ग्रीस—पाचवी मोठी जागतिक सत्ता
भरदार धावणाऱ्या चित्याप्रमाणे सिकंदर ग्रीसमधून बाहेर पडला व त्याने आपली मोहीम आशिया मायनर (सध्याचे तुर्कस्थान), पॅलेस्टाईन, मिसर आणि मेद-पारस साम्राज्यापर्यंत नेऊन ती भारताच्या किनाऱ्यापर्यंत आणली. ह्या असाधारण विजेत्याविषयी व पवित्र शास्त्र त्याच्याविषयी जे म्हणते त्याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यावेसे वाटेल का?
अवघा २० वर्षांचा असताना तरुण सिकंदर मासेदोनियाच्या राज्यपदी विराजमान झाला. दोन वर्षांनी तो आपला बाप फिलिप याच्या योजनेनुसार, पूर्वेकडे असणाऱ्या प्रबळ पारसाच्या साम्राज्याविरुद्ध लढण्यास गेला. आपली मोहीम संपविण्याआधी सिकंदरने त्याच्या काळातील जगावर सरशी मिळवली होती.
या हिंमतवान तरुण लष्करी योद्ध्याने आपले पराक्रम आशिया मायनर, अराम, पॅलेस्टाईन, मिसर, बाबेलोनिया आणि प्राचीन भारताच्या उंबरठ्यापर्यंत अधिपत्य असलेले सबंध मेद-पारसाचे साम्राज्य येथपर्यंत गाजविले! प्राचीन काळच्या त्याच्या या प्रतापामुळेच तो आज थोर सिकंदर या नावाने मशहूर आहे.
आश्चर्य वाटेल इतक्या अल्प काळात ग्रीस हे पवित्र शास्त्र इतिहासातील पाचवे जागतिक साम्राज्य बनले, व ते त्याआधीच्या सर्व साम्राज्यापेक्षा मोठे झाले. हे असे कसे झाले? देवाच्या वचनाशी त्याच्या कसा संबंध आहे? याचा तुम्हासाठी काय अर्थ होतो?
पवित्र शास्त्र भविष्यवादात भाकित केले होते
सिकंदरच्या काळाच्या दोनशे वर्षे आधी, बाबेल आपल्या सत्तेत असताना आणि मेद व पारस अद्याप जागतिक साम्राज्य बनले नव्हते तेव्हा दानीएल या यहोवाच्या संदेष्ट्याला जागतिक इतिहासाच्या भावी रुपरेषेविषयी दोन मोठे भविष्यवादित दृष्टांत देण्यात आले. मग, जेव्हा बाबेल पडले तेव्हा त्याला तिसऱ्या भविष्यवादाचा लाभ मिळाला, ज्याची पूर्णता त्याच्या काळाच्या कितीतरी वर्षानंतर घडणार होती. दानीएलाने त्यांचे लिखाण करुन ठेवले. ज्यांच्या पूर्णतेला दोनशे वर्षांचा कालावधी लागला त्या ह्या भविष्यवादात सिकंदर व त्याच्या राज्याचे काय घडणार त्याविषयीची माहिती समाविष्ट आहे.
दानीएलाला असे काय प्रकट करण्यात आले? याविषयीची माहिती तुम्हाला त्याचे नाव असलेले पवित्र शास्त्रातील दानीएल या पुस्तकात सापडेल. याचे लिखाण इ.स.पू. ५३६ च्या सुमाराला झाले. दानीएलाने ग्रीस या पाचव्या जागतिक साम्राज्याविषयी ज्या गोष्टी पाहिल्या त्या थोडक्यात अशा आहेतः
पहिल्या भविष्यवादित दृष्टांतात ग्रीसला भरधाव धावणाऱ्या चित्त्याची उपमा देण्यात आली. “त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; . . . त्यास अधिकार दिला होता.”—दानीएल ७:६.
दुसऱ्या भविष्यवादित दृष्टांतात एक बकरा “मावळतीकडून [पश्चिमेकडून] सर्व पृथ्वी आक्रमून आला,” असे दिसले. त्याचा वेग इतका होता की, “त्याने जमिनीस पाय लावला नाही.” त्याने येऊन दोन शिंगाचा एडका, जो, “मेदय व पारस यांचे राजे” यांचे प्रतिनिधित्व करीत होता असे दिव्यदूताने म्हटले, त्याला धडक मारली. बकऱ्याने “त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली.” दानीएलला सांगितले गेले की, “तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा” आहे.—दानीएल ८:५-८, २०, २१.
तिसऱ्या प्रकारात, दानीएलला म्हटले गेले की, “पारसाचा [एक राजा] . . . सर्वांस ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवील. आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील.”—दानीएल ११:२, ३.
या सर्व सांकेतिक भाषा काय सुचवितात? जे काही घडणार असे दानीएलला सांगण्यात आले होते त्याप्रमाणेच सर्व काही घडले का? आपण पाहू या.
भविष्यवाद पूर्ण झाले
इ.स.पू. ३३४ च्या वसंत ऋतुमध्ये सिकंदरने ३०,००० शिपाई आणि ५,००० घोडेस्वारांच्या पलटणीसह आशियात डर्डानेलेस (प्राचीन हेलेस्पाँट) येथे प्रवेश केला. चार पंखे असलेल्या वेगवान चित्त्याप्रमाणे किंवा जमिनीस पाय न लावणाऱ्या बकऱ्याप्रमाणे येऊन त्याने पारसाच्या साम्राज्यास उधळविले. हे पारसाचे साम्राज्य त्याच्या राज्यापेक्षा ५० पटीने अधिक मोठे होते! तर आता तो, ‘आपली सत्ता फार गाजविणार’ तसेच “आपल्या इच्छेला येईल तसे” करणार होता का? इतिहास याचे उत्तर देतो.
आशिया मायनर (आजचे तुर्कस्थान) याच्या वायव्य कोपऱ्याला असणाऱ्या क्रेनिकस नदीजवळ सिकंदरने पारसाविरुद्ध आपली पहिली लढाई जिंकली. त्याच वर्षी त्याने आशिया मायनरचा पश्चिम भाग मिळविला. पुढील शरद ऋतुत आशिया मायनरच्या आग्नेय दिशेकडील इसस येथे त्याने पाच लाख पारसाच्या सैन्याचा पराभव केला. हा पराभव इतका दारुण होता की, पारसाचा राजा तिसरा दारयावेश याने आपल्या बायकामुलांस सिकंदरच्या हाती सोडून दिले व तो स्वतः पळून गेला.
पळणाऱ्या पारसी सैन्याचा पाठलाग करण्याऐवजी सिकंदरने आपला मोर्चा दक्षिणेकडे भूमध्य समुद्रालगतच्या किनाऱ्याकडे वळवून तेथील तळ काबीज केले; यांचा वापर पारसाच्या गलबतांचा ताफा करीत असत. सोरच्या बेटावरील शहराने सात महिने प्रतिकार केला. शेवटी, नबुखदनेस्सर राजाने नष्ट केलेल्या जुन्या भुपृष्ठावरील शहराच्या अवशेषांचा वापर करुन सिकंदरने बेटावरील शहरास जाण्यासाठी एक मार्ग बांधला. या मार्गाचे अवशेष आजही दिसतात व ते सोरची माती पाण्यात बुडवण्यात येईल या यहज्केलने वदविलेल्या भविष्यवादाची पूर्णता वदवितात.—यहेज्केल २६:४, १२.
यरुशलेमने शरणागति पत्करल्यामुळे सिकंदर पुढे दक्षिणेकडे गेला व त्याने गज्जा सर केले आणि त्याने “आपली सत्ता” “आपल्या इच्छेस येईल” त्याप्रमाणे मिसरपर्यंत नेली. येथे त्याचे मुक्तीदाता म्हणून स्वागत झाले. मेम्फीस येथे त्याने ॲपिस बैलापुढे यज्ञयाग करुन मिसरी याजकांना संतुष्ट केले. त्याने येथे अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली. हे शहर नंतर अथेन्स या विद्यालयीन केंद्राचे प्रतिस्पर्धी बनले; याला आजही अलेक्झांड्रिया असेच ओळखले जाते, ज्यात सिकंदरच्या नावाचा अंश आहे.
सिकंदरच्या वडीलांच्या योजना व हेतू सफळ झाले, पण सिकंदर मात्र त्यापुढे गेला. जोराने आक्रमण करणाऱ्या बकऱ्याप्रमाणे तो इशान्येकडे पॅलेस्टाईनकडून पुढे तैग्रीस नदीपर्यंत गेला. येथे इ.स.पू. ३३१ मध्ये त्याने अश्शुरची पूर्वीची राजधानी निनवे याच्या अवशेषापासून जवळच असलेल्या गोगमेलापाशी पारसाच्या सैन्याचा सामना केला. पारसाच्या १०,००,००० संघटित सैन्यावर सिकंदरच्या ४७,००० सैन्याने सरशी मिळविली. दारयावेश तिसरा पळून गेला व याचा नंतर त्याच्याच लोकांनी वध केला.
विजयाने भारावून जाऊन सिकंदर दक्षिणेकडे वळला व त्याने पारसाची हिवाळी राजधानी बाबेलोन सर केले. त्याने सुसा व पर्सेपोलिस येथील राजधान्यांवरही मोर्चा वळविला व तेथील पारसाची प्रचंड संपत्ती हस्तगत केली आणि झरक्सीसचा मोठा राजवाडा जाळून टाकला. शेवटी, एक्बटाना येथील राजधानी त्याच्यासमोर नमली. या वेगवान विजेत्याने नंतर पारसाच्या साम्राज्याच्या इतर भागावर आपले वर्चस्व स्थापिले व तो सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधु नदीच्या पूर्वभागापर्यंत आला. खरेच, ग्रीस हे पवित्र शास्त्र इतिहासातील पाचवे प्रबळ जागतिक साम्राज्य बनले होते.
सिकंदरने मिळविलेल्या विजयामुळे ग्रीक भाषा व संप्रदाय या विस्तीर्ण साम्राज्यात पसरविला गेला. जिंकलेल्या देशात ग्रीक वसाहती निर्माण झाल्यामुळे कोईन ग्रीक ही त्या काळातील आंतरराष्ट्रीय भाषा बनली. याच भाषेत पवित्र शास्त्राच्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे लिखाण झाले.
सिकंदरचे राज्य विभागले जाते
सिकंदरने आपल्या साम्राज्याची राजधानी बाबेलोन करावी म्हणून त्याची पुनर्बांधणी करण्याची इच्छा धरली. पण ती सफळ होणार नव्हती. भविष्यवादात, डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग असणाऱ्या या बकऱ्याविषयी दानीएलला असे सांगण्यात आले होतेः
“तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या ऐवजी त्याला चार बाजूस चार ठळक शिंगे फुटली. . . . तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा; त्याच्या डोळ्याच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा. एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली याचा अर्थ असा की, त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्याचे बल पहिल्या राज्याइतके राहावयाचे नाही.”—दानीएल ८:८, २१, २२.
“तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांस त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक यावयाचे नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करुन ते त्याच्या संतीस वगळून इतरांस देण्यात येईल.”—दानीएल ११:४.
पवित्र शास्त्राने भाकित केल्याप्रमाणे सिकंदरच्या जगस्वामित्वाचा आनंद अल्पकाळ टिकला. आपल्या विजयी ध्येयाच्या उच्चांकामध्ये, जेव्हा की, तो केवळ ३२ वर्षांचा होता, त्याची निर्दयी विजयसंपदा संपुष्टात आली. त्याला विषमज्वर जडला असतानाही त्याने मिष्टान्न व मद्याचे प्राशन चालूच ठेवले आणि त्याला बाबेलोनमध्ये इ.स.पू. ३२३ मध्ये मृत्यु आला. त्याचा मृतदेह मिसरात आणला गेला आणि अलेक्झांड्रिया येथे त्याचे थडगे उभारले गेले. “पहिला राजा” याचे प्रतिनिधित्व करणारे “मोठे शिंग” मोडले गेले. मग, त्याच्या साम्राज्याचे काय झाले?
भविष्यवादाने म्हटले की, त्याचे राज्य मोडून त्याचे विभाग होतील, “तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक यावयाचे नाही.” सिकंदरचा असहाय्य भाऊ अऱ्हीडाऊस याने थोडा काळ राज्य केले, पण याचा वध करण्यात आला. याचप्रमाणे सिकंदरचा औरस पुत्र सिकंदर (अलौ) आणि अनौरस पुत्र हरक्लेस (हर्क्युलस) यांना देखील वधले गेले. अशाप्रकारे, थोर सिकंदर बादशहा, मोठा रक्तपात घडवून आणणाऱ्याचा वंश नष्ट झाला.
शिवाय असे भाकित करण्यात आले की, “त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; [पण] त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहावयाचे नाही.” तसेच त्याचे राज्य “मोडून चार दिशास त्याचे विभाग होतील; . . . त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही.” हे खरेच घडले का?
लवकरच, सिकंदरचे प्रचंड साम्राज्य त्याच्या या चार सेनापतींमध्ये विभागले गेलेः (१) सेनापती कॅसेंडर—मासेदोनिया व ग्रीस. (२) सेनापती लेसीमाखस—आशिया मायनर व पश्चिमी विभाग. (३) सेनापती सेल्युकस निकेटर—बाबेलोनिया, मेदिया, अराम, पर्शिया आणि सिंधु नदीचा पूर्वप्रांत. (४) सेनापती टोलमी लागस—मिसर, लिबिया व पॅलेस्टाईन. भाकित करण्यात आल्याप्रमाणे सिकंदरच्या एका राज्यातून चार हेल्लेणी किंवा ग्रीस राज्ये उद्भवली.a
यापैकीचे मिसरात टोलमीने केलेले राज्य अधिक काळ टिकले. ते रोमपुढे इ.स.पू. ३० मध्ये पडले व तेव्हापासून रोमने ग्रीसची जागा घेऊन ते प्रबळ जागतिक साम्राज्यापैकीचे सहावे साम्राज्य बनले.
मानवजातीपुढे उज्वल भवितव्य उभे आहे
ही जाचक जागतिक साम्राज्ये एकामागोमाग अशीच अबाधितपणे चालू राहणार होती का? नाही, कारण आपण यापैकीच्या शेवटल्या साम्राज्याच्या शेवटामध्ये जगत आहोत असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते.—प्रकटीकरण १७:१०.
ती श्वापदरुपी मानवी सरकारे पाहिल्यावर दानीएलाने वेगळेच काही पाहिले. त्याला स्वर्गातील एक अप्रतिम दृष्टांत घडला, जेथे त्याने “पुराण पुरुष,” स्वतः देवाला, एक राज्य, कोणा भावी मानवी पुढाऱ्याला नव्हे तर “मानव पुत्रासारखा” असणाऱ्या कोणाला तरी देताना पाहिले. हा पुनरुत्थित झालेला व स्वर्गात असणारा येशू ख्रिस्त आहे.—दानीएल ७:९, १०, १३.
केवढी विसंगति! पृथ्वीच्या पूर्वीच्या लढाऊ मानवी राजांपेक्षा हे स्वर्गीय राज्य व त्याचे अधिपत्य केवढे भिन्न दिसणार होते! याविषयीच्या कथनात दानीएल त्या अत्युच्च स्वर्गीय “मानवपुत्रा”विषयी म्हणालाः “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.” (दानीएल ७:१४) हे शांती व धार्मिकतेचे राज्य असणार.—यशया ९:६, ७.
मागील मानवी राजवटीचा परामर्श घेता आपल्याला त्यात लोभ व हिंसाचार दिसतो, पण स्वर्गीय राज्याच्या बाबतीत पहाता, ते आधीच स्थापन झाले असून त्याचा पृथ्वीभरातील नीतीमान अंमल अगदी जवळ आलेला आहे हे जाणणे केवढे आनंद देणारे आहे!—प्रकटीकरण १२:१०, १२.
“हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागणार नाही.”—हबक्कूक २:३.
[तळटीपा]
a सिकंदरच्या साम्राज्याच्या विभाजनानंतर ज्या क्षुब्ध घटना घडल्या त्या “उत्तरेचा राजा” व “दक्षिणेचा राजा” यांच्या भविष्यवादात भाकित केलेल्या आहेत. दानीएलाच्या ११ व्या अध्यायात लिखित करण्यात आलेल्या या भविष्यवादाची विस्तारीत चर्चा, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या “युवर वील बी डन ऑन अर्थ्” या पुस्तकात २२९-४८ पृष्ठांवर आढळेल.
[२७ पानावरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
सिकंदरच्या साम्राज्याचा विस्तार
पेला
सार्दीस
भूमध्य सागर
अलेक्झांड्रिया
मेम्फीस
तेबेस
इसस
दिमिष्क
सोर
यरुशलेम
गोगमेला
फरात नदी
तैग्रीस नदी
बाबेलोन
एक्बटाना
शुशन
पर्सेपोलिस
अलेक्झांड्रियाची मिळकत
तक्षीला
सिंधु नदी
[२९ पानावरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
सिकंदरच्या साम्राज्याचे विभाजन
पेला
लायसीमाखिया
कॅसेंडर
लेसीमाखस
भूमध्य समुद्र
अलेक्झांड्रिया
टोलमी लागस
अंत्युखिया
सेल्युकस निकेटर
सेल्युसिया
[२८ पानांवरील चित्रं]
आधुनिक अलेक्झांड्रियाजवळचा बंदराचा किनारा