासाठी करीत आहेत. तरीपण बालकांच्या मृत्युसंख्येच्या बाबतीत पाहता सर्व राष्ट्रात अमेरिकेचा अठरावा तर यु. एस. एस. आर.चा सेहेचाळीसावा क्रमांक येतो. विकसनशील देश आपल्या लोकांच्या आरोग्यासाठी करणाऱ्या खर्चाच्या चौपट खर्च शस्त्रास्त्रावर करतात. तरीपण याच देशात लाखो लोक उपाशी आहेत; त्यांची २० टक्के बालके तर आपल्या पाचव्या वाढदिवशीच्या आधीच मरतात.”
३ या विनाशी मार्गात आणखी काही गोष्टी भर टाकतात व त्या आहेतः सदाचार व कुटुंबाचे मोडकळणे, पृथ्वीची लपत छपत शिकार करणारी गुन्हेगारी व दहशत, आणि सद्य पिढीची प्रेमहीनता व अभक्तपणा. तर मग, “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश” करण्याचा यहोवाने उद्देश राखला आहे हे जाणून आम्हाला किती आनंद झाला पाहिजे! (प्रकटीकरण ११:१८) आपला हा उद्देश तो कसा तडीस नेईल त्याविषयी पवित्र शास्त्रातील प्रकटीकरणाचे पुस्तक १६ दृष्टांत मालिकेद्वारे सविस्तर माहिती देते.
“दूत” व “चिन्हे”
४. प्रकटीकरणात दूतांचा कसा समावेश आहे आणि दृष्टांत प्रमुख दिव्यदूताला कसे चित्रित करतात?
४ पवित्र शास्त्राचा पहिला भविष्यवाद, उत्पत्ती ३:१५ यावर प्रकटीकरणाचे पुस्तक प्रकाश टाकते आणि हे दाखविते की सैतान व देवाची स्त्री संस्था तसेच त्यांच्या ‘संताना’तील आपसात असणारे वैर यांचा कसा निकाल लावण्यात येईल. हे पुस्तक यहोवाच्या शत्रुंविरुध्द असणारे त्याचे न्यायदंड आणि जे त्याजवर प्रेम करुन त्याच्या सार्वभौमत्वास उंचावतात त्यांना मिळणारे प्रतिफळ याविषयीही सांगते. एका देवदूताद्वारे योहानाला हे प्रकटीकरण “चिन्हांनी” कळविण्यात आले. इतर दिव्यदूतांनी वा संदेशवाहकांनी ही चिन्हे कळविण्यात वा तशी नाट्यमय कृति दाखवून त्यात सहभाग घेतला. अधिक प्रमुख असणाऱ्या देवदूताची ओळख प्रकटीकरण १:५ मध्ये आहे व तो येशू ख्रिस्त, ‘विश्वसनीय साक्षी,’ ‘मेलेल्यातून प्रथम जन्मलेला,’ आणि ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती,’ आहे. या पुस्तकातील “चिन्हे” किंवा दृष्टांत त्याला “सिंह,” “कोकरा,” “मीखाएल,” आणि कित्येकदा प्रबळ दूत असेही चित्रित करतात.—प्रकटीकरण ५:५, १३; ९:१, ११; १०:१; १२:७; १८:१.
५. प्रकटीकरणाच्या पहिल्या दृष्टांतात काय दाखविण्यात आले, व त्यात आमचा कसा समावेश आहे?
५ प्रकटीकरण १:१०-३:२२ पर्यंत असणारा पहिला दृष्टांत वैभवी येशूने सात आशिया मंडळीच्या “दूतांना” वा देखरेख्यांना जे थरारक संदेश पाठविले त्यांचे कथन करतात. त्या मंडळ्या “प्रभुच्या दिवसा”तील यहोवाच्या साक्षीदारांच्या गोलार्धव्याप्त मंडळ्यांचे प्रतीक आहेत. तर मग, ते संदेश आज आपल्यासाठी आहेत! “आत्मा मंडळ्यास काय म्हणतो” ते आम्ही कान देऊन ऐकले पाहिजे, कारण ते इशारे व सूचना आमच्या उत्तेजनासाठी, आम्ही विश्वासू ठरावे—आमची कृत्ये, आमची “प्रीती, विश्वास, सेवा व धीर” याकरवी आपल्याला मान्यता लाभावी म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत.—प्रकटीकरण १:१०; २:७, १०, १९.
६. आशियातील सात मंडळ्यांना प्रत्येकी जो संदेश पाठविण्यात आला त्यापासून आम्ही आपल्याला कोणता लाभ मिळवून घेऊ शकतो?
६ इफिसच्या मंडळीप्रमाणे आम्ही निष्ठावंतपणे परिश्रम घेतले असतील आणि विभाजन निर्माण करणाऱ्या धर्मत्याग्यांचा द्वेष केला असेल. पण आमची प्रीती कोणा ना कोणा मार्गाने मंद झाली असल्यास आपण पश्चातापी वृत्तीने आपल्या पहिल्या प्रीतीकडे वळू या आणि प्रज्वलीत असा आवेश चकाकवू या! स्मुर्णा येथील आध्यात्मिकदृष्ट्या धनवान असणाऱ्या ख्रिश्चनांप्रमाणे आपण निर्भिडपणे आपल्या प्रतिफळासाठी झटू या, जरी ‘मरेपर्यंत विश्वासू राहण्याची पाळी आली तरी विश्वासू राहू या.’ पर्गम मंडळीत सैतानाने ज्यांना परिक्षा प्रसंगात टाकले होते त्यांच्याप्रमाणेच आपण आपल्या गत आचाराबद्दल, मग ती मूर्तिपूजा, अनैतिकता वा दुफळी माजविण्याची वृत्ति असो, तिच्याविषयी पश्चाताप दाखवू या. थुवतीरा मंडळीलाही अशाच प्रकारच्या मोहपाशाविषयी व खासपणे इजबेलीच्या प्रभावाविषयी दक्ष राहण्यास सांगण्यात आले होते. आम्ही दक्ष असलेच पाहिजे! जर कोणी सार्दीस येथील मंडळीच्या सदस्याप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या मृत झालेला आहे तर त्याने उशीर होण्याआधी उठलेच पाहिजे. कार्याचा प्रशस्त दरवाजा आपल्यापुढे उघडा ठेवण्यात आला आहे व तोच फिलदेलफिया मंडळीसमोर सुध्दा उघडण्यात आला होता. यांनी केले तसेच आपल्याला देखील येणाऱ्या परिक्षाप्रसंगात विजयी ठरण्यासाठी शक्ती मिळो. लावदेकियाच्या मंडळीप्रमाणे आमच्यातील कोणी कोमट बनला असेल तर आपल्या आध्यात्मिक नग्नतेविषयी त्याने जागे होण्यास हवे आणि पश्चाताप दाखविला पाहिजे. येशू दरवाजा ठोकीत आहे. आपण सर्व त्याचे स्वागत करू या आणि त्याच्यासोबत, गोलार्धव्याप्त रितीने आमच्या ५५,००० मंडळ्यातून जो यथाकाळी आहार मिळत आहे त्याचे सेवन करीत राहू या!—प्रकटीकरण १:११; २:७, १०, ११, १७, २९; ३:६, १३, २२.
देवाचे सिंहासन, गुंडाळी आणि एक प्रश्न
७. दुसऱ्या दृष्टांतात कोणती स्तुति गायिली जाते आणि तुमचा याविषयीचा प्रतिसाद काय आहे?
७ योहान दुसऱ्या दृष्टांतात यहोवाचे वैभवी स्वर्गीय सिंहासन बघतो. आमचा दैदिप्यमान देव अति उच्च अशा प्रखर तेजात दिसतो, त्याच्या भोवती चार करूब आहेत, दूतांचा अगणित समूह आहे आणि पुनरूत्थान करण्यात आलेले ख्रिस्ती विजेतेही आहेत. त्यांनी गायिलेले स्तुतीगीत अंगावर केवढे रोमांच उभारतात! ते म्हणतातः “हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” यहोवा एक गुंडाळी, ती उघडण्यास जो समर्थ आहे त्याला देतो, आणि तो कोण आहे? तो आहे यहुदा वंशाचा सिंह, वधला गेलेला कोकरा आणि आमचा मुक्तीदाता. सबंध सृष्टी यहोवा देव व त्याचा कोकरा यांची स्तुति गाते.—प्रकटीकरण ४:११; ५:२-५, ११-१४.
८. प्रकटीकरणाच्या तिसऱ्या दृष्टांतात आम्ही काय पाहतो, व त्याचा आमच्या दिवसाशी कोणता संबंध आहे?
८ आता तिसरा दृष्टांत! कोकरा गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यास पुढे येतो. आपल्याला काय दिसते? पहिल्या प्रथम नव्यानेच मुकुटमंडित झालेला येशू स्वर्गात पांढऱ्या घोड्यावर आपली दौड आक्रमीत आहे, जे नीतीमान युध्दाची सूचकता देते. यानंतर अग्निवर्ण घोड्यावरील स्वार पृथ्वीला सार्वत्रिक युध्दाने ग्रासतो. याच्यामागे दुष्काळाचा काळा घोडा धावत येतो व त्याच्यानंतर मरीचा फिकट घोडा ज्याच्या स्वाराचे नाव मृत्यु आहे तो येतो. त्याच्यामागोमाग हेडीस किंवा मानवजातीची कबर येते व ती सर्व बळींना आपणात सामावून घेते. या सर्व गोष्टींना, मानवजातीला १९१४-१८ मध्ये लागलेल्या “वेदनांच्या आरंभा”ने सुरुवात झाली; ही गोष्ट त्या पिढीचे अद्याप हयात असलेले वृध्दजन चांगल्या रितीने आठवून सांगतात. (मत्तय २४:३-८) ते स्वार आपली घोडदौड अजून आक्रमीत आहेत! आणि जेव्हा पाचवा व सहावा शिक्का उघडण्यात येतो तेव्हा सर्व घटना ‘यहोवा व त्याचा कोकरा यांच्या क्रोधाच्या मोठ्या दिवसा’कडे वळतात. आता प्रश्न हा आहे की, “कोणाच्याने टिकाव धरवेल?”—प्रकटीकरण ६:१-१७.
‘टिकाव धरणारे’
९. चवथ्या दृष्टांतात कोणते थरारक दृश्य दाखविण्यात आले?
९ चवथा दृष्टांत उलगडतो व येथे आपल्याला देवाच्या क्रोधाच्या दिवशी कोणाचा बचाव होईल व का ते पहायला मिळते. आध्यात्मिक इस्त्राएलांवर—१,४४,०००—शिक्का मारण्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून पृथ्वीच्या चाऱ्ही दिशेकडील वारे दिव्यदूत अडवून धरीत आहेत. “ह्यानंतर” दृष्टांत एक भयप्रेरित असा विस्तृत देखावा सादर करतोः “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय [देवाच्या] राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा” आहे! तो उच्च स्वराने म्हणत होताः “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.” (प्रकटीकरण ७:१-१०) या दृश्यात तुम्ही स्वतःला पाहात आहा का?
१०. (अ) १९३५ व १९८७ च्या स्मारकविधीच्या अहवालाची तुलना केल्यास चवथ्या दृष्टांताच्या पूर्णतेविषयी काय सूचित होते? (ब) आता कोणता प्रश्न आम्हापुढे आहे व का?
१० येशूच्या मृत्युच्या स्मारकविधीला १९३५ मध्ये ३२,७९५ इतकी उपस्थिती होती. यापैकी २७,००६ जणांनी १,४४,००० मधील पृथ्वीवर बाकी राहिलेले व स्वर्गीय आशा असणारे या अर्थी बोधचिन्हात सहभाग घेतला. नंतर याच वर्षी मोठ्या लोकसमुदायाची ओळख अगदी स्पष्टरित्या झळकली. नंदनवनमय पृथ्वीवर चिरकालिक जीवनाची आशा राखणारे हे लीन जन सुध्दा येशूच्या ओतलेल्या रक्तावर आपला विश्वास प्रदर्शित करतात, ते यहोवाला समर्पण करतात, बाप्तिस्मा घेतात आणि “मोठे संकट” यातून जिवंतपणे निभावण्याची आशा राखून देवाची सेवा करीत आहेत. १९८७ मधील स्मारकविधीची उपस्थिती ८९,६५,२२१ इतकी होती व त्यात केवळ ८,८०८ इतक्यांनीच सहभागिता घेतली. याकरवी हे सूचित होते की लाखो जन आज या मोठ्या लोकसमुदाय वर्गाचे आहेत वा त्यापैकीचे बनण्याचे इच्छुक आहेत. तर मग, ‘यहोवाचा व त्याच्या कोकऱ्याचा क्रोधाचा मोठा दिवस येईल’ तेव्हा तुमच्याने ‘टिकाव धरवेल’ काय? तशी पावले घेणे हा तुम्हासाठी बचाव ठरू शकेल.—प्रकटीकरण ६:१५-१७; ७:१४-१७.
देवाच्या न्यायाचा कर्णा वाजविणे
११. पाचव्या दृष्टांतात कोणते न्यायदंड कर्ण्यांद्वारे घोषित केले गेले व याचा आमच्या काळाशी कोणता संबंध आहे?
११ सातवा शिक्का उघडला गेला! आता दृश्यात प्रकटीकरणाचा पाचवा दृष्टांत सामोरा झळकतो. सात दिव्यदूत देवासमोर उभे आहेत. त्यांना सात कर्णे दिले आहेत. या कर्ण्यांद्वारे ते अशा घोषणांचा नाद वदवीत आहेत जो १९१९ पासून यहोवाच्या लोकांनी पृथ्वीभरात प्रतिध्वनित केला आहे. पहिले चार देवदूत मानवजातीच्या “तृतीयांशा”वर न्यायदंडाची घोषणा करतात. हा तृतीयांश ख्रिस्तीधर्मजगतात राहणाऱ्या लोकांना अनुलक्षून आहे हे उघड आहे. हे “कर्णे” सुचवितात की, ख्रिस्तीधर्मजगताच्या “पृथ्वी”चा भाग (सैतानाचे टिकाऊ स्वरुपाचे वाटणारे व्यवस्थीकरण), तसेच “समुद्र” (मानवजातीचा खवळलेला जनसमूह) तसेच ‘नद्या व झऱ्यांचे पाणी’ (ख्रिस्तीधर्मजगताचे तत्वज्ञान व शिकवणी) याचप्रमाणे त्याच्या अंधकारमय ज्योति (आध्यात्मिक प्रकाशापासून वंचित असणारे धर्मपुढारी) या सर्व गोष्टी देवाच्या क्रोधाचे निशाण आहेत. यानंतर एक उडणारा गरुड, एक दिव्यदूत अंतराळात दिसतो व सांगतो की अद्याप ज्या तीन कर्ण्यांचा नाद व्हावयाचा आहे त्यांच्यामुळे “पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”—प्रकटीकरण ८:१-१३.
१२. अगाधकूपाची खाच कोण उघडतो आणि आधुनिक काळात “टोळ”धाडीने धर्मपुढाऱ्यांना कसा उपद्रव केला?
१२ आता पाचवा दिव्यदूत कर्णा वाजवितो. पहा! “एक तारा”—प्रभु येशू—धुराने भरलेले अगाधकूप उघडतो आणि टोळांची मोठी धाड बाहेर पडते. ही गोष्ट येशू देवाच्या अभिषिक्त साक्षीदारांना १९१९ मध्ये त्यांच्या अक्रियाशील स्थितीतून बाहेर आणतो हे प्रकर्षाने लक्षात आणते. इश्वरी अधिकार प्राप्त झाल्यामुळे ते धर्मपुढाऱ्यांचे कुरण उद्ध्वस्त करतात आणि “पाच महिने”—टोळांचे सर्वसाधारण आयुष्यमान—ते त्यांचे खोटे शिक्षण व दांभिकता यांना उघड करीत राहतात. याकरवी याची पुष्टी मिळते की, यहोवा व ख्रिस्त राष्ट्रांचा न्याय पूर्ण करीपर्यंत आधुनिक टोळांची पिढी “कधीही नाहीशी होणार नाही.” आतापर्यंत या टोळाच्या समूहाने लोकांना पवित्र शास्त्र आधारित लाखो प्रकाशनांचे वाटप करून त्याकरवी विंचवाच्या नांगीने दंश देणारा अग्निमय न्यायाचा संदेश दिला आहे. योहान म्हणतोः “पहिला अनर्थ होऊन गेला आहे; पहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.”—प्रकटीकरण ९:१-१२; मत्तय २४:३४; २५:३१-३३.
१३. (अ) फरात नदीवरून मोकळे करण्यात आलेले दिव्यदूत कोणाला सूचित करतात, आणि त्यांना कोणते काम दिले जाते? (ब) घोडदळाची बेसुमार संख्या कशास सूचित करते आणि यांची शक्ती “त्यांच्या तोंडात व शेपटात आहे” हे कसे?
१३ सहावा कर्णा वाजतो व दुसरा “अनर्थ” समोर येतो. फरात नदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे होतात, जे १९१९ मध्ये बाबेलोनी दास्यत्वातून मुक्त झालेल्या देवाच्या अभिषिक्त साक्षीदारांचे अचूक चित्र ठरतात. त्यांची, “एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता” म्हणजे, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मपुढारी यहोवाच्या दृष्टीने मृतवत् आहेत हे सांगण्यासाठी सिध्दता होते. तरीपण हे साक्षीकार्य विस्तारीत करण्यासाठी मदतीची गरज आहे आणि यहोवा, सोबतीच्या कार्यकर्त्यांचा मोठा समूह सामोरा आणून ती देतो. हे अभिषिक्त साक्षीदार व त्यांचे साहाय्यक “वीस कोटीं”च्या बेसुमार घोडदळाप्रमाणे पुढे सरसावतात. त्यांची शक्ती “त्यांच्या तोंडात” आहे ते या अर्थी की, ते लोकांच्या घरोघरी जाऊन यहोवाच्या न्यायदंडाचे संदेश वदवितात. तसेच ती शक्ती “शेपटात” देखील आहे ते या अर्थाने की, ते लोकांच्या घरी मागे पवित्र शास्त्रीय प्रकाशने सोडतात, जी लोकांना देवाचा सूड घेण्याचा दिवस त्वरेने येत असल्याचे सांगतात.—प्रकटीकरण ९:१३-२१; प्रे. कृत्ये २०:२०, २१.
१४. (अ) सहाव्या दृष्टांतातील “बलवान देवदूत” कोण आहे, व तो काय करतो व म्हणतो? (ब) लहानसे पुस्तक “मधासारखे गोड” पण ‘पोट कडू करणारे’ आहे याकरवी काय सूचित होते?
१४ आता सहावा दृष्टांत आणखी उलगडतो. आम्ही “एक बलवान देवदूत” बघतो, जो या खास भूमिकेतील प्रभु येशू आहे हे उघड आहे. त्याच्या हातात एक लहानसे पुस्तक आहे. वाणी व मेघगर्जना ऐकू येतात आणि हा देवदूत आमच्या थोर निर्मात्याची शपथ वाहून म्हणतोः “आणखी अवकाश लागणार नाही. तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाचे . . . पवित्र गूज पूर्ण होईल.” योहानाला ते लहानसे पुस्तक घेऊन ते खाण्यास सांगितले. ते त्याच्या “तोंडाला मधासारखे गोड” लागले. याचप्रमाणे, “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्या आशीर्वादाचे अभिवचन अभिषिक्त योहान वर्गास व त्याच्या साथीदारांनाही गोड वाटते. तरीपण, “लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे” यांच्याविषयी देवाच्या सूड घेण्याच्या दिवसाची घोषणा करणे काहींच्या पोटाला कडू करते. परंतु, धैर्य धरा! तुम्ही देवाचा सूड घेण्याचा संदेश घोषित करीत राहाल तेव्हा यहोवा तुम्हाला आवश्यक असणारे बळ पुरवील असा दृढ विश्वास राखा.—प्रकटीकरण १०:१-११; २१:१, ४; १ योहान ५:४; यशया ४०:२९-३१; ६१:१, २.
सातवा कर्णा व तिसरा अनर्थ
१५. (अ) तिसरा अनर्थ पुकारला जातो व सातवा दूत कर्णा वाजवितो तेव्हा काय होते? (ब) राज्याची घोषणा ही कोणत्या अर्थी अनर्थ आहे?
१५ देवाच्या साक्षीदारांना १९१८ मध्ये “ठार” करण्याचा शत्रुचा प्रयत्न तसेच १९१९ मध्ये ‘देवापासून आलेल्या जीवनाच्या आत्म्याने’ केवढ्या अप्रतिमरित्या त्यांना गोलार्धव्याप्त साक्ष देण्यासाठी पुनरुज्जवित केले त्याचे भाकित वदविल्यानंतर योहान लिहितोः “दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. पहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे.” पण कोणत्या मार्गाने? अहवाल पुढे कळवितोः “सातव्या देवदूताने कर्णा वाजविला.” अशाप्रकारे तिसरा अनर्थ उद्भवण्याचा संबंध शेवटचा कर्ण्याचा निनाद होण्यासोबत आहे. आता ऐका! “स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्याः ‘जगाचे राज्य आमच्या प्रभु [यहोवा]चे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.’” हे ख्रिस्त येशूकरवीचे देवाचे राज्य आहे व तो आपल्या १,४४,००० सहवारीसांसोबत मिळून देवाचे पवित्र गूज पूर्ण करील व त्याद्वारे सर्वसमर्थ यहोवा देवाचे चिरकालिक सार्वभौमत्व सदाकाळासाठी गौरवील. राज्याची ही घोषणा अनर्थ आहे का? होय, दुष्टांसाठी ती अनर्थच आहे. कारण, देव “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा [कसा] नाश” करील हे ती सांगते.—प्रकटीकरण ११:१-१९.
१६. सातव्या दृष्टांतात कोणत्या नाट्यमय घटना दाखविल्या आहेत?
१६ सातवा दृष्टांत आता दृश्यात चकाकतो! पहा, देवाची कर्तव्यदक्ष स्वर्गीय संस्था, त्याची “स्त्री” येथे दिसते. ती गरोदर आहे व तिला वेणा होत असून दीर्घकाळापासून वाट पाहिलेल्या मुलाचा जन्म होण्याच्या प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत आहे. येथे एकदाच नव्हे तर प्रथमतःच प्रकटीकरणात, एक अग्निवर्ण अजगर, “सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप” दिसतो व तो मुलाला जन्मताच खाऊन टाकण्याच्या स्थितीत उभा ठाकला आहे. आधी भाकित करण्यात आलेले “[सर्प] व स्त्री याजमधील वैर” आता शिगेला पोहंचते! ती स्त्री ‘पुसंतानाला’ जन्म देते, तिचे हे मूल लगेच देवाच्या राजासनाकडे नेण्यात येते.—प्रकटीकरण १२:१-६, ९; उत्पत्ती ३:१५; दानीएल २:४४; ७:१३, १४.
१७. (अ) मीखाएल कोण आहे व तो १९१४ पासून आपल्या नामाला कसा जागला आहे? (ब) ‘तीन अनर्थ’ व प्रकटीकरण १२:१२ मधील “पृथ्वीवर अनर्थ” यातील फरक स्पष्ट करा.
१७ हे पुसंतान राज्य १९१४ या ऐतिहासिक वर्षी स्वर्गात स्थापण्यात आले. त्याचा राजा ख्रिस्त येशू याला मीखाएल असाही किताब आहे, ज्याचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?” असा होतो. कसलाही विलंब न लावता तो सैतानाशी युध्द करुन व या जुनाट सापाला आणि त्याच्या दुरात्म्यांना खाली पृथ्वीवर ढकलून देऊन तो त्याच्या नावाच्या अर्थात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. १९१४ पासून “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” तर हा, मानवजातीच्या दयनीय स्थितीत प्रवर्तित होणारा अनर्थ, यहोवा दुष्टांवर दंडाज्ञा बजावण्यात जे ‘तीन अनर्थ’ आणणार असल्याचे आपण पूर्वी पाहिले आहे त्याच्यासोबत मिसळून गोंधळ होऊ देऊ नये.—प्रकटीकरण १२:७-१२.
१८. (अ) दुसऱ्या जागतिक युध्दामध्ये व त्याच्या आधी दियाबल सैतानाने यहोवाच्या निष्ठावंत सेवकांवर कोणता अनर्थ आणण्याचा प्रयत्न केला? (ब) अजूनही दियाबलाचा काय करण्याचा निश्चय आहे आणि राहिलेले दृष्टांत काय प्रकटवितील?
१८ दियाबल सैतानाने देखील पृथ्वीवरील यहोवाच्या निष्ठावंत सेवकांवर अनर्थ आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या जागतिक महायुध्दामध्ये व त्यापूर्वी त्याने छळाचा महापूर त्यांच्यावर आणला आणि देवाच्या स्त्री संस्थेचे “बाकीचे लोक”—मानवजातीत अद्याप सेवा करीत असलेले १,४४,०००मधील राहिलेले लोक—यांचे काम वाहवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यहोवाने, पृथ्वी म्हणजे सैतानाचे स्वतःचे व्यवस्थीकरण या पूराला गिळंकृत करीत आहे याकडे लक्ष दिले. तरीपण रागाने संतप्त असणारा सैतान अजूनही यहोवाच्या साक्षीदारांशी लढण्याचा कयास धरून आहे. (प्रकटीकरण १२:१३-१७) याचा अंतिम परिणाम काय दिसणार? आणखीन नऊ दृष्टांत यावयाचे आहेत व तेच आपल्याला याचे उत्तर देतील!—हबक्कुक २:३.
उजळणीसाठी प्रश्न
◻ प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या बाबतीत यहोवाने दिव्यदूतांचा कसा वापर करून घेतला?
◻ येशूने सात मंडळ्यांना पाठविलेल्या संदेशाचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?
◻ सात कर्ण्यांच्या निनादामुळे कोणते परिणाम उद्भवले?
◻ टोळांची धाड तसेच बेसुमार घोडदळ याकरवी काय सूचित करण्यात आले?
◻ देवाच्या राज्याच्या जन्माचा संबंध ‘तिसऱ्या अनर्था’सोबत का जोडण्यात आला?
[२० पानावरील चौकट]
प्रत्येक दृष्टांताचे अध्याय व वचनेः
◻ १ला दृष्टांत १:१०-३:२२
◻ २रा दृष्टांत ४:१-५:१४
◻ ३रा दृष्टांत ६:१-१७
◻ ४था दृष्टांत ७:१-१७
◻ ५वा दृष्टांत ८:१-९:२१
◻ ६वा दृष्टांत १०:१-११:१९
◻ ७वा दृष्टांत १२:१-१७
◻ ८वा दृष्टांत १३:१-१८
◻ ९वा दृष्टांत १४:१-२०
◻ १०वा दृष्टांत १५:१-१६:२१
◻ ११वा दृष्टांत १७:१-१८
◻ १२वा दृष्टांत १८:१-१९:१०
◻ १३वा दृष्टांत १९:११-२१
◻ १४वा दृष्टांत २०:१-१०
◻ १५वा दृष्टांत २०:११-२१:८
◻ १६वा दृष्टांत २१:९-२२:५
[२१-२४ पानांवरील चौकट/चित्र]
प्रकटीकरणाचे १६ दृष्टांत—त्यातील काही ठळक वैशिष्ट्ये
१ सात मंडळीय समया यात असणारा येशू, सात ताऱ्यांमार्फत, अभिषिक्त देखरेख्यांमार्फत प्रेमळ संदेश पाठवितो
२ यहोवाच्या दैदिप्यमान सिंहासनापुढे विजयी कोकऱ्याला न्यायविषयक संदेशाची गुंडाळी मिळते
३ ख्रिस्त येशू विजयाने आपली दौड सुरु करतो, तर इतर घोडेस्वार मानवजातीवर पिडा आणतात, आणि देवाचा क्रोधाचा दिवस समीप येतो
४ मोठे संकट दिव्यदूत अडवून धरीत असता, १,४४,००० तसेच मोठ्या लोकसमुदायाचे एकत्रीकरण पूर्ण होते
५ दिव्यदूत न्यायदंडाचे संदेश निनादवितात, आणि यहोवाचे साक्षीदार टोळासारख्या धाडीने खोट्या धर्मास उघड करतात
६ सातव्या कर्ण्याचा नाद होतो तेव्हा देवाच्या “साक्षीदारांना” यहोवाच्या व ख्रिस्ताच्या येणाऱ्या राज्याविषयीची घोषणा करण्यासाठी पुनरुज्जीवित करण्यात येते
७ राज्याचा १९१४ मध्ये जन्म घडल्यावर ख्रिस्त सैतान व त्याच्या दुरात्म्यांना खाली पृथ्वीवर टाकून देतो
८ दोन जंगली श्वापदे येतात; दुसरे राजकारणी श्वापद पहिल्याच्या मूर्तीत जीव घालतो, संयुक्त राष्ट्र संघ एकत्र बनतो
९ ‘देवाचे भय बाळगणारे व त्याचे गौरव करणारे’ मानवजातीतील लोकांना सार्वकालिक जीवनासाठी काढून घेण्यात येते; इतरांचा नाश होतो
१० देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओतण्याचा परिणाम सैतानाकरवी प्रदुषित झालेल्या “हवे”त श्वसन करणाऱ्या सर्वांची हत्या होण्यात दिसतो
११ मोठी कळवंतीण, खोटा धर्म याला राजकारणी “श्वापद” याजवरुन खाली खेचण्यात येते, ते श्वापद तिला उद्ध्वस्त करते
१२ मोठ्या बाबेलीचा नाश झाल्यावर, कोकरा व त्याची वधू, १,४४,००० यांच्या विवाहाची तयारी पूर्ण होते
१३ मोठ्या कळवंतिणीचा नाश घडल्यावर येशू आपल्या स्वर्गीय सेनेचे नेतृत्व, सैतानाच्या बाकीच्या पृथ्वीवरील व्यवस्थेचा नाश करण्यात करतो
१४ सैतानास अगाधकूपात टाकणे ख्रिस्त व त्याची वधू, १,४४,००० यांच्या हजारवर्षीय राजकिर्दीची सुरुवात करून देते
१५ ख्रिस्त व त्याची वधू यांच्या ‘नव्या आकाशा’च्या वर्चस्वाखाली “नवी पृथ्वी”, मानवजातीचा समाज यहोवाकडिल आशीर्वादांचा उपभोग घेईल
१६ मानवजातीस बरे करणे व तिला जीवन पुरविण्याची देवाची व्यवस्था वैभवी नव्या यरूशलेमामार्फत वाहत येते