सहावी जागतिक सत्ता—रोम
ख्रिस्ती धर्माचा उद्भव झाला तेव्हा रोमी साम्राज्य राज्य करीत होते. तद्वत, प्राचीन रोमची अधिक माहिती, येशूने कोणत्या परिस्थितीत प्रचार केला तसेच त्याच्या आरंभीच्या अनुयायांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्या काळी ज्ञात असलेल्या जगात केला तेव्हा कोणते वातावरण होते त्याची समज प्राप्त होण्यास मदत देईल.
रोम ही पवित्र शास्त्र इतिहासातील सहावी जागतिक सत्ता येशूचा जन्म झाला, त्याच्या प्रेषितांनी प्रचार केला तेव्हा राज्य करीत होती. या आधीच्या ग्रीस या जागतिक सत्तेने कोइन किंवा सर्वसामान्य ग्रीक ही आंतरराष्ट्रीय भाषा दिली ज्याकरवी ख्रिस्ती शिकवणींचा प्रसार त्या काळच्या जगातील या सर्व भागात होऊ शकला. आता रोमने अशी परिस्थिती व मार्ग पुरविले ज्याद्वारे ख्रिस्ती सत्याचा जलद प्रसार होऊ शकला.
इटलीमध्ये लॅटीयम येथील एकेकाळी लहान असलेले रोम हे शहर प्राचीन पवित्र शास्त्र काळातील सर्वात मोठे जागतिक साम्राज्य बनण्यापर्यंत वाढले. याची सुरुवात त्याने इटलीतील परगण्यांवर अधिपत्य करण्याद्वारे झाली. त्याने आफ्रिकेच्या उत्तर बंदरकिनाऱ्यावरील शक्तीमान कार्थेजचा पराभव केला. स्पेन, मासेदोनिया व ग्रीस त्याच्या सत्तेखाली आले. यानंतर इ.स.पू. ६३ मध्ये यरुशलेम त्याच्या ताब्यात आले. त्याने मिसरला इ.स.पू. ३० मध्ये रोमी प्रांत बनविला. आपल्या कळसात असताना या प्रबळ साम्राज्याने आपला विस्तार ब्रिटनपासून खाली मिसर आणि पोर्तुगालपासून ते मेसोपोटेमिया जो प्राचीन बाबेलचा प्रदेश तेथपर्यंत नेला. त्याने संपूर्णपणे भूमध्य समुद्राला वेढा दिला; याला त्याने मारे नोश्रम (आमचा समुद्र) असे म्हटले.
त्या भव्य साम्राज्यात पसरलेल्या अनेक रोमी अवशेषांना आजही भेटी देता येतात. ब्रिटनमधील हेड्रीयनची भिंत, स्पेनमध्ये सेगोविया येथे बांधण्यात आलेला पाण्याचा प्रचंड खंदक, ओरेंजी येथील रोमी आराखडा तसेच आरलस येथील आराखडा (दोन्ही दक्षिण फ्रान्समध्ये) पाहता येईल. रोमजवळील ओस्टीआ अँटीकाच्या मूक अवशेषांजवळून तुम्हाला जाता येईल तसेच दक्षिण नापल्स येथील प्राचीन पॉम्पी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. रोममधील राजवाड्याभोवती प्रचंड गर्दी आहे अशी तुम्हाला कल्पना करता येईल तसेच टायटसची कमान देखील पाहता येईल जी, त्याने इ. स. ७० मध्ये यरुशलेम व त्याचे मंदीर यांच्या नाशाच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारली होती. या नाशाविषयीचे भाकित येशूने ३५ वर्षे आधी केले होते.
प्राचीन रोममध्ये श्रीमंत लोकांची मोठमोठी घरे होती आणि त्यात शेकडो नोकरचाकर काम करीत. पण, गरीब मात्र अनेक मजली घरात राहात ज्या गलिच्छ व वक्र रस्त्यावर बांधलेल्या होत्या. खूपच थोड्यांना मध्यमवर्गीय म्हणत. गरीबांनी बंडाळी करु नये यासाठी त्यांना धान्य भत्ता आणि करमणूक मोफत दिली जाई. प्रांतावर बसवण्यात आलेला कर या खर्चाची भरपाई करीत असे.
रोमी सैन्य
प्रसिद्ध रोमी सैन्य वेगवेगळ्या तुकड्यात विभागलेले होते. प्रत्येक तुकडीत ४,५०० ते ७,००० पुरुष असत व ते पूर्ण सैन्य होते. त्यावरील अधिकारी पूर्णपणे बादशहास जबाबदार असत. एका तुकडीच्या ६० पलटणी असत व त्यात साधारणतः प्रत्येकी शंभर माणसे असत. ही पलटण एका शताधिपतीच्या ताब्यात असे व याला “सेनाधिपती” असे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये म्हटले आहे. अशा एका शताधिपतीच्या आज्ञेवरुन चार शिपायांनी येशूला मृत्युसाठी वधस्तंभावर चढविले. याच शताधिपतीने येशूच्या मृत्युच्या वेळी घडलेल्या अद्भूत घटना बघून असे म्हटलेः “खरोखर हा देवाचा पुत्र होता.” (मत्तय २७:५४; योहान १९:२३) शिवाय आणखी एक शताधिपती, कर्नेल्य हा पहिला बेसुंती यहुद्देत्तर माणूस होता जो ख्रिस्ती बनला.—प्रे. कृत्ये १०:२२.
प्रत्येक तुकडीचे विशिष्ठ निशाण असे, जे लाकूड वा धातूपासून बनविलेल्या प्रतिमा किंवा चिन्ह असत. आज आधुनिक निशाण वा पताका ज्यासाठी वापरली जाते तोच उद्देश त्यामागे होता. या निशाणाला पवित्रपणे जपत आणि यासाठी ते जीवाची पर्वाही करीत नसत. एनसायक्लोपिडिआ ब्रिटेनिका म्हणतोः “रोम येथील मंदिरात रोमी निशाणांना धार्मिक पद्धतीने वागवीत. शत्रूसैन्यावर हल्ला करण्यासाठी अधिकाऱ्याने निशाण फडकविण्याचा हुकुम देणे हे असाधारण नव्हते; अखिल जगात पवित्र वाटणाऱ्या या निशाणाच्या प्राप्तीस्तव आपल्या शिपायात चैतन्य भरविणे हेही असाधारण नव्हते.”
रोमी रस्ते व पदव्या
रोमने अंकित केलेल्या राष्ट्रांना जागतिक साम्राज्यामध्ये जोडून घेतले. या साम्राज्यात शक्य आहे त्या सर्व ठिकाणी जाता येण्यासाठी रस्ते केले. शिवाय लोकही प्रवास करु लागले! इ. स. ३३च्या पेंटेकॉस्ट सणाच्या वेळी लोक कोठून यरुशलेमात आले होते त्याच्या यादीकडे जरा लक्ष द्या. ते इशान्येकडील दूरवरील मेदियापासून, रोमकडून, पश्चिमेकडील दूरच्या अफ्रिकेच्या उत्तर भागाकडून आणि त्यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणाहून आले होते.—प्रे. कृत्ये २:९-११.
रोमचे रस्ते बांधणाऱ्यांनी बांधलेल्या रस्त्यांपैकी काही अद्याप वापरात आहेत. रोमच्या दक्षिणेकडे जेथून स्वतः प्रेषित पौल रोमला गेला त्या अप्पियाच्या मार्गावरुन आजही तुम्हाला वाहन चालविता येते. (प्रे. कृत्ये २८:१५, १६) “लोहमार्ग प्रचलित होईपर्यंत रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना निरनिराळ्या सुविधा पुरविल्या जात” असे सांगण्यात आले आहे.—द वेस्टमिनिस्टर हिस्टॉरिकल ॲटलास टू द बायबल.
चोहीकडे पसरलेल्या आपल्या साम्राज्यावर ताबा ठेवताना रोमने तेथील स्थानिक प्रथा तशाच ठेवल्या. यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणचे अधिकारी वेगवेगळ्या नावांनी वा पदव्यांनी ओळखले जात. मॉडर्न डिस्कव्हरी ॲण्ड द बायबल या प्रकाशनात ए. रँडल शॉर्ट म्हणतात की, “मशहूर रोमी इतिहासकार” सुद्धा “या सर्व मध्यमवयीन लोकांच्या संज्ञा बरोबर देत नव्हते.” तरीपण, ते म्हणतात की, पवित्र शास्त्र लेखक लूक याने मात्र “सर्व काही अचूकपणे लिहिले.” उदाहरणार्थ, लूक हेरोदाला “मांडलिक”, हेरोद अग्रिप्पा याला “राजा”, थेस्सलनीकातील अधिकाऱ्यांना “अधिकारी”, आणि कुप्रचा प्रांताधिकारी सिर्ग्य पौल याला “सुभेदार” या पदव्यांनी संबोधितो. (लूक ३:१; प्रे. कृत्ये २५:१३; प्रे. कृत्ये १७:६; प्रे. कृत्ये १३:७; पहा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.) कधी कधी संशोधनात मिळालेले एखादे नाणे वा त्यावरील मजकूर याने या पवित्र शास्त्र लेखकांनी योग्य वेळी कोणती योग्य पदवी वापरली त्याची प्रचिती देते. अशा प्रकारची ही अचूकता व काळजीपूर्वक लिखाण पवित्र शास्त्रात येशू ख्रिस्ताचे जीवनी चरित्र व काळाविषयी जी ऐतिहासिक माहिती पुरविण्यात आली त्या अहवालाची सत्यता अधिकांशाने वदविते.a
साम्राज्य आणि ख्रिस्ती धर्म
रोममध्ये ख्रिस्ती मंडळीची वाढ झाली. या मंडळीची प्रस्थापना बहुधा जे लोक इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या सणामधून ख्रिस्ती धर्माचा स्विकार करुन यरुशलेमाहून परतले होते त्यांच्याकडून झाली असावी. (प्रे. कृत्ये २:१०) रोमकरांस पत्र हे पवित्र शास्त्रात असणारे पुस्तक या मंडळीला सुमारे इ. स. ५६ मध्ये लिहिण्यात आले. नंतर पौल रोम येथे कैदी म्हणून आला आणि साधारण दोन वर्षे त्याने, तो बंदिस्त होता त्या घरात जे त्याला भेटण्यास येत त्यांना कसून साक्ष दिली. अशाप्रकारे बादशहाच्या प्रेटोरियन रक्षकाच्या सदस्यांनी राज्याचा संदेश ऐकला ते, तसेच “कैसराच्या घरचे” सदस्य देखील ख्रिस्ती बनले.—फिलिप्पैकर १:१२, १३; ४:२२.
रोमी साम्राज्याच्या प्रथा, कायदे आणि नियम यांचा पवित्र शास्त्रात बहुतेक वेळा उल्लेख आला आहे. औगुस्त याने काढलेल्या फर्मानामुळे योसेफ व मरीया बेथलहेमास आली व येथे येशूचा जन्म झाला. कैसर ज्याची मागणी करीत होते तो कर भरणे योग्य आहे याला येशूने पुष्टी दिली. येशूला ठार मारता यावे यासाठी यहुदी याजकांनी कैसराला निष्ठावंत आहोत अशी बतावणी केली. रोमी कायद्यामुळेच ख्रिस्ती प्रेषित पौलाला आपल्या प्रकरणाविषयी कैसराजवळ अपील करता आले.—लूक २:१-६; २०:२२-२५; योहान १९:१२, १५; प्रे. कृत्ये २५:११, १२.
रोमी शिपायाची शस्त्रसामग्री—त्याचे शिरस्त्राण, उरस्त्राण, ढाल, चढावा आणि तलवार—या गोष्टींचा वापर सत्य तसेच तारणाची आशा, धार्मिकता, विश्वास, सुवार्ताप्रचार आणि देवाचे वचन या सर्व गोष्टी सैतानाकडील हल्ल्यात दृढ उभे राहता यावे यासाठी कशा सहाय्यक आहे ते विदारीत करण्यासाठी करण्यात आला आहे. (इफिसकर ६:१०-१८; १ थेस्सलनीकाकर ५:८) पौलाने तीमथ्याला “ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई” होण्याचे उत्तेजन दिले तेव्हा तो चांगल्या प्रशिक्षित रोमी सैनिकाला उल्लेखित होता. (२ तीमथ्य २:३, ४) तरीपण ख्रिस्ती युद्ध हे शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक होते. यासाठीच आरंभीच्या ख्रिस्तीजनांनी रोमी सैन्यात भरती होण्याचा नकार दिला होता. जस्टीन मारटर (इ.स. ११०-१६५) यांनी म्हटले की, ख्रिस्तीधर्माने “आमची युद्धाची अस्त्रेच बदलविली. आमच्या तलवारी फाळ झाल्या आणि आमच्या भाल्यांच्या कोयत्या झाल्या.” लष्करी सेवेत भरती होण्याचे नाकारल्यामुळे कित्येक ख्रिश्चनांना आपल्या जीवनाची आहुती द्यावी लागली.
कैसर
कैसरांच्या कारकिर्दीत रोम आपल्या वैभवी कळसाला पोहोंचले. यापैकींच्या काहींची वस्तुस्थिती समजावून घेणे इष्ट वाटते, कारण यांचा पवित्र शास्त्र इतिहासासोबत संबंध आलेला आहे.
इ.स.पू. ४४ मध्ये ज्युलियस सीझरची हत्या झाली. यामुळे ऑक्टोवियन हा एकटाच अधिपती राहिला. इ.स.पू. ३० मध्ये ऑक्टोवियनने मिसरला आपल्या अंकित केले आणि तेथे असणारी ग्रीक टोलेमी राजवट संपविली. यामुळेच ३०० वर्षे आधीपासून सिकंदर बादशहाकरवी जे ग्रीसचे साम्राज्य जागतिक रुपाने अधिकार गाजवीत होते ते संपुष्टात आले.b
इ.स.पू. २७ मध्ये ऑक्टोवियन बादशहा बनला. त्याने “औगुस्त” ही पदवी धारण केली, ज्याचा अर्थ “उच्च, पवित्र” असा होतो. त्याने पंचागातील एका महिन्याला आपले नाव दिले आणि फेब्रुवारीतील एक दिवस या महिन्यात घेतला की ज्यामुळे ज्युलियस सीझरने आपले नाव दिलेल्या महिन्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील दिवसांची संख्या त्यासमान होईल. येशू जन्मला तेव्हा औगुस्त बादशहा होता व त्याने इ.स. १४ पर्यंत आपली राज्यकीर्द केली.—लूक २:१.
औगुस्त नंतर आलेल्या तिबिर्य याने इ.स. १४ पासून इ.स. ३७ पर्यंत राज्य केले. तिबिर्यच्या राज्यकीर्दीच्या १५ व्या वर्षी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आपला प्रचार आरंभिला. याच्याच कारकिर्दीत येशूचा बाप्तिस्मा झाला, त्याचे साडेतीन वर्षांचे उपाध्यपण झाले आणि आपल्या जीवनाचे त्याने बलिदान दिले. येशूच्या अनुयायांनी त्या काळी ज्ञात असणाऱ्या जगात प्रचारकार्य आरंभिले तेव्हाही तोच राज्य करीत होता.—लूक ३:१-३, २३.
यानंतर गायस ज्याला कॅलिगला असेही म्हणत, त्याने इ.स. ३७ पासून इ.स. ४१ पर्यंत राज्य केले. त्याच्यानंतर क्लौदिया (इ.स. ४१-५४) हा राज्यावर आला आणि याच्याच कारकिर्दीत त्याने यहुद्यांनी रोम सोडून जावे अशी आज्ञा केली, ज्याविषयी आपल्याला प्रे. कृत्ये १८:१, २ मध्ये वाचावयास मिळते. याला त्याच्या बायकोने विष घालून ठार केले आणि तिचा तरुण मुलगा निरो यानंतर गादीवर आला. इ.स. ६४ च्या जुलै महिन्यात रोममध्ये प्रचंड आग लागली आणि शहराचा पाव हिस्सा जळून भस्मसात झाला. इतिहासकार टॅसिटस् म्हणतो की, निरोने, आपणावर आळ येऊ नये यासाठी तो दोष ख्रिश्चनांवर लादला. यामुळे या ख्रिश्चनांना “कुत्र्यांनी फाडून ठार केले” व शिवाय दिवस मावळल्यावर मशाली व्हाव्यात यासाठी त्यांना “आगीचा लोळ सहन करुन जळून मरावे लागले. याकरता निरोने आपले पटांगण सज्ज केले होते.” हा छळ होत असताना पौलाला दुसऱ्यांदा कैदी व्हावे लागले. या काळापावेतो त्याने यरुशलेम ते रोम व कदाचित स्पेनलाही प्रचार केला असावा. त्याचा इ.स. ६६ च्या सुमाराला निरोकरवी घात झाला असावा.
आणखी एका ज्या रोमी सम्राटाविषयी आपल्याला रस वाटतो तो आहे व्हेसपासियन (इ.स. ६९-७९) व याच्याच कारकिर्दीत टायटसने यरुशलेमाचा नाश केला. यानंतर स्वतः टायटसने (इ.स. ७९-८१) व टायटसचा भाऊ डोमीटीयन (इ.स. ८१-९६) यांनी ख्रिश्चनांच्या छळास शासकीय मार्गाने पुढे आणले. या छळाच्या काळात सांप्रदायिकरित्या मानले जाते की, वृद्ध प्रेषित योहान पात्म नावाच्या बेटावर कैदी म्हणून होता. येथेच त्याला या दुष्ट मानवी व्यवस्थांचा विनाश व त्याऐवजी देवाच्या धार्मिक स्वर्गीय राज्याच्या प्रस्थापनेविषयीचा वैभवी दृष्टांत देण्यात आला जो त्याने पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण या पुस्तकात लिखित केला आहे. (प्रकटीकरण १:९) यानंतर आलेल्या नेरव्हा या बादशहाच्या काळात (इ.स. ९६-९८) योहानाची तुरुंगवासातून सुटका झाली असे दिसते आणि योहानाने आपले शुभवर्तमानाचे तसेच तीन पत्रांचे लिखाण त्राजन (इ.स. ९८-११७) याने अधिकार गाजविण्यास आरंभ केला तेव्हापर्यंत पूर्ण केले.
रोमी साम्राज्याचे पतन
चवथ्या शतकात कॉन्स्टंटाईन बादशहाने एका “कॅथोलिक” वा सार्वत्रिक धर्माखाली लोकांना एकवटण्याचे ठरविले. मूर्तिपूजक प्रथा व समारंभ यांना “ख्रिस्ती” नावे देण्यात आली पण या नावाखालीसुद्धा त्याच भ्रष्ट आचारपद्धती वागविण्यात आल्या. इ.स. च्या ३२५ व्या वर्षी निका येथे भरलेल्या चर्च परिषदेत कॉन्स्टंटाईन याने अध्यक्षपद भूषविले व त्याने त्रैक्याच्या बाजूने आपली संमती दिली. खरा ख्रिस्ती नसल्यामुळे त्याने आपला थोरला मुलगा क्रिसपस आणि स्वतःची बायको फौस्टा यांचा काही कारणांमुळे वध केला.
कॉन्स्टंटाईनने आपले सरकार बायझान्टीम येथे हलविले. या शहराला त्याने प्रथम नवे रोम व नंतर कॉन्स्टँटिनोपल (कॉन्स्टंटाईनचे शहर) असे नाव दिले. जेथे युरोप व आशिया एकत्र भेटतात त्या बोसपोअरस जागी असलेले ते शहर रोमी साम्राज्याची पूर्वेकडील राजधानी म्हणून ११ शतके राहिले; ते नंतर १४५३ मध्ये ओटोमन टर्कपुढे पडले.
रोममध्ये रोमी साम्राज्याचा पश्चिम विभाग, बादशहाला राजा ओडोसर या जर्मन वंशीय अधिकाऱ्याने पदच्युत केले तेव्हा इ.स. ४७६ मध्ये पडला. यामुळे सिंहासन रिकामे झाले. चार्लमॅग्ने याने नंतर पश्चिम विभागीय साम्राज्य पुन्हा वसविण्याचा प्रयत्न केला आणि इ.स. ८०० या वर्षी त्याला पोप लिओ ३ याकरवी बादशहा म्हणून मुकुटमंडित करण्यात आले. नंतर इ.स. ९६२ मध्ये पोप जॉन बारावे यांनी ओटो १ याला जर्मन राष्ट्रातील पवित्र रोमी साम्राज्याचा सत्ताधीश बनविले—हे पद १८०६ पर्यंत चालू राहिले व नंतर ते बदलण्यात आले.
पण यावेळेपावेतो पवित्र शास्त्र इतिहासातील सातवे व शेवटले जागतिक साम्राज्य सामोरे येत होते. पण भाकितात दाखविण्यात आल्याप्रमाणे हे सुद्धा लवकरच लयास जाणार होते व त्याऐवजी एका चिरयास्थी सरकारची, देवाच्या स्वर्गीय राज्याची प्रस्थापना होणार होती.—प्रकटीकरण १७:१०; दानीएल २:४४.
[तळटीपा]
a पहा “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल,” पृष्ठे ३४०-१.
b यामुळेच, रोमचे अधिपत्य सुरु असताना दिव्यदूत या जागतिक साम्राज्यांविषयी हे म्हणू शकलाः “सात राजे आहेतः त्यापैकी पाच पडले आहेत [मिसर, अश्शुर, बाबेल, मेद-पारस व ग्रीस], एक आहे [रोम], आणि एक [अँग्लो-अमेरिकन] अद्याप आला नाही.”—प्रकटीकरण १७:१०.
[२४ पानांवरील नकाशा]
रोमी साम्राज्याचा विस्तार
ब्रिटेनिया
अटलांटिक समुद्र
स्पेन
गॉल
इटली
रोम
ग्रीस
भूमध्य समुद्र
मिसर
काळा समुद्र
कॅस्पियन समुद्र
तैग्रीस
युफ्रेटीस
यरुशलेम
[२६ पानांवरील चित्रं]
पौल ज्या रस्त्याने रोमला गेला तो अप्पियन मार्ग