यहोवावर भाव प्रदर्शित करा शिकलेल्या गोष्टी आचरण्याद्वारे
“यहोवावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करुन राहा, इमानाने चाल.”—स्तोत्रसंहिता ३७:३.
१, २. (अ) व्यक्तीगत अभ्यासाचा कोणता परिणाम घडावा अशी अपेक्षा आहे? (ब) याकोबाने कोणते उदाहरण दिले आहे, आणि यात त्याने ज्या पाहण्याविषयीचा उल्लेख केला आहे तो नुसता ओझरता आहे का?
देवाच्या वचनाचा एखादा करीत असलेला अभ्यास हा त्याच्या व्यक्तीगत मनोरंजनासाठी नसतो. अभ्यास हा यहोवावरील भाव वाढविण्यास चालना देणारा ठरला पाहिजे. (नीतीसूत्रे ३:१-५) स्तोत्रकर्त्याचे वर उद्धृत करण्यात आलेले शब्द याची स्पष्टता देतात की ईश्वरी भाव हा त्या व्यक्तीच्या ‘सदाचारा’मुळे प्रदर्शित होत असतो.
२ याकोबाने सांगितलेः “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरुन जातो.” (याकोब १:२२-२४) यास्तव, ते बघणे नुसता कटाक्ष टाकण्यापुरते करायचे नव्हते. येथे ज्या ग्रीक शब्दाचा वापर “पाहणे” याकरता केला आहे त्याचा मूलभूत अर्थ “एखाद्या गोष्टीबद्दल माहिती पकडून धरण्याची मनाची हालचाल” असा होतो.—ॲन एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्डस्, लेखक डब्ल्यू. ई. वाईन; पडताळा प्रे. कृत्ये ७:३१, किंग्डम इंटरलिनियर.
३. आरशामध्ये पाहणारा मनुष्य “आपण कसे होतो” हे कसे लगेच विसरतो?
३ आता समजा की एक मनुष्य आरशासमोर उभा आहे व तो आपल्या चेहऱ्याचे परिक्षण करीत आहे. त्याला दिसते की त्याचा चेहरा काहीसा बदललेला आहे. अन्नाचे अधिक सेवन करण्यामुळे आणि मद्याच्या अतिप्राशनामुळे त्याचे ओठ जड झालेले आहेत, रात्री जागरण झाल्यामुळे डोळे सुजलेले आणि सारखी काळजी लागून राहिल्यामुळे पापण्यांवर सुरकुत्या आलेल्या आहेत. आपली ही झालेली दशा त्याला प्रत्यक्षात आरशात पहावयास मिळत असता तो आता निर्धार करतो की आपल्या सवया व राहणीमान यात बदल केला पाहिजे. यानंतर तो “तेथून निघून जातो.” विकृत झालेला चेहरा आता नजरेआड झाल्यामुळे तो, आपण कसे दिसत होतो ते नव्हे तर “आपण कसे होतो” हे “तेव्हाच विसरुन जातो.” मग, जे काही करण्याचा त्याने निर्धार केलेला असतो तो लोप पावतो.
४. याकोबाने दिलेले उदाहरण, आम्ही करीत असलेल्या शास्त्रवचनांच्या अध्ययनाविषयी कसे लागू करता येईल?
४ याचप्रमाणे तुम्ही पवित्र शास्त्राचा चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी असाल. पण तेच, जेव्हा तुम्ही स्वतःला देवाच्या वचनाच्या आरशात बघता तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? आपल्या आध्यात्मिक चुका व कलंक दिसतो तेव्हा तुम्हाला नुसती क्षणार्धासाठी काळजी वाटते का? किंवा या चुका काढून टाकण्याचा तुम्ही पक्का निश्चय करता? याकोब पुढे म्हणतोः “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करुन ते तसेच करीत राहतो तो, ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व आपल्या कार्यात धन्यता मिळवतो.” (याकोब १:२५) स्तोत्रकर्त्याने असे प्रार्थिलेः “हे यहोवा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखीव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरुन राहीन.”—स्तोत्रसंहिता ११९:३३.
आमचे आचरण आम्हाविषयी काय सांगते
५. (अ) आमचे आचरण आम्हाविषयी काय सांगते? (ब) “अधर्म करणारे” यांना काय मिळणार?
५ खरे म्हणजे, आम्ही जे करतो किंवा आचरतो ते, आम्ही आतून कसे आहोत याची सिद्धता समोर मांडते. आणि लवकर किंवा कालांतराने म्हणा, चांगले वा वाईट आचरल्यामुळे तो माणूस आपले “अंतर्याम” प्रकटवितो. (स्तोत्रसंहिता ५१:६) शलमोन म्हणालाः “वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.” (नीतीसूत्रे २०:११) हे याकोब व एसाव जेव्हा तरुण होते तेव्हा खरे दिसले. कालांतराने, एसावच्या कृतींनी त्याच्याठायी आध्यात्मिक गोष्टींची रसिकता केवढी अल्प होती ते प्रकट केले. (उत्पत्ती २५:२७-३४; इब्रीयांस १२:१६) हेच, यहोवावर भाव असल्याचा दावा करणाऱ्या हजारो लोकांविषयी खरे ठरले ते असे की, पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे ते “अधर्म करणारे” आहेत असे दिसून आले. (ईयोब ३४:८) स्तोत्रकर्त्याने लिहिलेः “दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले तेव्हा त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.”—स्तोत्रसंहिता ९२:७.
६. यहोवावरील असणारा आमचा भाव आम्ही आत्ताच प्रदर्शित करणे का जरुरीचे आहे?
६ दुष्टांची संख्या वाढतच आहे, पण त्यांचा नाश देखील लवकरच होणार आहे; देव दुष्कृत्यांना अधिक काळ राहू देणार नाही. (नीतीसूत्रे १०:२९) यासाठीच, आम्ही जे शिकतो ते आचरणात आणून यहोवावरील आपला भाव प्रदर्शित करणे अत्यंत जरुरीचे आहे. “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा,” असे पेत्र बजावतो. (१ पेत्र २:१२) तर मग, कोणकोणत्या क्षेत्रात आम्हाला आपली सुधारणा घडवून आणता येईल?
इतरांसोबतचे आमचे दळणवळण
७. “बाहेरच्या लोकांबरोबर” दळणवळण राखताना आपण दक्ष का असले पाहिजे?
७ आम्ही इतरांसोबत राखीत असलेले दळणवळण हे ते एक क्षेत्र म्हणता येईल. नीतीसूत्रे १३:२० आम्हाला इशारा देतेः “मूर्खांशी दळणवळण राखणारा कष्ट पावतो.” या प्रेरित आज्ञेकडे दुर्लक्ष करुन काहीजण नोकरीवर वा शाळेत इतरांबरोबर अवास्तव परिचित बनवून घेतात. एका विवाहीत बंधूने नोकरीवर एका स्त्रीबरोबर अशुद्ध वागणूक आचरली. यासोबत तो आपल्या कामावरील साथीदारांसोबत स्थानिक पेय उत्पादन करणाऱ्या कारखान्यात जाऊ लागला व तेथे तो भयंकर पिणारा बनला. असे होऊ नये याकरता आपल्याला “बाहेरच्या लोकांबरोबर सूज्ञतेने वाग”ले पाहिजे.—कलस्सैकर ४:५.
८. काहींना आपल्या सहख्रिश्चनांसोबतच्या व्यवहारात कशी सुधारणा करता येईल?
८ पण आमच्या सहख्रिश्चनांसोबतच्या व्यवहाराबद्दल काय? समजा की, तुम्हाला आपल्या बंधूचे काही पैसे देणे आहे. तर आता तुमच्या मनात कदाचित ही भावना येते की, त्याचे तर बरे चालले आहे तेव्हा मी हे पैसे देण्याची दिरंगाई केली तरी चालेल, कारण सध्या मला त्यांची गरज आहे. असे तुम्ही वाटू द्याल का? “दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही,” असे नीतीसूत्रे ३७:२१ म्हणते. तुम्ही जर मालक आहात व तुम्हाकडे साक्षीदार कर्मचारी कामाला आहेत तर “कामकऱ्याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे” या तत्त्वाचा तुम्ही अवलंब करता का? (१ तीमथ्य ५:१८) पौलाला स्वतःच्या व्यवहाराबद्दल असे म्हणता आलेः “देवाच्या कृपेने आम्ही जगात व विशेषेकरुन तुम्हाबरोबर . . . पवित्रतेने व सात्विकपणे वागलो.”—२ करिंथकर १:१२.
सभ्यतेचा पेहराव व केशरचना
९. पेहराव व केशरचनेच्या बाबतीत कोणती प्रवृत्ती वडीलांच्या नजरेस आली आहे?
९ जर्मनीतील एका फिरत्या देखरेख्याने काहीजण स्थानिक सभांना ज्या पद्धतीने येत ते पाहून त्यांच्याविषयी “टेनिसचे बूट घालून येणारी पिढी” असे वर्णन केले. शाखा दप्तरानेही याला पुष्टी देताना म्हटले की, “सर्वसाधारणपणे आमचे बहुतेक बांधव नीटनेटका पेहराव करीत असले” तरी काही ठिकाणी सभेला काहीजणांना “गबाळेपणा प्रिय वाटतो.” आणखी एका देशाने अहवाल कळवताना म्हटले की, “शारीरिक स्वच्छता ही येथे समस्या आढळते. . . . काही बांधव स्वच्छ कपडे घालत नाहीत. सभेला येताना वा क्षेत्रकार्यात त्यांचे केस विंचरलेले नसतात, ते घाणेरडे असतात.” यहोवाच्या सेवकांनी प्रत्येक बाबतीत नीट व स्वच्छ असणे हे किती महत्त्वाचे आहे बरे!—२ करिंथकर ७:१.
१०. (अ) पेहराव व केशरचनेच्या बाबतीत कोणत्या तत्त्वाने आम्हाला मार्गदर्शित करावे? (ब) सूचना देणे केव्हा योग्य आहे, आणि त्याला आमचा कसा प्रतिसाद असावा?
१० खासपणे आध्यात्मिक कार्यात मग्न असताना आम्ही “सभ्यतेचा पेहराव, शिष्टाचार व औचित्य” राखले पाहिजे. (१ तीमथ्य २:९, न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन) एखादी पद्धत अगदीच भपकेबाज आहे का हा तो प्रश्न नाही, तर तो पेहराव देवाचा सेवक म्हणणाऱ्यांसाठी साजेसा आहे का हा आहे. (रोमकर १२:२; २ करिंथकर ६:३) अगदीच सैल कपडे तसेच अगदीच तंग कपडे लोकांचे लक्ष आमच्या संदेशापासून दूर नेतील. जे कपडे घातल्यामुळे पुरुष स्त्री असल्याचा आणि स्त्री ही पुरुष असल्याचा आभास निर्माण केला जातो तसे कपडे घालणे हे निश्चितपणे चुकीचे आहे. (पडताळा अनुवाद २२:५.) अर्थातच हवामान तसेच व्यावसायिक गरजा इत्यादि कारणामुळे स्थानिक प्रथांमध्ये भिन्नता असेल, यामुळेच ख्रिस्ती मंडळी बंधूंनी जागतिकपणे अमूकच पेहराव घातला पाहिजे असा कडक व बंधनशील नियम करणार नाही. शिवाय वडीलांनी पेहरावाविषयीची स्वतःची पसंती कळपावर लादू नये. तथापि, असे दिसले की, कोणा राज्य-प्रचारकाची केशरचना मंडळीतील इतरांमध्ये शंका निर्माण करते व ख्रिस्ती उपाध्यपणापासून लक्ष विचलीत करणारी आहे तर त्याला किंवा तिला दयाळूपणे सूचना देणे उचित आहे. अशी सूचना तुम्हाला मिळाल्यास ती तुम्ही नम्रपणाने स्विकारुन यहोवावरील आपला भाव प्रदर्शित करणार का?—इब्रीयांस १२:७.
राज्य शोधकांना तरतूद मिळण्याविषयी देवावर भाव ठेवणे
११. काहीजण जडवादी ध्येयांच्या मागे कसे धावू लागले, आणि हे मूर्खतेचे का आहे?
११ “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) या शब्दांकडे कोणी कान देण्यात मागे पडते तेव्हा ते किती दुःखद असते! आर्थिक सुरक्षिततेच्या कहाण्या ऐकून ऐकून ते संपत्ती, प्रापंचिक शिक्षण आणि जागतिक ध्येये यांच्यामागे धावू लागतात, आणि “आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात.” (स्तोत्रसंहिता ४९:६) शलमोनाने लिहिलेः “धनवान होण्यास धडपड करु नको. . . . जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.”—नीतीसूत्रे २३:४, ५.
१२. संपत्तीच्या मागे धावणारे स्वतःला कशाप्रकारे ‘पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतात’?
१२ प्रेषित पौल पुढे असे म्हणतोः “द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:१०) यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट मध्ये डॉ. डग्लस लाबेईर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीच्या बाबतीत म्हटले की, संपत्तीच्या मागे धावणाऱ्या बऱ्याच तरुण पुरुष व स्त्रियांनी “असमाधानी वृत्ती, चिंता, नैराश्य, पोकळी, तसेच डोकेदुखी, पाठदुखी, पोटाचे विकार, निद्रानाश आणि भूकेची समस्या याविषयी कळविले आहे.”
१३. “अन्नवस्त्र” असण्यामध्ये समाधान मानणे अगदी उत्तम का आहे?
१३ आपली तरतूद पुरविण्याविषयी जे यहोवावर भाव ठेवतात अशांना बरीच काळजी व यातनांपासून सुटका मिळते. “अन्नवस्त्र असल्यास” तेवढ्यातच तृप्त राहण्याचा अर्थ अगदीच साधी रहाणीमान असा होईल. (१ तीमथ्य ६:८) पण, “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही.” (नीतीसूत्रे ११:४) जेव्हा आम्ही यहोवाची सेवा अधिक करतो तेव्हा स्वतःला “यहोवाचा आशीर्वाद” मिळविण्याच्या मार्गावर ठेवतो. हे असे आशीर्वाद आहेत जे ‘समृद्धी देतात व तिच्यासोबत आणखी कष्ट देत नाहीत.’—नीतीसूत्रे १०:२२.
“शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा”
१४, १५. (अ) काही वेळेस कोणत्या गोष्टींमुळे मंडळीची शांती नष्ट होते? (ब) जेथे दुमत आहे तेथे शांती कशी जोपासली जाऊ शकते?
१४ आम्ही यहोवावर भाव ठेवीत आहोत हे दाखविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आमच्या समविश्वासू बांधवासोबत “शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा” हा होय. (१ पेत्र ३:१०-१२) काही वेळा क्षुल्लक गोष्टीवरुन बांधवांमध्ये वादंग माजतोः राज्य-सभागृहाची सजावट, दोन मंडळीच्या क्षेत्रात सुचविण्यात आलेल्या सुधारणा, पुस्तक अभ्यास केंद्राच्या नेमणूका, मासिके व प्रकाशन वितरणाची हाताळणी इत्यादि. काही प्रकरणात बंधूजन आपल्या व्यक्तीगत वा व्यावसायिक समस्या मत्तय १८:१५-१७ च्या अनुषंगाने मिटविण्याऐवजी ते एकमेकांशी बोलण्याचेच थांबवतात किंवा मंडळीला नको त्या वितंडवादाने ग्रासून टाकतात.
१५ याकोब म्हणतोः “नीतीमत्त्वरुपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” (याकोब ३:१८) तेव्हा शांतीखातर, इतरांच्या आवडीनिवडी व मते यासाठी नमते घ्या आणि शक्य आहे तर स्वतःच्या हक्कावर पाणी सोडा. (पडताळा उत्पत्ती १३:५-१२.) उदाहरणार्थ, दोन मंडळ्या एकाच राज्यसभागृहाचा वापर करीत असतील तर एका मंडळीने ते सभागृह “आमचे” आहे आणि दुसऱ्या मंडळीने सभांच्या वेळा आणि इतर गोष्टीविषयी आमचे ऐकले पाहिजे असे धोरण धरु नये. अशा सर्व गोष्टीत उभयतांमध्ये आदर व सहकार्य असले पाहिजे.
१६. घर व मंडळी यामध्ये ईश्वरशासित व्यवस्थेची जाण राखण्याचे केवढे महत्त्व आहे?
१६ आम्ही ईश्वरशासित व्यवस्था ओळखली आणि आमचे स्थान योग्य ठिकाणी ठेवले तर बऱ्याच भानगडी टाळता येतील. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२-२७) बायका आपल्या पतींच्या इच्छेचा आदर करतात, मुले आपल्या आईबापाची आज्ञा मानतात, तसेच उपाध्य सेवक वडीलांकरवीचे मार्गदर्शन हाताळतात तेव्हा त्यांची कृति ‘मंडळीची वृद्धी घडविण्यासाठी प्रीतीमध्ये कार्य करते.’ (इफिसकर ४:१६) हे मान्य आहे की, कधी कधी पती, पालक आणि वडील देखील उणे पडतात. (रोमकर ३:२३) पण जे, योग्य मनोदयाने दिलेले मार्गदर्शन आहे त्याच्याविरुद्ध बंडाळी करणे, कुरकुरत राहाणे वा प्रतिकार करणे हे परिस्थितीत सुधारणा घडवून आणील का? देवाने आपल्याला जी जागा नेमून दिली आहे तेथे राहणे आणि शांती जोपासणे हे किती चांगले ठरेल बरे!
क्षेत्रामध्ये स्वतःला नेटाने पुढे नेणे
१७. (अ) प्रचारकार्यात नाममात्र सेवा करण्यासंबंधाने काहीजण कोणती कारणे दाखवितात? (ब) आजच्या दबावाशी ख्रिश्चनांनी कसा सामना द्यावा म्हणून येशूने उत्तेजन दिले?
१७ तरीपण काहींसाठी सुवार्तेचा प्रचार करण्याची ख्रिस्ती नेमणूक मोठी आव्हानात्मक वाटते. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) काहीजण म्हणतील की, आम्हाला उदरनिर्वाह करणे आणि कुटुंबाचा चरितार्थ चालविणे मोठे कष्टाचे आहे याकरता आम्ही अधिक काही क्षेत्रकार्य करु शकत नाही. ते नाममात्र सेवेचा अहवाल देतात. “शेवटल्या काळी” असणारे दबाव भयंकर आहेत हे मान्य आहे. (२ तीमथ्य ३:१) तरीपण, येशूने “संसाराच्या चिंता ह्यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊ” नये म्हणून इशारा दिला. परिस्थिती अधिकाधिक बिघडत असता ख्रिश्चनांनी ‘सरळ उभे राहून आपली डोकी वर करावीत.’ (लूक २१:२८, ३४) सैतानाच्या हल्ल्यात “टिकाव धरता यावा” यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढविणे”—नियमितपणे प्रचारकार्यात सहभागी होणे हा होय!—इफिसकर ६:१४, १५.
१८. प्रचाराच्या कामात काही पूर्ण रुपाचा सहभाग घेण्यात मागे राहतात त्याचे कारण काय असावे?
१८ पौलाच्या काळी (निदान काही मंडळ्यात) काही ख्रिस्ती ‘स्वतःच्याच गोष्टी पाहत होते; ख्रिस्त येशूच्या पाहत नव्हते.’ (फिलिप्पैकर २:२१) हे आज आम्हामधील काहीजणांविषयी खरे आहे का? याचे कारण कदाचित हे असावे की यांनी, ज्या माणसाला ‘मोलवान मोती’ आढळला व ज्याच्या प्राप्तीसाठी तो हवा तो त्याग करायला तयार झाला होता त्या माणसाप्रमाणे वृत्ती राखून राज्याची प्राप्ती करण्याचा दृष्टीकोन ग्रहण केला नसावा. (मत्तय १३:४५, ४६) स्वतःचे हित पाहण्याचा विचार राखल्यामुळे शक्य तितका कमी प्रतिकार दाखवून नाममात्र सेवा सादर करणे त्यांना बरे वाटते. तरीपण हे ध्यानात घ्या की, कोणा अनोळख्यासोबत बोलण्यास आरंभ करणे हे आम्हाला संकोचविणारे वाटत असले तरी यहोवा व शेजाऱ्यांवरील प्रेमच खऱ्या ख्रिश्चनांना प्रचार करण्यास उद्युक्त करते.—मत्तय २२:३७-३९.
१९. आमच्या शिथिल प्रयत्नांसंबंधाने यहोवा का असंतुष्ट असतो, आणि आम्ही त्याला सादर करीत असलेल्या सेवेसंबंधाचे मूल्यमापन आम्हाला कसे करता येईल?
१९ आम्हाला प्रचार करण्याची चालना येत नाही तर मग यहोवाविषयी वाटणारे प्रेम व त्याच्यासंबंधाने आम्हाला वाटणारा भाव हा केवळ वैचारिक स्थितीतला आहे असे म्हणावे लागेल. “तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व पूर्ण अंतःकरणाने त्याची सेवा कर,” असा दावीदाने शलमोनाला बोध केला. तो पुढे म्हणालाः “यहोवा सर्वांची अंतःकरणे पारखितो आणि त्यात जे विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात.” (१ इतिहास २८:९) आपल्या शिथिल प्रयत्नांनी यहोवा देव फसणार नाही. ‘जोराचा यत्न करण्यामुळे’ जे काही साध्य होऊ शकते ते आमच्याकडून केले जाऊ शकते तरीही आम्ही नाममात्र सेवा देत राहिलो तर त्या रुपातील आमचा क्षेत्रातील नियमित सहभाग त्याचे समाधान करु शकणार नाही. (लूक १३:२४) यास्तव प्रत्येक ख्रिश्चनाने, तो स्वतः क्षेत्रात केवढ्या प्रमाणात सहभाग घेत आहे याचे खरे मूल्यमापन करुन पहावे व स्वतःला विचारावेः ‘मला जे काही करता येऊ शकते ते खरेच मी करतो का?’ यासाठी आमच्या आवडीनिवडींमध्ये कदाचित बदल घडवून आणण्याची गरज असेल.
इतरांच्या उदाहरणांमुळे “चांगले करण्यासाठी” चालना मिळाली
२०. आमच्या सहख्रिश्चनांनी ठेवलेल्या चांगल्या उदाहरणांचे परिक्षण करणे का उचित आहे?
२० आम्ही देवास आपली सेवा “दुसऱ्यांच्या [कामा]संबंधाने” स्पर्धा राखून करीत नाही. (गलतीकर ६:४) तरीपण, दुसऱ्यांच्या चांगल्या उदाहरणांमुळे आम्हाला अधिक करण्याची चालना मिळू शकते. प्रेषित पौलाने स्वतःच्या बाबतीत असे म्हटले की, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) तेव्हा, आमचे बांधव दर महिन्याला क्षेत्र कार्यात किती वेळ खर्च करीत आहेत याचा विचार करा. अमेरिकेत प्रचारकांच्या तासांची सरासरी १९७९ च्या ८.३ पासून १९८७ मध्ये ९.७ पर्यंत पोहंचली आहे! आमचे बांधव क्षेत्रकार्यात आपला वेळ वाढवीत आहेत. हे तुमच्या बाबतीत सुद्धा खरे आहे का?
२१. पुष्कळांना पायनियर कार्य स्विकारण्याची चालना कशामुळे मिळाली? विवेचीत करा.
२१ इतरांनी घालून दिलेल्या आवेशी उदाहरणांमुळे उत्स्फुर्त होऊन बांधव मोठ्या संख्येने नियमित पायनियरिंगचे कार्य हाती घेत आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एन्जेला या तरुण भगिनीला एका चांगल्या नोकरीचे आकर्षण आले व यात तिच्या पसंतीच्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती देखील मिळणार होती. तरीपण एन्जेला हिने पूर्ण वेळेचे उपाध्यपण निवडून घेतले. काय कारण बरे? “पायनियर बांधवांच्या सतत सहवासामुळे त्यांना केवळ स्वतःपुरताच नव्हे तर यहोवासोबत त्यांनी राखलेल्या नातेसंबंधात केवढा खोल आनंद व समाधान मिळते ते मला बघायला मिळाले. हाच आनंद व समाधान मीही मिळवावे असे मला वाटते.”
२२. शिकलेल्या गोष्टी आचरल्यामुळे कोणते फायदे मिळतात?
२२ “खोल आनंद व समाधान प्राप्त करावे” अशी तुमची देखील इच्छा आहे का? तर मग, “यहोवावर भाव ठेवा व सदाचाराने वागा”! तुम्हाला जे ज्ञात आहे ते तुम्हाला यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करण्याची चालना देवो. शिकलेल्या गोष्टींचे आचरण केल्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती सर्वांना दिसून येईल आणि इतरांना जीवनदायी मार्गाकरवी मदत मिळेल. (१ तीमथ्य ४:१५, १६) पौलाने फिलिप्पैकरांना ४:९ मध्ये लिहिलेल्या शब्दांना सर्वांकडून प्रतिसाद लाभला जावो. तो म्हणतोः “माझ्यापासून जे काही तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.”
उजळणीसाठी मुद्दे
◻ देवाच्या वचनाच्या आरशात डोकावून बघण्यासंबंधीचा आमचा प्रतिसाद कसा असावा?
◻ आम्ही इतरांबरोबर व्यवहार राखण्याच्या बाबतीत कशी सुधारणा करु शकतो?
◻ भौतिक गोष्टींच्या मागे लागत राहाणे हे का मूर्खतेचे आहे?
◻ आम्ही मंडळीत शांती राखण्याचा कसा प्रयत्न करु शकू?
◻ क्षेत्रकार्यात पूर्ण रुपाचा सहभाग घेण्यासाठी कशाने आम्हाला चालना दिली पाहिजे?
[१६ पानांवरील चित्रं]
नुसत्या आध्यात्मिक चुका व कलंक पाहून उपयोगाचे नाही. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही कृति आचरली पाहिजे!
[१८ पानांवरील चित्रं]
संपत्तीच्या मागे लागणारे बहुधा आपणावर ‘पुष्कळसे खेद’ आणीत असतात