नवीन विचारांसाठी मोकळेपणा का असावा?
धुक्याचा पडदा हळूहळू दूर झाला आणि अमेरिकी आरमाराच्या तुकडीचा अधिकारी, मॅथ्यु सी. पेरीला आपली युद्धनौका सुस्क्वेहन्ना हिच्या वरच्या मजल्यावरुन फूजी पर्वत दृष्टीस पडला. त्याची जपान पाहण्याची उत्कट इच्छा होती आणि आता सात महिन्यापेक्षा जास्त नौकापर्यटन करून तो शेवटी जुलै ८, १८५३ रोजी तिकडे पोहोंचला. या देशाविषयीच्या प्रत्येक अहवालाचा त्या अधिकाऱ्याने अभ्यास केला होता. का बरे? कारण “स्वतःस वेगळा करुन” घेतलेला हा देश जगास प्रकटविण्याची त्याची इच्छा होती.
खरंच वेगळा झालेला! २०० पेक्षा अधिक वर्षांअगोदर जपानने चीन, कोरिया व हॉलंड वगळता सगळ्या देशांबरोबर आपले व्यापारिक व सांस्कृतिक संबंध तोडले होते. त्या राष्ट्रात नंतर निर्वेध चित्ताची प्रसन्नता नांदू लागली. अशा अवस्थेत, ते नव्या विचारांचा विरोध करणाऱ्या व आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार ऐकून न घेणाऱ्या लोकांसारखे झाले. काही अंशी हे बरे वाटते. कारण नवे विचार एखाद्याला कदाचित अस्थिर करू शकतात किंवा ते भीतीदायक देखील असतात. पण अशी ही मनःस्थिती समंजसपणाची असू शकेल का? तर मग, स्वतःस वेगळे राखणाऱ्या जपानच्या धोरणाचे परिणाम आपण विचारात घेऊ.
जपानचा अज्ञातवास कशामुळे घडला?
काहीही कारण नसताना जपान अज्ञातवासात गेला नाही. १५४९ मध्ये जेसुईट धर्मप्रचारक फ्रान्सिस झेवियर आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी जपानला आला. थोड्याच वेळात, रोमन कॅथोलिक विश्वास, या देशात उंचवट्यावर पोहोंचला. त्या काळाच्या राज्यकर्त्यांनी बौद्ध पंथाच्या द्वारे धार्मिक बंडाळीचा अनुभव घेतल्याने कॅथोलिकांद्वारे देखील तसेच घडण्याची शक्यता त्यांनी पाहिली. या कारणामुळे कॅथोलिक धर्मावर बंदी घालण्यात आली, परंतु ती बंदी कडकरित्या अमलात आणली गेली नाही.
जपान हे “ईश्वरी राष्ट्र” आहे असे हक्काने म्हटले जात असल्यामुळे या राज्यकर्त्यांनी “ख्रिस्ती” धर्माला आपल्या व्यवस्थेला धमकी बनेल म्हणून अनुमती दिली नाही. पण मग, कॅथोलिक धर्मावर त्यांनी कडकरित्या बंदीचा अमल का घातला नाही? कारण कॅथोलिक धर्मप्रचारक पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजावरून आले, आणि ते जहाज, त्या सरकारला नफा मिळवून देणार होते. तथापि, कॅथोलिकांचे जपानी लोकांवर प्राबल्य होईल या भीतीने राज्यकर्त्यांच्या व्यापारी इच्छेवर आपली सरशी मिळवली. ह्या कारणामुळे त्यांनी विदेशी व्यापारावर ताबा, स्वदेश सोडून जाणे आणि “ख्रिस्ती” लोक याविषयीचे हुकुमनामे जाहीर केले.
जेव्हा “ख्रिश्चनां”चा छळ झाला, तेव्हा त्यांनी स्थानिक जहागिरदारांविरुद्ध बंडाळी केली. ही बंडाळी उघडरित्या कॅथोलिक प्रचारामुळे झाली असे गृहीत धरून मध्यवर्ती शोगुनेट सरकारने पोर्तुगीज लोकांना देशाबाहेर काढले व जपानी लोकांना परदेशी जाण्यास बंदी घातली. १६३९ मध्ये हा हुकुम काढल्यापासून जपानचा अज्ञातवास एक सत्यस्थिती बनली.
पश्चिमी लोकांमध्ये केवळ डच लोकांनाच जपानसोबत व्यापारी संबंध ठेवण्याची परवानगी देण्यात आली. यांना डेजीमा नावाच्या लहान बेटावर ठेवण्यात आले. यानंतर २०० वर्षे पश्चिमी संस्कृती जपानमध्ये फक्त डेजीमद्वारे जाऊ लागली. दर वर्षी त्या बेटाचा व्यापारी संचालक “डच अहवाल” सादर करीत असे. यामुळे त्या सरकारला बाहेरच्या जगात काय चालले आहे त्याची माहिती मिळत असे. परंतु शोनुगेट सरकार हा अहवाल कोणाच्या दृष्टीस पडू नये याची दक्षता घेई. अशाप्रकारे १८५३ मध्ये अधिकारी पेरी याने जपानी दरवाजा ठोकेपर्यंत जपानी लोक अज्ञातवासात जगत होते.
अज्ञातवासाची समाप्ती
पेरीच्या मोठमोठ्या काळ्या जहाजांनी एडो उपसागरात धूर फेकीत प्रवेश केला तेव्हा हे चालणारे ज्वालामुखी आहेत असे वाटून स्थानिक कोळ्यांची बोबडी वळाली. एडो (सध्याचे टोकिओ) चे रहिवाशी घाबरले व बरेच लोक आपले सामान घेऊन शहर सोडून पळाले. सोडून जाणाऱ्यांची संख्या एवढी होती की, लोकांना शांत करण्यासाठी सरकारला एक अधिकृत सूचना जाहीर करावी लागली.
पेरीच्या अखत्यारातील आगबोटींनीच नव्हे तर त्याने आणलेल्या विविध बक्षिसांना पाहून अज्ञातवासातील लोकांना मोठी भुरळ पडली. एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत संदेश पाठविण्यासाठी तार यंत्राचे दाखविण्यात आलेले प्रात्यक्षिक पाहून ते थक्क झाले. पेरीच्या देखरेखीखाली संकलन करण्यात आलेले नॅरेटीव्ह ऑफ द एक्स्पीडिशन ऑफ ॲन अमेरिकन स्क्वॉर्डन टू द चायना सीज् ॲण्ड जापान हे पुस्तक जपानी अधिकाऱ्यांविषयी सांगताना म्हणते की, त्यांनी “सहा वर्षांच्या लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या” छोट्या आगगाडीस बघण्यासाठी उड्या टाकल्या. एक उच्च पदाधिकारी तर इंजिनाच्या छप्पराला बिलगला आणि “त्याचे ढिले वस्त्र हवेत उडू” लागले.
अखेरीस जपानचे दरवाजे, पेरीच्या पुढील वर्षीच्या दुसऱ्या भेटीत पूर्णतया उघडले गेले. त्या सरकारला दबावामुळे आपला देश उघडावा लागला. यावेळी जपानचा अज्ञातवास टिकवू पाहणाऱ्या कट्टर एकांतवासीयांनी दहशतवादाचा आश्रय घेतला, सरकारच्या मुख्य मंत्र्याला ठार केले आणि विदेशी लोकांवर हल्ले केले. काही अज्ञातवासियांनी तर परदेशी जहाजांवर गोळ्या झाडल्या. त्यांचे हे हल्ले सरतेशेवटी, टोकुगावा शोनुगेटकडून सम्राटाने सरकार आपल्या ताब्यात घेतले तेव्हा कमी झाले.
पेरीने जपानचा दरवाजा उघडला तेव्हा पश्चिमी रा औद्योगिक क्रांतीतून पुढे गेली होती. पण जपान आपल्या अज्ञातवासामुळे यांच्यापेक्षा बरेच मागे पडले होते. औद्योगिकरणामुळे इतर राष्ट्रांनी वाफेद्वारे शक्ती उत्पन्न केली. १८३० च्या दरम्यान वाफेवर चालणारी इंजिने व यंत्रे सामान्यपणे उपयोगात आणली जाऊ लागली. जपानच्या अज्ञातवासाच्या धोरणामुळे औद्योगिकीकरणात ते बरचे मागे राहिले. या गोष्टीची जाणीव, जपानच्या पहिल्या प्रतिनिधी मंडळाने युरोपाला भेट दिल्यावर सिद्ध झाली. १८६२ मध्ये लंडनला आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात कागदाने व लाकडाने बनविलेल्या जपानी वस्तु ठेवण्यात आल्या. एकंदर प्रदर्शन पाहता जपानच्या प्रतिनिधीचे त्यांच्या वस्तुंसंबंधाविषयी “जुना माल विकणाऱ्या दुकानात आढळणाऱ्या वस्तु” असे मत झाले.
युरोप व अमेरिका येथे भेट देणाऱ्या जपानी प्रतिनिधीमंडळाला आपल्या देशात औद्योगीकरण करण्याची निकड भासली व यामुळेच त्यांनी आधुनिक शोध व विचारांचा त्यांच्या देशात मोठ्या उत्कंठेने प्रारंभ केला. पेरीच्या पहिल्या भेटीच्या ६४ वर्षांनंतर, जहाजाच्या पहिल्या कामगार वर्गापैकी शेवटी उरलेल्या एका खलाशाने जपानला भेट दिली तेव्हा म्हटलेः “जपानने साठ वर्षांत केलेल्या प्रगतीने मी थक्क झालो.”
अशाप्रकारे, जपानच्या अज्ञातवासी धोरणामुळे त्याची वाढ बरीच मर्यादित राहिली. नव्या विचारासांठी आपले दरवाजे उघडल्यामुळे त्या राष्ट्राला अनेक मार्गाने फायदे मिळाले. तरीपण, जपानमधील काही, “मनाच्या अज्ञातवासा”कडे अंगुली दर्शवीत आहेत व ती एक समस्या बनली आहे. याचेही निरसन करावयाचे आहे. वस्तुतः नव्या विचारांचा विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर मात करणे हे आधुनिक जपानी लोकांपुढे नव्हे तर सर्व मानवांपुढे एक आव्हान आहे. प्रत्यक्षात, “मनाचा अज्ञातवास” याविषयी तुमची वस्तुस्थिती काय आहे? नवीन विचारांना मन उघडल्यामुळे जसा जपानला १८५० मध्ये फायदा झाला तसा तुम्हाला होऊ शकतो का?